दुर्गा, न्यूड. फिल्मस. समाजानं काय पहावं आणि काय पाहू नये असं ठरवण्याचा अधिकार सरकारला असावा काय?

” दुर्गा ” ही फिल्म गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवायला केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यानं नकार कां द्यावा? तसा नकार देण्याचा अधिकार त्या खात्याला असावा काय?

फिल्ममधलं एक मुख्य पात्र दुर्गा आहे. दुर्गा आणि तिच्या सोबत असणारा कबीर  रात्री रेलवे स्टेशनकडं जाण्यासाठी एका व्हॅनमधे लिफ्ट घेतात. तिथून कथानक सुरू होतं. गाडीत असलेले पुरुष, नंतर मधे येणारे पोलीस पुरुष दुर्गाला कसं वागवतात याचं चित्रण चित्रपटात आहे.

व्हॅनमधली माणसं दुर्गाकडं एक सेक्सवस्तू आहे अशा रीतीनं पहात होती. त्यावरून चित्रपटाचं शीर्षक सेक्सी दुर्गा असं ठेवण्यात आलं होतं. वाद नकोत म्हणून दिद्गर्शकानं नावातला सेक्सी हा शब्द काढला आणि निव्वळ दुर्गा येवढंच नाव ठेवून चित्रपट सादर केला.

चित्रपटभर दुर्गेला कसा त्रास दिला जातो ते दिग्दर्शकानं थरारक रीतीनं दाखवलं आहे. चित्रपटाचं कलामूल्य अनेक समीक्षकांनी वाखाणलं आहे.

चित्रपटात एका दृश्यात केरळमधील गरुडन थोक्कम या   धार्मिक विधीचंही चित्रण केलं आहे.या विधीत देवी कालीसमोर पुरुष स्वतःच्या अंगात घुसवलेल्या हूकनं वाहनं खेचतात. पुरुष स्त्रीसाठी स्वतःला कसे क्लेष करून घेतात आणि पुरुष स्त्रीला कसं क्लेष देतात अशा दोन्ही गोष्टी  दिद्गर्शकानं दाखवल्यात.

” दुर्गा ” ला  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वात  पुरस्कार मिळालेत.

कुणी माणसांनी म्हणे सेक्सी दुर्गा या नावाला आक्षेप घेतला होता. त्यांच्या  हिंदू भावना दुखावतात असं त्या संख्येनं आणि वकुबानं किरकोळ माणसांचं मत होतं.  सोशल मीडियात काहींनी लिहिलं की कलाकार नेहमीच अशा रीतीनं हिंदू देवदेवतांची टिंगल करतात, अवहेलना करतात,  चित्रपट तर दाखवला जाताच कामा नये पण फिल्म काढणाऱ्यांना झोडलं पाहिजे.

गेली काही वर्षं सोशल मीडियामधे ” हिंदुत्वाचं ” निशाण आणि शस्त्र हाती घेतलेली माणसं वावरत आहेत. चित्रकार हुसेन यांची प्रदर्शनं या मंडळींनी बंद पाडली. महाश्वेता देवींच्या कादंबरीवर यांचे आक्षेप होते. महाश्वेता देवींच्या कथानकातल्या द्रौपदी या पात्रावर  त्यांचा आक्षेप होता. अशा किती तरी गोष्टी.या लोकांना त्यांना  नसलेल्या सर्व गोष्टी पुस्तकांतून, इतिहासातून खोडून काढायच्या आहेत.

लोकांनी वाढदिवशी मेणबत्ती लावावी की पणती पेटवावी हेही ही माणसं  सांगत आहेत. ही माणसं लोकांची अभिरुची घडवण्याच्या, दुरुस्त करण्याच्या खटपटीत आहेत. सरकार या माणसांचं आहे. म्हणूनच गोवा महोत्सवातला न्यूड हा सिनेमाही माहिती-प्रसारण खात्यानं अमान्य केलाय. न्यूड या सिनेमात चित्रकारांना नग्नावस्थेत पोज देणाऱ्या स्त्रीची कहाणी आहे. नग्नता म्हणे या लोकांना त्यांच्या संस्कृतीच्या विपरीत वाटते.  ओदिशामधे किंवा मध्य प्रदेशातल्या मंदिरांत कित्येक शतकांपासून नग्न शिल्पं आहेत, संभोग चितारले आहेत. देव संभोगात रममाण दाखवले आहेत. रामायणात नग्नतेची दृश्यं चितारलेली आहेत.  तो काळ वेगळा होता, कदाचित त्या काळातल्या लोकांची अभिरुची बिघडली होती  असं म्हणून वरील नग्नतेला नाकारायला ही मंडळी सिद्ध झाली आहेत. संधी मिळाली तर तीही शिल्पं तोडली जातील किंवा झाकली जातील.

ही माणसं संख्येनं कमी आहेत. त्यांना तर्काशी, विचारशक्तीशी देणं घेणं नाही. ती माणसं भावना आणि श्रद्धांचा अतिरेक करतात, दोन्ही मानवी वैशिष्ट्यं ही माणसं संदर्भ सोडून आणि तोल सोडून व्यक्त करतात.  सामान्यतः समाज या मंडळींकडं दुर्लक्ष करतो.

अशा मंडळींवर कारवाई करून त्यांना थांबवण्याऐवजी सत्ताधारी त्यांना प्रोत्साहन देतात. अभिरुची, धर्म, संस्कृती या गोष्टी सत्ताधारींना संस्काराची बाब वाटत नसून मतं मिळण्याचं साधन वाटतंय. संस्कृतीचे अयोग्य अर्थ लावून हिंदू नसलेल्या लोकांना सत्ताधारी घाबरवत आहेत.

सलमान रश्दी यांच्या सेटॅनिक व्हर्सेस या कादंबरीवर खोमेनी यांनी फतवा काढला होता. फतवा काढणारे आणि दंगल करणारे यांनी कादंबरी वाचली नव्हती. वाचली असती तर ती एक कादंबरी होती, ते साहित्य होतं हे त्यांच्या लक्षात आलं असतं. कादंबरीबद्दलची  मतं  भाषणं, पुस्तकं यातून मांडणं सोडून माणसं दंगलीवर उतरली.  कादंबरीवर बंदी घाला असं म्हणणाऱ्यांना समजावून किंवा दमात घेऊन त्यांना रोखायला  सत्ताधारी राजीव गांधी तयार झाले नाहीत. मुसलमान प्रजा ही माणसं नसून निवडणुकीतली मतं आहेत या भावनेनं राजीव  गांधींनी कादंबरीवर बंदी घातली.

एकाद्या धर्मातल्या पवित्र गोष्टीबद्दल काही वावगं प्रसिद्ध झालं तर लोकांच्या भावना खवळतात.  दंगली घडू नयेत, अशांतता माजू नये, समाजाचं नुकसान होऊ नये, सुव्यवस्था टिकावी यासाठी सरकारला पावलं उचलावी लागतात. पण ती पावलं उचलणं आणि बंदी घालणं या दोन गोष्टी सारख्याच नाहीत हे सरकारला आणि समाजाला कळायला हवं.

साहित्य, विधी,सिनेमा इत्यादी कशावरूनही माणसं दंगल करू लागली तर त्यांना दंगल करू न देणं, दंगल केलीच तर कडक कारवाई करणं हा त्यावरचा उपाय असतो.  आताचं सरकार  आणखीनच विचित्र आहे. ते अशांतता माजवणाऱ्यांना अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे प्रोत्सान देतं.

मुळात पुस्तकं, नाटकं, सिनेमा हा विषय सरकारच्या अखत्यारीत असता कामा नये. समाजाचा गाडा (आर्थिक इत्यादी) नीट चालवणं हे सरकारचं काम असतं. समाजाची सांस्कृतीक पातळी उंचावणं, समाजाची अभिरुची विकसित करणं इत्यादी कामं सरकारची नसतातच मुळी. अलीकडं तर लक्षात आलंय की लोकशाहीत सरकारं ज्या रीतीनं निवडून येतात ते पहाता साधारणपणं संस्कृती,विचार, कला इत्यादी गोष्टी कशाशी खातात ते माहित नसणारीच फार माणसं निवडून येतात. सामान्यतः पैसे जमा करणं, जाती-धर्माचा विचार करून व पैशाचा वापर करून बहुमत मिळवणं, नंतर सत्ता टिकवणं येवढाच धंदा राजकारणातली मंडळी करत असतात. त्यांना वाचन, लिखाण, विचार इत्यादी गोष्टी करायला वेळ नसतो. त्यांची वाढही त्या वातावरणात झालेली नसते. त्यामुळं संस्कृती कला इत्यादी बाबी सरकारवर सोपवणं अत्यंत धोक्याचं असतं.

नाटक, सिनेमा, पुस्तक कसं असावं याचा निर्णय समाजानं करायचा असतो. त्या क्षेत्रात वावरणाऱ्या कलाकारांनी त्यावर निर्णय घ्यायचा असतो. यासाठी त्या विषयांच्या स्वायत्त संस्था असायला हव्यात. संस्थेला समजा इमारत लागत असेल, संस्था चालवायला चार पैसे लागत असतील तर ते सरकारनं द्यायला हरकत नाही पण त्या पलीकडं नोकरशाही आणि राजकीय पक्षाची माणसं त्यात अजिबात असता कामा नयेत.

अभिरुजी, संस्कृती या गोष्टी सरकारकडं नसाव्यात, समाजाकडं असाव्यात.

लोकांनी काय खावं, काय प्यावं. लोकांनी कोणते कपडे घालावेत आणि काय वाचावं. लोकांनी उपासना कशी करावी. भाषा कशी असावी. इत्यादी गोष्टी अभिरूची या सदरात मोडतात. कलावंत निर्मिती करतात, समाज आस्वाद घेतो. या व्यवहारामधून समाजात अभिरूची, परंपरा, संस्कृती घडते.  सत्तेनं दूर राहून मदत करणं अपेक्षित  असतं. सयाजीराव गायकवाड कलाकार, खेळाडू, अभ्यासक यांना भरपूर मदत करत, त्यांनी कसं पळावं, कोणता खेळ कसा करावा आणि त्यांनी काय वाचावं, कशावर संशोधन करावं ते सयाजीराव सांगत नव्हते.

हिंदूमधे माणसांना देवांची, देवतांची नावं दिली जातात. ऐतिहासिक पुरुष, नद्यांचीही नावं दिली जातात. मुसलमानांना नावामधे महंमद हे नाव जोडलं जाणं पवित्र वाटतं. नावं देवांची, प्रेषितांची, नद्यांची, इतिहास पुरुषांची. पण शेवटी  माणसं ही माणसंच असतात. ती गुणी असतात,ती अवगुणी असतात. ती शिक्षकही असतात आणि बलात्कारीही असतात. ती वैज्ञानिक असतात आणि खुनीही असतात. माणसं फार गुंत्याची असतात.

अडचण अशी की कथा, कादंबरी, चित्रपट, नाटक यातल्या पात्रांची नावं काय असावीत. कुठलंही नाव ठेवलं तरी कोणाची तरी भावना दुखावते. मग कथानकं असतील तरी कशी?

अ या माणसानं ब या स्त्रीवर बलात्कार केला असं लिहायचं? क या माणसानं खून केले आणि ड हा माणूस स्मगलर आहे असं लिहायचं?  या घटना अबकडई नावाच्या देशात इसवी सन चार हजार मधे घडल्या असं लिहायचं? समाजात वावगं काहीच घडत नाही, समाजातला प्रत्येक माणूस  सतत सत्कृत्यच करत जगत असतो असं दाखवायचं?

सेक्स. माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग. मुलंही त्यामुळं होतात आणि माणसाला त्यामुळं आंनंदही मिळतो. म्हणे की पुर्वी पुराणपुरुषांना सेक्स न करता मुलं होत होती. कोणाला म्हणे सूर्यापासून मुलं झाली. कोणाला म्हणे नुसत्या कल्पनेनं मुलं झाली. मजा आहे. कल्पना छान आहे. परंतू त्या काळातली मंडळी भरपूर सेक्स करत होती हेही नोंदलं गेलेलं आहे. अनेक पुरातन ग्रंथात भरपूर मद्य प्राशन आणि मुक्त सेक्सची वर्णनं आहेत.

पुल देशपांडे यांनी एक गंमत लिहिलीय. स्त्री पुरुष संबंधाला एका पुढाऱ्याचा विरोध असतो. पुलं लिहितात की राम आणि सीता  असे वेगळे उल्लेख करायचे, ते पती पत्नी होते असं लिहायचं नाही असं संकट त्यातून तयार झालं.

नवअभिरुचीवाल्यांचं म्हणणं जर सर्वांनी मान्य केलं तर साहित्य,नाटकं, चित्रपट कसे असतील याची कल्पनाच केलेली बरी.

कोणतं सरकार आहे आणि कोणता मंत्री आहे हा विषय नाही. सांप्रतचं सरकार, सत्ताधारी पक्ष आणि मंत्री हास्यास्पद आहेत हा स्वतंत्र विषय झाला. तो मुख्य मुद्दा नाही.

समाजाची अभिरुची ठरवणं आणि घडवणं हे सरकारचं काम नाही. सत्ता आणि राजकीय पक्ष, नोकरशहा यांना समाजाची अभिरुची आणि संस्कृती घडवण्यापासून शक्य तितकं  ठेवलं पाहिजे असा मुद्दा आहे.

।।

 

 

7 thoughts on “दुर्गा, न्यूड. फिल्मस. समाजानं काय पहावं आणि काय पाहू नये असं ठरवण्याचा अधिकार सरकारला असावा काय?

 • November 16, 2017 at 6:14 PM
  Permalink

  ‘भाजप’ पक्ष्याच्या कामगिरीवर ८८% जनता खूष असल्याची बातमी कालच लोकसत्ता दैनिकात वाचनात आली व ते सर्वेक्षण अमेरिकेतील अर्थव्यवस्था विभागातील एका प्रतिष्टीत कंपनीने केले आहे. भारतात न्यायव्यवस्था पोलिसांकडून राबवण्यात येते (म्हणजे आक्षेपार्ह प्रकरणाबद्दल दंड, शिक्षा, चूकभूल इत्यादी ते ठरवतात). ज्यांना हे पसंत नाही, त्यांनी “देश सोडून इतरत्र जावे”, असे रोखठोक उत्तर सामान्य प्रजेपासून देशाचे राष्ट्रपती ऐकवत असतात. मनोहर पर्रीकर त्यांच्या लहानपणीच (वय १०-१२) स्वतःच्या बंधूंच्यासमवेत ‘आक्षेपार्ह सिनिमे’ (प्रौढांसाठीचे) आईच्या नकळत सिनेगृहात पाहत असतांना त्यांच्या शेजाऱयांनीच पकडले होते -असे अभिमानाने विद्यार्थ्यांपुढील भाषणात ऐकवतात (तीन दिवसांपूर्वी लोकसत्तेतच बातमी) आणि आज मात्र लोकांच्या भावना दुखावू नयेत -म्हणून ‘न्यूड’ सारख्या चित्रपटास गोव्यातील चित्रपट महोत्सवात बंदी केलेली असल्याचे सांगतात (अपूर्ण असल्याचे कारण देऊन). अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हे याच मालिकेत मोडतात -लोकांना पसंत आहे आणि जगभर निळूभाऊंसारख्या आठ-दहा टक्के विचारवंतांना कुणीही जुमानत नाही. भारतात विरोधकांचे मोर्चे निघतील, उपोषणे सुध्दा घडतील परंतु पालथ्या घागरीवर पाणी घालण्यासारखे आहे. निर्णय घेणे प्रजेकडे नसते व तो सत्ताधारी (आणि पोलीस घेतात) व त्यांना प्रजेनेच निवडून आणलेले आहे. आपण आपले जेवणखाण आणि डोक्यावरील छप्पर सुरक्षित आहे नां -त्याची खात्री करून गप्प बसावे. एरवी लेख चिंतन करण्यासाठी लग्नातील पंक्तीत ‘मिष्टान्न’ असल्यासारखे समजावे.

  Reply
  • November 16, 2017 at 10:29 PM
   Permalink

   khupach chaan uttar dilat ,hya ashya mansanni he desh tyanna surkshit vatat nasel tar desh sodun jave, vyakti swatantrya mhanje ekach dharmavar tika karne mhanje tumhi saral saral tyaa dharmacha anadar kartay, himmat asel tar itar dharma baddal hi kahi liha te nahi honar tumchyat , dr. baba saheb ambedkar he hindu kivva bramhan virodhi navhate. pan aaj kahi tumchya sarkhe mathe firu ahet je fakt hindu dharmchi cheshta karta , hya varun tumcha hindu dwesh disun yetoy . mag aata kay ” nilu damle BABA “je sagtil to hindu dharm ka . he maz dukkh mi vyakt kel .

   Reply
   • November 17, 2017 at 8:41 AM
    Permalink

    मी सांगतो तोच हिंदू धर्म असं मी म्हणत नाही. पण तसंच इतरांनीही म्हणू नये. विशेषतः राजकारणी लोकांनी. मुसलमान म्हणतात की त्यांच्या धर्माबद्दल कोणी बोलवायचं नाही, ते मात्र इतर धर्मांबद्दल बोलणार. हिंदू म्हणतात की हिंदू नसलेल्यांनी किंवा विशिष्ट गटाचा हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांनी सोडता इतरांनी हिंदू धर्माबद्दल बोलायचं नाही, ते मात्र इतर धर्माबद्दल बोलणार.मी कोण आणि मी कशासाठी जगतो या प्रश्नानं धर्माची सुरवात होत असते. हे प्रश्न विचारून धर्माची सुरवात होते आणि ते प्रश्न विचारायला बंदी घालून धर्म संपतो.धार्मिक, धर्मप्रेमी, धर्मवीर, धर्मद्वेष्टा इत्यादी लेबलं फार स्वस्त आहेत, बाजारात ती जवळजवळ फुकटच मिळतात. विचारवंत, बुद्धीजीवी इत्यादी लेबलंही बाजारात आहेत. तीही खूप दुकानांत मिळतात. लेबलांचाच वापर करायचं ठरवलं तोटा नाहीये.

    Reply
  • November 17, 2017 at 8:52 AM
   Permalink

   विचारवंतांना जनता जुमानत नाही असं नसतं. विचारवंत जे सांगतात ते लोकांना अडचणीचं वाटतं ते जुमानायला लोकं तयार नसतात. जेव्हां विचारवंत लोकरहाटीवर शिक्का मारतात तेव्हां लोकं खुष असतात. सामान्यतः लोकांना संथपणे नौकानयन करायचं असतं. समुद्रात खळबळ झाली, वारं वेगानं वाहिलं तर बोटीतली माणसं अस्वस्थ होतात. समुद्र खवळलाय, नीटपणे सुकाणू धरा, समुद्रप्रवाह आणी वाऱ्याच्या वेगाकडं लक्ष द्या इत्यादी अभ्यास करण्यासारख्या गोष्टी सांगितल्या की बोटीतले लोक वैतागतात. कोणी तरी एकादा महापुरुष, एकादा संत, एकादा पिता, एकादा देव, एकादा अवतार, एकादा मंत्र, एकादं स्तोत्र, एकादी आरती इत्यादीमुळं जर चिंता आणि अडचणी दूर होताहेत असं वाटलं तर लोक त्यावर आपली मान टेकवतात आणि आपलं जीवन जगायला लागतात. भारतातली माणसं स्वच्छता पाळायला अजिबात तयार नसतात. भारतीय माणसाला कायदा पाळायला अजिबात आवडत नाही. भारतीय माणसं कर भरतांना कष्टी होतात. विज्ञानाचा अभ्यास करून आणि बाजाराचे टक्केटोणपे शिकून उत्पादन करायला ना उद्योगी तयार असतो ना शेतकरी. एकादा नेहरू, एकादा शास्त्री, एकादी इंदिरा गांधी, एकादा जयप्रकाश नारायण, एकादा वाजपेयी, एकादा मोदी त्यांचे मनोरथ स्वतःला सायास न देता पुर्ण करणार असेल तर भारतीय जनता खुषच. वेळोवेळी वरील त्रात्यांना जनतेनं ८८ टक्के पसंती नेहमीच दिली आहे. वरील त्राते होऊन गेले, भारत आणि गंगा कमालाची अशुद्ध शिल्लक उरते.

   Reply
 • November 17, 2017 at 5:20 PM
  Permalink

  I am not able to write in Marathi, here. That’s why, trying to write in English language. Entire article is very good and thought provoking. but, first time I read this sentence – रामायणात नग्नतेची दृश्यं चितारलेली आहेत.
  Sir, can u give any one proof for it. Actually, it was 6th century, when Kings in India used there all power for fake things like sex. that timw Yajna means sex for them. sir, You never write a vain word, but today it feels…

  Reply
  • November 25, 2017 at 5:03 PM
   Permalink

   चूक सुधारतो. नग्नतेची दृश्यं हे चुकून लिहीलं गेलं, शृंगाराची दृश्य आहेत असं लिहायला हवं होतं.

   Reply
 • November 29, 2017 at 1:02 AM
  Permalink

  लेख बहुतांशी पटला आणि आवडला. मात्र कलाकरांचे अविष्कार स्वातंत्र्य १०० % मान्य करून विरोधकांच्या बाजूने असे लिहावेसे वाटते की हे कलाकार शुद्ध कलेच्या भावनेनेच हे सर्व करत असतील का यावर कलाविष्काराची treatment पहिली तर शंका जरूर येते. कुठेतरी यात विरोध होण्याचे potential आहे हे लक्षात घेतले जात असावे. त्यामुळे घटं भिन्द्यात… नुरूप प्रसिद्धी मिळवावी असे एक गणित नसेलच असे नाही. तसे गणित मांडायलाही काही हरकत नाही पण ते उघडपणे कबूल करण्याचे धारिष्टय पण नाही. किमान बाजीराव मस्तानीच्या वेळेस भंसालीने तसे तरी केले, असे वाचल्याचे स्मरते की २ top च्या हिरॉईन एकत्र पडद्यावर आल्यावर dance नसेल तर सिनेमाच्या वितरणावर परिणाम होतो.

  तसेच – अभिरुची, कोणी काही खावे, प्यावे , घालावे हे सरकार ठरवू शकत नाही हे तात्विकदृष्ट्या मान्य असले तरी सर्वार्थाने शक्य नाही. एक उदाहरण, जाहिरातीच्या माऱ्यामुळे समजा एक पिढीच्या पिढी निकृष्ट अन्न खाऊन वाढत आहे , त्यामुळे health issues चे प्रमाण वाढेल, पर्यायाने देशाच्या health budget \ अर्थव्यवस्थेवर त्याचा परिमाण होऊ शकतोच ना ? अशा वेळी लोकांना खाऊ दे काय खायचे ते, सरकारने त्यात नाक खुपसू नये हे तितकसं ठीक वाटत नाही. problem असा आहे की फोकस नेहमी वेगळ्या कमी महत्वाच्या गोष्टींवरच राहतो

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *