Browsed by
Month: April 2015

काश्मिरबाबत मोदी सरकारकडं धोरण नाहीये? भाजप काश्मिर सरकारात केवळ सत्ता मिळवण्यासाठी सहभागी झालाय?

काश्मिरबाबत मोदी सरकारकडं धोरण नाहीये? भाजप काश्मिर सरकारात केवळ सत्ता मिळवण्यासाठी सहभागी झालाय?

एनडीटीव्हीवर झालेल्या कार्यक्रमात एक काश्मिरी मुस्लीम तरूण बोलला. तो स्वतःला भारतीय मानत नव्हता. काश्मिर भारताचा भाग नाही, असू नये असं त्याचं मत होतं. भारतानं काश्मिरी लोकांवर कायम अन्यायच केला आहे, त्यांना दुराव्यानं वागवलं आहे असं त्याचं म्हणणं होतं.
काश्मिरात झालेल्या उद्रेकाच्या पाठपडद्यावर हा कार्यक्रम झाला होता. पहिल्या प्रथमच काश्मिरी लोकांनी पाकिस्तानी झेंडे जाहीरपणे फडकावले होते. मसरत आलम नावाच्या एका फुटीर-पाकिस्तान धार्जिण्या माणसाला काश्मिर कोर्टानं तुरुगांतून सोडण्याच्या घटनेनं काश्मिरातल्या असंतोषाला सुरवात झाली. काश्मिर आणि भारत सरकारचं म्हणणं असं की मसरतला कोर्टानं सोडलेलं असल्यानं सरकारचा त्या निर्णयाशी संबंध नाही. 
काश्मिरात पीडीपी आणि भाजप यांचं संयुक्त सरकार आहे. दोन्ही पक्ष घडत असलेल्या घटनांपासून स्वतःला मोकळं करू पहात आहेत. मसरत आलम कोर्टाच्या आदेशानुसार सुटला, असं दोन्ही पक्ष म्हणतात. ‘ देशद्रोह्यांना सोडणार नाही, कडक कारवाई केली जाईल ’ असं दोन्ही पक्षाचे लोक म्हणतात.
काश्मिरात फुटीर आणि पाकिस्तान धार्जिणे लोक उद्योग करत असतात आणि त्यांना कोणीही आवरू शकलेलं नाही, गेल्या कित्येक वर्षात, ही वस्तुस्थिती आहे. पीडीपी आणि भाजप त्याला अपवाद नाहीत.
पाकचे झेंडे नाचवणं ही घटना काश्मिरात अपेक्षित होती. गेली िकत्येक वर्षं काश्मिरात जेकेएलएफ आणि हुरियत कॉन्फरन्स या संघटना सक्रीय आहेत. या संघटना दोन  मुद््यांवर घोटाळत असतात. काश्मिर एक स्वतंत्र देश करणं, काश्मिर पाकिस्तानात सामिल करणं. काश्मिरात सार्वमत घेऊन   निर्णय घ्यावा असा त्यांचा आग्रह असतो. या मंडळींना पाकिस्तानातून मदत मिळत असते. १९७९ च्या सुमाराला अफगाणिस्तानातल्या रशियनांना घालवण्यासाठी झिया उल हक यांना अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी शस्त्रं आणि पैसे दिले. झिया यांनी लश्करे तय्यबा सारख्या जिहादी टोळ्या निर्माण केल्या आणि त्यांना पैसे व शस्त्रं दिली. अशा संघटनाना नॉन स्टेट संघटना म्हणतात. म्हणजे जे काम सरकारी संस्था-पोलिस-लष्कराला करता येत नाही ते अशा खाजगी संस्थांकडून करून घ्यायचं.  या संघटनांना अनौरस संघटना म्हणूया. या टोळ्या झियानं भारतात, काश्मिरात दहशतवाद पसरवण्यासाठी वापरल्या. तिथून काश्मिरातलं वातावरण आणखी बिघडत गेलं.
फाळणीच्या वेळी काश्मिरचा घोळ झाला. काश्मिरातली प्रजा मुसलमान आणि राजा हिंदू.  मुसलमान प्रजा पाकिस्तानात सामिल झाली पाहिजे अशी पाकिस्तानची भूमिका. काश्मिरतर्फे करार कोण करू शकणार? अर्थातच काश्मिरचा राजा.   तो जाम घोळ घालू लागला, त्याचा निर्णय होईना. तेवढ्या वेळात पाकिस्ताननं अफगाण भाडोत्री काश्मिरमधे धाडले. लुटालूट, बलात्कार करत अफगाण श्रीनगरच्या दिशेनं निघाले. ही वार्ता कळल्यावर सरदार पटेलांनी पटकन विमानानं सैन्य श्रीनगरला उतरवलं आणि अफगाणांना रोखलं. इथं काश्मिरची विभागणी झाली. अफगाणांनी ताबा घेतला होता तो झाला पाकव्याप्त काश्मिर आणि उरलेला झाला भारतव्याप्त काश्मिर. 
पाकिस्तानच्या दबावाखाली नेहरूनी युनायटेड नेशन्सला मध्यस्थ केलं.  सार्वमत घेऊन प्रश्न सोडवा असं युनोनं सांगितलं. ते कधीच घडलं  नाही.नंतर यथावकाश काश्मिर भारताचा भाग झाला. भारतीय कायदा, न्यायव्यवस्था, पोलिस, अर्थव्यवस्था, निवडणुक व्यवस्था इत्यादि गोष्टी काश्मिरात स्थिर झाल्या. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार  काश्मिरात निवडणुका होत राहिल्या. काश्मिर हा भारताचा भाग झाला.
समांतर पातळीवर एक गोष्ट पाकिस्तानात घडत होती. पाकिस्तान घडत असताना, फाळणी होत असताना बलुचिस्ताननं पाकिस्तानात सामिल व्हायला नकार दिला. बलुचिस्तान हा प्रांत ब्रिटिशांशी झालेल्या स्वतंत्र करारानुसार तत्कालीन इंडियात सामिल झाला होता.  इंडियाची विभागणी झाल्यावर आपण भारतात जायचं की पाकिस्तानात की स्वतंत्र याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य बलुचिस्तानला होतं. पाकिस्तान तयार झालं त्या दिवशी बलुचिस्तान स्वतंत्र होता. बलुचिस्तानला पाकिस्तानात जायची इच्छा नव्हती. जिन्नांनी बलुची पुढाऱ्यांना घोळात घेतलं. तुम्हाला स्वातंत्र्य, ऑटॉनॉमी वगैरे देऊ, त्या बद्दल नंतर ठरवू आत्ता सामिल व्हा अशी गळ घातली. बलुच पुढारी अनिर्णित अवस्थेत असताना जिन्नांनी सैन्य घुसवून बलुचिस्तानचा ताबा घेतला. बलुची माणसं अजूनही   स्वतंत्र होण्याची आस बाळगून असतात. ती  बंडाळ्या करतात, उठाव करतात.  पाकिस्तानी सैन्य बंडाळ्या चेपून काढतं. बलुचींनी स्वातंत्र्य मागणं म्हणजे देशद्रोह आहे असं पाकिस्तान म्हणतं.
जे काही घडायचं ते घडलं आणि बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग झाला. जसा काश्मिर हा भारताचा भाग झाला. बलुचींचं बंड ज्या न्यायानं पाकिस्तान सहन करत नाही त्याच न्यायानं पाकिस्तानी होण्याचे प्रयत्न भारत सहन करत नाही.
 बलुची लोकांची स्वतंत्र संस्कृती, भाषा आहे. पण त्यांना पाकिस्तानात राहूनच आपलं अस्तित्व टिकवावं लागेल. काश्मिरी लोकांना स्वतंत्र संस्कृती, अस्मिता आहे. तशीच ती भारतातल्या कित्येक राज्यांना, भाषकांना आहे. बिहार, आसाम, ओदिसा, तेलंगणा असे कित्येक प्रदेश मागास आहेत. या व अशा कित्येक भागांना स्वतःच्या अस्मिता आणि आर्थिक प्रश्न आहेत.  हे प्रश्न आपल्याला आपसात बसून सोडवायचे आहेत, बाहेर पडणं इत्यादी गोष्टी होणार नाहीत असं भारत सरकारचं धोरण असायला हवं होतं.भारतातल्या सर्व लोकांनी भारत या देशात राहून आपापले असंतोष कायदेशीर मार्गानं दूर करत, स्वतःची अस्मिता टिकवत वाढायचं आहे.
दुर्दैवानं ही गोष्ट भारत सरकार, भारतातले राजकीय पक्ष मनात घ्यायला तयार नाहीत. काश्मिर हा भारताचाच भाग आहे, यावर आता  चर्चा नाही असं केव्हांच भारतानं जगाला आणि पाकिस्तानला सांगायला हवं होतं. काश्मिरात कोणी उद्योग करू लागलं तर ते उद्योग देशद्रोह मानून त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे सांगणं आणि सिद्ध करणं या आधीच व्हायला हवं होतं.  
दुर्दैवानं काश्मिरात राजकारण आड येत राहिलं. काश्मिरातले मुसलमान आहेत,काश्मिरी आहेत या गोष्टीचा फायदा घेत, त्या चोंबाळत राजकीय पक्षांनी मतं मिळवण्याची खटपट चालवली. भारतात इतरत्र राजकीय पक्षांनी मुसलमानांची मतपेढी तयार केली, बंगाल्यांची-असामींची-तेलुगुंची-मराठी माणसांची अशा तऱ्हेनं मतपेढ्या तयार केल्या. हिंदूंचीही एक मतपेढी तयार केली. जातींच्याही मतपेढ्या तयार केल्या. जनतेचे आर्थिक प्रश्न सोडवणं न जमल्यामुळं, आर्थिक प्रश्न सोडवण्याचा विचार किंवा कार्यक्रम तयार करण आणि अमलात आणणं न जमल्यावर अशा मतपेढ्या तयार केल्या गेल्या. महाराष्ट्राचा समतोल विकास करणं न जमल्यावर, प्रत्येक माणसाला सामावून घेणारा विकास साध्य न करता आल्यानं  महाराष्ट्रात विदर्भ मतपेढी, मराठवाडा मतपेढी, पश्चिम महाराष्ट्र मतपेढी, गुजराती मतपेढी, मराठी मतपेढी असा मतपेढ्या तयार जाल्या. औरंगाबाद शहराचा विकास करण्याचं न जमल्यावर  औरंगाबाद शहरात हिंदू, मुस्लीम आणि दलित अशा मतपेढ्या तयार करण्यात आल्या.
तेच काश्मिरातही झालं. परिणामी काश्मिरात दहशतवाद्यांना थारा आणि मदत मिळाली. महाराष्ट्रात कित्येक गुन्हेगारांकडं शस्त्रं असत, ग्रेनेड आणि एके सत्तेचाळीस असत. कधी चुकून एकाद्या पोलिस अधिकाऱ्यानं धाड घालून ती शस्त्रं पकडण्याचा प्रयत्न केला की पुढाऱ्याचा फोन येत असे आणि  कारवाई थांबत असे. देशभरात हा पॅटर्न आहे. देशद्रोह असो, स्मगलिंग असो, गुन्हे असोत, राजकीय पुढारी त्यांना संरक्षण देतात.
 अगदी पहिल्या दिवसापासून पाकिस्तान आपल्याला भारतापासून धोका आहे आणि काश्मिर हा आपल्यापासून हिरावून घेतलेला प्रदेश आपल्याला मिळवायचा आहे असं म्हणत राहिलं. या अटीवरच पाकिस्तानला अमेरिका, सौदी अरेबिया इत्यादी देशांकडून मदत मिळत राहिली. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच भारत द्वेष-काश्मिर या प्रश्नी बाहेरून मिळालेल्या मदतीवर उभी राहिली. काश्मिरात दहशतवाद पसरवण्यावर पाकिस्तान जगत आलं. 
 पाकिस्तानचा वापर अमेरिका, रशिया, इराण, चीन इत्यादी देशांना त्यांच्या आर्थिक-राजकीय फायद्यासाठी करून घेतला.  भारत त्यांच्या उपयोगाचा नव्हता, आजही नाही. वरील देश पाकिस्तानला उघड किंवा छुपी मदत करत असतात. पाकिस्तान काश्मिरात उघडपणे धुडगूस घालत असताना आणि मान्यही असताना वरील देश पाकिस्तानवर दबाव आणत नाहीत किंवा पाकिस्तानची मदत बंद करत नाहीत. सौदी अरेबियानं काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला दीड दोन अब्ज डॉलर दिले, अमेरिकेनंही तेवढ्या रकमेची शस्त्रं दिली. शिवाय इतर वाटांनी दिलेली मदत वेगळीच.
हा सारा घोळ भारतातल्या राजकीय पक्षांना खरं म्हणजे कळत असणार. पाकिस्तानचा दंगा चालतो कारण त्याला इतर देशांची फूस आणि मदत आहे हे तर उघडच दिसत असतं. रशिया संयुक्त लष्करी संचलन करतं. चीन बंदरं आणि रस्ते बांधून देतं. सौदी-अमेरिकेचं तर विचारायलाच नको. तेव्हां काश्मिरचा प्रश्ण सोडवायचा असेल तर एकीकडं आंतरराष्ट्रीय शक्तींशी मुकाबला केला पाहिजे. त्यांना घोळात घेतलं पाहिजे. दुसरीकडं खुद्द काश्मिरात अगदी स्वच्छपणे सर्व संबंधितांना आपला इरादा दाखवला पाहिजे. काश्मिरात रोजगार निर्माण करा, तिथल्या भाषेचा विकास करा, तिथं ऊर्जा प्रकल्प उभे करा इत्यादी गोष्टी बोलता येतात. सार्वमत, स्वातंत्र्य, पाकिस्तानात सामिल होणं या गोष्टी बोलता कामा नयेत. मसरत किंवा इतर लोक जेव्हां उद्योग करतात तेव्हां कायद्यानुसार खटले भरून, ते पटापट चालवून त्यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. 
हे सारं उघड असतानाच आजवरची सरकारं कां गप्प राहिली?
परवा काश्मिरात निवडणुका झाल्या. कोणालाच बहुमत मिळालं नाही. तेव्हां भाजप-पीडीपी-नॅशनल काँग्रेस या तिघांच्या संगनमतानंच सरकार स्थापन होणं तर्काला धरून होतं. तसं न घडतं तर काश्मिरात सरकारच स्थापन होतं ना. भाजपनं कित्येक आठवडे घोळ घातला.  अपक्षांना जवळ करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. जमलं नाही. नॅशनल कॉन्फरन्समधे गळ टाकला. जमलं नाही. शेवटी पीडीपी बरोबर वाटाघाटी केल्या. या वाटाघाटीत काय घडलं? काश्मिरातली वस्तुस्थिती दोघांनाही चांगलीच माहित होती. दहशतवाद, फुटीरवाद, पाकिस्तानी घुसखोरी या बाबत दोघांचं काय ठरलं? सारं काही संघाच्या पद्धतीनुसार गुप्त. आता तर दिल्लीतही फक्त दोन माणसंच राज्य चालवतात. अमित शहा आणि नरेंद्र मोदी. ते काय ठरवतात ते इतर मंत्र्यांनाही कळत नाही, नोकरशहांनाही कळत नाही. त्यामुळं काश्मिरात सरकार तयार करतांना  काय बोलणी झाली, काय ठरलं त्याचा देशाला पत्ता लागलेला नाही.
काश्मिरात गडबड चालली असताना नरेंद्र मोदी युरोपात दौऱ्यावर होते. काश्मिरातल्या घटना घडत असतांना बराक ओबामा दिल्लीत येऊन गेले आणि सि पिंग अमदाबादला. तिथं मोदी त्यांच्याशी काय बोलले? 
काश्मिरचा प्रश्न केवळ हिंसा आणि रक्तापाताचा नाही. तो आर्थिकही आहे. काश्मिर ठीकठाक ठेवण्यासाठी भारत अब्जावधी रुपये खर्च करत असतो. काश्मिर हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरचा एक बोजा आहे. त्या दृष्टीनंही अमेरिका इत्यादींशी बोलायला हवं. त्यांच्यावर दबाव आणायला हवा. दबाव आणणं ही गोष्ट चार दोन डिप्लोमॅटनी चार दोन पत्रं लिहिण्यातून होत नाही. गीतेच्या प्रती भेट देणं आणि भारतीय संस्कृतीची थोरवी ऐकवणं याचा परिणाम होत नसतो. त्यांना वेगळ्या भाषा समजत असतात. त्या भाषा पैशाच्या असतात, दहशतवादी कारवायांच्या असतात, त्या भाषा मार्केटच्या असतात, त्या भाषा जकात आणि व्यापारावरच्या बंदीवरच्या असतात. त्यासाठी अभ्यासक, जाणकार, अनुभवी अशा माणसांची फौज कामी लावावी लागते. कित्येक महिने. एक पक्कं धोरण असावं लागतं.
मोदींचं सरकार  काय करत आहे ?
त्यांची धोरणं नीट कळत नाहीत. घोषणा होतात, भाषणं होतात, धोरणं कळत नाहीत.
मोदी आणि अमित शहा हे यशस्वी जरूर आहेत. सत्तेसाठी सर्व काही असा त्यांचा खाक्या असतो. काश्मिरात, महाराष्ट्रात त्यांना बहुमत मिळालं नाही. तिथं इतर पक्षांशी जवळिकीचं नाटक करत मोदी-शहा जोडीनं सत्ता हस्तगत केली. त्या आधी लोकसभेत बहुमत मिळवत असतानाही कार्यक्रमाचा आणि स्पष्ट धोरणांचा अभाव होता. पुरेशी माणसंही नव्हती. इतर पक्षांतून माणसं आयात केली. त्या माणसांजवळ धोरणांची बोंब होती, चारित्र्याबद्दलही शंका होत्या. देशाची सत्ता चालवण्याची क्षमता असणारी, तेवढं शहाणपण आणि कार्यक्रम असणारी, परिपक्वता असणारी माणसं भाजपजवळ अगदीच कमी होती. जी काही होती त्यांनाही मोदी-शहा जोडीनं हाकललं. मोदी किवा शहा, दोघांकडं  सत्ता-संघटना सांभाळण्याची कला आहे पण देशापुढील अनेक आणि जटिल समस्यांवर त्यांच्याकडं उत्तरं नाहीत. 
या पार्श्वभूमीवर काश्मिरचा प्रश्न उफाळून आला आहे. 
 मोदींना  काश्मिरात केवळ सत्ता हवीय की त्यांच्याकडं काश्मिरबाबत काही निश्चित दूरगामी विचार आहे ते स्पष्ट होत नाहीये. 
 आजवरच्या सरकारांना काश्मिर हाताळण्यात अपयश आलंय.या अपयशाची  पुनरावृत्ती घडणं देशाला आणि काश्मिरला परवडणारं नाही.
००

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

महत्त्वाची सर्जक कलाकृती समजायला जर तशीच सर्जकता लागत असेल तर हवीय कशाला तशी कलाकॄती ?
सर्जकता, सर्जक कलाकृती, ती समजून घेण्यासाठी सर्जकता.
कलाकृती सर्जक असू शकते किंवा सर्जक नसलेली भरड कलाकृती असू शकते. 
सामान्य कोणीही माणूस चार ओळी लिहून तिला कविता म्हणू शकतो, त्याच्या दृष्टीनं ती कविताही असते. दोन पाच हजार शब्द लिहून एखादा त्या मजकुराला कथा म्हणू शकतो. साठ सत्तर हजार शब्द गोळा झाले तर  कादंबरी म्हणता येते.  कॅमेरा आणि एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून क्लिप तयार करणं कोणालाही जमू शकतं, जमतं. या निर्मितीला भरड कलाकृती म्हणता येईल. ती सर्जक कलाकृती म्हणणं कठीण आहे. 
सर्जक कलाकृतीमधे म्हणजे क्रिएटिव कलाकृतीत नेहमीच काही तरी नवं असतं. भाषा, कल्पना, रचना, शब्द, कथानक, आशय, पोत, शैली यापैकी कशात तरी किंवा सर्वच गोष्टीत काही तरी नवं असतं. सर्जन करणारा माणूस खूप मेहनत करत असतो. मुख्य म्हणजे त्याच्या जीनसाखळीतली  प्रतिभा नावाची जीन सक्रीय होते. ही जीन कदाचित प्रत्येक मनुष्यमात्रात असेल. सर्जनशील माणसात एक्सप्रेस होते, प्रकट होते. प्रकट होऊन ती पेशीत आलेल्या नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी आवश्यक नवी   द्रव्यं करण्याची आज्ञा इतर जीन्सना देते. झालं. पेशीमधे बाहेरून आलेल्या गोष्टीवर प्रक्रिया होतात, त्यातून काही तरी नवीच द्रव्यं तयार होतात.
मी आणि विजय तेंडुलकर काही प्रकल्पांवर एकत्र काम केलं. कित्येक माणसं, कित्येक घटना आम्ही दोघांनी एकत्रच अनुभवल्या, त्यावर तासनतास चर्चा केल्या. मी त्यावर काही तरी किडुक मिडुक लिहिलं. पत्रकारी स्वरूपाचं. ते माहितीपूर्ण असेल, रंजकही असेल पण साधारणपणे भरड या वर्गातलं. तेंडुलकरांनी जे लिहिलं ते भरड नव्हतं, ते सर्जक होतं. त्या माणसांनी, प्रसंगांनी तेंडुलकरांच्या डोक्यात गेल्यावर ितसरीच रूपं घेतली. त्यांच्या डोक्यात  आधीच्या असंख्य गोष्टी असणार, नंतरही असंख्य गोष्टी घुसलेल्या असणार. तेंडुलकरांची प्रतिभा जीन जागृत झाली. तिनं त्यातून कायच्या कायच नव्या गोष्टी घडवल्या. माझ्या जेनेटिक नकाशातली प्रतिभा नावाची जीन सक्रीय झाली नाही.
 तेंडुलकरांच्या नाटकातली, पटकथातली, पात्रं, प्रसंग, अशाच रीतीनं तयार झाले असणार.
 तर असं हे सर्जकता प्रकरण.
सर्जक नसलेलं भरड प्रकरण वाचणं, समजून घेणंही सहजासहजी घडत नाही. त्यासाठीही काही तरी पूर्वतयारी लागते. 
 माणसं भरड कविता वाचतात, भरड नाटकं पहातात, भरड सिनेमे पहातात. त्यांना वाटतं की त्यांना ते सारं समजलंय. एका परीनं ते त्यांना विनासायास समजलेलं असतं. कारण जन्मल्यापासून पाच दहा वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या परिसरातून त्यांच्या कानावर जे पडलेलं असतं, त्यातून त्यांची समजूत तयार झालेली असते. ती समजूत तयार करण्यासाठी फारशी खटपट त्यांना करायला लागत नाही. साहित्य असो, ज्ञानवर्धक मजकूर असो, एकूणातच माणसं भरड वाचतात. त्यामुळं जे काही भरड वाचलं, पाहिलं, ऐकलं जातं ते थोर असतं अशी त्यांची समजूत असते. ते सारं वाचण्यासाठी आपल्याला काहीच खटपट करावी लागली नाही हे त्यांना समजत असतं. काहीही मेहनत न करता आपल्याला सारं काही उत्तम समजतं असं त्याला वाटत असतं. विनासायास जे समजतं तेच ग्रेट असतं अशी समजूत ही माणसं करून घेतात.
काही ‘ जड ‘ वाचनात वा पहाण्यात आलं की ही माणसं स्वाभाविकपणे वैतागतात. पिकासोची चित्रं असोत, अरूण कोलटकरांची कविता असो, आंद्रे वायदाची फिल्म असो. अदूरच्या किंवा सत्यजित रे यांच्या फिल्मा असोत. काहीही खटपट न करता तयार झालेली समजूत वरील गोष्टी समजून घ्यायला पुरेशी पडत नाही. आपल्याला परिचित नसलेला भूगोल, परिचित नसलेली भाषा, परिचित नसलेला धर्म आणि सांस्कृतिक परंपरा, परिचित नसलेल्या चालीरीती समोर आल्या की ही माणसं बावचळतात. 
काही वर्षांपूर्वी अँटोनियाज लाईन नावाची एक फिल्म ऑस्कर विजेती ठरली. डच समाजाचं चित्रण त्या फिल्ममधे होतं. एक वयात आलेली हुशार कलाकार मुलगी ठरवते की तिला मूल हवंय पण नवरा नकोय. ती  शहरात जाते. एका तगड्या आणि हुशार मुलाला हेरते. त्याच्या बरोबर एकाद दोन तास घालवून गरोदर होते. यथावकाश तिला मुलगी होते.   यथावकाश ही वयात आलेली आई  समलिंगी संबंधात रमते.  डच समाज, युरोपीय समाज, युरोपीय समाजात झालेलं प्रबोधन, तिथली आर्थिक आणि सामाजिक स्थिती, तिथले सिनेमे वगैरे गोष्टी भरड सिनेमे पहाणाऱ्या लोकांना माहित नसतात. ही माणसं चिडतात. डच सिनेमा, डच माणसं कशी असंस्कृत आणि विकृत आहेत असं ती माणसं म्हणू लागतात. त्यांची समजूत सामान्यतः ज्ञानेश्वर-तुकाराम इथपर्यंतच ( सदानंद मोरे यांच्या कृपेनं ) तयार झालेली असते. तेराव्या शतकानंतर आणखी सात शतकं होऊन जग आता एकविसाव्या शतकात आलं आहे हे अनेकांना कळलेलं नसतं. त्यांच्या डायरीतली तारीख १० एप्रिल २०१५ असली तरी मनातली तारीख १० एप्रिल १३१५ वगैरे असते.
अर्थात ज्ञानेश्वरांचं साहित्यही सोपं नाही. त्यात त्यात खूप अर्थ आहे. ज्ञानेश्वरांच्या साहित्यातली प्रतिकं, प्रतिमा, शब्द, शैली इत्यादी गोष्टी समजून घेणं त्या काळातही सोपं नव्हतं, आजही सोपं नाही. 
   साहित्यिक कृती  त्या त्या काळाच्या संदर्भात तपासावी लागते, त्यासाठी मेहनत करावी लागते. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर आजही खूप मेहनत करावी लागेल. भरड संस्कृतीत वाढलेली माणसं मेहनत करत नाहीत,ज्ञानेश्वरीचं आंधळं पारायण करत असतात, कीर्तनकारांनी सांगितलेल्या बाष्कळ गोष्टी म्हणजे ज्ञानेश्वर अशी त्यांची समजूत करून घेतात. लता मंगेशकरांनी म्हटलेली ज्ञानेश्वरांची गाणी आणि आई वडिलांनी त्यांना सांगितलेल्या सोप्या सोप्या गोष्टी यावर त्यांचं ज्ञानेश्वरीचं ज्ञान पोसलेलं असतं. ज्ञानेश्वरी असो किंवा शिवाजी महाराज असो. कोणत्याच गोष्टीचा अभ्यास करण्याची प्रथा आपल्यात नाही.फारच थोडे म्हणजे थोडे लोक अभ्यास करतात.बाकीचे सगळे लोक ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराज यांच्या नावानं दुकानं चालवतात, आपली अकार्यक्षमता आणि भरडपण ते ज्ञानेश्वर-शिवाजीच्या स्तोत्रांच्या गजरात विसरून जातात.  कोणतीही कलाकृती मग ती भरड असो की सर्जक असो, समजून घेण्यासाठी काही एक मेहनत करावी लागत असे. ज्ञान आणि समजूत या दोन्ही गोष्टी प्रयत्नपूर्वक मेहनतीतूनच साध्य होतात. 
 एक आठवण. पिकासोच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईत लागलं होतं. चित्रकला हा माझा विषय नसल्यानं पिकासो मला समजत नव्हता.  तो आपल्याला थोडा तरी, निदान प्राथमिक तरी समजला पाहिजे असं मला वाटलं. मी व्यंगचित्रकार-चित्रकार वसंत सरवटे याना घेऊन प्रदर्शनाला गेलो. एकेका चित्रासमोर उभा राहून मी त्याना सांगितलं की मला अगदी प्राथमिक गोष्टीपासून समजून सांगा, म्हणजे रेषा, रंग, कंपोझिशन, संकल्पना इत्यादी. त्यांनी सांगितलेलं मी टिपून घेतलं. पुन्हा एकदा बसून मी काय समजलो होतो आणि ते बरोबर होतं की नाही ते त्यांच्याकडून तपासून घेतलं. माझी पिकासोची समज  चित्र समीक्षकायेवढी किंवा चित्रकारायेवढी नक्कीच झाली नाही. पण पिकासोकडं कसं पहावं लागतं हे मला समजलं. मला पिकासो एक बिंदूही माहित नव्हता. तो चारेक बिंदू समजला. ज्यांना पिकासोचा खरा आस्वाद घ्यायचा असेल त्यांना किती तरी अभ्यास आणि खटपट करावी लागत असणार हे माझ्या ध्यानात आलं.
कलाकृती निर्माण करणं, सर्जक कलाकृती निर्माण करणं हेच मुळात फार मेहनतीचं काम असतं. सर्जकाच्या जीन्ससाखळीतला प्रतिभा  जीन तिथं प्रकट होत असतो. कलाकृती समजून घेणं हेही कष्टाचं काम असतं. समजून घेणाऱ्याच्या सर्जक जीन माणसाला जागा करावा लागतो. तो सहजा सहजी जागा होत नाही. महाखट जीन. 
एकादी गोष्ट समजून घेताना माणसाची क्रिटिकल थिंकिंगची क्षमता पणाला लागत असते. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे साक्षेपी विचाराची क्षमता. समोर दिसाणारं  तसंच्या तसं न स्वीकारता ते ताडून पहायचं, तपासून पहायचं. 
समजा मला एक सिनेमा समजून घ्यायचा आहे. तर त्या सिनेमाबद्दल संशय, दुरावा, राग, पूर्वप्रेम इत्यादी न बाळगता, होता होईतो, मला तो सिनेमा पहायला हवा. मी आधी सिनेमे पाहिलेले असतात. त्यातून माझी सिनेमाबद्दल काही एक समजूत तयार झालेली असते. मला अमूक एक पठडीचा सिनेमा आवडतो, अमूक एक आवडत नाही. शिवाय माझ्या मनामधे अनेक गोष्टींबद्दल, संस्कृतींबद्दल, राजकीय वा आर्थिक विचारांबद्दल, कलाकृतीबद्दल काही समज बिमज असतात. सिनेमा पहाता हे सारे समज, ग्रह माझ्या मनामधे दडी मारून बसलेले असतात. सिनेमा पहाताना त्या समज आणि ग्रहांशी मारामारी होते, पहात असलेल्या सिनेमातून तयार होणाऱ्या ग्रहांची आणि समजुतींची. 
राडा. 
माझ्या समज आणि ग्रहांचं काय करायचं?त्यांच्यात बदल करायचे? की ते सोडून द्यायचे?  आधीचे समज-ग्रह   मनातला कोपरा सोडायला तयार नसतील तर काय करायचं?  ते कप्प्यात कुलुपबंद करायचे? नवी समजही स्विकारून वेगळा कप्पा करून त्यात कोंबायची?  दोन्ही कप्प्यांसह अस्वस्थ जगत रहायचं?
नवं माणूस भेटतं. नवी भाषा कानावर येते. नवं चित्रं दिसतं. नवं वाचायला मिळतं. अकल्पित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. नवा भूगोल. राडा सुरु होतो. जीव जातो. सर्जकाला या साऱ्याचा सामना करावा लागतो. सर्जनाचा आस्वाद घेणाऱ्यालाहा सामना करावा लागतो. महा छळ.
अनेक आणि फार माणसं या छळाच्या, त्रासाच्या भानगडीत पडत नाही. तो त्यांचा पिंड नसतो. त्यांचं जगच वेगळं. कमी माणसं या छळछावणीत सापडलेली असतात. त्यांची गोची झालेली असते. इतर माणसांना ही सर्जक माणसं, छळछावणीत सापडलेली माणसं समजत नाहीत. मग सर्जक माणसं दगड खातात, शिव्या खातात, शेणगोळे आणि अंडी झेलतात. किती तरी वर्षं आणि जगभर हे चालत आलंय.
धर्म, देव यांच्याशी चिकटलेले समज आणि ग्रह माणसाच्या मनात लाखभर वर्षांपासून दडलेले आहेत. ते जाम तिथून हलत नाहीत. वैज्ञानिक या समज-ग्रह गुच्छाला मेम्स असं म्हणतात. सांस्कृतिक साठवण असंही या गुच्छाचं एक नाव आहे. सांस्कृतिक साठवण लिग्निन सारखी असते.
लिग्निन नावाचं एक प्रोटिन असतं. पाण्यात चटकन विरघळणाऱ्या साखरेचेच रेणू लिग्निनमधे असतात.   ते रेणू सहज तोडता येणार नाही अशी साखळी करतात. नारळ सुकला की त्याच्या किशा होतात. त्यात लिग्नि असतं. त्या उकळा, गाडा, काहीही करा. जाम मोकळ्या होत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत. नारळाच्या किशा जमिनीत पुरल्या तर त्यांचं खत व्हायला वर्षं जातात. सुबाभूळ नावाच्या झाडाची पानंही अशीच. काही केल्या ती कुजत नाहीत. धर्म आणि देव हे एक लिग्निन आहे. माणसाच्या डोक्यातून ते हलत नाही, त्यावर परिणामच होत नाही. याच लिग्निनचं वर्णन श्रद्धा, विश्वास, खात्री, शाश्वती, अंधश्रद्धा, खरी श्रद्धा इत्यादी शब्दांत केलं जातं.
साक्षेपी विचार आणि श्रद्धेचं लिग्निन यांचं जमत नाही.
साक्षेपी विचार, क्रिटिकल थिंकिंग, सर्जकता यात नातं आहे काय? 
युरोपात प्रबोधन घडलं, रेनेसान्स घडला. त्याची सुरवात चित्रकलेपासून झाली होती. पूर्वी प्रत्येक चित्रात एक देवदूत किंवा देव असे. खाली चित्रामधे काहीही दाखवलं तरी वर कोपऱ्यात  देव आणि देवदूत हवा. कधी तरी चित्रकाराला वाटलं की हा देव किंवा देवदूत हवा कशाला? एके दिवशी देव आणि देवदूत गायब झाले. गहजब झाला. तिथून युरोपातल्या एकूण विचारांना वेगळं वळण मिळालं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडं एक पद्धत होती. काहीही लिहायला घेतलं की अगदी वर, शीर्षकासारखं लिहायचं. ।। श्री ।।, ।। अमूक देव प्रसन्न ।।
साधं पत्र असो. लेख असो. पुस्तक असो. खतावणीत केलेली नोंद असो. राजानं कोणाचे हातपाय तोडायचा आदेश दिलेला असो. लेखनाची सुरवात श्री, अमूक देव प्रसन्न.
अलिकडच्या काळात कोणी असं लिहिताना दिसत नाही. पत्रं, लेखनाला थेट सुरवात होते.

असो. 
लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

२३ मार्च रोजी ली क्वान यू यांचं ९१ व्या वर्षी  निधन झालं. ली क्वान यू १९६५ साली सिंगापूरचे प्रधान मंत्री झाले. त्या वर्षी सिंगापूर मलेशियापासून वेगळा झाला. १९९९ साली ते प्रधान मंत्री पदावरून दूर झाले पण मंत्रिमंडळाचे एक सदस्य म्हणून राहिले. २००४ साली ते मार्गदर्शक मंत्री म्हणून मंत्रिमंडळावर लक्ष ठेवून होते.  २०१४ पर्यंत म्हणजे सुमारे पन्नास वर्षं त्यांची सिंगापूरच्या सत्तेवर, राजकारणावर पकड होती. वयोमानानुसार ते मुख्य पदावरून निवृत्त झाले तरी या ना त्या स्वरूपात सिंगापूरची सत्ता त्यांच्याच हाती होती, त्यांच्या होकाराशिवाय सिंगापूरचे निर्णय होत नव्हते.
सिंगापूर हे जगभरच्या व्यापाराचं एक मोक्याचं केंद्र आहे. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, पूर्व-पश्चिम जलवहातुकीचं केंद्र हा सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा. जगाचा व्यापार-उलाढाल जसजशी वाढत गेली तसतसा सिंगापूरचा फायदा वाढत गेला. जगातली अर्थव्यवहाराची वळणं लक्षात घेऊन सिंगापूरनं तेल शुद्धिकरण उद्योग सुरु केले, इल्लेक्ट्रॉनिक उद्योग विकसित केले. हे सारं करण्यासाठी भांडवल लागतं.   ७०० चौकिमीचा भूभाग आणि पन्नास लाख लोकसंख्येच्या सिंगापूरजवळ गुंतवायला पुरेसे पैसे नव्हते. सिंगापूरनं आंतरराष्ट्रीय भांडवलाला मोकळीक दिली. एका परीनं या गोष्टी जवळपास आपोआप घडत गेल्या.  परंतू सिंगापूरची ही वाढ, विकास टिकवून ठेवण्याचं श्रेय यू यांना जातं. सिंगापूरमधे चिनी, मले, भारतीय इत्यादी माणसं रहातात. बहुवंशी, बहुधर्मी समाजात तणाव असतात आणि ते तणाव शेवटी आर्थिक घात करतात. मलेशियानं ते अनुभवलं आहे. यू यांनी अशा नाना प्रकारच्या माणसांना शिस्तीत एकत्र बांधून ठेवलं, कामाला लावलं.
यू मुळातले चिनी. कनफ्युशियस विचारात ते वाढले. शिक्षण, शिस्त, आज्ञाधारकता आणि श्रेणीआदर ( हायरार्की ) म्हणजे कनफ्युशियसचा विचार. चिनी समाजाची घडण कनफ्युशियसच्या विचारांवर झाली आहे. मार्क्सवादी विचार समतेवर आधारलेला आहे, तिथं श्रेणी आणि उच्चनीचता यांना जागा नाही. तरीही चिनी मार्क्सवादी पदावरच्या माणसाचं श्रेष्ठत्व मानतो, त्यापुढं वाकतो. कनफ्युशियसनं समाजाला एक शिस्त घालून दिली. कडक शिस्त. यू हे पक्के कडक शिस्तीचे. ‘ मी जर प्रधान मंत्री असेन, देश प्रमुख असेन तर सर्वांनी माझं ऐकलंच पाहिजे, मी सांगेल त्या प्रमाणं वागलंच पाहिजे. तसं न करणाऱ्याला माझ्या समाजात वाव नाही. ‘ हे कनफ्युशियस विचाराचं मुख्य सूत्र. ते यूनी पाळलं. त्यांच्या आर्थिक वा राजकीय विचारांवर टीका करणाऱ्या माणसांना त्यांनी तुरुंगात पाठवलं. सिंगापूरमधे वीस वर्षापेक्षाही जास्त काळ तुरुंगात काढलेली माणसं आहेत. त्यांचे विचार मान्य आहेत, त्यांना विरोध नाही असं कागदावर लिहून दिलं तरच सुटका  असा ली क्वान यू यांचा व्यवहार. पत्रकारी, पत्राकाराचं स्वातंत्र्य, विचार आणि प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी आपले मर्यादित लोकशाही विचार कधीच झाकून ठेवले नाहीत,   अभिमानानं मिरवले.
आर्थिक विकास हेच ध्येय. इतर गोष्टी बाजूला. ली क्वान यू हे सिंगापूरचे राजेच होते, हुकूमशहा होते. सिंगापूरमधे स्वच्छता होती, उत्कृष्ट जगण्याची सोय होती, कायदा होता, सुरक्षितता होती, उत्तम शिक्षण होतं. सिंगापूरच्या जनतेला ते हवं होतं, आवडलं होतं. पण या विकासात आपल्याला विचारात घेतलं जात नाही, आपला सहभाग त्या विचारात, प्रक्रियेत नाही अशी खंत सिंगापुरी जनतेत होती. आपण मोकळेपणानं बोलू शकत नाही याचं सिंगापुरी जनतेला वाईट वाटत असे. परंतु या बदल्यात मिळणारं सुख येवढं होतं की सिंगापूरमधे यू यांच्या विरोधात बंड झाली नाहीत, त्यांची सत्ता उलथवून लावण्याचे प्रयत्न झाले नाहीत, क्रांत्या बिंत्या झाल्या नाहीत.
एकहाती कारभार. कारभार करणारा शहाणा असतो, तो आपला बाप असतो, त्याचं ऐकायचं. ऐकलं नाहीत तर काय होईल असा प्रश्नच येत नाही, कारण ऐकण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो. पीपल्स अॅक्शन पार्टी स्थापन करून त्या पक्षाच्या द्वारे यू यांनी सत्ता मिळवली, चालवली. पीपल्स अॅक्शन पार्टीत  माणसं विविध मतं मांडत आहेत आणि विचार विनिमयाच्या अंती धोरण ठरत आहे असं घडलं नाही. बाप घरात असतो आणि जगातही तो बाप असतो. चिनी प्रथा. 
जगात अशी व्यक्तीच्या हुकूमशाहीची कित्येक उदाहरणं आहेत. हिटलरनं नॅशनल सोशलिस्ट पार्टी काढली. माओ आणि स्टालिन यांनी कम्युनिष्ट पार्ट्या काढल्या. इथियोपियात हेले सेलासीनं १९३० ते १९७४ सम्राटपद भोगलं. त्याच्या नावानं रास तेफारी चळवळ इथियोपियात सुरु झाली. आम्हारा भाषेत रास म्हणजे प्रमुख आणि तेफारी हे सेलासीचं नाव. हेले सेलासी हा आमचा देव-प्रमुख-बाप आहे असं मानणारी माणसं त्यानं आपल्या भोवती गोळा केली. ही माणसं हेले सेलासीला देवाचा अवतार मानत, ख्रिस्ताचा अवतार मानत.
हिटलरनं जर्मनी आणि जगाचं नुकसान करून शेवटी आत्महत्या केली. स्टालिननं करोडो माणसं ठार मारून रशियाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली, देशावर भीषण दुष्काळ लादले. माओनंही लाखो विरोधक मारले आणि चीनवर दुष्काळ लादले. हेले सेलासीच्या काळात इथियोपियाची धूळधाण झाली. हेले सेलासी श्रीमंत झाला आणि इथियोपिया देश भिकेला लागला. ली क्वान यू  वरील माणसांपेक्षा वेगळे निघाले.  यू यांचे विरोधक तुरुंगात खितपत पडले पण ना त्यांचा छळ झाला ना त्यांना ठार मारण्यात आलं. सिंगापूरक या देशाचं नुकसान झालं नाही. सिंगापूरची सतत भरभराट होत राहिली, सिंगापूरची जनता सुखात राहिली.
  समाजात विविध गट असतात, त्यांच्या  मागण्या वेगवेगळ्या असतात, त्यांची धोरणं वेगवेगळी असतात. प्रत्येक समाजगटाच्या काही मागण्या योग्य असतात पण अनेक मागण्या अयोग्य असतात, संकुचित स्वार्थावर आधारलेल्या असतात,  हितसंबंधी असतात. भारतात पहा. जाती आहेत. उपजाती आहेत. भाषा आहेत. भाषेत उपभाषा आहेत. जिल्हे आहेत. धर्म आहेत, धर्मात उपपंथ आहेत. आदिवासी, गिरीजन आणि समुद्रतटी गट आहेत. गरीब आहेत, श्रीमंत आहेत. वीस पंचवीस प्रकारचे गट, त्यांचे स्वार्थ. शिवाय प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाचे स्वतंत्र स्वार्थ. त्या कुटुंबं आणि व्यक्तींची मतं.  भारतात काहीही करायला गेलं तरी एकमत होणं शक्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला एक मत असतं. मतांचे गट होतात. ज्या गटात जास्त मतं तो गट वरचढ ठरतो आणि सामान्यतः त्या गटाची धोरणं ही समाजाची अधिकृत धोरणं ठरतात. मुंबईतल्या मल्टिप्लेक्स सिनेमात मराठी सिनेमे दाखवले पाहिजेत हे मराठी भाषक गट मोठा असल्यानं महाराष्ट्र सरकारचं अधिकृत मत ठरतं. या पेक्षा वेगळी मतं असणाऱ्या माणसांची बहुसंख्या होत असली तरीही वरील मत अधिकृत ठरून तो कायदा होतो. मतं, माणसं, त्यांची संख्या ही कसोटी लोकशाहीला अडचणीत आणते. एका छोट्या गटाचं धोरण अख्ख्या समाजाचं धोरण होतं.
हिटलर, स्टालिन, माओ, हेले सेलासी, ली क्वान यू यांनी माणसं-मतं-डोकी यांचा विचार केला नाही. पक्षांची ताकद, पक्षांवरची या नेत्यांची पकड यामुळं समाजालाही त्या  नेत्यांचं मत हेच आपल मत आहे असं मानावं लागलं.  त्यामुळं मतमतांतरातला गोंधळ, विविध हितसंबंध आणि अयोग्य आकांक्षा यांच्या बेरीज वजाबाकीतून होणारा गोंधळ टळला. अर्थाक एक खरं आहे. भारतात मतांतरांना जेवढी जागा आहे तेवढी जागा तुलनेनं जर्मनी, रशिया, चीन, सिंगापूरमधे  नव्हती. असो. हिटलर, माओ इत्यादींनी लादलेली धोरणं स्वीकारताना समाजानं खळखळ केली. पण  यू यांची राजवट  थोडासा आंबट चेहरा करून कां होईना सिंगापुरी समाजानं मान्य केली.
इतक्या वर्षात एकादाच यू.   हिटलर, स्टालिन इत्यादी बरेच.
साऱ्या जगभर जिथं लोकशाह्या आहेत, जिथं जास्तीत जास्त डोकी आणि मतं यांच्या जोरावर राज्यकारभार होतो तिथली माणसं काहीशी चिंतेत आहेत. या पद्धतीनं समाजात कोणालाच सुख लाभत नाहीत असं लोकांना वाटतंय. अमेरिकेसारखा मोकळा लोकशाही देश, तिथं बेधडक मोकळी माध्यमं. तिथले लोक आता म्हणत आहेत की फायनान्स आणि उद्योग यातले एक टक्का लोक उरलेल्या ९९ टक्के लोकांचं सुख हिरावून घेत आहेत, ते इतरांची साधनं हिरावून घेत आहेत. ब्रिटनमधली जनता तिथल्या बहुवंशीय-बहुभाषिक-बहुसांस्कृतिक-बहुधार्मिक लोकशाहीला कंटाळली आहेत. जवळपास तशीच स्थिती फ्रान्समधे आहे. भारतातली लोकशाही आणि निवडणूक पद्धत या बद्दल आक्षेप घेण्याजोग्या जागा आहेत. तरीही इथं लोक मोकळेपणानं बोलू शकतात, मतं मांडू शकतात हे सामान्यतः सर्वांना मान्य आहे. तरीही अलिकडं देशात कोणीही सुखी नाहीये, सगळेच या ना त्या कारणानं दुःखी आहेत ( मोजके राजकारणी, उद्योगी आणि सरकारी नोकर वगळता ) असं लोक आता बोलत आहेत.
नाना प्रकारची माणसं, नाना गट समाजात वावरत असताना सर्वाना सामाईक अशा सुखाच्या बाबी कशा शोधायच्या आणि त्या अमलात आणण्यासाठी सरकार-स्टेट कशा रीतीनं चालवायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. 
दिल्लीत केजरीवाल यांच्या आप पार्टीला मतदारांनी सत्तर पैकी सदुसष्ट जागा दिल्या. साधारणपणे असं मतदान कम्युनिष्ट, हुकूमशाही देशातच होतं. भारतात बोंब करायला वाव आहे, आरोप प्रत्यारोपाला खुलं मैदान आहे, माणसं बहुतांशी खुलेपणानं मतदान करू शकतात. त्यामुळं हुकूमशाही देशात होते तशी दादागिरी इथं कमी शक्य आहे. त्यामुळं  इतकी मतं आणि इतक्या जागा एकाद्या पक्षाला मिळणं ही गोष्ट भयचकित करणारी आहे. 
 कल्पनाही करता येणार नाही असं बहुमत मिळाल्यावर काही दिवसातच त्या पक्षातले प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे दोन पक्ष संस्थापक पक्षातून बाहेर पडले. केजरीवाल आणि त्यांच्यात मतभेद झाले. पक्ष कसा चालवायचा, पक्षाची संघटना कशी असेल आणि पक्षाची निर्णय प्रक्रिया कशी असेल या विषयावर मतभेद होते. केजरीवाल यांच्या हाती सारी सत्ता केंद्रित होणं लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नाही असा भूषण-यादव यांचा मुद्दा आहे. ( ली क्युआऩ यू यांच्यावर सिंगापूरच्या लोकांचे हेच आक्षेप होते. )दिल्लीतल्या मतदार नागरिकांना सुख कसं द्यावं, त्यांचे प्रश्ण कसे सोडवावेत या विषयावर मतभेद नव्हते. केजरीवाल यांनी स्पष्टच सांगून टाकलं की वेगळी मतं असणाऱ्या लोकांबरोबर संस्था चालवण्याचा अनुभव आपल्याला नाही.
भूषण आणि यादव पक्षाबाहेर गेल्यात जमा आहेत. दोघेही तावातावात होते, प्रक्षुब्ध होते. केजरीवाल   थंड होते. टीका करणं, उल्लेख करणंही त्यांनी टाळलं. केजरीवालांचे सहकारी भूषण-यादवांवर तुटून पडले. केजरीवाल गप्प. एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना उपस्थितांनी आणि पत्रकारांनी पक्षातली फूट आणि असंतोषाबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारले. केजरीवाल थंडपणे म्हणत राहिले की गव्हर्नन्स, कारभार या गोष्टीसाठी त्याना जनतेनं निवडून दिलं आहे, कारभार  त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे.
काही लोक इतरांबरोबर काम करू शकतात, काही लोक करू शकत नाहीत. इतिहासात डोकावून पहा. गांधींनी स्वातंत्र्य चळवळ उभी केली, काँग्रेस पक्ष उभा केला. करोडो माणसं त्यांनी जोडली. पण टंडन, सुभाषबाबू, जिन्ना इत्यादी माणसाना त्यांनी राजकारणातून हाकून लावलं. खूप माणसांना बरोबर घ्यायचं पण आपल्या सत्तेला आव्हान देणाऱ्यांना मात्र हाकलून द्यायचं. केजरीवाल आणि गांधी यांची तुलना होऊ शकत नाही.  केजरीवालनीही दिल्लीत काम करताना, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात काम करताना, आप पार्टी स्थापन करताना खूप माणसं जोडली आणि भूषण-यादवांना हाकललं. 
हा  एका  विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा,  पर्सनॅलिटीचा वर्ग आहे.  बरीच माणसं अशी असतात.
दिवस-महिने-वर्षं येतात आणि जातात. पुढारी येतात, सत्ता चालवतात, दिसेनासे होतात. शेवटी काय उरतं? हिटलर, स्टालिन, माओ, हेले सेलासी गेल्यानंतर कटु आठवणी उरल्या. ली क्यूआन यू गेल्यावर दिवस संपताना सिंगापूरवासी उद्याचा दिवस आपण सुखात जगू या खात्रीनं झोपी गेले.   शेवटी तीच कसोटी उरते.
पाच वर्ष जाऊ द्यात, दहा वर्षं जाऊ द्यात. केजरीवाल यांच्या सत्तेनं दिल्लीकरांना   सुख मिळालं, शुद्ध हवा मिळाली, पुरेसं पाणी आणि वीज मिळाली, इस्पितळात फार रांगेत उभं न रहावं लागता वाजवी किमत मोजून उपचार मिळाले तर लोक भूषण-यादव यांना विसरतील, केजरीवाल त्यांच्या लक्षात राहतील. 

००
येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनच्या राजधानीवर सौदी अरेबियाची विमानं बाँब हल्ले करत आहेत. त्यांना इजिप्त, कतार, अरब अमिराती या देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचाही पाठिंबा आहे परंतु पाकिस्ताननं तिथं सैनिक पाठवायचं अजूनपर्यंत टाळलं आहे. सौदी अरेबिया सानामधे घुसलेल्या हुती सरकारला हुसकावण्याच्या प्रयत्नात आहे. गेले काही दिवस उत्तर येमेनमधे बलवान असलेल्या हुती या संघटनेनं येमेनच्या राजधानीचा ताबा घेतला असून साऱ्या येमेनवरच सत्ता मिळवण्याचा हुती या संघटनेचा इरादा आहे. 
हुती या संघटनेकडंही भरपूर शस्त्रं आहेत. त्यामुळं लढाई तुंबळ आहे. येमेनी जनतेचं मत  विभागलेलं आहे. हुतीला पाठिंबा असलेले लोक आहेत, हुतीच्या विरोधात लोकं आहेत, सौदीला पाठिंबा देणारे आहेत, सौदीला विरोध करणारे आहेत. अल कायदा आणि इस्लामी स्टेट या संघटनांना पाठिंबा आणि विरोध करणारेही आहेत. भरीस भर म्हणून अनेक जमातींच्या सशस्त्र टोळ्या आहेत आणि त्याही एकमेकाला आणि इतरांना विरोध करत असतात. असे एकूण आठ नऊ तरी सशस्त्र गट सध्या स्वैर हिंसा करत आहेत. मधल्या मधे येमेनी जनता भरडून निघत आहे.
हुती या संघटनेचे सदस्य झैदी या येमेनमधल्या एका पंथाचे आहेत. फक्त येमेनमधेच हा पंथ आहे. हा इस्लामी पंथ तत्वतः सुन्नी आहे पण व्यवहारात शिया आहे. झैदी मंडळीमधे इमाम असतो, शियांप्रमाणं.  येमेनमधे झैदी मंडळी पंचवीस ते तीस टक्के आहेत. उरलेले येमेनी सुन्नी आहेत. जगभराप्रमाणं शिया सुन्नी यांच्यात इथंही हाडवैर आहे. सौदी अरेबियाची समजूत आहे की हुतींना इराणचा पाठिंबा आहे. प्रत्यक्षात इराणचा फारसा पाठिंबा असल्याचे पुरावे नाहीत. गंमत म्हणजे हुती व्हेनेझुएलाच्या युगो शॅवेझला हिरो मानतात. 
हुती या संघटनेला सत्ता हवी आहे. गेली पंधराएक वर्षं हुती संघटनेची माणसं येनेमची सत्ता घेऊ पहात आहेत. एकाद्या गावावर ते हल्ला करतात. गावातल्या जनतेला धमकावतात. गावातली मशीद ताब्यात घेतात, मशिदीत स्वतःचा इमाम नेमतात. हा इमाम लोकांना हुतीचा शब्द पाळा असं सांगतो. इमामाकडं एके सत्तेचाळीस असते, प्रवचन ऐकायला बसलेल्या समोरच्या लोकांकडंही स्वयंचलित बंदुका असतात.अमेरिका मुर्दाबाद, ज्यू मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद अशा या संघटनेच्या घोषणा असतात. पण त्या पेक्षा भ्रष्टाचार विरोध हा त्यांचा मुख्य मुद्दा असतो. 
२०११ साली अरब स्प्रिंग ही क्रांती झाली तोवर साले या अध्यक्षाची एकहाती सत्ता तीसेक वर्षापासून येमेनमधे होती. या माणसानं देश खाल्ला होता. चमचे आणि नातेवाईक यांनी देशाची संपत्ती लुबाडली होती. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचा साले यांना पाठिंबा होता. ओसामा बिन लादेननं येमेनचा आश्रय घेतल्यावर सौदी अरेबिया आणि अमेरिकेनं येमेनमधे प्रचंड प्रमाणावर पैसे ओतले. तेही साले यानं खाल्ले. सालेनं येमेनच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली पण स्वतःचे खिसे मात्र भरपूर भरले. अमेरिकेच्या भक्कम पाठिंब्यावर साले टिकून होता. अरब स्प्रिंगमधे तरूणांनी त्याला हाकललं. तो गेल्यावर त्याच्या जागी अब्द हादी अस्थायी अध्यक्ष झाले. परंतु परिस्थिती जैसे थे होती. अर्थव्यवस्था बिघडलेली, प्रशासन भ्रष्टाचारानं बरबटलेलं. जनता हैराण. 
या स्थितीत हुती या संघटनेनं उचल खाल्ली. गावं गावं, शहरं शहरं या संघटनेनं ताब्यात घ्यायला सुरवात केली. गावातली, शहरातली सरकारी यंत्रणा जशीच्या तशी ठेवली जाते. पोलीस, कारभार, पालिका, शाळा इत्यादी सारं जसंच्या तसं. हुती त्यांच्यावर लक्ष ठेवणार. हुतीच्या क्रांतीकारी समित्यांचे सदस्य बंदूक-पिस्तूल घेऊन शहरात फिरणार. रस्तो रस्ती हुतीच्या उघड्या जीप्स-पिक अपमधून हुतीचे कार्यकर्ते गल्लोगल्ली फिरणार आणि त्यांचं न मानणाऱ्या पोलिसांना, कारभाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारणार. एकाद्या गावातल्या कोणी त्यांना विरोध केला तर तिथं बाँबस्फोट करणार. हुतीचं पसरणं इतर प्रतिस्पर्धी संघटनाना अर्थातच मान्य नव्हतं. अल कायदाचा हुतीला विरोध होता. त्यामुळं जागोजागी अल कायदा विरुद्ध हुती अशी हिंसक मारामारी आजतागायत चालू आहे. सरकार नावाची गोष्ट असून नसल्यागत. सरकारी नोकर असतात, त्यांचे पगार बिगार होतात. पालिकेची इस्पितळं चालतात, तिथं उपचार वगैरे होतात. फक्त जागो जागी त्यांचे मालक वेगवेगळे असतात. एकाद्या ठिकाणी  हुतीचा कार्यकर्ता, एकाद्या ठिकाणी अल कायदाचा कार्यकर्ता मालक-सत्ताधारी असतो.
  अशा रीतीनं हुती गेली चारेक वर्षं पसरत पसरत राजधानी सानापर्यंत येऊन पोचली आहे. सौदी अरेबियाला हुती पसंत नसल्यानं सौदीनं हुतीविरोधात कारवाई सुरु केली आहे. 
सौदीचा पापड कां वाकडा झालाय? 
सौदीचा समज आहे की हुती ही संघटना शिया आहे आणि तिला इराणचा पाठिंबा आहे. इराण हुतीचा वापर करून आखाती प्रदेशात स्वतःचं वर्चस्व स्थापू पहातेय असा सौदीचा संशय आहे. येमेन हा देश सौदी अरेबियाला चिकटून आहे. त्यामुळं सुतीनं येमेनचा ताबा घेणं म्हणजे आपल्याच छाताडावर बसणं आहे असं सौदीला वाटत आहे. सौदी सुन्नी आणि इराण शिया. सौदी अरब आणि इराण पर्शियन. दोन देशांमधलं वितुष्ट धार्मिक आहे आणि सांस्कृतीकही. दोन्ही देश तेलाच्या जोरावर श्रीमंत झाले आणि त्याच जोरावर त्यांना आखाती देशांचं वर्चस्व हवं आहे. म्हणूनच संधी मिळाल्यावर इराणला छळण्यात सौदी अरेबियाला स्वारस्य आहे.
हुती काहीसे शिया असले तरीही ते कडवे शिया नाहीत. हुतीचं मुख्य दुखणं सत्तालालसा हे आहे. येमेनमधे हुतीला सत्ता हवी आहे. सत्तेला धर्म नसतो. सत्ता नेहमीच धर्माचा वापर करून घेत असते. इस्लामचा विजय असो, अल्ला थोर आहे अशा घोषणा हुतीचे कार्यकर्ते देतात. पण नेमक्या त्याच घोषणा देत अल कायदाचे लोक हुतींवर तुटून पडतात. या दोघांच्या भांडणात इस्लामी स्टेट ही संघटनाही पडते तीही याच घोषणा देत. आणि सौदी सैनिकही अल्लाच्याच नावानं बाँब वर्षाव करत असतात. अमेरिका, ज्यू, बिगर इस्लामी लोक जर या सर्वांचे समान शत्रू आहेत तर ही माणसं एक कां होत नाहीत? एकमेकांचे जीव घेतात? अत्यंत क्रूरपणे निष्पाप माणसांची हत्याकांडं कां करतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात हुतीला रस नाही. हुतीला काहीही करून येमेनची सत्ता हवी आहे. आणि हुती सत्तेत येणं म्हणजे सुन्नी देशात शिया सत्ता स्थापन होणं असं वाटत असल्यानं सुन्नी सौदी अरेबिया हुतींचं निर्दालन करण्यास सरसावली आहे.
इराणही कमी नाही. एकूण मुस्लीम जगात शिया अल्पसंख्य आहेत. पंधरा वीस टक्के असतील. आपणच खरे मुस्लीम असं त्याना वाटतं. सुन्नी मंडळींनी त्यांच्यावर अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे असं त्यांना किती तरी शतकांपासून वाटत आलं आहे. त्यामुळं शिया, इराण संधी मिळेल तिथं सुन्नींवर सूड उगवायला तयार असतात. अल्पसंख्य असतात त्या ठिकाणी ते दबून असतात पण जिथं डोकं वर करता येतं, शक्ती परजता येते तिथं ते सुन्नीना खतम करण्याच्या प्रयत्नात असतात. लेबनॉन, इराक आणि सीरिया या तीन ठिकाणी इराणची शस्त्रं आणि मुजाहिद सक्रीय आहेत. अल कायदालाही लाज वाटावी इतक्या क्रूरतेनं हेझबुल्ला ही शिया संघटना लेबनॉन आणि सीरियात हिंसा करत असते. तिथं त्यांना सौदी-कतार इत्यादी देश इराणच्या विरोधात उभे आहेत. 
येमेनमधली अंतर्गत यादवी आणि आखाती देशातल्या इस्लामी सत्तांमधली मारामारी. सत्तेसाठी, वर्चस्वासाठी मारामारी. या मारामारीत कोण कोणाबरोबर कुठं असेल याचा नेम नाही. सगळेच शत्रू आणि सगळेच मित्र.