लिलिबिट या मुलीची राणी एलिझाबेथ होते

लिलिबिट या मुलीची राणी एलिझाबेथ होते

एक  मुलगी. साध्याशा फ्रॉकमधे खेळतांना, हिंडताना दिसते.  ती जिथं वावरते ते घर आणि परिसर हे एक मोठं प्रकरण आहे  हे सहज  लक्षात येतं. हळूहळू कळतं की तो  बकिंगहॅम राजवाडा आहे.

ही मुलगी कोण? ही मुलगी  एका मोठ्या माणसाला म्हणजे तिच्या वडिलांना म्हणजे राजे जॉर्ज यांना शपथ देते. हा काय प्रकार? खूप वेळानं कळतं की जॉर्जचा मोठा भाऊ एडवर्ड हा खरा राजा असतो. पण त्याला एका घटस्फोटितेशी लग्न करायला राजवाडा परवानगी देत नसल्यानं त्याला सिंहासन सोडावं लागतं.  मनापासून तयार नसतांनाही जॉर्जला राजा व्हावं लागतं आणि शपथविधीची तयारी तो आपल्या मुलीकडून करून घेत असतो. अरेच्चा म्हणजे ही मुलगी म्हणजे राजाची मुलगी, राजकन्या असते.

राजकन्या असल्याच्या कोणत्याही खाणाखुणा नसलेली ही राजकन्या लिलिबिट किंवा शर्ली टेंपल या टोपणनावानं ओळखली जात असते. तिला साधं जगायचं असतं.  तिला पुरुषावर प्रेम करायचं असतं, मुलांना वाढवायचं असतं. तिला स्वयंपाक करायचा असतो, बाजारहाट करायचा असतो.

                              दौऱ्यावर असतांना वडिलांच्या मृत्यूची बातमी कळते

वडिलांनी जबरदस्तीनं तिला परदेश दौऱ्यावर पाठवलेलं असतांना इकडं वडिलांचं म्हणजे राजाचं निधन होतं. ही बातमी तरूण लिलिबिटला केनयात असताना कळते. एक अधिकारी तिला बीबीसीवरची बातमी ऐकून घटना सांगतो. तोपर्यंत तीएक साधी राजकन्या असते. दुसऱ्याच क्षणाला ती राणी होते. सभोवतालचं वातावरण बदलतं. एक आफ्रिकन नोकर येतो, जमिनीवर लोटांगण घालून  तिच्या सँडल्सचं चुंबन घेतो. विमानात असताना तिचा सहाय्यक तिला म्हणतो की आता तो तिचा सहाय्यक रहाणार नाही, कारण राणीचा सहाय्यक वेगळा असेल. ब्रिटीश नोकरशाही किती चकडबंद असते याचा प्रत्यय तिला येतो.

लंडन तळावर विमान उतरतं तेव्हां सवयीनुसार तिचा नवरा, फिलिप, तिच्या सोबत पायऱ्या उतरायला लागतो. एक सनदी अधिकारी अलगदपणे फिलिपला दूर करतो आणि अगदी हलक्या आवाजात सांगतो – आधी राणी. नंतर तुम्ही. राणीमागे. राणीबरोबर नाही. फिलिप राणीचा नवरा असला तरी राजा नसतो. राज्यघटनेत त्याला राणीचा सहचर असं म्हटलं जातं.

राजकारणी. अर्थकारणी. वैज्ञानिक. राजदूत. कलाकार. नाना प्रकारची माणसं राणीकडं येऊ लागतात. कालपर्यंत अल्लड असलेल्या स्त्रीला  त्या लोकांच्या विषयातलं काहीही कळत नसतं. वांधे होतात. राणी एका वयस्क ज्ञानी प्रोफेसरची शिकवणी ठेवते. राणीची आई सांगते- तुला सगळे विषय माहित असण्याची आवश्यकताच नाही. तू राणी आहेस, तशीच वाग म्हणजे पुरे.

राणीमुकुट डोक्यावर येतो तेव्हां चर्चिल नावाचा एक दांडगा राजकारणी पंतप्रधान झालेला असतो. जगभर प्रसिद्ध. ऐंशीच्या पलीकडचा. अर्धी इंग्रजी डिक्शनरी त्याला पाठ होती म्हणे. फर्डा वक्ता. रिवाजानुसार चर्चिल राणीला भेटायला येतात. राणीला चर्चिलनं वर्षादोनवर्षाची असल्यापासून पाहिलेलं असतं.

                                       चर्चिल नावाच्या वादळाला नमवायचं

चर्चिल भेटायला येणार म्हटल्यावर राणी धास्तावलेली असते. काठी टेकत टेकत चर्चिल येतात तेव्हां राणी उठून उभी रहाते. चर्चिलना राणीनं वडिलांसोबत वावरतांना पाहिलेलं असतं. त्यांचं आगत स्वागत कसं करायचं ते राणीला कळत नाही. घुटमळते. चर्चिलना म्हणते- प्लीज, बसा.

चर्चिल काठीच्या आधाराने उभेच रहातात.

दरडावल्याच्या सुरात चर्चील राणीला सांगतात – तू राणी आहेस. मी पंतप्रधान आहे,  सेवक आहे. मी राणीसमोर बसू शकत नाही. मी दर आठवड्याला वीस मिनिटं देश कसा चाललाय ते सांगायला येणार. उभाच राहून बोलणार. बोलणं झाल्यानंतर उभ्याउभ्या निघून जाणार.

चर्चिल राणीलाच बसायला सांगतो.

राणी हात पुढे करते. चर्चिल वाकून राणीच्या हाताचं चुंबन घेतात.

चर्चिल जातात.

राणीची बहीण मार्गारेट. तिथं एका कॅप्टनवर प्रेम असतं. कॅप्टनची घटस्फोटित बायको जिवंत असते. त्यामुळं मार्गारेटचं त्याच्याशी लग्न होऊ शकत नाही.

राणीनं लहानपणी वचन दिलेलं असतं की ती कधीही बहिणीला अंतर देणार नाही, तिच्या इच्छा पूर्ण करेल. पण वचन देते तेव्हां राणी एक बहीण असते. मार्गारेटचं लग्न लावायची वेळ येते तेव्हां ती बहीण राहिलेली नसते, राणी झालेली असते. एकीकडं बहीण आता प्रजाजन असतं. दुसरं म्हणजे राणी ही  चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख असते. म्हणजे धर्मप्रमुखही असते. त्यामुळं तिच्या राज्यातली लग्न धर्माला अनुसरून होतात की नाही ते पहाण्याची जबाबदारी तिच्यावर असते. घटस्फोटित नवरा जिवंत असताना तिच्या काकांना, राजे एडवर्ड यांना, सिंहासन सोडावं लागलेलं असतं. मार्गारेटच्या नवऱ्याची घटस्फोटित बायको जिवंत असताना चर्चप्रमुख या नात्यानं राणी लग्नाला परवानगी देऊ शकत नाही.

बहिणीला बहीण म्हणून दिलेलं वचन राणी म्हणून तोडावं लागतं.

कष्टानं पण अगदी शांतपणे राणी मार्गारेटला सांगते की ती लग्नाला परवानगी देऊ शकत नाही. त्या वेळचा राणीचा चेहरा आणि देहबोली पहाण्यासारखी.राणी म्हणते-मी बहीण नाहीये, मी राणी आहे. मला राणीसारखंच वागायला हवं.

एकदा लंडनवर धुकं पडतं. कायच्या काय धुकं. कित्येक हजार माणसं मरतात. जनता वैतागते. सत्ताधारी पक्ष आणि मंत्रीमंडळही वैतागतं. चर्चिल म्हातारे झाले आहेत, अकार्यक्षम झाले आहेत, चर्चिलनी पायउतार व्हावं असं मंत्रीमंडळातले सहकारी म्हणत असतात. ते राणीला भेटतात. काड्या करतात. चर्चीलचे काही निर्णय (राजघराण्याबाबत ) राणीलाही रुचलेले नसतात. राणीचा सहचर फिलिपला पायलटचं कसब शिकायला चर्चिलनं विरोध केलेला असतो. विमन उडवायचं प्रशिक्षण घेताना राणीचा नवरा मरणं ही शक्यता त्याला नको असते. फिलिपला याचा राग आलेला असतो. राणीलाही राग आलेला असतो. त्यामुळं चर्चिलचा राजीनामा  मागायचं राणी ठरवते.  राज्यघटनेच्या अभ्यासक, सनदी नोकर आणि   जाणकार सल्ला देतात की अप्रत्यक्षपणे राणी पंतप्रधानाला राजीनाम्याचं सुचवू शकते. राणीचा तसा निर्णय ठरतो.

राणी चर्चीलना बोलावणं धाडते. चर्चिल राणीला भेटायला जातात, राणीसमोर उभे असतात आणि सूर्य दिसू लागतो, धुकं नाहिसं होतं. ज्या कारणासाठी राजीनामा मागायचा असतो ते कारणच दूर होतं.

राणी राजीनामा मागत नाही, हुशारीनं विषय बदलते. चर्चीलचं पंतप्रधानपद वाचतं.

नंतर राणी आपल्या आज्जीला भेटते. आज्जीनं दोन राजे पाहिलेले असतात.  राणी विचारते की पंतप्रधान समजा चुकत असतील तर निर्णय घेऊन त्याला घालवायचं की नाही. आज्जी शांतपणे सांगते- हे बघ. राणीनं कधीच निर्णय घ्यायचा नसतो, काहीही करायचं नसतं, स्वस्थ बसायचं असतं. निर्णय घेणं सोपं असतं, निर्णय न घेता स्वस्थ बसणं कठीण असतं. तेच तर राणीनं केलं पाहिजे असं आज्जी सांगते.

                            फिलिपला लिलिबिटसमोर गुडघ्यावर बसून वाकावं लागतं

फिलिप माऊंटबॅटन हा नवरा.  नौदलातला अधिकारी. त्याचं स्वतंत्र मोठ्ठं वडिलोपार्जित घरही लंडनमधे असतं. फिलिप-लिलिबिटचं लग्न झालेलं असतं तेव्हां ती साधी राजकन्या असते. लिलिबिट राणी होते तेव्हां फिलिपला त्याचे परदेशी किताब सोडावे लागतात, माउंटबॅटन किताब सोडून ड्यूक ऑफ एडिंबरा हा किताब स्विकारावा लागतो. त्याला नौदलही सोडावं लागतं. त्याचं काम राणीबरोबर हिंडणं. बस. त्याला विमान चालवायला शिकायचं असतं. पण ब्रिटीश सरकार तेही त्याला करू देत नाहीत. फिलिप जामच  वैतागलेला असतो. राणीच्या घरातला एक फर्निचरचा तुकडा बनून रहाणयाचा त्रास त्याला होत असतो.फिलिप आणि एलिझाबेथ यांच्यात खूप तणाव निर्माण होतात.   अनेकदा चिडचीड होते. एकदा चिडलेली राणी फिलिपवर एक ग्लास फेकते. बीबीसीचे फोटोग्राफर ती घटना कॅमेऱ्यात पकडतातही.

हे सारं आपण नेटफ्लिक्सवरच्या दी क्राऊन या मालिकेत पहात असतो. दहाव्या भागापर्यंत मालिका येऊन पोचते तोवर एलिझाबेथ एक तरबेज आणि मुरलेली राणी झालेली असते.  एलिझाबेथची गोष्ट मालिका किती पुढपर्यंत नेताहेत ते पहायचं.

एलिझाबेथच्या आयुष्यातल्या अनेक घटना अजून मालिकेत आलेल्या नाहीत.

चार्ल्स या तिच्या मुलाचं लेडी डायनाबरोबरचं लग्न वादळग्रस्त होतं. राजघराण्यात घटस्फोटाला परवानगी नाही म्हणून दोघं एकत्र रहात होते येवढंच. अन्यथा दोघांनाही स्वतंत्र गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड होते. लेडी डायनाचं अपघाती निधन झालं. चार्ल्सनं आपल्या आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून कॅमिला बाऊल्स या घटस्फोटितेशी लग्न केलं.राणी आणि राजघराणं त्या वेळी बराच काळ वादात सापडलं होतं. राणी एलिझाबेथ शांत राहिली. आज्जीच्या शिकवणुकीनुसार. एक चकारशब्द काढला नाही. चार्ल्स, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि सून इत्यादींबरोबर एलिझाबेथ आजही जाहीर समारंभात वावरतांना दिसते.

नेटकीच घडलेली घटना. ट्रंप निवडून आले. आमंत्रण ब्रीटनच्या  राज्यप्रमुख राणीनं   अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख ट्रंप यांना ब्रीटनभेटीचं आमंत्रण दिलं. परंतू वीसेक लाख ब्रिटीश नागरिकांनी ट्रंप यांना बोलावू नये असं पत्र राणीला लिहिलं. ब्रिटीश परंपरेनुसात दहा लाख लोकांनी सह्या करून  एकादा अर्ज दिला तर सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं. राणी पेचात सापडलीय.

ब्रिटीश अभिनेती क्लेअर फॉयनं एलिझाबेथची भूमिका केलीय. छोट्या मुलीपासून ते मुरलेल्या राणीपर्यंतचे बदल क्लेअरनं व्यवस्थित दाखवले आहेत. कायापालटीतली प्रत्येक अवस्था खऱ्या एलिझाबेथ राणीशी ताडून पहाण्यासारखी आहे. क्लेअरनं नाट्य शिक्षण घेतलंय. स्टोअरमधे सुरक्षा व्यवस्थेत किंवा वस्तूंना लेबलं लावण्याचीही कामं तिनं केलेली आहेत. अशा एका साधारण स्त्रीनं राणी कल्पिणं आणि जगणं हे कठीण काम आहे. क्लेअरनं ते साधलंय.

खऱ्या जगण्यात लिलीबीट या साध्या मुलीची राणी झाली. मालिकेत क्लेअरची एलिझाबेथ झालीय.

बहिणीच्या लग्नाला परवानगी देत नाही

ब्रिटीश नट मॅट स्मिथनं फिलिप्सचं काम  केलंय. खऱ्या प्रिन्सचं निरीक्षण करून भूमिका केलीय हे स्पष्ट आहे. खरे प्रिन्स चालतांना, थांबताना, एकाद्या गोष्टीचं निरीक्षण करताना थोडेसे डावीकडं झुकतात. मॅट स्मिथला पहाताना  खरे प्रिन्स पहात आहोत असा भास होतो. जाहीरपणे दिसणारे प्रिन्स आपल्याला माहित आहेत, घरात ते कसे वावरतात ते आपल्याला माहित नाही. प्रिन्स फिलिप यांचं एलिझाबेथशी न पटणं, तिच्यावरचा त्यांचा राग, तिच्याबद्दचे संशय मॅट स्मिथ छान दाखवतो. दी क्राऊनमधे प्रिन्स फिलिप काहीसा खलनायकासारखा दिसतो. प्रत्यक्षात तो तसा आहे की नाही ते कळायला मार्ग नाही.

अमेरिकन रंगभूमी आणि चित्रपट अभिनेता जॉन लिथगोनं चर्चिलचं काम केलंय. खरा चर्चिल काही आपण पाहिलेला नाही. लिथगोचा चर्चील पहाण्यासारखा आहे. सारं जग हिटलरपासून वाचवणारा चर्चील एका अल्पवयीन, अननुभवी राणीसमोर दुय्यम स्थान पत्करतो. एकीकडं चर्चीलला परंपरा आवडतात पण दुसरीकडं त्याचा अहम त्याला झुकू देत नाही. दोन प्रेरणातला तणाव चेहऱ्यावरच्या सूक्ष्म हालचालीनी लिथगोनं दाखवला आहे. सिनेमातला आणि रंगभूमीतला अभिनय यात बराच फरक असतो. रंगभूमीवर अधिक लाऊड अभिनय असतो. छोट्या पडद्यावर अभिनयात खूप तरल बारकावे दाखवावे लागतात. जॉन लिथगो काहीसा लाऊड आहे. कदाचित त्यामुळंच त्यांनी आजवर खलनायकांच्या, दुष्टांच्या भूमिका केल्या असाव्यात. जॉन लिथगोंना दोन  वेळा ऑस्कर नामांकन मिळालं आहे.

चर्चिल यांचं पंतप्रधान या नात्यानं एक अधिकृत पोर्ट्रेट करण्याची जबाबदारी एका नामांकित चित्रकारावर सोपवली जाते. तो चित्रकार चर्चिलना समोर बसवून चित्रं तयार करतो. त्या निमित्तानं दोघांमधे संवाद होतो. चित्र काढताना त्या माणसाचं मनही समजणं आवश्यक असतं. चर्चा करून, सहवासात राहून चित्रकार ती तयारी करत असतो.

चर्चिलची एक लहान मुलगी अकाली निधन पावलेली असते. ती घटना चर्चिलच्या मनात खोलवर रुतलेली असते. चित्रकार ब्रश चालवत असताना ही घटना जाणून घेतो.

चित्र काढताना चर्चिल म्हातारा झालेला असतो. समाज, सहकारी त्याला नाकारत असतात. वयोमानानं चर्चिल निकामी होत चाललेला असतो. पण चर्चिलचं मन हे वास्तव स्विकारायला तयार नसतं. चर्चिलची ही व्यथा चित्रकाराच्या चित्रात व्यक्त होते.

                                  राजमुकुट डोक्यावर चढवताना लिलिबिट

चर्चिल खवळतात. चित्रकार म्हणतो की चर्चिल जसा आहे तसाच चित्रातून व्यक्त होणार. भांडण होतं. चर्चिल चित्र फाडून टाकतो.

वरील सारे प्रसंग मालिकेत प्रेक्षकाला विचार करायला लावतात, दुःखी करतात, व्याकूळ करतात. चित्रकार आणि चर्चिल दोघांचंही खरं असतं.वास्तव दाहक असतं.

जिवंत असलेल्या, लोकांना माहित असलेल्या लोकोत्तर व्यक्तीवर पुस्तक लिहिणं किंवा सिनेमा करणं अवघड असतं. त्या व्यक्तींच्या वादग्रस्त पैलूंवर, त्या व्यक्तीच्या दोषांवर आणि त्रुटीवर माहिती देणं कठीण असतं.  प्रसिद्ध व्यक्तीला राग येण्याचा संभव असतो. अशी व्यक्ती सत्तेत असेल तर भरपूर दबाव आणू शकते. काही वेळा या व्यक्तींचे पाठिराखे दंगा करण्याची शक्यता असते. या शक्यता भारतात आपण अनुभवतो. अमेरिकेत-युरोपात मात्र तसं घडत नाही.वास्तव मांडताना लेखक, दिद्गर्शकाना लागणारं सर्जनात्मक स्वातंत्र्य तिथला समाज मान्य करतो. काही दिवसांपूर्वी मार्गारेट थॅचर यांच्यावरही एक सिनेमा येऊन गेला. ब्रिटीश जनतेनं तो भरपूर आणि आनंदानं पाहिला.

एलिझाबेथ आणि फिलिप दोघांनीही नेटफ्लिक्सवरची मालिका पाहिली असणार. पण त्या बद्दल ते काहीही बोललेले नाहीत.

लोकशाही देशानं राजापद, राणीपद ठेवावं की नाही यावर वाद घालायला हरकत नाही. ब्रिटीश परंपरा भारताला किंवा कोणालाही किती उपकारक होत्या किंवा अपकारक होत्या यावरही वाद घालायला हरकत नाही. घडून गेलेल्या गोष्टी. क्राऊन ही  दहा तासांची नेटफ्लिक्सची  मालिका एका राणीचं पन्नास वर्षापेक्षा अधिक काळाचं जगणं दाखवते.  त्या सोबत ब्रीटनचा इतिहास, विविध लोकशाही संस्था,   इतर संस्थांची घडण, समाजाची घडण, त्यांच्यातले तणाव आणि त्या संस्थांचा विकास या गोष्टी तरलतेनं मालिकेत पहायला मिळतात. पुढारी, संसद, वर्तमापत्रं, मंत्री, राणी-राजा, सामान्य नागरीक इत्यादी समाजातले घटक एकमेकांच्या सान्निध्यात कसे वाढतात याचंही दर्शन क्राऊनमधे घडतं.

                                                      राणी एलिझाबेथ

दीर्घ मालिका हा अलिकडल्या काळात गवसलेला एक चांगला आकृतीबंध आहे. मालिका म्हणजे एक दीर्घ कादंबरीच असते. खूप मोठा काळ, खूप माणसं, गुंतागुंत, कथानकं, उपकथानकं इत्यादी गोष्टी दीर्घ मालिकेत सांभाळता येतात. महाभारतचं  कथानक दीर्घ मालिकेत सांभाळता येतं. तासातासाचा एक भाग आणि अनेक भागांची मालिका.

मालिका दृश्य असते. लिखित शब्दामधे वाचकाला भरपूर पैस मिळते. वाचक त्यात स्वतःचं स्वतंत्र जग कल्पू शकतो. तशीच वेगळ्या प्रकारची पैस सिनेमातही मिळत असते. दृश्य पहाताना, दोन वेगळी दृश्यं एकामागोमाग पहातांना, अनेक दृश्यं पहातांना प्रत्येक प्रेक्षक त्या तुकड्यांचे स्वतंत्र अर्थ लावत असतो. सिनेमाची दोन तासांची मर्यादा मालिकेत ओलांडता आल्यानं मोठ्ठा पट मालिकेत मांडता येतो.

कॅमेऱ्यानं जन्माला घातलेली सिनेमा ही  एकदमच आधुनिक आणि नवी कला आहे. ही कला किती प्रभावी आहे ते दी क्राऊन ( आणि इतर अनेक ) मालिकेमुळं समजतं.

।।

 

2 thoughts on “लिलिबिट या मुलीची राणी एलिझाबेथ होते

  1. सदर मालिका पाहिली नसल्यामुळे त्याबद्दलचे विश्लेषण खरोखरच उत्तमपणे वटल्याचे जाणवले (अभिनंदन), विशेषतः देशातील मराठी वाचकांना ते सर्व अभूतपूर्व वाटावे -जिथे ‘माननीय’ पुढाऱ्यांचे अपमान केल्यास त्यांना प्रजा ठोकून काढते आणि इंग्लंडमध्ये राणी मात्र मूग गिळून गप्प!

    थोडेसे अभिनेत्यांबद्दल आणि या ‘THE CROWN ‘ मालिकेस मिळालेल्या पुरस्कारांबद्दल -गाजली मात्र अमेरिकेत (Netflix मुळे असावे). ते ‘कॉपी-पेस्ट’ करून इतर वाचकांसाठी इंग्रजीत देत आहे (सोयीस्कर म्हणून).

    SAG (Screen Actor Guild) Awards news brief. If can’t be seen with the following links, just copy paste them and VIEW IN YOUR URL.

    http://www.dailymail.co.uk/tvshowbiz/article-4170472/Claire-Foy-wins-SAG-Awards-Crown.html

    Golden Globe Awards Coverage below:
    http://deadline.com/2017/01/the-crown-golden-globes-best-tv-series-drama-claire-foy-netflix-1201880967/

  2. अशा मालिकांमुळे लोकांची इतिहासांत गर्व शोधण्याच्या गरजेची पूर्ती होते. वर्तमान काळाचा , समस्यांचा व त्यांच्या उपायांचा विचार करण्याची इच्छा होऊच नये अशी परिस्थिती निर्माण व्हायला मदत होते.
    सुंदर परीक्षण मालिका व पुस्तकांचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *