एकविसाव्या शतकातला (एक) हिटलर

एकविसाव्या शतकातला (एक) हिटलर

ही गेल्या दोनेक महिन्यातली एक घटना.

मनिला शहरातला एक विभाग. चिंचोळ्या गल्ल्या. गल्लीच्या दोन्ही कडांना पत्र्याची घरं आणि घरांना कार्डबोर्डचे दरवाजे. तळ मजला आणि त्यावर एक लडखडत  उभा असलेला दुसरा मजला.

मध्य रात्र उलटून गेल्यानंतर एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी एक मोटारसाकल एका घरासमोर उभी रहाते. बाईकस्वार उतरून पहिल्या मजल्यावर जातो. गोळ्या झाडल्याचे आवाज होतात. एक लहान मुलगा मारला जातो. नंतर त्याचा बाप मारला जातो. नंतर त्या मुलाची आई मारली जाते.

बाईकस्वार जिना उतरून बाईकवरून निघून जातो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या जाण्यायेण्याच्या वेळा नोंदल्या जातात. दोनच मिनिटात तीन माणसं मारून माणूस परागंदा होतो.

मारलेली माणसं शवपेट्यांत ठेवली जातात. माणसाच्या चेहऱ्यावर प्लास्टिक पांघरलं जातं. शरीरावर धान्याचे दाणे टाकले जातात. कोंबड्यांची पिल्लं ते धान्य टिपतांना शरीरावरही चोची मारत असतात. ही फिलिपिनो सांस्कृतीक परंपरा आहे. मारेकऱ्याच्या विवेकाला कोंबडी टोच्या मारते असं लोक म्हणतात.

मारेकरी कधी पोलिसांच्या वेशात असतात कधी साध्या वेशात असतात. कधी त्यांच्या तोंडावर बुरखा असतो, कधी नसतो. मारेकरी कधी गोळ्या घालतात तर कधी माणसांच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी गुंडाळून ठार मारतात. कधी मेलेल्या माणसांचे तुकडे करून दूरवरच्या कचऱ्याच्या ढिगात टाकले जातात तर कधी प्रेतं निव्वळ नाहिशी केली जातात.

२०१६ च्या सप्टेंबर महिन्यात फिलिपीन्सच्या संसदेनं चौकशी आरंभली. एका माणसानं समितीसमोर कबूली दिली. एका पाचशे माणसांच्या दलाचा तो सदस्य होता. अध्यक्ष ड्युटेर्ट यांच्या सांगण्यावरून त्या दलानं काही खून केले होते. पोलिस या खुनी दलाकडं यादी देतात, पत्ते देतात. कागदोपत्री काहीही नोंद नसते. आरोप नसतात, पुरावे नसतात. यादी असते आणि मारायचं असतं. येवढंच. मारणाऱ्या माणसाला शंभर ते एक हजार डॉलरचा मेहेनताना दिला जातो. बहुतेक वेळा लिलावात बोली केल्यासारखा व्यवहार केला जातो. उपकंत्राटदार असतात. किती माणसं मारायचीत आणि कुठलीकुठली ते सांगितल्यावर ते बोली लावतात.

समितीसमोरच्या या साक्षीनंतर एका आंतरराष्ट्रीय वाहिनीनं मारेकऱ्याची मुलाखत टेलेकास्ट केली. तो आणि त्याची बायको मिळून खून करत असत. सुपारी घेतली नाही तर तुम्हालाच मारून टाकू असं पोलिसांनी सांगितल्यामुळं आपला नाईलाज झाला असं मारेकरी सांगत होता. मारेकरी एक रिक्षाचालक होता. उत्पन्न पुरत नाही म्हणून तो ड्रग विकण्याला मदत करत असे. पोलिसांनी त्याला पकडलं. तसा गुन्हा किरकोळ असल्यानं पोलिसांनी त्याला सोडलं पण अट घातली की त्याला खून करावे लागतील, न केल्यास त्याचाच खून होईल.

अनेक माणसं पोलिस कोठडीत मरतात. कोठडीत असलेल्या माणसावर आरोप होतो की त्यानं पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्याला मारावं लागलं. कोठडीत त्याच्याकडं हत्यार कुठून आलं? सीसीटीव्हीवर नोंदलं गेलेलं असतं की एका माणसाकडं कोठडीत जाताना पिस्तूल असतं आणि बाहेर पडताना पिस्तूल गायब असतं आणि तेच पिस्तूल नंतर कोठडीतल्या घटनेसाठी पुरावा म्हणून वापरलं जातं.

दरमहा चारशे तरी माणसं या रीतीनं मारली जातात. न्यायव्यवस्थेला टांग मारून केलेले खून.

या खुनांमधे फिलीपिन्सचे अध्यक्ष ड्युटेर्ट यांचा हात आहे असा आरोप फिलिपिन्समधली माध्यमं करतात. ह्यूमन राईट्स संघटनेनंही पुराव्यानिशी आरोप केलेत आणि संसदीय कमीटीनंही तसे पुरावे मांडले आहेत.

ड्युटेर्ट एका भाषणात म्हणाले ‘ हिटलरनं तीस लाख माणसं मारली. जर्मनीत हिटलर होता, फिलिपिन्समधे मी आहे. माझ्या देशात तीस लाख गुन्हेगार आहेत. ड्रग गुन्हेगार. मी त्यांची कत्तल करून देशाला गुन्हामुक्त करणार आहे, फिलिपिन्सला अवनतीपासून रोखणार आहे.’

एका शहराच्या मेयरला पोलिसांनी गोळ्या घालून मारलं. ड्युटेर्ट म्हणाले ‘ पोलिस म्हणतात की त्यानं अटक करायला विरोध केला म्हणून त्याला मारावं लागलं. यात काही तरी गडबड आहे हे मला मान्य आहे. पण पुरावे हाती नसतील तर मी तरी काय करू? पोलिसांकडं एक यादी असते. त्यात ड्रगवाल्यांची नावं असतात. मी ती यादी माणसासमोर ठेवतो. म्हणतो की या यादीत तुमचं नाव शोधा. नाव असेल तर मी तुम्हाला मारून टाकणार. लोक मला खाटिक म्हणतात. माझा इलाज नाही.’

अध्यक्ष झाल्या झाल्या एका भाषणात ड्युटेर्ट यांनी आपल्याला असलेल्या रोगांची माहिती उघड केली. अस्थमा, श्वसनसंस्थेचे रोग, फुफ्पुसाचे रोग, अर्धशिशी. अर्धशिशीचा त्रास त्यांना इतका होतो की त्याना वेदनानाशकं घ्यावी लागतात. ड्युटेर्ट म्हणाले की आपण नाईलाजानं ड्रग्जही घेतो, कारण त्यामुळं आराम पडतो. त्या ड्रगची नावंही त्यांनी जाहीर केली. ते घेतात ते ड्रग तसं खतरनाकच असतं.  त्यांना समाजाचं कल्याण करायचं असल्यानं वेदनामुक्ती आवश्यक असल्यानं त्यांचा नाईलाज असतो.

मारले जाणारे नाना प्रकारचे लोक आहेत. काही लोक निष्पाप आहेत. सरकारमधली माणसं आपल्या माणसांचा काटा काढण्यासाठी त्यांच्यावर ड्रगव्यवहाराचा शिक्का मारून मोकळे होतात. बरीच माणसं गरीब घरातली आहेत आणि माफक प्रमाणावर ड्रग घेतात. काही ड्रग कमी कडक असतात. दिवसभर कारखान्यात, ड्रेनेजमधे काम केल्यावर, रिक्षा चालवल्यानंतर, कष्टाची कामं केल्यानंतर माणसं रात्री ड्रग घेतात. श्रमाचा त्रास कमी करण्यासाठी. त्यांचं वागणं नॉर्मल असतं, त्यांच्या घरच्यांना आक्षेप नसतो कारण ही माणसं हिंसक वगैरे नसतात. काही माणसं मात्र ड्रगचा व्यापार करणारी आणि व्यसनी असतात. फिलिपिन्समधे ड्रगसेवन बरंच होतं हे खरं आहे. गरीब वर्गातली माणसं त्यात अधिक आहेत. श्रीमंत माणसं हुशारीनं ड्रग सेवन करतात आणि सरकारच्या कचाट्यातून सुटतात. गरीब माणसं सापडतात. ड्रगपासून समाजाची सुटका करण्याची खटपट अनेक संस्था करत असतात. गरीबी दूर करणं आणि लोकांना योग्य सल्ला देणं, मदत करणं हे त्यावरचे खरे आणि टिकाऊ उपाय आहेत.

आपण खाटीक आहोत, आपण हिटलर आहोत, आपण न्यायव्यवस्था बाह्य कत्तल करणार, आपण ड्रग्ज घेतो या साऱ्या गोष्टी ते भाषणात सांगतात. पण नंतर त्यांचे सरकारी अधिकारी या वक्तव्यांचा इन्कार करतात. ड्युटेर्ट तसं म्हणालेच नाहीत. किंवा म्हणतात की ड्युटेर्ट यांच्या विधानाचा विपर्यास झाला आहे.

ड्युटेर्ट यांच्या खूनबाजीवर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टीकेचा राग ड्युटेर्ट यांनी एके दिवशी बराक ओबामा यांच्यावर काढला. एका जाहीर सभेत, टीव्ही कॅमेऱ्यासमोर ड्युटेर्ट म्हणाले ‘ ओबामा हा वेश्येचा मुलगा आहे. मी त्याचं कशाला ऐकावं.’

ओबानांनी प्रतिक्रिया दिली नाही. ड्युटेर्ट म्हणाले की मी तसं म्हणालोच नाही. वेश्येचा मुलगा असं आम्ही बोली भाषेत म्हणतो पण त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, एक वाईट माणूस येवढाच अर्थ घ्यायचा असतो.

हुकूमशहांचं एक वैशिष्ट्यं असतं. ते नेहमी भाषेचा गैरवापर करत असतात. त्यांची भाषा वेगळीच असते.

 

।।

5 thoughts on “एकविसाव्या शतकातला (एक) हिटलर

  1. निळुभाऊ,

    ब्लोक वाचला.तुमच्या ब्लोकामुळे आमची आंतरराष्ट्रीय ज्ञान वाढते आहे.धन्यवाद.त्या त्या देशांच्या तुलनेत आपण बरेच सुसंस्कृत आहोत म्हणायचे का?

    अ.पां.देशपांडे

  2. हुकूमशहांचं एक वैशिष्ट्यं असतं. ते नेहमी भाषेचा गैरवापर करत असतात. त्यांची भाषा वेगळीच असते. Best.

  3. तुमचा एमैल id कळवा मला दोन लेख तुम्हाला पाठवायचे आहेत.
    चंद्रकांत बर्वे

  4. भयानकच आहे सर्व प्रकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *