Browsed by
Month: January 2014

केजरीवाल यांना सल्ला
देणारे लेख नाणावलेले पत्रकार लिहीत आहेत. त्यात गोविंदराव तळवलकर आहेत, एम जे
अकबर आहेत. कित्येक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे हे पत्रकार सल्ले देत आहेत, मतं
मांडत आहेत. ते योग्य आहे, समजण्यासारखं आहे. मेघनाद देसाईंनीही केजरीवाल इवेंट जगात
इतरत्र इतर वेळी घडलेल्या घटनांच्या प्रकाशात तपासला आहे. एक लाट तयार होते. एक
वातावरण इमर्ज होतं. त्यात माणसं सत्तेत, विधीमंडळात फेकली जातात. काही काळानंतर
लाट ओसरते, वातावरण निवळतं आणि इमर्ज झालेली माणसं विस्मृतीत जातात, इतिहासातली एक
छोटीशी नोंद होतात. तळवलकर, मेघनाद देसाई ही नाणावलेली आणि विचारी माणसं आहेत.
त्यांच्या म्हणण्यात अर्थातच तथ्थ्य आहे.
अकबर सांगतात की
केजरीवालांनी जरा सबूरीनं घ्यावं, थांबावं. सल्ल्याच्या ठिकाणी सल्ला ठीक आहे.
परंतू काही वेळा माणसं टेकीला येतात.  टेकीला
आलेलं असणं, पाणी डोक्यावरून गेलेलं असणं याचाच अर्थ सबूरी संपलेली असते. अशा वेळी
माणसं बेभान होऊन काही तरी करतात. कधी हिंसा करतात, कधी उलथापालथ करतात, कधी कधी
क्रांतीही करून टाकतात, कधी क्षणैक उद्रेक करून गप्प रहातात. दिल्लीतली आणि
देशातली माणसं टेकीला आलेली आहेत. पैकी दिल्लीतल्या  माणसांनी केजरीवालांना निवडून दिलं, देशात काय
होईल ते माहित नाही.
केजरीवालांनी सुरक्षा
नाकारणं, दरबार भरवणं, लहान घरात रहायला जाणं या गोष्टी नाटक या सदरातल्या आहेत
असं गोविंदराव म्हणतात. वरील गोष्टी केजरीवालांनी केल्या हे खरं, पण ते नाटक आहे
की इतर काही हा अर्थ लावण्याचा प्रश्न आहे. सुरक्षेच्या गराड्यात,
हितसंबंधियांच्या घोळक्यात, सत्तेनं दिलेल्या अती सवलतीत मंत्री वगैरे रहातात ही
गोष्ट लोकांना बोचते. त्याला केजरीवालांची ही प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे,
त्यात मोठा तत्वज्ञानाचा वगैरे प्रश्न नाही. त्यामुळं तो प्रकार तेवढाच, तितक्याच
गंभीरपणे घ्यायला हवा.
केजरीवाल धरण्यात बसले
होते ते  दृश्य पहाण्यासारखं होतं. ते आणि
त्यांचे मंत्री आणि आसपासची जनता यात फरक दिसत नव्हता. ते अगदी सामान्य माणसासारखे
दिसत होते. त्यांना वेगळं काढताच येत नव्हतं. आपल्याला केजरीवाल माहित असल्यानं
आपण त्याना गर्दीत पटकन शोधू शकत होतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, जपान इथला एकादा
माणूस टीव्ही पहात असता तर त्याला जमलेल्या लोकांमधे मंत्री, मुख्यमंत्री सापडला
नसता.
सभोवताली
सुरक्षा,चमचे आणि हितसंबंधी यांचं प्रचंड कवच घेऊन फिरणाऱ्या आजच्या पुढाऱ्यांच्या
तुलनेत केजरीवालांचं धरणं वेगळं दिसलं. हा फरक लोकांच्या नजरेत भरणं ही आज एक
स्वतंत्र महत्वाची गोष्ट आहे.
जगात या पूर्वी काय
घडलं होतं त्याच्याशी तुलना करत केजरीवाल घटना पहाणं अनेक बाबतीत निरूपयोगी आहे.
एफेसाय वाढवून द्या, आमच्यावरचे खटले मागे घ्या, आमचे लांडे कारभार सांभाळून घ्या,
आम्हाला कॉलेज किंवा कारखान्याला वाट वाकडी करून परवानगी द्या, अमूक गोष्टीवरची
जकात वाढवा किंवा कमी करा, जमीन द्या, खाणी द्या, 
अशा मागण्या करत माणसं आज निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडं जातात.
त्यासाठी पैसे देतात. केजरीवालांकडं माणसं वरील गोष्टी घेऊन गेलेली नाहीत. शाळेत
प्रवेश, दिव्याला वीज आणि नळाला पाणी अशा गोष्टींसाठी बहुतांश माणसं त्यांच्याकडं
गेली. पैशाचा ढीग घेऊन नव्हे. हे वेगळेपण लक्षात घ्यायला हवं. सत्ता आल्यानंतर
केजरीवाल काय करतील हा भविष्य वर्तवण्याचा प्रश्न आहे.
केजरीवाल म्हणत आहेत
की त्याना जनतेला सत्ता द्यायची  आहे,
स्वतःकडं सत्ता घ्यायची नाहीये. केजरीवालांना नवा पक्ष उभारून आज उपलब्ध असलेल्या
दुकानांत एका नव्या दुकानाची भर घालायची नाहीये. थेट जनतेकडं सत्ता, पक्ष
संघटनेशिवाय राजकीय चळवळ या गोष्टी व्यवहाराच्या हिशोबात समजायला कठीण आहेत, त्यात
एक आंधळा ध्येयवाद आहे, एक  युटोपिया आहे
असं वाटतं. ते खरंही आहे.
नेमकी हीच गंमत आहे.
देशात कोंडी झालेली असतांना नाना गोष्टींबद्दल स्पष्टता नसलेल्या, अव्यवहारी
माणसाला लोकांनी निवडून दिलंय. काय होईल ते सांगता येत नाही.

ही घटना तशीच पहायला
हवी. 

केजरीवाल हा एक इवेंट
आहे. इमरजंट आहे. अनेक लोकांनी स्वतंत्र हेतू बाळगून केलेल्या हालचालीतून ही घटना
घडली आहे. केजरीवाल सत्ता स्थापन करतील असं लोकांना वाटलंही नसणार. लोकांच्या ढोबळ
अपेक्षा तेवढ्या केजरीवालांना माहित होत्या. म्हणजे  वीज, पाणी इत्यादी. परंतू त्याच माणसांना
केजरीवाल यांनी मंत्री म्हणून कसं वागावं या बद्दलही अपेक्षा होत्या. त्या काही
मतदानात प्रतिबिंबित झालेल्या नव्हत्या. त्यांना अपेक्षित नसलेल्या अनेक गोष्टी
केजरीवाल करत जातील कारण त्या गोष्टी करू नयेत असं काही लोकांनी त्यांना
सांगितलेलं नव्हतं.
 कोणाला नुसतं पाणी हवं होतं, कोणाला नुसती वीज
हवी होती, कोणाचा भ्रष्टाचारावर राग होता, कोणाचा एकाद्या किंवा अनेक राजकीय पक्षांवर
राग होता, कोणाला समाजात आमूलाग्र बदल हवा होता, कोणाला क्रांती हवी होती,
प्रत्येकाची वेगळी तऱ्हा. केजरीवाल यांना तिसरंच काही तरी हवं असणार. राजकीय
पक्षांतली माणसं काही एका संस्कृतीची असतात, त्यांना पाठिबा देणारी बहुतांश माणसं
हितसंबंधी असतात. त्यामुळं त्यांचे उमेदवार आणि पक्ष यांच्याकडून चौकटीबाहेर काही
घडेल अशी अपेक्षा नसते.
केजरीवाल यांच्या
बाबतीत वेगळं घडण्याची अपेक्षा बाळगता येते कारण त्यांना  माणसांनी वेगळ्या कारणांसाठी पाठिंबा दिला,
अत्यंत मर्यादित अशा हेतूंसाठी पाठिंबा दिला.
वेगळेपण आणि
अनपेक्षित घडण्याची शक्यता हे केजरीवाल यांच्या बाबतीतले महत्वाचे मुद्दे आहेत.
दिल्लीबाहेरची,
त्यांना मत न दिलेली देशातली इतर माणसं : या
सर्वांच्या केजरीवाल यांच्याकडून नाना अपेक्षा आहेत, दिल्लीतल्या लोकांपेक्षा
वेगळ्या. त्यांना त्यांच्याकडून एक सम्यक, भारतीय जीवनाच्या सर्व अंगांना
स्पर्शणारा सर्वांगिण विचार हवा आहे. त्यांना एक जवळपास संपूर्ण निर्दोष राजकीय
पक्ष आणि नेता हवा आहे. देशासमोर दीर्घकाळापासून ताटकळत असलेले पाचपन्नास ते हजार
दोन हजार वर्षांच्या काळात किचकटलेले प्रश्न केजरीवालांनी सोडवावेत असं त्यांना
वाटतंय. गंमत अशी की परिपूर्ण विचारधारा, परिपूर्ण राजकीय पक्ष आणि परिपूर्ण नेता
या बाबत प्रत्येक माणसाचं मत  वेगळं असतं.
केजरीवाल कसे काय पुरे पडणार या नाना, एकमेकांशी संबंध नसलेल्या, एकमेकांना छेद
देणाऱ्या अपेक्षांना?
एक चाकोरीबाहेरचा
विचार.
सध्याच्या माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक भारतीय माणसाकडून त्याच्या अपेक्षित गोष्टींची
यादी बनवावी. उमेदवार, मंत्री, पक्षांनी कसं कसं वागावं याची. वागणं, बोलणं, कपडे,
अन्न सेवन, श्रद्धा, आर्थिक स्थिती, नातेवाईक, सांपत्तीक स्थिती, भाषा, यांच्यासह
तंत्रज्ञान-अर्थ-राजकीय-आंतरराष्ट्रीय-धार्मिक-सांस्कृतीक-भाषिक इत्यादी
बाबतीतल्या अपेक्षा त्यात व्यक्त 
व्हाव्यात. समजा सरासरी दहा हजार अपेक्षा होतील. त्या डिजिटाईज्ड कराव्यात.
10 हजार गुणिले 75 कोटी अशी अपेक्षायादी तयार होईल. ती हाताळू शकणारा कंप्यूटर आणि
सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग गुगल वगैरे लोक नक्की  करून देतील. या अपेक्षांवरची उमेदवारांची,
पक्षांची मतं जाणून घ्यावीत, त्यावर त्यांच्या सह्या घ्याव्यात.

तसं घडलं की परिपूर्ण
अशी निवडणूक पद्धत तयार होईल. नंतर मग केजरीवाल यांच्या बद्दलच्या अपेक्षा (
इतरांबद्दलच्याही), केजरीवाल यांनी केलेला अपेक्षाभंग (इतरांचेही अपेक्षाभंग )
इत्यादी गोष्टी आटोक्यात येतील.

प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी आणि केजरीवाल

बरखा दत्त यांनी
एनडीटीव्ही या वाहिनीवर केजरीवाल यांची दीर्घ मुलाखत घेतली. आप पक्षाबद्दल
लोकांकडून घेतल्या जाणारे आक्षेप दत्त यांनी मांडले. विरोधी पक्षा  या बुरख्यामागं दडून बरखांनी माध्यमांना वाटणारे
आक्षेपच मांडले. अनेक मुद्द्यांवर केजरीवालांनी स्पष्टीकरणं दिली. त्यातले लक्षणीय
असे काही मुद्दे.
1. ” मी डावा किंवा उजवा
नाही. मला डावं, उजवं म्हणजे काय ते समजत नाही. मला येवढंच समजतं की लोकांना पाणी
हवंय,वीज हवीय, पारदर्शकता हवीय, सुशासन हवंय.” केजरीवाल यांच्या या भूमिकेमुळंच आधीचा राजकारणाचा
अनुभव नसतांनाही मतदारांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला भरघोस मतं दिली. त्यांचं
हे मत चर्चा मार्तंड आणि घनघोरविचारवंत मंडळींना पटणारे नाहीत. डावे आणि उजवे
केजरीवाल यांना कसं काहीही समजत नाही, त्यांना वैचारिक पातळी नाही वगैरे गोष्टी ते
उत्तम प्रकारे मांडतील. विचारधारावाल्यांनाबाजूला सारून केजरीवांना मतदारांनी
निवडून दिलं हे कसं समजून घ्यायचं?

2. दिल्लीत एका
परदेशी महिलेवर बलात्कार झाला. केजरीवाल विचारतात की याची जबाबदारी कोणावर? पोलिस किंवा प्रशासनात कोणावर तरी याची जबाबदारी असायला हवी की नाही? आदर्श प्रकरण झालं. भ्रष्टाचार झाला हे तर उघड आहे. परंतू कोणावरही
जबाबदारी टाकून त्यांना शासन करणं जमत नाहीये. नोकरशहा म्हणतात की पुढाऱ्यांची
जबाबदारी. पुढारी म्हणतात नोकरशहांची जबाबदारी. विचारवंत म्हणतात की एकूण समाजच
सडलेला असल्यान सर्व समाजाचीच जबाबदारी. मधल्या मधे आदर्श घडतय, बलात्कार होताहेत,
खून होताहेत, बेकारी वाढतेय त्याचं काय करायचं? या
घोळातून वाट काढण्यासाठी केजरीवल यांनी एसएचओ स्तरावरच्या पोलिस अधिकाऱ्याला
जबाबदार ठरवलं आहे, त्यांचं निलंबन करून कारवाई करा अशी मागणी केली आहे. पोलिस
खातं आणि गृह खातं त्याला तयार नाही. शेवटी कोणावर तरी जबाबदारी टाकून त्या
माणसाकडून पैसे वसूल व्हायला हवेत, त्या माणसाला तुरुंगाची हवा द्यायला हवी.  हेच नेमकं आपल्या देशात घडत  नाही. ना काँग्रेसला  ते जमलं ना भाजपला. त्यामुळंच गुन्हेगार मोकाट
सुटलेले आहेत. कायदा असून नसल्यासारखा आहे. केजरीवाल यांनी पहिल्या प्रथमच योग्य
रीतीनं प्रश्न धसाला लावला आहे. प्रस्थापित व्यवस्था ऐकत नाही म्हटल्यावर केजरीवाल
मुख्यमंत्री असूनही चौकात धरणं धरणार आहेत. तर बरखा दत्त त्यांना  विचारतात की सत्ताधारी असूनही तुम्ही आंदोलन
कां करता. मग त्यांनी काय करावं?