राजीव गांधींचा खून, कां व कसा.

राजीव गांधींचा खून, कां व कसा.

राजीव गांधींचा खून कां झाला?

राजीव गांधी-कारण-राजकारण. ले. नीना गोपाल. मनोविकास प्रकाशन.

)(

१८१५ साली ब्रिटिशांनी डचांकडून श्रीलंका घेतली. कारभार चालवण्यासाठी तेव्हां भारतातल्या तामिळनाडूतले तमिळ त्यांना उपयोगी ठरले कारण तमिळ लोकं इंग्रजी शिकलेले होते, कारभार-साहित्य इत्यादी बाबतीत तरबेज होते. १९४८ साली लंका स्वतंत्र झाली तेव्हां लंकेतल्या सरकारी नोकऱ्यांतल्या ६० टक्के नोकऱ्यात तमिळ होते, विद्यापीठांत त्यांचंचं वर्चस्व होतं. लोकसंख्येत १५ टक्के असले तरी तमिळाना वाटे की लंका हा त्यांचाच देश आहे. 

लंका हा बहुसंख्य सिंहलींचा, बौद्ध धर्मियांचा देश. १९५६ साली लंकेनं सिंहली  अधिकृत भाषा केली, त्या आधी तमिळ ही भाषा वापरात होती, व्यवहाराच्या हिशोबात राजभाषा असल्यासारखीच होती. पाठोपाठ बौद्ध हा देशाचा अधिकृत धर्म केला. त्यानंतर हलके हलके सरकारी नोकऱ्यांत स्थानिक सिंहलींना प्राधान्य दिलं गेलं. तमिळ खवळत गेले. त्यांना आपलं वर्चस्व जातंय याचं वाईट वाटलं.  १९५८ साली सिंहली वि. तमिळ अशा दंगली झाल्या. तमिळ अनेक गटांमधे, राजकीय संघटनांमधे संघटित झाले.  इल्लंकाई तमिळ अरसू कच्चाई या नावाची  एक संयुक्त तामिळ संघटना स्थापन झाली आणि ती नोकऱ्या, अधिकारांची मागणी करू लागली, आंदोलनं करू लागली. आंदोलनं सामान्यतः लोकशाही पद्धतीची असत, मोर्चे, मिरवणुका, निवेदनं इत्यादि. लंकेचं सरकार आंदोलनं दडपू लागलं. लंका अशांत झाली.

 जनता विमुक्ती पेरामुना ही मार्क्सिस्ट संघटना तमिळांमधे बलवान होती. पेरामुनानं १९७१ साली (एप्रिल ते जून असं सुमारे ३ महिने)  सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला, काही शहरं ताब्यात घेतली, बंड केलं. सिरिमाव बंदरनायके पंतप्रधान होत्या. त्यांनी लष्कराचा वापर करून बंड मोडलं. पेरामुनामधे ४० विद्यार्थी संघटना होत्या. त्या पैकी एका संघटनेमधे वेल्लुपिलाई प्रभाकरन हा नेता होता. 

सत्ता काबीज करण्याचा पेरामुनाचा प्रयत्न फेल गेल्यावर प्रभाकरननं टायगर ही संघटना ५ मे १९७६ साली स्थापन केली. प्रभाकरन तेव्हां १८ वर्षाचा होता. प्रभाकरन तापट, एककल्ली आणि क्रूर होता. त्याचा कोणावरही विश्वास नसे. संघटनेतला प्रत्येक माणूस आपला प्रतिस्पर्धी आहे असं समजून तो वागत असे. फार धाडसी होता. लोकशाही मार्गानं काहीही होणार नाही, लंकेतले सिंहली तमिळांचे शत्रू आहेत, लंका हा तमिळांचाच देश आहे, म्हणून लंकेचं राज्य तमिळांचंच असलं पाहिजे असा पक्का विचार प्रभाकरन बाळगून होता. लंकेत सत्ता स्थापन झाल्यावर तामिळनाडू, मलेशियातला तामिळांचा विभाग, सिंगापुरातला तामिळ विभाग एकत्र करून एक महाईलम स्थापन करायचं त्याचं उद्दीष्ट येवढं भारी होतं की जगभरातले तमिळ त्याचे अनुयायी झाले, भारतातही द्रमुक-अद्रमुक इत्यादी पक्षांचे अनुयायी आणि पुढारी त्याचे भक्त झाले. त्याची स्पष्ट, टोकदार भूमिका आणि धाडसी व्यक्तिमत्व यामुळं त्याची संघटना वेगानं फोफावली. माणसं गोळा करण्याची पद्धत आणि विरोध करणाऱ्याचा काटा काढणं यामुळं तयार झालेल्या दहशतीमुळं संघटना पक्की होत गेली. टायगर्स ही संघटना म्हणजे सिंहाची गुहा होती, प्राणी आत जात, बाहेर परतत नसत. एक तरफी प्रवास.

टायगर स्थापन झाली तेव्हां जयवर्दने प्रेसिडेंट होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात ते अमेरिका-इस्रायलच्या बाजूला झुकले होते, भारताच्या विरोधात होते, भारतात इंदिरा गांधींचं राज्य होतं. प्रभाकरननं मांडलेल्या उच्छादावर उपाय म्हणून जयवर्दने इस्रायल आणि अमेरिकेची लष्करी मदत घेत होते. तमिळनाडूतले द्रविड पक्ष प्रभाकरनला मदत करत होते, कधी कधी स्वतंत्र तमिळ देशाची मागणी करत होते. या परिस्थितीत जयवर्दने यांच्यावर वचक बसवण्यासाठी आणि तमिळनाडूतल्या तमिळ जनतेला आपलंसं करण्यासाठी इंदिरा गांधीनी प्रभाकर यांना हाताशी धरलं. त्यांना शस्त्रं दिली, तामिळनाडू-कर्नाटकाच्या हद्दीवर छावण्या उघडून टायगरना लष्करी प्रशिक्षण दिलं. 

प्रभाकरननं धमाल उडवली. लंकेचं लष्कर आणि प्रभाकरनचं लष्कर यांच्यात तुंबळ लढाया झाल्या. दोन्हीकडची हज्जारो माणसं मरत होती. मधल्या काळात इंदिरा गांधींचाच खून झाला, पण प्रभाकरनवर त्याचा परिणाम झाला नाही. १९८३ साली सिंहली-तामिळ, लष्कर आणि टायगर यांच्या तुफ्फान लढाया झाल्या, दंगली झाल्या, हज्जारो माणसं मारली गेली. लंकेतली हिंसा हा आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला. आता राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. त्यांनी जयवर्दने यांच्याबरोबर करार करून लंकेत हस्तक्षेप केला. टायगरनी शस्त्रं खाली ठेवावीत, बदल्यात तमिळांची बहुसंख्या असलेल्या विभागाना स्वायत्तता द्यावी असं ठरलं. जयवर्दने यांनी पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा प्रयत्न केला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतानं शांती सेना लंकेत पाठवली. तमिळाना प्रादेशिक स्वायत्तता द्यायला सिंहली राजी नव्हते आणि युद्ध थांबवायला टायगर राजी नव्हते. त्यामुळं भारतीय सेनेला दोघांचाही विरोध होता. शांती सेना लढाईच्या तयारीनं गेली नव्हती, शांती सेनेला लंकेचा भूगोल आणि सामरीक खाचाखोचा माहित नव्हत्या. शेवटी टायगर आणि शांती सेना यांच्यातच लढाई झाली.

प्रभाकरनं राजीव गांधींवर दात धरला. राजीवनी आपल्याला दगा दिला, आपलं ईलमचं स्वप्न खलास करून आपल्याला प्रांतीक स्वायत्ततेच्या चिखलात ढकललं असं प्रभाकरनचं मत झालं. त्यानं कट रचला आणि २१ मे १९९१ रोजी श्रीपेरुंबुदूरमधे खून केला.

नीना गोपाल या पत्रकार-लेखिकेचं पुस्तक राजीव गांधींचा खून झाला तिथं सुरु होतं. गोपाल या मुळच्या तमिळ. त्यांनी अनेक वर्षं तामिळनाडू आणि लंकेच्या राजकारणावर बातम्या व वृत्तांत लिहिले होते. राजीव गांधींच्या मुलाखतीही त्यानी घेतल्या होत्या, राजीवशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क होता. राजीव गांधींचा खून झाला तेव्हां गोपाल राजीव गांधींच्या सोबतच होत्या. गर्दीच्या रेट्यामुळं राजीव पुढे गेले, गोपाल मागे राहिल्या, राजीव मारले गेले, गोपाल वाचल्या.

त्या घटनेचा थरार गोपाल यांनी पुस्तकाच्या सुरवातीला मांडला आहे.

प्रभाकरननं १९८३ साली भारतात आश्रय घेतला आणि तामिळनाडूतल्या भारत सरकारनं उभारलेल्या छावणीत लष्करी प्रशिक्षण घेतलं. १९८५ मधे प्रभाकरन राजीव गांधींना त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी भेटले. गोपाल यांनी पुस्तकं आणि इंटेलिजन्सच्या लोकांच्या मुलाखतीतून या भेटीचा वृत्तांत लिहिला आहे. गोपाल लिहितात-  राजीव गांधींचं  खास बुलेट प्रुफ जाकीट त्यांनी त्याला भेट दिलं. ते त्याच्या खांद्यावर त्यांचे तरुण पुत्रं राहुल गांधी ठेवलं. तेव्हां राजीव म्हणाले ‘ स्वतःची काळजी घ्या प्रभाकरन.” 

 १९८५ नंतर आधी प्रभाकरन आणि नंतर प्रभाकरन यांचे सहकारी अनेक वेळा राजीव गांधीना भेटले. ” राजीव गांधीना ठामपणे वाटत होतं की, श्रीलंकेच्या फुटीरतावाद्यांच्या दाव्याला आपण पाठिंबा दिला आणि पैसाही पुरवला तर जम्मू आणि काश्मिरबद्दल काही बोलण्यासाठी भारताला तोंडच राहाणार नाही. ” 

इंदिरा गांधीनी फुटीरतावाद्याना मदत करण्याचं आखलेलं धोरण राजीव रद्द करू पहात होते. शांती सेना पाठवून टायगरना वाटाघाटींकडं वळवावं, त्यासाठी लंकेच्या सरकारचं मन वळवावं आणि समांतर पातळीवर प्रभाकरनलाही स्वतंत्र देशाची मागणी सोडून अंतर्गत स्वायत्तता स्विकार, लोकशाही पद्धतीनं वाग असं सांगावं असं राजीव गांधीना वाटत होतं. राजीव गांधींचे परराष्ट्र सचीव वेंकटेश्वरन यांना हे धोरण मान्य नव्हतं. ” लंकेत भारतीय शांती सेना पाठण्याचा निर्णय ही एक मोठी चूक आहे असं वेंकटेश्वरन जाहीरपणे बोलले. राजीव गांधीनी त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं.” 

१९९० च्या एप्रिल महिन्यात टायगर्सच्या संदेश यंत्रणेमधून एक संदेश लंकेतून भारतात आला. लंकन तामिळ भाषेत हा संदेश होता. ” राजीव गांधी अवरुंदे मंदालई अद्दीपोदलम, डंप पन्नीदुंगो (राजीव गांधींचा शिरच्छेद करा, त्याला नष्ट करा) ..’ मारानाई वेचिदुंगो ‘ (ठार करा त्याला).

हा संदेश इंटेलिजन्स, रॉ इत्यादी संघटनांमधे फिरला पण त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. कोणी माणसं तामिळनाडूत परदेशातून स्फोटकं गोळा करत आहेत अशी खबर जर्मन इंटिलिजन्सनं दिली. तिकडंही दुर्लक्ष करण्यात आलं. प्रभाकरननं दोनदा खुनाची रंगीत तालीम मद्रासमधे केली होती. तिकडंही दुर्लक्ष झालं. राजीव गांधी हे माजी पंतप्रधान आहेत, त्यांच्या जिवाला धोका आहे हे माहित असतानाही पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी राजीव गांधींची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, केवळ एकच अंगरक्षक त्यांच्याजवळ ठेवला. राजीव गांधींच्या सभेत केंद्र आणि राज्य सरकारांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था ठेवली नाही. काँग्रेस पक्षानंही ना सुरक्षेचा आग्रह धरला ना स्वतंत्रपणे सुरक्षेची व्यवस्था केली. राजीव गांधींनी व्यक्तिशः स्वतःच्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केलं.त्यामुळं व्हायचं तेच झालं.

लेखिकेनं अनेक पुस्तकांचा हवाला देऊन सुरक्षा यंत्रणा, लष्कर, परदेश खातं, इंटेलिजन्स, रीसर्च अँड अॅनालेसिस विंग (रॉ) यांच्यात कसा समन्वय नसे, कशी भांडणं असत, कसं निष्काळजीपण असे याचं वर्णन केलं आहे. लष्कराचा सल्ला पंतप्रधान धुडकावतात, लंकेतल्या राजदुताचा सल्ला लष्कर अधिकारी धुडकावतात असा एकूण कारभार. 

लेखिका लिहितात ” भारताच्यातामिळीखेळीतमूलभूतदोषहोते. तिचीआधीचवाटलागलेलीहोतीश्रीलंकाभारतशांतीकरारावरच्यासहीचीशाईवाळण्यापूर्वीच (नव्या खेळीची) दुर्दशा झाली होती.”

पुस्तकातले धडे असे. हत्या, मारेकऱ्यांचा शोध, जाफना कट, तामिळी कार्ड-मुत्सद्दीपणा की चूक, ‘ रॉ ‘चे सत्य, पांढऱ्या व्हॅन्स पांढरे झेंडे, खटले आणि कारस्थानं, हरपलेला वारसा, उपसंहार. धड्यांच्या शीर्षकावरून मजकुर कसा सरकत गेला आहे याची कल्पना येते. 

पुस्तकाचा बाज माहिती देण्याचा आहे, विश्लेषण करून ठपका वगैरे ठेवण्याचा नाही. काही ठिकाणी लेखिकेनं निष्कर्ष काढले आहेत. ते निष्कर्ष इतर जाणकारांच्या मतांच्या आधारे आहेत. लेखिकेला राजीव गांधींबद्दल आदर आणि आपलेपणा आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, काँग्रेस पार्टी, भारतीय सरकार इत्यादीना झोडणं किंवा त्यांचं कौतुक करणं असा उद्देश ठेवून पुस्तक लिहिलेलं नाही. पत्रकारामधे आवश्यक तटस्थपणा या पुस्तकात आहे.

भारताचं श्रीलंकाविषयक धोरण समजायला या पुस्तकाची मदत होते. लंकेच्या सरकारनं टायगर्स आणि प्रभाकरनचा निःपात करून फुटीरतावादी आव्हान संपुष्टात आणल्यानंतर २०१५ साली लेखिकेनं लंकेचा आणि तामिळनाडूचा दौरा करून नव्या परिस्थितीचा अभ्यास केला. लंकेत शांतता आहे पण ती शांतता अस्वस्थ आहे. पराभूत तामिळ माणसांचा सल आणि स्वायत्ततेचा किडा शिल्लक आहे याकडं लेखिका लक्ष वेधते. 

२०१५ साली हे पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध झालं. सविता दामले यांनी केलेलं हे चांगलं वाचनीय भाषांतर (क्वचित ठिकाणी गोंधळात टाकणारी वाक्य  वगळता) २०१९ मधे मनोविकासनं प्रसिद्ध केलं.

पॅलेस्टाईन-इस्रायल, काश्मिर-भारत-पाकिस्तान, या प्रमाणंच लंकेतले तामिळ हे एक दीर्घकाळ चालणारं, कदाचित कायमच खदखदत रहाणारं किचाट आहे असं पुस्तक वाचताना वाटतं.

।।

हत्ती, महाकाय माणूस.

 Giants of the Monsoon Forest: Living and Working with Elephants

by Jacob Shell

Norton, 255 pp., $26.95

स्थळ म्यानमार. नदीला प्रचंड पूर आलेला. सोकोना हत्तीण आपल्या पिल्लाला सुळ्यांमधे ठेवून नदी ओलांडत होती. पाठीवर माहूत होता. पाण्याला येवढी ओढ होती की सोकोना डळमळत होती. तोल जाऊन माहूत पाण्यात कोसळला. सोकोनानं त्यालाही उचललं, आपल्या पिल्लाबरोबर त्यालाही सुळांवर तोलून धरलं आणि नदी पार करून नेलं.

माहुताला लोकांनी विचारलं – हत्तीण असं कां वागली.

माहूत म्हणाला – हत्तीमधे माणसासारखीच अनुकंपा असते.

शेल यांनी पुस्तकात हत्तीचं व्यक्तिमत्व सिद्ध करणारे अनेक अभ्यास आणि प्रसंग टिपले आहेत. माणूस आणि हत्तीमधलं नातं समानतेचं असतं, इतर प्राणी पाळीव असतात, हत्ती पाळीव नसतो, तो माणसाच्या कुटुंबाचा भाग असतो असं लेखक म्हणतो. मुळात हत्ती हा जंगलातला प्राणी नाही. त्याचे दात गवत खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तरीही परिस्थितीवशात त्याला जंगलात जावं लागलं, पानं खाऊन जगणं तो शिकला, माणसाच्या संगतीनं आणि माणसानं शिकवल्यामुळं.

हत्ती हा प्राणी नाही. जवळजवळ माणूसच आहे. (आकाराचं सोडून द्या.) तो माणसायेवढाच बुद्धीमान आहे, त्याला भाषा समजतात (बोलता मात्र येत नाहीत), त्याचं आयुष्यही माणसायेवढंच असतं. त्याच्या भावनाही माणसासारख्याच असतात. 

जेकब हे भूगोल शास्त्रज्ञ आहेत, जगभरच्या जंगलांत आणि शहरात राहून त्यांनी हत्तींचा अभ्यास केला आहे. ते अमेरिकेतल्या टेंपल विश्वशाळेत भूगोल विषयाचे प्राध्यापक आहेत. 

।।

एक विनंती. हा ब्लॉग तयार होणं आणि लोकांपर्यंत पोचणं यात तांत्रीक गोष्टी गुंतल्या आहेत, त्याचा काही एक खर्च आहे. तो निघावा यासाठी वाचकांनी  ३०० रुपये किंवा अधिक रक्कम सोबतच्या लिंकवर पाठवावी. http://niludamle.com/pay.php.  वर्गणी पूर्णपणे ऐच्छिक आहे. 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *