फ्रेंच अध्यक्ष, आट्यापाट्या खेळाची सुरवात.

फ्रेंच अध्यक्ष, आट्यापाट्या खेळाची सुरवात.

प्रस्थापित राजकीय पक्ष आणि पुढारी उपयोगाचे नाहीत तेव्हां नव्या माणसाला संधी द्यावी अशा विचारानं फ्रेंच जनतेनं एमॅन्युअल मॅक्रॉन या ३९ वर्षाच्या माणसाला फ्रेंच जनतेनं भरपूर मतं देऊन राष्ट्राध्यक्षपदी नेलं आहे. मॅक्रॉन काही महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षात होते. मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. सध्या त्यांना राजकीय पक्ष नाही. पुढे चला अशी एक घोषणा, कार्यक्रम, त्यानी मांडलाय, तोच आहे त्यांचा पक्ष.

फ्रेंच अध्यक्षीय निवडणुक दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात अनेक राजकीय पक्षांचे अनेक उमेदवार उभे रहातात. त्यातून सर्वाधिक मतं मिळालेले दोन उमेदवार दुसऱ्या फेरीत पोचतात. दुसऱ्या फेरीत अध्यक्षाची निवड होते. यंदाच्या निवडणुकीत डावे, उजवे, मध्यम, अती डावे, अती उजवे अशा छटांचे पक्ष रिंगणात होते. प्रत्येक उमेदवाराला वीसेक टक्के मतं मिळाली. दुसरी फेरी सुरु झाली तेव्हां अती उजव्या मरीन ल पेन या उमेदवाराच्या विरोधात इतर सर्व पक्ष एकत्रित झाले आणि त्यांच्या पाठिराख्यांनी मॅक्रॉनना मतं दिली. ज्यांनी मॅक्रॉनना मतं दिली त्यांच्यापैकी बहुसंख्यांना सुरवातीला मॅक्रॉन नको होते. ल पेन नकोत या नेगेटिव भावनेनं त्यानी मॅक्रॉनना मतं दिली.

अलिकडं जगभरच हा नकारी प्रवाह प्रभावी झालेला दिसतोय.   हिलरी क्लिंटन नकोत,  एस्टाब्लिशमेंटचं कोणीही नको, राजकारणाचा कोणताही परिचय नसलेल्या ट्रंप बरा असा विचार अमेरिकन लोकांनी केला.  भारतात लोकांनी काँग्रेस नको म्हणून भाजपला मतं दिली, संधी दिली.  मॅक्रॉनना त्याच रीतीनं निवडण्यात आलंय. उमेदवाराची कुवत काय आहे याला   महत्व नाही, उमेदवाराचा कार्यक्रम काय आहे याचाही   विचार नाही, उमेदवाराजवळ कार्यक्षम कार्यक्रम आहे की नाही यालाही महत्व नाही. अमूक नको, तमूक नको, काही तरी नवं हवंय, काही तरी थरारक हवंय, काही तरी चमकदार हवंय असं मतदारांना वाटू लागलंय. चमकदार, चटकदार, विक्षिप्त, टोकाच्या घोषणा लोकांना पसंत पडतात.

वाढती बेकारी आणि स्थानिक गोऱ्या फ्रेंच ख्रिस्ती लोकांचं खालावलेलं जीवनमान या समस्यांना  बाहेरून आलेले स्थलांतरीत,  मुसलमान कारणीभूत आहेत असं लपेनना वाटतंय. युरोपियन युनियनमधे राहिल्यानं स्थलांतरीत आणि आर्थिक संकट यातून वाट काढता येत नाहीये असं लपेन यांचं मत आहे.  प्रखर राष्ट्रवाद ( अरब, मुसलमान, आफ्रिकी काळे हे रुतलेले काटे दूर करणं),  युरोपियन युनियनमधून बाहेर पडणं यावर लपेन यांचा भर आहे.   इतर राजकीय पक्षांना, मॅक्रॉन यांना,  तसं वाटत नाही. त्यांना युरोपियन युनियनमधे रहायचं आहे, फ्रेंच अर्थव्यवस्थेत बदल करून फ्रेंच आर्थिक समस्या सोडवता येतील असं त्यांना वाटतं.

फ्रेंच समाजाचे ढोबळ मानानं दोन गट होतात. एक गट  बहुसंख्य  गोऱ्या ख्रिस्ती फ्रेंचांचा. फ्रेंच ही या गटाची संस्कृती आहे. दुसरा गट आहे अरब, आफ्रिकी, काळे, मुसलमान,  माणसांचा. या गटातली  माणसं फ्रेंच भाषा बोलतात, फ्रेंच शाळेत शिकतात तरीही त्यांची संस्कृती फ्रेंच नाही असं गोऱ्या-ख्रिस्ती-कित्येक पिढ्या फ्रान्समधे जन्मलेल्या-वाढलेल्या फ्रेंचांना वाटतं. दोन्ही गटाच्या माणसांना बेकारी आणि आर्थिक चणचणीची समस्या भेडसावत आहे.

बहुसंख्येनं असणाऱ्या गोऱ्या-ख्रिस्ती-फ्रेंचसंस्कृत माणसांमधल्या  एका  वर्गाला वाटतंय की  त्यांच्या आर्थिक त्रासाला बाहेरून आलेले, स्थलांतरीत, गोरेतर, आफ्रिकी, मुसलमान इत्यादी ‘ इतर ‘ माणसं कारणीभूत आहेत. ‘ इतर ‘ माणसं आपले रोजगार हिरावून घेतात, फ्रेंच संसाधनांचा मोठ्ठा वाटा ही ‘ इतर ‘ माणसं गट्ट करतात असं त्यांना वाटतं. कट्टर फ्रेंच राष्ट्रवाद, कट्टर फ्रेंच संस्कृती हाच आर्थिक संकटांवरचा उपाय आहे असं या लोकांना वाटतं. काळे, अरब, मुसलमान, आफ्रिकी इत्यादी लोकांना प्रवेश बंद करा; त्यांची संख्या मर्यादित ठेवा; त्यांना फ्रेंच व्हायला लावा अशी या लोकांची मागणी आहे. गेल्या दोन तीन वर्षात फ्रान्समधे झालेले दहशतवादी हल्ले हा या लोकांचा मुख्य सल आहे. दहशतवादी माणसं मुसलमान असतात, अरब असतात, काळी असतात,  हे वास्तव हे त्यांच्या हातातलं मुख्य शस्त्र आहे. बाहेरची माणसं आत घुसतात किंवा फ्रेंच रोजगार कमी होतात याला युरोपियन युनियनमधे रहाणं हे मुख्य कारण आहे असं या गटाला वाटतं. थोडक्यात म्हणजे फ्रेंच लोकांच्या निर्णयावर युरोपियन युनियनमधे रहाण्यानं बंधनं येत असल्यानं युनियनच्या खोडातून बाहेर पडा असं या लोकांचं म्हणणं आहे. लपेन या गटाच्या प्रवक्त्या आहेत.

सुमारे ३६ टक्के लोकांचा लपेन यांना पाठिंबा आहे.

मॅक्रॉन युनियनच्या बाहेर पडायचं बोलत नाहीत. फ्रेंच अर्थव्यवस्थेत काही बदल केले तर अर्थव्यवस्था सुधारेल असं त्यांना वाटतं.  कार्यक्षमता कमी झाल्यानं फ्रेंच बाजारात टिकत नाहीत, कमाल उत्पादन करू शकत नाहीत. शिक्षण व्यवस्थेत बदल करून, कार्यक्षमता वाढवणारं शिक्षण देऊन भागेल असं मॅक्रॉन यांना वाटतं. फ्रेंच उद्योगांचा आकार खूप मोठा आहे. मोठ्या आकारामुळं दिरंगाई, कामचुकारपणा, सांडलवंड हे दोष निर्माण होतात. कर्मचाऱ्यांचं वेतन आणि सवलतींचं प्रमाणं फार असल्यानं मोठे उद्योग अकार्यक्षम ठरतात. तेव्हां अकार्यक्षम असणाऱ्या मोठ्या उद्योगातले कर्मचारी  कमी करणं, उद्योगांना बाजाराच्या स्पर्धेत उतरायला लावणं, लहान आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणं या वाटा अवलंबल्या तर उत्पादन वाढ होऊन रोजगार वाढतील असं मॅक्रॉन यांना वाटतं. थोडक्यात म्हणजे अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याची मॅक्रॉन यांची इच्छा आहे.

मॅक्रॉन यांची भूमिका समाजवादी विचारांत बसत नाही. कामगारांना अधिक कार्यक्षम व्हायला लावणं, त्यांना काम करायला लावणं, त्यांचं वेतन त्यांच्या कार्यक्षमतेनुसार ठेवणं, त्यांची संख्या मर्यादित करणं असले उपाय मार्क्सवादी आणि समाजवादी पक्षांना मान्य नाहीत.

इटाली, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीस इत्यादी युरोपियन देशांपुढंही जवळपास फ्रेंचासारख्याच आर्थिक समस्या आहेत. या देशांनी सार्वजनिक हिताचं आर्थिक धोरण चालवतांना सार्वजनिक खर्च वाढवला पण तो भागवण्यासाठी आवश्यक साधनं गोळा केली  नाहीत. पगार वाढले, पेन्शन वाढलं, सवलती वाढल्या, लोकांचे खर्च वाढले; पण ते सारं भागवण्याची क्षमता देशांजवळ उरलेली नाही. पुरेसं उत्पादन आणि कार्यक्षमता या दोन मुद्द्यांवर त्या त्या अर्थव्यवस्था लडखडत आहेत.काही एका प्रमाणावर ब्रीटनमधेही तीच समस्या आहे.

या समस्येवरची वाट प्रामुख्यानं आर्थिक आहे असं अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. परंतू ही वाट कष्टाची असल्यानं संस्कृती-धर्म हा निरुपयोगी ठरणारा शॉर्ट कट राजकारणातले लोक घेतात. मुसलमान, काळे, आफ्रिकी, आशियाई इत्यादी गटांच्या गळ्यात गाडगं  बांधलं की मतं मिळतात असा हिशोब करून मतं मिळवण्याची खटपट शॉर्टकटवाले पक्ष काढतात. लपेन यांचा तोच प्रयत्न आहे. अमेरिकेत ट्रंपही त्याच वाटेनं जात आहेत.

मॅक्रॉन अध्यक्ष झाले खरे पण खऱ्या अडचणी तिथूनच सुरु होणार आहेत. फ्रेंच राज्यव्यवस्था म्हणजे राष्ट्राध्यक्ष आणि संसद अशा दोन बैलांची गाडी आहे. संसदेची निवडणुक होऊन त्यात निवडला गेलेला पंतप्रधान प्रत्यक्षात सरकार चालवत असतो. म्हणजे मॅक्रॉन यांना मानणाऱ्या खासदारांची बहुसंख्या झाली तरच त्याचे कार्यक्रम अमलात येऊ शकणार. गंमत अशी की मॅक्रॉन यांना पक्षच नाही. विविध लाल छटांचे,   मध्यम मार्गी, टोकाचे उजवे-राष्ट्रवादी असे पक्ष संसदेत निवडून येणार. त्या कडबोळ्यातून पंतप्रधान तयार होणार आणि त्या पंतप्रधानानं राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा कार्यक्रम अमलात आणायचाय. डावे आणि अती उजवे मिळून  मॅक्रॉन विरोध करणार हे उघड आहे.

मुख्य म्हणजे फ्रेंच अर्थव्यवस्थेची घडी नव्यानं बसवण्यासाठी आवश्यक ती स्पष्टता मॅक्रॉन यांच्याकडं असायला हवी. मॅक्रॉन यांचा कार्यक्रम लोकांना पसंत पडायला हवा, लोकांच्या गळी उतरायला हवा. अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न ग्रीक राजकीय पक्षानी केला, लोकांनी त्यांना सहकार्य केलं नाही. लोकांचं म्हणणं असं आम्ही थोर आहेत आमचे पुढारी चोर आहेत. जवळपास तसंच फ्रेंच नागरिकांना वाटतंय. यात भरीस भर म्हणजे पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त लोक आर्थिक बाजूनं विचार करायला तयार नाहीयेत, त्यांना धर्म-संस्कृती-देशीवाद या गोष्टी महत्वाच्या वाटत आहेत.

आट्यापाट्याचा खेळ आहे. एका कोंडीतून सुटलं की दुसरी कोंडी दत्त म्हणून समोर उभी ठाकते. तिच्यातून सुटतो तोवर तिसरी कोंडी. मॅक्रॉन किती कोंड्या फोडतात आणि पुढं सरकतात ते कळायला वेळ लागेल.

।।

 

 

 

3 thoughts on “फ्रेंच अध्यक्ष, आट्यापाट्या खेळाची सुरवात.

  1. The issue is not just economics as you try to paint. It is more cultural. The Europe will change its complexion as more and more outsiders settle in. The conflict will intensify as number of ‘outsiders’ increases. Their level of tolerance towards Christianity will play a key role. Present experience does not bode well for it. Is it going to be 20 years or 25 years? Some of us will experience it.

  2. श्री.निळू दामले यांच्या या ब्लोकवरून फ्रान्समधील सद्य परिस्थितीचे आकलन झाले.धन्यवाद.
    अ.पां.देशपांडे

  3. सामाजिक वास्तवाचे आपले आकलन अचूक असल्याचे गृहीत धरून केले जाणारे विश्लेषण व सुचवले गेलेले उपाय जेव्हा अनर्थकारी परिणाम घडवतात तेव्हा जनसामान्य त्या विचाराच्या सत्यतेविषयी साशंक होतात.
    आज जगभर उजव्या तसेच डाव्या उदारमतवादी विचारवंताना नाकारताना दिसते त्याचे कारण वास्तव त्यांना कळले नव्हते याचा प्रत्यय पदोपदी येताना दिसतो. मग त्यांच्या कार्यक्रमावर विश्वास का ठेवावा? त्यापेक्षा नवीन नेता जर आपण नवी दिशा देऊ असे ठामपणे म्हणाला तर त्याला संधी देऊन पहावे हा विचार तारतम्य दाखवतो.
    आज जगभर उदारमतवादी वृत्तपत्रीय लेखनाकडे पाहण्याच्या फरकाचे कारण वरील गोष्टीत आहे. ओबामाच्या कारकीर्दीच्या सुरवातीला काय अपेक्षा होत्या व अखेरीस काय वस्तुस्थिती आहे हे पाहिले की सोपी पुस्तकी उत्तरे किती कुचकामी ठरतात ते स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *