शिव सेनेचा आधार, महिला.

शिव सेनेचा आधार, महिला.

The Dashing Ladies of Shiv Sena

POLITICAL MATRONAGE IN URBANIZING INDIA

Tarini Bedi

Aleph

एकदा मुंबईत गिरगावात केळेवाडीच्या तोंडाशी मला एक महिला भेटल्या. साधारण उंची, सडपातळ, डोळ्यावर जाड काचांचा चष्मा. त्यांची वडापावची आणि चहाची गाडी होती.

आसपासची  बरीच माणसं त्यांना ओळखत होती. त्यांचा दरारा होता. सभोवतालच्या वातावरणारून ते कळत होतं.

मी सहज त्यांची जनरल चौकशी करणारा प्रश्न विचारला आणि त्या सुटल्याच. त्या शिवसैनिक होत्या. तसं त्यांनी अभिमानानं सांगितलं. म्हणाल्या ” कोणालाही विचारा. आपली वट आहे या विभागात. कुठल्याही पोलिस चौकीत जा नाही तर कॉर्पोरेशनच्या ऑफिसात जा. सगले लोक आपल्याला वळखतात. कधी ना कधी तरी त्यांनी आपले फटके  खाल्लेत.”

बाईंनी आपण कसे राडे केलेत, कशी दुकानं फोडलीत, मोर्चात पोलिसांनी अडवल्यावर कसा राडा केलाय याच्या गोष्टी सांगितल्या. आपण शिव सैनिक आहोत याचा आपल्याला अभिमान आहे असं त्या म्हणाल्या. बाळासाहेब हे आपले परमेश्वर आहेत, त्यांच्यासाठी आपण काय पण करायला तयार असतो असंही त्या म्हणाल्या.

दुपारची वेळ होती. गर्दी होती. त्या इतक्या मोठ्यानं बोलत होत्या की अक्ख्या रस्त्याला ऐकू जात होतं. मीही जरा टरकलोच. आपल्या तोंडून सेनेबद्दल वावगा शब्द निघाला तर या बाई आपल्याला व्हाणेनं मारतील याची खात्री मला वाटली.

” या भागात तुम्हाला काय पण अडचण आली तर थेट माझ्याकडं यायचं. बस. ” त्यांनी मला सांगून टाकलं.

वरील बाईंना भेटण्याआधी  शिवसेनेतल्या एकाच स्त्रीशी माझी चांगली ओळख होती ती व्यक्ती म्हणजे नीलम गोऱ्हे. नीलम गोऱ्हे आता टीव्हीमुळं मराठी माणसाला चांगल्या माहित झाल्या आहेत. त्यांचं संवाद कौशल्य प्रेक्षकांनी अनुभवलं आहे.  गिरगावाच्या नाक्यावरचं संवाद कौशल्य धास्तावणारं होतं. अशी शिवसैनिक स्त्री मी प्रथमच पहात होतो.

अलिकडं पालघरमधे एका कार्यक्रमाला गेलो असताना तिथं एक ठळकपणे लक्षात याव्यात अशा महिला भेटल्या. त्यांचं दिसणं, वावरणं, आवाज, बोलणं सारंच ठळक होतं. त्या मुंबईत सेनेच्या कॉर्पोरेटर होत्या. त्यांनी स्वतःची   ओळख तशीच  करून दिली.  पालघरला भेटलेल्या महिलेला मी गिरगावात भेटलेल्या महिलेची आठवण सांगितली. पालघरच्या बाई हसल्या. म्हणाल्या ” म्हणजे काय, आम्ही शिवसैनिक महिला असतोच तशा. आम्ही कामं करतो. मी एके काळी समाजवादी पक्षाचं काम करायची. मृणाल गोरे यांच्याबरोबर. मृणालताईंचं जनता पक्षाचं राजकारण सुरु झाल्यावर मी पक्ष सोडला आणि शिव सैनिक झाले. आम्ही भाषणं वगैरे करत नाही. आम्ही कामं करतो….?

त्यानंतर असंख्य शिवसैनिक महिलांची गाठ  तारिणी बेदी यांच्या दी डॅशिंग लेडीज ऑफ शिव सेना हे पुस्तकात पडली.

हे पुस्तक हाती पडलं त्याचीही मजाच आहे. विराटच्या वेवर्ड अँड वाईज या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळत होतो. गॅरेथ जोन्सच्या ‘ कार्ल मार्क्स, ग्रेटनेस अँड इल्युजन्स ‘ या पुस्तकाला खेटून दी डॅशिंग लेडी उभं होतं. काळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या लाल अक्षरात पुस्तकाचं नाव आणि सेनेच्या महिलांचं चित्र. महिलांच्या हातात उघडे चाकू. चाकू कीचेनमधे अडकवलेले आणि की चेनच्या टोकाला बाळ ठाकरे यांचा फोटो.

मुखपृष्ठाचा  एक सिद्धांत असा की मुखपृष्ठावरून पुस्तकातल्या मजकुराची कल्पना यायला हवी. या पुस्तकाच्या बाबतीत हा सिद्धांत तंतोतंत खरा ठरत होता. ब्लर्ब वाचला, सुरवातीची काही पानं चाळली आणि पुस्तक घेतलं. अशाही विषयावर पुस्तकं निघतात याचं कौतुक  वाटलं.

स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यू यॉर्कचं हे पुस्तक रुपा पब्लिकेशनच्या अलेफ या उपकंपनीनं भारतात प्रकाशित केलंय. कागद, छपाई, मांडणी या सर्वावर आंतरराष्ट्रीय दर्जाची छाप दिसते.

पुस्तकाच्या लेखिका तारिणी बेदी या मुंबईतल्या गोरेगाव विभागात वाढल्या. शिकण्यासाठी आणि पीएचडीसाठी त्या अमेरिकेत, इलिनॉय विश्वशाळेत गेल्या. तिथं   दक्षिण आशिया विषयविभागामधे त्यांनी पीएचडी पूर्ण केली. शिव सेनेतल्या डॅशिंग स्त्रिया हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. या विषयासाठी त्यांनी मुंबई, पुणे आणि नाशिक इथल्या पंचवीसएक महिलांच्या कार्याच्या अभ्यास केला. तीनेक वर्षं त्या शिव सैनिक महिलांबरोबर वावरल्या, त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि पीएचडीचा प्रबंध लिहिला. वरील पुस्तक पीएचडी  प्रबंधावर आधारलेलं आहे.

सामान्यतः प्रबंध या मजकुराची  शैली फार कंटाळवाणी असते. जागोजाग अवतरणं असतात, विधानं जिथून घेतली ती पुस्तकं आणि त्या लेखकांचे संदर्भ असतात. जगातले अमूक एक विद्वान अमूक विषयावर काय म्हणतात असं ओळीओळीत सांगितलेलं असतं. शिवाय तळटीपा असतात आणि पुस्तकाच्या शेवटी पानंच्या पानं टिपांनी आणि इंडेक्सनं भरलेली असतात. मुख्य विषय काय आहे आणि लेखकाला काय म्हणायचं आहे ते शोधून काढणं फारच कठीण होऊन बसतं.

तारिणी गुप्तांच्या पुस्तकात तो त्रास बराच मर्यादित आहे. साधारणपणे पत्रकारी शैलीत गुप्तानी वीस पंचवीस महिला कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रं या पुस्तकात रंगवली आहेत. महिला कार्यकर्ती घरात कशी वावरते, कचेरीत कशी जाते, तिथं कार्यकर्त्यांबरोबर ती कशी वागते, अँक्शनमधे ती कशी असते इत्यादी गोष्टींचं चित्रासारखं वर्णन लेखिकेनं केलं आहे. त्या महिला कार्यकर्त्या डोळ्यासमोर उभ्या रहातात.

पुण्याच्या बालाताई बाईकवरून फिरतात. त्या लेखिकेला सांगतात ” सर्वांना माहित आहे की मी मिरचीची पूड टाकून तुम्हाला आंधळं करू शकते आणि तुम्हाला ठारही मारू शकते.तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठे मराल पण मला ते माहित असतं. आम्ही शिव सैनिक आहोत. आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला कशाचीही भीती नाही..” बालाताईंचा एक कार्यकर्ता सांगतो ” कोणालाही विचारा, लोक सांगतील की मुंडेताई गोड आहेत पण डेंजरस आहेत. पोलिस बालाताईंना  नाममात्र अटक करतात, चहापाणी करतात आणि सोडून देतात.”

श्रीमती काणे या एक कॉर्पोरेटर. अरूण साटम हा आणखी एक सेना कॉर्पोरेटर. दोघं जण लेखिकेबरोबर मुलाखतीसाठी हिंडत असतात. रात्र झालेली असते. घरी परतत असतांना तिघं रिक्षाची वाट पहात असतात. एक ऑटोवाला जेमतेम थांबतो, पण तो यांना घ्यायला तयार नसतो. दोन्ही  कॉर्पोरेटर त्याला धोपटतात. हे सांगून की आम्ही सेनेचे कॉर्पोरेटर आहोत.

पुण्यातल्या शीला. गरीब घरच्या. लहानपणीच लग्न झालं. नवरा दारुडा, शीलाला मारझोड करत असे. शीलानं धैर्यानं घर सोडलं, माहेरी परतली. नवरा तिथही जाऊन तिला त्रास देत असे. शीला सेनेत गेली. सेनेतले कार्यकर्ते तिला मदत करू लागले. शीलाला संरक्षण मिळालं. शीलानं संसार नीट केला आणि ती सेनेची कार्यकर्ती झाली. तिच्या धैर्याबद्दल तिचं कौतुक होऊ लागलं. आसपासच्या वस्तीत एकाद्या स्त्रीला त्रास होऊ लागला की ती शीलाकडं जाऊ लागली. अन्याय घरच्या माणसाकडून होत असो की समाजातल्या इतर कोणाकडून. शीला सरसावते. शीला जाहीर सभातही बेधडक बोलते.

कल्पना साटे या कॉर्पोरेटर दिवसभर सेनेच्या शाखेवर असतात. त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असतो. कुणाला त्यांच्याकडून शिफारसपत्रं हवं असतं, कोणाला पालिका अधिकाऱ्यासाठी पत्र, कोणाला कसल्या तरी फॉर्मवर सही. फोनवर बोलत बोलत साटे सह्या करत असतात. फोनवरचं बोलणं म्हणजे  कित्येक वेळा दमदाटी असते, सोडलेले हुकूम असतात.  तक्रारी असतात,   वस्तीतले संडास बिघडलेले असतात, पाण्याचा पाईप मोडलेला असतो, सांडपाणी वहात असतं. साटे संबंधित पालिका अधिकाऱ्याला फोनवर हुकूम सोडतात किंवा पत्र लिहितात.

साटे म्हणतात- या सर्व लोकांची मी आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. माझं या लोकांशी रक्ताचं नातं आहे. त्याना माहित आहे की त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असते.

या गर्दीत एक बशीर नावाचा माणूस असतो. त्याच्या मुस्लीम वस्तीतली  अडचण घेऊन तो आलेला असतो. साटे त्याला म्हणतात- मी तुम्हा (मुस्लीम) लोकांचे प्रश्न नेहमी सोडवत असते. माझं येवढंच म्हणणं की तुमच्या वस्तीतल्या घरांवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. या वेळी तरी तसं घडलं पाहिजे.

बशीर हुशार आहे. प्रत्येक वेळी तो आश्वासन देतो – झेंडा एकादे वेळेस फडकणार नाही, निदान एकादी पाटी लावण्याचा तरी प्रयत्न करीन. पण ते जाऊ द्या या वेळच्या निवडणुकीत आमची इतकी इतकी मतं तरी मी तुम्हाला नक्कीच मिळवून देईन.

दुर्वाबाई. वैद्य आहेत. लोक त्यांना डॉक्टर म्हणतात. पुण्यातल्या वेश्यावस्तीत त्या रहातात. वेश्यांचे आरोग्याचे व इतर प्रश्न त्या सोडवतात. वेश्यांना सरकारी अधिकारी छळतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. दुर्वाबाई वेश्यांच्या बाजूनं उभ्या रहातात. या विभागाकडं पालिकेचं दुर्लक्ष असतं. एकदा पालिकेनं शेजारच्या वार्डातला कचरा या वस्तीत साठवायला सुरवात केली. दुर्वाबाईंनी वेश्यांना आणि दुकानदारांना संघटित करून कचरा कुंडी हटवायला लावली. पालिका कर्मचारी कचरा उचलत नाहीत, कचरा साठतो. दुर्वाबाईंच्या आंदोलनामुळं कचरा उचलला जातो. दुर्वाबाई लोकप्रिय आहेत, नेत्या आहेत.दुर्वाबाईंच्या पाठिंब्यावर इथला शिवसेनेचा माणूस निवडून येतो.

दुर्वाबाई ब्राह्मण. त्यांनी एका दलिताशी लग्न केलं. ब्राह्मण वस्तीतलं वास्तव्य सोडून त्या वेश्या विभागात काम करू लागल्या, राहू लागल्या.  त्यांचं माहेर त्यांना मुकलं. तरी न डगमगता त्या काम करताहेत.

गोरेगावात फिल्म सिटी विभागातल्या झोपड्या उठवून तिथं नव्या इमारती उभारल्या जाणार होत्या. एसआरए योजनेखाली झोपडपट्टीतल्या लोकांना इतरत्र घरं देण्यात येणार होती. १९९५ साली सेना सत्ताधारी झाली तेव्हां ही योजना सरकारनं जाहीर केली होती. यथावकाश सेनेची सत्ता गेली. विकास प्रकल्प रेंगाळला. झोपडपट्टीतल्या लोकांची संघटना शिव सेनेनं बांधली होती.

फिल्म सिटी विभागात सेनेच्या दोन महिला कार्यकर्त्या लोकप्रिय आणि प्रभावी आहेत. सीता आणि गीता. त्यांनी झोपडपट्टी विकास योजना रोखून धरलीय. झोपडपट्टीतल्या लोकांना पर्यायी घरं नीटपणे मिळतात की नाही याकडं सीता गीता लक्ष देतात. करोडो रुपयांच्या प्रकल्पाच्या चाव्या जणू या दोघींच्या हातात आहेत. सीता गीता यांचंच राज्य या विभागात चालतं.

पैकी सीता या बेधडक शिव सैनिक महिलेचं एक समांतर खाजगी साम्राज्य आहे. त्यांच्याकडं जमीन आहे, त्या जमिनीवर अनधिकृत घरं बांधलेली आहेत आणि त्या घरात त्या लोकाना भाडेकरू म्हणून ठेवतात, वाजवीपेक्षा जास्त भाडं वसूल करतात. त्या सावकारी करतात. वस्तीतली अनेक दुकानंही त्यांच्या मालकीची आहेत. भाडेकरू ठेवणं, त्यांना व्याजानं पैसे देणं या गोष्टीही सामाजिक सेवा आहेत असं त्या म्हणतात. रहात्या जागेची, पैशाची गरज आपण भागवतो असं त्यांचं म्हणणं.

गीता एकदमच वेगळ्या. त्यांची काहीही प्रॉपर्टी वगैरे नाही. त्या गरीब होत्या, गरीबच आहेत, गरीबच रहाणार आहेत. त्या दलित आहेत. ख्रिश्चन मिशननं त्यांना वाढवलं, त्या ख्रिस्ती झाल्या. या विभागातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना अनेक संकटांतून जावं लागलं. मुलगा गेला, नवरा गेला. तरी गीताबाई हिमतीनं उभ्या राहिल्या. त्यांचं कष्टाचं जीवन वस्तीला माहित असल्यानं वस्ती नेहमी त्यांच्या सोबत असते. मारझोड करणारे व्यसनी नवरे किंवा भाऊ वगैरे त्रास देऊ लागले की वस्तीतल्या स्त्रिया हक्कानं गीताबाईंकडं येतात. वस्तीतली  घरगुती भांडणं आणि समस्याही गीताबाई सोडवतात.

तारिणी बेदींनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रात सेनेच्या महिला विभागाच्या प्रमुख एडवोकेट चुरींचं व्यक्तिमत्व ठळकपणे लक्षात रहातं. सीता आणि गीता यांच्या बरोब्बर दुसऱ्या टोकाचं चुरींचं व्यक्तिमत्व. अभ्यासू, सुखवस्तू संस्कृती, कायद्यानं वागणं, मृदूतेनं लोकांचे प्रश्न सोडवणं. चुरीबाई डॅशिंग नाहीत.

पुस्तक वाचल्यानंतर सेनेचं एक वेगळंच चित्र तयार होतं. तळात काम करणाऱ्या निरलस महिला कार्यकर्त्या. कोंडी झालेल्या समाजात बेधडक-बिनधास्त पद्धतीनं प्रश्न तडीस लावणाऱ्या कार्यकर्त्या. इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते (पुरुष-महिला) शांततामय इत्यादी पद्धतीनं कामं करतात, सेनेच्या महिला कार्यकर्त्या राडा करायला तयार. त्यांची वाट समाजाला मान्य न होणारी पण प्रभावी. बहुतांश कार्यकर्त्या बहुजन समाजातल्या, दलित, मागासवर्गीय. शिवसेनेची राजकीय घडण वेगळी असल्याचं या धाडसी महिलांच्या कामाकडं पाहून लक्षात येतं.

                                  तारिणी बेदी

दी डॅशिंग लेडीज ऑफ शिव सेना हे पुस्तक शिव सेनेचा एक वेगळाच पैलू वाचकांसमोर ठेवतं. शिव सेनेच्या विकासात आणि टिकण्यात महिलांचा वाटा किती आहे ते वरील पुस्तक अप्रत्यक्षपणे दाखवतं. अप्रत्यक्षपणे अशासाठी म्हणायचं की पुस्तकाचा मुख्य विषय आहे सेनेतलं धाडसी-डॅशिंग स्त्रियांचं स्थान. परंतू धाडसी महिलांच्या गोष्टी ऐकत असताना सेना बलवान का झाली या प्रश्नाचं एक उत्तर अलगदपणे वाचकाला सापडतं.

झोपडपट्ट्या, गरीबवस्त्या, वंचित वस्त्या यातल्या लोकांच्या नागरी अडचणी सेनेच्या महिला सोडवतात. मालकीचं घर, सांडपाणी व्यवस्था, पाणी मिळवून देणं, खाजगी भाई आणि पालिका यांच्याकडून होणारी दादागिरी आणि अन्याय यांच्यापासून संरक्षण देणं इत्यादी कामं या महिला निरलसतेनं करतात. या कामाचं एक मॉडेल मृणाल गोरे यांनी तयार केलं होतं. विधायक आणि कायदेशीर संघर्ष हे ते मॉडेल होतं. प्रश्न हाती घ्यायचे, मोर्चे काढायचे, निवेदनं द्यायची, सनदशीर मार्गानं पण संघर्षाच्या वाटेनं प्रश्न सोडवायचे. यात सेनेनं स्वतःच्या स्टाईलची भर घातली. बेधडक राडे करणं. सरकारी अधिकारी किवा बिल्डर किंवा कोणाच्याही कानाखाली आवाज काढणं, त्यांना धोपटणं. मोर्चा किंवा तत्सम प्रसंगी तोडफोड करणं.  मृणाल गोरे अधिक सेना असं मिश्रण महिलांनी साधलं.   त्यांनी सेना अधिक प्रभावी केली.

महिला कार्यकर्त्यांचं एक नेटवर्किंग असतं. हळदी कुंकू, संक्रांत, गोविंदा इत्यादी सांस्कृतीक प्रसंगी महिला एकत्र येतात. यात राजकारण आहे असं कोणालाही वाटत नाही. सेनेला या नेटवर्किंगचा उपयोग होतो. नारायण राणे याना हरवण्यासाठी मुंबईहून महिला सैनिकांची फौज कोकणात गेली होती आणि नेटवर्किंगचा उपयोग करून त्यांनी राणेंच्या मतदारांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळवला होता.

ठाकरे म्हणत की सेनेला राजकारण करायच नाहीये, समाजकारण करायचंय. सेनेतल्या स्त्रियांनी ठाकरेंचं म्हणणं अमलात आणलं. बेदी यांच्या पुस्तकातल्या बहुतेक सगळ्या धाडसी महिला धडाडीनं समाजकार्य करतात पण राजकारणात फार पडत नाहीत. शाखा प्रमुखांनी आदेश दिला की  मोर्चे, तोडफोड, सभा यात  सामिल होतात.  त्या आधी आणि नंतर त्या आपापल्या ठिकाणी आपापली कामं करत रहातात.

तारिणी बेदी यांचं पुस्तक शिव सेना या विषयावर नाहीये. शिवसेनेतल्या डॅशिंग महिला हा पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. शिव सेनेची संघटना, राजकीय विचार इत्यादी विषय अभ्यासाचा भाग नाहीत. जाता जाता काही निरीक्षणं या पुस्तकात येतात, ती विचार करायला लावणारी आहेत.

सेनेमधे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे असं ओझरत्या उल्लेखातून लक्षात येतं. उद्धव ठाकरे यांच्या भेटीला एक कॉर्पोरेटर महिला जातात तो प्रसंग लेखिकेनं चित्रपटासारखा रेखाटला आहे. त्यातही आडून आडून स्त्रीच्या स्थानाचा मुद्दा येतो.

मुंबईची घडण बदलणाऱ्या दोन घटना घडल्या. एक म्हणजे मुंबईतल्या गिरण्या व इतर उद्योग बंद होणं. त्यामुळं मुंबईतली मराठी माणसं कमी झाली, देशोधडीला लागली. दुसरी घटना म्हणजे मुंबईचा विस्तार. जुन्या वस्त्यांच्या जागी नव्या टोलेजंग किमती इमारती येऊ लागल्या. या बदलाच्या संक्रमण काळात ज्यांना त्रास झाला त्या लोकांच्या बाजूनं शिव सेना उभी राहिली. त्रस्त मराठी माणसं. या माणसांनीच शिव सेनेला पाठिंबा दिला, मतं दिली.

आता मुंबई बदललीय. आता त्रास होणाऱ्या मराठी माणसांची संख्या कमी झालीय. ज्यांना त्रास होतोय ती माणसं बिगरमराठी आहेत आणि सुखवस्तू आहेत, चांगल्या घरांमधे रहाणारी आहेत. या माणसांचे प्रश्न सोडवण्याचं राजकीय तंत्र शिव सेनेला माहित नाही. ते तंत्र भाजप किवा कोणत्याही राजकीय पक्षाला माहित आहे.  शिव सेवा रूढार्थानं राजकीय पक्ष कधीच नव्हती.  बदललेल्या मुंबईचे प्रश्न सोडवण्याची वाट सेनेला माहित नाही. बदललेल्या मुंबईतली माणसं रस्त्यावर येणारी, राडे करणारी नाहीत.

म्हणूनच सेना नागरी प्रश्नांपेक्षा हिंदुत्व, व्यापक राष्ट्रीय कार्यक्रम  यावर भर देत असावी.

शिवसेना या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. किंगशुक नाग यांचं सॅफ्रन टाईड, सुजाता आनंदन यांचं सम्राट, वैभव पुरंदरे यांचं बाळ ठाकरे ही इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस यांनी लिहिलेल्या बाँबे मेरी जान या पुस्तकामधे शिवसेनेवर काही मजकूर आहे. प्रकाश अकोलकर यांनी जय महाराष्ट्र या नावानं सेनेचा इतिहास लिहिला आहे. विजय सामंत आणि हर्षल प्रधान यांनी सुवर्ण महोत्सवी सेना नावाचं पुस्तक लिहिलंय. हर्षल प्रधान आणि श्वेता परुळेकर यांची बाळ ठाकरे यांची भाषणं संकलित केली आहेत. सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर लिहिलेल्या पुस्तकात सेनेचं विश्लेषण आहे. डॅशिग लेडीज या पुस्तकानं सेना या विषयावरच्या साहित्यात एक वेगळी भर घातली आहे.

।।

 

2 thoughts on “शिव सेनेचा आधार, महिला.

  1. सदर लेखाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सकाळ’ मध्ये ‘ब्रिटिश नंदी’ या टोपण नांवाखाली (ज्यांचे खरे नांव दुनियाभर जाहीर आहे) दररोज उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंबद्दल जी थट्टा चाललेली असते, ती या धाडशी महिला कशी काय खपवून घेतात? योगायोग म्हणजे या लेखाची शाई वाळण्यापूर्वीच ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील व्यंगचित्रे बघून ‘मराठा समाज’ खवळून उठला असल्याचे वाचनात आले. येत्या निवडणुकीच्या परिस्थितीत हा सर्वच मामला भोंवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. “आगीत तेल ओतणे” -म्हणजे काय या म्हणीचा प्रत्यय “WHEN IT RAINS, IT POURS ” असा लावायच्या की काय?

  2. Hey there would you mind sharing which blog platform you’re working with?
    I’m going to start my own blog in the near future but I’m having a tough time
    selecting between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.

    The reason I ask is because your design and style seems
    different then most blogs and I’m looking for something completely unique.

    P.S Apologies for getting off-topic but I had to ask!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *