Browsed by
Month: February 2016

ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.

ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.

स्पॉटलाईट हा चित्रपट यंदाच्या ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. दिद्गर्शन, उत्तम चित्रपट यासह एकूण ७ नामांकनं या चित्रपटाला मिळाली आहेत. या चित्रपटाबद्ल बोंब दोन कारणांसाठी  झाली. एक म्हणजे चर्चमधल्या गैरव्यवहारावर चित्रपटानं बोट ठेवलं. दुसरं म्हणजे अमेरिकन समाज कसा पक्षपाती असतो ते या चित्रपटानं दाखवलं. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणून ही निर्मिती उत्तम आहे हा स्वतंत्र भाग झाला.
हा चित्रपट बिशपांची विकृती उघडी करतो.
बॉस्टन या अमेरिकन नगरीत अनेक बिशप लहान मुलांचा लैंगिक विकृत वापर करत असत. बिशप लहान मुलांना देवाची भीती घालून हा उद्योग करत. वाच्यता केलीत   तर देवाला आवडणार नाहीत असं सांगत. मुलं घाबरत. शाळेतून काढून टाकण्याची भीती. कारण शाळा चर्चची. नंतर समाज वाळीत टाकणार. कारण समाजावर चर्चचा प्रभाव. मुलं घाबरत. आतून घुसमटत.  उध्वस्थ होत. कित्येकांनी आत्महत्या केली. बहुतेकांचं जीवन उसवलं.
चर्चला हे सारं माहित होतं. चर्चनं या बिशपांना पाठीशी घातलं. त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांना रजेवर पाठवलं, उपचार केल्याचं नाटक केलं. आपण काही अयोग्य केलं असं बिशपांना वाटत नसे.
ख्रिस्ती धर्मात लैंगिक संबंध हे मूळ पाप, ओरिजिनल
सिन मानलं गेलंय.  आदम आणि ईव्हनं देवानं नाकारलेलं
फळ खाल्यानं त्यांना मुलं झाली.  धर्मप्रसारासाठी
काम करणाऱ्या माणसानं अविवाहित रहायलं पाहिजे असा एक ख्रिस्ती नियम. प्रीस्ट आणि नन
यांनी अविवाहित रहायचं. कामभावना ही माणसाच्या जगण्याचा अविभाज्य आणि अटळ घटक आहे हे
त्या ख्रिस्ताच्या काळात माहित नसेल. परंतू नंतर ते समाजाला कळलं तरीही ख्रिस्ती धर्मसंस्थेनं
आपल्या घडणीत सुधारणा केली नाही. शरीर संबंध आणि लग्न यांची सांगड   चर्चनं घातली.
विवाह केला नाही तरीही माणसं आपल्या शारीर गरजा भागवत रहातात हे सत्य चर्चनं नाकारलं.
शारीर गरजा नाकारूनही जगता येऊ शकतं. माणसाची तशी घडण असायला हवी. निर्धारानं शारीर
गरजा दूर ठेवूनही माणूस चांगलं जगू शकतो. सर्व माणसांना ते जमत नाही.  शारीर-मानसिक 
गरजा नाकारण्याची सक्ती केली की गोची होते. चर्चनं सक्ती केल्यानं  प्रिस्ट मंडळी या ना त्या वाटेनं शरीर सुख उपभोगत
असतात. लपून छपून
प्रीस्ट माणसं अत्यावश्यक सुख आडवाटेनं भोगतात
खरं पण क्रूर परिणाम समाजावर होतो.
गोल्डन ग्लोब या दैनिकाच्या स्पॉट लाईट या शोध पत्रकारी करणाऱ्या टीमनं हे प्रकरण वेशीवर टांगलं. अत्याचार करणाऱ्या प्रिस्टाना शोधून त्यांच्यावर कारवाई करणं असा ग्लोबचा उद्देश नव्हता. असे अत्याचार लपवण्याची, अत्याचारींना पाठीशी घालण्याची  व्यवस्था,
सिस्टिम,
चर्चमधे आहे यावर त्या पेपरला प्रकाश टाकायचा होता. सत्य लोकांसमोर ठेवणं हेच तर वर्तमानपत्राचं काम असतं. हे सत्य समजल्यावर त्याचं काय करायचं याचा निर्णय नंतर समाजातल्या इतर संस्थांनी घ्यायचा असतो.
या शोधासाठी गोल्डन ग्लोबला  पुलित्झर बक्षीस मिळालं. गोल्डन ग्लोबनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतावर हा चित्रपट आधारलेला आहे.
ही एक शंभर टक्के खरी गोष्ट आहे.
ही गोष्ट आपल्यापर्यंत सिनेमा पोचवतो. चित्रपट हे माध्यम कसं असतं, कसं असायला हवं, कसं असू शकतं याचा अभ्यास या चित्रपटामुळं शक्य होतो.
लैंगिक अत्याचार, गैरवापर हा मुख्य मुद्दा असून चित्रपटात अत्याचाराची एकही घटना सिनेमात दिसत नाही. ढाणढाण संगित नाही. एकही नाट्यमय घटना नाही. 
एका प्रसंगात  अत्याचाराचा बळी झालेला माणूस कोसळतो, रडतो. पण भेकाड नाही,  कोणतेही भावना चेतवणारे  सूर नाहीत.
 बळी, वकील, पत्रकार घटना शोधतात, नोंदतात.  ऊच्च स्वरात बोलत नाहीत, प्रवचन देत नाहीत. फक्त एकदा बातमीदार भावनाविवश होतो, तोही अगदी थोडा काळ.
चित्रपटभर बातमीदार, संपादक, मुख्य संपादक ही माणसं बातमीची,
बातमी गोळा करण्याच्या पद्धतीची आणि प्रक्रियेची  चर्चा करतात.  कचेरीत अनौपचारिक पद्धतीनं एकमेकासमोर बसून. खालच्या आवाजात कामाचे तपशील चर्चितात.  त्यांचे कपडे सामान्य.
त्यांची घरं सामान्य. मुख्य संपादक नावाचा माणूस खांद्यावर बॅग लटकावून कामाच्या जागी जातो. बातमीदार वकीलांना भेटतात, बळींना भेटतात, कार्डिनलना भेटतात. गाठीभेटी आणि संभाषणं चित्रपटभर पसरलेली आहेत.  माणसं आपापली कामं शांतपणे करताना दिसतात.आपण जगाची सेवा करतोय, जगावर उपकार करतोय, क्रांतीबिंती करतोय  असं त्यांच्या वागण्यात दिसत नाही. यात कोणीही हीरो असल्यासारखा दिसत नाही. कोणा एका किवा दोन मुख्य पात्रांभोवती सिनेमा फिरत नाही. अख्खी टीमच मुख्य पात्र आहे.
बॉस्टन या गावाची ही गोष्ट. गावावर चर्चचं वर्चस्व.
शाळा, कॉलेजेस  त्यांच्या ताब्यात. आर्थिक संस्था  चर्चच्या सांगण्यानुसार चालतात.  जो कोणी चर्चला दुखावेल त्याला चर्च जीवनातून उठवतं. कोणत्याही नाट्यमय घटनेविना  संभाषणांमधून, चर्चेतून हे प्रेक्षकाला कळतं.
बॉस्टनमधली माणसं  बाहेरच्या कोणाला  शहरात ढवळाढवळ करू देत नाहीत. काळा, कॅथलिक नसलेला, अमेरिकन नसलेल्या माणसाला बॉस्टनमधे स्थान नाही. ग्लोबचा बातमीदार असतो पोर्तुगीझ आणि मदत करणारा वकील आर्मेनियन. त्यांना दूर ढकललं जातं. विकृतीप्रकरणाचा छडा लावण्यासाठी आलेला मार्टी हा संपादक कॅलिफोर्नियातून आलेला असल्यानं त्याला
सहकार्य करू नये असं बॉस्टनवासी आपसात ठरवतात.
 चर्चच्या गैरव्यवहाराला कोणी हात लावायचा नाही, त्याची चर्चा करायची नाही.
नाट्यमयतेसाठी   वापरल्या जाणाऱ्या युक्त्या चित्रपटात अनुपस्थित असून चित्रपट पहावासा वाटतो, खिळवून ठेवतो. त्याचं एक कारण संकलन. दृश्य पटापट सरकतात. कोणतंही दृश्य कंटाळवाणं होईपर्यंत टिकत नाही.  कोणतंही  दृश्य त्याचा अर्थ कळेपर्यंत प्रेक्षकासमोर रहातं.
कात्री हे हत्यार चित्रपटात महत्वाचं. दृश्य छान दिसतय, घटना चित्तवेधक आहे म्हणून भरमसाठ काळ पडद्यावर ठेवण्याचा मोह भल्याभल्याना होत असतो. या चित्रपटात संकलकानं कात्री शिस्तीत आणि कलात्मकरीत्या वापरलीय. आपण जे चाळे केले त्यात काहीही चूक नाही असं एका प्रसंगात  बिशप सांगतो.  ते दृश्य लांबवायचा मोह कोणालाही झाला असता. बळी पडलेली दोन माणसं आपली कहाणी सांगतात तेव्हांही ती दृश्य कोणीही लांबवली असती. ते टाळण्याला माध्यमाची समज आणि माध्यमावरची मांड असं म्हणता येईल. पार्टीच्या दृश्यात काही पात्रं नाट्यमय रीतीनं दाखवण्याचा मोह दिग्दर्शकानं टाळला आहे. कथानकाच्या दृष्टीनं महत्वाच्या पात्रांतलं संभाषण दाखवण्यापुरतीच पार्टी दिसते.माणसं नव्हे सिस्टिम हा मुख्य विषय असल्यानं ही हाताळणी.
कास्टिंग म्हणजे कलाकारांची निवडही उत्तम आहे.स्पॉटलाईट या चित्रपटाची कलात्मक आणि तंत्रात्मक हाताळणी खूप वरच्या दर्जाची असल्यानं हा सिनेमा ऑस्करला पोचला.
हा चित्रपट पहाताना काही दिवसांपूर्वी एका ब्राझिली दिग्दर्शकानं सादर केलेली क्लब नावाची फिल्म आठवली.
भ्रष्टाचार किंवा अत्याचार करणाऱ्या बिशपांना चर्च रजेवर, उपचारासाठी पाठवतं. म्हणजे त्याना कामापासून दूर करून एका दूरच्या गावात ठेवतं, पोसतं. एक प्रकारचा तुरुंग.   सर्व सुखसोयी असलेला.  एका छोटं गाव, वसतीगृहाची खोली आणि गावातला एक रस्ता येवढीच स्थळं चित्रपटात वापरलेली आहेत. स्पॉटलाईटसारखीच हाताळणी. फरक येवढाच की   वसतीगृहातल्या बिशपांच्या लैंगिक उद्योगाची काही दृश्य चित्रपटात आहेत. ती प्रत्ययकारक, हादरवून टाकणारी आणि प्रक्षोभक आहेत. स्पॉटलाईट या चित्रपटात तसं काहीही नाही.क्लब चित्रपट सुरु झाल्यावर या बिशपांचं वागणं, आपसातलं बोलणं व व्यवहार जसजसे प्रेक्षकाला दिसू लागतात तसतसा प्रेक्षक खुर्चीला खिळून जातो.  
 एरिन ब्रोकोविच या आणखी एका चित्रपटाची आठवण होते. अमेरिकेतल्या एका गावात एका उद्योगामुळं प्रदूषण होतं, लोकांचे बळी जातात. एरिन ही संशोधक सत्याचा शोध लावून कंपनीवर खटला भरते ही त्या सिनेमाची गोष्ट.  स्पॉटलाईटमधला शोध पत्रकारीच्या अंगानं आहे. एरिन ब्रोकोविचमधला शोध संशोधन,अन्याय निवारण या अंगानं आहे.  कामाच्या रीतीत साम्य आहे. फिरणं, बळी शोधणं, त्यांच्या मुलाखती, पुरावे, वकील इत्यादी इत्यादी.
२००० साली प्रदर्शित झालेला एरिन ब्रोकोविचचं  वैशिष्ट्य त्यातल्या भूमिका. ज्युलिया रॉबर्टस आणि मायकेल हार्नी (वकील) यांच्या भूमिका छान होत्या.  या दोन व्यक्तिरेखांभोवतीच सगळा सिनेमा उभा होता.  
।।।

दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल

दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल

         आधीच्या
ब्लॉगमधे भारत सरकार आणि पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट दहशतवादाचा मुकाबला करण्यात कां अपेशी
ठरते ते लिहिलं होतं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं, भारत सरकारचे विविध विभाग दहशतवादाच्या
मुळाचा छडा लावत नाहीत, तशी यंत्रणा भारत सरकारजवळ नाही असं त्या ब्लॉगमधे लिहिलं होतं. 
         स्वातंत्र्यापासून
तर १९९० पर्यंत पाकिस्तान सरकार लष्कराचा वापर करून भारताशी लढत होतं. १९९० नंतर पाकिस्ताननं
जैशे महंमद, लष्करे तय्यबा यासारख्या खाजगी टोळ्या तयार केल्या, त्याना शस्त्रं दिली,
प्रशिक्षण दिलं, पैसे दिले.   काश्मिरात आणि
भारतात त्या दहशतवादी टोळ्या पाठवायला सुरवात केली. या कामी अमेरिका आणि सौदी अरेबिया
यांच्याकडून मिळालेले पैसे आणि शस्त्रं पाकिस्ताननं वापरली.
         पाकिस्तानच्या
दहशतवादी कारवाया लक्षात आल्यावर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला नव्यानं सुरक्षा विचार
करणं आवश्यक होतं. पाकिस्तानातली माहिती मिळवणं, मुळातच त्या दहशतवाद्यांना निष्प्रभ
करणं या दिशेनं विचार करायला हवा होता. त्यासाठी इंटेलिजन्स विभागाची नव्यानं उभारणी
करण्याची आवश्यकता होती. वेळ पडल्यास सीआयए, मोसाद इत्यादी संघटना ज्या रीतीनं शत्रूचं
निराकरण करतात त्याचा विचार करायला हवा होता. सरकारनं ते केलं नाही. परराष्ट्र खातं
आणि भारतातली इंटेलिजन्स यंत्रणा यांच्याच आधारे त्यांनी दहशतवाद हाताळण्याचा प्रयत्न
केला. भारत सरकार बहुतांशी इतरांच्या मदतीवर अवलंबून होतं. अमेरिका इत्यादीनी गोळा
केलेली माहिती वापरणं आणि अमेरिकन सरकारवरच त्यानी पाकिस्तानवर कारवाई करावी असा दबाव
आणणं या वाटेनं भारत सरकार जात राहिलं.
         मुत्सद्देगिरी
आणि वाटाघाटी या वाटेनं भारत सरकारनं दहशतवाद हाताळण्याचा प्रयत्न केला.
         परिणाम
असा की दहशतवादाला भारत सरकार आळा घालू शकलं नाही.
         या
बाबत आजच्या इंडियन एस्क्सप्रेसमधे प्रवीण स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची
लिंक सोबत जोडत आहे. त्यावरून लक्षात येतं की मुंबईवरच्या हल्ल्याची माहिती परदेशी
यंत्रणांकडून मिळत होती. ती पुरेशी नव्हती. माहिती मिळवण्यासाठी त्यांना विनवणी करावी
लागत होती. तरीही ते माहिती देत नव्हते. मिळालेल्या माहितीचा उपयोग मुंबई पोलिस करू
शकले नाहीत.
         परदेशी
यंत्रणेनं पाकिस्तानातून दहशतवाद्यांची बोट निघाल्याची माहिती दिली.  भारतीय रॉनं त्याची दखल घेऊन सुरक्षा व्यवस्था केली.
नंतर ती बोट पुन्हा पाकिस्तानकडं वळल्यावर रॉला वाटलं की आता हल्ला होणार नाही. त्यांनी
सुरक्षा व्यवस्था गुंडाळली. घडलं होतं ते असं की दहशतवाद्यांनी एक बोट हायजॅक केली
आणि मुळ बोट सोडून दिली. त्यामुळं हायजॅक केलेल्या बोटीनं दहशतवादी मुंबईत पोचले. मुंबई
पोलिस अशा हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम नव्हते. त्यामुळं पुढं काय झालं ते जगानं पाहिलं
आहे.
         शेकडो
माणसं मारली गेली.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/david-headley-mumbai-attack-2611-7-years-on-india-waits-for-west-intelligence-on-isi-links/#sthash.Q1qBcFbc.dpuf

अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

१३ डिसेंबर २००१ रोजी ५ जैशे महंमदच्या दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर  हल्ला केला. संसदेत भारत सरकारचे सर्व मंत्री असतात. तीसेक मिनिटं भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात संघर्ष झाला. त्यात पाच दहशतवादी, आठ भारतीय सुरक्षा जवान आणि एक माळी अशी माणसं मारली गेली.  त्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि १५ डिसेंबर २००१ रोजी अफझल गुरु व इतरांना हल्ल्याला मदत करणं या आरोपावरून अटक केली. अटक झाल्यावर दिल्लीच्या डीसीपींनी एका खास खोलीत अफझल गुरुचा कबुली जबाब घेतला. हा जबाब घेताना इतर कोणाही व्यक्तीला (पोलिस किंवा न्यायालयीन) हजर ठेवण्यात आलं नाही. अफझल गुरुची जबाबदारी आज तक या वाहिनीवर दाखवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली.
१५ मे २००२ रोजी अफझलवर आरोपपत्र (चार्ज शीट) दाखल करण्यात आलं.  अफझलनं जैशे महंमदकडून पैसे घेतले, संसदेच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती पुरवली, दहशतवाद्यांना थारा देऊन हल्ला आयोजित करायला मदत केली, पूर्ण जाणीव ठेवून, असे आरोप अफझलवर ठेवण्यात आले. १८ डिसेंबर २००२ रोजी पोटा न्यायालयानं अफझल गुरुला फाशीची शिक्षा दिला. २९ डिसेंबर २००३ रोजी हाय कोर्टानं अफझलची फाशी पक्की केली. ४ ऑगस्ट २००५ रोजी सुप्रीम कोर्टानं फाशी पक्की केली. २२ सप्टेंबरला २००५ रोजी रिव्ह्यू पेटिशन ऐकून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा अफझलची फाशी पक्की केली. २००६ च्या ऑक्टोबर महिन्यात अफझलच्या बाजूनं दया याचना अर्ज राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडं गेला. पुन्हा २००७ च्या जून महिन्यात सुप्रीम कोर्टानं दया याचना फेटाळली. २३ जून २०१० रोजी भारत सरकारच्या गृह खात्यानं अफझलचा दया अर्ज नाकारावा अशी विनंती राष्ट्रपतींना केली. १० ऑगस्ट २०११ रोजी गृह खात्यानं दया अर्ज फेटाळून राष्ट्रपतींना विनंती केली की त्यांनी फाशीवर शिक्का मोर्तब करावं. १६ नव्हेंबर २०१२ रोजी राष्ट्रपतींनी दया अर्ज पुन्हा गृहमंत्र्यांकडं पाठवला आणि पुनर्विचार करावा अशी विनंती केली. २३ जानेवारी २०१३ रोजी गृहमंत्र्यांनी फाशी द्यावी असा निर्णय देऊन फाईल राष्ट्रपतींकडं पाठवली. ३ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रपतीनी अफझलचा दया अर्ज फेटाळला. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफझलला फाशी देण्यात आलं.
।।
अफझल गुरु काश्मिरमधील सोपोरचा रहिवासी. अफझल गुरु फुटीर होता.काश्मिर स्वतंत्र करू मागणाऱ्या गटाचा. १९८९ मधे तो पलिकडल्या आझाद काश्मिरमधे दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचं वागणं आणि विचार पाहून त्याचा भ्रम निरास झाला आणि तो भारतात परतला. त्यानं फुटीरता, दहशतवाद सोडला, बंदूक खाली ठेवली. अशा अनेक लोकांशी भारत सरकार संपर्क ठेवत असे. (दुलाट यांचं kashmir the vajpayee years हे पुस्तक वाचावे). १९९३ साली तो आपणहून भारतीय सुरक्षा दलाच्या स्वाधीन झाला.  तो सुरक्षा दलाच्या कार्यालयात दररोज हजेरी लावत असे, त्यांना काश्मिरमधल्या घटनांबद्दल माहिती पुरवत असे. संसदेवरील हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी महंमद याला अफझलनं दिल्लीत नेलं होतं.
।।।
संसदेवरील हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा, त्यांचं चरित्र, त्यांना कोणी पाठवलं, त्यांचा आणि पाकिस्तानी लष्कराचा संबंध इत्यादी गोष्टींवर भारत सरकारनं कोर्टाला माहिती पुरवलेली नाही. दहशतवादी लष्करे तय्यबाचे होते की जैशे महंमदचे हेही कोर्टाला स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पाच माणसं दिल्लीत कशी येतात, कुठं रहातात, त्यांना संसदेचे पासेस कसे मिळतात, इतकी शस्त्रं घेऊन ते भारतात-दिल्लीत कसे सुखानं वावरू शकतात याचं स्पष्टीकरण सरकारनं कोर्टाला किंवा संसदेला दिलेलं नाही. पठाणकोट हल्ल्यानंतर अजूनही हल्लेखोर, त्यांना पाकिस्तानात कोण हाताळत होते याचे तपशील सरकारनं संसदेला किंवा माध्यमांना दिलेले नाहीत.
मुंबई हल्ल्याचे तपशील भारत सरकार हेडलीमार्फत जाहीर करतंय, स्वतः कोणतेही प्रयत्न करून नव्हे.
पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारतीय नसलेल्या अनेक पत्रकारांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यात खूप तपशील सापडतात. न्यू यॉर्करचे स्टीव कोल, डेविड फिलकिन्स आणि इतर अनेक पत्रकार पाकिस्तानात गेले आणि त्यांनी न्यू यॉर्करमधे पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भरपूर तपशील देणारे वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत. अशी कोणतीही माहिती भारत सरकारनं  जमा केलेली दिसत नाही.संसदेच्या पटलावर किंवा मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात अशी कोणतीही माहिती भारत सरकारनं न्यायालयाला दिलेली नाही.
दुलाट यांनी दिलेल्या पुस्तकात काश्मिरी लोकांबद्दल लिहिलय पण पाकिस्तानी लष्कर, आयएसाय या बद्दलची माहिती दिलेली नाही.
 अफझल फाशी निकालात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की सर्व पुरावा परिस्थिती जन्य आहे, तपासात “lapses” and
“violations of procedural safeguards.” आहेत. सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलं आहे —The incident, which
resulted in heavy casualties, had shaken the entire nation, and the collective
conscience of the society will only be satisfied if capital punishment is
awarded to the offender. The challenge to the unity, integrity and sovereignty
of India by these acts of terrorists and conspirators can only be compensated
by giving maximum punishment to the person —
म्हणजे न्यायालयानं ठोस खडखडीत पुरावे हाती नसतांना लोकभावनेचा विचार करून अफझल गुरुला फाशी दिली आहे.
अफझल गुरुचा एकेकाळी दहशतवादी संघटनांशी संबंध होता. असे संबंध कधी संपत नसतात. अशा संबंधाचा उपयोग दहशतवादी आणि पोलिस असे दोघेही आपापल्या कामासाठी करून घेत असतात. एका परीनं अशी माणसं डबल एजंट झालेली असतात. दोन्ही डगरींवर त्यांचा पाय असतो. त्यामुळं पुरावे नसले तरीही दहशतवादी महंमदला अफझलनं दिल्लीत नेलं ही घटना दृष्टी आड करता येत नाही.
पोलिस आळशी आणि भ्रष्ट असतात. सरकार, राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली ते वागतात.
संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला हे तर वास्तवच आहे. पण दहशतवाद्यांची मुळं शोधणं, त्यांच्यापर्यंत त्यांच्या पाकिस्तानातल्या अड्ड्यात पोचणं, त्यांचा बंदोबस्त करणं हे भारतीय सुरक्षा दलांना, पोलिसांना जमत नाही. आवश्यक पैसा, राजकीय पाठबळ त्यांना मिळत नाही. कदाचित ती कुवतही त्यांच्यात नाही. त्यात भ्रष्टाचार आणि आळसाची भर. त्यामुळं गेली तीसेक वर्षं पाकिस्तानातून भारतावर हल्ले होतात आणि भारत सरकार देशभक्तीची गीतं गाण्यापलिकडं काहीही करत नाही. मग ते सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं. वाजपेयींच्या पाच वर्षाच्या काळातही या बाबत काहीही घडलेलं नाही.
अशा स्थितीत आपली अब्रू वाचवण्यासाठी थातूर मातूर उद्योग भारत सरकार करतं. अफझल गुरुबाबत तेच घडलं. अफझल गुरु दहशतवादी तर होताच. त्यामुळं त्यांना आयता बकरा मिळाला. तो कापून काँग्रेस सरकारनं भारतमातेला अर्पण केला. घिसाडघाईनं, पुरावे गोळा न करता. तो मुळातला दहशतवादी असल्यानं त्यांचं काम सोपं झालं. परंतू पाकिस्तानी दहशतवादाला भारत सरकारनं हात लावला नाही.
ओंबाळेंनी अजमल कसाबला स्वतःचा प्राण खर्ची घालून पकडलं नसतं तर भारत सरकारच्या हाती काहीही लागलं नसतं, केवळ उज्ज्वल निकम यांची भंकसबाजी ऐकत रहावी लागली असती. अजमलनं दिलेल्या माहितीची खातर जमा करण्यासाठी भारतीय हेर पाकिस्तानात गेलेले नाहीत. जैशे महंमदच्या बारीक सारीक हालचालींचा हिशोब अमेरिकन पत्रकार जाहीर करत असतात. फिल्म्स, वार्तापत्रं यातून. भारत सरकार भाषणं ठोकतं. बस.
देशप्रेम आणि देशभक्तीची उरबडवी भाषणं आणि वक्तव्यं. ते सिद्ध करण्यासाठी काहीही न करणं अशी ही तऱ्हा.
पूर्वी काँग्रेसची आता भाजपची.
सुशील कुमार शिंदे या माणसानं पक्षीय स्वार्थ डोळ्या समोर ठेवून अत्यंत अव्यावसायिक आणि ढिसाळ तपासाच्या आधारे, मूळ दहशतवादाला हातही न लावता,अफझलला फासावर लटकावला. येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपवर मात करण्यासाठी. 
आता मोदी आणि त्यांचे ऊरबडवे कंठाळी सहकारी अफझल गुरुचं प्रकरण काढून आपली अपेशं लपवायचा प्रयत्न करत आहेत.
।।

वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

  वाईन ग्लास,नग्न पुतळे
इराणनं आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततेसाठीच असेल असं मान्य केलं आणि युनोला आपल्या कार्यक्रमावर लक्ष ठेवायला परवानगी दिली. युनोनं इराणवर लादलेले निर्बंध मागं घेतले. व्यापार, तंत्रज्ञान, वित्तपुरवठा आणि उर्जा या चारही बाबतीत जगाशी व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य इराणला मिळालं. काही वर्षं अडकून पडलेले व्यवहार व अनेक देशांशी गोठलेले संबंध सुधारण्यासाठी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी जगाच्या दौऱ्यावर बाहेर पडले.
पहिला दौरा युरोपचा.
युरोपीय देशांनी इराणमधे पैसे गुंतवावेत, इराणला तंत्रज्ञान द्यावं आणि इराणकडून तेल घ्यावं हे मुख्य उद्देश. पैसा. धंदा.
सुरवात झाली इटालीपासून.
इटाली इराणकडून तेल घेणार आहे. इराण इटालीकडून पोलाद, यंत्र सामग्री घेणार आहे. इटाली-इराणमधे सुमारे १८ अब्ज डॉलरचे करार झाले.
 रुहानी रोममधे यायच्या आधी इटालीनं रोममधले नग्न पुतळे झाकले. पुतळ्यांवर खोके घातले. कां तर रुहानी यांना नग्न पुतळे पहाववणार नाहीत. बिचारे रुहानी. इस्लामी. कुराणात नग्न कसले आलेत पुतळेच उभारायला परवानगी नाही.  नग्नता, स्त्रीचं शरीर दिसणं म्हणजे पुरुषाच्या कामुकतेला चिथावणी असते 
असं कुराणाचं मत आहे.
खरं म्हणजे वर्षानुवर्षं कठोर तपस्या केल्यानंतर नग्न पुतळ्यांचा रुहानींवर काहीच परिणाम होणार नव्हता. हव्वे तेवढे नग्न पुतळे समोर आणा, माझ्या वागण्यात आणि विचारात फरक पडणार नाही असं रुहानी यांनी म्हणायला हरकत नव्हती.
माणसाच्या शरीरीचं सौष्ठव व्यक्त करणारी चित्रं, पुतळे आणि शिल्पं निर्मिती हे युरोपीय संस्कृतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्यं आहे. हे सांस्कृतीक वैशिष्ट्यं इटालीनं धर्माशी जोडलं नाही. धर्म आणि संस्कृती एकमेकांपासून वेगळी ठेवली. भारतात असंख्य मंदिरात आणि गुंफांमधे शिल्प आणि चित्रांत शरीर सौष्ठव आणि कामक्रीडा दिसतात. इस्लाम आणि इस्लामी संस्कृती यांची स्थिती या बाबतीत बरोबर वेगळ्या टोकाची दिसते.
रुहानी यांच्याशी सांस्कृतीक भांडण उकरून काढून स्वतःचा आर्थिक तोटा करायची इटालीची इच्छा नसावी. मेडिची घराण्याकडं गडगंज पैसा होता म्हणून त्यांनी 
लिओनार्दो दा विंची, बोटिसेल्ली,
मायकेल अँजेलो यांना नग्न पुतळे करण्यासाठी
(इतर वेगळ्या कलाकृतींसह)  सढळ हातानं मदत केली होती. सध्या 
परिस्थिती वाईट असल्यानं आधी आर्थिक स्थिती सुधारायची मग संस्कृती वगैरेच्या बाता करायच्या असा निर्णय इटालियन सरकारनं घेतला असावा.
इटालीशी करार झाल्यावर रुहानी फ्रान्समधे गेले. इराण फ्रान्सला तेल पुरवणार आहे. बदल्यात फ्रान्स इराकला विमानं, कार, शेती औजारं, रसायनं इत्यादी गोष्टी देणार आहे. दोन देश ३७ करार करून देवाण घेवाण साधणार आहेत.
इराण आणि फ्रान्समधले संबंध कधी प्रेम कधी द्वेष अशा रुपाचे आहेत. इराणमधे नागरिकांना स्वातंत्र्य नाही, मतभेद असणाऱ्या नागरिकांना 
ठार मारलं जातं, तुरुंगात टाकलं जातं, त्यांचा छळ केला जातो असा आरोप फ्रेंच पुढारी आणि राजकीय पक्ष सतत करत असतात.  परंतू सीरियामधे मात्र आयसिस या दहशतवादी सुन्नी संघटनेवर बाँब वर्षाव करून इराण या शिया देशाला सुखी करत आहे.
संबंध कसेही असोत आज घडीला दोन्ही देशांना आपापली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दोस्ती करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच तर रुहानी पॅरिसला रवाना झाले.
परंतू इटालियन लोकांनी रुहानींच्या इस्लामी धर्म आणि संस्कृतीपुढं 
नमतं घेतलं तसं करायला फ्रान्सनं नकार दिला.
अध्यक्ष रुहानी आणि अध्यक्षं ओलाँ यांच्यातल्या वाटाघाटीमधे एक अधिकृत खाना, मेजवानी ठरली होती. यजमान फ्रेंच सरकारनं मेजवानीचा मेनू पाठवला. त्यात वाईन होती. कारण फ्रेंच माणसं दुपारच्या (किंवा कोणत्याही) जेवणाबरोबर वाईन घेतात. तो त्यांच्या संस्कृतीचा एक अटळ भाग आहे.
रुहानीचं पित्तं खवळलं असावं. त्यांनी कळवलं की ते जिथं असतील तिथं वाईन असता कामा नये.
 वाईन या देखण्या, चविष्ट आणि आनंददायक द्रव्याला ख्रिस्ती धर्म आणि संस्कृतीत मानाचं स्थान आहे. ख्रिस्त हा जादूगार होता हे सिद्ध करण्यासाठी त्याची एक गोष्ट सांगितली जाते. त्या गोष्टीत त्यानं पाण्याचं रुपांतर दारूत केलं असं सांगितलं जातं. (मद्यार्क तयार करण्याचं आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडं तेव्हांपासूनच होतं असं मात्र ख्रिस्ती लोक सांगत नाहीत) संध्याकाळी घेतली तर वाईन ‘ चढते ’ आणि दुपारी जेवणाबरोबर घेतली तर मात्र ती तरतरी आणते ही फ्रेंचाची भावना रसायनशास्त्रात सिद्ध होत नाही. ते काहीही असो, फ्रेंच माणसं जमेल तेव्हां वाईन घेत असतात हाच त्याचा अर्थ.
आली पंचाईत. फ्रेंच सरकारनं आपली संस्कृती गुंडाळून कपाटात ठेवायला नकार दिला. वाईन देणारच आणि वाईन नको असेल तर अध्यक्ष रुहानी यांच्याबरोबरची चर्चा न्याहरीवर घ्यायची तयारी फ्रेंच सरकारनं दाखवली.
आता इराणची पंचाईत आली. मेजवानी नावाची भारदस्त बडदास्त सोडून न्याहरी या फालतू गोष्टीवर बोळवण करणं म्हणजे अपमान आहे असं इराणला वाटलं. त्यांनी न्याहरीही नको असं सांगितलं. वाईन नको आणि हलाल मांसही कोणत्याही खान्यात देऊ नका असं इराणनं कळवलं.
मेजवानी रद्द आणि न्याहरीही रद्द. बहुदा कटिंग चहा पिताना अध्यक्षांनी चर्चा केल्या असाव्यात.
हट्ट. आम्ही अमूक एका प्रकारेच वागणार.

मागं एकदा स्वीडिश राजदूत इराणचे अध्यक्ष अहमदिनेजाद यांच्यासमोर पायावर पाय ठेवून बसले. राजशिष्टाचारात असं पायावर पाय ठेवून बसणं हा अपमान समजला जातो. स्वीडिश राजदूताकडून हे अनवधानानं घडलं. पण अहमदिनेजाद यांना राग आला. एका बैठकीत ते मुद्दाम त्या राजदूतासमोर पायावर पाय ठेवून बसले.
राजशिष्टाचार हे एक अवघड प्रकरण असतं. भेटीसाठी आलेल्या पाहुण्याचा मान राखावा लागतो, त्याची आवड निवड पहावी लागते.  ती आवड निवड आपल्या संस्कृतीत बसो वा न बसो. भारतीय पंतप्रधान जेव्हां अमेरिकेत, युरोपात जातात तेव्हां त्या वेळी दिल्या जाणाऱ्या खान्यात दारू नसते, फळांचा रस असतो. खरं म्हणजे दारूला  भारतीय संस्कृतीत मज्जाव नाही.  महात्मा गांधींच्या प्रभावामुळं भारतात दारू बदनाम झाली, दारूला राजशिष्टाचारातून कटाप करण्यात आलं. भारतातही परदेशातले पाहुणे येतात त्यावेळी टेबलावर दारू नसते.
इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान इत्यादी देशात जेव्हां मुस्लीमेतर लोक जातात तेव्हां तिथल्या प्रथेनुसार डोक्यावर रुमाल वगैरे ठेवतात. स्त्रिया   डोक्यावर स्कार्फ घेतात. (नशीब पूर्ण बुरखा घ्यायला लावत नाहीत). भारतात देवळात जाताना, काही लोकांच्या घरात जाताना, जोडे बाहेरू ठेवून जावं लागतं.
  एकदा पंजाबच्या राज्यपालांनी देशभरच्या सेवाभावी संघटना आणि पत्रकारांना खान्यासाठी बोलावलं. अधिकृत आमंत्रण देऊन. संध्याकाळी.
मंडळी जमली असताना  घंटा घणाणली आणि जाहीर करण्यात आलं ‘ बार उघडा करण्यात आला आहे, पाहुण्यांनी ड्रिंक घ्यायला यावं.’  मंडळी अचंब्यात. राज्यपाल आणि दारू पाजणार म्हणजे काय. कारणही तसंच होतं. राज्यपाल होते निवृत्त लेफ्टनंट जनरल. सैन्यात दारु हा अविभाज्य घटक असतो. गांधीजींचा देश वाचवणारी सैन्यातली माणसं दारु पितात.  बरोब्बर एक तास बार उघडा होता. एक तास झाल्यावर पुन्हा सैनिकी शिस्तीत घंटा वाजली. ‘ जेवणाची वेळ झाली आहे, ग्लासं खाली ठेवा, जेवणाच्या टेबलावर बसा.’
सैनाधिकाऱ्यानं गवगवा न करता अनधिकृतरीत्या व्यावहारिक वाट शोधली होती.
 असो.
ते काहीही असो. (कदाचित कटिंग चहावर) दोघानी ३७ आर्थिक करारांवर सह्या मात्र केल्या.
००  

वासुदेव बळवंतांचं कीर्तनचरित्र

वासुदेव बळवंतांचं कीर्तनचरित्र

क्रांतीकारक वासुदेव
फडके यांचं कीर्तनचरित्र
||||
क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचं  निधन १८८७ साली एडनच्या तुरुंगात झालं. त्यांचं १९५२ साली लिहिलेलं चरित्र नुकतंच बडोद्यात हाती लागलं.
हे चरित्र म्हणजे रूढार्थाचं चरित्र नाही. ते कीर्तनाच्या रुपात लिहिलेलं आहे. लेखक कीर्तनकार असल्यानं त्यांनी कीर्तनाचा फॉर्म निवडला.
विषय वासुदेव बळवंत फडके. काव्याच्या भोवती गुंफलेला.अभंग. त्या अभंगाचं निरूपण. विषय ओळख. नंतर ओवी. ओवीचा अर्थ.  विषय. नंतर आर्या.  विषय.  पोवाडा. विषय. अशा रीतीनं आख्यान पुढं
सरकतं. असं करत करत ३२८ पानांचं पुस्तक संपतं. अभंग, आर्या, ओव्या इत्यादी देतांना त्यांचे छंद, गाण्याचे प्रकार लिहिलेले आहेत. कीर्तन करणारा माणूस या पुस्तकाच्या आधारे कीर्तन करू शकतो. पूर्ण पुस्तकाचं कीर्तन करायचं कदाचित पंधरवडा किंवा महिना 
खर्ची पडेल.
वासुदेव बळवंतांचे दोन फोटो काढले गेले. एक फोटो ब्रिटिशांनी तुरुंगात काढला होता. एक फोटो वासुदेव बळवंतांचे चाहते गुळवे यांनी स्वतःच्या घरात काढवून घेतला होता.   वासुदेव बळवंत गाणगापुरात अज्ञातवासात असताना गुप्तपणेच ते गुळवे यांच्याकडं पनवेलला गेले होते. तिथं  गुळवे यांनी त्यांचं छायाचित्र काढवून घेतलं. हेच चित्रं लोकमान्य टिळकांकडं होतं.  त्या चित्राच्या मागं लोकमान्यांनी  लिहिलं होतं – काशीकर बाबा.  काशीकर बाबा हे वासुदेव बळवंतांचं अज्ञातवासातलं नाव होतं. कीर्तन चरित्राच्या मुखपृष्ठावरचं चित्र त्याच छायाचित्रावरून तयार केलं असावं. (तसा उल्लेख लेखकानं केलेला नाही.)
वासुदेव बळवंत जिवंत असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं नावंही उच्चारणं अशक्य  इतका ब्रिटिशांचा दरारा होता. त्यांचं पहिलं त्रोटक चरित्र  कृष्णाची आबाजी गुरुजी यांनी प्रसिद्ध केलं. त्यानंतर ठाण्याचे रा.ग.बोरवणकर यांनी 
१९३९ साली एक  चरित्र प्रसिद्ध केलं. ही सारी माहिती एकत्र करून, त्या माहितीत भर घालून वि.श्री.जोशी यानी एक विस्तृत चरित्र प्रसिद्ध केलं. त्या चरित्रावर पटवर्धनबुवांनी कीर्तन चरित्र लिहिलं.
चरित्रामधे वासुदेव बळवंतांचं गुणवर्णन आहे, त्यांच्या साहसी जीवनातले प्रसंग ओघवत्या भाषेत, कीर्तनकाराच्या शैलीत वर्णन केले आहेत. देशभक्ती, त्याग, कष्ट हे वासुदेव बळवंतांचे गुण कीर्तनात सविस्तर मांडलेले आहेत. वासुदेव बळवंत जे जे सांगत होते नेमकं ते तेच पुढं सुभाषबाबू, सावरकर, गांधीजी इत्यादी नेते सांगत होते असं कीर्तनकार पुस्तकात वाचकांना सांगतात.
लेखक म्हणतात ‘ द्रव्यदृष्ट्या कीर्तन व्यवसायावर राहून अशी चरित्रे छापून प्रसिद्ध करणे फारच जड, नव्हे तर जवळ जवळ अशक्यच होते. … ते सध्यस्थितीत झेपत नाही. कारण अशी चरित्रे समाजापुढे ठेवल्यानंतर त्यांचा परामर्ष घ्यावा तितका समाज घेत नाही. जुन्याना वाटते की अशी चरित्रं लावणे कीर्तन क्षेत्रात बसत नाही….नवे लोक लघुकथा, कादंबऱ्या इत्यादी उथळ व करमणुकीच्या वाड़मयाचे भोक्ते असल्याने त्यांना हे वावडेच वाटते. प्रस्तुत अधिष्ठित सत्तेच्या ध्यानीं मनीही हे वाड.मय विचारार्ह आहे असे वाटत नाही. तात्पर्य अशा कामाला कोणाचाच पाठिंबा नाही.’ केवळ ईश्वराचाच पाठिंबा आहे असं मानून पदराला खार लावून पटवर्धन बुवांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं.
‘ अशा सत्प्रवृत्ति वाढवणाऱ्या वाञमयावर नफा मिळवणे … पाप आहे असे लेखकाला वाटतें…केवळ प्रचार व्हावा हाच ध्यास.’
‘ आपला भारत, आपली संस्कृति, धर्म, कुळपरंपरा समाजात जिवंत ठेवण्याला समर्थ कीर्तनासारखी दुसरी संस्था नाही असे लोकमान्यांसारख्यांनी बोलून दाखविले आहे…’ हे सर्व ध्यानी घेऊन लेखकानं हे कीर्तन चरित्र लिहिलं आहे.
  लेखक पटवर्धनबुवा १९१० ते १९१४ या काळात वैद्यकीचा अभ्यास करत होते. तेव्हां अण्णासाहेब पटवर्धनांनी वासुदेव बळवंत इत्यादी क्रांतीकारकांचं नित्य स्मरण करत रहा असं सांगितलं होतं. त्या आज्ञेचं पालन हे चरित्र लिहिताना आपण केलं असं हरी भक्त परायण डॉ. पटवर्धनबुवा सांगतात.
स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात   देशसेवा, पारतंत्र्यातून सुटका, ब्रिटीशांना हाकलून देऊन देश स्वतंत्र करणं ही त्या काळातली मुख्य प्रेरणा होती.
पटवर्धनबुवांनी लिहिलेली इतर पुस्तकं अशी होती. कीर्तन पंचक ( किमत १२ आणे), दिनचर्या (किंमत १२ आणे), संत दामाजी (किंमत १२ आणे), नरव्याध तानाजी (किमत १२ आणे). या पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर वंगरत्न नेताजी सुभाष आणि कल्याणकरी अशी दोन पुस्तकं प्रसिद्ध होणार होती.
वाईतल्या यशवंत प्रिंटिंग प्रेसमधे गो.शि.सोहनी यांनी हे पुस्तक छापलंय.
बडोद्यात रहाणाऱ्या निर्मला फडके यांच्या घरात हे कीर्तनचरित्र मिळालं.
          निर्मलाबाई आज ९५ वर्षाच्या  आहेत. त्यांना वाचनाचा नाद आहे. टीव्हीवरच्या मालिका त्या बघत नाहीत. बातम्या आणि चर्चांचे कार्यक्रम त्या पहातात. त्यांना भेटायला गेलं की त्या प्रश्न विचारतात ‘ महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कां करतात? महाराष्ट्राच्या शेतीची समस्या कशी आहे आणि ती कशी सुटेल?’. शरीर खंगलं असलं 
तरी डोकं एकदम शाबूत. राजकीय पक्षांबद्दल प्रश्न विचारीत. वयोमानपरत्वे त्या आजारी आहेत.  त्या इस्पितळात असताना त्यांच्या रहात्या घरी फडके चरित्र मिळालं. अशी अनेक जुनी जुनी पिवळी पडलेली पुस्तकं त्यांच्या घरात आहेत. जपून ठेवलेली.
निर्मलाबाईंचे दिवंगत पती बाळकृष्ण फडके एक केमिस्टचं दुकान चालवत. त्यांना गाण्याचा नाद होता. बाल गंधर्वांचे, त्यांच्या गाण्याचे ते चाहते होते.  त्यांच्या बडोद्यातल्या घरात बाल गंधर्वांचं गाणं होत असे.
चेहऱ्यावर लावायची पावडर, फेस पावडर, फडके आपल्या केमिस्ट दुकानात विकत असत. या पावडरच्या पाकिटावर 
बालगंधर्वाचं चित्र डकवलेलं असे.
निर्मलाबाईंच्या घरात जुन्या पुस्तकांबरोबर गंधर्वांच्या मूळ रेकॉर्डस आहेत, त्या काळातला रेकॉर्ड प्लेअर आहे.
तर अशा या जुन्या घरात बालगंधर्वांच्या रेकॉर्डच्या पेटीवर फडक्यांचं चरित्र मिळालं.
                            ००