Browsed by
Month: March 2015

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
पंढरपूर या गावातल्या एका कुटुंबाच्या जगण्यातले काही दिवस या चित्रपटात आहेत. मध्यम वर्गीय कुटुंब. कुटुंबातला कर्ता माणूस वारला आहे. त्याची पत्नी, आई आणि त्याची दोन मुलं. मुलांची आई स्वेटर विणून, स्वयंपाकाची कामं करून घर चालवते, मुलांना वाढवते. मुलाच्या दिवंगत वडिलानी हौसेनं डिझाईन केलेली एक सायकल आहे. मुलगा ती जिवापाड जपतो. मोठा झाल्यावर, उंची वाढल्यावर, त्याला ती वापरायची आहे.  लोकांकडून कामाचे पैसे न आल्यानं आईचं स्वेटर विणायचं गहाण यंत्रं   बँक जप्त करायला निघाली आहे. बँकेला पैसे परत करायचे आहेत. पैशाची भरती करण्यासाठी सायकल विकायची पाळी आली आहे. कमी पडणारे पैसे मिळवण्यासाठी मुलगा, मुलगी बांगड्या विकायचं सायकलवर चादर पसरलेलं दुकान काढतात. आजी त्या कामी मदत करते, तीही यात्रेत चहा विकून चार पैसे मिळवते. नाना संकटं येतात. शेवटी सगळं ठीक होतं. अशी गोष्ट. 
पडद्यावर पहाताना ही गोष्ट अगदी खरी खरी वाटते. पंढरपूर नावाचं एक खरंखुरं गाव आपल्या समोर येतं. त्यातली इरसाल माणसं आपल्यासमोर येतात. त्यातली खूप माणुसकी असणारी माणसंही आपल्यासमोर येतात. हे सारं पंढरपूरचं आहे हे आपल्याला सिनेमा पहाताना लक्षात येतं. पंढरपुरमधले रस्ते, घरं, माणसं, त्यांचे कपडे, त्यांच्या घरांतले आतले रंग आणि भांडीकुंडी. सारं काही पंढपुरचं असतं. बोलणारी माणसं पुस्तकी बोलत नाहीत किंवा पुणं-मुंबई-मराठवाडा इथलं बोलत नाहीत. पंढरपूरचीच भाषा बोलतात. मुंबई पुण्यातली माणसं पैसे उधार घेतात, लोन घेतात, कर्ज घेतात. पंढरपुरातली स्त्री ‘हातउसने’  पैसे मागते. ती बाई आपल्या मुलांना ‘ लेकरं ‘ म्हणते.
एलिझाबेथ एकादशीत खूप बारीक बारीक तपशील आहेत. जगण्यातले, कपड्यांतले, समाजातले, धर्मातले, बोलण्यातले. जत्रा आहे. जत्रेतल्या वेश्या आहेत. तपशीलातून एक गाव डोळ्यासमोर उभं रहातं.
सत्यजित रे आणि अदूर गोपालकृष्णनच्या सिनेमांची आठवण येते. मधे बराच काळ गेल्यानंतर  चित्रपटाची ही धाटणी पुन्हा एकदा दिसतेय, लोकांना ती आवडतेय आणि देशाच्या पातळीवर या चित्रपटाला मान्यता मिळतेय. 
एलिझाबेथमधे काही संदेश बिंदेश आहे काय? असू शकेल. तो ज्यानं त्यानं शोधायचा. चित्रपटात बरीच इन्फर्मेशन आहे, बराच आशय आहे. वारकरी दिसतात. अंधश्रद्धा निर्मुलनाचा मोर्चा दिसतो. देव दिसतो. गरीबी दिसते. असहाय्य माणसं दिसतात. माणसांच्या श्रद्धा दिसतात. या साऱ्याचा  अर्थ पहाणाऱ्यानं आपापल्या कलानं लावायचा. सिनेमा कशाचाचा आग्रह धरत नाही. इंग्रजी सब टायटल्स नसली तरीही सिनेमा समजतो. कारण तो चित्रपटाच्या भाषेत बोलतो. पात्रांचं दिसणं, वावरणं, त्यांचे चेहरे सारं काही बोलत असतं. माजीद मजिदीच्या चित्रपटांची आठवण येते.छोट्या मुलांचं जग माजिदी चितारतो.माजीदचे चित्रपट ध्वनी बंद करून पाहिले तरी समजतात. माजीद मजिदीचा प्रभाव एकादशीच्या दिग्दर्शकावर असणं शक्य आहे. मजीदीच्या अनेक फिल्म गेल्या काही वर्षात मुंबईत अनेक वेळा दाखवल्या गेलेल्या आहेत. 
एकादा प्रसंग किंवा मुद्दा किंवा बिंदू प्रेक्षकाच्या मनावर ठसावा म्हणून ध्वनीचा मुद्दाम केलेला वापर एकादशीत  नाही. करूण संगित नाही. घटना वेग घेताना तबला, ड्रम इत्यादींचा वापर नाही. आनंददायक घटना घडल्यावर सतारीचे तुकडे नाहीत.  एकादी फ्रेम प्रेक्षकाच्या मनावर ठसावी म्हणून क्लोजपचे, फोकसिंगचे खेळ नाहीत. वातावरण निर्माण करण्यासाठी पिवळा, गडद निळा, शेंदरी वगैरे रंगांचा वापर नाही. 
संगित, ध्वनी, चित्रांच्या फ्रेम्स इत्यादी गोष्टी कथनाकाचा भाग असतात, कथानकाबरोबरच वाहत जातात.  
एकादशी स्थानिक आहे आणि वैश्विकही आहे. हीच तर गंमत आहे. स्थानिकतेचे तपशील खोडून काढून कथानक वैश्विक होत नाही. घसघशीत स्थानिकतेतच वैश्विकता असते. एलिझाबेथमधे नातेपुते या गावाचा उल्लेख होतो. उगाचच नातेपुते हे नाव काढून त्या ऐवजी रामपूर, गोविंदपूर असलं नाव घालण्यात मतलब नसतो. नातेपुते नावाचं एक गाव असतं. ते मुंबईतल्या माणसाला भले माहित नसेल. पण तरीही ते असतं आणि त्याचं असणंही आपल्याला समजू शकतं. सोलापूरमधल्या मुलांची नावं ज्ञाना, गण्या, झेंडू इत्यादी असतात. उगाचच ती खोडून त्याजागी अशोक, सुरेश, जान्हवी वगैरे नावं कशाला टाकायची? 
रे आणि अदूरच्या सिनेमातली गावं, त्यांची नावं इत्यादी गोष्टी स्थानिक असतात. रे किंवा अदूर आपलं गाव, आपली भाषा, आपली संस्कृती सोडून जात नाहीत.  परेश मोकाशीही महाराष्ट्राची, पंढरपूरची गोष्ट सांगतात.
थोडं मेक्सिकोत जाऊया..
गोंझालेज इनारिटो या मेक्सिकन दिग्दर्शकाच्या बर्डमन सिनेमाला चार ऑस्कर मिळाली आणि हॉलिवूडमधे भरपूर पैसाही मिळाला. गेल्या वर्षी अल्फोन्सो क्वारोन्सच्या ग्रॅविटी या मेक्सिकन सिनेमानं अनेक ऑस्करं मिळवली. जगात मेक्सिकन सिनेमांची लाटच सध्या आल्यासारखं दिसतंय. या मंडळींनी केलेले मेक्सिकन सिनेमे लोकप्रिय होत आहेत, पैसे मिळवत आहेत आणि मान्यता मिळवत आहेत. क्वारोन्सनं २००१ साली यु टू मामा तँबरीन हा सिनेमा केला. मेक्सिकन तरूणांचं जगणं, त्यांच्या व्यथा वगैरे गोष्टी या सिनेमात आहेत. त्या सिनेमात ना हॉलिवूड आहे, ना अमेरिका आहे. त्यात स्वित्झर्लंडमधे किंवा हवाईमधे केलेली चित्रणं नाहीत. त्यात विदेशांचे संदर्भ किंवा पात्रं वगैरे नाहीत. सारं थेट मेक्सिकन आहे. मेक्सिकन समाजाचं चित्रण त्यात आहे. शतकभर मेक्सिकोनं दडपशाहीचं वातावरण भोगलं. आताशा तिथं माणसं मोकळा श्वास घेत आहेत. गोंझालेझ इनारिटो म्हणतो आता कधी तरी आम्हाला हवं तसं सरकार या देशात येईल. इनारिटो, क्वारोन्स किंवा आता नव्यानं दिग्दर्शनात उतरलेला दिएगो लूना यांना काही तरी बोलायचं आहे, काही तरी सांगायचं आहे. त्यांचं सांगणं तद्दन स्थानिक आहे, त्याला स्थानिक इतिहास आहे. ही मंडळी त्यांचं सांगणं प्रवचनाच्या रुपात न मांडता गोष्टीत मांडतात. गोष्टी सांगतात. गावाकडल्या गोष्टी. दिएगो लूनानं सीझर शावेझ ही फिल्म केलीय, ती गाजतेय. तो म्हणतो “The marvel of directing films is that you can go as far as you like, but you always end up talking about the place that you come from.”
इनारिटो, लूना, सत्यजित रे, अदूर, बर्गमन, परेश मोकाशी. सगळी माणसं आपापल्या प्रदेशाबद्दल बोलतात. रे बंगालबद्दल बोलतात. अदूर, केरळबद्दल. बर्गमन स्वीडनबद्दल. ही मंडळी जिथं वाढतात तिथलीच भाषा बोलणार. इतर काही बोलणं कृत्रीम होतं, ओढून ताणून होतं. स्पीलबर्ग अमेरिकन आहे. त्याच्या सिनेमात अमेरिकाच येणार. तेव्हां परेश मोकाशींच्या सिनेमात महाराष्ट्र असायला हवा. तो गोष्टीतून प्रकट व्हायला हवा. चित्रपट माणसं चित्रांचं वस्त्रं. माणसं विणून तयार केलेलं वस्त्रं. 
गेल्या वर्षी चित्रपट महोत्सवात असगर फरहादी या इराणी दिग्दर्शकाची सेपरेशन ही फिल्म पहायला मिळाली. त्या आधी त्याचीच अबाउट एली नावाची फिल्मही भारतात पहायला मिळाली होती. दोन्ही सिनेमे गाजले, त्यांना  अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं आणि सन्मान मिळाले. दोन्ही सिनेमे तेहरानमधे घडतात. तेहरानमधल्या मध्यम वर्गीय लोकांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांभोवती सिनेमे फिरतात. सेपरेशनमधे घटस्फोट घेऊ पहाणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट आहे. पुरुषाला आपल्या अल्झायमर झालेल्या बापाची काळजी घ्यायचीय. बायको घरात राहून सासऱ्याची काळजी घ्यायला तयार नाही. पुरुषाला नोकरीही करायची आहे आणि घरात वडिलांकडं लक्षही द्यायचंय. एक महिला नर्सिंगसाठी ठेवली जाते. नंतर एकामागोमाग एक घटना घडत जातात. अबाऊट एलीमधे समुद्राकाठी माणसं पिकनिकला गोळा झालेली असतात आणि त्यांच्यापैकी एली नावाची तरूणी बुडून मरते. तिच्या मरणाचं दुःख सहलकरींना नाही. त्यांच्या आपसातल्या मारामाऱ्या होतात त्या पिकनिकला हीच जागा कां निवडली, एली या तरूण मुलीला तिच्याबद्दलची माहिती नसतांना पिकनिकला कां बोलावलं इत्यादी.  
फरहादीच्या गोष्टीतली माणसं इराणी आहेत. तद्दन. सिनेमाभर इराण, तेहरान दिसत रहातं. तिथले पोलीस. तिथलं न्यायालय. तिथले कायदे. धर्माच्या चौकटीत जगावं लागण्यातली घालमेल. बुरखे आणि हिजाब. या सर्वाच्या तळात असतं तिथल्या लोकांचं जगणं. सिनेमा पहाताना आपल्याला इराणही दिसत असतं आणि आपला भारतीय वास्तवही. मधेच ती इराणी माणसं भारतीयच आहे असंही वाटून जातं.
काही वर्षांपूर्वी पोस्टमेन इन माऊंटन्स नावाचा एक चिनी सिनेमा महोत्सवात प्रदर्शित झाला होता. हुओ जियांकी या माणसानं तो दिग्दर्शित केला होता. एका कथेवर तो आधारलेला होता. पर्वतमय प्रदेशातला एक पोस्टमन. एकशेवीस किमीचा दुर्गम पर्वतीय प्रदेशात पायी फिरून पोष्टमन पत्रं घरोघरी पोचवत असतो. घरातून बाहेर पडला की महिन्याभरानं तो परतायचा. पायाचं दुखण जडल्यानं पोस्टमन निवृत्त होतो,तेच काम करणाऱ्या आपल्या मुलाला गावं आणि पत्रांचं वाटप दाखवण्यासाठी तो आपला शेवटला बटवटा करायला निघतो. त्या प्रवासात पोस्टमनचं काम, गावं, तिथली माणसं इत्यादींचं दर्शन मुलाला घडतं. गावं, माणसं, निसर्ग, त्यांचं चहा पिणं, गावठी पाईप ओढणं, गावातला चिखल आणि पायरस्ते, गरीबीनं ग्रासलेली घरं, माणसांचे विटलेले कपडे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इत्यादी गोष्टी अगदी बारीक तपशीलासह या सिनेमात येतात. सुरवातीला मुलगा बापापासून काहीसा दुरावलेला असतो. पण हलके हलके त्याला बाप कळू लागतो. एका ठिकाणी तो ओढा ओलांडताना बापाला पाठुंगळीला घेतो. एका प्रसंगात मुलगा पुढं जाता जाता बाप मागं पडलेला असतो. मुलगा आपल्याच नादात.  त्याच्या लक्षात येतं की मागं बाप दिसत नाही. तो घाबरतो. बापाला काही झालं तर नाही ना? तो मागं फिरून बापाला शोधतो. बाप सू करायला थांबलेला असतो. दुरवर तो तुमानीची बटणं लावून येताना दिसतो. मुलाचा जीव भांड्यात पडतो. एक शब्दही कोणी बोलत नाही असे कित्येक मिनिटांचे किती तरी प्रसंग. संगीतही नाही. पानांची सळसळ, वाहत्या पाण्याची खळखळ इत्यादी आवाज. बस. 
सिनेमा चिनी.  तो चिनी रहात नाही. तो केरळी, कानडी, कोकणी वगैरे सहज होतो. 
तर पुन्हा एकदा असे सिनेमे निघताहेत, मराठीत. 
एकेकाळी असे सिनेमे चित्रपट महोत्सवात दिसत. त्यांना कलात्मक चित्रपट असं म्हटलं जाई. मुख्य प्रवाहात ते येत नसत, पैसे मिळवत नसत. आता वातावरण काहीसं बदलत आहे. वर उल्लेख केलेले मेक्सिकन सिनेमे आता हॉलीवूडमधे गाजू लागले आहेत, खूप प्रेक्षक ते पहात आहेत, चित्रपटाला बरे पैसे मिळू लागले आहेत. आपल्याकडं, मराठीतही तसं घडायला हरकत नाही.
टीव्हीवर प्रोमोज दाखवून उपयोग होतो काय? कलाकारांच्या कल्पनाशून्य, विशेषणबंबाळ, पोकळ मुलाखतींचा मारा केल्यामुळं प्रेक्षक चित्रपटाकडं वळतील काय? कोणत्या प्रकारचं मार्केटिंग असायला हवं? 
चित्रपटात दम आहे, त्यात गंमत आहे, त्यात पहाण्यासारखं खूप आहे येवढ्यावरही चित्रपटाला प्रेक्षक मिळायला हरकत नाही. वारेमाप पैसा खर्च करणं, संदेशांचा मारा करणं म्हणजे मार्केटिंग आहे काय? 
या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर या चांगल्या चित्रपटांचा प्रसार व्हायला मदत होईल.

००
व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?

व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?

व्यंकटरमण सुब्रमण्यम ब्रीटनमधल्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले आहेत. त्या आधी२००९ मधे त्यांना मॉलिक्युलर बायॉलॉजी विषयातलं नोबेल पारितोषिक (इतर दोन वैज्ञानिकांसह) मिळालं होतं. या दोन्ही घटना व्यंकटरमण यांचं जगातलं स्थान दाखवतं.
वरील दोन्ही गोष्टी त्यांनी अमेरिका आणि ब्रीटनमधे साधल्या.ते वडोदऱ्यात जन्मले, तिथंच त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यांना आयआयटीत प्रवेश हवा होता. मिळाला नाही. त्यांना संशोधन करायचं होतं, त्यांचे आई वडील दोघंही संशोधक होते. व्यंकटरमण अमेरिकेत पोचले. तिथं त्यांनी ओहायो विश्वशाळेत डॉक्टरेट केली. नंतर येल विश्वशाळा, ब्रुकलीन इन्सटीट्यूट या ठिकाणी त्यांनी  मॉलिक्युलर बायॉलॉजी या विषयावर संशोधन चालू ठेवलं, संशोधन प्रबंध लिहिले. 
रायबोझोनची रचना आणि कार्य हा त्यांचा विषय. माणसाच्या पेशीत असणारा रायबोझोम माणसाच्या जगण्याला आवश्यक प्रथीनांची निर्मिती करत असतो. रायबोझोमचं कार्य आणि रचना कळल्यामुळ पुढल्या काळात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बिघडलेल्या रायबोझोमची दुरुस्ती करणं शक्य होईल, त्यामुळं माणसाच्या जगण्यात क्रांतीकारक बदल होतील. रायबोझोममधे काही गडबड झाली रे झाली की दुरुस्त करा अशा रीतीनं वैद्यक वागत राहिलं तर रायबोझोम कधीच मरणार नाही आणि माणूसही अमर होऊ शकेल. 
रिचर्ड फेनमननं एका प्रबंधात लिहिलं की जीवशास्त्रामधे मरण नावाची कल्पना कुठंच नाहीये.  तिथून जीवशास्त्राच्या संशोधनाला वेगळं वळण मिळालं. माणसाच्या पेशीची दुरुस्ती करणाऱ्या संशोधनाला गती मिळाली. कंप्यूटर आणि नॅनोटेक्नॉलॉजी या दोन शाखांनी पेशींची दुरुस्ती शक्य करून दाखवली.   माणसाच्या पेशीतल्या गुणसुत्रातले घटकगुण कात्रीनं कापून, वेगळे करून, दुरुस्त करून, पुन्हा जोडून एक नवं गुणसूत्र तयार करण्याची शक्यता निर्माण झाली. त्या दिशेन सध्या काम चालू आहे. गुणसूत्र वेगळी करणारी कात्री म्हणजे एक यंत्र-उपकरण, नॅनो उपकरण.  नाना उपयोगांची नाना प्रकारची यंत्र निर्माण होऊ घातली आहेत. रेणूचे घटक वेगळे करून, त्यात इतर रेणूंचे घटक भरती करून एक नवा रेणू तयार करता येतो आहे. तेही एका यंत्राचंच काम. त्यातून आता स्मार्ट धातू, नवे धातू तयार होत आहेत. माणूस आणि यंत्रं एकजीव होऊन जातील, एकत्र काम करतील आणि त्यातून माणसाचं आयुष्य अडीचशे ते पाचशे वर्षांपर्यंत वाढेल असं रे कुर्झवेल सांगतो आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातलं संशोधन कोणा एका माणसामुळं होत नाही. अनेकानेक संशोधकांच्या साखळीतून संशोधन होत असतं. एकला चालो रे वगैरे गोष्टी विज्ञान-तंत्रज्ञानात नसतात. तिथं सहजीवन असतं. माणसाच्या जगण्यात होऊ घातलेले क्रांतीकारक बदल करणाऱ्या अनेकानेक वैज्ञानिकांच्या अनेकानेक साखळ्यांतली व्यंकटरमण, सर व्यंकटरमण, ही एक कडी आहे.
 आपली समजूत सुधारावी म्हणून, आपल्याला काही शिकता यावं म्हणून एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. व्यंकटरमण यांची कारकीर्द, त्यांनी केलेलं सर्व काम, अमेरिकेतलं आणि ब्रीटनमधलं आहे. असं कां व्हावं? व्यंकटरमण असोत की सीव्ही रामन की खुराणा, ही माणसं भारतात जन्मतात, भारतात शिकतात, त्यांची मूळ वाढ भारतातच होते. परंतू त्यांच्या हातून होणारं काम मात्र परदेशातच होतं. असं कां होतं?
थोडं तपशिलात जायला हवं.
रॉयल सोसाटीपासून सुरवात करू.
१६४५ मधे ही संस्था स्थापन झाली. अनौपचारिक रूपात. नंतर १६६२ मधे तिला राजमान्यता मिळाली. विज्ञान म्हणजे प्रयोगातून सिद्ध झालेल्या गोष्टी हा सिद्धांत तेव्हां पुढं आला होता. त्या सिद्धांताच्या आधारे विज्ञान आणि ज्ञान मिळवणं असं या संस्थेचं उद्दीष्ट होतं. संस्थेनं आपला उद्देश Nullius in verba ‘ कोणाचाही शब्द जसाच्या तसा घेऊ नका’ या वाक्यात कोरून ठेवला.दर आठवड्याला ठराविक दिवशी ठराविक वेळी वैज्ञानिक जमत. आपला सिद्धांत आणि प्रयोग वैज्ञानिक या सभेत मांडत. त्यावर चर्चा होई, तपासणी होई. त्याला मान्यता दिली जाई. नंतर या सिद्धांतावरचा निबंध सोसायटीच्या जर्नलमधे प्रसिद्ध केला जाई.रॉबर्ट बाईल, रॉबर्ट हुक इत्यादी त्या काळातले वैज्ञानिक सुरवातीपासून संस्थेच्या कामात सहभागी असत. रॉबर्ट बॉईलनी संस्थेतल्या कामाबद्दल लिहिलेल्या एका पत्राचा काही भाग असा
About the year 1645, while I lived in London (at a time when, by our civil wars, academical studies were much interrupted in both our Universities), … I had the opportunity of being acquainted with divers worthy persons, inquisitive natural philosophy, and other parts of human learning; and particularly of what hath been called the New Philosophy or Experimental Philosophy. We did by agreements, divers of us, meet weekly in London on a certain day and hour, under a certain penalty, and a weekly contribution for the charge of experiments, with certain rules agreed amongst us, to treat and discourse of such affairs.”
रॉयल सोसायटीची स्थापना हवेत, अपघातानं झाली नाही. फ्रान्सिस बेकन या विचारवंत वैज्ञानिकानं मांडलेला संशोधनाचा सिद्धांत या सोसायटीच्या निर्मितीला कारणीभूत आहे. विचारपूर्वक प्रयोग उभा करायचा, त्याचे निष्कर्ष मांडून सिद्धांत तयार करायचं ही ज्ञानाची वैज्ञानिक पद्धत बेकननं मांडली. प्रयोगातून तयार झालेलं ज्ञान म्हणजे विज्ञान हा तो सिद्धांत. माणसं प्रयोग करू लागली आणि रॉयल सोसायटीत ते प्रयोग मांडून चर्चा करू लागली, प्रयोगाचं खरंखोटेपण सिद्ध करू लागली.
एक उदाहरण. १७७० च्या सुमाराचं. स्मीटन नावाचा एक प्रयोग करणारा माणूस रॉयल सोसायटीत आपली निरीक्षणं आणि प्रयोग मांडू लागला. स्मीटन हा जेम्स वॅटचा समकालीन. त्या काळात उत्तर युरोपात धरणं,कालवे, पाण्याचं वितरण, पाण्यापासून वीज तयार करणं इत्यादी गोष्टी घडत होत्या. स्मीटननं त्या सर्वाचा अभ्यास करून जलव्यवस्थेचा सिद्धांत मांडला. तंत्रज्ञान परिभाषित केलं, जलव्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक मॅन्युअल्स लिहिली. त्यातून एक हायड्रॉलिक्स हे शास्त्र तयार झालं, सिविल इंजिनियरिंगची एक शाखा सुरु झाली. स्मीटननं लििहलेली पुस्तकं आणि मॅन्युअल्स वापरून जगभर त्यानंतर पूल, बंदरं, कालवे, वाफेची इंजिनं इत्यादी गोष्टी उभ्या रहायला लागल्या. गंमत म्हणजे स्मीटन शिक्षणानं इंजिनियर नव्हता. तो वकील होता. फ्रान्स जलशास्त्रात आघाडीवर होतं. सारी पुस्तकं फ्रेंचमधे. स्मीटनला ती अनुवादित करून वाचावी लागली. वगैरे.
त्यानंतर १७५० सालची गोष्ट. आता वाफेची यंत्रं सरसकट वापरली जाऊ लागली. परंतू त्यात काही दोष होते, कार्यक्षमता आणि उत्पादनाची किमत यावर त्या दोषांचा परिणाम होत असे. जॉन देसाग्युलर्स हा माणूस भलीमोठी यत्रं घेऊन सोसायटीत भाषण करी. या यंत्रात कोणते दोष आहेत आणि ते कसे दूर करता येतील यावर तो तांत्रिक भाषणं देत असे. त्याच्या सोबतच अॅडम वॉकर हा माणूस  mechanics, hydrostatics, penumatics, chemistry, optics, electricity and general properties of matter या विषयावर भाषण करत असे. या भाषणांना लोक गर्दी करत. भाषणांना त्या काळात आजच्या काळाच्या हिशोबात १५ हजार रुपयांचं तिकीट काढावं लागत असे. शिवाय भाषणांसाठी त्यांना भरभक्कम मानधनही दिलं जायचं.
भाषणांना व्यापारी, उद्योजक हजर असत. या मंडळींचा वापर ते आपले उद्योग, यंत्रं, कारखाने अद्यावत-कार्यक्षम करण्यासाठी करत असत. तत्कालीन ब्रीटनमधे, स्कॉटलंड आणि मँचेस्टरमधे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, मेकॅनिक, प्राध्यापक, बँकर्स, राजकीय पुढारी, व्यापारी इत्यादी मंडळी एकत्र येत. उद्देश एकच, आर्थिक विकास. विश्वशाळा, इंजिनियरिंग शाळा इत्यादी सुरु करण्यासाठी व्यापारी सढळ हातानं देणग्या देत. त्यातूनच पुढं औद्योगीक क्रांती सिद्ध झाली. औद्योगिक क्रांती सिद्ध होण्यासाठी लागणारा सामाजिक-राजकीय पायाही लोकानी तयार केला. माणसाला संपत्तीचा उपभोग घेणं शक्य होईल असे कायदे केले, बँकिंग-इन्शुरन्स इत्यादी संस्था सुरु केल्या.
सोसायटी एक वैज्ञानिक जर्नल चालवते. या वर्षी हे जर्नल ३५० वर्षांचं होत आहे. या जर्नलमधे प्रकाशित झालेले काही प्रबंध असे.  
 सुरवातीला रक्त देण्याच्या – ब्लड ट्रान्सफ्युजन – प्रक्रियेचा वृत्तांत (१६६६). 
 आयझॅक न्यूटन- प्रकाश किरण आणि रंग यांचं स्वरूप (१६७२).
 बेंजामिन फ्रँकलिन- ढगात वीज असते (पतंग उडवून). (१७५२)
हॅन स्लोन-देवीची लस.(१७५५)
मोत्सार्ट हा अलौकिक बुद्धीमत्तेचा संगीतकार आहे. वैज्ञानिक अभ्यास. (१७७०)
कॅरोलिन हर्शल- धूमकेतूचा शोध.(१७९४)
मॅक्सवेल-प्रकाशाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म. (१८६५)
डायसन,एडिंग्टन- आईनस्टाईन यांचा जनरल रिलेटिविटीचा सिद्धांत.(१९२०)
स्टीफन हॉकिंग- ब्लॅक होल. (१९८०)
  रॉयल सोसासटी या संस्थेला महत्व आणि प्रतिष्ठा आहे त्या मागं बराच इतिहास आणि खटपट आहे.
अशा संस्था भारतात कां उभ्या/चालत्या  नाहीत?
व्यंकटरमण यांचा मॉलिक्युलर बायॉलॉजीचा अभ्यास येल विश्वशाळेमधे झाला.
येल विश्वशाळेची सुरवात एका कॉलेजपासून झाली. १७०१ साली प्रेसबिटेरियन चर्चमधल्या पुरोहितांना धर्मशास्त्र शिकवण्यासाठी येल कॉलेज सुरु झालं. १७७७ मधे कॉलेज धर्मशास्त्रापासून दूर गेलं, विज्ञान विषय शिकवला जाऊ लागला. १९१० नंतर एंब्रियॉलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी, इकॉलॉजी या विज्ञानशाखा उघडल्या गेल्या. १९२० मधे वैज्ञानिक वैद्यकी या शाखेला सुरवात झाली. संशोधन हा या शाखेचा मुख्य फंडा होता. कमीत कमी लेक्चर्स, कमीत कमी परिक्षा आणि पूर्णवेळ शिक्षक अशी शिक्षण पद्धत सुरू झाली. या पद्धतीचं नावही येल पद्दत असं पडलं. येल विद्यापीठातून शिकलेले, तिथं शिकवणारे यांच्या यादीत ५२ नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
१८६१ मधे बॉस्टनला एमआयटी स्थापन झाली आणि १८८५ साली स्टॅनफर्ड विश्वशाळा सुरु झाली. येल विश्वशाळेत संशोधनावर भर असतो तर एमआयटी आणि स्टॅनफर्डमधे संशोधनातून उत्पादनं तयार करण्यावर भर असतो. आजच्या जगाच्या वापरात असलेल्या वस्तूंपैकी बहुसंख्य वस्तूंच्या उत्पादनाच्या मुळाशी वरील दोन विश्वशाळा आहेत. उदाहरण- इंटरनेट, सेल फोन, लॅपटॉप, आय फोन, आय पॅड.  
स्टॅनफर्डनं जोर धरला १९४० ते १९५५ मधे डीन असलेल्या फ्रेडरिक टर्नर यांनी घेतलेल्या निर्णयांपासून. स्टॅनफर्डकडं प्रचंड जमीन होती. टर्नर यांनी आपल्याच विश्वशाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना जमीन भाडेपट्टयावर देऊ केली, उत्पादनांचं डिझाईन तयार करण्यासाठी. विश्वशाळेतलं ज्ञान, उत्साही प्राध्यापक- संशोधक- विद्यार्थी यांचं सान्निध्य आणि पैसे गुंतवू पहाणारे व्यापारी अशा तिघांच्या सहकार्यातून हेवलेट पॅकार्ड सारख्या कंपन्या सुरु झाला. तिथून स्टार्ट अप संस्थांचं पेव फुटलं. मायक्रोचिप्स आणि त्यांचा वापर करून तयार होणारी उपकरणं हा उद्योग तिथं जन्मला. गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल इत्यादी संस्था इथंच काम करतात.  सारा उद्योग चिपवर, म्हणजे सिलिकॉन चिपवर आधालेला असल्यानंच या विभागाला सिलिकॉन व्हॅली असं नाव पडलं.
एमायटीचंही तसंच. १८६१ साली ही विश्वशाळा स्थापन झाली. संशोधन आणि वर्कशॉपमधे काम करून उत्पादनं तयार करणं या जर्मन विचारावर ही संस्था आधारली. विद्यार्थी अवस्थेतच विद्यार्थ्यानं हातपाय पसरायला पुरेल इतक्या जागेतही उत्पादनाचं डिझाईन आणि प्रोटोटाईप करायला विश्वशाळा प्रोत्साहन देते. या उद्योगामधे पैसे घालायला उद्योगपती तयार होतात. म्हणजे विश्वशाळा, संशोधक आणि उद्योगक अशांची साखळी तयार होते.
एमआयटीमधे १० हजार विद्यार्थी आणि १ हजार शिक्षक आहेत. विद्यार्थी शिक्षक प्रमाण १०:१. आजवर ५० नोबेल पारितोषिक विजेत या संस्थेमधून बाहेर तरी पडलेत किवा त्यांनी या संस्थेत शिकवलय. या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी २५,८०० उत्पादक संस्था काढल्यात. त्यात ३० लाख लोकाना रोजगार मिळालाय. या संस्थांचं एकत्र उत्पन्न १.९ लाख ट्रिलियन डॉलर आहे.  या विद्यार्थ्यांनी काढलेल्या उद्योगांचा एकादा भौगोलिक देश असता तर उत्पादनाच्या हिशोबात तो जगात अकराव्या क्रमांकावर असता.
व्यंकटरमण ओहायोत, येलमधे, ब्रुकलीनमधे संशोधन करू शकले कारण असं संशोधन करण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुंतवणूक अमेरिका करू शकतं. गुंतवणूक करण्यासाठी लागणारा बख्खळ पैसा अमेरिका मिळवतं. पैसा कसा मिळवायचा याचं गणित त्याना सापडलंय. हे गणित सतराव्या शतकाच्या सुरवातीला ब्रीटन आणि युरोपमधे तयार झालं. तिथं औद्योगीक क्रांती झाली. सार्वत्रिक शिक्षण आणि उपयुक्त ज्ञानावर आधारलेलं संशोधन हा ब्रिटीश-युरोपीय विकासाचा पाया होता. फालतू संशोधन करून पीएचड्यांचा कारखाना काढण्याला तिथं किमत नाही. माणसाचं जगणं समृद्ध करणाऱ्या वस्तू व प्रक्रियांचं संशोधन करणाऱ्या संशोधनाला तिथं किमत दिली जाते. संशोधन, उत्पादन आणि समृद्धी. ब्रीटनमधे तयार झालेलं ते गणीत नंतर अमेरिकेत गेलं.
व्यंकटरमण, रामन, खुराणा हे भारतात जन्मतात. पण त्यांच्या डोक्याचा आणि क्षमतांचा उपयोग करण्याची क्षमता अमेरिकेनं अंगीकृत केली आहे. 
ती क्षमता भारतात कशी तयार होईल?

महाराष्ट्रात गायबैल मारण्यावर बंदी

महाराष्ट्रात गायबैल मारण्यावर बंदी

  महाराष्ट्रात गायीबैल मारण्याला बंदी करणारा कायदा झालाय. गायीबैलांचं मांस खाणं हा गुन्हा ठरला आहे.
भारतात हिंदूना गायी प्रिय आहेत. गायींना धर्मात देवतेचं स्थान आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात असं हिंदू मानतात. महाभारतात, पुरातन सािहत्यात गायींचे अनंत उल्लेख आहेत. 
मागं जाऊन कल्पना करा. उद्योग नव्हते. आजच्या तुलनेत अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक पातळीवरच्या गोष्टी मिळवत माणूस जगत होता.  गाय दूध देई, दुधापासून तयार होणाऱ्या गोष्टी माणसाला मिळत.  गायी आणि बैलांना गाय जन्म देई. बैल शेतीच्या कामात उपयोगी पडत.  अन्न निर्मितीत बैलाचा वाटा  मोठा. गायीचं शेण, गोमुत्र यांचाही वापर केला जाई. गायीचं वर्णन गोधन अशा शब्दात केलं जाई. बक्षीस म्हणून गाई द्यायच्या, शिक्षा झाली तर दंड म्हणून गाई द्यायच्या, राजानं दुसऱ्या देशावर आक्रमण करून तिथल्या गायी पळवायच्या, राजांनी आपापल्या राज्यातल्या गायींचं रक्षण करायचं. गाय हे चलन होतं, संपत्ती होती. खरं म्हणजे म्हणूनच ती महत्वाची होती.
जग बदललं. बैलांच्या जागी शेती करण्यासाठी यंत्रं आली. शेणखताची जागा रासायनिक व इतर खतांनी घेतली. गोवऱ्यांची जागा कोळसा केरोसीननं घेतली. दूध देणाऱ्या गायींची जागा दूध देणाऱ्या म्हशींनी घेतली. माणसाचं एकूणच जीवन इतकं बदललं की गाय आणि गोवंश यांचा वापर, स्थान मर्यादित झालं. 
एके काळी भारतात सर्रास गोमांस खाल्लं जात असे. मुसलमान किवा ख्रिस्ती धर्म जन्मायच्या किती तरी आधी. वेदांमधे तसे उल्लेख आहेत. ज्याला हिंदू धर्म असं म्हणतात ती घटना घडलेली नसतांनाची ही गोष्ट आहे. कधी तरी हिंदू ( म्हणजे हिंदू या व्यापक चौकटीत असणारे संप्रदाय, पंथ इ.) लोकांनी ठरवलं की गाईबैलांचं मांस खायचं नाही. एकादी गोष्ट करावी किवा करू नये असं सांगताना ती देवाच्या नावावर खपवण्याची पद्धत भारतात आणि जगात आहे. त्यामुळं गाय ही देवता करून गायीचं मांस वर्ज्य करण्यात आलं.
आज भारतात कित्येक म्हणजे कित्येक हिंदू गोमांस खातात. नेपाळ या हिंदू देशात सर्रास गोमांस खाल्लं जातं. कित्येक हिंदू गोमांस खात नाहीत, केवळ सवयीमुळं. परंतू गोमांस खाण्याला त्यांचा विरोध नाही. गोमांस हे इतर कुठल्याही प्राण्याच्या मांसाप्रमाणंच आहे असं त्यांचं म्हणणं असतं. चिकन खातो, बोकड खातो, मासे खातो, ससे खातो, तितर खातो, डुक्कर खातो मग गाईबैलांचं मांस खाण्यात काहीही वावगं नाही असं त्यांचं मत आहे. अर्थात गोमांस खाल्लंच पाहिजे असा त्यांचा आग्रह नाही. कुठलं मांस खायचं आणि कुठलं नाही, की कुठलंच मांस खायचं नाही हे ज्यानं त्यान ठरवायचं असं फार म्हणजे फार हिंदू लोकांचं मत आहे.
गायी भाकड होत. शेतकरी तरीही गायीचं पालन करत. एकाद दोन गायी पाळणं शेतकऱ्याला जड जात नसे. काहीच नाही तरी शेणमूत तर मिळतंच असे. सामान्यतः गाय भाकड झाल्यानंतर तिला मारून तिचं मांस खाण्याचा प्रश्न  भारतात आला नाही कारण हिंदूंच्या लेखी गाय पवित्र होती. अत्यंत भीषण दुष्काळात लोकांनी गायी मारून खाल्याचे उल्लेख सापडत नाहीत. चीनमधे दुष्काळांच्या नोंदी आहेत, त्यामधे गावातले यच्चयावत प्राणी मारून खाल्ल्याची नोंद आहे. गावात हाल चाल करू शकणारा एकही प्राणी, पक्षी शिल्लक रहात नसे. अगतीकतेतून घडणारी घटना. भारतात अर्वाचिन काळात तसं घडल्याची नोंद नाही. कारण गाय हा नुसता पशू नसून ते एक धार्मिक प्रतिक आहे.
इतर देशांत, इतर समाजांत, इतर धर्मियांत  गाय पवित्र नसल्यानं गोमांस खायची पद्धत आहे. कोंबडी, मासे, ससे, हरणं इत्यादींसारखंच गाय-बैसाचं मांस. इस्लामी माणसं डुकराचं मांस खात नाहीत. कारण त्यांच्या लेखी डुक्कर हे धार्मिक प्रतीक आहे. सीरियातले अलवाईट सशाचं मांस खात नाहीत.
  गोमांस खायला परवानगी असणारी   माणसं भारतात आली आणि गोची झाली. ख्रिस्ती आणि मुसलमान.  गोमांस खाल्लंच पाहिजे असा आग्रह त्यांच्या धर्मानं धरलेला नाही. गोमांस हा त्यांच्या आहाराचा भाग झाला आहे.  त्यामुळं गोमांस तयार करणारा उद्योग भारतात तयार झाला.
गोमांस तयार करणं आणि खाणं यावर बंदी घालण्याचा अर्थ या देशातले जे नागरीक गोमांस खाऊ इच्छितात किंवा उद्योग म्हणून गोमांस तयार करतात त्यांचं स्वातंत्र्य आणि जगणं हिरावून घेणं.  अनेक   हिंदूना त्यांची पवित्र गाय मारली जाणं आणि खाणं (जे कधी काळी या देशात घडत असे) आज पसंत नाही. हे खरं असलं तरी गोवंशातल्या प्राण्यांच्या हत्त्येवर बंदी घालायची मागणी सर्वच हिंदू करत नाहीत. काही गांधीवादी संस्था आणि सामान्यतः संघाच्या परिघात वाढलेले राजकीय हिंदू यांचीच ही मागणी आहे असं दिसतंय. बाकीच्या हिंदूंना बंदी घालावी असं वाटत नाही आणि समजा बंदी घातली तरी ते अहमहमिकेनं या बंदीला विरोध करतील असंही नाही. साधारणपणे असं म्हणता येईल की बंदी आणि बंदीला विरोध या दोन्ही गोष्टी राजकारणी लोकांच्या आहेत, सामान्य हिंदू माणसांच्या भावना या प्रकरणी तीव्र आहेत असं वाटत नाही. राजकीय हिंदूंची  भावना महाराष्ट्रात कायद्यात रूपांतरीत झाली असून गोवध बंदी लागू करण्यात आली आहे. बाय द वे भारतात ब्रिटीशांना घालवण्याचा, राजकीय स्वातंत्र्याचा विचार सुरु झाला त्या वेळी या देशात राजकीय हिंदूत्व असा एक पंथ तयार झाला. 
जैनांना तर कोणताच प्राणी मारावासा वाटत नाही. तत्वतः ते कुठलंही मांस खात नाहीत. उद्या समजा एकाद्या भूगोलात जैनांची बहुसंख्या झाली तर तिथं असणाऱ्या इतर समाजांना कोणतंही मांस खायला बंदी केली जाऊ शकते किंवा मांस निर्मितीचे उद्योग बंद केले जाऊ शकतात. इस्लामी बहुसंख्य असणाऱ्या देशात तंबाखू आणि अल्कोहोलच्या निर्मितीवर आणि वापरावर बंदी आहे. 
बंदी हे प्रकरणं वांध्याचं असतं. ज्या गोष्टीसाठी बंदी घालायची असते ती गोष्ट बंदीनंतर साध्य होईल याची खात्री नसते, किंबहुना ती गोष्ट साध्य होत नाही. दारुबंदी करून लोकांचं दारू पिणं थांबवता येत नाही. बंदी घातली तर दारू अधिक वाढते, काळाबाजार सुरु होतो. अमेरिकेत  काही काळ दारुबंदी होती. वाट लागली. दारु पिण्यानं विकृत वळण घेतलं. काळा बाजार प्रचंड झाला. अनंत पुढारी या काळ्याबाजारातल्या पैशावर अमेरिकन संसदांत निवडून जाऊ लागले. शेवटी बंदीचं खूळ सरकारला सोडावं लागलं.  गांधीजींचा दारूवर राग होता त्या खातर गुजरातेत दारूबंदी लागू करण्यात आली. गुजरातेत माणसं दणादण दारू पितात, प्रचंड प्रमाणावर दारू खपते. सर्वांना हे माहित आहे, पोलिसांनाही याची सवय झालेली आहे. कुठलीही दारू गुजरातेत मिळते. फक्त चोरून. पकडलं गेलं तर लाच दिली की भागतं.
भारतात नाना धर्माची, संस्कारांची माणसं आहेत. अशा परिस्थितीत एकाद्या मोठ्या जनसमूहाचं जगणं ढवळून काढणारे कायदे करणं कितपत व्यवहार्य ठरेल?  
  गाय आणि बैल. माणसाच्या जगण्याचा ते एक भाग असतात, माणसं त्यांच्यात भावनेनं गुंतलेली असतात. त्यामुळं गायींना मारायला शेतकरी मनानं तयार नसतो.  गाय पाळणं जड जातं तेव्हां दुःखानं, नाईलाजानं काही हिंदू गायी खाटकाला विकतात.पण काही हिंदू मरेपर्यंत गायींचं पालन करतात हेही खरं आहे.
इथुन पुढल्या जगात नाना सांस्कृतीक, धार्मिक सवयींची माणसं देशांच्या चौकटीत एकत्र होणार आहेत. शहर, जिल्हा, देश अशा भूगोलात आता फार वेगवेगळ्या प्रकारची माणसं रहाणार आहेत. धर्म, जाती, भाषा, संस्कृती, खानपान, कपडेलत्ते, नटणंथटणं, खिसे. देश कायद्यानं चालतात. कायदा लोकशाहीत बहुसंख्य माणसांचे प्रतिनिधी ठरवतात. पण बहुसंख्य म्हणजे कोण? इथून पुढं धर्म, भाषा, रंग, संस्कृती, मुळ देश इत्यादी कसोट्या लावल्यावर प्रत्येक स्वतंत्र कसोटीवर स्वतंत्र बहुसंख्य होणार आहेत. अमेरिकेत गोरे पन्नास टक्केपेक्षा कमी होतील; काळे-सावळे-पिवळे मिळून बहुसंख्य होतील. पण कुठल्याही एकाच रंगाची संख्या मोजायची झाली तर पांढरे, काळे, सावळे, पिवळे इत्यादी दहा वीस टक्के होतील. एकादा पंचवीस टक्के तर एकादा पस्तीस टक्के. पन्नास टक्केपेक्षा जास्त कोणीच असणार नाही. हेच धर्माच्या बाबतीत होणार आहे. भाषेच्या हिशोबात स्पॅनिश भाषा बोलणारे बहुसंख्य होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचं उदाहरण केवळ प्रातिनिधिक आहे. जिथं जिथं रोजगार विपुल असतील तिथं तिथं जगभरची माणसं गोळा होतील आणि जे अमेरिकेत होतंय ते साऱ्या जगात होईल.  
  लोकशाहीमधे लोक भाषा,संस्कृती,धर्म यासाठी मतदान करण्याची शक्यता कमी आहे. आर्थिक सुख, सुरक्षा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यासाठी मतदान होईल. या गोष्टी साध्य व्हाव्यात यासाठी कायदे होतील. तेव्हां भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी साऱ्या गोष्टींचा विचार अमळ कमी तीव्रतेनंच करावा लागेल. बहुदा त्या गोष्टी दुय्यम ठरतील. भाषा, संस्कृती, धर्म या गोष्टीही त्यामुळं नव्यानंच परिभाषित होतील. 
हिंदूंना गोवंश इत्यादीं बाबींचा विचार बंदीच्या हिशोबात करून चालणार नाही. मुसलमानांना गाईचं मांस खाणं जितकं आहाराचा भाग आहे तितकंच डुकराचं मांस खाणंही आहाराचा भाग आहे, त्यात धर्म आणण्याचं कारण नाही असा विचार करावा लागेल.
अगदी अलीकडचीच एक गोष्ट. 
उंटांची.
ऑस्ट्रेलियन सरकार सध्या उंटांची कत्तल करतय. तिथं सुमारे १६ लाख उंट आहेत. अठराव्या शतकात ब्रिटीशांनी ऑस्ट्रेलियाचा विकास करायला घेतला तेव्हां सामान वाहून नेण्यासाठी भारतातून   उंट नेले. कालमानानुसार उंटांची प्रजा वाढत गेली. कालांतरानं रस्ते सुधारले, रेलवे झाली, गाडी आणि ट्रकनं वाहतूक होऊ लागली. उंटांचा उपयोग होईनासा झाला. झाडंच्या झाडं नाहिशी करतात. उंट वाळवंटांतल्या वनस्पती फस्त करत असल्यानं वाळवंटांची संख्या आणि व्याप्ती वाढते. उंटांमुळं रोगही पसरतात. तेव्हा एकूणातच ते त्रासदायक आहेत हे ठरल्यावर ऑस्ट्रेलियानं ऊंट गोळा करून त्याना गोळ्या घालायला सुरवात केली.
कतारमधल्या अली सुलतान अल हाजरी या अरब माणसानं ऑस्ट्रेलियातली उंटांची कत्तल पाहिली. हेलेकॉप्टरमधून उंटांचा पाठलाग, त्यांना पळवत एकाद्या ठिकाणी नेणं आणि पाठलाग करणाऱ्या  जीपमधून त्यांना गोळ्या घालून मारणं. अली सुलतान दुःखी झाला. वाळवंटांत वाढलेल्या अलीनं वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत उंट वाढवले होते. त्याचं उंटावर प्रेम होतं. 
वाळवंटी प्रदेशात ऊंट म्हणजे देवच असतो. वाळवंटातली काटेरी झुडुपं खाऊन तो रहातो. एकदा प्यालेलं पाणी त्याला कित्येक दिवस पुरतं. त्याची कातडी त्याचं थंडी आणि ऊष्म्यापासून रक्षण करते. वाळूतून पळता यावं अशी पायाची रचना. कुराणात म्हटलंय ‘ पहा देवानं कशी उंटाची निर्मिती केलीय, किती उपकारक प्राणी.’ कित्येक अरब टोळ्यांमधे उंटाला सांस्कृतीक-धार्मिक स्थान आहे. उंटाचं दूध प्यालं जातं. उंटाची कातडी कपडे करण्यासाठी वापरली जाते. उंटाचं मूत्र औषध म्हणून वापरलं जातं. म्हणजे अगदी गायच.
तर अली सुलतान दुःखी झाला. तो ऑस्ट्रेलियात गेला. तिथल्या खासदार, मंत्र्यांना भेटला. ऊंट मारण्याचा कार्यक्रम त्यानं समजून घेतला. एकदा उंट मारले जातानाही त्यानं पाहिलं. दुःखी झाला. एकीकडं उंट हा केवळ एक उपयुक्त पण निरुपयोगी प्राणी मानणारे ऑस्ट्रेलियन आणि दुसरीकडं उंटावर प्रेम असणारा, उंटाला जवळ जवळ धार्मिक मानणारा अरब.
अली सुलताननं ऑस्ट्रेलियन सरकारला ऑफर दिली. ‘ आपण सर्वच्या सर्व उंट विकत घ्यायला तयार आहोत. त्यासाठी एकादा मोठ्ठा हजारो एकरांचा प्रदेशही घ्यायला तयार आहोत, विकत किंवा भाडेपट्टयानं. आपण उंटांचं पालन करू. त्याच्यामुळं पर्यावरणारी हानी होणार नाही, रोगराई पसरणार नाही याची काळजी घेऊ. उंट गोठ्यात पाळू. दूध, कातडी, मांस  इत्यादी उत्पादनं मिळवू आणि बाजारात विकू. उंट मारावे लागतील अशी स्थिती येईल त्या वेळी वैज्ञानिक शिस्त पाळून आरोग्यकारक पद्दतीनं त्याला मारू आणि त्याचं मांस इत्यादी उपयोगात आणू. हे सारं आपण उंटावर प्रेम असल्यानं करणार आहोत. ‘ 
प्रेम व्यक्त करण्याचा हा कतारी मार्ग. त्यात व्यवसाय आहे, व्यवहार आहे आणि प्रेमही आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचंही भलं आहे.
कतार, सौदी, बहारीन इत्यादी कुठं उंट मारण्याचा उद्योग असल्याचं ऐकिवात नाही. उंटांना पोसण्याचाही उद्योग ऐकिवात नाही. उंटांची ही एक नवीच व्यवस्था, नवाच उद्योग दिसतोय. 
अली सुलतानच्या ऑफरवर ऑस्ट्रेलियन सरकार विचार करत आहे.
।।

धर्मातून बाहेर पडण्याची सोय

धर्मातून बाहेर पडण्याची सोय

” आपल्या ब्लॉगवरची २४ डिसेंबर २०१४ ची ‘धर्माचा दरवाजा’ नावाची post वाचली. मला एक प्रश्न बरीच वर्षे सतावतो आहे. जर एखाद्या माणसाला कुठल्याच धर्माचे label नको असेल, तर अशी काय सोय आहे की तो माणूस त्याला जन्माने मिळालेल्या धर्मातून बाहेर पडेल आणि त्यासाठी त्याला दुसरा कोणताही धर्म स्वीकारायला लागणार नाही…?? उदाहरणार्थ: हिंदू कुटुंबात जन्मलेला माणूस हिंदू असतो. त्याला स्वत: विचार करता यायला लागला आणि तो मनाने संपूर्ण नास्तिक झाला. तर अशा वेळी त्याला धर्मात राहून धर्म न पाळणे असा पर्याय असतोच, परंतु जर त्याला हिंदू धर्म सोडायचा असेल तर कायदेशीर प्रक्रिया काही अस्तित्वात आहे का? मला ह्याचे उत्तर जाणून घेण्यात रस आहे.”
खरं म्हणजे कोणीही माणूस कुठल्याही धर्माच्या बाहेर पडू शकतो. एकाद्या धर्मात माणूस असतो तो केवळ त्याचा जन्म विशिष्ट धर्म मानणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्मल्यामुळं आणि नंतर बालपणात आईबाप व सभोवतालचा समाज यानं तो धर्मात रहावा याची व्यवस्था केल्यानं. धर्म ही गोष्ट एका परीनं लादली गेलेली असते, एका परीनं ऐच्छिक असते. त्यामुळं माणूस केव्हांही धर्माच्या बाहेर पडू शकतो. एकाद्या संस्थेचं सदस्य असणं, एकाद्या देशाचा नागरीक असणं इत्यादी गोष्टी काही कायदेशीर तरतुदीनं होतात, काही अटी मान्य केल्यावर होतात. तसं धर्माच्या बाबतीत नाही.
धर्मातून धर्माबाहेर पडण्याची अडचण तेव्हांच येते जेव्हां धर्मात रहाण्याच्या फायद्याला मुकावं लागतं किंवा धर्म सोडला तर समाजानं लादलेल्या शिक्षेमुळं. ख्रिस्ती धर्मात राहिलात तर ख्रिस्ती देव तुम्हाला स्वर्गात जाऊ देतो. ख्रिस्ती देवाचा स्वर्ग. ख्रिस्ती देवाचं ऐकलं नाहीत तर तुमचं अकल्याण होतं, नर्कातही जावं लागतं. ही अडचण.   स्वर्ग आणि नर्कावर विश्वास असणारी माणसं तो धर्म सोडून जाणार नाहीत. दुसरा एकादा धर्म स्वर्गाची खात्री देत असेल तर त्या धर्मात जायला ख्रिस्ती माणूस मोकळा असतो. अनेक ख्रिस्ती धर्म बदलतातही.  दुसऱ्या धर्माची खात्री नसेल,  ख्रिस्ती धर्म सोडला तरी देवाचं आपल्यावर लक्ष राहील आणि तो आपलं काही बरं वाईट करेल अशी एक सूप्त भिती मनात राहिल्यानं   ख्रिस्ती माणूस  धर्म सोडायला तयार होत नाही. सॅम हॅरिस, रिचर्ड डॉकिन्स इत्यादी कित्येक म्हणजे कित्येक माणसं ख्रिस्ती धर्म आरामात सोडून गेली आहेत, सुखानं जगत आहेत. त्याना नर्क-स्वर्गाची भीती नाही.
इस्लाममधली पंचाईत अधिक गडद आहे. इस्लामी समाजात वावरणाऱ्यानं इस्लाम सोडला तर तो नरकात जातोच पण याच जन्मात त्याला त्रास असतो. शरीयानुसार त्याला ठार मारलं जाऊ शकतं.  थेट नरकातच प्रवेश.  त्याला कोणत्याही स्मशानात पुरु देत नाहीत, त्याला वाळीत टाकतात. प्रेत सडत राहिलं तर सर्वांचीच पंचाईत.  इस्लामचा देव हा एकच देव आणि महंमद हा त्याचा शेवटला प्रेषित असं म्हटलंत की मामला संपला. इतर देव, इतर धर्म, इतर प्रेषित वगैरेंना मान्यताच नाही. धर्म सोडण्याची वाटच इस्लामनं बंद केली आहे. अरबस्तानात एकच धर्म शिल्लक राहिला पाहिजे अशी महंमदांची मागणी होती. त्यावरून काय ते समजा.  यात एक बारीकसा घोळ आहे. पूर्णपणे इस्लामी समाजात, म्हणजे समजा सौदी अरेबियात किंवा इजिप्तमधे मुसलमान रहात असेल तर धर्म बदल म्हणजे मरण असतं. परंतू जो समाज इस्लामी नाही, भारत-अमेरिका-फ्रान्स-युके इ.- अशा ठिकाणी मात्र मरणाची शिक्षा नाही. अर्थात तशी शिक्षा देता येत नाही कारण त्या देशांचे स्वतंत्र कायदे आहेत, तिथं तथाकथित इस्लामी कायदा चालत नाही. त्यातही आणखी एक छोटीशी गोची आहेच. भारतात सैयदना यांच्या पंथातल्या लोकांनी सैयदनांची आज्ञा पाळली नाही तर सैयदनांचे लोक त्या माणासाला वाळीत टाकतात, त्यांचं प्रेत पुरु देत नाहीत. खरं म्हणजे भारत सरकारनं सैदयदनांचं हे वर्तन बेकायदेशीर ठरवलं पाहिजे, सैयदनांचं न ऐकणाऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना भारतीय कायद्यात बांधलं पाहिजे. असो.
हिंदू धर्माची गोष्ट वेगळी आहे. तो धर्मही आहे आणि नाहीही.   हिंदूंचे देव तुम्ही मानले तरी चालतं, नाही मानलेत तरी चालतं. बरं देव मानण्यातही बरेच घोळ आहेत. प्रार्थना, देवाला काही देणं, पूजा, मूर्तीची पूजा इत्यादी गोष्टी नाही केल्यात तरी चालतं आणि चोविस तास तेच करत राहिलात तरी चालतं. दिवसभर घंटा बडवत राहिलात, माळ जपत राहिलात, नामस्मरण करत राहिलात तरी चालतं, मनातल्या मनात ते सारं केलंत तरी चालतं आणि ते नाही केलंत तरी चालतं.  देव नाही मानलात तरी चालतं.  थोडक्यात तुम्ही कसंही वागा, हिंदू धर्म तुम्हाला सोडत नाही. 
पाप आणि पुण्य हिंदू धर्मातही आहेत. स्वर्ग आणि नरकही आहे. पाप आणि पुण्य देवाच्या वतीनं कोणी तरी सांगतो आणि ते तुम्हाला ऐकावं लागतं. पण ते न ऐकलं तरी चालतं. सामान्यतः हिंदू धर्माच्या सांगण्यानुसार तुम्ही वागला नाहीत तर तुम्हाला कोणी मारत नाही. तसे उद्योग करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे कोणी तो उद्योग करतात ते गुंड आहेत असं म्हणता येईल.  आज अमूकच देवाची पुजा करा, अमूक खा, तमूक खाऊ नका, तमूक पिऊ नका, वाढ दिवस अशाच रीतीनं साजरा करा, अमुकच कपडे वापरा इत्यादी सांगणारे आणि त्याची दादागिरी करणारे लोक व संघटना आहेत. या संघटनेची माणसं वेगळा विचार करणाऱ्यांना मारून टाकतात.  अशी माणसं चार पाच हजार वर्षात वेळोवेळी होऊन गेली आहेत. शैव वैष्णव मारामाऱ्या झाल्या, जैन विरूद्ध इतर अशाही मारामाऱ्या झाल्या.  परंतू सामान्यतः वरील दादागिरीचं वर्तन हा हिंदू समाजात नियम नाही, तो अपवाद आहे, कधी कधी उबळ आल्यागत समाज तसा वागतो आणि कालांतरानं पुन्हा सामान्य होतो. 
आणखी एक. धर्माची व्याख्या कर्तव्य अशीही आहे. राजाचा धर्म, बापाचा धर्म, पतीचा धर्म, विंचवाचा धर्म अशाही धर्माच्या व्याख्या केल्या जातात.
 भारतीय माणूस, हिंदू माणूस हा धर्म मानतो की नाही अशी शंका यावी असंच त्याचं वर्तन पूर्वापारपासून दिसतंय. देवानं समानता सांगितली माणूस जातीच्या नावावर विषमता आणि अन्याय करतो. प्राणीमात्रही आपल्या जगण्याचे भाग आहेत असं देव सांगतो आणि भारतीय माणसं नागरिकांना छळतात, त्याना मारतात. भारतातली माणसं खून करतात, बलात्कार करतात, बँका लुटतात, दरोडे घालतात, नशापाणी करतात, कायदे मोडतात, त्या वेळी त्याना देव दिसत नाही, आठवत नाही. काय मजा आहे पहा. भारतात देवळाचे कळस माणसं चोरून नेतात, कळसाचं सोनं वितळवतात, ते विकतात. कळस चोरतांना चोराला देवाचा ना धाक असतो ना आठवण. चोरलेल्या मूर्त्यांचे व्यापार करणारे समाजातले प्रतिष्ठित लोक त्या चोरीच्या पैशावर नवी मंदिरं बाधतात, देवाला पुन्हा दागिने अर्पण करतात. कधी कधी वाटतं की भारतीय हिंदू माणसा इतका नास्तिक माणूस जगात नाही. राजकीय पक्षाचे पुढारी खून मारामाऱ्या करतात, लुटालूट करतात आणि सगळे एकामागाएक देवालयात जाऊन देवाच्या पाया पडतात, देवाला सांगतात की आपल्याला निवडून दे, मंत्री कर. देव काय करतो? माहीत नाही. पण सगळी माणसं निवडून येऊन आळीपाळीनं लुटालूट करतात, अनैतिक वर्तन करतात.
तेव्हां हिंदू माणसाला धर्म सोडायला काहीच त्रास नाही.
  धर्माच्या नावानंच राज्य चालत होतं तेव्हां धर्म ही गोष्ट जगण्याची एक अट होती. पंधराव्या शतकापासून राज्याचं रूप बदलत गेलं, धर्म ही गोष्ट सावकाशीनं खाजगी होत गेली, ती जगण्याची एकमेव अट राहिली नाही. युरोपात आणि नंतर अमेरिकेत.   हा बदल सामान्यः इस्लामेतर समाजांतच घडला. इस्लाम आजही धर्माच्या मर्यादा, धर्मापलिकडं जग असतं हे सत्य समजून घेण्याच्या स्थितीत नाही.  
 धर्मात असणं आणि नसणं या गोष्टी आधुनिक जगात अगदीच व्यक्तीगत आवडी निवडीची गोष्ट आहे. ती जगण्याची पूर्वअट नाही, असू नये. तुम्ही पिझ्झा खाता की बिरयाणी की उकडीचे मोदक यावरून तुमच्या जगण्याचे अधिकार आता ठरत नाहीत. तुमची भाषा कोणती आहे, तुम्ही कोणाच्या पोटी जन्मलात, तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करता की ढोल बडवून प्रार्थना करता यावर तुमच्या जगण्याचे अधिकार आता ठरत नाहीत. माणसानं कसं जगावं, सार्वजनिक जीवनात कसं वागावं याचे जवळपास साऱ्या मानवजातीला लागू होतील असे नियम आता तयार झाले आहेत. जगा, जगू द्या हा आता जगाचा नियम आहे. संघर्ष-तणाव जरूर निर्माण होतात. बहुदा ते आर्थिक हितसंबंध, संस्कृती यातून उद्वभवतात. माणसांनी एकत्र बसून ते सुटतात, त्यासाठी देवाला किंवा देवाच्या वतीनं कोणालाही पाचारण करण्याची आवश्यकता नाही.
तेव्हां  देव आणि धर्मापासून माणूस आता मुक्त आहे. 
तरीही धर्म शिल्लक रहातोय. माणसाच्या काही आदिम गरजा आणि काही आधुनिक गरजांसाठी माणसाला धर्म लागतोच. न सुटलेली कोडी देवाच्या पारड्यात टाकून माणूस मोकळा झाला होता.अजूनही न सुटलेली अनंत कोडी आहेत. विज्ञानाचा प्रसार झाला, माहिती आणि पुरावे मिळाले. परंतू सर्वच गोष्टींचे निर्णय विज्ञानाच्या आधारे घेता येत नाहीत. माणसाचं वागणं आजही समजायला कठीण असतं. या साऱ्या गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात.  आजही शिकले सवरलेले, अगदी डझनभर विज्ञानाच्या पीएचड्या मिळवलेले न सुटलेली कोडी देवाच्या पारड्यात टाकतात. तसंच देशोदेशात पसरलेल्या लोकांचे तंटे अजूनही सुटत नाहीयेत. कायदे, राष्ट्रप्रमुख इत्यादींचं म्हणणं ऐकायला माणसं तयार नाहीयेत. दणकावून हाणामाऱ्या करत आहेत,निष्पाप स्त्रिया आणि मुलांचे बळी घेतले जात आहेत.ही अस्वस्थता देवाच्या खुंटीवर टांगावं असं अनेकांना आजही वाटतं. देवाची खुंटी सोडलेले लोकही खूप म्हणजे खूप आहेत.
तेव्हां न सुटलेली कोडी आणि माणसांचं आपसात न पटणं या दोन गोष्टींसाठी अजून बराच काळ लोक देवाची आठवण काढणार आहेत. म्हणजे कुठल्या तरी स्वरूपात देव आणि धर्माला जपणार आहेत. 
त्यातही गंमत आहे. अनेक म्हणजे फारच अनेक माणसं आता उपासना न करता धर्म पाळतात. इंग्रजीत त्याना नॉन प्रॅक्टिसिंग धार्मिक असं म्हणतात. ते चर्च, मशीद, देवळात जात नाहीत. ते देवाला साकडं घालत नाहीत, देवाला लाच देत नाहीत, देवाची प्रार्थना करत नाहीत. तरीही देव असायला हरकत नाही असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या दैनंदिन जगण्यात देवानं ढवळाढवळ करू नये असा एकतरफी करार ते करून टाकतात, देवाला न विचारता. 
  एकेकाळी उद्योग नव्हते, औद्योगीक उत्पादनं नव्हती, बाजार नव्हता, माणसं पंचक्रोशीत जगत होती. आता जग बदललंय. माणसाच्या जीवनात अनंत नव्या वस्तू, नव्या प्रक्रिया, नव्या संस्था आल्या आहेत. या वस्तू, प्रक्रिया, संस्था चालवण्याचे नियम गेल्या पाच पन्नास वर्षात तयार झाले आहेत. ते नियम तयार करताना माणसानं देवाधर्माला विचारलेलं नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवायला हवीत हा नियम आपण तयार केला कारण कार, शहरं आणि रस्ते या गोष्टी आताशा तयार झाल्या आहेत. त्या बाबत देवाला काहीही माहित नव्हतं, आपण आपल्या माहितीनुसार  नियम केले. असे असंख्य नियम माणसानं तयार केले आहेत. थोडक्यात असं की आता माणसाचं नियंत्रण बाजार, उद्योग, उत्पादन इत्यादी गोष्टी करू लागल्या आहेत. एकेकाळी फक्त देव होता, नंतर राजा आला. आता देवही नाही, राजाही नाही, लोकांनी तयार केलेली विधीमंडळं आहेत, बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, उत्पादक कंपन्या आहेत, विज्ञान आहे, विद्यापीठं आहेत, शाळा आहेत. ही सारी मंडळी आता माणसाचं जगणं ठरवत आहेत.  म्हणजे माणसाचं जीवन नियंत्रित करणाऱ्या धर्माला आता स्पर्धक निर्माण झाले आहेत. देवाला आता बँक चालवणारे, विमा कंपनीवाले, उत्पादन करणारे, वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक, लोक प्रतिनिधी इत्यादींच्या बरोबर बसावं लागतंय. देव एकट्यानं आता काही सांगू शकत नाही, घडवू शकत नाही. या अर्थानं आता माणसानं आधुनिक जीवनात देवाला आणि धर्माला नियंत्रित केलं आहे.
  बिनधास्त देवाला धर्माला सुट्टी द्या. काहीही बिघडत नाही. तो तुमचा अधिकार आहे.  कोणतीही चांगली गोष्ट करा हे सांगण्यासाठी देवाची आणि धर्माची अजिबात म्हणजे अजिबात आवश्यकता नाही. देव नावाची एक कल्पना ही तुमच्या मित्रासारखी आहे असं माना. हा मित्र काय सांगतो ते योग्य वाटल्यास ऐकावं, अयोग्य वाटल्यास त्याला  चुप बस असं सांगावं. देव, धर्म, दोन्ही आपल्या म्हणण्याप्रमाणं वागतील असं पहावं. देव आणि धर्म यांच्या वतीनं कोणी काही सांगत असेल तर ते ऐकण्याचं बंधन मानू नये, त्यानं घाबरून जाऊ नये. देव जर आपला मित्र असेल तर तो नक्कीच आपल्याला नरकाची भीती घालणार नाही. देव जर आपला मित्र असेल तर इतर कोणावरही अत्याचार करायला सांगणार नाही, बलात्कार करायला सांगणार नाही, कोणाची घरं जाळायला सांगणार नाही, कोणा गर्भवतीची पोटं फाडायला सांगणार नाही, कोणावरही तलवार चालवायला सांगणार नाही.
 मोकळे व्हा.  मोकळा श्वास घ्या. कित्येक हजार वर्षात इतका मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली नव्हती.

।।