एका राजपुत्राचं लग्न

राजपुत्र हॅरीचा क्रमांक आहे पाच. जेव्हां केव्हां सिंहासन मोकळं होईल तेव्हां आधी राजपुत्र चार्ल्सचा (हॅरीचा पिता) क्रमांक पहिला. कारण ते राणीचे सर्वात मोठे पुत्र. त्यांच्यानंतर त्यांचे मोठे पुत्र विल्यम्स (हॅरीचा मोठा भाऊ) यांचा नंबर. त्यानंतर विल्यम्स यांच्या मुलाचा (हॅरीचा पुतण्या) नंबर. विल्यम्सना एक मुलगीही (हॅरीची पुतणी) आहे. तिचाही राणी म्हणून नंबर लागू शकतो, पण आधी क्रमांक तिच्या भावाचा कारण ब्रिटीश परंपरेनुसार आधी अधिकार पुरुषाचा व नंतर स्त्रीचा.त्यानंतर पाचवा क्रमांक आहे राजपुत्र हॅरी याचा. विल्यम्स यांची पत्नी सध्या गरोदर आहे, बाळंत झाल्यानंतर त्यांना आणखी एक मूल होईल.  त्याचा नंबर पाचवा झाला की हॅरीचा नंबर सहावा होईल. ब्रीटनला  परंपरा आवडतात.

तर अशा हॅरीचं लग्न ठरलंय, म्हणजे त्यानंच ठरवलंय. लग्न ठरवण्याची राजघराण्याची परंपरा अशी की राणी सोयरीक ठरवते. म्हणजे तोलामोलाची एकाद्या देशाची राजकन्या राणी शोधतात. सध्या ब्रुनेई आणि जॉर्डनमधे राजेशाही आहे. पण तिथले राजे मुसलमान आहेत. आफ्रिकेत काही राजे आहेत, पण ते काळे आहेत. रहाता रहातो स्पेन किवा न्यू झीलंडचा राजा. म्हणजे निवड करायला अगदीच कमी वाव.  पण अलीकडं भानगड अशी आहे की राजपुत्र राणीला, राजाला विचारतच नाहीत. ते आपल्या प्रिय व्यक्तीला निवडतात.  राजपुत्र कोणातरी मुलीच्या प्रेमात आहेत, तशी कुणकुण त्यांना लागलेली असते. पण राजपुत्र एकदम जाहीर करून टाकतात की अमूक एक मुलगी निवडलीय. हॅरीनंही तेच केलं. कॅलिफोर्नियातल्या एका आफ्रिकन लोकांच्या वस्तीतल्या, टोळी हिंसेसासाठी प्रसिद्ध असलेल्या उपनगरातल्या एका मुलीशी आपण लग्न करणार आहोत असं हॅरीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. एक मोठी दृश्य मुलाखत त्यानं दिली. परस्पर. राणी एजिझाबेथ, राजपुत्र चार्ल्स यांनी आनंद व्यक्त केला. बस. तेवढंच त्यांच्या हाती होतं.

वधू आहे मेगन मर्कल. तिची आई आफ्रिकन आणि वडील गोरे फ्रेंच. मेगन आफ्रिकन दिसते. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि आई गोरी अमेरिकन. ओबामा काळे दिसतात. मेगन टीव्ही मालिकांत अभिनय करते. मेगन तिच्या आईसोबत रहाते, तिच्या वडिलांचा घटस्फोट झाल्यापासून. खुद्द मेगनचाही एक घटस्फोट झाला आहे. मेगन चार पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी बोटस्वानामधे गेली असताना तिची हॅरीशी भेट झाली आणि दोघांनी डेटिंग सुरु केलं.

आधीच ब्रीटन, त्यातून राजघराणं, त्यामुळं पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीचं स्थान आणि पायरी पाहून त्या व्यक्तीशी कसं वागायचं ते ठरवलं जातं. वरच्या पायरीवरच्या माणसाकडं आदरानं पाहिलं जातं, अर्धी पायरी खाली असलेलीही व्यक्ती असली तर खडुस तोडांनं तिच्याकडं पाहिलं जातं. पायरीनुसार पद आणि किताब.वधू राजघराण्यातली तर नाहीच, उलट अगदीच सामान्य घराण्यातली काळी मुलगी आहे. ती चर्च ऑफ इंग्लंडची सदस्य नाही. ती तोलामोची असती तर तिला प्रिन्सेस म्हणजे राजकन्या असा किताब मिळाला असता. तिला बहुदा कुठली तरी डचेस करण्यात येईल पण रॉयल हायनेस असं संबोधलं जाईल.

हॅरीचे वडील राजपुत्र चार्ल्स यांनी डायनाशी लग्न केलं होतं. राजपुत्र चार्ल्सचे कॅमिला पार्कर या अमेरिकन स्त्रीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं डायनाशी त्यांनी तणावातच संसार केला.

हॅरीची आज्जी म्हणजे राणी एलिझाबेथही खरं म्हणजे राणी होण्यातली नव्हती. तिचा काका हा राजाचा मोठा मुलगा असल्यानं राजे होणार होते.  त्यांना एका घटस्फोट होऊ घातलेल्या ब्रिटीश नसलेल्या स्त्रीशी लग्न करायचं होतं. तत्कालीन राजघराणं, लोकसभा, सरकार, चर्च ऑफ इंग्लंड यांच्या मते ते परंपरेत बसत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या डोक्यावरचा राजमुकूट काढून घेण्यात आला आणि तो एलिझाबेथच्या वडिलांच्या डोक्यावर ठेवण्यात आला. एलिझाबेथना भाऊ नसल्यानं त्या राणी झाल्या.

एलिझाबेथचं वैवाहिक जीवन तणावाचंच होतं. कारण त्यांचे पती फिलिप्स माउंटबॅटन ( भारताचे शेवटले व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटन होते, ते वेगळे)  तोलामोलाच्या राजघराण्यातले नव्हते, त्यांचे पूर्वज ब्रिटीश नव्हते. आपल्याला नवरा म्हणून वावरता येत नाही राणीचा प्रजाजन म्हणून वावरावं लागतं ही खंत एलिझाबेथचे पती सतत बाळगत आले आहेत.

हॅरी १२ वर्षाचे असताना डायनांचा अपघाती मृत्यू झाला. वडील चार्ल्स आणि आई डायनांच्या संबंधांवर जाहीर चर्चा झाल्या. राजघराण्यानं त्या साऱ्यावर पांघरूण घातलं तरी सगळ्या गोष्टी समाजासमोर आल्या. आज्जी, वडील यांच्या संसारातले तणाव हॅरीनं पाहिले असल्यानं त्याचं बालपण कोळपलं होतं.

ओठ घट्ट दाबून जगायचं ही राजघराण्याची परंपरा असल्यानं हॅरी गप्प होता, आतून धुमसत होता. जितकं जमेल तितकं तो बकिंगहॅम राजवाड्यापासून दूर रहात असे. दारूच्या नशेत स्वतःला बुडवत असे. राजपुत्र असूनही तो पायलट झाला आणि सामान्य सैनिकाप्रमाणं अफगाणिस्तानातल्या लढाईत उतरला.

एलिझाबेथचे पती म्हणजे हॅरीचे आजोबा यांना पायलट व्हायचं होतं. पण विमान उडवतांना अपघात होऊ शकतो या कारणास्तव ब्रिटीश सरकारनं, पंतप्रधान चर्चिल यांनी पायलट होण्याला कडक विरोध केला. त्यावरून एलिझाबेथ आणि पती यांच्यात प्रचंड तणाव होते आणि ते राजघराण्यातली माणसं पहात होती. एलिझाबेथ यांची बहीण, राजकन्या अँन याही परंपरा झुगारून एका सामान्य हवाई दलातल्या घटस्फोटित अधिकाऱ्याबरोबर संबंध ठेवून होत्या.

डायना आणि तिची दोन्ही मुलं यांच्यात फार जिव्हाळा होता. पोरांचा बापावर रागच होता.  आईच्या अपघाती मृत्यूतून मुलं सावरली नाहीत. मोठा विल्यम त्या मानानं सावरला. त्यानं राजघराण्याचा चेहरा सांभाळला आणि हॅरीला सावरण्याचा प्रयत्न केला. हॅरीला मानसीक उपचार करून घेण्यासाठी त्यानं राजी केलं. त्याचा बोभाटा झाला. राजपुत्र आणि मनोरोगी म्हणजे वृत्तपत्रांना प्रचंड खाऊ. हॅरीचा एक खापर खापर पणजोबा राजा  मनोरोगी झाला होता. राणी, राजपुत्र यांना सत्ता हवी होती, त्या साठमारीचा परिणाम म्हणून राजा मनोरोगी झाला होता.

राजा असो की राजपुत्र. शेवटी ती माणसंच तर असतात. आपल्या आईला बापानं वाईट वागवलं हा सल हॅरीला दूर करता आला नाही. लग्नात वधूच्या बोटात घालण्यासाठी तयार केलेल्या अंगठीमधे हॅरीनं डायनाच्या दागिन्यातले हिरे वापरले आहेत. आपली आई सदैव आपल्यासोबत असावी असं वाटलं म्हणून ते हिरे अंगठीत घातलेत असं त्यानं पत्रकार परिषदेत त्यानं सांगून. बापाची नव्हे, आईची आठवण.

वधू मेगन मर्कल ही थेट सामान्य कर्तृत्ववान स्त्री आहे. संघर्ष करत करत तिनं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. माध्यमांतले जाणकार तिच्या सूट या मालिकेतल्या भूमिकेचं कौतुक करतात. आपल्याला आवडलेल्या एका माणसाशी आपण लग्न करतोय अशा अगदीच मानवी मनस्थितीत त्या आहेत, त्यांना नवल वाटतंय, आनंद होतोय. हॅरीपेक्षा आपण तीन वर्षानी मोठे आहोत याचं त्यांना काही वाटत नाही. प्रेमात पडल्यावर कसलं वय अन् कसलं काय.

मेगन रीतसर आपल्या आजेसासूला भेटायला लंडनला गेली. राणी एलिझाबेथची पहिली भेट झाली तेव्हां राणीसोबत दोन कॉर्गी कुत्री होती. राणीची फार आवडती, राणीसोबत सतत वावरणारी. ही कुत्री फार तिखट आहेत. परकी कोणी आलं की भूंकून, अंगावर धावून हैराण करतात. हॅरीशी त्यांची कधीच दोस्ती होऊ शकलेली नाही. पण मेगनशी मात्र त्या दोघांची दोस्ती झाली, दोघंही मेगनच्या भोवती घोटाळत राहिले. एलिझाबेथ आतून सुखावल्या असतील. कदाचित.

एलिझाबेथ ९१ वर्षाच्या आहेत. १९५२ पासून त्यांनी राजवाडा आणि ब्रिटीश समाज अनुभवला आहे. आई, काका, काकू, आज्जी, बहीण, पंतप्रधान, नोकरशाही यांच्यातले तणाव एलिझाबेथनी अगदी बालपणात असल्यापासून अनुभवले आहेत. एलिझाबेथ यांचं व्यक्तिगत जीवन स्वच्छ आणि संथ आहे पण त्यांचा सभोवताल मात्र गढूळ आहे. राजघराण्यात एकेकाळी एक “ कुरूप, काळी “ राणी आली होती आणि त्यातून काय घोटाळे झाले होते हे एलिझाबेथना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं आहे. एकेकाळी   राजाआजोबाच्या राजाआजोबाच्या राजाआजोबानं  एका लंडनमधल्या अभिनेत्रीशी शरीरसंबंध ठेवले होते,  त्यातून मुलंही झाली होती हा इतिहासही एलिझाबेथच्या शिक्षकानं त्यांना सांगितला आहे.

हे सारं डोळ्यासमोर तरळत असताना हॅरी त्याच्या अमेरिकन काळ्या पत्नीला घेऊन समोर बसला होता. एलिझाबेथना काय वाटलं असेल? आज्जीबद्दल हॅरीला ममत्व आहे की नाही? एलिझाबेथनी कधीही कशाचीही वाच्यता केली नाही. चर्चिल आणि एलिझाबेथ यांच्यात संघर्ष असतानाही त्या कधी बोलल्या नाहीत. त्यामुळं हॅरी आणि त्याचं लग्न या बद्दल काय वाटतंय ते एलिझाबेथ बोलणार नाहीत. पण एक नक्की घडलं असेल  ते सॉलिड हृद्य आणि नाट्यमय असणार.

तर असा हॅरी, त्याची मैत्रीण मेगन,  मे महिन्यात लग्न करणार आहेत. कधी काळी फोटोग्राफीचा शोध लागला तेव्हां तत्कालीन  राजानं लग्नप्रसंगाचे फोटो काढले होते आणि त्यात त्या काळाच्या फॅशननुसार राणीनं राजाच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला होता. त्यावर ब्रिटीश माणसं आणि राजघराणं जाम खवळलं होतं. आता हॅरी आणि मेगन एकमेकाच्या कंबरेभोवती हात लपेटून फिरतांना काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. पण आता जनता खवळलेली नाही. जनतेला मजा येतेय. जनतेला हा राजपुत्र आपल्यातला वाटतोय. तो पोरकटपणे वागला, त्यानं दारू पिऊन धमाल  उडवली हे लोकांना माहित असलं तरीही हॅरीबद्दल जनतेला आपलेपणा वाटतोय. लोक त्याला समजून घेताहेत. लोकांना तो आपल्यातला वाटतोय.

राजघराणं असावं की नाही, थाटामाटात लग्न करावं की नाही यावर विचारवंत मंडळी   चर्चा घुसळत आहेत.   ब्रिटीश जनता म्हणतेय की सध्याच्या बिकट आर्थिक राजकीय स्थितीत राजपुत्राचं लगीन हा एक छान विरंगुळा आहे. कम ऑन, लेट अस एंजॉय असं ब्रिटीश माणसं म्हणत आहेत.

।।

 

7 thoughts on “एका राजपुत्राचं लग्न

 • December 1, 2017 at 12:10 PM
  Permalink

  माझ्या कल्पनेप्रमाणे युरोपात बेल्जियम, स्वीडन या देशांमध्येही राजेशाही आहे. ग्रेस केली ही अमेरिकन अभिनेत्री मोनॅकोची राणी झाल्याची घटना आहेच.

  असो. कितीही तटस्थपणे लिहिलेलं असलं, तरी ग्रेड वन human interest story आहे. धन्यवाद!

  Reply
 • December 1, 2017 at 2:46 PM
  Permalink

  निळू,

  लग्नाचे आमंत्रण मिळाले का?

  अ.पां.देशपांडे

  Reply
 • December 1, 2017 at 5:21 PM
  Permalink

  (१)एलिझाबेथचं वैवाहिक जीवन तणावाचंच होतं. कारण त्यांचे पती माउंटबॅटन………..(हे माउंटबॅटन कोण ?)
  (२)हॅरीचे वडील फिलिप्स यांनी डायनाशी लग्न केलं होतं……(मग एलिझाबेथचे पती कोण? आणि प्रिन्स चार्ल्स आणि डायनाचे काय नाते होते ?)
  (३)राजपुत्र फिलिप्सचा (हॅरीचा पिता)………..(मग राजपुत्र चार्ल्स हॅरीचे कोण?)
  –ह्या लेखामुळे माझ्या मनात ब्रिटीश राजघराण्यातील नातेसंबंधा बाबत
  प्रचंड घोटाळा निर्माण झाला आहे हे मात्र खरे!

  Reply
  • December 1, 2017 at 6:35 PM
   Permalink

   एलिझाबेथचे पती फिलिप्स माऊंटबॅटन. भारताचे शेवटले व्हाईसरॉय होते लुई माऊंटबँटन,ते एलिझाबेथचे पती नव्हेत.
   हॅरीचे वडील म्हणजे डायनाचा नवरा म्हणजे एलिझाबेथचा मुलगा म्हणजे प्रिन्स चार्ल्स. चुकून फिलिप्स असं लिहिलं गेलं.
   नाते संबंध असे. एिलझाबेथ+फिलिप्स यांचा मुलगा चार्ल्स. त्याचं लग्न डायनाशी झालं. डायनापासून त्याना विल्यम्स आणि हॅरी ही दोन मुलं.
   डायनाच्या मरणानंतर चार्ल्स यांनी कॅमिला पार्करशी लग्न केलं.

   Reply
 • December 1, 2017 at 5:48 PM
  Permalink

  ब्रिटीश राजेशाही घराण्याचा इतिहास सर्वसामान्यांना कळेल अशा शब्दात लिहिला आहेत. मला व बायकोला आवडला.

  Reply
 • December 2, 2017 at 12:28 AM
  Permalink

  मेगन मर्कल सुरेख हस्ताक्षरात (कॅलिग्राफी) साहित्यिक दर्जाचे लेख प्रसिद्ध करून पैसे मिळवत होती. अनेक जणांच्या लग्नपत्रिका स्वहस्ताक्षरात लिहून देण्यात तिची कला विशेष असे. तिचे खरे नांव ‘रेचल मेघन मार्कल’ असे आहे. तिची विनोद बुद्धी तल्लख असून ‘WHEEL OF FORTUNE’ सारख्या TV शोज मध्ये HIGH HILLS असलेले बूट घालून ती व्हील फिरवण्याचे काम करत असे -ज्यामुळे चेहऱ्यावर खोटे हास्य ठेवून पाय दुखू लागल्यामुळे ‘तो कधी संपतो’ याची ती वाट बघत राही. “सांगणार कुणाला? पैसा झाला खोटा”, असं तीच म्हणते. ‘Elle Magazine’ मध्ये लेख लिहिताना, “Being biracial paints a blurred line that is equal parts staggering and illuminating.”, असं सांगते. सोशल वर्कमध्ये तिला मास्टर्सची पदवी असून याच क्षेत्रात BOTSWANA या आफ्रिकन देशात तिची हॅरीशी भेट झाली. शिकागो जवळील NORTH WESTERN या प्रसिद्ध विद्यापीठातून COMMINICATION विषयात तिने BS केलेले असल्यामुळे इंग्लंडची राणीच काय, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबास ती पुरून उरेल -असं मला वाटते. या पार्श्वभूमीवर आमचा HARRY नक्कीच भाळला असावा आणि तो देखील राजपुत्रासारखा न वागता तुमच्या-आमच्याप्रमाणे वागत असल्यामुळे जगभर सर्वत्र आनंदी आनंद आहे!

  Reply
 • December 8, 2017 at 5:43 PM
  Permalink

  khoop chhan lekh aahe.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *