Browsed by
Month: November 2015

भारतीय पैसा परदेशात जातो परदेशातला पैसा भारतात यायला नाराज. कां?

भारतीय पैसा परदेशात जातो परदेशातला पैसा भारतात यायला नाराज. कां?

भारताची शेती व्यवस्था चांगली नसल्यानं भारतात पैसे गुतवतांना अमळ विचार
करावा, काळजी घ्यावी असं मत  चार्ल्स स्लॅब
या संस्थेनं नोंदवलं आहे. ही संस्था जगभरच्या गुंतवणुकदारांना सल्ला देत असते. 
चार्ल्स स्लॅबचं निरीक्षण नवं नाही. गेली वीसेक वर्षं भारतातलं शेतीचं
उत्पन्न घसरत चाललं आहे. भारतातले जमीन विषयक कायदे, शेतमालाच्या किमतींचं आणि व्यवहाराचं
नियंत्रण करणारे कायदे, एकूणच शेतकरी विषयक कायदे शेतीला मारक ठरले आहेत. बहुसंख्य
शेतकऱ्यांकडं एक हेक्टर जमीन. वीज व पाण्याची खात्री नाही. अशा स्थितीत एका हेक्टरातून
निघणार काय?  ना शेतकऱ्याला फायदा ना देशाला
फायदा अशी शेतीची अवस्था आहे.
म्हणूनच शेतीकडं व्यवसाय म्हणून पहाणारे भारतीय उद्योगी इतर देशात
जात आहेत. पंजाब आणि गुजरातेतले उद्योगी इथियोपियात आणि केनयात हज्जारो हेक्टर जमीन
भाडेपट्ट्यानं घेतात. पैसे गुंतवून तिथं नवं तंत्रज्ञान वापरतात. फुलं पिकवतात, भाज्या
पिकवतात आणि युरोप-रशियात निर्यात करतात. भारतात हज्जार भानगडी कराव्या लागतात. इतकी
जमीन कोणी घेऊ देत नाही. वीज, पाणी, परवानग्या मिळत नाहीत, पदोपदी पुढारी आणि नोकरशहांना
पैसे मोजावे लागतात. पैसे मिळवले तरीही कर आणि खंडण्या द्याव्या लागतात. परिणामी शेती
हा किफायतशीर उद्योग न रहाता आतबट्ट्याचा व्यवहार होतो.  भारतातला सामाजिक, राजकीय आणि सरकारी व्यवहार शेतीला
पोषक नाहीये. चार्ल्स स्लॅबनं तेच वेगळ्या शब्दात सांगितलंय.
हेच सत्य रीझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी उद्योगांसंदर्भात
सांगितलं आहे. अगदीच मुळुमुळु शब्दात ते म्हणाले की भारतीय उद्योगांत बाहेरून किंवा
भारतातून गुंतवणुक होत नाहिये.
शेती आतबट्ट्याची झाली म्हणून शेतीत गुंतवणूक होत नाही. उद्योग चालवणं
कठीण असल्यानं उद्योगी उद्योगात पैसे गुंतवायला तयार नाहीयेत. उद्योग उभा करणं, चालवणं
कठीण आहे. देशातले कामगार विषयक कायदे, जमीन मिळवण्याबाबतचे कायदे, वीज आणि इन्फ्रास्ट्क्चर
विषयक व्यवस्था, कर  आणि उत्पन्न विषयक कायदे
उद्योगींना जाचक वाटतात.  राजकीय आणि सरकारी
व्यवस्थेतला  कमालीचा भ्रष्टाचार हेही एक मुख्य
कारण आहे.
ओदिशामधे गेली दहा वर्षे कोरियातली पॉस्को कंपनी बॉक्साईट खाण  आणि  अल्युमिनियम उत्पादन हे उद्योग उभारण्याचा
प्रयत्न करत होती. परवाने मिळतांना अडचणी आल्या. पर्यावरणवादी, भाजपवादी, काँग्रेसवादी,
मार्क्सवादी अशा सर्वांनी आळीपाळीनं या उद्योगाला छळलं. आता पॉस्को उद्योग गुंडाळण्याच्या
प्रयत्नात आहे.
गेल्या आठवड्यात ओदिशातलीच बातमी आलीय. टाटा तिथं पोलाद उद्योग उभारत
आहे.  उद्योग उभारायला ओदिशा सरकारनं परवानगी
दिली असून प्रक्रिया सुरु आहे. ती प्रक्रिया तशी बरीच वर्षं चालू आहे. आता तिला चालना
मिळाल्यासारखं दिसतंय. अजून जमिनीवर काहीही घडलेलं नाही.   ओदिशाचे मुख्यमंत्री या प्रकल्पाची घोषणा करत होते
तेव्हां बाहेर पर्यावरणवादी आणि आदिवासी समर्थक संघटना निदर्शनं करत मुख्यमंत्र्यांना
भेटण्याच्या प्रयत्नात होत्या. राजकारणाचा हिशोब करून  भाजप किंवा काँग्रेस किंवा मार्क्सवादी भविष्यात
काय भूमिका घेतील त्यावर हा प्रकल्प उभं रहाणं अवलंबून आहे. या पैकी कोणी तरी एक नक्कीच
खोडे घालणार.
गेल्या दहा वर्षाच्या काळात टाटांनी आपलं बरंच भांडवल परदेशात गुंतवलं.
ब्रीटनमधल्या जग्वार कार बनवणाऱ्या कंपनीत टाटानं पैसे गुंतवले. भारतापेक्षा ब्रीटनमधे
पैसे गुंतवणं अधिक व्यवहार्य आणि फायद्याचं असल्यामुळं. टाटांच्या आधी कित्येक वर्षं
मित्तल ग्रुप जगभरच्या पोलाद उद्योगात पैसे गुंतवत आहे. बराच भारतीय पैसा परदेसात जातोय.
भारतात व्यवसाय करणं उद्योगीना जड जातंय.
वाहनं तयार करणाऱ्या एका चिनी कपनीनं महाराष्ट्रात नाशिक पुणे पट्ट्यात
उद्योग उभारायचं ठरवलं होतं. जमीन मिळवण्यातच तीनेक वर्षं आणि पैसा खर्च झाला. त्यातला
बराच वेळ आणि पैसा महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातले पक्ष यांच्यावर खर्च करावा
लागला. खूप खटपटीनंतर जमीन मिळाली. उद्योग सुरु करायची वेळ आली तेव्हां उद्योग चालवणंही
कष्टाचं, खर्चाचं आणि नाना खंडण्यामधे बुडालेलं आहे हे चिन्यांच्या लक्षात आलं. खर्च
इतका होणार होता की वाहनाची किमत इतर वाहनांपेक्षा जास्त होऊ लागली. महाग वाहनं कोण
खरेदी करणार? चीननं तो उद्योग सुरु न करण्याचं ठरवलंय.  दुसरं काही तरी करावं किंवा खर्च झालेले पैसे अक्कलखाती
टाकून पोबारा करावा असा निर्णय चिनी कंपनीनं घेतलाय.
फायझर ही अमेरिकन औषध कंपनी. अमेरिकेत कनेक्टिकट राज्यात तिचं मुख्यालय
आहे. या कंपनीनं  अलर्जेन ही कंपनी १६० अब्ज डॉलरला विकत घेतली आणि आपलं मुख्यालय आयर्लंडमधे
हलवलं. अमेरिकेतले विविघ कर जाचक वाटल्यानं कमी कर असणाऱ्या आयर्लंडमधे कंपनीनं कारभार
हलवला. फायझरनं देश सोडला, दुसऱ्या देशात वास्तव्य हलवलं.
ईज ऑफ बिझनेस अशी एक संकल्पना आहे. उद्योग करण्याची सुकरता. भारतात ती
सुकरता नाही असं जगभरातले लोक म्हणतात. उद्योगी माणसं बोंब करत नाहीत,  मनाशी खूणगाठ बांधून निर्णय घेऊन मोकळे होतात. भारताच्या
तुलनेत पाकिस्तान किती तरी अशांत आणि हिंसेनं व्याप्त आहे. तरीही भारताच्या तुलनेत
तिथं पैसे गुंतवायला उद्योग तयार होतात, चीन तिथं पोचलाय.  बांगला देशाला भारताच्या तुलनेत अधिक पसंती देऊ
असं जगातले उद्योगपती म्हणतात.
भारताचे पंतप्रधान आणि विविध सरकारी अधिकारी एप्रिलमधे फ्रान्समधे गेले
होते. तिथल्या विमान कंपन्यांशी भारतात उत्पादन व्यवस्था उभी करण्याची चर्चा झाली.  त्या कंपन्यांची माणसं भारतात पहाणी करून गेली.
आज नोव्हेंबर संपत आला. सात महिने झाले. पुढं हालचाल कानावर नाही. दिल्लीतल्या हालचाली
आणि घटनांवर लक्ष ठेवणारी माणसं सांगतात की भारतात विमान उत्पादन करणं महाग आणि त्रासाचं
आहे असं त्यांना पहाणीत आढळून आलं. सरकारची कामाची पद्दत, राजकीय वातावरण, विविध कायद्यांचं
जंजाळ उद्योगाला पोषक नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांनी काही मागण्या केल्यात,
खुलासे मागितलेत. त्याचं काय झालंय तेही अजून कानावर नाही.भारतात बाहेरून भांडवल यावं,
भारतात उद्योग चालावेत, भारतात रोजगार निर्माण व्हावा अशी सरकारची इच्छा आहे. प्रत्यक्ष
व्यवहार त्या इच्छेला पूरक आणि पोषक नाही असं त्यांना आढळून आलंय.
भारतातले पुढारी परदेशात जातात. तिथल्या उद्योगी आणि गुंतवणुकदारांना
खाजगीत भेटून पैसे मागतात. निवडणुकीसाठी. पैसे दिले नाहीत तर तुम्हाला उद्योग चालवताना
छळू आणि कुठून झक मारून भारतात उद्योग काढला असं करून टाकू असं पुढारी सांगतात. असे
पैसे द्यायला एनरॉन तयार झालं.एनरॉननं  राजकीय पुढाऱ्यांना
पैसे वाटले. हा खर्च इतका झाला की प्रकल्प महाग झाला, किफायतशीर राहिला नाही. पैसे
वाटूनही उद्योग बंद पडला.
 उद्योग पैसे द्यायला तयार होत
नाहीत. दिले तर अगदीच नाममात्र, सदिच्छादर्शक किंवा लाक्षणीक रुपात देऊ म्हणतात. तितके
पैसे भारतीय पुढाऱ्यांना खूपच कमी वाटतात. पैसे द्यायला नकार दिलेल्या उद्योगांच्या
पाठी कारवाया, कोर्टकचेऱ्या लावल्या जातात. किंवा कायद्यात न बसणारे करार केले जातात,
शेवटी उद्योग संकटात येतो.
  अंतर्गत व्यवहार पहाणाऱ्यांना
हे माहित असतं. उद्योग या गोष्टींची वाच्यता करत नाहीत. त्यामुळं या गोष्टी सामान्य
जनतेसमोर, मतदारांसमोर येत नाहीत.
तर हे असं आहे.
|||

आयसिस उत्तरार्ध

आयसिस उत्तरार्ध

 १९२६ साली केमाल पाशानं ऑटोमन खिलाफत बरखास्त केली. त्यानं अधिकृतरित्या राज्य – स्टेट- शरियापासून आणि कुराणापासून मुक्त केलं. अल बगदादी आणि आयसिसला पुन्हा एकदा खिलाफत म्हणजे सर्वंकष धर्मराज्य प्रस्थापित करायचं आहे. आधुनिकता आणि आधुनिक समाज न समजलेल्या इस्लामी लोकांना खिलाफत या कल्पनेचं फार आकर्षण आहे. 
इस्लामचं राज्य असलेल्या पाकिस्तान किवा सौदी अरेबियात इस्लामी माणसं सुखी नाहीत. इस्लामी राज्य नसलेले अमेरिका, युरोप, भारत इत्यादी देशात मुसलमान सुखानं जगत आहेत.
असं असूनही  काही मुसलमानांना वाटतं की त्यांची काल्पनिक दुःखं   खिलाफत स्थापन झाल्यावर लाभणार आहे. त्याना अल बगदादीचं आयसिस  त्यांच्या स्वप्नातलं काल्पनिक खिलाफत देणार आहे असं वाटतंय.
।।
आयसिस म्हणजे इस्लामी स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
आयसिसचं एक स्टेट म्हणजे राज्य तयार झालं आहे. खलिफा म्हणजे अल बगदादी राज्यप्रमुख आहे. त्याचे दोन उपप्रमुख आहेत. उपखालिफा. एक धार्मिक खातं संभाळतो, दुसरा सेक्युलर. त्या खाली मंत्रीमंडळ आहे. मंत्रीमंडळातले लोक विविध खात्यांचे प्रमुख आहेत. राज्यात विविध विभाग, शहरं आहेत. प्रत्येक शहरात शिक्षण, आर्थिक, लष्करी, धार्मिक इत्यादी खाती आहेत. प्रत्येक खात्यात काम करणारे कर्मचारी असतात, कमांडर्स असतात. त्यांना वरून आज्ञा येतात,  आज्ञा पालन केल्यानंतर ते  आपल्या कामाचा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवतात. राज्यामधे धार्मिक आज्ञेचं पालन केलं नाही तर हुदूद कायद्यानुसार शिक्षा केल्या जातात. म्हणजे डोकं उडवणं, हात किंवा पाय कापणे, फटके देणे इत्यादी. इतर कायदे मोडले तर तझीर कायद्यानुसार शिक्षा केल्या जातात. कायदा म्हणजे शरिया. शरियाची काटेकर अमलबजावणी करण्यासाठी शरिया पोलिस असतात आणि शरिया कोर्टं असतात.
शिक्षेच्या घटना चित्रीत केल्या जातात, वेब साईटवर टाकल्या जातात, ऑडियो टेप्स आणि पुस्तिकांच्या रुपात वितरित केल्या जातात.
शिक्षा अशा. सुळावर चढवणं. डोकं उडवणं. बलात्कार करणारे,  बलात्काराचे बळी यांची हृदयं शरीरातून बाहेर काढून छातीवर लटकवणं. समूह हत्या. म्हणजे लोकांना ओळीनं उभं करून मारणं. समलिंगी गुन्हेगारांना उंच इमारतींच्या छतावरून ढकलणं. 
उडवलेली मुंडकी रांगेनं एका लाकडी ओंडक्यावर लावली जातात, त्यांचं प्रदर्शन भरवलं जातं. उडवलेली मुंडकी लाकडाच्या तुकड्यावर रोवून नाचवली जातात, मिरवणुक काढली जाते. मुंडक्यांच्या माळा इत्यादी गोष्टी मुद्दाम मुलांना दाखवल्या जातात. मुंडकी उडवतांना मुलांना हजर ठेवलं जातं, त्यांना जिहादी करण्यासाठी. 
अल कायदाच्या अबु बकर नाजी या तत्वज्ञानं  वरील शिक्षा पद्धतींचं एक मॅन्युअल तयार करून प्रसिद्ध केलं आहे. त्यात शिक्षा पद्धत, शिक्षांचं तात्विक समर्थन इत्यादी गोष्टी दिल्या आहे. या साऱ्या शिक्षा इस्लामला धरून आहेत हे तकी अल दिन इब्न तमिय्या या तेराव्या शतकातल्या इस्लामी विचारवंताचा हवाला देऊन सांगितलं आहे. या मॅन्युअलमधे पहिला खलिफा अबु बकर यानं आपल्या खिलाफतीच्या दोन वर्षाच्या काळात इस्लाम सोडून गेलेल्या लोकांना केलेल्या शिक्षांचे तपशील दिले आहेत.
।।
आयसिसची राजधानी.राक्का. 
सीरिया. इराकच्या हद्दीजवळ.  
आयसिसचा कारभार राक्कामधून चालतो. अल बगदादी इथंच मुक्काम करून असतो असं म्हणतात. म्हणूनच या शहरावर अमेरिकेनं खूप हल्ले केले. अनेक वेळा बगदादी जखमी झाला, बगदादी मेला अशा बातम्या आल्या. बगदादी कदाचित जखमी झाला असेल पण मेल्यासारखा वाटत नाही. राजधानी असल्यानं या शहरात मजबूत लष्करी सिद्धता आहे.
सीरियात बशर असद यांची राजवट आहे. राक्कामधली जनता सामान्यतः असद राजवटीवर खुष असे. कारण इथे बहुसंख्य असलेल्या जमातींना असद राजवटीनं सुखात ठेवलं होतं. यादवी सुरु झाल्यावर २०१३ साली असदविरोधी बंडखोर गटांनी या शहराचा ताबा घेतला. असदविरोध एकसंध नव्हता, त्यात अनेक संघटना होत्या आणि त्या संघटना आपसात सत्तेसाठी भांडत होत्या. प्रत्येक संघटनेला असद सरकार घालवून त्या जागी आपलं एकछत्री राज्य हवं होतं. अहरार अल शाम, जबात अल नुस्र ( अल कायदाची शाखा ), काही छोट्या टोळ्या या  विरोधकांनी  राकात पाय रोवले आणि ते आपसात भांडू लागले. स्थानिक जनता वैतागलेली होती. अशा स्थितीत अल बगदादीच्या आयसिसनं २०१३ च्या ऑगस्टमधे राकात पाऊल ठेवलं. इतर संघटनांची विल्हेवाट लावली आणि एकसंध शासन बसवलं. 
२०१४ च्या जूनमधे अल बगदादीनं तो खलिफा असून त्यानं खिलाफत म्हणजे खलिफाचं इस्लामी राज्य स्थापन झाल्याचं जाहीर केलं. 
राज्य स्थापन झाल्या झाल्या शरिया कायदा लागू करण्यात आला, कायदा मोडणाऱ्याला शरिया कायद्यानुसार शिक्षा होतील असं जाहीर करण्यात आलं. लोकांना जरब बसावी म्हणून सुरवातीलाच मुंडकी उडवून ती बंदुकीच्या टोकावर लावून नाचवण्यात आली. 
राकामधे महापालिका होती. पालिकेतले पूर्वीचे नोकर आयसिसनं जसे होते तसेच टिकवले. त्यांना सांगण्यात आलं की आता ते सीरियन सरकारसाठी नव्हे तर इस्लामी खिलाफतसाठी काम करत आहेत. तेच टेलेफोन व्यवस्थेबाबतही.  शाळा होत्या तशाच ठेवल्या फक्त अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. विज्ञान आणि फ्रेंच हे विषय घालवले, त्या जागी इस्लामी शिक्षण हा विषय सक्तीचा केला. हॉस्पिटलातल्या डॉक्टरना सूचना गेल्या, पुरुषांनी पुरुषांना तपासायचं आणि स्त्री डॉक्टरांनी स्त्रियांनाच तपासायचं. स्त्री पेशंटना पुरुष डॉक्टरांनी  हात लावायचा नाही, पुरुष पेशंटना स्त्री डॉक्टरांनी हात लावायचा नाही.
स्त्रियांचं जग,  बुरखा,चूल,घर आणि नवरा. 
धुम्रपान आणि मद्यपान बंदी. शहरात आयसिसचे पोलिस चाबूक आणि साखळदंड घेऊन हिंडत, कायदा मोडणाऱ्याला जागच्या जागी फटके. 
टी शर्ट घालायला हरकत नाही पण त्यावर चित्र किंवा मजकूर असता कामा नये.
पाच वेळा नमाज. नमाजाच्या वेळी दुकानं, कार्यालयं बंद. नमाजाच्या वेळी कोणी बाहेर हिंडताना दिसला तर फटके.
दुकानदार आपल्या उत्पन्नाच्या २.५ टक्के अधिक ८.३० डॉलर येवढी रक्कम दर महा आयसिसला देतात. हा कर आहे पण आयसिस त्याला जकात असं म्हणतं. जकातचा अर्थ दान, धर्मादाय दान. इस्लाममधे व्याज आणि कर या गोष्टी मान्य नाहीत. माणसानं समाजातल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणून दान, जकात द्यायची असते. इस्लामच्या काळात राज्य, सरकार, आर्थिक विकासासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकी, शाळा, वीज इत्यादी गोष्टी नव्हत्या त्यामुळं सरकारला महसूल गोळा करावा लागत नव्हता. अगदीच प्राथमिकपेक्षाही प्राथमिक अशी अर्थव्यवस्था असल्यानं जकातीवर भागत होतं. 
 टोळी प्रमुख लुटालूट करत असल्यानं लूट हे खरं उत्पन्न होतं. महंमदही लूट करूनच पैसा उभा करत असत. 
प्रत्येक नागरीक महिन्याला सुमारे २ डॉलर टेलेफोन वापरण्यासाठी देतात. टेलेफोन व्यवस्था असद सरकार चालवतं.  पैसे मात्र आयसिस वसूल करतं.
।।
टिक्रीत
२०११-२०१२ चा काळ. इराकमधे यादवी चालली होती. अमेरिकी सैन्याच्या बळावर नुरी अल मलिकीचं इराकी सरकार कार्यरत होतं. इराकी सैन्य बरखास्त झालं होतं. अमरिकेच्या मदतीनं नवी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची खटपट अल मलिकी करत होते. इराकी सरकारात शियांचं वर्चस्व वाढत होतं. अल मलिकी हे इराणचे हस्तक होते. इराकी सैनिक बिनधास्त सुन्नी शहरं, सुन्नी वस्त्यांवर हल्ला करत. सुन्नी माणसं वैतागलेली होती. सरकार होतं, पोलिस होते, सैन्य होतं, कोर्टं होती तरीही इराकमधे अस्थिरता, अशाश्वती, अराजक होतं. या स्पेसमधे आयसिसचा आधीचा अवतार, इस      ( IS ) हातपाय पसरत होता. 
१०१२ सालातला एक दिवस. आदल्याच दिवशी बातमी आली होती की पलिकडचं मोसुल हे इराकमधलं दोन नंबरचं गाव आयसिसनं काबिज केलं आहे. टिक्रीतच्या लोकांचा विश्वासच बसत नव्हता. 
युसुफ याचं आयटीचं दुकान. दुपारी त्याला इस्लामी संघटनेच्या माणसाचा फोन आला. ‘ तुला चांगला धंदा करायचा आहे ना, धंद्यात टिकायचं आहे ना? मग १ लाख  डॉलर पाठवून दे.’ 
युसुफनं विचारलं ‘ तू कोण आहेस, तुझी संघटना कोणती?’ 
पलिकडून आवाज आला ‘ इस्लामी स्टेट. ’
युसुफची चिडचीड झाली. असा अनुभव त्यानं पूर्वी घेतलेला नव्हता. त्यानं नकार दिला. त्याला नंतर कळलं की त्याचा धंदाच नव्हे तर जीवही धोक्यात आहे. त्यानं रदबदली केली. ५० हजार डॉलरवर मांडवळ झाली. त्या माणसानं समारा या गावातल्या एका माणसाला भेटायला सांगितलं. युसुफनं तिथं पैसे पोचवले.
समारा हे अल बगदादीचं गाव.
अशा रीतीनं एकेका माणसाला धरत आयएसनं पैसे गोळा केले. या भानगडीत पोलिस काही करत नाहीत, सरकारी यंत्रणा काही करत नाही हे आयएसनं अनुभवलं. सरकार आयएसला घाबरलं होतं, हातपाय गाळून बसलं होतं. थोडक्यात म्हणजे टिक्रीत हे गाव पोकळ झालं होतं.
२०१४ सालपर्यंत टिक्रीत पिकलेल्या फळासारखं लोंबायला लागलं होतं. जूनमधली गोष्ट. टिक्रीतमधल्या   शाळेत शिकवणारा शिक्षक महमुद, दुपारी दररोजच्या सवयीनुसार जेवायला आणि दुपारची डुलकी घ्यायला घरी गेला. कारनं. जेवण होतं न होतो ते त्याला बगदादमधून फोन आला. ‘ आम्ही ऐकतोय की टिक्रित आयसिसनं काबीज केलंय.’  महमुद म्हणाला ‘ कसं शक्य आहे. आता तर मी आरामात घरी पोचलो. कुठ बंदुकीचा किवा बाँब फेकल्याचा आवाज नाही.’ 
महमुद कारमधे बसून शाळेकडं निघाला.  वाटेत आयसिसच्या गाड्या आरामात फिरताना दिसल्या. त्याला कळलं की फक्त सात गाड्यातल्या तीस आयसिसच्या जिहादींनी टिक्रीत शहर काबीज केलंय. आरामात. सरकारच्या एकाही माणसं किंचतसाही विरोध केला नाही. इराकी सैन्य निव्वळ वितळून गेलं होतं.
 टिक्रीत गावात एका छावणीत इराकी पोलिस आणि सुरक्षा सैनिक होते. त्यांची संख्या ३ हजार होती.   ३ हजार सैनिक  चणे खात होते आणि ३० लोकांनी शहर ताब्यात घेतलं. 
काही वेळानं अबु अजिल या जमातीतले लढवय्ये टँक्स आणि जीप्समधून टिक्रीतमधे पोचले. अबु अजिल ही जमात आयसिसमधे सामिल होती. त्यानी सरकारी सुरक्षा छावणी ताब्यात घेतली. तिथल्या सैनिकांचे वीस वीस लोकांचे गट करून छावणीबाहेर नेले आणि त्यांना गोळया झाडून घाऊक पद्धतीनं  मारलं. 
छावणी गावाबाहेर होती. छावणी लगतचे नागरीक, छावणीपासून अंतरावर असलेल्या उंचवट्यावर रहाणारे नागरीक यांनी शिरकाण पाहिलं. सैनिकांची प्रेतं गोळा करून आयसिसचे लोक शहरात फेकत होते. शेजारच्याच वस्तीत रहाणाऱ्या झैनबच्या कानावर गोळीबाराचे आवाज येत होते. तिच्या कानात ते इतके बसले की अजूनपर्यंत तिला तेच आवाज ऐकायला येतात.
आयसिसनं जाहीर केलं की आता इराकी सरकार संपलं आहे, आयसिसची खिलाफत सुरु झाली आहे. सरकारनं विविध कमिट्या तयार केल्या. शिक्षण, कारभार, न्याय इत्यादी. एक झाली रियल एस्टेट कमिटी. तिनं गावभर फिरून सरकारी इमारती, पोस्ट ऑफिसं, बँका, टाऊन हॉल इत्यादींची पहाणी करून त्या इमारती ताब्यात घेतल्या, तिथं आपल्या कचेऱ्या स्थापल्या. 
एका कमिटीचं नाव पश्चात्ताप कमिटी. इराकच्या सरकारात विविध पदांवर कामं केलेल्या लोकांना त्यांनी केलेल्या कामावर पश्चात्ताप प्रकट करायला सांगण्यात आलं. ज्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला नाही, चालढकल केली त्याना तिथल्या तिथं गोळी घालून मारण्यात आलं. हा इवेंट जाहीरपणे घडला. त्यामुळं नंतर नंतर माणसं थरथरतच येत आणि पश्चात्ताप व्यक्त करत. मग कोणाला दंड भरावा लागे, कोणाला सांगितलेलं काम करावं लागे.
शहरात शरिया कायदा लागू झाला. विद्यापीठातले कायदा, इतिहास आणि जीवशास्त्र हे विभाग बंद करण्यात आले. कला हाही विषय बंद. चित्रं आणि संगित बंद. इराकी झेंडे उतरवण्यात आले, त्या जागी आयसिसचे काळे झेंडे लावण्यात आले. मशिदीतल्या जुन्या इमामांना हाकलण्यात आलं, आयसिसचे नवे इमाम नेमले गेले. स्त्रियांना घराबाहेर पडायला बंदी. बाहेर पडायचं तर डोक्यावर दुपदरी बुरखा हवा आणि सोबत एक पुरुष हवा. बाप किंवा भाऊ किंवा नवरा किंवा मुलगा. इतर कोणी सापडला तर दोघंही जागच्या जागी खलास. संस्कृती-धर्म पोलिसांच्या टोळ्या गावात फिरू लागल्या. स्त्रियाही पोलीस होत्या. धर्म आणि संस्कृतीचं पालन. बुरखा न घेतलेली स्त्री, दाढी न वाढवलेला पुरुष, जीन्स घातलेला माणूस, तोंडाला दारूचा वास. ताबडतोड बाजारात लोकांसमोर शिक्षा. लोकांना लाऊड स्पिकरवरून दवंडी देऊन गोळा केले जात असे आणि त्यांच्यासमोर शिक्षा.  गोळा केलेल्या लोकांच्या लहान मुलं जास्त. त्यांना धाक निर्माण व्हावा,  लहानपणीच त्यांनी जिहादी व्हावं या साठी.
 शिक्षा म्हणजे सामुहिक घाऊक गोळीबार, डोकं उडवणं इत्यादी.
बासिल रमादान. इराकी सैन्यात होता. त्याची चारही मुलं सैनिक होती. आयसिसनं हुकूम दिल्या प्रमाणं त्या सर्वांनी आपल्याजवळच्या बंदुका आयसिसला दिल्या. मग आयसिसनं इराकी सैन्यात नोकरी केल्याच्या गुन्ह्यापोटी प्रत्येकाला  २५०० डॉलर मागितले. सर्वानी दिले. तरीही आयसिसचा संशय शिल्लक होता. त्यांनी एकेका मुलाला चौकीत नेलं आणि ठार मारलं.
 आता एकटा बासिल उरला होता. आपली धडगत नाही हे तो कळून चुकला. त्यानं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा केलं. नाईलाजानं आपण इराक सोडून जाणार आहोत असं सांगितलं. बंदुक घेऊन बाहेर पडला. जवळच्या आयसिसच्या केंद्रात गेला. समोर दिसले तेवढे आयसिसचे जिहादी त्यानं मारून टाकले.   गोळ्या संपल्या. मग आयसिसच्या जिहादीनं त्याला गोळ्या घालून मारलं.
टिक्रीत हे मुळातलं शांत शहर. दोनेक लाख लोकवस्ती. शिया आणि सुन्नी सुखानं एकत्र नांदत होते. टेन्शन नाही. गुन्हेगारीचा मागमूस गावात नव्हता. लोक मस्तपैकी वाईन, व्हिस्की वगैरे पीत असत, इस्लाम काहीही म्हणो. आयसिसनं वर्चस्व स्थापन केल्यावर लोकांनी आपापल्या घरातले वाईनचे आणि व्हिस्कीचे क्रेट्स गावाबाहेर नेऊन फेकून दिले. 
अदेल नावाचा एक तरूण. वांड होता. तो आयसिसच्या दादागिरीकडं दुर्लक्ष करे. समोरच्या मशिदीमधे चाललेली व्याख्यानं तो आपल्या बाल्कनीत व्हिस्कीचे घोट घेत ऐकत असे. त्याचा शेजारी अली वाईनच्या बाटल्या फेकून देतोय हे पाहिल्यावर त्याला काळाचं वळण समजलं. इथं रहाण्यात अर्थ नाही असं म्हणून त्यानं गाव सोडायचं ठरवलं, दारुच्या बाटल्या जमिनीत पुरून तो गावाबाहेर पडला. थोडं अंतर  गेल्यावर त्याला आठवलं की दोन व्हिस्कीच्या बाटल्या टेबलावर शिल्लक होत्या. टरकला. आपलं खरं नाही असं कळल्यावर त्यानं अलीला फोन केला आणि सांगितलं की काहीही करून ताबडतोब त्या बाटल्या फोडून टाक. 
अलीला निरोप दिल्यावर अदेल आणखी वेगानं पळाला, जेणेकरून  आयसिसची माणसं त्याच्या पर्यंत पोचू नयेत.
 शहराची पार धूळधाण उडाली. ज्यांना शक्य होतं ती माणसं परागंदा झाली. ज्यांना अगदीच शक्य नव्हतं तेवढी टिकली. काही हजार माणसं. 
 एके दिवशी अमेरिकेच्या आणि इराणच्या मदतीनं इराकी सैन्यानं टिक्रीतवर हल्ला केला. जिहादी मारले. टिक्रीत पडलं. शहरात नवी व्यवस्था उभी करणं इराकी सरकारला जमलं नाही. गुंडांनी गावाचा ताबा घेतला. आयसिसच्या गुंडांच्या जागी नवे गुंड आले. 
 आपण कधी तरी आपल्या घरात परत येऊ असं वाटणारे टिक्रिती लोक गावात यायला तयार नाहीत. ते आता कायमचे परागंदा आहेत.
।।
आयसिसची अर्थव्यवस्था.
परदेशातून उघड किवा छुपेपणानं माणसं आयसिसला पैसे पाठतात.   आयसिस शियांच्या विरोधात लढत असल्यानं, आयसिस ही सुन्नी संघटना असल्यानं,   सौदी, कतार इत्यादी सुन्नी  देश आयसिसला पैसे देतात. 
आयसिसनं सिरिया आणि इराकमधल्या तेल विहिरींचा ताबा मिळवला आहे. विहिरीतून निघणारं तेल अनधिकृतरीत्या विकलं जातं. 
अपहरण, बँका लुटणं, माल आणि माणसं यांची वाहतुक यावरची  जकात हेही उत्पन्नाचे मार्ग आहेत.
सिरिया आणि इराकमधे पाचेक हजार वर्षांच्या पुरातन वस्तू आहेत. त्या विकणं हाही एक उत्पन्नाचा मोठा मार्ग आहे. ही विक्री काळ्या बाजारात होते. श्रीमंत अमेरिकन, युरोपीय, ब्रिटीश, सौदी इत्यादी लोक बोली लावतात, वस्तू मिळवून पसार होतात.
 आयसिस इस्लामी कर, जकात बसवतं. 
जमा झालेले पैसे, युद्ध व इतर गोष्टींवर खर्च झालेले पैसे याचा हिशोब ठेवला जातो आणि दरवर्षी मार्च महिन्यात तो प्रसिद्ध केला जातो. २०१५ च्या जानेवारीपर्यंत आयसिसचं उत्पन्न २ अब्ज डॉलर होतं आणि २५ कोटी डॉलरची शिलकी रक्कम युद्ध खात्यात जमा केलेली होती.
।।
आयसिसच्या खिलाफतीत किती सक्रीय जिहादी आहेत? 
पश्चिमी माध्यमं आणि सरकारांच्या मते जिहादींची संख्या १ लाख आहे. आयसिसमधे प्रत्यक्ष वावरून बाहेर पडलेल्या अभ्यासकांच्या मते त्यापेक्षा किती तरी जास्त सैनिक आयसिसमधे आहेत. एक तृतियांश सिरिया-इराकी नसलेले म्हणजे बाहेरचे आहेत.  २१ टक्के लिबियन.  १६ टक्के ट्युनिशियन आणि सौदी. ११ टक्के जॉर्डनियन. १० टक्के इजिप्शियन. ८ टक्के लेबॅनीज. तुर्की जिहादींची सख्या सुमारे दोन हजार म्हणजे २ टक्के आहे. ६ टक्के फ्रेंच. ४.५ टक्के ब्रिटिश. २०० ऑस्ट्रेलियन. 
आयसिस आणि जिहादी आपसातले आर्थिक व्यवहार बिट कॉईन्स या फिजिकल अस्तित्व नसलेल्या आभासी चलनात करतात. बिट कॉईन्समधे हिशोब होतो आणि नंतर प्रत्यक्ष डॉलरमधे त्याचं रुपांतर करून व्यवहार केले जातात.
।।
आयसिसच्या प्रचार विभागाचा प्रमुख आहे अबु महंमद अल अदनानी अल शामी, एक सिरियन जिहादी. इलेक्ट्रॉनिक संदेश तयार करण्याची तांत्रिक जबाबदारी एका फ्रेंच जिहादीवर आहे. त्यानं माध्यमाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण मेसॅच्युसेट्स इन्सटिट्यूटमधे ( एमआयटी, अमेरिका ) घेतलं आहे. त्यानं तयार केलेला एक प्रभावी संदेश असा. ” पश्चिमी देशात रहाणाऱ्या एकलकोंड्या जिहादी लांडग्यानो. आयसिसच्या विरोधात लढणाऱ्या देशांमधे रहात असाल तर त्या देशातल्या नागरिकांना मारून टाका, जसं जमेल तसं. हवं तर अंगावर कार घालून. “
प्रचार विभागाकडं शेकडो आयटी विशेषज्ञ आहेत. ते नाना प्रकारचे आयपी पत्ते तयार करतात आणि इंटरनेटवरच्या देखरेख ठेवणाऱ्या संस्थांना मामा बनवतात. २०१४ साली अमेरिकेनं वरील प्रकारचे ४५ हजार संदेश नेटवरून पुसुन टाकले. न पुसता आलेले कित्येक संदेश शिल्लक असतील येवढं सायबर  जिहादी जाळं आहे.
।।
आयसिसचा खलिफा.
अबु बकर अल बगदादी. तो लोकांसमोर येत नाही, टीव्हीवर भाषणं वगैरे करत नाही, शक्यतो दिसण्यापासून दूर रहातो. कधी कधी लोक त्याला अल शबाह म्हणजे अदृश्य शेख म्हणतात. तो आपल्या कमांडरांसमोर भाषण करतो तेव्हां चेहरा मास्कनं झाकून घेतो.
अल बगदादीनं इमामतचं रीतसर शिक्षण घेतलं आहे. बगदाद विद्यापिठातून त्यानं इस्लामी कायदा या विषयावर बीए, एमए आणि पीएचडी केली आहे. या उलट ओसामा बिन लादेननं तसं रीतसर धर्मशिक्षण घेतलेलं नाही. अल बगदादी हा निष्णात लढवय्याही आहे आणि धार्मिक नेताही. खलिफा व्हायला तो लायक आहे. 
खलिफा म्हणजे मुसलमानांचा राजकीय आणि धार्मिक नेता. महंमदांच्या मृत्यूनंतर एकामामागोमाग एक असे खलिफा इस्लामचं साम्राज्य चालवत होते. खलिफा हे पद महंमदांच्याच घराण्यातल्या माणसाला मिळालं पाहिजे असा आग्रह धरणारे शिया. ते पद जाणत्यांनी, शहाण्यांनी, ज्येष्ठांनी विचार करून भरावं, त्या पदावर महंमदांच्याच वंशाचा माणूस असायला हवा असं नाही असं म्हणणारा गट म्हणजे सुन्नी. अल बगदादी थेट महंमदांच्या वंशातला नाही. अल बगदादी बोबाद्री जमातीत जन्मला.  ही जमात कुरेश या जमातीचा एक फुटवा आहे. कुरेश ही महंमदाची जमात.
त्याचं खरं नाव आहे इब्राहिम बिन अव्वाद बिन इब्राहिम अल बद्री अल कुरेशी. त्याचा जन्म इराकमधील समारा गावातला, १९७१ सालचा. एकेकाळी समारा हे गाव अब्बासिद साम्राज्याची राजधानी होतं. 
अल बगदादीच्या घराण्यात अनेक इमाम झाले.  स्वतः अल बगदादी हाही एक इमाम आहे.  इमाम म्हणजे प्रार्थनेचं नेतृत्व करणारा माणूस.  इस्लाममधे पुरोहित, मध्यस्थ नसतात.  देव आणि उपासक यांच्यात थेट संबंध असेल अशी इस्लामची कल्पना आहे. खरं म्हणजे प्रेषित म्हणजे महंमद हेही देव आणि उपासक यांच्या मधे येत नाहीत. प्रेषितांनी इस्लामचा संदेश लोकांपर्यंत पोचवला येवढंच. इस्लामचा अगदी कडक अर्थ लावायचा झाला तर प्रेषिताची पूजा करणं, प्रेषितांचं कथन पवित्र मानणंही धर्मात बसत नाही. असो.  
एकच अल्ला, महंमद हा एकच आणि शेवटला प्रेषित, प्रार्थना, हज, दान आणि श्रद्धा. येवढ्या गोष्टी जाहीर केल्या की माणूस इस्लामी होतो. त्यासाठी कोणाची मध्यस्थी लागत नाही. उपासकानं कुराण वाचावं आणि वरील अटीप्रमाणं वागावं की संपलं. या पैकी प्रार्थना ही सामुहिक गोष्ट आहे. इस्लाममधे दिवसातून पाच वेळा सामुहिक प्रार्थना महत्वाची आहे. घरात मनातल्या मनात किवा घरातल्या घरात प्रार्थना नव्हे तर सामुहिक प्रार्थना. त्या प्रार्थनेचं नेतृत्व एक माणूस करतो. प्रार्थना झाल्यावर तो त्याची काही मतं व्यक्त करतो. ती त्याची व्यक्तिगत मतं असतात, ती उपासकांवर बांधिल असतातच असं नाही. इस्लामच्या रचनेत इमामाचं महत्व मर्यादित आहे.  
 इमाम जाणता असतो, अभ्यासक असतो त्यामुळं एक जाणकार शहाणा या नात्यानं लोक त्याच्याकडं पहातात. परंतू त्याच्यामागं राज्यसत्ता उभी असल्यानं त्याचं महत्व वाढतं. राज्यकर्त्याच्या, सुलतानाच्या वर्तनाला इमाम विरोध करत नाही. विरोध केला तर त्याचं डोकं उडवलं जातं. इमामाची आपल्याला मान्यता आहे असं त्यामुळं राज्यकर्ता बिनधास्त सांगू शकतो. खलिफा म्हणजे इस्लामी समाजाचा प्रमुख हा ऐहिक आणि धार्मिक दोन्ही बाबतीत प्रमुख असतो असं मानण्याची प्रथा महंमदांपासून सुरु झाली. नंतरच्या काळात राजाला समांतर अशी धर्माची, इमामांची सत्ता असली तरी ती सत्ता राजापुढं झुकणारीच असल्यानं इमाम साधारपणपणे राजसत्तेच्या होला हो म्हणतात.
ख्रिश्चॅनिटीनं चर्च नावाची संस्था उभी केली. ती अधिकारी संस्था असते. पोप हा तिचा प्रमुख असतो.   गावापासून ते रोमच्या प्रमुख प्रतिनिधी मंडळापर्यंत अशी निवडलेल्या प्रतिनिधींची एक साखळी यंत्रणा असते. धर्माबाबतचे निर्णय सर्वोच्च मंडळात घेतले जातात, पोप हा अधिकृत नेता असतो. पृथ्वीभोवती जग फिरतं किवा नाही यावर गॅलिलिओ काहीही म्हणो, पोपचा निर्णय   अंतिम मानला जातो.  स्टेम सेलचा वापर संशोधनासाठी, उपचारासाठी करायचा की नाही याबाबत पोपचा निर्णय अंतिम मानतात, वैज्ञानिकांचा निर्णय मानत नाहीत. मग भले पोपची मतं अवैज्ञानिक कां असेनात.  
इस्साममधे चर्च नाही पोप नाही. इस्लाममधे कुराण आणि प्रेषितांची वचनं व वर्तन याच गोष्टी मार्गदर्शक असतात आणि त्याचा कोणताही अर्थ काढायला कोणीही माणूस मोकळा असतो. तत्वतः. व्यवहारात मात्र ज्याच्या हाती तलवार, ताकद, सत्ता त्याचंच म्हणणं इस्लामी समाज मान्य करतो.
हिंदू धर्मात तर मजाच मजा. देव नाही मानला तरी बिघडत नाही. राजा हा देवाचा अंश असतो असं मानलं तरी हरकत नाही. (शिवाजीनं  ब्राह्मण पुरोहितांकडून राज्याभिषेक करवून घेतला.)  राजा देवाला जबाबदार असतो, देवानं सांगितलेल्या गोष्टी त्याला पार पाडायच्या असतात. परंतू राजा सांगेल ते ऐकायला खालचे लोक बांधिल असतातच असं नाही. राजाचंही ऐकत नाहीत आणि राजपुरोहिताचं तर नाहीच नाही. शिवाजीविरोधात हिंदू सरदारच बंड करत असत. हिंदू शिवाजी विरोधात हिंदू सरदार. थोडक्यात म्हणजे माणसाचं धर्मासंबंधीचं वागणं ठरवण्याचा अधिकार हिंदू परंपपरांत कोणालाही नाही आणि सर्वानाच आहे. अंगाला राख फासलेले, भगवे कपडे घालणारे, पौरोहित्य करणारे, शास्त्रार्थ सांगणारे इत्यादी लोक त्यांना सांगायचं ते सांगतात. लोक त्यांना हवं ते करतात, वरील लोकांचं ऐकण्याचं बंधन त्यांच्यावर नाही. त्यामुळं हिंदू धर्मात धार्मिक आज्ञा कोणी देत नाही, दिल्या तरी त्या स्वीकारण्याचं बंधन कोणावरही नाही. अर्थात असे अधिकार नसतांनाही धर्माच्या नावानं कोणीही गुंडगिरी करू शकतो.
 धर्म आणि देव न मानणाराही हिंदूच असतो. 
   धर्माचा गैर वापर करण्याची वाट   हिंदू आणि इस्लाम दोघांमधेही मोकळी आहे. ख्रिश्चॅनिटीत धर्माचा वापर गुंडगिरीसाठी करायचा असेल तर त्याला पोपची अधिकृत परवानगी लागते येवढंच. पोपला मॅनिप्युलेट करता येतं असा इतिहासाचा दाखला आहे. बेकायदेशीर, अनैतिक उद्योग करणारे पोपही होऊन गेले.
।।
२००३ मधे जॉर्ज बुशनी इराकमधे सैन्य घुसवलं. सद्दाम हुसेन राजवट संपवण्यासाठी. इराकवर आक्रमण करण्यासाठी  अमेरिकेतले ट्विन टॉवर्स नष्ट करणाऱ्या अल कायदाचा मुक्काम इराकमधे आहे हे कारण बुशनं पुढं केलं. परंतू लवकर जगजाहीर झालं की अल कायदा तिथं नाहीये, उलट सद्दाम हुसेन हा अल कायदाचा प्रखर विरोधक आहे. मग बुशनी दुसरं कारण पुढं केलं. इराककडं महासंहारक शस्त्रं आहेत. तेही खोटं निघालं.  एकेक सबब खोट्या  ठरेपर्यंत लाखो अमेरिकन सैनिक इराकमधे घुसले होते. अमेरिकेनं सद्दामला फाशी दिली. इराकी सैन्य बरखास्त केलं. तीनेक लाख इराकी सैनिक बेकार झाले. कित्येक इराकी सैन्याधिकाऱ्यांना, जनरल्सना अमेरिकेनं कँप बक्का या छळछावणीत पाठवलं. 
अनेक इराकी जनरल  अमेरिकन लष्कर प्रमुखाना भेटले आणि म्हणाले ” सैन्य बरखास्त करू नका. सैनिक शस्त्रांसकट देशोधडीला लागतील आणि काय वाट्टेल ते करत सुटतील. सैन्य ठेवा, हवं तर तुम्हाला नको असलेल्या माणसांना काढून टाका. पण लष्कर शिल्लक ठेवा.”
बुशचे सल्लागार बेकार होते. बंडल सल्ले देण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सेनाधिकाऱ्यांचं ऐकलं नाही. सैन्य बरखास्त करून अधिकाऱ्याना छळछावण्यात डांबलं. त्यातली बक्का छळछावणी  जिहादी विद्यापीठ बनली. अबु मुस्लीम अल तुर्कमानी हा जनरल सद्दामच्या क्रूर इंटेलिजन्सचा प्रमुख आणि  अबु अली अल अनबारी इराकी सैन्यात मेजर जनरल होता.  दोघंही बक्का छावणीत एकत्र आले, त्यांनी सैनिकांची संघटना बांधली आणि नेटवर्किंग करून इराकभर सैनिकांचं जाळ उभारलं. तुरुंगात असतानाच. वेळ आल्यावर ही प्रशिक्षित आणि सशस्त्र मंडळी अल बगदादीला सामिल झाली. वरील दोन्ही जनरल्स आज आयसिसच्या सैन्यात आणि कारभारात दोन नंबरवर आहेत.
     २०११ पर्यंत इराकमधे अमेरिकन सैन्य होतं पण तळातली परिस्थिती अमेरिका विरोधी होती. अल बगदादी सीरियात घुसला, असदशी भांडू लागला. तिथं त्याला जागा मिळाली. अल कायदा तिथं नव्हतं. २०१३ पर्यंत तिथं त्यानं माणसं गोळा केली. त्यात त्याला सौदी, कतार यांची मदत मिळाली. २००४ मधलं आयएस २०१४ मधे आयसिस झालं, इस्लामी स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. २०१४ मधे तो इराकमधे घुसला. तोवर अमेरिकन सैन्य ना मलिकीला हवं होतं ना ओबामाची रहायची इच्छा होती. ओबामा गोंधळात. त्यांना परिस्थितीचा नेमका अंदाज नाही. त्यांनी सैन्य बाहेर काढलं. आयसिसला अनेक जुने इराकी सैनिक हाताशी मिळाले. इब्राहिम इझ्झत अल दुरी हा सद्दामचा ज्येष्ठ अधिकारी बगदादीला सामिल झाला.  
   २००१ पासून अबु मुसाब अल झरकावी हा मुल्ला इराकमधे सक्रीय होता. त्याला ओसामा बिन लादेननं वाढवलं, अल कायदाची एक शाखा म्हणून.  झरकावी उस्ताद होता, त्याचा अजेंडा वेगळाच होता. त्याला अल कायदासारखं अख्ख्या जगामधे इस्लामी राज्य स्थापन करायचं नव्हतं. त्याची खिलाफत इराक आणि सिरियापुरतीच मर्यादित होती. त्यानं दोन्ही देशातल्या शियांच्या विरोधात युद्ध पुकारलं. शिया मशिदी, शिया वस्त्यांवर तो आत्मघाती हल्ले करत असे. अगदी एकेकट्या शियालाही गाठून मारलं जाई. शुद्द अरबी इस्लाम, वहाबी पंथाचा, त्यानं अंगिकारला. ओसामा बिन लादेनच्या गणितात तो बसेना. एक तर तो स्वतंत्र होणं ओसामाला मान्य नव्हतं. दुसरं म्हणजे त्याचा इस्लाम विभागीय होता. आश्चर्य म्हणजे त्याचे मार्ग ओसामाच्या मते फार क्रूर होते. ओसामाचे हल्ले सामुहिक असत.  मग त्यात कोणीही माणसं मेली तरी चालतील. व्यक्तिगत पातळीवर मुंडकी उडवणं  वगैरे गोष्टींना  ओसामा प्रोत्साहन देत नसे. 
 झरकावीनं सौदी सुन्नींचा पाठिंबा मिळवला. त्यानं उभारलेली संघटना आणि सामग्री त्याच्या मृत्यूनंतर अलगद अल बगदादीच्या हातात पडली.  
।।
राजकारण कसं असतं पहा.
सीरियात असद यांची हुकुमशाही राजवट आहे. असद हे अलवाईट शिया आहेत. २०११ साली अरब स्प्रिंग हा लोकशाहीवादी उठाव अरब जगात झाला तेव्हां सीरियातल्या तरूणानी आणि सेक्युलर राजकीय गटांनी निवडणुकीची मागणी केली. असदनं त्याना हं हं म्हणत झुलवलं आणि चेपलं. तिथून सीरियात यादवी सुरु झाली. नाना प्रकारच्या असद विरोधकांनी आघाड्या उभ्या केल्या. आघाड्या आणि असद यांच्यात जुंपली. असदला या आघाड्या निकाली काढायच्या आहेत. आयसिसलाही या आघाड्या नाहिशा करून सीरियाचा ताबा मिळवायचा आहे. त्यामुळं असदचा आयसिसला छुपा पाठिंबा आहे. त्याचं आणखी एक कारण असं की असद यांच्यावर अमेरिकेनं आर्थिक निर्बंध ( सँक्शन्स ) लादल्यानं असदला बाजारातून तेल विकत घेता येत नाही. आयसिस असदला आपल्या हातातलं तेल विकतं. गंमत म्हणजे यातलं बरंचसं तेल सीरियातल्या तेल विहिरीत निघतं. म्हणजे सीरियाचं अधिकृत तेल आयसिस चोरतं आणि ते पुन्हा सिरियन सरकारला देतं. 
विरोधकांचा पूर्ण खातमा होत नाही तोवर असदला आयसिस हवं आहे.
यात आणखी एक उपगोची आहे. असद हे अलवाईट शिया असल्यानं त्यांना शिया इराणचा छुपा पाठिंबा आहे. पलिकडच्या बाजूला आयसिस ही सुन्नी संघटना असल्यानं तिला सौदी-कतार इत्यादी सुन्नी सरकारांचा छुपा पाठिंबा आहे. तरीही आतल्या आत असद आणि आयसिस यांच्यात छुपे संबंध आहेत.
।।

अमेरिका आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील वीस देशांनी आयसिसला खतम करण्याचा विडा उचलला आहे. अमेरिकी किवा युरोपीय सैनिक मैदानात उतरवायची त्या देशांची इच्छा नाहीये. तसं केलं तर हज्जारो अमेरिकन-युरोपीय सैनिक मारले जाणारेत. अमेरिकी-पश्चिमी लोकांना त्यांच्या मुलांची प्रेतं घरी यायला नकोयत. इराकी, सिरियन, कुर्ड सैनिकांनी जमिनीवर लढाई करुन प्रदेशाचा ताबा घ्यावा आणि पश्चिमी लोकांनी हवाई हल्ले आणि इंटेलिजन्सची मदत करावी अशी पश्चिमी सरकारांची व्यूह रचना आहे. सीरिया, इराक, तुर्कस्तानातले लोक आपला जीव धोक्यात घालायला तयार नाहीयेत. कोंडी झालीय. पश्चिमी विमानं बाँब फेक करतात, आयसिसच्या नेत्याना एकेकटे गाठून ड्रोनच्या सहाय्यानं मारतात. पण त्याचा पाच पैसेही परिणाम आयसिसच्या विस्तारावर होत नाहीये. आयसिस पसरत चाललंय. केवळ सीरिया-इराकमधेच नव्हे तर खुद्द अरबस्तानातही. सौदी, बहारीन इत्यादी ठिकाणच्या शिया मशिदी ते खतम करू लागलेत, तिथल्या शियांना  मारू लागलेत.
स्वतः तयार केलेला भस्मासूर सौदी अरेबिया आणि इतर सुनी देशांवर उलटलाय.
आयसिस १

आयसिस १

नारिंगी जंप सुट घातलेला एक मध्यम वयीन माणूस गुढग्यावर उभा. नारिंगी जंप सुट.
 ग्वांटानामो बे या अमेरिकन छळछावणीतल्या माणसांना असे कपडे घालावे लागत. अफगाणिस्तान, आखाती देश  इत्यादी ठिकाणी पकडलेले जिहादी ग्वांटानामो बे छावणीत दाखल केले जात.
 नारिंगी सूट घातलेला माणूस आहे जेम्स फॉली.  अमेरिकन पत्रकार. कित्येक महिने तो सीरिया-इराकमधील युद्ध-संघर्षाच्या बातम्या देत असे, फिल्म्स करत असे. त्याच्या मागं उभा आहे काळे कपडे घातलेला आयसिसचा जिहादी.  जेम्स फॉली भाषण करतो. अमेरिकन सरकारला विनंती करतो की त्यांनी इस्लामच्या विरोधात चालवलेलं युद्ध बंद करावं. तो तणावाखाली आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असतं. 
 पाठीमागं उभा असलेला काळ्या कपड्यातला माणूस एक सुरा काढतो आणि जेम्सचं डोकं उडवतो.
यू ट्यूबवरचं दुसरं क्लिप.
आता नारिंगी जंपसुटमधे आहे  स्टीवन सेटलॉफ. तोही पत्रकार आहे. तो बराक ओबामाना उद्देशून भाषण करतो.
अल्ला हो अकबर असं म्हणून  मागं उभा असलेला काळ्या कपड्यातल्या जिहादी त्याचं मुंडकं उडवतो.
आणखी एक क्लिप.
  ठिकाण आहे पालमिरा.
एक प्राचीन वास्तू आहे. भिंतीत तयार केलेलं एक शिल्प काळ्या कपड्यातले जिहादी हातोड्यांनी तोडत आहेत.
एका जिहादीनं चौथऱ्यावर ठेवलेला अर्धपुतळा हातोड्यानं जमिनीवर पाडला आहे. पडलेल्या पुतळ्यावर जिहादी घाव घालतो आहे.
एक जिहादी शिडीवर चढला आहे. वास्तूच्या छताजवळ काही शिल्पं आहेत, खांबांना लगडलेली.  जिहादी ती शिल्पं तोडत आहेत.
दिवे लावून हे काम चाललं आहे.
आजूबाजूला अनेक माणसं उभी राहून ही तोडफोड पहात आहेत. त्यात लहान मुलंही आहेत.
एका जिहादीनं एक तीन चार फुटांचं शिल्पं कोनाड्यातून काढलं,  कापडात गुंडाळलं.   शिल्प घेऊन तो जिहादी बाहेर पडला.
बाहेर नाना आकाराची वाहनं उभी आहेत. गुंडाळलेली मूर्ती घेऊन जिहादी एका जीपमधे जाऊन बसला. जीपमधे आधीच आणखी दोघे जण कापडात गुंडाळलेल्या वस्तू घेऊन बसले आहेत.
एक टोयोटा पिक अप आहे. तिच्यात एक तोफ ठेवलेली आहे. या तोफांनी आताच डोंगरावर गोळेफेक करून इमारतीच्या नक्षीदार प्राचीन भव्य कमानी तोडलेल्या आहेत.
टोयोटा पिक अप हे एक सिंबॉल आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान इत्यादी ठिकाणी  जिहादी मंडळी बंदुका घेऊन टोयोटातून फिरतात आणि बेशिस्त गोळीबार करतात.
वास्तूतली कारवाई संपली. कॅमेरे आणि लाईट्स घेऊन माणसं बाहेर आली. बघेही आपसात बोलत बाहेर पडले. मागोमाग काळ्या कपड्यातले जिहादी वाहनांमधे बसतात.
वाहनं धूळ उडवून निघून जातात.
ख्रिस्त जन्मायच्या कित्येक शतकं आधी,  सभोवतालच्या असह्य वाळवंटामधे तयार झालेलं  पालमिरा. भरभराटलेलं शहर.  बाजार. मंदिरं. लोकांना एकत्र येण्यासाठी आणि करमणुकीसाठी तयार केलेले सार्वजनिक चौक. शहराच्या मध्यभागी कलोझियम. म्हणजे महा इवेंट साजरे करण्यासाठी तयार केलेली जागा. तलवार बहादुरी, रथांच्या स्पर्धा, राज्यारोहण इत्यादीसाठी. एका वेळी ५० हजार ते ८० हजार प्रेक्षक बसू शकत.
ख्रिस्त जन्मायच्या आधी ज्यू धर्म होता. या भागात इतर आदिधर्म-प्रोटोरिलिजन प्रचलित होते. ख्रिस्ती आणि इस्लाम हे सेमेटिक धर्म अजून विकसित झाले
नव्हते. त्या सेमेटिक आदिधर्मातला एक देव, त्याचं नाव बेल,   ( Bel ). त्याचं मंदिर. मंदिराच्या भोवती सहाशे फूट लांबीची भिंत. सत्तर फूट उंचीचे आणि दहा माणसांनाही कवेत घेता येणार नाहीत अशा व्यासाचे खांब. त्यावर नक्षी आणि शिल्पं. आत मधे साठ फूट उंचीची देवाची मूर्ती. 
पालमिरातल्या इमारती, खांब, कमानी, भिंती इत्यादींचं वास्तुशिल्प त्या काळातल्या गांधार संस्कृतीतल्या आर्किटेक्चरशी जुळणारं होतं. असं म्हणतात की इसवी पूर्व सहाव्या शतकात पालमिरा आणि गांधार दोन्ही संस्कृती समांतर पातळीवर, एकमेकांच्या संपर्कात वाढल्या.
गांधार संस्कृतीचे काही अवशेष अफगाणिस्तानात बामियानमधे होते. डोंगरात खोदलेल्या साठ सत्तर फूट ऊंचीची शिल्पं. तालिबानांनी ती शिल्पं नष्ट केलीत, अल कायदाच्या चिथावणीनं.
पालमिरातली शिल्पं, मंदिरं, कलोझियम, कमानी, खांब अगदी काल पर्यंत शिल्लक होते.
आता ते नष्ट तरी झालेत किंवा जिहादींनी ते पुराणवस्तूंचं स्मगलिंग करणाऱ्या लोकांना विकलेत, भरपूर पैसे घेऊन..
।।
अमेरिकेतल्या फ्लोरिडाचा  हार्लेम सुआरेझ. वय वर्षे २३.
त्यानं फेस बुकवर पोस्ट टाकली. ” मला बाँब तयार करायचा. बंधुनो मला मदत करा. बाँब तयार करायची कृती मला पाठवून द्या. “
हार्लेमनं इंटरनेटवरच्या ऑन लाईन खरेदी यंत्रणेत एका बंदुका विकणाऱ्या कंपनीकडं एके सत्तेचाळीस खरेदी करण्याचा अर्ज भरला. पत्ता, नाव गाव, कार्ड नंबर इत्यादी तपशील दिले.
खरं म्हणजे अमरिकेत एके सत्तेचाळी खरेदी करण्यासाठी इतका खटाटोप करण्याची आवश्यकता नसते. शहरात बंदुका आणि गोळ्या विकणारी अनेक दुकानं असतात. तिथं जायचं. दुकानदाराच्या अटी पूर्ण करायच्या, माहिती भरून द्यायची, पैसे मोजायचे, बंदुका घरी घेऊन जायच्या. कितीही.
हार्लेमनं दोन खोके भरून खिळे तयार ठेवले होते. एक सेलफोन तयार ठेवला होता. स्फोटकं त्याला मिळालेली नव्हती. ती मिळाली की हार्लेम स्थानिक समुद्र किनाऱ्याच्या वाळूत खिळ्यांचा बाँब पुरुन ठेवणार होता आणि दूर उभा राहून सेल फोनचा वापर करून उडवणार होता. गर्दीच्या वेळी. म्हणजे अनेक माणसं मेली असती. मरणारी माणसं अमेरिकन असणार होती. इस्लाम नष्ट करू पहाणारी अमेरिकन माणसं.
  गेले काही महिने हार्लेम इंटरनेटवर आयसिसच्या प्रचार फिल्म्स पहात होता. फिल्म पाहून आणि वाचन करून त्याला पटलं होतं की जगात इस्लामी क्रांती करणं आवश्यक होतं. त्याचा विचार पक्का झाला होता. त्यानं फेस बुकवर पोस्ट टाकली. ” भविष्यातलं  खिलाफत कसं असेल, भविष्यातलं जग कसं असेल ते जाणून घ्या. आपल्या शत्रूचं डोकं कसं उडवावं, त्याचं शरीर कसं जाळून टाकावं ते शिका. अमेरिका हा आता भूतकाळ आहे. आपण अमेरिका नष्ट करणार आहोत. व्हाईट हाऊसवर आपला काळा झेंडा फडकवणार आहोत. अध्यक्षाचं मुंडकं उडवून व्हाईट हाऊसवर लटकवणार आहोत. ” हार्लेमननं काळे कपडे घालून, डोक्यावर काळ्या-पिवळ्या रंगाचा स्कार्फ घेऊन आपलं जिहादी भाषणही टेप करून ठेवलं होतं.
सारी तयारी झाली होती. 
 योजना तडीस जाण्याआधीच पोलिसांनी त्याला पकडलं. तुरुंगात धाडलं.
 ।।
पोर्टस्माऊथ. इंग्लंड.
 पोर्टस्माऊथ शहरातले मुहंमद मेहदी हसन, मुशुदुर चौधरी, मुहंमद हमिदूर रहमान, असद उझ्झमान आणि इफ्तेखार जमन हे पाच पाच बंगाली मुस्लीम तरूण २०१३च्या ऑक्टोबरमधे लंडनला गेले.  गॅटविक विमानतळावर त्यांनी इस्तंबूलला जाणारं विमान पकडलं. त्यांच्याजवळ परतीचं तिकीट होतं. तुर्कस्तानातल्या अंतालिया समुद्र किनाऱ्यावरच्या रिसॉर्टमधे ही मुलं सुटी व्यतित करणार होती. त्यांच्याजवळ थॉमस कुक या कंपनीनं केलेलं रिसॉर्टचं आरक्षण होतं. सारे कागदपत्रं ठीकठाक होते. विमानतळावरची त्यांची हालचाल, इमिग्रेशन प्रोसिजर इत्यादी गोष्टी सीसीटीवी कॅमेऱ्यावर चित्रीत झाल्या होत्या. त्यावरून मुलं एकदम ठीकठाक दिसत होती.
मुलं सीरियात जिहाद करायला निघाली होती. आयसिसच्या जिहादात सहभागी व्हायला निघाली होती.
पोर्टस्माऊथ या इंग्लंडमधल्या गावात बांगला देशातल्या लोकांची मोठ्ठी वस्ती आहे. पाकिस्ताननं बंगाली लोकांवर अत्याचार करायला सुरवात केल्यावर बंगाली माणसं इथं स्थलांतरित झाली. ही माणसं पोर्टस्माऊथमधे टॅक्सी चालवतात, छोटी मोठी दुरुस्तीची कामं करतात,  टेक अवे दुकानांतून खाद्य पदार्थ विकतात, स्टोअर्समधे विक्रेता म्हणून काम करतात. कष्ट करून बांगला देशीयांनी आपली मुलं वाढवली. त्यातलीच ही पाच मुलं.
मुलं जिहादच्या कल्पनेनं भारली होती. सीरिया, इराक या देशात अमेरिका मुसलमानांवर अन्याय करत आहे असं त्याना वाटत होतं. एकूणच जगभरात अमरिका आणि मित्र देश ( ब्रीटन, फ्रान्स, जर्मनी इ. ) इस्लाम खतम करायला निघाले आहेत असं या मुलांचं पक्कं मत होतं.
पोर्टस्माऊथमधे २५ वर्षाचा इफ्तेकार जमन दर शुक्रवारी अभ्यासवर्ग चालवत असे. इफ्तेकार एका कॉल सेंटरवर काम करत असे. सीरियात गेलेली पाच मुलं आणि इतर तरूण त्याच्या घरी भेटत. वारंवार येणाऱ्या या मुलांची   खातीर करता करता इप्तेखारची आई थकत असे, तिला ते परवडतही नसे.
मसुदुरला समाजसेवेची आवड. बंगाल्यांना एकत्र करायची खटपट तो करत असे.पोर्टस्माउथची बंगाली जनता एकसंध नव्हती, त्यांच्या आपसात मारामाऱ्या होत्या. सिल्हेट गावातून आलेल्यांची एक मशीद होती. नबीगंजमधून आलेल्यांची एक वेगळी मशीद होती. सिल्हेटवाल्यांना नबीगंज मशिदीत प्रवेश नाही आणि नबीगंजच्या लोकांना सिल्हेटच्या मशिदीत प्रवेश नाही. दोघंही मुसलमान आणि सुन्नी. तेव्हां निदान ईदच्या दिवशी तरी दोघांनी एकत्र नमाज करावा अशी खटपट मसुदुर करत असे. आपसात भांडून एकमेकाचा जीव घेणारे मुसलमान, अरब जगात, पाकिस्तानात. आणि ही पाच मुलं सीरियात अमेरिकन लोकांच्या विरोधात लढायला निघाली होती.
सगळी मुलं शिकलेली होती. स्थानिक कॅथलिक कॉलेजात. पदवी घेऊन विद्यापिठात जाण्याच्या वाटेवर होती. मेहदी हसन विद्यापिठात दाखल होणार होता. एक वर्षाचा ब्रेक घ्यायचं त्यानं ठरवलं होतं. इस्लावरचा अन्याय दूर करायला निघालेली ही मुलं कुराणात
सांगितलेले पाच नमाज पढत नसत. कॉलेज करायचं, शहरात इतर उद्योग करायचे यामधे सगळे नमाज करणं कसं शक्य आहे असं त्यांचं म्हणणं.
मेहदी हसन कंटाळला होता. त्याला दररोज उठून त्याच त्याच गोष्टी करायचा कंटाळा आला होता. त्यानं   फेसबुकवर पोस्ट टाकली होती. ” कंटाळलोय. दररोज तेच तेच. पश्चिमेत कशाला आलोय, कशाला रहातोय.  जेवण. अभ्यास. काम. कर भरणं. झोप. शीः. ”
आई बाप खुष होते कारण बांगला देशाच्या तुलनेत त्यांना इथं चांगलं जगणं आणि स्थैर्य मिळालं होतं. काही एक बेसिक जगणं छान चाललं होतं.  बांगला देशातल्या किंवा पाकिस्तानातल्या माणसांच्या तुलनेत  मुलं सुखी होती. पण त्यात त्यांना गमत वाटत नव्हती. कदाचित सभोवतालच्या गोऱ्या ब्रिटीश माणसाच्या, भारतीय माणसाच्या तुलनेत त्यांचं जगणं दोन पायऱ्या खालीच होतं, तेवढी प्रतिष्ठा त्याना मिळत नव्हती.  स्थैर्यातच जन्मलेली असल्यानं त्यांना अधिक समृद्धी आणि प्रतिष्ठा हवी असावी. एक असंतोष त्यांच्या मनात असावा. न्यू यॉर्कमधले टॉवर्स पडल्यावर अमेरिका आणि दोस्त देशांनी मुस्लीम देशांत सुरु केलेल्या कारवाया करून मुसलमानांना नष्ट करायचं ठरवलं आहे असं जिहादी लोकांनी मुसलमानांच्या मनावर ठसवलं. सोशल मिडियाचा वापर करून. तो प्रभाव या पाच मुलांवर पडला होता.
निघाले.
 तुर्कस्तान. तिथून सीरिया-तुर्कस्तानच्या हद्दीवरचं  कबाने हे गाव. तिथं एका हॉटेलात मुक्काम. आधीपासून त्यांच्या संपर्कात असणारा माणूस त्यांना हॉटेलात भेटला. दुसऱ्या दिवशी टॅक्सीनं हद्दीवर जायचं. 
वाटेत कबाने गावातच त्यांच्यावर हल्ला झाला. स्नायपर्सनी गाडीवर गोळ्या झाडल्या. टॅक्सीतून उतरून पळावं लागलं. चौघे हद्द पार करू शकले.  
सीरियात पोचल्यावर मुलांचा भ्रम निरास सुरु झाला. त्यांना लढाईचा थरार हवा होता. तो मिळेना. कुठं इमारतीवर पहारा दे, कुठं स्वयंपाक कर, कुठं झाड लोटाचं काम अशी कामं करावी लागली. या कामाना प्रतिष्ठा नाही. खाणं पिणं, कपडा लत्ता या गोष्टी मिळत होत्या पण पगार मिळत नव्हता, खिशात पैसे नसत. ब्रिटनमधल्या सुखसोयी तर अजिबातच नाहीत.  दररोज हाणामारी असे. त्यात एकेकाचा बळी पडत गेला. कोणी पोटात गोळी लागून मेला, कोणी बाँब स्फोटात गेला.
मेहदी हसन कंटाळला होता. तो स्काईपवरून आई वडिलांशी बोलत असे. परत यायचं म्हणत असे. आई वडिल ब्रिटीश पोलिसांशी बोलत. त्यांनी आई वडिलांना तुर्कस्तानात नेण्याची सोय केली. तिथं मेहदी हसन त्यांना भेटणार होता आणि नंतर सर्वजण पोर्टस्माउथला परतणार होते. मेहदी हसनचा पासपोर्ट आयसिसच्या लोकानी जप्त केला होता. त्यामुळं त्याच्याजवळ पासपोर्ट शिल्लक नव्हता. स्पेशल केस म्हणून त्याला नवा पासपोर्ट देण्याचं ब्रिटिश पोलिसांनी ठरवलं. सारं काही ठरलं होतं.
पण एके दिवशी मेहदी हसन पोटात गोळी लागून मेला.
।।
नेटवर आयसिसच्या कारणी मेलेल्या लोकांचे, मृत देहावरच्या हसऱ्या चेहऱ्याचे फोटो दाखवले जातात. हौतात्म्य प्रेक्षकांवर ठसवण्यासाठी. त्या चेहऱ्यासोबत आयसिसचा सलाम असतो. हा सलाम म्हणजे उजव्या हाताचं अंगठ्यानंतरचं बोट आकाशाकडं करून ” वर, स्वर्गाचा ” निर्देश.

एका ब्रिटीश मुस्लीम स्त्रीचा संदेश ट्विटरवर आपल्याला दिसतो. ” माझ्या पतीनं स्वतःचा जीव दिला आहे, देव त्याला हौतात्म्य देवून स्वर्गात स्विकारो. “
पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

२०१५ चं साहित्याचं
नोबेल पारितोषिक स्वेतलाना अॅलेक्सिविच या पत्रकार महिलेला मिळालंय. त्यांची काही प्रसिद्ध,
प्रभावी पुस्तकं अशी – व्हॉईसेस फ्रॉम चेर्नोबिल, 
झिंकी बॉईज (अफगाण युद्धातल्या रशियनांची कथनं), वॉर्स अनवुमनली फेस (दुसऱ्या
महायुद्धात भाग घेतलेल्या रशियन स्त्रियांच्या कहाण्या). अॅलेक्सिविच सध्या बेलारूसची
राजधानी मिन्स्क या शहरात रहातात. नारोवल या गावातल्या स्थानिक पेपरात त्या काम करतात.
त्यांनी लिहिलेली पुस्तकं सोवियेत युनियनच्या राज्यकर्त्यांना मान्य नसल्यानं त्यांना
फ्रान्स, जर्मनीत परागंदा व्हावं लागलं होतं. 
बेलारुस हा त्यांचा पूर्व युरोपियन देश सोवियेत युनियनमधून मुक्त झाल्यावर त्या
आपल्या मायदेशात परतल्या आहेत.
अॅलेक्सिविच यांच्या
पुस्तकात मुलाखती आहेत, रीपोर्ताज (वार्तापत्रं) आहेत. त्यांनी निबंधही लिहिले आहेत.
त्यांच्या लिखाणाचं वर्णन मौखिक किंवा जबानी इतिहास असं करता येईल.
अॅलेक्सिविच म्हणतात
” इतिहासात केवळ हकीकत, वास्तवकथन असतं. त्यात भावना नसतात, भावना वगळलेल्या असतात.
मी जगाकडं इतिहास म्हणून पहात नाही, एक लेखक म्हणून मी त्यात मानवी भावभावनांचा कल्लोळ
पहाते. माणसाचं दैनंदिन सामान्य जीवन पाहून मी थक्क होते. त्यात अथांग सत्य दडलेली
असतात.”
बेलारूस लेखक अॅलेस
अॅडोमोविच यांच्या विचार आणि लेखनाचा प्रभाव अॅलेक्सिविच यांच्यावर आहे. त्यामुळंच
विसाव्या शतकातलं भयाण वास्तव चितारायचं तर त्यासाठी फिक्शन उपयोगाचं नाही, लोकांच्या
आठवणी लिहिल्या पाहिजेत असं अॅलेक्सिविच यांचं मत आहे.
अॅलेक्सिविच आयुष्यभर
रशियन, लाल रशियन समाज म्हणजे काय आहे ते शोधण्याचा, समजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
झारनं शेजारचे देश गिळून रशिया तयार केलं, कम्युनिष्ट राजवटीनी त्याचीच री ओढली आणि
अजूनही रशियन माणसं क्रूर दादागिरी मानसिकतेच्या बाहेर पडत नाहीयेत असं अॅलेक्सिविच
यांचं निरीक्षण आहे. रशिया म्हणजे एक महाकाय शवालय आहे, एका महाकाय रक्तपाताचा इतिहास
आहे असं अॅलेक्सिविच म्हणतात. क्रांती, छळछावण्या, दुसरं महायुद्ध, अफगाण युद्द, सोवियेत
युनियनचं विघटन आणि नंतर चेर्नोबिल हे रशियाचे ठसे आहेत असं त्यांना वाटतं. मारेकरी
आणि बळी यांच्यातला निरंतर आलाप हे रशियन आख्यान (नॅरेशन) आहे असं त्यांचं मत आहे.
तोच त्यांच्या लेखनाचा विषय आहे.
अॅलेक्सिविच लोकांमधे
मिसळतात. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जातात. दुर्घटनेच्या ठिकाणी माणसांना भेटतात. मारेकरी
आणि बळी. तिऱ्हाईत आणि निष्पाप बघे यांची कथन गोळा करतात. त्या माणसांना बोलतं करतात
आणि त्यांच्या मुलाखती आणि दिसणारं वास्तव आपल्या पुस्तकात मांडतात.
लोखंड जसं लोहचुंबकाकडं
खेचलं जातं तसं लेखिका  वास्तवाकडं आकर्षित
होतात.  लोकांचे आवाज, लोकांची कथनं, लोकांचे
कबुलीजबाब, लोकांच्या व्यथा हेच वास्तव आणि इतिहास असतो असं लेखिकेला वाटतं. जग म्हणजे
असंख्य लोकांच्या दैनंदिन जगण्याचा  कोरस असतो,
कोलाज असतो. लिहितांना लेखिका एकाच वेळी  लेखक,
बातमीदार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि उपदेशक होते.तोच त्यांच्या लेखनाचा बाज
आहे.
वॉर्स अनवुमनली फेसमधे
लेखिकेनं  दुसऱ्या महायुद्धात आघाडीवर असलेल्या
रशियन स्त्रियांच्या कहाण्या नोंदलेल्या आहेत. सैनिक, नर्स, डॉक्टर्स इत्यादी कामं
त्या स्त्रियांनी केली. स्त्री माणसाला जन्म देते, माणसाला वाढवते, त्याचं पोषण करते.
स्त्री म्हणजेच जीवन. अशी स्त्री युद्धात एकीकडं बंदूक आणि रणगाडा चालवून माणसं मारते
आणि दुसरीकडं जखमी सैनिकांची शुश्रुषा करून त्याचा जीव वाचवते. हे सारं दाहक वास्तव
या पुस्तकातल्या असंख्य मुलाखतींत आहे.
रशियाला अरबी समुद्रात
एक वर्षभर उपयोगी पडणारं बंदर   अफगाणिस्तान,
पाकिस्तान या वाटेनं मिळावं यासाठी अफगाणिस्तानवर रशियाला ताबा हवा होता. जेणेकरून
रशिया समृद्ध होईल आणि जगातला कम्युनिझम समृद्ध आणि सत्ताधारी होईल. त्यासाठी रशियानं
अफगाणिस्तानवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अफगाणिस्तानात एक धार्जिणं सरकार
उभं केलं आणि ते टिकवण्यासाठी सैन्य तिथं पाठवलं. त्या सैन्याच्या हकीकती झिंकी बॉईज
या पुस्तकात आहेत.
झिंकी बॉईज म्हणजे
जस्ताच्या शवपेटीतून आलेले सैनिकांचे देह. अफगाणिस्तानातल्या कम्युनिष्टधार्जिण्या
सत्तेला वाचवण्यासाठी लढायला गेलेल्या सैनिकांची शवं जस्ताच्या शवपेट्यांतून रशियात
परतत होती. रशियन विमानतळाच्या विस्तृत आवारात धूळ खात पडत होती. कोणत्या पेटीत कोणाचं
शव याचीही धड नोंद सरकारकडं नव्हती. सैनिकांचे नातेवाईक एकेक पेटी, पेटीवरचं नाव पहात
पेटीतलं शव आपल्याच नातेवाईकाचं आहे काय याचा तपास घेत फिरत.
हजारो सैनिक अफगाणिस्तानात
मरत होते किंवा अपंग होत होते.  रशियान समाजाला
त्याची पडलेली नव्हती. आपल्याला छान हवेच्या ठिकाणी ‘डाचा’ कसा मिळेल, चांगली कार कशी
मिळेल, चांगलं मांस कसं मिळेल याचीच फिकीर त्याला होती. मृत सैनिकाच्या आप्तेष्ठांना
आपलं आक्रंदन जाहीरपणे करायलाही रशियात बंदी होती.
अफगाणिस्तानातल्या
रशियन  अधिकाऱ्याना तोंड धुण्यासाठीही पाणी
मिळत नव्हतं अशी  कोरड्याठाक अफगाणिस्तानची
स्थिती. पाणी आणण्यासाठी ते तरूण सैनिकाला बाहेर पिटाळत. सैनिक बाहेर पडायला तयार होत
नसे कारण सभोवताली मुजाहिदांनी सुरुंग पेरलेले असत. लाथ घालून अधिकारी त्याला बाहेर
पिटाळत. सुरुंगांवर पाय पडून तरूण सैनिक मरे किंवा अपंग होई.
अफगाण मुजाहीद रशियन
सैनिकाला पकडून केवळ तोंड जमिनीवर राहील इतपत जमिनीत गाडत आणि त्याच्या तोंडावर मुतत.  नंतर संधी मिळाल्यावर हा रशियन सैनिक अफगाणाला बुकले,
भोसके, जाळे; त्याच्यावर गोळ्यांचा मारा करे.
रशियन सैन्याला मदत
करण्यासाठी गेलेल्या स्त्रियांना अधिकाऱ्यांखाली झोपावं लागे, त्यांचे बलात्कार सहन
करावे लागत.
रशियात चांगलं जगणं
शक्य नसल्यानं तरूण मुलं निदान लढाईवर गेल्यानंतर तरी चार पैसे मिळतील आणि चांगल्या
परदेशी वस्तू मिळतील या आशेनं अफगाणिस्तानात जात. तिथं मरणयातना सोसत आणि समजा जिवंत
परतलेच तर पुन्हा बंडल जगणं त्यांच्या नशिबी येई.
अफगाण युद्धात अपंग
झालेले सैनिक व त्यांचे कुटुंबीय ; अफगाण युद्धात मारले गेलेल्या सैनिकांचे आप्तेष्ट;
अफगाण युद्धात नाना सेवा द्यायला गेलेलेल्या स्त्रिया आणि पुरुष यांच्या कहाण्या झिंकी
बॉईज या पुस्तकात अॅलेक्सिविच यांनी नोंदल्या आहेत.
जॉन लॉईड यांनी लंडन
रिव्ह्यू ऑफ बुक्समधे या पुस्तकावर लिहिलेला लेख वाचावा.
अशा लेखिकेला रशियात
कोण थारा देणार? अॅलेक्सिविचना फ्रान्स, जर्मनीत परागंदा व्हावं लागलं.
यंदाच्या नोबेलच्या
संभाव्य लेखकांच्या यादीत जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी, केनयन लेखक एंगुई थियोंगो
आणि नॉर्वेजियन नाटककार जोन फोसे होते.
 वरील लेखक हे लेखक, नाटककार होते, साहित्य या वर्गवारीत
बसणारे होते. अॅलेक्सिविच ललित लेखक नाहीत. त्यांचं साहित्य कल्पित नाही. त्यांचा मजकूर
म्हणजे खडखडीत वास्तव आहे, पत्रकारी आहे. असं असूनही ललित साहित्याचं पारितोषिक अॅलेक्सिविच
यांना कां आणि कसं मिळालं?
एक कारण त्यांच्या
लेखनाचा विषय. विषय प्रामुख्यानं मानवी दुःख, व्यथा, भावना, भावनांचे अनेक स्तर, परस्पर
विरोधी आणि विसंगत सूर, अगतीकता असा आहे. परंतू त्याची पार्श्वभूमी रशियन समाजाची आहे.
सामान्यतः पश्चिमी देशातली माणसं, सरकारं आणि संस्था कम्यूनिष्ट विरोध आणि त्या अंगानं
रशिया विरोध या बाजूला झुकतात. त्यामुळंच रशियातल्या स्वातंत्र्यवादी लेखकांना बक्षिसं
सहज मिळतात. (अर्थात त्या लेखकांचं साहित्यही चांगलं असतं.) मुक्त लोकशाहीवादी विचार
आणि कम्युनिझम यात एक साप मुंगुसाचा संघर्ष असतो. त्याचं प्रतिबिंब बक्षिसांत पडतं.
ते अॅलेक्सिविच यांच्या बाबतीत काही अंशी खरं आहे.
रशिया अफगाणिस्तानात
घुसला तशीच अमेरिकी वियेतनाममधे घुसली होती. 
वियेतनामी गनीम आणि अमेरिकन सैनिकही वियेतनाममधे रशियन सैनिक आणि अफगाण मुजाहिदांइतकेच
क्रूर होते. अॅपोकलिप्स नाऊ हा सिनेमा त्याचं प्रक्षोभक वर्णन करतो. रशियन माणसं अमेरिकेला
दोष देणार आणि अमेरिकन माणसं रशियाला. परंतू माणसाचं क्रौर्य आणि त्याचे समाजावर होणारे
भयानक परिणाम या गोष्टी दोन्ही बाबतीत समान आहेत. त्याच अॅलेक्सिविच यांच्या पुस्तकातून
वाचकासमोर येतात.
दुसरं एक कारण शैलीबाबतचं.
ललित साहित्यामधे
मानवी वास्तवाचं लेखकाचं आकलन व्यक्त होत असतं. पण लेखक ते वास्तव पचवून, त्यात आपल्या
प्रतिभेची भर घालून, त्यात कल्पिताचं मिश्रण करत असतो. पत्रकारही त्याचं वास्तवाचं
आकलन पत्रकारी शैलीत मांडत असतो. मांडणीत त्याची प्रतिभाही व्यक्त होत असते. फरक येवढाच
की पत्रकारी व्यक्त होण्यात कल्पिताला वाव नसतो. कल्पितेचा वापर हा दोन शैलीमधील व्यवच्छेदक
फरक असतो. परंतू शैलीच्या बाबतीत बोलायचं तर ललित आणि पत्रकारी यातला फरक हा वर्णनाच्या
मांडणीतला, आकृतीबंधाचा फक्त फरक आहे. दोन्ही शैली प्रत्ययकारी असू शकतात.
मार्खेज आणि विजय
तेंडुलकर त्यांनी यांच्या सभोवतालचं वास्तव पत्रकारी आणि साहित्य या दोन्ही शैलीत मांडलं.
परंतू असे लेखक कमीच असतात. लेखनामधे पत्रकारी लेखन आणि साहित्यिक लेखन असे दोन ढोबळ
वर्ग करण्याची प्रथा आहे. या वर्गवारीनुसार नोबेल पारितोषिक साहित्याला दिलं जातं,
पत्रकारीला नाही. (पुलित्झर पुरस्कार पत्रकारी शैलीला दिला जातो.)
यंदा हा पायंडा नोबेल
कमिटीनं मोडला याला एक पार्श्वभूमी आहे. कापुश्चिन्सकी या पोलिश पत्रकाराला त्याच्या
पुस्तकांबद्दल नोबेल देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. मार्गारेट अॅटवूड
या लेखिकेनं धरलेल्या आग्रहामुळं कापुश्चिन्सकीचा विचार झाला होता.
          कापुश्चिन्सकीनं अंगोला, इराण, इथियोपिया
इत्यादी अनेक देशामधल्या क्रांत्या आणि संघर्षांवर पुस्तकं लिहिली. घटनांची ग्राफिक
वर्णनं आणि लोकांच्या मुलाखती हे त्याच्या पुस्तकांचे मुख्य आधार होते.  एकादी कादंबरी वाचत आहोत असं त्याचं पुस्तक वाचतांना
वाटतं. एकादा सिनेमाच पहात आहोत असं त्याची पुस्तकं वाचताना वाटतं. अत्यंत व्यामिश्र
अशी व्यक्तिचित्रं आणि पात्रं त्याच्या पुस्तकात असतात. कल्पितासारखं  वास्तव.
कापुश्चिन्सकीला
साहित्याचं पारितोषिक द्यायचा निर्णय नोबेल कमीटीनं घेतला. परंतू तो निर्णय होऊन अमलात
यायच्या आधी कापुश्चिन्सकी वारले. त्यामुळं ते पारितोषिक हुकलं. पण नोबेल कमीटीच्या
विचारात मुळातला बदल झाला होता. त्याचा परिणाम म्हणून स्वेतलाना अॅलेक्सिविच यांना
यंदाचे नोबेल मिळालं.
 ।।

शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

शहरातल्या मोकळ्या जागा, गच्च्या,
बाल्कन्या इत्यादी ठिकाणी करता येणारी शेती म्हणजे शहर शेती.
शेती म्हणजे वनस्पती वाढवण्याची सवय
माणसाला कित्येक हजार वर्षांपासून आहे. खतं, जंतुनाशकं, संस्कारित बिया आणि सिंचन या
गोष्टी हाताशी आल्यावर विसाव्या शतकात शेतीबद्दलच्या कल्पना बदलल्या. माहिती तंत्रज्ञानानं
जगातल्या शेतीत गुंतलेल्या अगणित प्रक्रियांची माहिती प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं
गोळा करणं आणि त्या माहितीची तितक्याच वेगानं घुसळण करून वनस्पतीचा वाढीला क्रांतीकारक
दिशा दिली.  
शेतीबद्दलची पारंपरीक
कल्पना आणि व्यवहार आता एकदमच बाजूला पडला आहे. निसर्गानं वनस्पतीच्या उत्पादनावर टाकलेल्या
मर्यादाही नव्या तंत्रज्ञानानं आता दूर सारल्या आहेत. एका बी मधून किती बिया निर्माण
व्हायचा याचे काही नियम निसर्गानं घालून दिले होते. आता तेही नियम नव्या तंत्रज्ञानानं
दूर सारले आहेत. वनस्पतीच्या व्यवहारातला मुख्य घटक सूर्य. नव्या तंत्रज्ञानानं सूर्यालाही
दूर सारून कृत्रीम प्रकाशात पिकं घेण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे.
परिणाम असा की मातीत, जमिनीत होणारी
शेती आता कुठंही होऊ शकते. अन्नाचा अभाव ही गोष्ट आता नव्या तंत्रज्ञानानं नष्ट केली
आहे.
शहर शेतीतली गंमत अशी की माणूस जिथं
रहातो तिथंच त्याला आवश्यक वनस्पती वाढू शकतात. आजवरची पद्धत अशी की दूरवर शेती करायची
आणि शेतमाल ट्रक-रेलवे-विमान-बोटीनं लोकांपर्यंत पोचवायचा. आता शेतमाल वाहून नेणं,
वाहतुक इत्यादी गोष्टीच अनावश्यक ठरल्या आहेत. म्हणजेच पेट्रोलचा वापर, वाहतुक व्यवस्थेमुळं
होणारं प्रदुषण इत्यादी गोष्टी संपल्या.
ब्रुकलिनमधे, लंडनमधे दुकानांच्या
गच्चीवर भाज्या आणि फळं पिकवली जातात आणि तळ मजल्यावरच्या दुकानात विकायला आणली जातात.
वर जाऊन फळं खुडायची आणि ग्राहक हिशोब करतोय तो पर्यंत ताजी फळं आणि भाज्या त्याला
द्यायच्या. अगदी हातगाडी, सायकल किंवा दैनंदिन वाहतुकीच्या साधनांचाच वापर करून माणसाला
हव्या त्या भाज्या, धान्यं फळं मिळणार.
पाणी, खतं इत्यादी इनपुट आणि प्रकाशाच्या
रुपात दिली जाणारी ऊर्जा ( आता एलईडी दिवे ) हे सारे घटक विविध अप्लिकेशन्स वापरून
नियंत्रित केली जातात. याचा एक परिणाम असा की ग्राहकांना हवी असणारी पिकं जेव्हा हवी
असतील त्याच दिवशी खुडण्याची व्यवस्था करता येते. शंभर दिवसात तयार होणारं पीक एकशेपंधरा
दिवस किंवा एकशेवीस दिवस असं केव्हांही काढता येतं. याचा एक अर्थ असा होतो की साठवण
नावाची भानगड संपली. धान्यं, भाज्या, फळं, पानपिकं साठवणं ही एक मोठी खर्चिक समस्या
असते. ती नव्या व्यवस्थेत जवळपास नाहिशी होते. माणसांना कोणत्या गोष्टी केव्हां पाहिजेत
हे आधी कळू शकतं. तशी मागणीही ग्राहक नोदवू शकतात. त्यानुसार नियोजन शक्य होतं. गणपतीच्या
वेळी माणसं काय खातात, दिवाळीत काय खातात, श्रावणात माणसांना काय हवं असतं इत्यादी
गोष्टी आधीच कळत असल्यानं साबूदाणा, वरीचे तांदूळ, ऋषींच्या भाज्या, मोदकांसाठी लागणारा
गूळ, तुळस, कोथिंबिर, दुर्वा इत्यादी इत्यादी सर्व गोष्टी माणसांना जशा आणि जेव्हा
हव्या असतील तशा देण्याची व्यवस्था नव्या तंत्रज्ञानामुळं होऊ घातली आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळं धान्य, भाज्या,
फळं इत्यादी गोष्टींचा अभाव नष्ट होईल आणि किमतीही नियंत्रणात येतील. अर्थव्यवस्थेला
या तंत्रज्ञानामुळं एक नवं वळण लागणार आहे. आणि हे सारं शहरात शेती व्हायला हवी या
माणसाच्या इच्छेमुळं घडलं आहे.
 मुंबईत चुनाभट्टीत विज्ञान परिषदेच्या गच्चीवर फळबाग
आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या काही इमारतींच्या गच्च्यांवर नाना फळं देणारी मोठ्ठी बाग
फुलली आहे. एके काळी शहरी शेती किंवा गच्चीवरली शेती हे एक नाविन्य नवलाई होती. आता
शहरी शेती मुंबईत, भारतातल्या अनेक शहरांमधे अनेक ठिकाणी उभी राहिलेली दिसते.
 अशी ही शेती केवळ उत्साही आणि हौशी शेती न रहाता
ती किफायतशीर, व्यावसायिक होऊ शकते हेही आता सिद्ध होत आहे. निदान परदेशात तरी.
लंडनमधे क्लॅपहॅम विभागातल्या भुयारी
खंदकात शेती केली जातेय. व्यवसाय म्हणून. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन बाँबिंगपासून
जीव वाचवण्यासाठी जमिनीखाली १०० फुटावर भुयारी खंदक खणले होते. बाँबिंग सुरू झालं की
कुटुंबं या  भुयारात जात. महायुद्ध संपल्यानंतर
हे भुयारी खंदक ऐतिहासिक खुणा झाले होते. आता एक व्यावसायिक या भुयारात शेती करतो.
भुयारातल्या सहा हजार चौरस फुटामधे
ही शेती पसरलेली आहे. ट्रेमधे पसरलेल्या कृत्रीम मातीमधे पोषक द्रव्य मिसळून, त्यात
ओल निर्माण करून बिया पेरल्या जातात.चार पाच दिवसांत बियांची रोपं झाल्यानंतर ती रोपं
दुसऱ्या ट्रेमधे ठेवून एलईडी दिव्यांच्या प्रकाशात ठेवली जातात. दिवसाचे बारा तास रोपांना
प्रकाश मिळतो. पंखे चालवून हवा खेळती ठेवली जाते आणि भुयाराचे तपमान एकवीस ते तेवीस
सेल्सियस दरम्यान राखलं जातं. अठ्ठावीस दिवसात पिकं तयार होतात.
सध्या कोथिंबिर, सॅलड, रॉकेट ही पानपिकं
आणि मुळा ही भाजी घेतली जाते. ताजी ताजी भाजी आसपासच्या स्टार खाणावळींत खोक्यांत भरून
पाठवली जाते. सुरु झाल्यापासून आजवर सुमारे नऊ कोटी रुपयांची भाजी उद्योगानं विकली.
या वर्षी वीसेक कोटी रुपयांचा व्यवहार होईल अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. पुढं चालून
शंभर दिवसांची पिकंही घ्यायची उद्योजकांची योजना आहे.
न्यू यॉर्कच्या ब्रुकलिन विभागात एका
उद्योजकानं गच्चीवर शेती उभी केली आहे. इमारतीला जशा पायऱ्या असतात तशा पाच सात पायऱ्यांचे
स्टँड्स ईडनवर्क्सनं तयार केले आहेत. या पायऱ्यांवर ट्रेमधे खोक्यांमधे झाडं लावलेली
आहेत. हे उपकरण काचेनं झाकून त्यात ग्रीनहाऊस सारखं पर्यावरण तयार केलं आहे. या स्टँडच्या
मागं पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांमधे मासे वाढवले जातात. मासे मरणं, माशांची
विष्टा इत्यादी पाण्यात रहाणाऱ्या गोष्टींवर बॅक्टेरिया प्रक्रिया करतात आणि त्या पाण्याचं
झाडांना पोषक द्रव्ययुक्त पाण्यात रुपांतर करतात. हे पाणी झाडाना दिलं जातं.
रॅकमधील वातावरण आणि पिकांची स्थिती
याचा अभ्यास करण्यासाठी विविध सेन्सॉरचा वापर करणारं एक अप्लिकेशन योजलेलं आहे. हे
उपकरण बाष्प, विविध आवश्यक द्रव्यं, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी घटकांचा अभ्यास करून
वरील सर्व इनपुटचं नियोजन करतं. कोणत्याही पिकामधे सामान्य परंपरेमधे लागणाऱ्या पाण्याच्या
फक्त १० टक्के पाण्यात पिकं निघतात.
वरील पिकं न्यू यॉर्कमधल्या खाणावळी
विकत घेतात.
ईडनवर्क्स या उद्योगानं तयार केलेल्या
या शेतीव्यवस्थेमधे पाच हजार माणसांच्या भाज्या व फळांच्या गरजा ७५ हजार चौरस फुटावरच्या
शेतीमधे भागू शकेल.
 शहर शेतीची कल्पना लोकमानसात रुजवण्याचं श्रेय प्रयोग
परिवाराचे जनक श्री.अ.दाभोलकर यांना जातं. मुंबईतले डॉ. आर टी दोशी आणि मराठी विज्ञान
परिषद या दोघांना सोबतीला घेऊन दाभोलकरांनी परिषदेच्या चुनाभट्टीतल्या इमारतीत आणि
वाद्र्याला डॉ. दोशी यांच्या गच्चीत शेती विकसित केली.
दाभोलकरांना नागरिकांमधे वैज्ञानिक
जागृती करायची होती, वनस्पती कशी वाढते हे समजून सांगायचं होतं. डॉ. दोशी यांना स्वतः
पिकवलेली भाजी-फळं खाण्यातला आनंद नागरिकांना घ्यायला हवा होता.  विज्ञान परिषदेला शहरी शेतीच्या माध्यमातून पर्यावरण
सुधारायचं होतं. दाभोलकरांनी तयार केलेल्या शेती तंत्रामधे घरामधे तयार होणारा जैविक
कचरा वापरला जात होता. उरणारं उष्टं खरकटं, भाज्यांची डेखं आणि साली इत्यादी गोष्टी
पिशवीत घालून त्यात झाड लावल्यानं एकीकडं झाड वाढत असे आणि दुसरीकडं वरील जैविक गोष्टींचं
रूपांतर नैसर्गिक खतमातीत होत असे. प्रत्येक कुटुंबातून दररोज बाहेर जाणारा एक ते दोन
किलो कचरा गटारात न जाता आपल्याच गच्ची-बाल्कनीत जाऊन उपयुक्त खतात रुपांतरीत होणं
हा शहराचं पर्यावरण सुधारण्याचा नामी मार्ग होता.
बाल्कनीत तयार झालेला चार काकड्या
खाणं, पिशवीत तयार झालेली एक मेथीची जुडी भाजीसाठी वापरणं, झाडाला लागलेली चार डाळिंबं
खाणं यात एक और आनंद असतो. भाजीवाल्याकडून आणलेली भाजी आणि आपल्या डोळ्यासमोर तयार
झालेली भाजी यात दिसण्याचा आणि चवीचाही खूप फरक असतो. हा आनंद शहरी शेतीत नागरिकाला
मिळतो. तो तर नागरिकानं घ्यायलाच हवा.
परंतू हा आनंद व्यक्तिगत असतो, त्याच्या
मर्यादा असतात. बाल्कनीतल्या चार चौरस फुटात वाढणाऱ्या झाडांमधे जीव रमवून आपण कित्येक
तास त्यात गुंतवतो. एकादे वेळेस झाडावरचा रोग दूर करण्यासाठी बस किंवा कारनं प्रवास
करून आपण पाच दहा रुपयाचं औषध शे सव्वाशे रुपये खर्च करून आणतो. हे सारं हौस म्हणून
होतं खरं.  परंतू शहराची पर्यावरणाची समस्या,
योग्य किमतीत उत्तम भाज्या हव्या तेव्हा उपलब्ध होणं इत्यादी गोष्टी अशा अकार्यक्षम
हौसेमधून साधत नाहीत.
त्या ठिकाणी न्यू यॉर्कमधल्या ईडनवर्क्स
सारखी व्यवस्था उभारावी लागते. महाग वाटणारं तंत्रज्ञान  वापरावं लागतं. त्यासाठी यंत्र आणि उपकरणं सिद्ध
करावी लागतात. यासाठी गुंतवणूक करावी लागते, श्रम खर्च करावे लागतात. इतकी गुंतवणूक
करायची असेल तर ती गुंतवणूक पेलण्याची क्षमता प्रयोगात असावी लागते. पाच रुपयांच्या
बियांचं पाकीट आणण्यासाठी चार तास आणि पन्नास रुपये खर्च व्हायला लागले तर उभा राहू
शकत नाही, टिकू शकत नाही.
गच्चीत आणि बाल्कनीत निर्माण होणाऱ्या
फळ-भाज्या कुटुंबाची दैनंदिन गरज भागवू शकत नाहीत. ती गरज भागवण्यासाठी शेवटी बाजारातूनच
भाज्या-फळं आणावी लागतात. व्यावसायिक रीतीनं शहरी शेती झाल्याशिवाय त्या गरजा भागणार
नाहीत. हव्या तेव्हां भाज्या फळं मिळायची असतील, त्यांची किमत वाजवी असायला हवी असेल
तर तो सारा शेती व्यवहार व्यावसायिक पद्धतीनंच व्हायला हवा.
नागरिकानं आपल्या बाल्कनीत, गच्चीत
शहर शेती जरूर करावी नव्हे करायलाच हवी. त्या निमित्तानं त्याला वनस्पतीच्या वाढीचं
ज्ञान मिळेल, कायाशास्त्र कळेल. थोडं अधिक पुढं गेल्यास पेशीशास्त्र, जेनेटिक्स इत्यादी
शास्त्रांचीही ओळख होईल आणि नवी तंत्रंज्ञानंही त्याला समजतील. एक लीटरच्या दुधाच्या
प्लास्टिकच्या पिशवीत पंचेचाळीस दिवसांनी मिळणारी काकडी आनंद देऊ शकेल आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा
परिचय करून देईल. ते तर व्हायलाच हवं. पण त्याच सोबत व्यावसायिक शहरी शेतीही प्रचिलत
होईल यासाठी नागरिक या नात्यानं जे काही करावं लागेल तेही नागरिकांनी करायला हवं.