Browsed by
Month: December 2013

अॅलन टुरिंग या वैज्ञानिकाची ब्रिटीश राणीनं माफी मागितली आहे. १९५४ साली टुरिंगनं आत्महत्या केली. तो समलिंगी स्वभावाचा होता. त्या काळात  समलिंगी स्वभाव आणि संबंध ही गोष्ट गुन्हा मानली गेली होती. सरकारनं  जबरदस्ती करून  अघोरी रासायनिक उपचार करून त्याला ‘ नैसर्गिक ‘ करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारनं केलेल्या छळाला कंटाळून टुरिंगनं आत्महत्या केली होती.  

  अॅलननं जर्मन सैन्याची गुप्त लिपी फोडली, त्यातून जर्मन हवाई हल्ल्यांपासून हज्जारो ब्रिटीश माणसांचे प्राण वाचले.  कंप्युटर विज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे प्रांत त्यानं सुरु केले. त्यानं टुरिंग मशीन तयार केलं. ते यंत्र आजच्या कंप्युटरचा मूळ पूर्वज आहे. एक अव्वल गणिती, वैज्ञानिक अशी त्याची ख्याती होती.  पूर्वग्रहदूषीत, अवैज्ञानिक कायद्यामुळं त्याचा जीव गेला आणि मानवी समाज एका थोर वैज्ञानिकाला मुकला.
१९६७ साली ब्रिटीश सरकारनं समलिंगी संबंधांना गुन्हा मानणारा कायदा रद्द केला. त्यानंतर हज्जारो लोकांनी टुरिंगवरचा  गुन्हेगार हा ठपका काढून घ्यावा अशी विनंती केली. पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी जाहीरपणे टुरिंगला गुन्हेगार ठरवणं हा प्रकार भयानक आहे असं म्हटलं. आता राणीनं ठपका पुसला आहे.
यंत्रं स्वतंत्रपणे विचार करू शकतात हा सिद्धांत टुरिंगनं मांडला. त्यानं तयार केलेल्या दोन कंप्यूटरांनी त्यांना दिलेल्या आज्ञा मोडून स्वतःचा विचार केला, एकमेकांच्या संवादामधून. विचार करण्याची क्षमता यंत्रामधेही तयार होते हे त्यानं प्रयोगातून सिद्ध केलं. त्याच्या या सिद्धांतानं सारं जग त्यावेळी आणि आजही विचारात पडलं आहे.
टुरिंग तर मेला आहे. त्याच्यावरचा गुन्ह्याचा ठपका पुसून काय हाती लागणार, अशा प्रतिकात्मक वागण्याचा उपयोग काय असा प्रश्न लोक विचारतात. जर्मनीनं ज्यूंची माफी मागितली, हिटलरनं मागं केलेल्या अत्याचारांबद्दल. जपाननं चीनचीही अशीच क्षमा मागितली. जेव्हां ब्रीटन टुरिंगची क्षमा मागतं तेव्हां आपण भविष्यात कसं वागू याची ग्वाही देतं, माणसाचं स्वातंत्र्य आपण पुन्हा हिरावून घेणार नाही, जुने कायदे उकलून काढून ते कालबाह्य असल्यास रद्द करू असं ब्रिटीश समाज म्हणतो. भविष्यात कोणाही समाजाशी आपण क्रूरतेनं वागणार नाही असं जर्मन समाज म्हणत असतो . 
स्वतःमधे बदल घडवून आणण्याची इच्छा असेल, तसा प्रयत्न समाजाकडून होणार असेल तर अशा माफीकृत्याला अर्थ उरतो. मनमोहन सिंग यांनी ८४ च्या शिख हत्याकांडाबद्दल शिख समाजाची माफी मागितली. पण नंतर देशात अनेक हत्याकांडं झाली तेव्हां त्यांचा पक्ष  आपल्याला त्यातून कोणता राजकीय फायदा होईल याचा विचार करत  योग्य संधीची वाट पहात थांबला. नरेंद्र मोदी  गोध्रा हत्याकांडाबद्दल क्षमा मागायला तयार नाहीत.   म्हणाले की ” एकादा कुत्र्याचं पिल्लूही गाडी खाली गेलं तर आपल्याला दुःख होतं.”