त्यांना गुरूचं स्थान कोणी दिलं? त्यांच्या पायवर डोकं कोणी ठेवलं? जनतेनंच ना?

                                      राम रहीम

गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या आरोपावरून वीस वर्षाची सजा कोर्टानं सुनावलीय. गुरमीतचा आश्रम, आश्रमातले अनैतिक, बेकायदेशीर व्यवहार इत्यादी गोष्टी आता साऱ्या जगाला माहीत झाल्या आहेत. गुरमीत विकृत होता. मनोरोगी होता.गुरमीतनं एक स्वतंत्र देशच चालवला होता आणि भारत नावाच्या देशातले कायदे गुरमीतच्या डेरादेशाला लागू नव्हते याची माहितीही बाहेर येतेय. गुरमीतचं साम्राज्य उभं राहिलं ते राजकीय आश्रयामुळं हेही आता पुरेसं स्पष्ट झालंय.

दुसरे एक भीषण आसाराम बापू सध्या तुरुंगाची हवा खाताहेत. टँकरनं लोकांवर रंग शिंपडणारे, गर्भार स्त्रीला डोहाळे येतात तेव्हां तिला मुकुट, कमरपट्टा, मनगटपट्टा वगैरे घालून झोपाळ्यावर बसवतात, तसेच झोपाळ्यावर झुलणारे हे आसाराम बापू. त्यांच्यावरही बलात्काराचे आरोप आहेत, खुनाचे आरोप आहेत.

संत रामपालही सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर खून आणि बलात्काराचे आरोप आहेत.

असे अनंत विकृत अद्यात्मिक धार्मिक पुरुष देशभर पसरलेले आहेत.गुरमीतला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं या महाराज सत्पुरुष परमात्म्यांबद्दलचे तपशील जगाला माहित झाले.

गुरमीत यांच्यापेक्षा वेगळी  गुन्हेगार वर्तणुक श्रीश्रीरवीशंकरनी केली आहे. त्यांनी यमुनेच्या काठावर एक मोठ्ठाच्या मोठ्ठा कार्यक्रम घडवला. यमुनेच्या पात्राची वाट लावली, भरुन न येणारं नुकसान केलं. न्यायालयानं रोखलं असतानाही न्यायालयाला धाब्यावर बसवून श्रीश्रीनी प्रचंड बांधकामं पात्रात केली. समाजाचं धार्मिक, सांस्कृतीक, अद्यात्मिक बळ पर्यावरणापेक्षा जास्त  महत्वाचं आहे असं ठासून सांगत त्यांनी कायदे पायाखाली तुडवले. कोर्टानं सांगितलेला दंडही भरायला हा माणूस तयार नाही.

गुरमीत ते श्रीश्री अशा विविध छटांच्या गुन्हेगार माणसांना राजकीय आश्रय आहे.सर्व राजकीय पक्षांनी त्यांना आश्रय दिला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, सेनापती, उद्योगपती इत्यादी मंडळी या गुन्हेगारांची भक्त आहेत. या सर्व मंडळींच्या पाठिंब्यामुळं आणि मदतीमुळंच वरील गुन्हेगारांची साम्राज्यं उभी राहिली आहेत. या गुन्हेगारांच्या प्रभावामुळं राजकीय पक्षांना मतं मिळत असतात.

गुन्हेगार नसलेलेही अनेक गुरु भारतभर आहेत.  सद्गुरु पै, नानासाहेब धर्माधिकारी, पांडुरंगशास्त्री आठवले हे सज्जन,  अद्यात्मिक धार्मिक लोक होऊन गेले,पण त्यांचे वारस अजूनही आहेत.  अनिरुद्ध बापूंची मोजदाद वरील माणसांमधे करता येईल. ही काही प्रसिद्ध नावं. गावोगावी प्रचलीत असलेले पण तेवढा गवगवा नसलेले अनंत महाराज, सत्पुरुष महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. या सर्वांचे आश्रम असतात, मठ असतात, भेटण्याच्या जागा असतात, कार्यक्रम असतात. यातल्या अनेकांचं काम पिढीजात चालतं, सद्गुरुंचा मुलगा, धर्माधिकारींचा मुलगा, पांडुरंगशास्त्रींची मुलगी अशा रीतीनं पिढ्यानपिढ्या हे काम चालतं. याला कोणी व्यवसाय म्हटलेलं त्यांच्या अनुयायांना आवडणार नाही पण एकूण व्यवहार व्यवसाय या सदरात मोडावा अशा प्रकारचा असतो.

गुरमीत आणि वरील सज्जन माणसं यात फरक आहे. वरील सज्जन माणसांनी अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत. वरील लोकांनी राजकारणाची वाट घेतलेली नाही, राजकीय पक्षांना त्यांचा थेट वापर करता आलेला नाही. वरील सज्जन माणसांचं एक महत्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे ही माणसं प्रवचनकार आहेत, ते  प्रवचनातून लोकांना  चांगलं वागायला शिकवतात. चांगलं म्हणजे काय तर साधारणपणे संत वगैरे सांगतात ते किंवा गीतेत सांगितलंय ते. कुटुंबात रहा, आपापली कामं सचोटीनं करा, परोपकार करा असं ही माणसं सांगत असतात. कोणत्याही बेकायदेशीर, अनैतिक वर्तनाचं समर्थन ही माणसं करत नाहीत,   तसं वागणं बरोबर नाही असंच सांगतात.

अशा प्रकारच्या  सज्जन प्रवचनकार अद्यात्मिक पुरुषांमधे काहीनी  एकेक जात पकडून ठेवली आहे. कोणी उघडपणे कबूल करत नाही पण विशिष्ट जातींचे पाठिराखे त्यांनी गोळा करून ठेवले आहेत. वरवर ही माणसं जातीपाती नष्ट करा, जाती पाळू नका असं सांगतात पण  वागतात मात्र नेमकं वेगळं. बोलणं एक आणि वागणूक दुसरीच ही भारतीय परंपरा हे अद्यात्मिक पुरुष पाळत असतात.

                                 आसाराम बापू

गुरमीत ते सज्जन ते गावोगावचे महाराज यांमधे एक समान सूत्र आहे. ही सर्व मंडळी धर्म, संस्कृती, अद्यात्माची भाषा करतात आणि त्यासाठीच त्यांना करोडो अनुयायी लाभतात. या मंडळींचे उत्सव होतात, सत्संग होतात, निरनिराळी धार्मिक सामुहीक कृत्यं होतात आणि त्यात करोडो माणसं वर्षातून अनेक वेळा सामिल होत असतात. गंमत म्हणजे ही अनुयायी माणसं स्वतंत्रपणे देवळात जात असतात, सतत आणि वेगळी निमित्त साधून. नवी गाडी घेतली की देवळात, लग्न झालं की देवळात, मूल झालं की देवळात, बढती मिळाली की देवळात, आजार दूर झाल्यावर देवळात. लग्न होत नसेल, बढती होत नसेल, भ्रष्टाचाराचं बालंट आलं असेल तरीही ही मंडळी सुटका मागण्यासाठी देवळात जातात.  शिवाय गणेशोत्सव असतो, नवरात्र असतं, इतरही जत्रोत्सव असतात.

वरील सर्व गोष्टी शेकडो वर्षं, दिवसरात्र, बारोमास चालू असतात. यातून माणसांना चांगलं वागा असा संदेश दिला जात असतो. प्रश्न असा पडतो की इतकी शतकं दिवसरात्र चांगलं वागा असा संदेश कां द्यावा लागतो? गीता आहे, गीतेवर अनेकांनी केलेली भाष्यं आहेत, शेकडो संत आहेत आणि त्यांनी केलेल्या रचना आहेत, अनंत देव आहेत आणि त्यांची स्तोत्रं आणि आरत्या आहेत. हे सारं कायम कानावर पडत असताना पुन्हा पुन्हा महाराज, बुवा, प्रवचनकार, बाबा यांच्याकडं कां जावं लागतं?

अद्यात्म आणि धर्मवाल्यांचं म्हणणं असतं की लोकं असहाय्य झाल्यामुळं देवाधर्माकडं वळतात.

देशात गरीबी आहे, विषमता आहे, शेतीची अवस्था वाईट आहे, उद्योगात बेकारी आहे, पर्यावरणाचा सत्यानाश झाला आहे, अनारोग्य पसरलं आहे. हे सारं दूर करण्यासाठी सरकार, शाळा कॉलेजं, इस्पितळं, न्यायालयं इत्यादींची सोय आहे परंतू त्या साऱ्या गोष्टी निरुपयोगी ठरलेल्या आहेत. सगळा देशच भ्रष्टाचारानं आणि बिनकामाच्या शॉर्टकनं भरलेला आहे अशा परिस्थितीत लोकांनी कोणाकडं पहावं असा प्रश्न अद्यात्मवाले विचारतात.

त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हलक्या आवाजात मोदी, ठाकरे, पवार, पनीरसेल्वम, लालू यांची नावं घेतात. वरवर उल्लेख  गणपती, शंकर, ब्रह्मदेव, सरस्वती, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी असे करतात पण प्रत्यक्षात वरील नावांशी विपरीत वर्णन करणाऱ्यांची पाठराखण करतात, त्यांच्या मदतीवर आपापली कामं चालवतात. सगळीच नसली तरी बरीचशी मंडळी हा उद्योग करत असतात.

धर्म किंवा ही संत महाराज इत्यादी माणसं जे जे करा म्हणून सांगतात ते अगदी साधं आणि उघड आहे.  भारतीय राज्यघटना आणि कायद्यात ते सारं सांगितलेलं आहे.  हुंडा घेतला तर शिक्षा होते. लुटालूट केली, खोटे चेक दिले, कबूल केलेले पैसे दिले नाहीत, रस्त्यावर घाण केली, संगीत वाजवून व इतर वाटांनी शेजाऱ्याला त्रास दिला, प्रदूषण केलं, अत्याचार केला, बलात्कार केला, खोटं बोललं, केलेले करार पाळले नाहीत, नेमून दिलेलं काम केलं नाही या साऱ्या गोष्टींना शिक्षा होते. मग वरील गोष्टी सांगण्यासाठी अद्यात्मिक गुरु माणसाला कां लागतो?

                                 संत रामपाल

आपल्या देशातली माणसं मनानं कमकुवत आहेत काय? त्यांचा नैतिक पाया कच्चा आहे काय? हज्जारो वर्षांच्या धर्मांच्या व सत्पुरुषांच्या संदेशांच्या माऱ्यानंतरही सतत त्याला चांगलं वाग चांगलं वाग म्हणून सांगावं लागतं इतका हा समाज मानसीक अशक्त आहे? कायद्यानंही सांगितलं असताना त्याच्या डोक्यात चांगलं वागणं शिरत नाही याचा अर्थ त्यांना कायदाही समजत नाही असा घ्यायचा काय? माणसानं तयार केलेली राज्यघटना ती देवानं सांगितलेली नाही म्हणून लोकांना अमान्य आहे काय?  धर्म ही गोष्ट हज्जारो वर्षं सांगूनही लोकांना स्पष्ट होत नाही, धर्माचा अर्थ सांगण्यासाठी दर हजार माणसांसाठी एक गुरुबिरू लागतो याचा अर्थ धर्मातच बराच घोळ किंवा संदिग्धता आहे काय?

शंभर, पाचशे, हजार, दहा हजार, पन्नास हजार वर्षांपूर्वी  काही देव नावाच्या कोणी तरी सांगीतली. देव नावाचा फार पॉवरफुल गृहस्थ ती तत्व न पाळणाऱ्यांना शिक्षा करतो असं सांगितलं गेलं.  ती तत्व पाळली तर पॉवरफुल देव लोकांना  नाना प्रकारे बक्षीसं आणि सुख देतो असं सांगितलं गेलं. हे सारं  कित्येक हजार वर्षं माणूस ऐकत आला आहे. काळ बदलत गेला तरी तो पॉवरफुल देव शिल्लकच दिसतो. स्त्रीला पाळी आली असताना ती अशुद्ध असते असं सांगणारा देव आता स्त्रीला पाळी येणं यात अशुद्धता नाही हे सिद्ध झालं तरी  शिल्लक आहे. समाजाला कोण घातक आहे ते सांगून त्यांचा नायनाट करायच्या आज्ञा देव देत असे. देव सांगत असे की तुमच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्यांना मारून टाका. आता असं कोणालाही कधीही मारून टाकता येत नाही. कोणतंही कृत्य करतांना कायद्याची चौकट पाळावी लागते, धर्माची आज्ञा नव्हे. कोणाला तुरुंगात घालायचं असेल, कोणाची इस्टेट जप्त करायची असेल, कोणाला दंड करायचा असेल तर  योग्य कायदेशीर  प्रक्रिया करावी लागते. असं असलं तरी लोकांना शिक्षा करायला देव शिल्लक आहे.

खरं म्हणजे माणसाच्या जगण्यातल्या बहुतेक सर्व गोष्टींचा विचार आता कायद्यानं केला आहे. राज्यघटना सार्वभौम झाली आहे. कायदा आणि राज्यघटना यात परिस्थितीनुसार बदलही केले जातात.  माणसाच्या जगण्याचा सार्वजनिक भाग आता कायद्याच्या कक्षेत येतो.

अशा परिस्थितीत देव, धर्म आणि त्याचे अर्थ सांगणाऱ्या लोकांना समाजात कोणत्या प्रकारचं स्थान आहे? एक लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली आहे.  देशाची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असायला हवी हेही या व्यवस्थेत माणसं ठरवतात. अन्याय झाला, त्रुटी शिल्लक असल्या तर त्याही दूर करण्याची संस्थात्मक व्यवस्था समाजात सिद्ध झाली आहे.असं असताना  बाबा, गुरु, महाराज, प्रवचनकारांची आवश्यकता काय?

                                       श्रीश्री

आज घडीला देव, धर्म आणि अद्यात्माचं श्रेत्र अतीशय निरुंद आणि मर्यादित झालेलं आहे.  जगण्यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरेशी स्पष्टता आली आहे. तरीही कित्येक बाबतीत विज्ञान, कायदा अपुरा पडतो.  जगातल्या सर्व गोष्टींवर विज्ञानात उत्तरं नाहीत. विज्ञान माहिती देतं पण जितकी माहिती देतं तितकं अजून किती तरी अज्ञान शिल्लक आहे हेही स्पष्ट करतं. माणसाचं आणि समूहाचं वर्तन कित्येक वेळा इतकं बुचकळ्यात पाडतं की विज्ञान, कायदा इत्यादीमधे उत्तरं सापडत नाहीत. नीतीमत्तेनं आणि सचोटीनं वागूनही आपल्यावर अन्याय का होतो याचं उत्तर माणसाला सापडत नाही. अशा स्थितीत माणूस असहाय्य होतो, सैरभैर होतो. तराफा शोधण्याचा प्रयत्न करतो. या संदिग्ध अवस्थेत, पोकळीत देवानं स्थान मिळवलं, टिकवलं आहे.

गेल्या दोनेकशे वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, वस्तू, बाजार या घटकांनी समाजाचं नियंत्रण करायला सुरवात केली. धर्म आणि देव यांचा समाजाचं नियंत्रण करण्याचा एकाधिकार वरील गोष्टींनी हिरावून घेतलाय. धर्म आणि देवाचं स्थान खूपच नियंत्रित झालंय. देवाधर्मामधे त्यातून एक असुरक्षितता निर्माण झालीय. आपलं स्थान, आपलं महत्व, पुन्हा प्रस्थापित करण्याची धडपड देवधर्म बुवा महाराज प्रवचक इत्यादींच्या वाटेनं करतोय.

समाजाचं नियंत्रण म्हणजे नेमकं काय, कोणकोण नियंत्रक आहेत इत्यादींची जाणीव शिक्षण, माध्यमं, कला, ज्ञान निर्मिती या क्षेत्रामधून होत असते. ही क्षेत्रं माणसाच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करतात,  माणसाला अधिक जबाबदार आणि जगण्याला लायक बनवतात. या प्रक्रियेत लोकनियुक्त सरकार आणि राज्यघटना हे दोन महत्वाचे घटक आणि टप्पे आहेत. नियंत्रणाचा हा खटाटोप भारतीय माणसानं अजूनही समजून घेतलेला नाही.

समाजातला दुराचार आणि दुःख यावर देव,  व्रतं-विधी-उत्सव हे उपाय नाहीत, त्या गोष्टी म्हणजे डोकं दुखताना लावायचा बाम आहे हे लोकांच्या अजून लक्षात आलेलं नाही. गरीबी, विषमता, अनारोग्य, अस्थिरता हे दोष दूर करण्यात  लोकशाही व्यवस्था अपुरी  पडत आहे हे खरं.  पण उपासना हा उपाय नाही, आपल्या समाज बांधणाऱ्या संस्था अधिक मजबूत करणं, त्या अधिक निर्दोष करणं, त्या प्रभावी करणं हाच उपाय आहे. भले तो उपाय दीर्घ काळ घेणारा आणि कष्टाचा असेल.

गुरमीत तुरुंगात गेला. तुरुंगात पडलेल्या आसारामलाही उद्या भरपूर शिक्षा होईल. रामपालवरचे गुन्हेही सिद्ध होतील. चार दिवसांनी सारं काही पूर्वीसारखंच सुरु होईल. भ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजपच्या जागी भ्रष्ट आणि अकार्यक्षम काँग्रेस किंवा जनता दल किंवा शिव सेना किंवा अद्रमुक राज्यावर येईल. टीबी, मलेरियाचे बळी वाढतच रहातील. विषमता शिल्लक राहील, बहुसंख्य माणसं दुःखात रहातील. बंडल विद्यापीठाच्या साच्यातून बंडल विद्यार्थी  बाहेर येत रहातील. माणसं अधिक असहाय्य आणि हताश होतील.

कमकुवत, मनानं हरलेला आणि शरण गेलेला, उपकारशरण    समाजच गुरमीत इत्यादी अद्यात्मिक-धर्मपुरुषांना जन्मला घालतोय.

भावना आटोक्यात ठेवून  बुद्धी आणि विचारशक्ती आणि तर्काचा जास्त वापर करणारा समाज तयार होणं आवश्यक आहे.

।।

 

 

9 thoughts on “त्यांना गुरूचं स्थान कोणी दिलं? त्यांच्या पायवर डोकं कोणी ठेवलं? जनतेनंच ना?

 • September 2, 2017 at 3:22 AM
  Permalink

  लेख वाचला.आत्यंतिक आस्तिक मनोवृत्तीच्या परंतु अतीव परखड, सारासारभेदाची संवेदना (सारासारविवेक मुद्दाम म्हणत नाही आहे कारण, त्याबद्दल खात्री नाही वाटत) असणारे माझ्यासारखे कोणतेही मन दुःखी होईल अशीच स्थिती सध्या समाजात फोफावली आहे. मेकॉलेप्रणीत शिक्षणामुळे सर्वच लोकांमध्ये स्वकीय प्रथा-परंपराबद्दल अविश्वास निर्माण व्हायची प्रक्रिया गेले दीड शतक बलिष्ट होत चालली आहे. अश्या स्थितीत “गुरु” ह्या पदाचे महात्म्य वाढीस लागणे साहजिकच आहे. प्रत्येक व्यवस्थेची ती साहजिक संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे. आणि जीवशास्त्रीय सिद्धांनुसार प्रतिक्षिप्त क्रिया (reflex)विवेकी प्रतिक्रियेपेक्षा (voluntary,thoughtful response) कमी प्रमाणात संचलित असते. पण, त्यामुळे कोणतीही व्यवस्था संपूर्णतया चांगली वा वाईट नसते. तिची गर्हणीयता वा त्याज्यता दृष्टिकोणात्मक असते. यास्तव धर्मसंस्थेवर सवंग दोषारोप टाळायलाच हवा. सापेक्षतावाद हा असाही असू शकतो ह्याची जिज्ञासुंनी नोंद घ्यावी (मान्य करा असा आग्रह नाही).
  आता राहता राहिला प्रश्न गुरमीत राम रहीम ह्यांचा. पंजाबमधील माझ्या वास्तव्यात मला तिकडचे वर्तमान व वर्धमान (ह्याचा धार्मिक अर्थ लावू नये) आध्यात्मिक वस्त्राचा पोत (texture of spiritual & religious fabric) मला जवळून पाहता आला. आध्यात्मिक गुरु व परंपरा नदीप्रमाणे काम करतात, विधायक आणि विघातक अशी ध्रुवीय रुपे एकाच वेळी आपल्याला पहावयास मिळतील. नदीकाठावर असेपर्यंत शीतल व आनंददायी वाटते तसेच हे आध्यात्मिक गुरु व परंपरा वर्तन करतात. परंतु, नदीच्या पात्रात मध्यात व खोली जास्त असलेल्या भागातल्या जलावर्तांप्रमाणे ह्याच आध्यात्मिक गुरु व परंपरा विघातक रुपही धारण करतात. त्यामुळे आध्यात्मिक गुरु व परंपरांच्या अत्याचारपीडितांमध्ये आहारी गेलेल्यांचीच संख्या अधिक असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. आध्यात्मिक गुरु व परंपरांच्या ह्या स्खलनशीलतेला स्थानिक व राष्ट्रीय आर्थिक व राजकीय पाठबळही असते. आध्यात्मिक गुरु व परंपरा ह्या राजकीय खेळांत game-changer ची भूमिका निभावत असतात. हरयाणा , हिमाचल प्रदेश व २०१४ च्या राष्ट्रीय निवडणुकांत गुरमीत राम रहीमने “एकगठ्ठा” १.५ कोटी मते भाजपला मिळवून देण्याची किमया साधली होती अशी वदंता आहे. नुकत्याच झालेल्या पंजाबातील निवडणुकांत जनमताची आदर करत गुरमीत रामरहीम ह्यांनी भाजप-अकालीला मतदान न करण्याचा आदेश अनुयायांना दिला होता. हा खटला त्या पार्श्वभूमीवर गडद रुप धारण करत जातो. तसेच, “त्रिवार तलाक”च्या निर्णयामुळे दुखावल्या गेलेल्या व त्याबद्दल वाचाळपणा करणारा मुस्लिम धर्मगुरुंच्या जो एक विशिष्ट वर्ग आहे त्याला ही एक लेकी बोले सूने लागे तत्वाने अप्रत्यक्ष सूचना आहे असे मला वाटते.

  Reply
 • September 2, 2017 at 1:13 PM
  Permalink

  सुंदर लेख पण लक्षात कोण घेतो ?

  Reply
 • September 2, 2017 at 2:14 PM
  Permalink

  Unfortunately, this will happen as long as people do not analyse the behaviour of these fake Gurus before accepting someone as Guru.
  It will be enlightening for many Indians to search web for similar incidences in Church and also Pope’s comments on this subject.
  Less said the better about Jihadis working in the name of Allah.
  May be ND can write a blog ot two on these topics.
  The whole spiritual movement has nothing to do with science or scientific temper(ST). Someone who will go solely by ST, is more likely to reject spirituality totally. It is like trying measure height with weighing scale and say height does not exist.

  Reply
 • September 2, 2017 at 6:35 PM
  Permalink

  Adwait Godse says:
  September 2, 2017 at 3:22 AM
  “लेख वाचला.आत्यंतिक ‘आस्तिक मनोवृत्तीच्या परंतु अतीव परखड, सारासारभेदाची संवेदना (सारासारविवेक मुद्दाम म्हणत नाही आहे कारण, त्याबद्दल खात्री नाही वाटत) असणारे माझ्यासारखे’ कोणतेही मन दुःखी होईल अशीच स्थिती सध्या समाजात फोफावली आहे.” ……. अहो, घरची पायरी उतरून रस्त्यावर पाय ठेवला की अश्या प्रकारचे वर्तन विविध प्रकारे अनादी काळापासून सुरु आहे व सध्या ते फोंफावत आहे आणि म्हणून ‘आस्तिकाने नास्तिक होणे’ बुद्धिजीवी माणसास कां आवश्यक आहे -असे निळू दामले यांना म्हणायचे असावे, अशी किमान शंका देखील मनास चाटून गेली नाही कां? …. असो, लेख अप्रतिम आहे परंतु ज्या देशात ९२ टक्के प्रजा श्रद्धा, तत्वज्ञान आणि मूर्तिपूजा यांमध्ये दंग आहे, तिथे हे ‘माणसांचे अवतार’ असेच जन्म घेत राहणार, -हे खेदाने सांगावेसे वाटते. मराठीतील कित्येक प्रथितयश मंडळी प्रत्यक्षात नास्तिक असून देखील सामाजिक दडपणामुळे स्वप्रजेच्या भावना दुखावू नयेत म्हणून या बाबतीत चिडीचूप राहून स्वताःत ‘देवपण’ निर्माण करून गेलेली आढळतात. “ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत ‘गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण’ असल्याचे म्हणत असतील अशा देशात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होऊ शकणार? ‘मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्माचे लोक मूळ भारतीय नसल्याने त्यांना या देशात अल्पसंख्याकांसाठीच्या कुठल्याही सुविधा मागण्याचा हक्कच नाही,’ असं विधान करणारे आपले राष्ट्रपती असतील, तर ते सामान्य नागरिकांना घटनात्मक संरक्षण कसे देऊ शकतील?”.. असे सवाल ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी उपस्थित केले.

  Reply
 • September 2, 2017 at 8:26 PM
  Permalink

  लेख वाचला. लेख वाचताना या बुवाबाजी संदर्भात तळपायाची आग मस्तकात जात होती. मला या सगळ्या रामाचं नाव धारण केलेल्या मंडळींवर तितका राग येत नाही जितका आपल्या शिक्षण व्यवस्थेवर येतो.
  का नाही आपल्या शाळेतून शिकून निघालेलं मूल परखडपणे प्रश्र्न विचारू शकत नाही. त्यांना कधीही प्रश्र्न विचारण्यास प्रोत्साहन दिलं जात नाही. विचारलाच तर उत्तरादाखल मार तरी मिळतो नाहीतर टिंगल तरी केली जाते. आपल्या शाळातून फक्त (अपवाद वगळता) भेकड कारकून बाहेर पडतात. जे स्वत:हून विचार करू शकत नाही. ज्यांचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्र्वास नसतो. म्हणूनच हे असल्या बाबांचे आणि बांचे स्तोम माजते.
  शिक्षण व्यवस्थेत स्वयंविचारी आणि शास्त्रीय दृष्टीकोन बाळगणारे शिक्षक आले पाहिजेत.

  Reply
 • September 3, 2017 at 11:40 AM
  Permalink

  Guru is like addiction to we people. God too. We all are responsible for the bad deeds of these so called Gurus. Why only blame them? Let us condemn ourselves too.
  Good article Niloo

  Reply
 • September 3, 2017 at 11:40 AM
  Permalink

  Guru is like addiction to we people. God too. We all are responsible for the bad deeds of these so called Gurus. Why only blame them? Let us condemn ourselves too.
  Good article Niloo

  Reply
 • September 3, 2017 at 7:21 PM
  Permalink

  Very thought provocative but true and people should learn to introspect.and change their attitude towards such baba and Guru.

  Reply
 • September 5, 2017 at 4:06 PM
  Permalink

  निळू,

  लेख वाचला. नेहमीपेक्षा खूप लांब आहे. मात्र लेख विचार करायला लावणारा आहे. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढारले तरी भारतीय समाज आहे तिथेच राहणार व ह्या बुवांची संख्या वाढत राहणार. उगाच त्यांच्याशी भांडू नका. निळूबुवा होउन मोकळे व्हा.
  अ.पां.देशपांडे

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *