लास वेगाससारखी हत्याकांडं अमेरिकेतच कां घडतात?

लास वेगासमधे स्टीवन पॅडॉकनं ५९ माणसांना ठार मारलं. ३२ व्या मजल्यावरच्या हॉटेल खोलीत, जिथून त्यानं गोळीबार केला, २३ बंदुका आणि हज्जारो गोळ्या होत्या. लास वेगासपासून चाळीस मैलावरच्या त्याच्या गावातल्या घरात पोलीस घुसले तेव्हां तिथं १९ बंदुका सापडल्या. ६४ वर्षीय पॅडॉकनं त्या गावातच असलेल्या गिटार आणि बंदुका या नावाच्या दुकानातून आणि काही अंतरावरच्या दुसऱ्या गावातून हस्तगत केल्या होत्या.

पॅडॉक  गोरा होता, मुसलमान नव्हता, त्यानं जिहाद केला नव्हता. पॅडॉकवर कोणताही गुन्हा पूर्वी नोंदला गेलेला नव्हता.

गोळीबाराची बातमी पसरल्या पसरल्या सोशल मिडियात दणादण मेसेजेस फिरले की पॅडॉक डेमॉक्रॅट होता, ट्रंपविरोधी होता, त्यानं ट्रंपना बदनाम करण्यासाठी हा उद्योग केला होता. पोलिसांनी तपास सुरु करून काही निष्कर्ष जाहीर करण्याच्या आतच मिडियात बातमी पसरली की एकापेक्षा अधिक जिहादी मारेकरी होते. फेसबुकची यांत्रिक पद्धत अशी की ज्या शब्दाला जास्तीत जास्त हिट्स मिळतात त्या शब्दाला प्राधान्य मिळतं. जिहादी, ट्रंप विरोधी शब्द आलेले मेसेजेस फेसबुक आणि गुगलनं रीतसर पसरवले.

ट्रंपांचे ट्विट्स लास वेगास प्रकरणात अगदीच थंड होते. मेलेल्यांना सहानभूती असे कोमट शब्द त्यात होते. कारण पॅडॉक ना मुसलमान होता, ना तथाकथित दहशतवादी होता. तो दहशतवादी असता तर मेलेल्यांना धोधो सहानुभूती मिळाली असती.

पॅडॉककडं फार शस्त्रं होती. अमेरिकेत शस्त्रं बाळगायला कायद्यानं परवानगी आहे. अमेरिकन लोकं तो त्यांच्या अधिकार मानतात.  स्वसंरक्षणासाठी, खेळ आणि मनोरंजनासाठी आम्हाला बंदुका हव्यात असं अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे. अमेरिकेत शस्त्राधिकार हवा असणाऱ्यांचा फार मोठा प्रभावी गट आहे. ते बहुतांशी गोरे आहेत. कामगार, काळे इत्यादी ‘ गैरअमेरिकन ‘ लोक आपल्यावर हल्ला करतील या भीतीपोटी ही माणसं शस्त्रं मागतात. शिवाय शस्त्रं उत्पादणाऱ्यांचाही एक मोठा गट आहे. शस्त्राधिकार गेला तर त्यांचा धंदा खतम होईल. वरील दोन्ही गटांचं वर्चस्व अमेरिकन राजकारणात आहे. त्यामुळंच कितीही हत्याकांडं झाली तरी शस्त्राचा अधिकार अमेरिकन सरकार नाकारत नाही, शस्त्र बाळगण्याला कायद्यानं बंदी घालत नाही.

स्वसंरक्षाणासाठी पिस्तुलं वापरली जातात. शिकारीसाठी रायफल्स वापरल्या जातात.  पॅडॉककडं असॉल्ट रायफल्स आणि ऑटोमॅटिक गन्स होत्या. या बंदुका केवळ युद्धात वापरल्या जातात, पक्षी मारण्यासाठी किंवा नेमबाजी करण्यासाठी वापरल्या जात नाहीत.

बंदुका देताना माणसाचा इतिहास तपासण्याची तरतूद अमेरिकन कायद्यात आहे. गुन्हेगार नाही ना, दहशतवादाशी संबंध नाही ना, एकूण तोल सुटलेला माणूस नाही ना  याची चौकशी केली जाते. पॅडॉकला कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता किंवा तो चक्रमपणे वागण्याच्या घटना नोंदल्या गेलेल्या नव्हत्या. त्यामुळं अमेरिकन कायद्यानुसार तो शस्त्रं बाळगू शकत होता.

मेख इथंच आहे. अलिकडल्या काळात कोणत्याही दहशतादी संघटनेशी कोणताही संबंध नसणारी माणसं कोणाकडूनही आदेश न घेता हत्याकांडं करतात. ब्रेक्झिटला विरोध करणाऱ्या एका खासदाराचा खून एका माणसानं केला. कोणत्याही संघटनेचा संबंध नसलेला अगदी सामान्य, तुमच्या आमच्यातला माणूस वर्तमानपत्रं आणि सोशल मिडिया वाचून भडकला आणि त्यानं परस्पर, एकांडेपणानं खासदाराला मारलं.

मुसलमानांवर अन्याय होतोय, काळ्यांवर अन्याय होतोय असं माणसं माध्यमातल्या क्लिप्स पाहून, दहशतवादी संघटनांचा प्रचार पाहून ठरवतात. दुसऱ्या बाजू कधी पहात नाहीत. अन्याय दूर करण्याचे अनेक इतर मार्ग असू शकतात हे त्यांच्या डोक्यात येत नाही. दुसऱ्याला मारणं म्हणजे एकतरफी पद्धतीनं दुसऱ्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणं होय हे त्याला सुचत नाही. आपले शत्रू कोण आहे ते आपलं आपणच ठरवतात आणि एकतरफीपद्धतीनं खून करून मोकळे होतात. कोणीही साधा माणूस आता खुनी होऊ शकतो असं वातावरण तयार झालं आहे.

प्रेमप्रकरणात अपेश, आईबाप घरी थारा देत नाहीत, नोकरी मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, खर्चायला पैसे मिळत नाहीत इत्यादी हताशांमधूनही माणसं शस्त्र उचलतात, खून करतात.

तुमच्या आमच्यासारखी माणसं कशी तरी कुठल्या तरी क्षणी हिंसक कां होतात याचा अभ्यास आताशा होऊ लागलाय. विजय तेंडुलकरांनी हिंसा या विषयावर केलेल्या अभ्यासात अनेक सामान्य असलेल्या आणि गुन्हेगार झालेल्या माणसांच्या केसेस नोंदल्या आहेत. एका कुटुंबवत्सल आणि घरेलू माणसानं आपल्या पत्नीला डोक्यात दगड घालून मारलं. आपण हे कृत्यं कां केलं हे त्याला सांगता येत नव्हतं. पण तरीही पत्नीला मारलं हा गुन्हा असल्यानं तो शिक्षा भोगत होता.

मानसिक तोल कोणाचाही केव्हाही जाऊ शकतो.

तोल जातो त्याक्षणी जर माणसाकडं घातक हत्यार नसेल तर हत्याकांड होण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच माणसाकडं हत्यार असायला परवानगी नसावी. जगभरच्या अनेक देशात, युरोपात, ब्रीटनमधे, जपानमधे हत्यारं ठेवायला बंदी असल्यानं बंदुकांमुळं होणारे खून अगदीच कमी होतात. अमेरिकेत सर्वात जास्त खून आणि हत्याकांडं होतात.

पॅडॉक ६४ वर्षाचा होता. सामान्यपणे आपण असं मानतो खूनबीन करायची खुमखुमी माणसाच्या तरुण वयात असते, म्हातारी माणसं वय वाढतं तसं मनानं आणि शरीरानं थकत जातात. त्यामुळं पॅडॉकचं कृत्यं  विचार करायला लावतं.

अमेरिकन म्हातारे हाही मुद्दा विचारात घ्यायचा कां?अमेरिकन म्हातारे सैरभैर, पोकळीग्रस्त झालेत काय? त्यामुळंच ते गुन्हे करायला प्रवृत्त होताहेत काय? केवळ एका पॅडॉकच्या घटनेवरून असा निष्कर्ष काढू नये पण तो एक मुद्दा चर्चेत येऊ लागलाय.

अमेरिकेत तारुण्यातच तुटलेपण सुरु होतं आणि म्हातारपणात ते अधिक गडद होतं. साठी उलटलेले लोक हल्ली बाईक घेऊन दिवसेंदिवस रस्ते आणि मॉटेलमधेच जगत असतात. या गावातून त्या गावात, या मोटेलमधून त्या मोटेलमधे. बांधून ठेवणारं घर त्यांना उरलेलं दिसत नाहीये.

गेल्या वर्षी मी लास वेगासला गेलो होतो, दिवसभराचा कारचा प्रवास करून. वाटेत कित्येक बायकर म्हाताऱ्यांचे ताफे भेटले. अर्ध्या अंतरावर नेवाडा वाळवंटातल्या ईली नावाच्या गावातल्या एका मोटेलमधे मी रात्र काढली. त्या मोटेलमधे चार जोडपी आणि दोन एकटे म्हातारे बाईकवरून आले होते. कित्येक दिवस ते फिरतच होते. दिवसभर रस्त्यावर, दुपारी आणि रात्री बारमधे.

कोलंबसमधे एका कॉफी हाऊसमधे मी पुस्तकं वाचत, लिहित बसत असे. तिथं मेगन नावाची तरूणी होती. तिची दोस्ती झाली. ती शिकत होती, शिक्षणासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी कॉफी हाऊसमधे वेट्रेस झाली होती. गप्पा मारता मारता म्हणाली की ती तिच्या गावातल्या घरी जात नाही, तिचे वडीलही तिला भेटायला कोलंबसमधे येत नाहीत. कारण वडिलांना मुलांमधे इंटरेस्ट नव्हता, वडिलांना तिच्याकडं पहायला वेळच नव्हता, ते कायम बाईकनं फिरत असत, घरीच येत नसत.

विस्कॉन्सिनमधल्या स्टीवन्स पॉईंट या गावात  मी रहात होतो तिथं माझ्या घरासमोरच्या एका बागेत एक माणूस सक्काळी येऊन  एका बाकड्यावर बसायचा.पुतळ्यासारखा. मी दिवसभर काहीबाही करून घरी परतलो तरी तो तिथंच. मग रात्री कधी तरी तो तिथून जायचा.

पॅडॉक ६४ वर्षाचा होता म्हणून हा मुद्दा येतो.

गेल्या पाचेक वर्षात अनेक एकांड्यांनी हत्यांकांडं केली. ते एकांडे तरूण किंवा मध्यम वयीन होते. ती माणसं हताश होती, निराशाग्रस्त होती, सैरभैर होती, समाजापासून तुटलेली होती, सारासार विचारांशी त्यांचा संबंध तुटला होता.

अमेरिकेत फाक माणसं एकूणातच तुटल्यागत झालीत कां?

सर्वसामान्य घरातली, साधारण सुखी घरातली तरुण मुलंही आज अत्यंत अस्थिर मनस्थितीत आहेत. समाजात चहूकडं सुख आणि स्थैर्याच्या असंख्य शक्यता दिसत असतानाही त्यांच्यात आपण सुखाला वंचित झालो आहोत अशी भावना आहे. शिक्षण अर्धवट राहिल्यानं, मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं, मिळणारं उत्पन्न अपुरं असल्यानं, मिळणारा रोजगार अनिश्चित असल्यानं किती तरी म्हणजे किती तरी तरूण अस्वस्थ आहेत. त्यात गोरे आहेत, काळे आहेत, आशियाई आहेत, आफ्रिकी आणि लॅटिनो आहेत, मुसलमान आहेत आणि ख्रिस्तीही आहेत.

जाहिरातीत, मॉलमधे, टीव्हीत, सेलफोनमधे, दुकानांत, सिनेमात नाना प्रकारची सुखं खुणावत असतात, त्यातली बरीचशी सुखं मिळतातही. तरीही माणसं सुखी दिसत नाहीत. आपल्याला काही तरी अजूनही मिळालेलं नाही जे इतरांना मात्र मिळालंय असं खूप लोकांना वाटतंय. आपलं दुःख हे इतर माणसांमुळं आहे असं खूप लोकांना वाटतं.

जगण्यासाठी आता घराची आवश्यकता राहिलेली नाही. सारं काही दुकानात, इस्पितळात, न्यायालयात मिळतं. लोकं घरापासून तुटलीत.  पण घराबाहेरचं जगही त्यांना सुख द्यायला तयार नाही. घरात एकादं सूज्ञ माणूस असतं, आई असते, मोठा भाऊ असतो जो माणसाला समजावतो, आततायी वागू नको म्हणून सांगतो.  घराबाहेर, चर्चमधला उपदेशक किवा मशिदीतला इमाम न्यायानं वागा, आततायीपणा करू नका, दुसरा गाल पुढे करा, सहन करा असं सांगत असे.आता माणसं चर्चमधे जाईनाशी झालीत आणि मशिदीत तर बऱ्याच ठिकामी आततायीपणालाच चिथावणी दिली जाते.

भाऊ पाध्ये म्हणत असत की ते ‘ बाहेरख्याली ‘ होते. घरात ते कधीच सामावले गेले नाहीत, फूटपाथ आणि इराण्याचं हॉटेल हेच त्यांचं जग होतं. याच इराण्याच्या हॉटेलानं महाराष्ट्रात नारायण सुर्वे आणि अरूण कोलटकरांना कवी केलं,  स्वातंत्र्य चळवळीच्या चर्चाही याच इराणी हॉटेलांनी घडवल्या.  आता मुंबईत लोकांना घरही नाही आणि इराणी हॉटेलही नाही अशी अवस्था झालीय.

म्हातारे असोत की तरूण, तुटलेपण, अवकाशात भिरकावले गेलेपण, ही एक समस्या अमेरिकेत तयार होऊ लागलीय. त्यातूनच तर अशी हत्याकांडं घडत नाहीयेत ना?

।।

 

9 thoughts on “लास वेगाससारखी हत्याकांडं अमेरिकेतच कां घडतात?

 • October 6, 2017 at 9:49 AM
  Permalink

  याच अंगानं आपण मोबाईल या शस्त्राबाबतही विचार करायला हवा….Free internet facility हा मोठाच प्रश्न असणार ! कास करावे या Data चे ?

  Reply
 • October 6, 2017 at 9:50 AM
  Permalink

  दामले सरांचा ब्लॉग वाचनं म्हनजे प्रत्येक वेळेस एका नव्या वास्तवाला सामोरी जाणं….

  Reply
 • October 6, 2017 at 12:20 PM
  Permalink

  ब्लॉग वाचला. पूर्ण पटला असं नाही; पण आवडला. हा ब्लॉग वाचून एक जुनं पुरुषोत्तम बेर्डेने बसवलेलं नाटक आठवलं. ‘अलवरा डाकू’

  श्रीरंग

  Reply
 • October 6, 2017 at 1:50 PM
  Permalink

  Very true. Feeling of loneliness, insecurity and at times frustration of any kind leads to such crimes. Sometimes man develops frustration by reading issues not related to him.

  Reply
 • October 6, 2017 at 3:16 PM
  Permalink

  अशा सर्व प्रश्नांचे मूळ माणसाच्या एकटेपणात आहे. आता आर्थिक दारिद्र्यापेक्षा भावनांचे दारिद्र्य हा भविष्यात अधिक गंभीर प्रश्न होऊ पहात आहे.

  Reply
 • October 7, 2017 at 3:54 PM
  Permalink

  CURSE OF AMPLICITY

  Reply
 • October 7, 2017 at 6:54 PM
  Permalink

  नुसती प्रजेसच नव्हे परंतु जगातील अनेक देशांना शस्त्रास्त्रे पुरवणे हा अमेरिकेचा एक मोठा धंदा होऊन बसलेला असून वरकरणी ‘शांततेचे दूत’ म्हणवणारा एक ढोंगी देश -असा सारांश काढण्यास हरकत नाही, सौदी अरेबियाचे राजे अलीकडेच रशियात गेलेले असून त्यांच्या विमानाचा सोन्याचा जिना उतरण्याआधी एक दिवस या राजेसाहेबांनी अमेरिकेकडून क्षेपणास्त्रांच्या संरक्षण (ANTI MISSILES) सुविधांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा करार या देशाबरोबर केलेला आहे -हे फार जणांना ठाऊक नसेल, त्यापुढे रशियाचे अपेक्षित करार अत्यंत नगण्य असतील. ब्रिटन, फ्रांस, इटली इत्यादी युरोपिअन देश असेच कार्य करत असतात -फक्त जनतेच्या हाती बंदुका, पिस्तुले, मशीन गन्स इत्यादी पडू न देण्यात दक्ष असतात (रस्त्यावरील पोलिसांच्या देखील), हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे असून देखील युरोपमध्ये इस्लामी अतिरेक्यांनी मोटारी, व्हॅन्स, घरगुती बॉम्ब्स इत्यादी वापरून निष्पाप जीविताची हानी केलेली आढळते. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची हमी राहिलेली नाही -मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे पुलाचे एक आगळे उदाहरण देखील मन अस्वस्थ करून टाकते.

  एक प्रवासी या भूमिकेतून अमेरिकेतील मुक्कामात जे आढळले ते अभ्यासपूर्ण भूमिकेतून मांडल्यामुळे सदर लेख वस्तुस्थिती उत्तम पद्धतीने वर्णन करतो -अभिनंदन!

  Reply
 • October 7, 2017 at 7:13 PM
  Permalink

  विशेष टिप्पणी: ‘लास व्हेगास’ येथील हत्याकांडानंतर गेल्या कांही दिवसांत चर्चेस आणि गल्लोगल्ली देवाकडे प्रार्थना आणि आणाभाका रोजच्या चालू असून टेलिव्हिजनवर यापेक्षा वेगळे असे वास्तव भूनिकेतील कांहीही दिसत नाही. ज्याची भक्तीने पूजा करून मनस्वास्थ्य मिळवायचे -त्याने मुळातच निष्पाप जीवितांचे संरक्षण नको का करायला?

  Reply
 • October 11, 2017 at 8:43 PM
  Permalink

  बाजारी वर्चस्वामुळे खुणावणारी आवाक्याबाहेरची आभासी सुखं ह्याच बरोबर कुठलेही छंद नसणे,वाचन-विचार,स्नेहभाव, समुहजीवनातील निरमळ आनंद हे सर्वच हरवते आहे या सर्वाचा आपण समाज म्हणून गांभिर्याने विचार करायला हवा. संपूर्ण समाजानेच अतीस्पर्धा व तणाव नाकारत,हळु व हळुवार जगण्याचा सराव करायला हवा….भुतानने हँपीनेस इंडेक्स वाढवला तसा प्रयत्न करुयात.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *