लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट या नावाची   व्हॅन गॉग या चित्रकारावरची एक फिल्म २०१७ च्या मामी उत्सवातलं एक मोठं आकर्षण ठरली.  व्हॅन गॉगनं त्याच्या  भावाला, थियोला, लिहिलेलं पत्रं घेऊन एक माणूस व्हॅन गॉगच्या गावात पोचतो. पत्रं पोचवत असतानाच तो व्हॅन गॉगच्या मृत्यू म्हणजे आत्महत्या होती की खून होता याचा शोध घेतो. या शोधावर ही ९० मिनिटांची फिल्म  Dorota Kobiela  या दिद्गर्शिकेनं तयार केलीय.

फिल्म रोटोस्कोपिंग एनिमेशन हे तंत्र वापरून केलीय.

रोटोस्कोपिंग या तंत्रात आधी फिल्म नेहमीच्या पद्धतीनं चित्रीत केली जाते. स्टुडियोत सेट लावून चित्रीकरण केलं जातं. नेहमीच्या फिल्ममधे सेटवर खूप बारीकसारीक तपशील चितारलेले असतात. रोटोस्कोपिंगसाठी वापरलेला सेट प्रतीकात्मक, सूचक अशा प्रकारचा असतो. पात्रांच्या हालचाली आणि कमीत कमी तपशीलाचं नेपथ्य येवढ्याच गोष्टी आवश्यक असतात.

फिल्म चित्रीत झाल्यानंतर प्रत्येक फ्रेमवर संस्कार केले जातात. पात्रांच्या हालचाली एका सेकंदाला किती फ्रेम वापरल्या जातात त्यानुसार ठरतात, व्यवहारात जशा दिसतात तशा हालचाली एनिमेशन फिल्ममधे दिसत नाही. फ्रेमवर केलेल्या संस्काराचे अनेक प्रकार असतात. संस्कार करणाऱ्या चित्रकाराच्या शैलीनुसार चित्र बदलतं. व्यंगचित्रकाराच्या रेखाटनाच्या, रेघांच्या शैलीनुसार जशी व्यंगचित्रातली पात्रं दिसतात तसंच एनिमेशन फिल्ममधल्या फ्रेममधली पात्रांच्या बाबतीत घडतं. लक्ष्मण, मारियो मिरांडा, उन्नी, शंकर, सरवटे या प्रत्येक चित्रकाराची पात्रं, माणसं, स्वतःची स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन कागदावर उतरतात. तसंच एनिमेशन फिल्मबाबत घडत असतं. संस्कार करणाऱ्याची दृष्टी आणि शैली महत्वाची.

लविंग विन्सेंटमधे प्रत्येक फ्रेम म्हणजे व्हॅन गॉगचं एकेक पेंटिंग असतं. एक दृश्य असतं व्हॅन गॉग शेतात बसून पेंटिंग करत असतो आणि चार टारगट मुलं त्याच्यावर दगडफेक करतात. व्हॅन गॉगचं पेंटिंग करतोय असं दृश्य सेटवर चित्रीत करण्यात आलं. चार मुलांकडून दगड मारत असल्याची एक्शन सेटवर स्वतंत्रपणे चित्रीत चित्रीत करण्यात आली. नंतर या दोन्ही दृश्यांमधली प्रत्येक फ्रेम  व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर चिकटवण्यात आली. फिल्म दिसते त्यावेळी वरील घटना व्हॅन गॉगच्या पेंटिंगच्या पार्श्वभूमीवर दिसते.

पूर्ण चित्रपट अशा रीतीनं तयार करण्यात आलाय.

चित्रपटाचं चित्रीकरण १४ दिवसांत सेटवर आटोपण्यात आलं. नंतर हे चित्रण पोलंडमधील डॅन्स्क या शहरामधे काम करणाऱ्या १२५  चित्रकारांकडं सोपवलं गेलं.त्यांनी ८५० कॅनव्हासेसवर व्हॅन गॉगच्या पेंटिंगच्या कॉपीज तयार केल्या आणि एकूण  ६५ हजार फ्रेममधे पार्श्वभूमी म्हणून चिकटवल्या. कधी व्हॅन गॉगचं पेंटिंग जसंच्या तसं वापरलं तर कधी त्यात थोडेसे बदल केले.

बाप रे. किती ती पेंटिंग्ज. इतकी सारी पेंटिंग्ज करायला ३ हजार लीटर रंग वापरावा लागला. एक अडचण होती. व्हॅन गॉगनं टर्पेंटाईन वापरून चित्रं केली होती. टर्पेंटाईन वापरलेला  रंग पटकन वाळत नाही. तैलचित्रात रंगाचा एक हात वाळल्यानंतर दुसरा द्यायचा असतो. त्यामुळं चित्रं तयार व्हायला खूप वेळ लागत असे. इतका वेळ चित्रपट निर्मात्यासमोर नव्हता. त्यांनी टर्पेंटाईन तेलाऐजी लवंगीचं तेल वापरलं. स्टुडियोत लवंगी तेलाचा घमघमाट असे. दात दुखू लागले की या तेलाचा बोळा दाताखाली धरा असं डॉक्टर सांगतात, त्यामुळं वेदना कमी होतात. चित्रपट करणारे लोकं बराच काळ वेदनारहित जगले असावेत.

सबंध चित्रपट प्रेक्षक व्हॅन गॉगची पेंटिंग पहात असतो. हा प्रयोग प्रेक्षकांना आवडला. युरोपात निवडक ठिकाणी ही फिल्म दाखवण्यात आली तेव्हां प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी फिल्मची खूपच वाखाणणी केली.

१९९० मधे अकिरा कुरोसावा या जपानी दिद्गर्शकानं  व्हॅन गॉगची पेंटिंग्ज या विषयावर  ड्रीम्स या नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती.  एक चित्रकार व्हॅन गॉगच्या चित्रांचं प्रदर्शन पाहून त्याला  भेटायला जातो हे कुरोसावाच्या शॉर्ट फिल्मचं कथानक आहे. चित्रकार फिरतांना थेट व्हॅन गॉगच्या चित्रातच शिरतो.त्याचा  सगळा प्रवास व्हॅन गॉगच्या चित्रांतून होतो. चित्रात शेत असतं, कुरोसावाचा माणूस त्या चित्रातल्या पायवाटेनं जातो. व्हॅन गॉगची बरीच मूळ चित्रं या चित्रपटात वापरली आहेत. व्हॅन गॉगची चित्रं ड्रीम्समधे जशी दिसतात तशी लविंग विन्सेंटमधे दिसत नाहीत.

२०१६ मधे टॉवर नावाची एक फीचर फिल्म कम डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. १९६६ मधे अमेरिकेत एक माणूस युनिवर्सिटीच्या टॉवरमधे मोक्याच्या जागी जाऊन खाली वावरणाऱ्या लोकांवर गोळीबार करतो. खूप माणसं मरतात. एक धाडसी माणूस शेवटी त्या खुन्याला मारतो. ही गाजलेली सत्य घटना टॉवरमधे चितारलेली आहे. त्यामधे रोटोस्कोपिंगचं तंत्रं अंशतः वापरलेलं आहे. काही प्रसंगात रोटोस्कोपिंग एनिमेशननं कार्टूनच्या धर्तीवरची चित्र वापरली आहेत.काही दृश्यं त्या काळातल्या नॉर्मल फिल्मची क्लिप्स अशा रूपात वापरली आहेत. काही चित्रं प्रत्यक्ष माणसांचं चित्रीकरण करून मुलाखतीच्या रुपात  दाखवली आहेत.

२०१६ मधे मामीमधे लिटल प्रिन्स नावाची ११६ मिनिटांची एनिमेशन फिल्म प्रदर्शित झाली होती. तीही गाजली होती.

चित्रपट निर्मितीत कंप्यूटर आणि चित्रीकरणाची, संपादनाची विविध नवी तंत्रं आल्यानंतर एनिमेशन हा चित्रपट प्रकार निर्माण झाला, चित्रपट पहाण्याची एक नवी दृष्टी विकसित झाली. एके काळी माणसं फक्त नाटकं पहात. नंतर चित्रपट पहाण्याची सवय झाली. नवी तंत्र आल्यावर कळसुत्री बाहुल्या, चिकणमातीच्या प्रतिमा वापरून चित्रपट तयार झाले. एनिमेशन हे आणखी नवं तंत्र. डिस्ने कंपनीनं केलेल्या एनिमेशन फिल्म आता लोकप्रिय झाल्या आहेत. जंगल बुक, अवतार ही काही खूप पाहिल्या गेलेल्या एनिमेशन फिल्मची उदाहरणं.

रोटोस्कोपी किंवा एकूणातच एनिमेशन हे नेहमीच्या चित्रपट तंत्रापेक्षा एक वेगळं तंत्रं आहे. नटनट्या घेऊन चित्रपट तयार करणं आणि एनिमेशन तंत्रानं चित्रपट तयार करणं या दोन्ही प्रकारात मेहनत सारखीच आहे.

अलीकडं रोटोस्कोपिंग न करताही केवळ एनिमेशन करून चित्रपट तयार करण्याकडं कल वाढत आहे. पात्रांना घेऊन चित्रीकरण करणं ही गोष्टच एनिमेशनमधून वगळली जाते. सर्व पात्रं कागदावर चितारली जातात. किंवा विविध सॉफ्टवेअर वापरून ती थ्रीडी किंवा टूडी पद्धतीनं चित्रीत केली जातात. सॉफ्टवेअर आता इतकी विकसित होत आहेत की माणूस जसा दिसतो जवळपास तसाच माणूस आता सॉफ्टवेअर तयार करतात. त्यामुळं नट, नट्या, एक्स्ट्रॉ अशी माणसं हाताळणं, स्टुडियो किंवा बाहेर चित्रीकरण करणं ही जिकिरीची आणि फार खर्चाची प्रक्रिया पूर्णपणे टळते.माणसं,त्यांच्या लहरी, त्यांची वेळापत्रकं इत्यादी गोष्टीच नाहिशा होतात. आभासी जगातली आभासी माणसं हाताळणं सोपं असतं. आभासी माणसं आणि पात्रं दिद्गर्शक आणि चित्रकार म्हणतो ते निमूट मान्य करत असतात. हे तंत्र जेव्हां पूर्ण विकसित होईल तेव्हां चित्रपट सृष्टी बदललेली असेल, आजचे फीचर चित्रपट इतिहासजमा झाले असतील.

लविंग विन्सेंट खूप कमी पैशात तयार झाला. तेही पैसे भरून निघाले नाहीत. बहुतांश प्रेक्षक असे प्रयोग पहायला तयार नसतात. अशा फिल्म कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रदर्शित करायला वितरक तयार नसतात. त्यामुळं एका फेस्टिवलकडून दुसऱ्या फेस्टीवलकडं अशी या चित्रपटांची वाटचाल होत असते.

रसिक, अभ्यासकांना मात्र हे चित्रपट म्हणजे मेजवानी असते.

।।

 

 

4 thoughts on “लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

  1. अप्रतीम लेख निळु मला हि फील्म पहावी असं प्रकर्षांने जाणवतय मदत करशिल 🤔

  2. हा वृत्तांत मराठीतून सांगणे देखील अभिनव पद्धतीने निर्माण केलेल्या सदर चित्रपटाएव्हडेच कठीण असल्याने निळूभाऊंना अनेक धन्यवाद. ज्याच्या जिवंतपणी त्याने केवळ आठ वर्षांत आठशे अप्रतिम कलाकृती रंगवल्या आणि त्यातील एकही न विकून समाजाकडून केवळ उपेक्षा आणि हालअपेष्ठा सोसून अखेरीस जीवन संपवून त्या कलाकृतींतून पुढेमागे इतरांनी आनंद उपभोगण्याची निर्व्याज अपेक्षा ठेवली, त्यास आजच्या युगात वाहिलेली ही आदरांजली ‘व्हॅन गो’ ला (खरोखरच) आत्मा असल्यास त्यास तृप्त करेल. या चित्रपटाच्या अनेक लहानमोठ्या चितेफिती व वर्णने ‘गुगलवर’ उपलबध असल्याने सर्व वाचकांना त्या प्रत्यक्षात उपभोगता येतील असे वाटले. तो चित्रपट पोलंड मधील ज्या अनेक कल्पक चित्रकारांनी प्रचंड मेहनत घेऊन निर्माण केला त्यांचे देखील कौतुक करावे तेव्हडे थोडेच ठरेल. रंग कमी वेळात सुकवण्याचे ‘लवंगी तेल’ वापरण्याचे तत्व आणि त्यामागील निळूभाऊंनी केलेली स्वतःची मीमांसा आवडली. असा कलाकार या जन्मी देखील अनुभवता येणार नाही -इतके समर्थक वर्णन त्याच्याच रंगीत चित्रांची जिवंतपणा निर्माण करून त्यांना चालते बोलते करणे मन अवाक करून गेले. ……… धन्यवाद निळूभाऊ!

  3. असे कलाकारांवर चित्र भाष्य होणे फार महत्वाचे आहे ! धन्यवाद सर्वांचे !💐💐

  4. सर,अतिशय सुंदर लेख.फक्त एक सांगू इश्चितो. ऑइल चित्र करतेवेळी लिंसिड ऑइल हे फार उशिरा वाळतं.टरपेंटाईन फार लवकर वाळतं.

Leave a Reply to Hemant Kulkarni, USA

Your email address will not be published. Required fields are marked *