अमेरिका – अफाट निसर्ग आणि पुस्तकं

अमेरिका – अफाट निसर्ग आणि पुस्तकं

 

वैराण वाळवंट. टोलेजंग जंगलं. न संपणाऱ्या पर्वतांच्या रांगा. दृष्टीत न मावणारी शेतं.काऊबॉईज. मारियुआना. पुस्तकं.

।।

सुरवातीला एकाच तिकीटात जास्तीत जास्त हिंडायची आयडिया. ओरलँडोचं तिकीट काढलं, व्हाया लंडन. परतताना लंडनला थांबलो आणि इंग्लंडात हिंडलो. औद्योगीकरणाचा अभ्यास करत होतो, मँचेस्टरला जायचं होतं. अमेरिकेत ओरलँडो, न्यू जर्सी, वाशिंग्टन आणि न्यू यॉर्क फिरून झालं. भारतीयांच्या बोलण्यातली बहुतांश अमेरिका म्हणजे न्यू जर्सी, वाशिंग्टन आणि न्यू यॉर्क. भारतीय माणसं त्याबद्दल बोलत असल्यानं या अमेरिका फेरीत थरार वाटला नाही, काही नवं दिसलं नाही. खरं म्हणजे नवं दिसलं ते नंतर मँचेस्टरमधे, मँचेस्टरपासून अंतरावर असलेल्या बोल्टनमधे आणि विगनमधे.

।।

नंतर दोन वर्षांनी ओहायोमधे कोलंबसमधे गेलो. आमोद (माझा मुलगा) तिथं शिकत होता. त्याच्याकडं एक खूप जुनी अँटिक म्हणावी अशी होंडा गाडी होती. तो बॅडमिंटन खेळत असे. त्यासाठी अमेरिकेत ठिकठिकाणी गाडीनं जात असे. तो म्हणे ” एक अमेरिका न्यू यॉर्क, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को इत्यादी ठिकाणी आहे. दुसरी अमेरिका शहरांपासून दूर आहे. तिथलं लँडस्केप जगात कुठंही दिसणार नाही. स्केल म्हणजे काय असतं त्याची कल्पना ती लँडस्केप्स पाहिल्याशिवाय येत नाही. मला कारनं हिंडायला आवडतं. चल आपण बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानं फिरूया.”

आम्ही दोघं निघालो. शेजारच्या इंडियानापोलिस आणि इलिनॉयमधल्या शहरात स्पर्धा होत्या. पाच सहा तासांचा प्रवास. दोन्ही बाजूंना नजर पोचेस्तवर म्हणजे क्षितिजापर्यंत पसरलेली शेतं आणि स्प्रिंकलर्स. मधे मधे सायलोज, म्हणजे चार पाच मजली उंचीच्या कणग्या, त्यात धान्य साठवलेलं. एक दिवसाचा खेळ आणि दोन दिवसांचा प्रवास.

।।

नंतर दोन वर्षांनी पुन्हा कोलंबस. कोलंबसपासून बऱ्याच अंतरावर एक स्टीव  नावाच्या माणसाकडं आम्ही गेलो. तो म्हणाला आपण एका नव्या ठिकाणी जेवायला जाऊया. ते नवं ठिकाण म्हणजे दोन वर्षात नव्यानं वसवलेलं गाव होतं. उद्योग, गोदामं, मॉल, दुकानं, घरं, जिम सारं सारं दोन वर्षात जय्यत तयार, लोकही रहायला आलेले. तिथंच एका बारमधे गेलो तर बियरसोबत खायला भुईमुगाच्या अख्ख्या शेंगा. जागोजागी पिंपात भरून ठेवलेल्या. आपण जायचं, परडीभर शेंगा घेऊन टेबलावर परतायचं. टरफलं खाली जमिनीवर टाकून द्यायची. महाराष्ट्र नसल्यानं ती टरफलं कोणी टाकली असं विचारणारे मास्तर नव्हते आणि मी टरफलं टाकली नाहीत असं बाणेदारपणे सांगणारे लोकमान्यही नव्हते. बारभर टरफलंच टरफलं पसरलेली. मधे मधे सफाईदार येऊन ती गोळा करून जात असे.

।।

नंतर विस्कॉन्सिनमधे ऑशकॉशमधे.

मला डेट्रॉईट या शहराच्या विपन्नावस्थेचा अभ्यास करायचा होता. अंतर होतं ४६८ मैल. विमानाचा प्रवास तीनेक तासांचा. कारनं जायचं तर मिशिगन लेकच्या बाजूबाजूनं शिकागो शहराला वळसा घालून हुरसन लेकच्या काठावरच्या डेट्रॉईटला पोचायचं. वाटेत इलिनॉय आणि इंडियाना ही राज्य लागायची. वाटेत रेस्टरूम आणि खाण्यापिण्यासाठी थांबत थांबत जायचं तर बारा तास सहज लागतात.  पहाटे पहाटे निघून रात्री उशीरा डेट्रॉईट. वाटेत समुद्रासारखंच मिशिगन आणि हुरसन लेक. दृष्टी पोचेस्तोवर हिरवीगार शेतं. तासन तास एक माणूस दिसत नाही, एक घर दिसत नाही, नुसती शेतं आणि जंगलं.

डेट्रॉईटमधली एक आठवण म्हणजे  John K. King, Used and Rare Books हे  १९३० पासून चालत आलेलं जुन्या व दुर्मिल पुस्तकांचं दुकान. या दुकानाची गंमत म्हणजे  पोर्नोग्राफी पुस्तकात (मराठीत चावट पुस्तकं) रस असणारी माणसं अमेरिकाभरून या दुकानात येतात. जुनी जुनी चावट पुस्तकं इथं मिळतात. जवळ जवळ ९०० विविध प्रकारची पुस्तकं या दुकानात मिळतात. काही कपाटं केवळ नऊ सेंट किमतीच्या पुस्तकांची. या दुकानात खूप जुनी नियतकालिकंही पहायला, विकायला ठेवली आहेत. एका नियतकालिकात अर्नेस्ट हेमिंगवे च्या पुस्तकाचं परीक्षण आहे. हेमिग्वेनं ते मासिक पाहिलं, त्यातलं आपल्या पुस्तकावरचं परिक्षण वाचलं आणि त्या पानावर स्वतःच्या हस्ताक्षर आणि सहीसह लिहिलं ‘ blah.. blah .. blah ‘

किंगमधे दररोज ढिगानं पुस्तकं येत असत. जुनी. मॅनेजरचं एक किचकट काम म्हणजे ती पुस्तकं पहायची आणि त्याची किमत ठरवायची. मॅनेजरला पुस्तकाचं कव्हर पाहूनच पुस्तकाच्या मोलाचा अंदाज येत असे. पुस्तकाचा लेखक कोण, किती जुनं प्रकाशन, लेखकाची किंवा नामांकिताची सही असणं इत्यादी कसोट्या होत्या. महत्वाचं वाटलं की पुस्तकाची सगळी पानं मॅनेजर चाळून पहात असे.

१९८७ मधे मार्क ट्वेनचं तीन खंडातलं चरित्र एका माणसानं किंगला विकलं. मॅनेजर ते चाळत असताना एका खंडातून तीन फोटो खाली पडले. फोटो मार्क ट्वेनचे होते. ट्वेन एका गाढवाच्या गाडीतून एका तरुण मुलीबरोबर प्रवास करत होता. फोटोमागे पेन्सिलिनं तारीख लिहिली होती १९०८. ट्वेनच्या चरित्रात १९०८ साली बर्म्युडामधे ट्वेन मार्गारेट ब्लॅकमर या तरुणीला भेटल्याचा उल्लेख होता. मार्क ट्वेनचा अभ्यास असणाऱ्या लोकांनी वरील फोटो आणि नोंद खरी आहे असं सांगितलं. त्या दिवशी डेट्रॉईटच्या पेपरात ती हेडलाईन होती.

किंगनं ते फोटो एका संस्थेला खूप किमतीला विकले.

।।

एकदा मिशिगन तलावाच्या काठावरच्या डोअर काऊंटी या गावात दोन दिवस मुक्काम. ऑशकॉश ते डोअर काऊंटी. वाटेत दोन्ही बाजूला जंगलं. शेकडो मैल एकही इमारत नाही, एकही माणूस नाही. जंगलात झाडांची उंची इमारतींपेक्षा जास्त. ऊन जमिनीपर्यंत पोचत नाही. मिशिगन म्हणजे काय आहे ते कळलं. हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांपेक्षाही जास्त विस्तार, ५९ हजार किमी चौरस. क्षितिजापर्यंत पाणी. थंडीत सरोवर गोठतं. माणसं त्यावर गाड्या चालवतात, खेळतात.

ऑशकॉशपासून काही अंतरावर  आमोदचे सासरे डेविड यंगब्रावर यांच्या बर्लिन या गावात गेलो. तिथं त्यांचं घर आणि  मागं त्यांची जमीन. म्हणाले चला आमच्या जमिनीवर  फेरफटका मारूया. शंभर एकर जमीन होती. त्यावर शेती अजिबात नव्हती. नुसतं जंगल. मला आश्चर्य वाटलं. जमीन तशीच ठेवणं कसं काय परवडतं असं माझ्या मनात आलं. डेविड म्हणाले ‘ जमीन पडीकच ठेवलीय. जंगल वाढू दिलंय. वर्षभरात इथं भरपूर डुकरं वगैरे जमा होतात. मग सीझनमधे आम्ही शिकार करतो.’ शिकारीसाठी बांधलेली मचाणं पाहिली. एक मचाण कष्टपूर्वक चढलो.

संध्याकाळी पार्टी होती. पार्टीला डेविडचे मेव्हणे, अंकल बिल,  आले होते. ते दिसायला थेट शान कोनोरीसारखे दिसत होते. ऐंशीच्या पलिकडचं   वय. ते कोलोराडोहून १५०० किमी पेक्षा जास्त अंतर गाडी चालवत आले होते. गाडी म्हणजे एक मोठी बस. ही बस म्हणजे एक रहातं घर होतं. झोपायची जागा, किचन, टॉयलेट इत्यादी सगळं. त्यात ते स्वयंपाकही करत. बसमधेच तयार केलेला केक त्यांनी पार्टीसाठी आणला होता. बसच्या मागं त्यांची कार बांधलेली होती. बर्लीन शहरापासून काही अंतरावर बसेस पार्क करण्याची सोय होती. बस तिथं सोडून कारनं ते बर्लिनमधे आले होते.

।।

नंतर आयडाहोमधे मेरिडियन या गावात. आमोदला कॉलेजला साडेतीन महिने सुटी असते. त्याचा सतत आग्रह असे की पूर्ण चार  महिने रहायला आलात तर भटकता येईल. तसं जमवलं.

एकदा गेलो व्हेगसला. वाटेत अख्खं नेवाडा राज्य. लांब प्रवास डोळ्यासमोर ठेवून आमोदनं जुनी गाडी काढून नवी गाडी घातली होती. जुनी गाडी फार पेट्रोल पीत असे. दिवस उजाडता उजाडता निघून संध्याकाळी ईली या गावात पोचायचं.

वाटेत नेवाडा. वाळवंट. सहारासारखं किवा राजस्थानातल्या वाळवंटासारखं नाही. फूटभर उंचीची झुडपं पसरलेली. बस. त्यापेक्षा जास्त उंचीचं झाड नाही. सभोवताली बोडकी हिंस्र दिसणारे पर्वत.एक माणूस दिसत नाही. तीन तीन तास प्रवास केला तरी वाटेत पेट्रोल मिळत नाही, खाण्यापिण्याची सोय नाही. जीपीएसही चालत नाही. सेल फोनला अनेक ठिकाणी रेंज यात नाही. पेट्रोल संपलं की मरण. कोणीही मदतीला येऊ शकत नाही.

हॉलिवूडच्या तिशी चाळिशीतल्या सिनेमातला निसर्ग.

खिडकीतून बाहेर पहाताना वारंवार भास व्हायचा की स्टीव मॅक्वीन किंवा क्लिंट ईस्टवूड किंवा जॉन वेन दत्त म्हणून समोर थडकलाय,  कंबरपट्ट्यातून रिव्हॉल्वर काढलय, बोटाभोवती फिरवून आमच्याकडं उगारलय.

अगदी तसंच झालं. एका क्षणी आमची कार थांबली. एक जनावरांचा कळप रस्ता ओलांडत होता. बघतो तो धिप्पाड घोड्यावर स्वार धिप्पाड काऊबॉईज जनावरांचा कळप सांभाळत होते. डोक्यावर काऊबॉय हॅट, हॅटच्या बाहेर आलेले लांबसडक केस, चामड्याचे गुडघ्यापर्यंतचे बूट, अंगात चामड्याचा कोट. काऊ बॉईज आणि काऊ गर्ल्स. सहा फुटापेक्षा जास्त उंचीचे घोडे आणि त्यावर सवार सहाफुटी काऊ बॉईज. कळपाच्या बाजूबाजूनी दांडगे कुत्रे. एकादं चुकार जनावर कळप सोडू लागलं की कुत्रं त्याच्यावर चढाई करायचं, जनावर पुन्हा कळपात दाखल.

जनरल मोठ्या सैन्यासमोर दिमाखानं उभा असावा तसे काऊबॉईज दिसत होते. समोर गुरांचं सैन्य.

वाटेत एका ठिकाणी प्रेक्षणीय स्थळाची पाटी लावलेली जागा होती. वैराण वाळवंटात प्रेक्षणीय ते काय असणार या विचारानं तिथं थांबलो. ते होतं पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोर्निया ते पूर्व किनाऱ्यावरील न्यू यॉर्क हे सुमारे चार हजार किमीचं अंतर पार करून टपाल घेऊन जाणाऱ्या घोडेस्वारांचं  थांबण्याचं ठिकाण.  घोडेस्वार हे अंतर धडाधड ८ दिवसात पार करत असत.

या जागेवरून चारही बाजूंनी पाहिलं की या टपालस्वारांना कशाकशाला तोंड द्यावं लागत असेल याची कल्पना येते. वाटेत ना एकही झाड ना एकही विहीर ना एकही घर ना एकही माणूस. वर आकाशात एकही ढग नाही. रणरणता सूर्य दयामाया न करता आग ओकत असतो.

बाप रे.

काही अंतर गेल्यावर आमोद म्हणत असे की पेट्रोलची टाकी रिकामी होत आलीय. आमचे वांधे. जीव नव्हे तर पेट्रोलची टाकी मुठीत धरून प्रवास. पेट्रोल पंप लागला की पुनर्जन्म झाल्यासारखं वाटे. पेट्रोल संपलं अशी पाटी पंपावर कुठंही दिसली नाही.

सूर्य विश्रांती घ्यायला जायच्या सुमाराला ईली हे गाव.

पुन्हा मॅक्वीन, ईस्टवूडची आठवण. तशीच बैठी आणि एक मजली घरं. तसेच रेस्टॉरंट आणि बार. बारचे आतबाहेर उघडणारे दरवाजे. एका बार समोर थांबलो. आतबाहेर उघडणारा दरवाजा उघडून आत पाहिलं. समोर शंभर वर्षापूर्वी असावा तसाच बार आणि आतलं लाकडी फर्निचर. बार स्टूलवर बसलेले काऊबॉयी हॅट घातलेले लोक. टाईम मशीनमधे बसून मागे गेल्यासारखं वाटलं.

बाहेर येऊन रस्त्यावर नजर टाकली. या मंडळींचे घोडे खुंट्याला बांधलेले दिसतील या आशेनं. पण घोडे नव्हते. हार्ले डेविडसन बाईक रस्त्याच्या कडेला रांगेनं ताठ उभ्या होत्या.

बार स्टूलवरच्या एका माणसाशी थोडीशी दोस्ती केली. तुमच्या जीन्स आमि चामड्याच्या ट्राऊझर्स, चामड्याची जॅकेट्स आणि गुडघ्यापर्यंतचे बूट आणि हॅट हा तुमचा पेहराव दररोज असाच असतो काय असं एकाला विचारलं. त्याला माझं बोलणं न समजणं स्वाभाविक होतं.  मी तुटक तुटकपणे एकेक शब्द सुटा सुटा वापरत त्याला जुन्हा सिनेमांची आठवण करून दिली आणि  विचारलं की तुम्ही हे सारं कपडे टुरिस्टाना सुखावण्यासाठी घालता? घशात घडघड आवाज करून हसत हसत तो माणूस म्हणाला हे त्यांचे दररोजचेच कपडे आहेत, हा बारही दररोजचा आहे आणि थोडा वेळ थांबलात तर इथे होणारा दंगाही दररोजचा आहे. फक्त कोणी पिस्तूल उगारून कोणाला मारत नाही येवढाच फरक पडला आहे.

ती रात्र एका मोटेलमधे. सकाळी उठून पुन्हा व्हेगसकडं आगेकूच. वाटेत कुठं तरी वाळवंट संपतं आणि शेती सुरु होते. पुन्हा क्षितीजापर्यंत हिरवीगार शेतं. हज्जारो हेक्टर्स.

आयडाहो ते व्हेगस या पूर्ण प्रवासात डाव्या उजव्या बाजूला वाळवंटं आणि क्षितिजावर पर्वत. पर्वतांची रांग संपतच नाही. कधी हे पर्वत पिवळे, सोनेरी काळेकुट्ट. भीती वाटावी अशा आकाराचे सुळके आणि घळी. कधी अर्ध्यापेक्षा जास्त उंचीपासून बर्फ. खाली मरणाचं उकडतं आणि तिकडं वर पहावं तर बर्फ.

व्हेगसपासून तासा दीड तासाच्या अंतरावर हूव्हर धरण. कधी तरी १९३० मधे बांधलेलं धरण. साधारणपणे आपण धरण खालून पहातो किंवा धरणाच्या भिंतीच्या पातळीवरून पहातो. इथं आपण डोंगराच्या माथ्यावर असतो आणि खाली धरणाची भिंत दिसत असते. तिथून खाली पाहिलं तर   खाली उभा असणारा पन्नास चाकांचा ट्रक एकाद्या अळीसारखा दिसेल. धरणाच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहून नेणारे, वीज वाहून नेणारे मार्ग. त्यासाठी उभारलेल्या इमारती. या इमारतींना खांद्यावर घेणारे आणि तोलून धरणारे महाकाय खांब. या साऱ्याला एक डिझाईन आहे. अनेक फ्लायओव्हर धरणापर्यंत गाड्या पोचवतात. या फ्लाय ओव्हरना आणि त्यांच्या खांबांना डिझाईन आहे. धरण असो की पूल की नदीचा काठ की वीज निर्मितीची जागा, प्रत्येक बांधकामाला सौंदर्य आहे, एक डिझाईन आहे. सिविल इंजिनियरिंग हा सिमेंट काँक्रीटसारखा खडखडीत विषय असूनही तो किती सुंदर करता येतो ते हूव्हर धरणाकडं पाहून कळतं. स्केल म्हणजे काय असतं तेही हूव्हरवरून कळतं. धरणावर फिरतांना छाती आणि मेंदू दडपून जातो.

व्हेगसहून  परतताना आम्ही वाटेत न थांबता परतायचं ठरवलं. तेरा तास सतत प्रवास. नेवाडाचं लँडस्केप, काऊबॉईज वगैरे.

।।

एकदा आम्ही ओरेगनमधे जायचं ठरवलं. रजनीशपुरम हे प्रकरण काय आहे ते पहाण्यासाठी. आयडाहोतून ओरेगनमधल्या बेंड या गावाला जायचं. तिथं मुक्काम. नंतर तिथून अँटेलोप या गावात. तिथून रजनीशपुरम. सगळा मिळून सुमारे साडेसहाशे किमीचा प्रवास. म्हणजे एकूण दहा तासापेक्षा जास्त प्रवास.

आयडाहो आणि ओरेगन हे दोन्ही प्रदेश नेव्हाडापेक्षा एकदमच वेगळे. हिरवेगार. प्रचंड शेती आणि जंगलं.

मेरिडियन या गावातून बाहेर पडता पडता डोंगर सुरु होतात. खरं म्हणजे मेरिडियन, बॉइसी ही गावं डोंगरांमधेच वसली आहेत. चारही बाजूला डोंगर आणि मधोमध गाव. गावाबाहेर पडल्यावर काही अंतरावर एक ऊंच डोंगर आणि डोंगराच्या टोकावर एक ऐसपैस घर. कायच्या काय अस्ताव्यस्त डोंगरावर डोंगरभर हिरवळ. सामान्यतः डोंगरावर झाडं झुडुपं असतात, हिरवळ असत नाही. हिरवळ लावणं आणि जपणं हे फार कष्टाचं काम असतं. सतत आणि भरपूर पाणी आणि गवत सतत कातरत रहावं लागतं. अख्खा डोंगर हिरवळीचा करायचा म्हणजे माणूस पैशानं फारच दांडगा हवा.

विचारणा केल्यावर कळलं की या भागात म्हणजे नेवाडा आणि ओरेगनमधे दांडगे लोक खूप आहेत. कॅलिफोर्नियातले श्रीमंत लोक इथं जमिनी आणि डोंगर घेतात. रहायचं म्हणाल तर कोणी तिथं रहायला जात नाही, केवळ हौस म्हणून घेतलेला डोंगर. वर्षातून काही दिवस आले तर आले.

मेरिडियन सोडलं की लगेच स्नेक नदी सुरु होते. कित्येक तास ही नदी आपल्या डाव्या उजव्या हाताला सोबत करत असते. नदीच्या पलीकडं क्षितीजावर पर्वत. रस्ता, नदी आणि पर्वत यांच्या मधल्या जागेत हज्जारो एकरांची हिरवीगार शेतं. बेंड पर्यंत जाईपर्यंत हिरवा रंग, पर्वत आणि बर्फानं माखलेली शिखरं आपली साथ सोडत नाहीत. पहाता पहाता गुंगी येते.

बेंड शहर तर जंगलातच वसल्यासारखं.

बेंडची एक गंमत म्हणजे तिथं मारियुआना हे मादक द्रव्य व इतर वीड्स (weeds- मादक द्रव्यं) मिळतात. अधिकृत रीत्या. ओरेगनमधे मादक द्रव्याला परवानगी आहे. आम्ही एका दुकानात गेलो. दगडी भिंतीचं डिझाईन असलेलं दुकान. दुकानात मुलींनी स्वागत केलं. तुम्हाला कोणतं वीड हवंय असं विचारलं. आमचा निर्णय झाला नव्हता. तिनं पलिकडच्या खोलीतल्या एका जाणकार बाईकडं पाठवलं. त्या बाईनं विविध मादक वनस्पती, त्यांचे विविध घटक आणि विविध गुण, शरीरावर त्याचे होणारे पोषक परिणाम इत्यादी गोष्टी सांगितल्या आणि त्यावरचा मजकूर वाचायला दिला. मजकुरात वैज्ञानिक विश्लेषण होतं. अनेक दुर्घर रोगांचे दुष्परिणाम वीडमधले घटक कसे रोखून धरतात यावरचे प्रसिद्ध झालेले वैज्ञानिक पेपरचे संदर्भ त्या मजकुरात होते. आमची ऑर्ड दिल्यावर सर्व माहिती व तपशील नोंदलेल्या एका सुंदर कागदी लखोट्यात हवाबंद केलेल्या पिशवीत आम्हाला आमचं वीड मिळालं.

काचेच्या कपाटात नाना प्रकारच्या देखण्या  डिझाईन्सचे  पाईप्स, चिलिमा होत्या. वीड ओढण्याचा एकादा सुंदर पाईप पंधरा हजार रुपयाला पडतो.

सार्वजनिक ठिकाणी वीड ओढायला परवानगी नाही. माणसानी स्वतःच्या घरातच वीडसेवन करावा असा कायदा आहे. कायदा कडक आहे. वीडप्रभावित माणूस रस्त्यावर आढळला तर दीर्घ तुरुंगवास.

।।

ओरेगनमधलं एक पुस्तकांचं दुकान.

पॉवेल्स बुक्स.

दुकानाचं ब्रीद वाक्य आहे ‘पुस्तकं विकत घ्या, वाचा, विका’

अमेरिकेतल्या महाकाय पुस्तकांच्या दुकानांच्या  गणनेत ओरेगनमधील  या  पुस्तक दुकानाचा नंबर लागतो. या दुमजली दुकानातल्या किरकोळ विक्रीच्या पुस्तकांचं क्षेत्रफळ १.६ एकर (६८ हजार चौफू) आहे. १९७१ साली हा उद्योग प्रथम शिकागोत सुरु झाला. तिथून तो ओरेगनमधे  सरकला.

दुकानात नवी आणि जुनी पुस्तकं विकली जातात. दररोज सुमारे ३००० पुस्तकं हे दुकान खरेदी करतं. दुर्मिळ पुस्तकांचाही साठा दुकानात आहे. सीडी, डीव्हीडी, ऑडियो पुस्तकं, ईपुस्तकं इत्यादी गोष्टीही विकल्या जातात. काऊंटवर व्यवहार होतात आणि इंटरनेटवरही खरेदी होते. आज या   पुस्तकाच्या दुकानाचं  उत्पन्न सुमारे दहा कोटी डॉलर आहे.

।।

बेंडपासून अँटेलोप. सारा प्रवास दऱ्यांमधून.

अँटेलोप गाव जेमतेम तीस चाळीस घरांचं. पडकी घरं दिसतात, एक पडकं पोस्ट ऑफिस दिसतं. त्यात आता पत्रं येत नाहीत. रस्त्यावर चिटपाखरू नसतं. मधेच एका घराच्या कंपाऊंडमधे ट्रॅक्टर, जुन्या गाड्या, शेतीची औजारं पडलेली दिसतात. दोन वयस्क पांढऱ्या दाढीच्या व्यक्ती जिन्सच्या खिशात पंजे कोंबून  ‘ कुठून परग्रहावरून ही माणसं आपल्या गावात तडमडायला आलीत ‘ असा भाव चेहऱ्यावर आणून आपल्याकडं पहातात. आपण विचारतो ‘ इथं रजनीशपुरम कुठंय? ‘ ती माणसं एकमेकांकडं पाहतात, माहित नाही असं पुटपुटतात. कारण त्यांना रजनीशपुरम माहित नसतं, त्यांना बिग मडी रँच माहित असतं.

रजनीशपुरम स्थापन झालं ते या बिग मडी रँचवर.

अँटिलोपपासून बिग मडी रँचवर जायला तासापेक्षा जास्त वेळ लागतो. एकच गाडी जाऊ शकेल असा कच्चा रस्ता. डांबरी, काँक्रिटचा नाही. रस्ता डोंगरांच्या रांगांतून जातो. एक रांग संपली की दुसरी रांग. वाटेत जीपीएस नाही. त्यामुळं आपण योग्य वाटेनं जातो की नाही ते कळायला मार्ग नाही. वळणं येतात, डावीकडं आणि उजवीकडं अशा वाटा फुटतात. कुठली वाट धरायची ते कळत नाही. कारण रस्त्यावर कुठंही पाट्या नाहीत. सेलफोनला रेंज नसल्यानं कोणाला विचारता येत नाही. अज्ञाताचा प्रवास.

चारही बाजूनी डोंगर आणि हिरवीगार शेतं. वाटेत रस्त्यावर डाव्या उजव्या हाताला एकादं छोटं कुंपण आणि फाटक. कुंपण आणि फाटकाला काही अर्थ नाही कारण पलिकडं प्रचंड डोंगर किंवा जमीन अस्ताव्यस्त पसरलेली असते. फाटक टाळून दुसऱ्या बाजूनं सहज प्रवेश करता येतो. फाटकावर एक फलक असतो. ‘ खाजगी प्रॉपर्टी. प्रवेश बंदी. बेकायदा प्रवेश करणाऱ्यावर कारवाई होईल. ‘ पलिकडं पाहिलं तर झाडं, शेती, सोडता नजर पोचेस्तवर एकही इमारत दिसत नाही. कोण मरायला इथं प्रवेश करणार आणि कशाला.

मधे मधे कुंपणामधे गाई आणि घोडे चरतांना दिसतात. तेवढीच जिवंतपणाची खूण.

एकदा आम्ही चुकलो. परत मागं फिरलो. पलिकडून येणारी गाडी थांबवून रस्ता विचारला. त्यानं सांगितल्यानुसार नवा रस्ता धरला. तरीही कुठं पोचू त्याची खात्री नव्हती.

एका वळणानं खाली उतरत असताना अचानक समोर एक विमानाची धावपट्टी दिसली. हे काय प्रकरण आहे ते स्पष्ट होईहोईपर्यंत इमारती दिसू लागल्या, एक धरण दिसलं. १९८० सालपर्यंत हे होतं बिग मडी रँच. नंतर त्याचं झालं रजनीशपुरम. १९९० नंतर पुन्हा बिग मडी रँच.

डोंगरांच्या रांगामधे ६४ हजार एकरावर पसरलेलं बिग मडी रँच. रँच म्हणजे गुरचरण. तिथं शेती होत नाही. झाडं, झुडपं वाढतात, गवत वाढतं. गुरं तिथं चरतात. गाई आणि घोडे. घोड्यांना पळायला पुरेशी होतील इतकी  विस्तीर्ण जागा. रँचवर इतर काहीही होत नाही. श्रीमंत माणसं अशी रँचेस विकत घेतात. सुटीत किंवा विश्रांतीसाठी या रँचचा वापर होतो. क्लिंट ईस्टवुड या नटानं अशातच एक असंच रँच विकत घेतलंय. प्रेसिडेंट बुश यांचंही एक मोठ्ठं रँच होतं. देशातल्या आणि जगातल्या महत्वाच्या माणसांना बुश तिथं नेत असत.

अजूनही या रँचेसवर काउबॉईज वावरत असतात. फार गाड्या बिड्या इथं नसतात. विमानाचं तर सोडाच. अँटेलोपमधलं वातावरण शे दोनशे वर्षं मागे असल्यासारखं. रजनीशनी बिग मडी रँचवर शहर वसवलं. तिमजली इमारती बांधल्या. हज्जारो गाड्या आणि बसेस तिथं येऊ लागल्या. आकाशात विमानं घिरट्या घालू लागली.रजनीशच्या ९३ रोल्सरॉईस गाड्या इथं विमानांतून उतरवण्यात आल्या. प्रत्येक दिवशी नव्या रोल्समधून रजनीशची मिरवणुक निघे. वर्षभरासाठी म्हणून ३६५ रोल्स घ्यायचा त्यांचा कार्यक्रम होता.

अंटेलोप आणि ओरेगनमधल्या माणसांना ही संस्कृती परिचयाची नव्हती. जिथं ६० हजार एकरात जेमतेम शंभर माणसं रहात तिथं रजनीशांची हजारो माणसं गोळा होऊ लागली. जिथं केवळ घोडे आणि गाई फिरत तिथं माणसं आणि कार फिरू लागल्या.

अँटेलोप, वास्को काऊंटी आणि ओरेगन राज्यातल्या लोकांनी रजनीशना हाकलून दिलं.

।।

मी रहात होतो ते मेरिडियन गाव. ८३ हजारांची वस्ती. बैठी आणि एकमजली घरं. गावभर झाडं, कारंजी, रुंद रस्ते. जागोजागी मोठी उद्यानं. प्रत्येक वस्तीत एकादं मोठं उद्यान.आवाज नाही. व्हिलेज अशा एका ठिकाणी दुकानं, चैनीच्या गोष्टी एकत्र केलेल्या. रस्त्यावर कोणी फिरत नाही. आवाज नावाची गोष्टच नाही. माणसं सकाळी सात वाजता कामावर जातात. संध्याकाळी सहा वाजता परत येतात. घरी परतल्यावर जेवुन गुडुप. आवाज नाही.

आमच्या समोरच एक मोठ्ठं घर माझ्या डोळ्यासमोर महिन्याभरात बांधून पूर्ण झालं. एके दिवशी फिरत असताना पोलिसांनी रस्ता बंद करून वाहतूक वळवली होती. उत्सूकता होती. खाली उतरून वाहतूक फिरवण्याचं कारण शोधत फिरलो. बघतो तर काय तर एक दुमजली घरच्या घर पाच पन्नास चाकांच्या ट्रकवर ठेवलं होतं. बांधून तयार केलेलं घर कुठं तरी नेऊन ठेवणार होते.

मेरिडियनमधे थोर निवांतपणा. चार महिन्यांच्या मुक्कामात मी किती तरी  वाचलं आणि किती तरी सिनेमे घरात पाहिले.पाच सात वर्षातही तितकं जमत नाही. वाचा. लिहा. पाय मोकळे करण्यासाठी बाहेर या, फिरा, पळा. पुन्हा घरी जा. वाचा, लिहा, पहा. पुन्हा फिरा, पळा.

।।

मेरिडियन डोंगरांच्या कुशीत वसलं आहे. चारी बाजूनी डोंगर.

आयडाहो दाट जंगलांसाठी प्रसिद्द. आयडाहोतल्या जंगलाबद्दल सांगतात की तिथं माणूस हरवतो, त्याला परत येण्याचा रस्ता सापडत नाही. अशी कित्येक माणसं नाहिशी झाल्याचं लोक सांगतात.

।।

मेरिडयनमधलं बेंट कॉर्नर्स युज्ड बुक्स. जुन्या पुस्तकाचं दुकान.

शेजारी इतर अनेक दुकानं.

साधारणपणे दुपारी बाराची वेळ. दुकानाच्या दारात एक फोर्ड गाडी उभी रहाते. गाडी चालवणारी ज्युडिथ ही नव्वदीच्या जवळपास पोचलेली स्त्री हातात एक पुस्तकांची चळत घेऊन उतरते. डाव्या हातानं दुकानाचं दार उघडून आत शिरते.

मालक डेव हॅन्सन ज्युडिथचं स्वागत करतो. ज्युडिथ या दुकानात नेहमीच येत असल्यानं एक जिव्हाळ्याचं नातं दोघांच्या हावभावात दिसतं.

ज्युडिथनं आणलेली पुस्तकं डेव टेबलावर ठेवतो. मोजतो. नोंद करतो, खाली ठेवलेल्या टोपलीत टाकतो.

” दुसरी पुस्तकं विकत घेणारेस की या पुस्तकांचे पैसे हवेत?” डेव  विचारतो.

” चार पुस्तकं पुन्हा घेईन, दोनाचे पैसे दे.” ज्युडिथ.

डेव पैसे देतो, ज्युडिथ दुकानाच्या आत जाते, पुस्तकांच्या रॅकमागे दिसेनाशी होते.

डेवचं दुकान जुन्या पुस्तकांची देवाण घेवाण करतं.

दुकानात सुमारे २५ हजार पुस्तकं आहेत. काही पुस्तकं पुठ्ठा बांधणीची आहेत, काही साध्या बांधणीची, पेपरबॅक सारखी.

पुठ्ठा बांधणीची म्हणजे जाडजूड उंचीपुरी पुस्तकं. यातल्या काही पुस्तकांवर किमतीची चिठ्टी लावलेली आहे, काही पुस्तकांवर चिठ्ठी नाही. चिठ्ठी लावलेल्या पुस्तकांवर पुस्तकाची किमत लिहिली आहे. किमती पंधरा डॉलर, दहा डॉलर, सतरा डॉलर अशा आहेत. किमती न लिहिलेल्या पुठ्ठा बांधणी पुस्तकाची प्रत्येकी सरसकट किमत दीड डॉलर आहे. कुठलंही पुस्तक घ्या, फक्त दीड डॉलर, म्हणजे सुमारे शंभर रुपये.

दीड डॉलर किमतीची पुस्तकं नवी कोरीच आहेत. बॉब वुडवर्ड या वॉशिंग्टन पोष्टच्या पत्रकारानं लिहिलेली बुश, क्लिंटन, रेगन इत्यादी प्रेसिडेंटवरची गाजलेली प्रत्येकी चार सहाशे पानांची पुस्तकं दीड डॉलरला मिळतात. वॉटरगेट बॉबनीच बाहेर काढलं होतं. ऑल दी प्रेसिंडेंट्स मेन हे बॉबचं बरंच गाजलेलं पुस्तकही दीड डॉलरला.

बाकीची पुस्तकं त्याच्यावर छापलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीत. मुराकामीची अगदी ताजी कादंबरी अर्ध्या किमतीत मिळत होती. आठ डॉलरला. तेच पुस्तक अमेझॉनवर चार डॉलरला मिळत होतं. परंतू पाठवणावळ होती चार डॉलर. त्यामुळं दुकानातच जुनं पुस्तक घेणं परवडतं. शिवाय हवं असल्यास वाचून झाल्यावर ते परत करता येतं, त्याचे पैसे मिळतात.

दीड डॉलर किंवा अर्ध्या किमतीतली पुस्तकं पैसे टाकून विकत घ्यायची. वाचून झाल्यावर याच दुकानात आलं तर दीड डॉलरचं पुस्तक डेव विकत घेत नाही पण बाकीची पुस्तकं छापील किमतीच्या पंचवीस टक्के किमतीत विकत घेतो. वाचलेली पुस्तकं ठेवायची, नवी घ्यायची किंवा नवी नको असतील तर पंचवीस टक्केप्रमाणं पैसे घ्यायचे.

ज्युडिथ पुस्तकांच्या कपाटाकडं  पोचते न पोचते तोवर एक सहा फुटी म्हातारा माणूस काऊंटवर पोचला. त्यानं एक पुस्तक  परत करायला आणलं होतं. त्याला कुठल्याशा लेखकाचं पुस्तक हवं होतं. त्यानं आधी येऊन आणि फोनवरून डेवला त्या लेखकाचं आणि पुस्तकाचं नाव सांगितलं होतं. डेवनं ते पुस्तक बाजूला काढून ठेवलं होतं. या माणसानं ते पुस्तक घेतलं. नव्या पुस्तकाची अर्धी किमत आणि परत केलेल्याची पंचवीस टक्के यातली बेरीज वजाबाकी झाल्यावर डेवनं काही पैसे त्या माणसाला परत केले. तीन चार मिनिटं दोघं एका लेखकाबद्दल बोलले. हे बोलणं सुरु असतानाच आणखी दोन महिला आल्या. एक मध्यम वयीन आणि एक वयस्क. त्या महिला आल्या म्हणून सहा फुटी माणूस दूर झाला आणि निघून गेला.

मध्यमवयीन महिलेनं दोन पुस्तकं ठेवली आणि नवी पुस्तकं घ्यायला तीही रॅकमागे दिसेनाशी झाली. वयस्क महिलेनं दहा बारा पुस्तकं आणली होती. ती सगळीच्या सगळी पुस्तकं विकण्यासाठी होती. डेवनं हिशोब करून पैसे दिले.

“या आजी आणि यांच्यासारखी किती तरी माणसं कुठून कुठून पुस्तकं गोळा करतात आणि विकायला आणतात. हा एक व्यवसायच आहे. त्या पुस्तकं कुठून आणतात ते आम्ही विचारत नाही. कोणीही कुठलीही पुस्तकं आणावीत, पंचवीस टक्के किमतीत ती आम्ही विकत घेतो.” डेव म्हणाला.

डेव पाठ्यपुस्तकं ठेवत नाही. कारण इथल्या विद्याशाळांत पाठ्यपुस्तकं दर वर्षी बदलत असतात. त्यामुळं जुन्या पाठ्यपुस्तकाला किमत शून्य.

मेरिडयनमधे वाचणारी अनेक माणसं आहेत, ज्यांना नवी पुस्तकं परवडत नाहीत. ही माणसं लक्ष ठेवून त्यांना हवी ती पुस्तकं घेण्यासाठी डेवच्या दुकानात येतात.दिवसाला हजारेक पुस्तकं येतात.

या दुकानाच्या बॉइसी आणि नँपा या लगतच्या शहरात दोन शाखा आहेत. डेव आणि त्याची पत्नी मिळून हे दुकान चालवतात. डेव कंप्यूटर इंजिनियर आहे. त्याला पुस्तकांची आणि वाचनाची आवड आहे. राजकारण, सभोवतालच्या कटकटी, टेररिझम इत्यादी गोष्टींनी त्याचं डोकं पिकतं. म्हणून तो सायन्स फिक्शन वाचतो. नोकरीचा कंटाळा आला म्हणून हे दुकान त्यानं २००५ साली उघडलं.  नंतर नँपामधे २००७ साली आणि बॉइसी या राजधानीच्या शहरात २०१२ साली दुकान उघडलं. कुठं कुठं माणसं घरं विकतांना पुस्तकं काढून टाकतात तेव्हां ती पुस्तकं घ्यायला डेव स्वतः जातो. माणसं गॅरेज सेल करतात. म्हणजे घरातल्या अनेक वस्तू काढून टाकतात. त्यातली पुस्तकं घ्यायला डेव जातो.

डेवचा उद्योग चांगला चाललाय.

।।

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *