बलात्कार, एक मामुली गोष्ट

बलात्कार, एक मामुली गोष्ट

अरे तू बलात्कार केलायस.

उंह: त्यात काय मोठंसं.

अरे ती जखमी झालीय.

औषधोपचार करा. हवं तर मी पैसे देतो.

अरे ती मेलीय.

जा, तिच्या नातेवाईकांना भरपाई द्या.

अरे पण तिला त्रास देण्याचा अधिकार तुला कोणी दिला.

अधिकाराचा काय प्रश्न. माझी गरज होती, मी भागवली.

१४ डिसेंबर २०१७.गाव, बोको. जिल्हा कामरुप, आसाम. आई वडील गावाजवळच्या वीट भट्टीवर कामाला गेले होते. १४ वर्षाची मुलगी घरी होती. काही जण (नेमके किती?) घरी पोचले. मुलीला पकडून गावात अन्यत्र नेलं. सर्वांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.इतका की ती बेशुद्ध झाली.

बेशुद्धावस्थेत तिला लोकांनी जवळच्या हॉस्पिटलात नेलं. हॉस्पिटल म्हणालं –  मोठ्या हॉस्पिटलमधे जा. तिला गुवाहाटीतल्या मोठ्या सरकारी हॉस्पिटलमधे नेलं. तिथं उपचार करण्यात आले. उपयोग झाला नाही. नऊ दिवसांनंतर २३ डिसेंबर २०१७ रोजी  ती मरण पावली. मुलगी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना जाग आली. घटना घडल्यानंतर ९ दिवसांनी तपास सुरु झाला. एका माणसाला पकडण्यात आलं. किती माणसं होती, ती कुठून आली वगैरेचा तपास सुरु झाला.

छोटं गाव. गावात कोण कुठं केव्हां कामाला जातं इत्यादी गोष्टी गावातल्या सर्वाना माहित असतात. गावातल्या एकांताच्या जागा, अंधाऱ्या जागा, आडवळणाच्या जागाही स्थानिकांना माहित असतात.  वीटभट्टी कामगाराची मुलगी केव्हां सापडू शकते हेही लोकांना माहित असतं. या माहितीचा उपयोग गुन्हेगारांनी केला. बलात्कार होत असताना मुलगी किंचाळेल, हातपाय झाडेल, ओचकारेल, सुटण्याचा प्रयत्न करेल. तिला उचलून नेण्याच्या क्षणापासून तिची आरडाओरड सुरु करेल. ते आवाज आणि धडपड कानावर पडणार नाही अशा रीतीनं मुलीला नेलं असणार. काही लोकांनी हा प्रकार पाहिलाही असणार, सारं घडलं ते दिवसा ढवळ्या.

ही घटना म्हणजे मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला नव्हे. गुन्हेगार गावातले. तपासासाठी फार वेळ लागण्याची आवश्यकता नाही. पोलिस दिरंगाई करतात, तपास करत नाहीत, कारवाई करत नाहीत अशी गावातल्या लोकांची तक्रार आहे.

आसाममधले बलात्कारी कोण होते ते अजून कळलेलं नाही. परंतू महाराष्ट्र, दिल्ली इत्यादी ठिकाणी बलात्कार करणारे लोकं शाळा शिकलेले होते. शाळेत त्याना नागरीकशास्त्र, कायदा, नैतिकता इत्यादी गोष्टींचे धडे असतात. त्यांच्यावर वरील धड्यांतल्या आशयाचा परिणाम झालेला दिसत नाही. तसं घडणं सहज शक्य आहे. कारण त्याना वरील धड्यांवरच्या प्रश्नांना उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिणं हे शिकवलेलं असतं, त्यातला आशय त्यांना शिकवला जात नाही. धडा काय आहे हे त्यांना माहित नसतं. माणसं वर्गात पोकळ अक्षरं शिकतात, त्यांना भाषा येत नाही. माणसं वर्गात आकडे जुळवतात त्यांना गणित येत नाही. माणसं उपकरणं हाताळतात, त्यांना मापन येत नाही. त्यामुळं शिकला आणि शहाणा झाला असं काही वेळा घडतं ते अपघातानं, तसं घडावं अशी व्यवस्था शिक्षण व्यवस्थेत नाही.

हल्ली न शिकलेलीही बरीच मुलं असतात. त्यांचं शिक्षण म्हणजे सडक, सभोवतालचं जग, अनुभव. कायदा हा शब्द त्यांच्या कधीतरी कानावर पडतो पण त्याचा अनुभव त्यांना येत नाही. गावातले पुढारी, दांडगट लोकं सर्रास भ्रष्टाचार करतात, अत्याचार करतात, त्यांना काही होत नाही हे त्यानं पाहिलेलं असतं. थोडक्यात असं की कायदा असून नसल्यासारखा आहे, बेकायदा वागलं तरी चालतं हे त्यानं अनुभवलेलं असतं.

सर्वच माणसं ऊठसूठ बलात्कार करतात असं मुळीच नाही. बलात्कार ही गोष्ट योग्य नव्हे असा अंधुक अंदाज असलेली माणसं देशात बहुसंख्य आहेत. पण समजा केला बलात्कार तर काय बिघडतं असं वाटणारी माणसंही समाजात फार आहेत, ती वाढत आहेत अशी शंका येते. विशेषतः धनिक, वरच्या जातीतली,सत्तेतली कुटुंब अशा मुलांना वाढवतात, चोंबाळतात, पाठीशी घालतात असा अनुभव वारंवार येत आहे. त्यामुळंच बलात्कार केला तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही असं या बऱ्यापैकी संख्येनं असलेल्यांना वाटतं. पोलिस दंडुके आपटत फिरतात. जात, धर्म, राजकीय दबाव आला तरच काही तरी कारवाई करतात. त्या दबावाखाली केलेला तपास आणि पुराव्यांची नोंद सदोष असते. कसब आणि कर्तव्य या बाबतीत पोलिस यंत्रणा खूपच कमी पडते.  गुन्हेगार सुटण्याचीच शक्यता वाढते.हे सारं त्यांना माहित असतं.

पोलिसांनी कारवाई केलीच तरी खालच्या कोर्टापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस आपोआप सरकत रहाते. मुलाच्या ज्ञानात किंवा कुवतीत काहीही फरक पडला नाही तरीही मुलगा बालवाडीपासून  मॅट्रिकपर्यंत पोचतो. तसंच केसचं. कित्येक वर्षं त्यात जातात. न्याय यंत्रणा सदोष आणि अपुरी पडतेय.

भारतात पुरुष अधिक आणि स्त्रिया कमी अशी स्थिती आहे. समाजाच्या निकोप वाढीसाठी जेवढ्या स्त्रिया असायला हव्यात तेवढ्या भारतात नाहीत, खूपच कमी आहेत. भारतात जोडप्यांना मुलगे हवे असतात कारण तेच आपल्याला पोसू शकतात असं भारतीयांना वाटतं. मुलगी शक्यतो नकोच, तिला उजवायचं म्हणजे हुंडाबिंडा द्यावा लागतो.  त्यामुळं  भारतात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण फार आहे. स्त्री भ्रूण हत्येचा सुळसुळाट महाराष्ट्रातही आहे. कोल्हापूर, सांगलीमधे तसे गुन्हे फार घडले आहेत. आसामातही स्त्री पुरुष प्रमाणात असमतोल आहे, आसाम भारतातच आहे.

भाषणात भारतीय काहीही म्हणोत, स्त्रीला महत्व किती?  इज्जत वगैरेचा प्रश्न असला तर मुलीचा खून होतो, मुलाचा नाही. ऑनर किलिंगमधे मुलीच मारल्या जातात. बलात्कार झालेली स्त्री भ्रष्ट मानली जाते, बलात्कार करणारा पुरुष मान्यताप्राप्त असतो. भँवरी देवीचं राजस्थानात काय झालं?

स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, तिचं स्थान खालच्या पायरीवर आहे हा विचार भारतीय मनातून आजही गेलेला नाही. त्यामुळंच स्त्री-पुरुष प्रमाण व्यस्त होतं, त्यातूनच बलात्कारी विचाराला अधिक बळ मिळतं.

महाराष्ट्रात बलात्काराची प्रकरणं गाजली. दलित मुलीवर बलात्कार झाला याबद्दल कोरडी हळहळ व्यक्त झाली. हळहळीचं रूप तात्विक, वैश्विक होतं. मराठा मुलीवर बलात्कार झाल्यावर लाखो लोक रस्त्यावर आले आणि खटला पटापट चालवून गुन्हेगाराला फाशी देण्यासाठी दबाव आणला गेला. आसामातली मुलगी वीट भट्टी कामगाराघरची असल्यानं ती ऊच्च जातीतली किंवा आमदार-मंत्र्याच्या घराण्यातली असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं अजून तिथं   आंदोलन उभं राहिलेलं नाही.

काय गंमत आहे या देशाची.स्त्रीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला की आधी तिची जात आणि धर्म पाहिला जातो. दलित, गरीब, मुसलमान अशा क्रमानं बलात्कार झालेल्या स्त्रीची चौकशी होते, त्या क्रमानंच बलात्काराचा विचार केला जातो. वरच्या जातीतली स्त्री असेल तर काही तरी हालचाल होण्याची शक्यता जास्त.गुजरातेत मुसलमान स्त्रियांवर बलात्कार झाले, ओरड झाली.  तेव्हां हिंदू म्हणाले ” हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले तेव्हां कां नाही ओरड झाली?”. मुळात बलात्कार हाच गुन्हा आहे असं समाज मान्य करायला तयार नाही. भारत या देशाबद्दल बोललं की माणसं म्हणतात अफगाणिस्तान आणि तमक्या देशातली माणसं स्त्रियांवर बलात्कार करतात त्यावर बोला.

इतर माणसांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल बोला, आमच्या गुन्ह्याबद्दल बोलू नका. इतरांचे गुन्हे आधी संपूर्ण संपवा आणि नंतरच आमच्या गुन्ह्यांकडं लक्ष द्या. जगात, देशात इतरत्र जोवर गुन्हे घडतात तोवर आमच्या गुन्ह्यांबद्दल बोलू नका. हा विचार समाजमनात घट्ट होताना दिसतोय. गुन्हा हा गुन्हाच नाही असंही माणसं मानू लागलीयत.  विविध कारणांसाठी गुन्हे आवश्यकच आहेत असं समाजमन तयार होऊ पहातंय. गुन्हा आणि गुन्हेगार आता समाजमान्यच ठरणार अशी स्थिती दिसतेय.गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळतंय. गुन्हेगारांना समाजात मान्यता मिळू लागलीय. गुन्हेगार मंडळींना माणसं सार्वजनिक ठिकाणी, आपल्या घरातली सन्मानं पाचारण केलं जातंय. जात, धर्म, मतं मिळवण्याची क्षमता, पैसा या कसोट्यांवर माणसाचं मोजमाप होऊ लागलंय.

ही प्रवाह चिंताजनक आहे.

।।

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *