Browsed by
Month: January 2016

लाखो वाचक असलेला ब्लॉगर, हिगिन्स.

लाखो वाचक असलेला ब्लॉगर, हिगिन्स.

जगभरातले दहाएक लाख लोक एलियट हिगिन्स या तरूण माणसानं लिहिलेला
ब्लॉग दररोज पहातात. अमेरिका, रशिया, ब्रीटन, फ्रान्स, जर्मनी, सीरिया, इराक, सौदी
अरेबिया इत्यादी देशातली सरकारं, लष्करं, संरक्षण विषयाचे अभ्यासक दररोज इलियटचा ब्लॉग
वाचतात.बीबीसी, सीएनएन, टाईम्स, गार्डियन इत्यादी माध्यमंही त्याच्या ब्लॉगवरची माहिती
वापरतात. ब्लॉगचं नाव आहे ब्राऊन मोझेस आणि एलियटला वाचक रॉकेट मॅन या नावानं ओळखतात.
एलियट पूर्णवेळ ब्लॉगर आहे. किमान गेली साताठ वर्षं. तो पूर्णवेळ
ब्लॉगसाठी माहिती गोळा करण्यात आणि ब्लॉग लिहिण्यात खर्च करतो.
एक लॅपटॉप येवढंच साधन एलियटकडं आहे. एलियट यूट्यूबवर   तीनचारशे क्लिप्स,  शे दोनशे मेल आणि शेदोनशे पोर्टल्स, वेब साईट्स  पहातो. फेसबुक आणि ट्विटरवर त्याचं दर मिनिटाला
लक्ष असतं. इतरांचे शेदोनशे ब्लॉग्ज पहातो. हे सारं दररोज चालतं.
सीरियातलं युद्ध हा त्याचा मुख्य विषय. सीरियात सरकार विरुद्ध
पाच सात सशस्त्र गट अशी मारामारी चालली आहे. त्यातला एक एक आहे आयसिस. सरकार आणि विरोधी
गट या दोघांना अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया इत्यादी देशांचे पाठिंबे आहेत. जेनेवा
कराराने बंदी घातलेली शस्त्र या युद्धात सर्रास वापरली जातात.
 दोन्ही बाजूला छुपा
शस्त्रपुरवठा होतो. जगात शस्त्रांची एक अनधिकृत दोन नंबरची बाजारपेठ असते. तिथून सीरियात
शस्त्रं पोचतात. ही शस्त्रं  पूर्व युरोप, रशिया
इत्यादी ठिकाणी सरकारच्या काण्याडोळ्यानं उत्पादली जातात आणि सर्व देशांना हा शस्त्र
पुरवठा माहित असतो. या शस्त्रांची कुंडली एलियट मांडतो.शस्त्राचा प्रकार. ते कुठं तयार
होतं, कोणत्या वाटेनं सीरियात पोचतं याचा माग एलियट घेतो.
घरबसल्या. लॅपटॉप आणि इंटरनेट दोन हत्यारांचा वापर करून.
एके दिवशी सीरियातल्या घाऊटा या गावावर रॉकेटं कोसळली.
लगोलग या रॉकेटचे फोटो यू ट्यूबवर झळकले. घाऊटामधले काही
जागरूक नागरीक, काही हौशी पत्रकार, सरकार विरोधी सशस्त्र गटाचे लोक यांनी विविध कोनातून
फोटो काढले. ते यू ट्यूबवर टाकले आणि एलियटलाही पाठवले. सीरियात एलियट येवढा प्रसिद्ध
आहे की सरकार, विरोधी, नागरीक, पत्रकार आपणहून बाँब, बंदुका, रॉकेट्स, हातबाँब इत्यादींचे
फोटो काढून लगोलग एलियटला पाठवतात.
एलियटकडं गेली काही वर्षं असे असंख्य फोटो साठवलेले आहेत.
त्या फोटोंशी एलियटनं घाऊटमधलं रॉकेट ताडून पाहिलं. जगभरच्या लष्करं कशी आणि कोणत्या
प्रकारची रॉकेटं तयार करतात याची माहिती एलियटकडं आहे. रॉकेट निर्मितीची आणि वापराची
मॅन्युअल्स एलियटनं जमवली आहेत. विविध कोणातून रॉकेटचे फोटो पाहून, रॉकेट जमिनीत कसं
रुतलं आहे, कोणत्या कोनातून रुतलं आहे, किती रुतलं आहे याचा हिशोब एलियटनं मांडला.
रॉकेटचे क्लोजअप पाहून त्याच्यावरच्या खुणा, मार्क्स त्यानं तपासले. या तपशिलांवरून
रॉकेट कुठं तयार झालंय याचा पत्ता एलियटला लागला. हाताशी असलेली माहिती या रॉकेटशी
ताडून पाहिल्यावर एलियटला कळलं की हे रॉकेट नवं आहे.
एलियटनं घाऊटमधल्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. रॉकेटं
कशी पडली याचं तपशीलवार वर्णन विचारलं. लोकांनी लगोलग ईमेल करून एलियटला माहिती पुरवली.
एलियटनं नोंदी एकत्र केल्या. रॉकेट आकाशातून जमिनीवर पडलं
पण फुटलं नाही. एक कोन करून ते जमिनीत रुतून राहिलं. एका रॉकेटजवळ एक कुत्रं तडफडतांना
दिसलं. दुसऱ्या रॉकेटसमोर एक छोटा मुलगा तडफडतांना दिसला. कुत्रा आणि मुलगा आचके देत
होते, त्यांच्या तोंडातून फेस येत होता. दोघंही काही काळ आचके देऊन निश्चेश्ट होत होते,
मरत होते. एलियटनं आपल्या काँटॅक्सना फोन केला आणि आणखी क्लिप्स मागवल्या. एक माणूस
एलियटच्या सांगण्यावरून तडफडणाऱ्या मुलाचं व्हिडियो शुटिंग करायला रॉकेटजवळ पोचला आणि
तोच तडफडून मेला. त्याचं मरणं तिसऱ्या एका माणसानं शूट केलं आणि एलियटला पाठवलं.
एलियटनं निष्कर्ष काढला. फेस येणं आणि तडफडणं ही लक्षणं सारिन
वायूच्या बाधेची होती. अशी रॉकेटं बाल्कन युद्धात वापरली गेली होती. न वापरता अनेक
रॉकेटं क्रोएशियात पडून होती. सौदी अरेबियानं ती क्रोएशियातून उचलली आणि असदविरोधी
बंडखोराना पुरवली. सारिन वायूचा वापर आंतरराष्ट्रीय जेनेवा कराराचं उल्लंघन करतो.
एलियटनं आपल्या ब्लॉगवर सविस्तर वृत्तांत लिहिला. सवयीप्रमाणं
बीबीसी, सीएनएन, न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन इत्यादी माध्यमातल्या पत्राकारांनी तो
वाचला. टाइम्सच्या सी जे शिवर्सनं त्या ब्लॉगवर आधारलेली बातमी छापली. क्रोएशियातली
शस्त्रं जॉर्डनमधून खुष्कीच्या वाटेनं सीरियात पोचली असं त्यानं बातमीत लिहिलं.
बोंब झाली. असद तर रासायनिक बाँब वापरतच होते पण विरोधकही
विषारी वायू वापरत आहेत हे बाहेर आलं. सौदीचा या प्रकरणातहा हातही उघड झाला.
एकदा एक रॉकेटसारखं शस्त्रं जमिनीवर कोसळलं. एलियटकडं लगोलग
माहिती गोळा झाली. रॉकेट वेगळं होतं. जगात तयार होणाऱ्या रॉकेटांपेक्षा वेगळं. विविध
भाग जुळवुन ते तयार करण्यात आलं असल्यानं ते कुठं तयार झालं ते एलियटला कळेना. रॉकेटवर
अल्फान्युमेरिक चिन्हं होती. एलियटला ती चिनी अक्षरं असावीत असं वाटलं. त्यानं त्या
अक्षरांचे फोटो एका चिनी ब्लॉगरला पाठवून चिनी मजकुराचा अर्थ विचारला. चिनी ब्लॉगरचं
उत्तर आलं त्या अक्षराचा अर्थ होतो सायकलचा पंप.
फुस्स. म्हणजे कोणी तरी सायकलच्या पंपाचं रूपांतर एका रॉकेटमधे
केलं होतं.
एका गावात असंच एक रॉकेट कोसळलं. गावकऱ्यांना त्या रॉकेटचे
फोटो एलियटला पाठवायचे होते. त्यांनी रॉकेटं हातानं ओढत नेऊन एका घराजवळ ठेवलं आणि
त्याचे फोटो, क्लिप्स काढल्या. एलियटला ते रॉकेट किती भयानक होतं याची कल्पना होती.
त्यानं तडक त्यांना कळवलं की असल्या रॉकेटला हात लावायचा नसतो, ट्रॅक्टरनंही असं रॉकेट
ओढायचं नसतं. महाभयंकर स्फोटकं त्या रॉकेटमधे असतात. ही रॉकेटं कोसळून शांतपणे जमिनीवर
पहूडतात. नंतर त्यावरून कार, ट्रॅक्टर, रणगाडा असलं काही गेलं की स्फोट होतो. तेव्हां
आता रॉकेट जिथं आहे तिथं राहू द्या, दूर जा, त्यावरून वाहन जाणार नाही याची काळजी घ्या
असं एलियटनं त्यांना कळवलं.
सीरियात पडणारे बाँब किंवा रॉकेटची व्हिडियो क्लिप दाखवतात
तेव्हां त्यावर अरबी भाषेत कॉमेंटरी असते. एलियटला अरबी येत नाही. एलियट ते क्लिप अरब
मित्रांना पाठवतो आणि त्याचा अर्थ विचारतो.
सीरियातच नव्हे तर जगात इतरत्र चालणाऱ्या युद्धांवरही एलियटचं
लक्ष असतं. मलेशियाचं विमान पाडणाऱ्या रॉकेटची माहिती एलियटकडं गोळा झाली. रॉकेटवरच्या  रशियन भाषेतल्या खुणा एलियटनं गोळा केल्या आणि रशियन
ब्लॉगर्सशी संपर्क करून त्याचा अर्थ शोधला. रॉकेट युक्रेनमधे तयार झालेलं होतं. रशियानंच
मलेशियन विमान पाडलं हे एलियटनं सिद्ध केलं.
एलियट शांततावादी आहे. त्याला युद्धाची आणि हिंसेची चीड आहे.
म्हणूनच  तो युद्धं उघडी पाडत असतो. दररोज त्याच्याकडं
शेकडो फिल्म्स गोळा होतात. त्यात रक्तबंबाळ शरीरं असतात. जखमी माणसं किंचाळत असतात.
एलियटला ते पहावत नाही. वरील क्लिप्स संपादित करतांना तो लॅपटॉप म्यूट करतो.
युद्ध जाणकार, सरकारं एलियटवर लक्ष ठेवून असतात. एलियटनं
सरकारमधे सामिल व्हावं असा त्यांचा आग्रह असतो. पण अशा रीतीनं सरकारमधे सामिल होणं
म्हणजे युद्धाला मदत करण्यासारखं आहे असं एलियटला वाटतं. एलियटकडं गोळा झालेली माहिती
म्हणजे प्रचंड घबाड आहे. या घबाडाला आजच्या सनसनाटी माध्यमांच्या जगात खूप किंमत आहे.
अनेक कंपन्या, माध्यमं एलियटला भरपूर पैसे देऊन आपल्याला सामिल व्हायला सांगतात. एलियट
तयार होत नाही.
बीबीसीनं आणि सीएनएननं एलियटला बोलावून घेतलं. माहिती गोळा
करण्याचं व संपादन करण्याचं तंत्र त्याच्याकडून शिकून घेण्यासाठी. तेवढ्या पुरता एलियट
लंडनला आणि न्यू यॉर्कला गेला. अन्यथा एलियट लेस्टरमधल्या घराच्या बाहेर पडत नाही.
एलियटची आई सांगते की शाळेच्या दिवसात त्याचं अभ्यासकडं लक्ष
नसे. त्याला कंप्यूटरवर खेळायला आवडत असे. तासन तास. त्यामुळं तो कॉलेजातही गेला नाही.
नंतर कधी तरी लग्न झालं. आता चार पैसे मिळवणं आलं. एका खाजगी कंपनीत तो कारकुनीसारख्या
कामाला लागला. इतर काही त्याला येत तरी कुठं होतं?  तिथंही त्याचं कामात लक्ष नसे. कंपनीनं त्याला कामावरून
काढून टाकलं.
पत्नी वैतागायची. घरात एक मुलगी होती. घर कसं चालवायचं? पत्नी
नोकरी करू लागली. हा पठ्ठा घरीच बसून राही, लॅपटॉप आणि इंटरनेटवर. मुलीची आंघोळ पांघोळ,
तिचं शिक्षण, तिला सांभाळणं हे उद्योग करत असल्यानं त्यातल्यात्यात पत्नी खुष असावी.
दररोज यू ट्यूब, ट्विटर, फेसबुक, ब्लॉग्ज. एके दिवशी सीरियातलं एक दृश्य त्यानं पाहिलं.
बाँब पडत असतात. हा गोळा कुठून आला, किती अंतरावरून आला, कुठल्या तोफेतून आला याची
जिज्ञासा जागृत झाली. एलियटनं माहिती गोळा करायला सुरवात केली.
रॉकेट मॅन या ब्लॉगरचा जन्म झाला.
एलियट सरकार किंवा मोठ्या कंपन्यांकडून पैसे घ्यायला नकार
देतो. काही शांततावादी, मानवतावादी माणसं, छोटे गट त्याला पैसे देतात. जगण्यापुरते.
त्यावर एलियट आनंदात आहे.

।।
इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.

इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.

इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.
 Heretic
Why Islam Needs A Reformation Now
Ayaan Hirsi Ali
Harper Collins.
पेशावरमधील बाच्चा खान शिक्षण संस्थेमधे घुसून तालिबानी घातपात्यांनी तीसेक विद्यार्थ्यांना
ठार मारलं. मेलेले विद्यार्थी मुसलमान होते. मारणारे तालिबानी मुसलमान होते.
सुरवात अल कायदानं केली. अल कायदातून फुटून आयसिसनं स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन केली. अल कायदातून स्फूर्ती घेऊन अल नुस्र फ्रंट, बोको हराम या संघटना स्थापन झाल्या. गेल्या वीसेक वर्षात या संघटनांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, इजिप्त, येमेन, इथियोपिया, सोमालिया,सुदान,नायजेरिया, इंडोनेशिया, सीरिया, इराक, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांत हिंसा माजवली आहे. फार माणसं मारली आहेत. मारलेल्या माणसांत बायका मुलं आहेत, ज्यू-ख्रिस्ती आहेत, मुस्लीम आहेत. या मंडळींचा विचार मान्य नसणारे ते सगळे शत्रू आणि त्यांना नष्ट करण्याचा अधिकार या मंडळींना अल्लानं, कुराणानं दिला आहे असं यांचं म्हणणं.  या मंडळींना सारं जग इस्लाममय करायचं आहे.
एकेकाळी अल कायदानं तालिबानच्या सहाय्यानं अफगाणिस्तानवर अधिकृत राज्य केलं. सध्या आयसिसनं सीरियातल्या राक्का या गावात आपलं अधिकृत खिलाफत सुरु केलंय. अल बगदादी हा आधुनिक खलिफा पश्चिम आशियामधे पुन्हा एकदा ऑटोमन साम्राज्य उभं करण्याच्या प्रयत्नात आहे.
  जगातल्या बहुसंख्य देशात आयसिसनं शिरकाव केला आहे. स्थानिक तरुण तरुणींचे आयसिस गट जगात तयार होत आहेत. त्यांना सीरिया, पाकिस्तान, येमेन, अफगाणिस्तान असं कुठंकुठं प्रशिक्षण मिळतं, प्रेरणा मिळते. मग हे तरूण सीरिया-इराकमधे जातात किंवा पॅरिसमधे किंवा जाकार्तामधे किंवा ट्युनिसमधे पर्यटन स्थळांवर हल्ले करतात.
इस्लामी समाजात दहशतादाला-हिंसेला मूक, अंशतः  पाठिंबा आहे. जग इस्लाम नष्ट करू पहातंय हा आयसिस-अल कायदा इत्यादी संघटनांचा प्रचार मुसलमानांना पटतो. पश्चिमी, ख्रिस्ती, इस्लामेतर जग इस्लामच्या विरोधात आहे असं बहुसंख्य मुसलमानांना वाटतं. भले सगळा मुस्लीम समाज हिंसक नसेल, त्याला सुखात रहायचं असेल. परंतू आयसिस, अल कायदा, तालिबान, इत्यादी संघटनांचा-विचारांचा पूर्ण नायनाट करायला इस्लामी समाज तयार नाहीये असंही दिसतंय.
फार तर असं म्हणता येईल की आयसिस-अल कायदाचा विचार मुसलमानांना पटतो पण त्यांची कामाची पद्धत मुसलमानांना मंजूर नाही.
दहशतवादाचा बंदोबस्त कसा होणार?
लष्करी कारवाई करून?
इस्लामी तरूण मंडळींच्या आर्थिक अडचणी दूर केल्या तर ती हिंसेकडं वळणार नाहीत?
इस्लामी तरूण इतर समाजात मिसळले तर दहशतवादापासून  दूर जातील?
अमेरिका, फ्रान्स, ब्रीटन इत्यादी देशामधे अनेक संस्कृती-धर्म एकत्र नांदतात. तीच या अतिरेकी मंडळींना ताळ्यावर आणण्याची वाट आहे?
‘खरा इस्लाम’ पटवून दिला तर हिंसा थांबेल?
||||||
अयान हिरसी अलीचं म्हणणं आहे की वरील कोणत्याही उपायांनी इस्लामी दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत. इस्लाम या धर्मातच हिंसेला, दहशतवादाला वाव असल्यानं इस्लाममधेच मूलभूत सुधारणा केल्या शिवाय दहशतवाद आटोक्यात येणार नाही असं अयान म्हणतात.
इस्लाम हा मुळातच शांततावादी धर्म नाही असं अयान यांचं म्हणणं आहे.
इस्लामची निर्मिती दोन टप्प्यात झाली, मक्का टप्पा आणि मदिना टप्पा. मक्का टप्प्यात उपास, प्रवचनं, समजावणं, उपकार  या गोष्टीं इस्लाममधे होत्या. महंमद लोकांना समजावत होते, इतर उपासनापद्धतीच्या लोकांशी संवाद करत होते, त्यांना पटवून देत होते, गरजूंना मदत करत होते. मदिना हा टप्पा म्हणजे महंमदांचं राज्य स्थापन झाल्याचा टप्पा. त्या काळात इस्लाम असहिष्णू झाला. इतर धर्माची माणसं आणि इस्लाममधलेही विरोधी मत असलेले यांच्यावर हल्ला करा, त्यांना खतम करा असं महंमदांनी मदिना टप्प्यात सांगितलं.
मक्का इस्लाम म्हणजे शांततेचा इस्लाम आणि मदिना इस्लाम म्हणजे हिंसक इस्लाम अशी विभागणी करून अयान दहशतवादींना मदिना इस्लामी कप्प्यात टाकतात.जगभरात मदिना इस्लामचा प्रभाव जास्त आहे असं अयान यांचं म्हणणं आहे. जे थोडेफार मक्का मुसलमान आहे त्यांना आपलंसं करून मदिना इस्लामवाल्यांना काबूत आणणं अशी अयान यांची खटपट आहे.
अयान हिरसी अलींचं म्हणणं संक्षेपात असं आहे. ‘इस्लाममधे साक्षेपी विचारांची (क्रिटिकल थिंकिंग) परंपरा नाही. माणसानं धर्म-देव निर्माण केला, देवानं-धर्मानं माणसाला निर्माण केलेलं नाही हा वास्तव आणि तर्कशुद्ध विचार मुसलमानांनी केलेला नाही. कुराण हे एक पुस्तक आहे. ते एका महंमद नावाच्या माणसानं एका विशिष्ट परिस्थितीत जगाला सांगितलं आहे. ते माणसानं निर्माण केलेलं पुस्तक असल्यानं त्यातल्या कित्येक गोष्टी कालबाह्य आहेत, अयोग्य आहेत (जिहाद, हुदूद कायदे, स्त्रीला दिली जाणारी वागणूक). पारलौकिक नव्हे तर या जगात कसं जगावं याचा विचार करणं आवश्यक आहे.’
इस्लाममधे आमूलाग्र बदल,सुधारणा व्हाव्यात असं अयानचं म्हणणं आहे. ख्रिस्ती धर्मात मार्टिन लूथर यांनी केलेल्या सुधारणेचे उदाहरण अयान देतात. इस्लाममधेही अशा बदलांची मागणी केलेल्या विचारवंतांचे दाखले अयान देतात.   अशी मागणी करणाऱ्यांना मारून तरी टाकलं जातं नाही तर त्यांना अज्ञातवासात जावं लागतं असे इतिहासाचे दाखले अयान देतात.
या पुस्तकात त्यांनी स्त्रियांना इस्लामी समाजात काय सोसावं लागतं याचे काही ओझरते उल्लेख केले आहेत. स्त्रीला भयानक वागणूक देणं हा व्यवहार कुराणातल्या तरतुदींमुळंच झालेला आहे असं अयान लिहितात.अयान उदारणांनिशी सांगतात की जिहादमधे हिंसेला चिथावणीच आहे असं नव्हे तर जिहाद करणं हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्यच आहे; कुराणात सांगितलेल्या गोष्टी न करणारा माणूस धर्मबाह्य असल्यानं त्याला देहांताची शिक्षा आहे. अयान म्हणतात की कुराणाची मांडणी गोंधळाची आहे.  अनेक परस्पर विरोधी विधानं कुराणात आहेत. परधर्मियांना सांभाळून घ्या,  त्यांना दुय्यम नागरीक ठरवून त्यांच्याकडून कर गोळा करा, त्यांना मारून टाका अशा आशयाची  परस्पर विसंगत  विधानं कुराणात सापडतात.
||||
अयान हिरसी अली अमेरिकेत अत्यंत कडक सुरक्षेत रहातात. त्यांना जिवे मारण्याचा फतवा निघालेला आहे.हा फतवा व्हॅन गॉग या चित्रपट निर्मात्याच्या रक्त बंबाळ शवावर दहशतवाद्यांनी लिहून ठेवला होता. व्हॅन गॉग यांनी नेदरलँडमधे तयार केलेल्या एका चित्रपटावर इस्लामी माणसं आणि दहशवाद्यांचा राग होता. अयाननी व्हॅन गॉगला हा सिनेमा काढण्यात सहकार्य केल्यानं ‘आता तुझा नंबर आहे’ अशी धमकी अयानला उद्देशून देण्यात आलीय.
अयान हिरसी अली ही सोमालियन स्त्री. योनी शिवण्याचा अघोरी प्रकार सोमालियात केला जातो. त्याला अयाननं नकार दिला. तिच्या इच्छेविरोधात तिचं लग्न ठरवलं. अयान पळाली. युरोपमधे गेली. तिथं शिकली. नेदरलँडमधे ती संसदेतही पोचली. तिथं यथावकाश तिच्यावर फतवा निघाल्यानंतर ती अमेरिकेत गेली. नियाल फर्गसन या अमेरिकन लेखकाबरोबर तिनं लग्न केलं. या आधी त्यांनी Nomad आणि Infidel या पुस्तकातून आपली कहाणी सांगितली आहे. अयाननी इस्लामचाही त्याग केला आहे. इस्लाममधे वाढल्यानं, इस्लामचं चटके खाल्ल्यानं इस्लामचा विचार त्यांना सोडवत नाही.
||||
अयान यांचे विचार स्फोटक आहेत. बहुतांश मुस्लीम समाजाला ते मान्य होण्यासारखे नाहीत. त्यांचे विचार मुस्लीम समाज स्वीकारेल असं वाटत नाही. अयानची इच्छा आहे की कुराण नव्यानं लिहावं, त्यात सुधारणा कराव्यात. नवं कुराण आणि नवा इस्लाम मुसलमानानी स्वीकारावा. तसं घडेल अशी शक्यता दिसत नाही. इस्लामी समाजानं स्वतःहून स्विकारलेली कोंडी इस्लामी समाज फोडेल असं दिसत नाही.
 सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मुल्ला यांच्या दबावाखाली इस्लामी समाज वावरत आला आहे. बलवान सत्ताधाऱ्यानं   केलेले/लादलेले बदल मुस्लीम समाज स्वीकारतो असं काही ऑटोमन सुलतानांच्या राजवटीत दिसतं. केमाल पाशानं कुराण नाकारून आधुनिक कायदा तुर्कस्तानमधे लागू केला. तुर्की समाजानं ते मान्य केलं कारण केमाल पाशा लष्करी प्रशासक होता, सैन्याची ताकद त्याच्या हाताशी होती. मुल्लांचा विरोध त्यानं बळाचा वापर करून मोडून टाकला, मुल्ला मंडळी गप्प झाली. आजही इजिप्तमधे लष्करी हुकूमशहा (मुबारक आणि एल सिसी) मुस्लीम ब्रदरहूडला काबूत ठेवतात.
दुसरा अनुभव अमेरिकेतला. अमेरिकेत मुस्लीम पुरुषांनी स्त्रीवर अत्याचार केले आणि शरियाचे दाखले देऊन अत्याचाराचं समर्थन केलं.  अमेरिकन न्यायालयानं  शरीया मान्य न करता अमेरिकन कायद्यांचा वापर करून अत्याचार करणाऱ्यांना पंधरा ते पंचवीस वर्षाच्या कारावासाच्या शिक्षा दिल्या. अमेरिकेत कोणी कोणाचा जीव घेतला (जिहाद करण्यासाठी, काफिरांना मारणं हे धर्मकर्तव्य आहे असं सांगून) तर त्याला अमेरिकेत फासावर लटकावलं जातं, त्याला हुतात्मा म्हटलं जात नाही.
  सौदी, इराण, सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी देशातली सगळी जनता मुसलमान आहे. त्यांचं त्यांचं स्वतंत्र राजकारण आहे. त्या देशातली जनता इस्लाममधे सुधारणा करेल असं वाटत नाही.
इंडोनेशिया, मलेशिया या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत.  तिथल्या शासकांनी दहशतवाद, अतिरेक यांना थारा दिला नाही. इस्लाम आटोक्यात ठेवून तिथल्या सरकारांनी आधुनिक ‘सेक्युलर’ कारभार केला.
अमेरिका, युरोपिय देश, भारत, लंका, ब्रह्मदेश, द. अमेरिका इत्यादी ठिकाणी मुसलमान बहुसंख्य नाहीत, ते तिथल्या इतर धर्मीय-संस्कृतीच्या लोकांसमवेत रहातात. तिथं, तिथल्या देशांनी आपापले सेक्युलर कायदे नीट अमलात आणले तर इस्लामी समाज निदान व्यवहारात तरी सुधारित इस्लाम अमलात आणेल. कदाचित तिथंच अयान यांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा अमलात येऊ शकतील.
भारत ही सुधारणांसाठी पोषक भूमी आहे. हिंदू समाजात कर्मठता आहे, धर्मांधता आहे, त्याच बरोबर मोकळेपणा आणि सहिष्णुताही आहे. घोडेचष्मा आणि मोकळे डोळे अशा दोन परस्परविरोधी प्रेरणा हिंदू समाजात एकत्र नांदत आल्या आहेत. हिंदू समाज कधी मूळ गाभ्यात सुधारणा करतो, कधी मूळ गाभा शिल्लक ठेवून वर्तणुकीत सुधारणा करतो. तणाव आणि ग्रह बाळगून वेगळ्या समाजगटाबरोबर सहजीवनाची सवय हिंदू समाजाला आहे. हिंदूच्या सहवासात राहिल्यामुळं भारतातले मुसलमान  इस्लामी विचार आणि परंपरेला मान्य नसलेल्या कित्येक गोष्टी करत असतात. भारतातल्या मुसलमानांना अरब लोक ‘हिंदू’ म्हणून हिणवतात. कालसुसंगत होण्याचा प्रयत्न हिंदू समाज करत आला, आजही करू पहात आहे. मुस्लीम समाजही त्या प्रवाहात भारतात सामिल होऊ शकतो.त्यासाठी  हिंदूनी कालसंगत होणं  आणि मुसलमानांना सोबत ठेवणं आवश्यक आहे.
००

मुंबईतलं पुस्तकांचं नवं दुकान wayword & Wise

मुंबईतलं पुस्तकांचं नवं दुकान wayword & Wise

बोरीबंदर स्टेशनमधून बाहेर पडल्यावर
समोर दिसतो एक कबूतर खाना. तिथं असंख्य कबूतरांची फडफड आणि गुटरगू. अखंड. तिथंच उजव्या
हाताला आहे पुस्तकाचं नवं कोरं दुकान. Wayword and Wise.
इमारत ब्रिटीश आहे. स्वतःचं एक स्वतंत्र
व्यक्तिमत्व पांघरलेली, लक्ष वेधून घ्यायला नकार देणारी. दुकानाची पाटी वेगळी, निळ्या
रंगाची,  लक्ष वेधून घ्यायला नकार देणारी.
आजूबाजूला बसेस, कार, उडुपी हॉटेलं
आणि कबुतरांचा गोंगाट.
दुकानात दिव्यांचा लखलखाट नाही. 
दीर्घ काळ टिकलेल्या, मुरलेल्या गोष्टी
वातावरणात असतात. लंडनमधे, मँचेस्टरमधे, एडिंबरात जुन्या पबमधे गेल्यावर जसं वाटावं
तसं काहीसं.
दुकानात नीट मांडलेली पुस्तकं.  लगट करत नाहीत, आपल्याला चिकटायचा प्रयत्न करत नाहीत.
आदबीनं कपाटात असतात. दोन कपाटांच्या रांगेत दोन माणसं पाठीला पाठ लावून पुस्तक शांतपणे
चाळू वाचू शकतील येवढं अंतर.
आत शिरतांनाच समोर   गिरकी 
घेऊ शकणाऱ्या पुस्तकाच्या कपाटावर प्रिमो लेवी यांची चार पुठ्ठा बांधणीची पुस्तकं
एका खोक्यात ठेवलेली दिसतात. किमत सहा हजार रुपये.
कोण हा प्रिमो लेवी?
“Monsters exist, but they are
too few in number to be truly dangerous. More dangerous are the common men, the
functionaries ready to believe and to act without asking questions.”  असं म्हणणारा.
प्रिमो लेवी हिटलरच्या ऑशविझ छळछावणीत
होता. तिथून तो वाचला. इटालीत आपल्या गावी परतला. त्यानं कथा, कादंबऱ्या लिहिल्या.
तो अनुभवानं, विचारपूर्वक अश्रद्ध  होता.
इंग्रजी साहित्यातला तो ऑलटाईम मोठा
लेखक, विचारवंत मानला जातो. त्याच्या कादंबऱ्या, लेख, कथा, निबंध माणसं सतत वाचत असतात.
उत्तम छपाई केलेले त्याच्या साहित्याचे वरील खंड नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या खंडांच्या
निमित्तानं  न्यू यॉर्करनं युरोप सतत प्रिमो
लेवीची आठवण कां काढतात ते लिहिलं होतं. तो मजकूर प्रसिद्ध होत असतानाच इकडं मुंबईत
लेवीचे खंड  वेवर्ड अँड वाईजमधे पोचले होते.
हे खंड विकत घेणारी माणसं मुंबईत थोडीच असतील, पण आहेत.
पुढं गेल्यावर कपाटांत जपानी, आफ्रिकन,
अमेरिकन, द. अमेरिकन, पोलिश, तुर्की इत्यादी साहित्यातली निवडक पुस्तकं दिसतात.
पुस्तकं पहात पुढं सरकलं की डाव्या
बाजूला  कोपऱ्यात टेबलं आणि खुर्च्या मांडून
ठेवलेल्या दिसतात. सध्या त्या रिकाम्या आहेत. काही दिवसांत तिथं बसून कॉफी आणि ब्राऊनी
खाता येणार आहे. आणखी काही महिन्यांनी तिथं चांगली वाईनही मिळणार आहे. 
लंडनमधे लंडन  रिव्ह्यू ऑफ बुक्सचं  दुकान आहे. तिथं दुकानाच्या कडेला कॉफी मिळते, केक्स
मिळतात आणि मद्याचे घोट घेत घेत पुस्तकं चाळता येतात. तिथं येणाऱ्या वाचकांची जातकुळी
लक्षात घेऊन खानदानी ब्रिटीश स्कॉच तयार करणारे लोक जातीवंत स्कॉच वर्षातून काही दिवस
या दुकानात पाठवतात. स्कॉच आणि पुस्तक.
हा सारा उद्योग उभारणाऱ्या माणसाचं
नाव आहे विराट चांडोक. याचं सारं आयुष्य पुस्तकांत गेलं आहे. वाचन आणि वाचन. सर्व विषयांचं.
माणूस आहे पंजाबी. घराची परंपरा आहे आर्थिक उद्योगाची. वडील धनिक व्यावसायिक. विराटला
कळायला लागलं तेव्हापासून वाचनाचा नाद. धंद्यात इंटरेस्ट नाही. वडिलांनी विराटला लहानपणापासून
पुस्तकांच्या दुकानात फिरवलं, वाचनाचा नाद जोपासू दिला.
वीसेक वर्षं झाली असतील.   वांद्र्याला एका पेट्रोल पंपात लोटस बुक स्टॉल
विराटनं चालवला होता. पेट्रोल पंपात बुक स्टॉल.  
तिथं अगदी वेचक पुस्तकं असत. विजय तेंडुलकर, बाजी कुलकर्णी इत्यादी वाचणारी
माणसं तिथं दर आठवड्याला फेरी मारत. काही तास पुस्तकं आणि विराटशी चर्चा. वाचकाचा कल
पाहून त्यानं काय वाचावं, जगात काय नवं आलंय ते विराट सांगत असे. विराटनं लोटस सोडलं,
नंतर तो क्रॉसवर्डमधे गेला. क्रॉसवर्डच्याही काही मर्यादा होत्या. तिथं खेळणी, देखणी
पुस्तकं ठेवावी लागत कारण त्यांना गिऱ्हाईकं होती. विराट तिथं रमत नसावा. तिथंच त्याची
गाठ अतुल सूद नावाच्या एका बिझनेसमनशी पडली. अतुल बिझनेस करतो आणि त्याला पुस्तकांची
आवड आहे. उत्तम, अभिजात, निवडक पुस्तकांचं दुकान काढणं यावर दोघांचं एकमत झालं. वेवर्ड
उघडलं. उघडल्या उघडल्या काही दिवसातच रोमिला थापर दुकानात रेंगाळून गेल्या.
।।
Wayword and Wise हे दुकान तसं लहान
आहे.
 जेवढी जागा जास्त तेवढी पुस्तकं जास्त. स्योलमधलं
(द.कोरिया) क्योबो बुक
स्टोअर.  दुकानाचा कार्पेट एरिया एक हेक्टर
आहे.
 
दुकानाचे दोन मजले जमिनीच्या खाली आहेत. मांडणी चकचकीत. ब्रिटिशांच्या दुसऱ्या
टोकाची. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक कपाट, प्रत्येक पुस्तकं रचलेलं टेबल वाचकांना आपल्याकडं
खेचायचा प्रयत्न करत. रंग, दिवे यांच्या मदतीनं. 
पुस्तकाची कव्हरं फ्लोरोसंट रंगाची. हे पुस्तक बघू की ते पुस्तक बघू असं होतं.
बहुतांश पुस्तकं कोरियन भाषेतली. सर्व
विषयातली. इंजिनियरिंग असो की टेक्नॉलॉजी की मेडिसीन, सर्व विषयातलं अद्यावत ज्ञान
कोरियन भाषेत.  पुस्तकांची छपाई, मांडणी, फाँट्स,
चित्रं वगैरे सारं काही आकर्षक. एका पुस्तकात शस्त्रक्रियेबद्दल काही तरी लिहिलेलं
असतं. कोरियन भाषेत. त्यामुळं काय लिहिलय ते कळत नाही. पण तिथं काढलेली आकृती आणि ऑपर्शन
थेटराचा फोटा या गोष्टी पहातच रहाव्याशा वाटतात.
इंग्रजी पुस्तकं कमीच.
एका पुस्तकावर इंग्रजी अक्षरं दिसतात.
उत्सुकतेनं पहावं तर त्या पुस्तकावर लिहिलेलं असतं की या पुस्तकात दिलेले शब्द आणि
वाक्य कोरियन नसलेल्या लोकांनी कृपया जपून, काळजीपूर्वक वापरावीत. पुस्तक उघडल्यावर
कोरियन आणि इंग्रजी भाषेत मजकूर असतो.  कोरियन
भाषेतल्या शिव्या, अपशब्द. पुस्तक चाळू लागलं की दुकानातली मदत करणारी कोरियन मुलगी
गालातल्या गालात हसत, लाजत विचारते, काही मदत हवीय का. पुस्तकातलं एक पान उघडून त्यातली
एक त्यातल्या त्यात मुळमुळीत असभ्य ओळ ती वाचून दाखवते.
दुकानातला एकच मजला फिरता फिरता पाय
दुखतात. दाम खात, दुकानातच असलेल्या दोन खाणावळीत थांबत थांबत, खात पीत एकेक दालन फिरायचं.
जागोजागी मदत करण्यासाठी माणसं.
किती पुस्तकं आहेत या दुकानात?
२३ लाख.
शनिवार रविवारी सव्वालाख माणसं दुकानात
फेरी मारतात.
00

इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.

इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.

सौदी इराणमधल्या प्राचीन संघर्षातलं एक नवं वळण.
।।
 इराण आणि सौदी अरेबिया यांनी आपसातले राजनैतिक संबंध तोडले आहेत. दूतावास बंद करावेत, राजदूतानी आपापल्या देशात परत जावं असे आदेश दोन्ही देशांनी काढले आहेत.
सौदीनं अल निम्र या शिया पुढाऱ्याचा केलेला शिरच्छेद हे या घटनेचं तात्कालिक कारण आहे. सौदीचं म्हणणं होतं की अल निम्र सौदी हिताच्या विरोधात भाषणं करत होते, हिंसेला चिथावणी देत होते, सौदीविरोधात इतर देशांनी (इराणनं) कारवाई करावी असं सुचवत होते.  सौदीनं त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. इराणचं म्हणणं आहे की अल नम्र हे नम्र होते,ते चिथावणी वगैरे देणाऱ्यांपैकी अजिबात नव्हते, ते सौदीतल्या अल्पसंख्य शियांच्या हक्कासाठी लढत होते. नम्र यांच्या शिरच्छेदानंतर तेहरानमधल्या इराण्यांनी सौदी दूतावासावर अग्नीगोळे फेकले, दूतावासावर हल्ला केला.
नम्र यांचा शिरच्छेद आणि राजनैतिक संबंध तोडणं या घटना निमित्तमात्र आहेत. इराण आणि सौदी यांच्यातलं वितुष्ट कित्येक शतकापासून चालत आलेलं आहे. इराण आणि सौदी हे आजच्या स्वरूपात देश नव्हते, नेशन स्टेट्स नव्हते तेव्हापासून इराण (शिया पंथाचा नेता) आणि सौदी (सुन्नी पंथाचा नेता) यांच्यात वैचारिक आणि सामरिक लढाया चालत आल्या आहेत. इराण, सौदी आणि जगभरचे मुस्लीम प्रदेश यामधे दोन्ही पंथाच्या लोकांनी एकमेकाचे लाखो लोक मारले आहेत.
तेव्हां मूळ मारामारी पंथांची.  मुस्लीम समाजाचं नेतृत्व मुस्लीम समाजानं आपसात चर्चा करून ठरवावं, ते कोणा एका घराण्यात (महंमदांच्या वंशजात) असता कामा नये असं सुनी म्हणतात. शियांचं म्हणणं  महंमदांच्या वंशातल्याच माणसानं इस्लामचं नेतृत्व केलं पाहिजे.त्यांचे बारावे इमाम नाहिसे झाले आहेत, माहदी, ते कधी तरी परत येतील आणि जग इस्लाममय करतील असं शियांचं म्हणणं आहे. ते माहदीची वाट पहात आहेत. सुन्नी मात्र त्यांना हवा तो प्रमुख निवडायला मोकळे आहेत. अल बगदादीनं स्वतःला  इस्लामचा प्रमुख जाहीर करून टाकलंय. इतरही अनेक बारके सारके पण चिवट धागे या पंथांनी भांडणांमधे घुसवले आहेत.
काही अंशी यामधे सांस्कृतीक-वांशिक भागही आहे. महंमदांनी इस्लाम स्थापला आणि पसरवला. महंमद अरब होते. त्यांचे साथीदार अरब होते. अरबी भाषा आणि संस्कृतीही महंमदांच्या इस्लामचा अविभाज्य घटक होती. पर्शियन-इराणी लोकांनी इस्लाम स्वीकारला (त्यातही जबरदस्ती कितपत होती याचा तलाश घ्यायला हवा) परंतू त्यांना अरब वर्चस्व नको होतं. यातूनच संघर्षाला  अरब विरुद्ध पर्शियन असाही एक पैलू चिकटला.
पहिल्या महायुद्धापूर्वी इराण आणि सौदी अरेबिया हे समाज या ना त्या इस्लामी साम्राज्याचा भाग होते. पांथिक आणि वांशिक मतभेदांसह दोन्ही पंथ साम्राज्यात नांदत होते. पहिल्या महायुद्दानंतर जगभरची साम्राज्य कोसळली आणि देश सुटे झाले. तिथून नेशन स्टेट्सना स्वतःचं एक स्वतंत्र आर्थिक आणि राजकीय अस्तित्व प्राप्त झालं. तेल हाताशी आल्यानंतर मुस्लीम देशांचं रूप आणखीनच पालटलं. सौदी किंवा इराण केवळ देश न रहाता त्या त्या विभागातले दादा  होण्याच्या प्रयत्नात लागले. शिया-सुनी आणि अरब-पर्शियन या पलिकडं जाऊन देश म्हणून ते एकमेकांच्या स्पर्धेत उतरले. त्यांनी आपापले गट तयार केले. इराणनं सीरिया, इराक, लेबेनॉन इत्यादी आखाती देश आपल्या गटात ओढले. सौदीनं दोहा, कतार, कुवैत, बहारीन, अमिराती इत्यादी देश आपल्या तंबूत खेचले. इजिप्त, पाकिस्तान, इंडोनेशिया इत्यादी मुस्लीम देश वंशाच्या आणि संस्कृतीच्या हिशोबात ना फारसी ना अरब. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र तंबू उभारले. इजिप्तची तर मजाच मजा. त्यांचं म्हणणं की त्यांची संस्कृती पर्शियन, अरब यांच्यापेक्षा किती तरी आधीची, म्हणून वेगळी आणि श्रेष्ठ.
 जगभरात १२० कोटी मुसलमान.  १४ कोटी शिया आणि उरलेले सुन्नी. सुन्नी मंडळीही नाना वंश, संस्कृती आणि भाषांत विभागलेली. भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी कित्येक सुनी गट शियांशी जुळवून घेत असतात, मारामाऱ्या करत नाहीत. परंतू आखात, पश्चिम आशियात मात्र ते एकमेकाचे गळे चिरत असतात. सध्या येमेनमधे दोन गटांमधे धुमश्चक्री चालू आहे.  एका गटाला इराण शस्त्र पुरवतं, दुसऱ्याला सौदी अरेबिया. सीरियात असद यांच्या सरकारला इराण शस्त्रं, पैसा पुरवतं आणि असदला विरोध करणाऱ्या गटांना सौदी,दोहा,कतार शस्त्रं पुरवतात. आयसिसला अरब देशांचा पाठिंबा आहे. इराकमधे सरकार कोणाचंही असलं तरी शिया आणि सुनी टोळ्यासैन्य गेली वीस वर्षं एकमेकांशी लढत आहेत.
सीरिया, इराकमधे सुनी अल्पसंख्य आहेत. तिथली सरकारं त्यांना छळत असतात.  त्या बद्दल सौदी अरेबिया तक्रारी करतं.  सौदी, बहारीन इत्यादी ठिकाणी शिया अल्पसंख्य आहेत, त्यांना तिथले सत्ताधारी सुन्नी छळत असतात. इराण त्या बद्दल तक्रारी करत असतं.
एकूणात असा हा चिखल आहे.
इराण आणि सौदी अरेबियाला मुस्लीम जगाचं नेतृत्व हवंय. ते मिळवण्यासाठी दोघेही पश्चिमी देश, रशिया इत्यादींचे पाठिंबे मिळवत असतात. राजकारणाचा भाग म्हणून अमेरिका-रशिया  सतत आपल्या भूमिका बदलत कधी या गटाला तर कधी त्या गटाला पाठिंबा देतात,  दोघांमधलं वितुष्ट टिकवून ठेवतात.  इराण – सौदीचं नेतृत्व आणि जनताही गोठलेल्या कालबाह्य इस्लामी विचारांत अडकलेली आहे. आधुनिकता, सभोवतालचं जग, उद्याचं जग या बद्दल एकूणच मुस्लीम समाजात औदासिन्य, अज्ञान आणि दुरावा आहे. त्यामुळं गाढवासारख्या लढाया करत मुस्लीम समाज स्वतःचं आणि जगाचं नुकसान करत असतात.
इराण-सौदीनं राजनैतिक संबंध तोडणं हा मुस्लीम समाजाच्या स्वतःला आणि जगाला त्रास देणाऱ्या सिलसिल्यातला एक बिंदू आहे.
।।

।।