Browsed by
Month: June 2016

ब्रीटन. युरोपियन माथ्यावर खापर

ब्रीटन. युरोपियन माथ्यावर खापर

सरतेशेवटी ५२ टक्के  ब्रिटीश नागरिकांनी युरोपियन युनियनच्या बाहेर पडण्याच्या बाजूला आणि ४८ टक्के नागरिकांनी बाहेर न पडण्याच्या बाजूला मतदान केलं. जनतेचा निर्णय अमलात यायला सुमारे दोन वर्षाचा काळ लागेल. पंतप्रधान कॅमेरॉन यांच्या राजिनाम्यानंतर नवे पंतप्रधान ऑक्टोबरमधे सूत्रं हाती घेतील. नवे पंतप्रधान युरोपियन युनियनच्या काऊन्सीलमधे भाषण करतील, नोटीस देतील आणि नंतर  युनियनच्या बाहेर पडण्याची कारवाई सुरु होईल. कारवाईची प्रक्रिया पूर्ण व्हायला दोन वर्षं लागतील.
युरोपियन युनियन ही एक अपूर्ण राजकीय-आर्थिक व्यवस्था आहे. तिच्यात सुधारणेला वाव आहे.  अस्मिता आटोक्यात ठेवून जागतीक प्रश्न सोडवण्याचं तंत्रं अजून विकसित झालेलं नाही. समाजाच्या आणि देशांच्या राष्ट्रभक्ती आणि सार्वभौमत्वाच्या कल्पना  जगाच्या सामुहीक प्रयत्नांच्या आड येण्याइतपत घट्ट आहेत. त्या कल्पनांनी उचल खाल्यामुळं बाहेर पडण्याचा निर्णय ब्रीटननं घेतला.
गेले काही  महिने युनियनमधे रहायचं की बाहेर पडायचं यावर प्रचार मोहिम झाली.रहावं आणि बाहेर पडावं या दोन्ही बाजूंनी लोकांना घाबरवून टाकलं.  युनियनमधे राहिलं तर  ब्रीटनचं घोर नुकसान होणार आहे असं  विरोधी पक्ष, युके इंडिपेंडंट पार्टी व इतर गटांनी सांगितलं. तर कॅमेरॉन व त्यांच्या मित्रांनी बाहेर पडलं तर घोर नुकसान होईल अशी भीती घातली. चर्चा आर्थिक कमी भावनात्मक जास्त झाली.
युरोपियन युनियनमधे जावं की नाही या विषयावर १९७५ मधे ब्रीटनमधे एक जनमत चाचणी झाली. युनियनमधे प्रवेश झाला की ब्रीटनची भरभराट होणार असं लोकांना वाटलं. १९९३ मधे ब्रीटननं युनियनमधे प्रवेश केला. आर्थिक विकास साधायचा पण आपलं ब्रिटीशपण सोडायचं नाही या मुद्द्यावर ब्रीटननं युनियनमधे प्रवेश केला,  चलन (स्टर्लिंग-पाऊंड) आणि पासपोर्ट जिवंत ठेवला. ब्रीटनला युरोपियन बाजाराचे फायदे हवे होते पण आपलं राजकीय अस्तित्व आणि निर्णय घेण्याचा अधिकार शाबूत ठेवायचा होता. आपलं सार्वभौमत्व युरोपियन युनियन या एका नव्यानं आकाराला येत असलेल्या ‘महादेशाला’ सुपूर्द करायची ब्रीटनची तयारी नव्हती. 
मुख्यतः आर्थिक कारणांसाठी युरोपियन युनियन स्थापन झालं होतं.  देशांनी आपापल्या जकाती रद्द केल्या, वस्तू-प्रक्रिया-सेवा-माणसं-भांडवल यांचा प्रवास निरंकुष ठेवल्यास  देशांचा फायदा होईल या तत्वावर युनियन स्थापन झालं.
युरोप खंडातल्या ४८ पैकी २८ देश आणि ५० कोटी लोक युरोपियन युनियनमधे गोळा झाले.  युनियनचं उत्पादन  १४ ट्रिलियन युरो आहे. अमेरिका आणि चीनपेक्षाही जास्त. या उत्पन्नाचा  एक टक्का-  १५० अब्ज युरो- युनियन सदस्य देशांच्या मदतीवर खर्च करतं. ४२ टक्के भाग शेतीवर, (बहुतांशी अनुदानात), ४० टक्के भाक  कमी विकसित देशांवर, खेड्यांच्या  विकासावर खर्च होतो.
१९७५ ते २०१५ या काळात असं काय घडलं की ब्रीटनला युनियनच्या बाहेर पडावंसं वाटलं? सीरिया-इराकमधून येऊ घातलेले लोंढे, बाहेरून येऊ घातलेली माणसांची भीती हे कारण असावं. ब्रीटनला युरोपियन युनियनचा जाचक त्रास नव्हता.
युरोपियन युनियनमधे स्थापन झालेल्या बहुतेक देशांना हजारभर वर्षांचा स्वतंत्र इतिहास, संस्कृती, भाषा होत्या. सगळे देश कुठल्या ना कुठल्या तरी साम्राज्याचा भाग होते, एकमेकांविरोधात लढत होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरोधात फ्रान्स-ब्रीटन अशा घनघोर लढाया झाल्या.  स्वतःच्या भौगोलिक आणि अस्मितेच्या सीमा दूर ठेवून त्यांनी  आर्थिक समुदाय स्थापन केला. एक अर्ध राजकीय-आर्थिक व्यवस्था युनियननं उभी केली.
अनेक देशांना युनियनचा फायदा झाला. झेकोस्लोवाकिया, पोलंड, पोर्तुगाल, इटाली, ग्रीस, स्पेन इत्यादी आर्थिक दृष्ट्या मागं पडलेल्या देशांमधे भांडवल गुंतवणूक झाली, तिथल्या लोकांना युरोपभर नोकऱ्या मिळाल्या. प्रत्येक देशानं युरोपियन युनियनचे गुंतवणुकीचे फायदे आपल्यालाच मिळावेत यासाठी खटपटी केल्या. युनियननं केलेले आर्थिक नियम आपल्याला लागू होऊ नयेत, शिथील व्हावेत असा प्रयत्न प्रत्येक देश करत होता. समुदायात राहूनही प्रत्येक देश आपला स्वार्थ-हित साधण्याच्या खटपटीत होता. सामुहीक हिताच्या बुरख्याआड देशांना स्वतःचा स्वार्थ साधायचा होता.संघर्ष होत होते, ठिणग्या उडत होत्या. परंतू एकूण गाडं ठीक चाललं होतं.
साधारपणे २००८ च्या आसपास युनियनमधे बेबनाव आणि तणाव सुरु झाले. अमेरिकन बाजार आणि अर्थव्यवस्था कोसळली. त्याचा परिणाम अर्थातच जगावर, युरोपवर झाला. जागतीक व्यापारामधे फारशा नसलेल्या भारताला आर्थिक मंदीचा फटका बसला नाही. कारण भारताची अर्थव्यवस्था युरोप-अमेरिके इतकी जागतीक व्यवहारावर अवलंबून नाही. 
०८ च्या मंदीवर अमेरिकन सरकारनं धोरणात्मक पावलं उचलली. बाजारात पैसा ओतला, लडखडणाऱ्या वित्त संस्था (भ्रष्ट असल्या तरी) मजबूत केल्या.  हळू हळू अमेरिका सावरली. 
युरोपीय बँकेनं पैसा ओतण्याऐवजी व्याजदर वाढवून संकट अधिक तीव्र केलं. ग्रीस, स्पेन इत्यादी देशांना आपली आर्थिक संस्थांची रचना सुधारायचा आग्रह केला. त्या देशात खूप भ्रष्टाचार होता. आमदन्नी अठन्नी खर्चा रुपैया अशी अर्थव्यवस्था होती. सवंग लोकप्रियतेच्या नादी लागून तिथल्या सरकारांनी महसूल वाढवण्यापेक्षा सार्वजनिक खर्च वाढवण्यावर भर दिला होता. ही स्थिती बदलली नाही तर कितीही पैसा ओतला तरी विकास होणार नाही असं युरोपियन युनियन सांगत होतं. त्या देशातले लोक आपली सवंग धोरणं सोडायला तयार नव्हते.
त्यात सीरिया,इराकमधून आलेल्या इमिग्रंट्सची भर पडली. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं अशी अवस्था. लाखो निर्वासितांची व्यवस्था अर्थव्यवस्थेवर बोजा टाकू लागली.
पोलंड, झेकोस्लोवाकिया हेही देश कुरकुर करू लागले. 
  युरोपियन युनियनमधे तणाव निर्माण झाले, सदस्य देश कटकट करू लागले. आपले दोष झाकण्यासाठी त्यांनी अस्मिता, जर्मनद्वेष, आपलं ऐतिहासिक वैभव इत्यादी गोष्टी चोंबाळायला सुरवात केली. युनियनच्या बाहेर पडायची भाषा सुरु केली.
आपलं बिघडलं की दोष नेहमी दुसऱ्यांचाच असतो, आपण कायम निर्दोष असतो.
भांडण सुरु झालं की विकोपाला जायलाही वेळ लागत नाही. ‘ ग्रीस असो की फ्रान्स की स्पेन. या देशांना आर्थिक शिस्त पाळायची नाही आणि आम्ही उदारतेनं झळ सोसून दिलेली मदत विसरून आम्हालाच दोष द्यायचा’ असं जर्मन माणसांना वाटू लागलं. नकोत ते उपकार असं म्हणून जर्मन लोक नको ती युनियन म्हणू लागले. 
आर्थिक संकटाचा त्रास ब्रीटनलाही झाला. बेकारी वाढली. विषमता वाढली. गरीब आणि मध्यम वर्गीयांना त्रास व्हायला लागला. शिक्षण आणि आरोग्य दोन्ही महत्वाच्या व्यवस्था डगमगू लागल्या. वीज महागली. सेंट्रल बँक आणि सरकार या दोन स्वायत्त संस्थामधे तणाव होते. अमेरिकेप्रमाणं बाजारात पैसे ओतायचे की नाही यावर मतभेद झाले. ब्रीटनमधल्या आर्थिक दुरवस्थेला युरोपियन युनियन कारणीभूत नव्हतं, ब्रीटनच्या अर्थव्यवस्थेतले अंगभूत दोष कारणीभूत होते. ब्रीटनची उत्पादनकार्यक्षमता घसरू लागली होती.ब्रीटननं काळाबरोबर जाण्यात खळखळ चालवली होती. ब्रिटीश अर्थजाणकार टोनी अॅटकिन्सन अर्थरचनेत मूलभूत बदल हवेत असं म्हणत होते. त्यांनी सुचवलेले उपाय अमलात यायला वेळ लागला असता. पण राजकीय पक्ष आणि जनता थांबायला तयार नव्हती. आपल्याला झालेल्या त्रासाचं खापर फोडायला ते एक माथं शोधत होते. 
  युरोपियन युनियनच्या आग्रहामुळं  इराकी-सीरियन लोकं स्वीकारायला लागतील ही भीती बळावली.  बाहेरून आलेली माणसं आपल्या नोकऱ्या हिसकून घेतील, कमी पैशावर काम करून आपलं वेतनमान खाली आणतील अशी भीती ब्रिटीश माणसाच्या मनात बसली.  (बाहेरून येणाऱ्या लोकांचा ब्रीटननं नेहमीच उपयोग करून घेतलेला आहे !).  नकोच ती युनियन, आपले आपण आपलं पाहूया असं जनमत तयार झालं.  
 १६ जूनला जनमताच्या एक आठवडा आधी  बर्स्टहॉलमधे युनियनमधे रहावं असं म्हणणाऱ्या जो कॉक्स या खासदाराचा खून झाला. खून करणाऱ्यानं ब्रीटन जिंदाबाद असं म्हणत खून केला. ही घटना ब्रिटीश मन दर्शवते. या घटनेनंही ब्रिटीश मन आणखी युनियनविरोधात नेलं.
युनियनमधून बाहेर पडा असा आग्रह धरणाऱ्यात लंडनचे माजी मेयर बोरिस जॉन्सन आघाडीवर होते. युरोपियन युनियन किचकट कायदे करून ब्रिटीश उद्योग व्यापार अशक्य करून टाकतंय असं त्यांचं म्हणणं. ब्रीटनमधल्या ट्रक उत्पादकाला ट्रकच्या खिडकीचं डिझाईनही युरोपियन युनियनला विचारून ठरवावं लागणं अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं. जॉन्सन यांनी दिलेली उदाहरण बालीश या सदरात मोडणारी होती. व्यापार, उत्पादन इत्यादी गोष्टींचे नियम सर्वच सरकारं ठरवत असतात, ते ठरवण्यात उत्पादक भाग घेत असतात. खिडकीचं डिझाईन ठरवतांना ब्रिटीश सरकारलाही विचारावंच लागतं. युनियनचे कायदे आणि नियम जाचक वाटले तर युरोपियन संसद, युरोपियन काऊन्सील, युरोपियन कमीशन या मंचांवर जाऊन त्यावर चर्चा करण्याची तरतूद होती. लोकशाही व्यवस्थेमधे अशा रचना प्रत्येक देशात असतात, युरोपियन युनियनमधेही आहेत.  लोकशाहीला जन्म देणाऱ्या ब्रिटिशांनी  युरोपियन युनियनची संस्थात्मक रचना अधिक निर्दोष करण्याकडं पुरेसं  लक्ष दिलं नाही.
 युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रीटनचे प्रश्न सुटतील? ब्रीटनमधील आर्थिक व सामाजिक समस्यांना ब्रिटीश इतिहास, ब्रिटीश सवयी आणि परंपरा कारणीभूत आहेत. समुदायाच्या बाहेर पडून त्या समस्या कशा सुटणार? 
   आपलं आपण पाहून घेऊ ही कृती मर्यादित महत्वाची आहे. दहशतवाद, पर्यावरण या समस्या सोडवण्यासाठी ब्रीटनला युरोपिय समुदायाबरोबर रहावं लागेल.  
बाहेर पडण्याचा आग्रह धरणारे नायजेल फेरेज यांनी निर्णय झाल्या झाल्या जाहीर केलं की ब्रीटन आता स्वतंत्र झालं. ब्रीटन स्वतंत्र झालं की नाही ते माहित नाही पण ब्रीटन फुटण्याची शक्यता वाढलीय. स्कॉटलँड आणि आयर्लँड फुटून निघण्याची शक्यता निर्माण झालीय.
स्कॉटलंड हा यूके/ब्रीटनचा घटक देश आहे. स्कॉटलंडनं बहुमतानं बाहेर पडण्याला विरोध केला आहे. ब्रीटनच्या निर्णयाला स्कॉटलंडची लोकसभा आक्षेप घेईल. कायद्यानुसार हा आक्षेप दूर सारून बाहेर पडण्याची कारवाई करण्याचा अधिकार ब्रिटीश सरकारला आहे. परंतू एका घटक देशाला डावलणं ब्रीटनला कितपत परवडेल ते सांगता येत नाही.
झालेला निर्णय योग्य नाही असं उशीरा लोकांच्या लक्षात येतंय. हा निर्णय सवंग प्रचाराचा परिणाम होता असं ब्रिटीश आणि युरोपियन माध्यमं म्हणू लागली आहेत. निर्णयाचा नव्यानं विचार व्हावा असा सूर उमटू लागला आहे.
 युरोपियन युनियनच्या संस्थात्मक चौकटीतून समजा ब्रीटन बाहेर पडलं तरी युरोपियन युनियमधल्या देशांशी ब्रीटनला संबंध ठेवावेच लागतील, संबंध सुधारावेच लागतील. शेवटी ते देश हीही एक मोठी बाजारपेठ आहे. व्यापारी वृत्तीच्या ब्रीटनला बाजारपेठेकडं दुर्लक्ष करता येणार नाही.  
।।
  
   

49+1.पन्नास खून. फ्रीलान्स दहशतवाद

49+1.पन्नास खून. फ्रीलान्स दहशतवाद

ओरलँडो हत्याकांड.
पल्स गे बार. इथं समलिंगी माणसं जमत.
१२ जून २०१६.
मध्य रात्र उलटून गेलेली, दोन वाजण्याचा सुमार. ओमार अमीन   बारमधे पोचला. पोचल्यावर त्यानं ९११ या इमर्जन्सी नंबरवर पोलिसांना फोन केला. 
  “या, पहा पल्स बारमधे काय चाललंय.” 
फोनवर मतीननं स्वतःचं नाव स्पष्टपणे सांगितलं आणि पल्स बारचा नेमका पत्ताही दिला.
  फोन बंद केला आणि त्यानं आपल्या जवळची असॉल्ट रायफल आणि पिस्तूल वापरून गोळीबाराला सुरवात केली. समोर दिसेल त्याच्यावर मतीन गोळ्या चालवत होता. एका क्षणी समोरची सगळी माणसं गारद झाल्याचं पाहून त्यानं विकट हास्यही केलं. मेल्याचं सोंग केलेल्या एका जखमी माणसानं या हास्याची गोष्ट पोलिसांना सांगितली. नंतर कित्येक रात्री ते हास्य या तरुणाच्या स्वप्नात येत असे आणि घामाघूम होऊन तो उठत असे.
 मतीम जागोजाग हिंडून लोकांना मारत होता. कोणी बाथरूममधे लपले होते, कोणी किचनमधे. यथावकाश पोलीस पोचले. पोलीस आणि मतीन यांच्यात लढाई झाली. शेवटी पहाटे पाचच्या सुमारास मतीन पोलिसांच्या गोळीला बळी पडला. 
गोळीबार करण्याच्या आधी त्यानं फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.”खरे मुस्लीम कधीही पश्चिमी लोकांचं गलिच्छ वागणं सहन करणार नाहीत. .. तुम्ही आमच्या लोकांवर हवाई हल्ले करून निष्पाप मुलं आणि स्त्रियांना मारलं आहे, आता इस्लामी स्टेटच्या सूडाची चव घ्या. पुढल्या काही दिवसात तुम्ही इस्लामी स्टेटचे अमेरिकेवरचे हल्ले पहाल.”
हत्याकांडाच्या आधी काही दिवस मतीन, त्याचा पिता आणि मुलगा   मायामी समुद्रकिनाऱ्यावर बसले असताना समोर एक एक गे पुरुषांचं जोडपं चुंबन घेत होतं. मतीन चिडला. वडिलांना म्हणाला “माझ्या मुलाला असलं घाणेरडं दृश्य पहावं लागतंय. या गे लोकांना खतम केलं पाहिजे.”
दोन वेळा २९ वर्षीय मतीनकडं एफबीआयचं लक्ष गेलं होतं. एकदा त्यानं इस्लामी स्टेटबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. दुसऱ्यांदा त्यानं फ्लोरिडातून सीरियात गेलेल्या एका माणसाबद्दल बोलला होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हां त्याना काही आढळलं नाही.
मतीन हा सिद्दीक मतीन या अफगाण इमिग्रंटचा मुलगा. फ्लोरिडात शिकला, वाढला, नोकरी करत होता. पदवी घेतल्यानंतर त्यानं सुरक्षा रक्षकाचं प्रशिक्षण घेतलं, एका कंपनीत सेक्युरिटा गार्डची नोकरी करत होता. त्याच्याकडं शस्त्रं बाळगायचा परवाना होता. हत्याकांड घडण्याच्या आधी काही दिवस त्यानं बंदूक आणि पिस्तूल विकत घेतलं होतं. मतीनला शस्त्राचं आकर्षण होतं. कधी तरी आपण पोलिस व्हायचं असं त्याचं स्वप्न होतं. न्यू यॉर्क पोलिसचा शर्ट घातलेले फोटो त्यानं फेसबुकवर टाकले होते. 
मतीनचा धर्माकडं ओढा नव्हता. घरातलं वातावरण खास धार्मिक नव्हतं. तो कधीमधी मशिदीत जात असे. मशिदीचा इमाम म्हणतो की मतीन अबोल होता, त्यानं कधी धर्मवगैरे गोष्टीवर चर्चा केली नव्हती. मोकळा वेळ मतीन  व्यायाम करण्यात खर्च करी. त्याचे वडील अफगाण राजकारणावर बोलत असत. त्यांचा तालिबानकडं ओढा होता. 
मतीनची पहिली पत्नी सितोरा युसुफी. तिचं म्हणणं की मतीन रोगट वृत्तीचा होता. कित्येक वेळा त्यानं सितोराला झोडपलं होतं. घरी परते, कपड्यांना नीट इस्त्री झालेली नाही अशी तक्रार करून तो सितोराला मारे.   सितोराच्या कुटुंबियांनी सितोराला मतीनपासून वाचवलं, घरी नेलं, सोडवलं.   मतीननं दुसरं लग्न केलं. तिलाही तो मारत असे. तीही मतीनला सोडून गेली. तिच्यापासून मतीनला एक मुलगा होता.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांना मतीनचा इस्लामी स्टेटशी संबंध असल्याचं आढळून आलं नाही. पल्स बारच्या हत्याकांडाची जबाबदारी इस्लामी स्टेटनं घेतली नाही. इस्लामी स्टेटला   मतीन कोण आहे ते माहितही नसणार. परस्पर मतीननं स्वतःला इस्लामी स्टेटचा जिहादी  मानून परस्पर कारवाई करून टाकली होती.
१६ जून २०१६. 
इंग्लंड. बर्स्टहॉल गावातली लायब्ररी.
या विभागातल्या मजूर पक्षाच्या खासदार जो कॉक्स यांचा कार्यक्रम या ठिकाणी होता. सोबत जो यांचे पती केन्नीही होते. 
अचानक समोरून मध्यम वयाचा टॉमी मायर आला. चाकू वापरून  कॉक्सना भोसकलं. पती मधे पडले, टॉमी मायरला दूर करण्याचा प्रयत्न केला. टॉमीनं त्यांनाही भोसकलं. टॉमी शांतपणे समोरच्या एका सँडविच बारमधे गेला. गोंधळ उडाला. लोकांनी टोमीला पकडलं, पोलिसांच्या हवाली केलं. टॉमी पळाला नाही.
भोसकताना टॉमीनं घोषणा केल्या ” Britain first”.
कोर्टात उभं केल्यानंतर मॅजिस्ट्रेटनं टॉमीला नाव विचारलं. पत्ता विचारला. टॉमीनं पत्ता सांगितला नाही. नाव सांगितलं ” देशद्रोही मुर्दाबाद, स्वतंत्र ब्रीटन – death to traitors, freedom for Britain”
ब्रीटनमधे सध्या युरोपियन युनियनमधे रहायचं की नाही या प्रश्नावर वादळ चाललं आहे. या प्रश्नावर  जनमत अजमावलं जाणार आहे. कॉक्स  युरोपियन युनियनमधे रहाण्याच्या बाजूच्या होत्या,  हिरीरीनं प्रचार करत होत्या. 
युरोपियन युनियनमधून ब्रीटननं बाहेर पडावं असं म्हणणाऱ्या यूके इंडिपेंडंट पार्टी या पक्षानं नेमक्या त्याच दिवशी एक पोस्टर मोहिम सुरु केली होती. ब्रीटनमभर त्यांनी पोस्टरं डकवली होती. पोस्टवरवर सीरियन निर्वासितांच्या लोंढ्याचं चित्र होतं, शीर्षक होतं “breaking point”. आता कळस झालाय असं या पक्षाचं म्हणणं होतं.
टॉमीचं मानसिक आरोग्य बिघडलेलं होतं. त्याच्यावर उपचार चालले होते. तो बेकार होता. एकटा पडलेला होता. त्याला मित्र उरलेले नव्हते. तो नवनाझी साहित्य वाचत असे, गोरेवर्णवर्चस्व चळवळीचे (white supremacist) वेबसाईट तो पहात असे, त्या चळवळीची पुस्तकं तो वाचत असे.
मतीननं इस्लामी दहशतवादाची भाषा वापरली. पश्चिमी संस्कृती आणि समलैंगिक संबंधांना इस्लामचा, इस्लामी जनतेचा विरोध आहे. तत्वतः वरील गोष्टी इस्लामविरोधी आणि पाप आहेत असं त्यांना वाटतं. ती आपला विरोध जाहीरपणे व्यक्त करत नाहीत, गप्प रहातात. इस्लामी स्टेटची माणसं विरोध व्यक्त करत नाहीत, गैरइस्लामी लोकांना मारायलाच निघतात.  मतीननं इस्लामी स्टेट या संघटनेच्या आदेशावरून हत्याकांड केलेलं नाही. तरीही ते दहशतवादी कृत्यं मानायला हवं. ते एका माथेफिरूचं कृत्य आहे असं मानू नये. संघटनेच्या आदेशावरून नव्हे व्यक्तिगत ऊर्मीनं त्यानं हत्याकांड केलं. आदेश दहशतवादी संघटनेचा नाही, प्रेरणा इस्लामी दहशतवादाची. या प्रकाराला फ्री लान्स इस्लामी दहशतवाद असं नाव देता येईल.  
  टॉमी मायर नवनाझी आणि वंशद्वेष्टा होता. संघटनेचं काम करून नव्हे तर वाचन करून तो वंशद्वेष्या, नाझीवादी झाला होता.  फ्री लान्स नवनाझी.
   हिंसावादी संघटनेशी संबंध नसलेली माणसंही स्वतंत्रपणे  खून करू लागलीत ही चिंता वाटण्यासारखी गोष्ट आहे.
हा नवाच प्रकार म्हणायला हवा. 
असं कां घडतंय?
एकूण वातावरण हिंसेनं भारलेलं दिसतंय. हिंसा करण्यासाठी, खून करण्यासाठी, आत्मघाती स्फोट करण्यासाठी आता एकाद्या संघटनेत प्रशिक्षण घ्यायची आवश्यकता नाही. एकाद्या पुढाऱ्याचा आदेश घेण्याची आवश्यकता आता नाहीये. दहशतवादी-धार्मिक संघटना आणि राजकीय पक्षांनी सारं वातावरण हिंसेनं भारून टाकलंय. त्यामुळं बंदूक, तलवार, सुरा मिळवून आपल्याला नको असलेल्या माणसांना मारुन टाकणं सहज झालं आहे. सोपं झालं आहे. आपल्याला नकोसे विचार कोणते आहेत ते माणसं आता वातावरणातल्या प्रचारातून आणि माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतून ठरवतात.   नकोशी माणसं कोण आहेत तेही माध्यमं सतत सांगत असतात. बस कुठल्या तरी क्षणी शस्त्र उचलायचं. दुसऱ्याला मारणं, संपत्ती नष्ट करणं ही गोष्ट चुकीची नाही उलट ती चांगलीच आहेत ते एक पुण्यकारक कर्तव्यच आहे असं लोकाना वाटू लागलंय.
माध्यमं अलिकडं सर्व गोष्टी थरारक करण्याच्या नादात असतात. जगातल्या घटनांची सांगोपांग माहिती देत नाहीत, विषयाची सर्व अंगं मांडत नाहीत. पर्सपेक्टिव मांडत नाहीत. अपुरी, असंतुलित माहिती देतात. राजकीय पक्ष, कॉर्पोरेशन्स, दहशतवादी संघटना माध्यमातील   या दोषांचा वापर करतात. ती मंडळी बेजबाबदार, असंतुलित, अपुरी आणि खोटी माहिती माध्यमात पेरतात. वातावरणात पूर्वग्रह, द्वेष तयार होतात.  दुसऱ्याचा जगण्याचा अधिकार काढून घेणं, दुसऱ्याला मारणं, संस्था-संपत्ती   उध्वस्थ करणं ही गोष्ट लोकांना अगदी साधी आणि सोपी वाटते. अमूक माणसाला फटके मारा, तमूक संघटना नष्ट करा, तमूकांना फाशी द्या, असं माणसं अलीकडं सहजपणे बोलून जातात. वेगळा विचार, वेगळा पक्ष, वेगळी संघटना हे आता गुन्हे मानले जाऊ लागले आहेत. दुसरे पक्ष, दुसरे विचार समूळ नष्ट झाले पाहिजेत असं माणसं सर्रास बोलतात.
  फेसबुक पहा. एकादा सिनेमा आवडला नाही असं कुणी म्हणालं तर लगोलग त्या माणसाचे तीन तेरा वाजवायच्या गोष्टी सुरु होतात. आम्हाला आवडलेला सिनेमा सर्वांना आवडलाच पाहिजे. आम्हाला मान्य असलेला पक्ष आणि पुढारी सर्वांना मान्य असायलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीची भक्तीच केली पाहिजे. विनोद आणि थट्टा होता कामा नये. असं आता माणसं म्हणू लागली आहेत. काही वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवर अत्यंत घाण, असभ्य मजकूर सर्रास प्रसिद्ध केला जातो. राजकीय पक्ष अशा असभ्य आणि हिंसक वागण्याला प्रोत्साहन देत असतात.
ओरलँडो अमेरिकेत आहे. अमेरिकेतलं वातावरण काय आहे ते डोनाल्ड ट्रंप याच्या आचरट वक्तव्यावरून कळतंय. दहशतवाद या चिंताजनक घटनेवर त्याचं उत्तर आहे सरसकट मुसलमानांना अमेरिकेबाहेर घालवून देणं. तसा विचार करणारी खूप माणसं अमेरिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला दहशतवादाची समस्या ही इस्लामी समस्या नाही असं पोलिटिकली करेक्ट बोललं जातं. दहशतवाद हा इस्लाममधल्या अंगभूत दोषांचा परिणाम आहे हे वास्तव समजून घ्यायला ते तयार नाहीत. दोन टोकं झालीत.मतीन आणि बर्नाडिनोतला सय्यद फारूक गैरइस्लामीना मारून टाकतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून ३८ ठिकाणी गोरे अतिरेकी मशीदीत किंवा गुरुद्वारात घुसून इस्लामी माणसांना (शिख मुस्लीमच आहेत असं वाटणारे अमेरिकन खूप) मारून टाकतात.
आज एकविसाव्या शतकात गरीबी आणि विषमता हे जटील प्रश्न झाले आहेत. ते आर्थिक प्रश्ण सोडवायला निघालं की धर्म या संघटनेतले आणि विचारातले दोष आणि त्रुटी आड येतात. मुस्लीम द्वेष हे एक टोक.  राजकीय फायद्यासाठी इस्लामी समाजाच्या वागण्याकडं बोटचेपेपणानं पहाणारं दुसरं टोक.  टोकाची विभागणी होते. मामला  गुंत्याचा आहे.  गुंता विचारपूर्वक सोडवायला हवा, त्यासाठी वेळ जायला हवा. तसं न होता चुकटीसरखी माणसांना मारून, देशाबाहेर घालवून प्रश्न सुटेल असं राजकीय पक्ष आणि माध्यमं मानतात. 
सत्ता आणि माध्यमं या दोन्ही क्षेत्रांनी आत्मपरिक्षण करायला हवं.
 ।।

स्टॅनफर्ड विश्वशाळेत झालेला बलात्कार

स्टॅनफर्ड विश्वशाळेत झालेला बलात्कार

           जून २०१६ च्या पहिल्या आठवड्यात ब्रॉक टर्नर या स्टॅनफर्ड विश्वशाळेतल्या  विद्यार्थ्याला एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याबद्दल सहा महिन्याची शिक्षा झाली. कायद्यातल्या तरतुदींनुसार १४ वर्षाची शिक्षा होऊ शकत असताना इतकी किरकोळ शिक्षा झाल्याबद्दल अमेरिकन जनतेनं नाराजी दाखवलीय, निकाल देणाऱ्या न्यायाधिशाला बडदर्फ करण्याची मागणी केलीय.
           17 जानेवारी 2015 ची मध्यरात्र. (की मद्यरात्र?)
स्टनफोर्ड विश्वशाळा. मुलांनी पार्टी केली. पी पी प्याले. इंग्रजीत याला बिंगे ड्रिंकिंग म्हणतात. ब्रॉक टर्नर हा वीस वर्षाचा विद्यार्थी दुसऱ्या एका विद्यार्थिनीबरोबर पार्टीतून फिरायला बाहेर पडला.  विद्यार्थिनीही फार प्याली  होती. फिरता फिरता कचरा एका कुंडीजवळच्या एकांतात दोघं पोचले. येव्हाना विद्यार्थिनीची शुदध हरपली. ब्रॉक मात्र इतका प्याला असूनही लडखडत्या शुद्धीवर होता. त्यानं बलात्कार केला. 
झाला  प्रकार त्या जागेजवळून जाणाऱ्या  दोन विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला हलवलं, पोलिसांना खबर दिली. खटला दाखल झाला. कलिफोर्नियाचे न्यायाधिश पर्स्की यांच्यासमोर. जबान्या झाल्या. पुरावे सादर झाले. सुनावणी झाली. ज्यूरींनी खटला ऐकला. 
सुनावणीच्या दरम्यान ब्रॉकच्या  पित्यानं न्यायाधिशाला एक दीर्घ पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यानी ब्रॉकला  दोषी ठरवू नका, दारूला दोष द्या असं लिहिलं. ज्या वातारणामुळं हा गुन्हा घडला त्या वातावरणाला दोषी धरा असं लिहिलं. ब्रॉकच्या पित्यानं लिहिलेल्या पत्रात “ culture surrounded by drinking and promiscuity” अशा शब्दात शाळेतल्या वातावरणाचं – संस्कृतीचं  वर्णन केलंय.आपला मुलगा सालस आहे, गुणी आहे, मेहनती आहे, घडलेली गोष्ट दुर्दवी असल्यानं त्याला कमीत कमी शिक्षा द्या असं त्यानी पत्रात म्हटलं. बलात्काराच्या गुन्ह्याला 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
 पत्रात त्यांनी ब्रॉकचं वर्णन केलं होतं. ब्रॉक पोहणारा होता, त्याला पोहण्यातच करियर करायची होती.  त्याला ऑलिंपिकमधे जायचं होतं. त्यासाठीच स्टनफर्ड या विश्वशाळेत तो दाखल झाला होता. या विख्यात शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यानं खूप मेहनत केली होती. शाळेत गेल्यावर तिथल्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला.   तिथं खूप स्पर्धा होती. जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेचा प्रचंड तणाव आणि दबाव त्याच्यावर होता. ब्रॉकला तणाव सहन होत नसे. आपल्याला कॉलेज सोडावंसं वाटतंय असं ब्रॉक रडून रडून सांगत असे. 
लेस्ली रासमुसेन या ब्रॉकच्या बालमित्रानंही न्यायाधिशांना एक पत्र  लिहिलं. त्यांनंही ब्रॉक कसा चांगला होता याचे किस्से त्यानं  लिहिले. त्याचं म्हणणं असं की ब्रॉकला विश्वशाळेनं बिघडवलं.   लेस्ली म्हणतो “ these universities market themselves as the biggest party schools in the country….they encourage drinking…” . या वातावरणाचा परिणाम ब्रॉकवर झाला असं लेस्लीचं म्हणणं. पिणं ही फॅशन झाली होती. ब्रॉक खूप प्याला, प्यालेल्या अवस्थेत त्याचा तोल जाणं अटळ होतं असं लेस्लीचं म्हणणं. लेस्ली बलात्कार झाल्याचं मान्य करतो. पण त्या मुलीलाही तो अप्रत्यक्षपणे जबाबदार  धरतो. मुलीलाही कळू नये? तंग कपडे, दारुची नशा हे एक प्रकारे बलात्काराला आमंत्रणच होतं असं लेस्ली सुचवतो. 
खटल्याच्या दरम्यान ब्रॉकनं पश्चात्ताप व्यक्त केला. आपल्या हातून जे काही घडलं त्याचं आपल्याला  खूप वाईट वाटतंय. न्यायालयानं मला संधी द्यावी. मी तरूण पिढीला दारू व इतर दोषांचे परिणाम सांगून परावृत्त करणार आहे आहे असं त्यानं न्यायाधिशांना सांगितलं.
दोन्ही पत्रं ब्रॉकला क्षमा व्हावी, त्याची शिक्षा कमी असावी असं म्हणत होती.
कुठलाही खटला चालावा तसा हा खटला चालला. वकिलांनी डावपेच लढवले. घटनेचे तपशील अशा रीतीनं मांडले की कोर्टानं बलात्कार नव्हे तर लैंगिक हल्ला हा आरोप ठेवला. 
 न्यायाधीश पर्स्की यानी जून 2016 मधे दिलेल्या निकालात ब्रॉकला सहा महिन्यांची शिक्षा दिली. अत्याचाराच्या कलमाखाली त्याला दोषी ठरवण्यात आलं.  शिक्षा झाल्यावर दोन वर्षं परिक्षेचा काळ. त्या काळात त्याच्या वागणुकीवर पोलिस आणि न्यायालयाचं लक्ष. तो पूर्ण झाल्यानंतर ब्रॉक मोकळा. मोठ्या शिक्षेची आवश्यकता नाही असं न्यायाधिशांनी म्हटलं. आयुष्यभर एक गुन्हेगार अशी नोंद कपाळावर लिहिली जाणं हीच एक मोठी शिक्षा आहे, ती पुरेशी आहे असं न्यायाधिश म्हणाले. अधिक काळ तुरुंगात ठेवण्यानं आरोपीवर फार दुष्परिणाम होईल असं न्यायाधिशानी निकालपत्रात म्हटलं.
जनता चिडली. लाखो लोकांनी सह्या करून न्यायाधिशाला  बडतर्फ करण्याची मागणी केली आणि खटला नव्यानं चालवून मोठ्या शिक्षा देण्याची मागणी केली. बलात्कार करणाऱ्याला इतकी किरकोळ शिक्षा दिली जाणं म्हणजे बलात्काराला प्रोत्साहन देणं आहे असं लोकांनी म्हटलं. अशानं कुणाही स्त्रीला रस्त्यावरून मोकळं फिरणं अशक्य होईल असं असंख्य लोक वेगवेगळ्या माध्यमात म्हणाले.
जनतेनं सह्या जमवून, माध्यमांत ओरड करून न्यायाधिशांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
अमेरिकन राज्यात अनेक वाटांनी न्यायाधिश नेमले जातात. एक वाट म्हणजे राज्याचा गव्हर्नर त्यांना नेमतो. वकिली ज्ञान आणि राजकीय कल याचा विचार करून गव्हर्नर आपल्या पक्षाला हवा असलेला माणूस न्यायाधिशपदी नेमतात. ही नेमणूक राजकीय असते. दुसरी वाट म्हणजे राज्य विधीमंडळ उमेदवाराची पात्रता लक्षात घेऊन न्यायाधिश नेमतं. यातही राजकीय घटक असतोच. तिसरी वाट म्हणजे थेट निवडणुक, जनता मतदान करून न्यायाधिश निवडते. पण याही निवडणुकीत उमेदवार पक्षाच्या यादीतले असतात. चौथी वाट म्हणजे अपक्ष निवडणुक. या निवडणुकीत उमेदवार जाहीर करतात की आपण कुठल्याही पक्षाचे नाही.
गव्हर्नर न्यायाधिशाला काढून टाकू शकतो. विधीमंडळ न्यायाधिशावर अभियोग चालवून, त्याची चौकशी करुन दोन तृतियांश बहुमतानं बडतर्फी करू शकते. न्यायालयीन व्यवस्थाही कमीटी नेमून चौकशी करून कारवाई करू शकते. जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांच्या अर्ध्या सख्येनं मतदार एकत्र येऊन न्यायाधिशाला काढून टाकू शकतात.
पर्स्कीची नेमणूक २००३ साली डेमॉक्रॅट गव्हर्नर डेविस यांनी केली. जूनमधे ही न्यायाधिशाची जागा रिकामी होऊन त्या ठिकाणी निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणुक अपक्ष असेल. अजूनपर्यंत इतर कोणाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलेला नसल्यानं पर्स्की पुन्हा बिनविरोध न्यायाधीश होणार आहेत.
या स्थितीत जनतेनं कौल लावून पर्स्की यांना हटवण्याचं ठरवलं आहे. ज्या काऊंटीतून ते निवडून गेले तिथल्या ८१ हजार मतदारांनी सह्या करून त्यांना परत बोलावण्याची मागणी केली तर पर्स्की बडतर्फ होतील. बहुसंख्यांनी मतदान करून घालवलं तर अर्थातच पुढल्या निवडणुकीत ते निवडले जाणार नाहीत. पुरेशा सह्या गोळा झाल्या नाहीत तर इतर वाटा उरतील. पण त्या वेळ खाणाऱ्या असतील.
न्यायाधिश भले कायद्यानुसार वागले असतील, तरीही बलात्कारासारख्या गुन्ह्याला किरकोळ शिक्षा होणं ही  गोष्ट न्यायाला धरून  नाही.  जबर  शिक्षा दिली पाहिजे या बाजूला जनमत आहे.  
 ब्रॉक टर्नर हा ओहायो या राज्यातल्या  ओकवूड  या  गावाचा रहिवासी. एक समृद्ध आणि स्वच्छ अमेरिकन गाव. टुमदार. बहुतेक सर्व कुटुंबं सुखवस्तू आणि श्रीमंत वर्गातली. गावात चहूकडं हिरवळ,  झाडं, निवांतपणा. याच गावातल्या एका शिक्षिकेनं वर्तमानपत्राला पत्र लिहून आपल्या गावाची हकीकत सांगितली. पार्टी, दारू पिणं आणि धिंगाणा घालणं अशी एक परंपरा – फॅशन गावात रूढ झाली आहे.शाळकरी  मुलही वीकेंडला, सुटीच्या दिवसात पार्ट्या करतात. एकाद्या पित्यानं आपल्या मुलाला किंवा मुलीला पार्टीत जाऊ नकोस असं सांगितलं तर मुलं रागावतात. असं करणं म्हणजे मागे पडणं असं मुलांना वाटतं. पार्टीत धिंगाणा झाला तर पोलीसही काणाडोळा करतात, अगदीच खून वगैरे झाला नाही म्हणजे बास झालं असं पोलिसांचं मत झालंय.
मुलांना आता नकार ऐकायची सवय राहिलेली नाही.पालकही ‘ नो ‘ म्हणायला तयार नसतात. बलात्कार करणं, बळजोरी करणं यात चूक नाही, यात गुन्हा नाही, म्हटलं तर त्यात मर्दानगी आहे असं बऱ्याच मुलांना वाटतं. सर्वाना तसं वाटत नसेलही पण बऱ्याच जणांना वाटतं. ही समजूत दूर करण्याचा प्रयत्न समाजात होताना दिसत नाही. पालक मुलांना बलात्कार वा पिण्याला प्रोत्साहन नक्कीच देत नाहीत. परंतू या दोषांपासून परावृत्तही  करत नाहीत असं ओकवूडमधल्या शिक्षक बाईचं म्हणणं आहे.
विद्यार्थिनी दारू प्याली, प्रमाणाबाहेर. ही तिची चूक. अशा परिस्थितीत मित्रापासून अंतर ठेवलं नाही हीही चूकच. पण या होत्या चुका, गुन्हे नव्हेत. ब्रॉकनं बलात्कार केला ही चूक नव्हती, तो गंभीर  गुन्हा होता. रस्त्यात एकांतात भले पूर्ण नग्न स्त्री समोर असेल. तिचं शारीरीक आणि मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेणं हा मोठा गुन्हा आहे. तो ब्रॉकनं केला. तेव्हां हे कृत्य धिक्कार करण्यायोग्य  आहे, त्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे.
अमेरिकन समाजाची घडण स्वातंत्र्य आणि संधी  या पायावर झाली आहे. माणसाला विचाराचं आणि आचाराचं स्वातंत्र्य आहे. पुरुषाना आहे आणि स्त्रियांनाही. पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना संधी आहे. स्वतःचा व्यक्तिशः विकास, सार्वजनिक ठिकाणची वर्तणुक याचं  स्वातंत्र्य अमेरिकन समाजानं स्त्रीला दिलं आहे. असा विचार आणि परंपरा जगातल्या इतर समाजात कमी आहेत, कमी प्रमाणात अमलात येतात. हे स्वातंत्र्य अर्थवाही पद्धतीनं टिकवणं आणि विकसित करणं  अमेरिकन स्त्री पुरुषांच्या हाती आहे. हे स्वातंत्र्य अमेरिकन कसं टिकवणार? स्त्रीला स्वतःचं आयुष्य बेतण्याचं स्वातंत्र्य उपभोगू देणं, तरीही बलात्कारासारखा अमानवी प्रकार न घडू देणं हे अमेरिकन समाज कसं साधणार आहे?
ब्रॉकला जबर शिक्षा तर व्हायलाच हवी. परंतू विश्वशाळेमधे जीवघेण्या स्पर्धा असणार नाहीत, स्वातंत्र्य असेल पण स्वैराचार असणार नाही याचीही काळजी विश्वशाळेला घ्यायला हवी. आचाराचं स्वातंत्र्य पुरुष आणि स्त्रियांना असेल.  त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी होता कामा नये ही नीती समाजात रुजवायला हवी.
।।

झुंपा लाहिरींचं नवं पुस्तक

झुंपा लाहिरींचं नवं पुस्तक

झुंपा लाहिरी यांचं दी अदर वर्ड नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्या पुस्तकावर खूप चर्चा चाललीय. पुस्तक आहे इटालियन भाषेत. त्याची एक इंग्रजी आवृत्ती निघालीय. या आवृत्तीत डावीकडलं पान इटालीयन भाषेत आणि समोरचं पान इंग्रजीत आहे. इटालियनचं इंग्रजी भाषांतर गोल्डस्टीन या इटालियन भाषांतरकारीनं केलंय. 
पुस्तकावर भरपूर चर्चा होतेय. 
अनेकांनी या पुस्तकाचं स्वागत केलंय. एकाभाषेतून दुसऱ्या भाषेत जाण्याच्या प्रयत्नामधे लेखिकेला झालेला त्रास आणि आलेलं अपयश लेखिकेनं प्रामाणिकपणे मांडलंय. अनेक वाचक आणि समीक्षकाना पुस्तक आवडलेलं नाही. त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्या आणि कथांमधला कस त्यांच्या या नव्या पुस्तकात नाही असं अनेकांनी म्हटलंय.
झुंपा लाहिरी इंग्रजी साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या आणि दोन कथासंग्रह प्रकाशित झालेत. त्यांच्या पहिल्या कादंबरीला (नेमसेक) पुलित्झर पारितोषिक मिळायलंय. बूकर पारितोषिकासाठी त्यांचं नाव किमान दोन वेळा तरी घेतलं गेलं.
झुंपा लाहिरी बंगाली आहेत. त्या जन्मल्या आणि वाढल्या अमेरिकेत. शिक्षण इंग्रजी, वातावरण इंग्रजी, परिसर इंग्रजी, अभ्यास इंग्रजी. घरामधे आई वडिलांमुळं बंगाली भाषा कानावर पडत असणार. आई वडिलांमुळं आणि जन्मामुळं झुंपाच्या रक्तात बंगाली, भारतीय संस्कृती आहे. जगण्यामुळं त्यांची संस्कृती अमेरिकन झालीय. बंगाली आणि अमेरिकन अशा दोन संस्कृतींच्या प्रभावात झुंपा हेलकावे खात असतात. त्यांच्या साहित्यातही दोन संस्कृतीतला संबंध, संवाद, विसंवाद, संघर्ष उमटत असतात. त्यांची पात्रं भारतीय-बंगाली असतात. ती पात्रं सभोवतालच्या अमेरिकन  वातावरणाशी जुळवून घेण्याच्या खटपटीत असतात. लाहिरी यांच्या साहित्यात  ही संस्कृती श्रेष्ठ आणि ती संस्कृती कमी प्रतीची अशी भूमिका मांडलेली नाही. त्या तटस्थ आहेत. 
लािहरी रोममधे स्थलांतरित झाल्या. इंग्रजी सोडून इटालियन भाषेत लिहायचं आहे असं ठरवून इटालियन भाषेचा अभ्यास त्यांनी सुरु केला. (त्यांचा नवरा इटालियन आहे). दोन वर्ष वेगानं इटालियन भाषेचा अभ्यास करणं, इटालियन होणं आणि इटालीयन भाषेत लिहिणं  या खटापोमामधे आलेले अनुभव त्यांनी अदर वर्डस या पुस्तकात लिहिलेत. पुस्तकात त्यांचं दोन संस्कृतींमधे हेलकावे खाणं व्यक्त झालंय.  धड अमेरिकन नाही धड बंगाली नाही अशा अवस्थेत आपण आहोत असं कबूल करत लेखिकेनं  एका नव्या इटालियन संस्कृतीत-भाषेत प्रवेश केला. त्रांगडं झालं. बंगाली, अमेरिकन आणि इटालियन भाषा-संस्कृती.
हे पुस्तक फिक्शन नाही, त्यांचे अनुभव आणि संस्कृती-भाषा विषयक विचार आठवणींच्या रुपात मांडलेले आहेत.
फिक्शन नसलं तरीही त्यात फिक्शनसारखे तुकडे आहेत. लेखिकेचा एक स्वेटर हरवतो. शोधाशोध. एक स्वेटर समोर येतो. ‘हा तुझाच स्वेटर आहे कां’ असा प्रश्न विचारल्यावर लेखिका घोटाळ्यात पडते. फिजिकल स्वेटर आणि भावनेतला,कल्पनेतला,मनातला स्वेटर यात लेखिकेचा गोंधळ होतो.  
इंग्रजीत लिहिण्याची सवय असताना, इंग्रजीत  स्थिरावलेल्या असतानाही त्यांना नवी भाषा कां हवीशी वाटली? इंग्रजी शब्द त्याना व्यक्त व्हायला पुरेसे वाटत नाहीत? इटालीत गेल्यानंतर त्यांना जे सांगावंसं वाटतं ते इंग्रजीत त्यांना व्यक्त करायला त्रास होतोय? अमेरिकेत त्यांचा वावर अमेरिकन अमेरिकन आणि बंगाली वातावरणात होता. इटालीत कदाचित दोन्ही प्रकारची माणसं त्यांना कमी भेटत असतील, इटालियन आणि युरोपीय माणसं भेटत असतील. त्यामुळं त्यांचं अनुभव विश्व, विचार विश्व बदललं असेल आणि तिथं इंग्रजी भाषा अपुरी वाटत असेल?
 रोममधे असंख्य छोटे छोटे पूल असतात. प्रत्येक पुलावरून जाताना पुलाच्या मध्यावर आल्यावर लेखिकेला  मानसिक त्रास सुरु होतो. आपण पुलाच्या याही बाजूला नाही आणि त्याही बाजूला नाही, आपण मधेच आहोत असं त्या बिंदूवर त्याना वाटतं.  
मोठ्या तलावात आपण उतरलो आहोत अशी कल्पना लाहिरी करतात. आपल्याला तलावाच्या मध्यावरची खोली अस्वस्थ करते, आपण बुडू अशी भीती त्यांना वाटते. संकट आलं तर मदतीला त्यांचा मुलगा, नवरा आहे. तरीही तलावाच्या मध्यावर, खोलवर जायला त्या घाबरतात. तलावाच्या कडेकडेनं पोहत त्या पलिकडं जातात, मध्यामधून नाही.
अमेरिकेत आपण राहिलो पण परिघावरच राहिलो असं त्यांना वाटतंय? ना अमेरिकेची खोली अनुभवली ना बंगाली संस्कृतीची असं त्यांना वाटतंय?
भाषेच्या बाबतीत त्या एक मुद्दा मांडतात. भाषा वरवर हाताळून हाती लागत नाही. भाषा संस्कृती हाडात असते, हाडाच्याही आतल्या अस्थिमज्जेत असते. आपण हाडापर्यंत गेलो नाही, अस्थिमज्जेपर्यंत गेलो नाही असं (खंत?) लाहिरी सूचित करतात.
लाहिरी प्रामाणिकपणानं, सरळपणे साहित्य निर्मितीच्या प्रश्नाला सामोरं जाताहेत. पुस्तकाच्या शेवटी त्या सूचित करतात की त्या कदाचित पुन्हा इंग्रजीकडं परततील, अमेरिकेत परततील.
टिम पार्क या लेखक समीक्षकानं मुद्दा उपस्थित केलाय. आपण ज्या भाषेत वाढलो ती भाषा सोडणं. लेखक काही कारणांसाठी परागंदा होतात पण लेखन मातृभाषेत करतात. काही लेखक आपली मातृभाषा सोडून इतर भाषेत लिहू लागतात. मातृभाषा सोडून गेलेले लेखक यशस्वी ठरत नाहीत, सकस लिखाण करू शकत नाहीत, त्यांच्या वाचकांच्या पसंतीस उतरत नाहीत असं टिम पार्क यांनी अनेक उदाहरणं देऊन म्हटलंय. त्यानी दिलेलं एक उदाहरण आहे प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते कादंबरीकार मिलान कुंडेरा यांचं. कुंडेरा झेक भाषेत लिहित असत. त्याच पुस्तकांसाठी त्यांना नोबेल मिळालं. झेकोस्लोवाकियावरच्या जाचक  कम्युनिष्ट राजवटीतून सुटण्यासाठी कुंडेरा फ्रान्समधे स्थलांतरित झाले. फ्रान्समधेच ते वसले. तिथं त्यांनी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला, फ्रेंचमधे लिहिलं. वाचक आणि समीक्षकांचं म्हणणं असं की कुंडेरांचं फ्रेंचमधलं लिखाण त्यांच्या झेक लिखाणापेक्षा कमी सकस आहे. 
लेखक मातृभाषेत भाषेत वाढतो. परिसर, परिवार, मित्र, वातावरण, शाळा यातून लेखकाची भाषा घडते. वीसेक वर्षाचा होईपर्यंत. नंतर लेखक इतर भाषा शिकतो, त्यात प्राविण्यही मिळवतो. काही कारणानं माणूस लिहिण्याची भाषा बदलतो. कधी राजकीय कारणासाठी. कधी अधिक पसरलेल्या भाषेत अधिक वाचक, कीर्ती आणि पैसे मिळतील या आशेनं माणूस इंग्रजी, जर्मन किंवा तत्सम भाषेत लिहू लागतो. मातृभाषेइतकी सहजता इतर भाषेत येत नाही, काही तरी राहून जातं. म्हणूनच अनेक लेखक देश सोडून दुसऱ्या देशात गेले तरी स्वतःच्या भाषेतच लिहीत रहातात.  
इथे अरूण कोलटकर यांची आठवण येते.
कोलटकरांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत कविता लिहिल्या. स्वतंत्रपणे दोन भाषात लिहिणारी माणसं अगदीच कमी. दोन्ही भाषेतल्या त्याच्या कवितेला साहित्यात अव्वल स्थान मिळालं. जागतिक साहित्यातला शतकातला नंबरी कवी म्हणून कोलटकरांना मान्यता मिळाली.
 कोलटकरांचा घडणीचा काळ कोल्हापूर, मुंबईतला. वातावरण पूर्णपणे मराठी. सभोवतालची माणसं आणि वातावरण मराठी. मग अचानक त्यांना इंग्रजीत कां लिहावंसं वाटलं? 
एकदा एका मुलाखतकारानं त्यांना विचारलं की मराठी-इंग्रजीपैकी कोणती भाषा तुम्हाला अधिक जवळची वाटते. त्यावर कोलटकरांनी त्यांच्या शेैलीत उत्तर दिलं “असले प्रश्न विचारू नका. मी काय लिहिलंय ते पहा, ते वाचा, त्यावरून तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा.”
एका मुलाखतकारांनी त्याना विचारलं “तुम्ही काय वाचता?”
  कोलटकर त्यांच्या तिरकस, छान शैलीत प्रसन्न हसले. “तुम्हाला मी काय वाचलं ते जाणायचंय? मग घ्या तर ही यादी.” त्या यादीत जगभरचे लेखक, कवी होते.अमेरिकन, ब्रिटीश.  त्यात आईनस्टाईन, मंडेला, तुकाराम आणि एकनाथही होते.
  कोलटकरांची मराठी भाषाच अगदी वेगळी होती. ती रुढ मराठी भाषा नव्हती. माणसं, वातावरण, शब्द, रचना इत्यादी  रूढ मराठी माणसाचं-मराठी संस्कृतीतलं नव्हतं. माणसांचे व्यवहारही रूढ मराठी जीवनातले नव्हते. दुसऱ्या महायुद्धानंतर मुंबईतलं जगणं बदललं. बाहेरच्या राज्यातली नाना प्रकारची माणसं मुंबईत आली. ती मुंबईला माहित नसलेले नाना व्यवहार करू लागली. “खाली पिली” काहीही करायला लागली. मुंबईत ‘मादरचोद’ माणसं दिसू लागली, ‘गांडू’ लोक दिसू लागले. माणसं एकादी गोष्ट ‘कायकू करनेका’ असा प्रश्न विचारू लागली. संप होऊ लागले. भोसका भोसकी होऊ लागली. इराण्याकडे लोक बनमस्का खाऊ लागले. आँटीकडे जाऊन दारु पिऊ लागले. 
अनेक शतकं तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल-रखुमाईच्या भोवती वावरलेल्या   समाजात यंत्रं आली, यात्रेत रांडा फिरू लागल्या. आंघोळ करायला नकार देणारे, केस वाढवणारे, मुक्त सेक्सचा ओढा असलेले, ड्रग्जमधे मुक्त झालेले,  हिंदू नावाच्या कठल्यातरी परिभाषित न झालेल्या व्यवहाराकडं वळलेले तरूण  गळ्यात माळा घालून हरेरामा भजनं करत मुंबईत पोचले. 
 तुकाराम ते हिप्पी.
हे सारं कोलटकरानी पाहिलं, त्यांच्या पद्धतीनं. हे सारं कोलटकरांच्या कवितेत आलं. यच्चयावत गोष्टींबद्दल उत्सुकता. प्रत्येक गोष्टीला भिडणं पण तरीही एक अंतर. सर्व गोष्टींकडं गंभीरपणे पण मिश्कीलथट्टेकोरपणं पहाणारा हा पहिला माणूस मराठी भाषेत निपजला. 
   त्यांची भाषा. दरक्षणी दृष्टीस पडणाऱ्या गोष्टी, त्यातली छुपी अंगं दाखवणारी. कोलटकर त्यांच्या परिसरातल्या भाषेत कंफर्टेबल नक्कीच नसणार. त्यांनी त्यांची स्वतःची भाषा शोधली. ती येवढी प्रत्ययकारी होती की झक मारत जाणत्या माणसांना ती मान्य करावी लागली.
एका मित्राबरोबर ते जेजुरीला गेले होते. जेजुरी त्यांच्या मेंदूत घुसली. बराच काळ ती त्यांच्या मेंदूत गोंधळ घालत होती. मग एकदा धाडकन जेजुरी इंग्रजीत उतरली. कोलटकर मराठीत मजेत असताना इंग्रजीत कां लिहावंसं वाटलं? जेजुरी इंग्रजीत कां लिहावी वाटली? असा प्रश्न कोलटकरांना विचारला असता तर त्यांनी काय उत्तर दिलं असतं? 
  ते हसले असते. 
सकाळी उठून दाढी कां करावीशी वाटली किंवा आंटीकडं जाऊन दारू कां प्यावीशी वाटली या प्रश्नाला काय उत्तर असणार?
जे मराठी भाषेबाबत तेच इंग्रजीबाबतही झालं. अमेरिका, इंग्लंड इत्यादी इंग्रजी देशातल्या माणसांना परिचित असलेलं इंग्रजी कोलटकरांच्या कवितेत नाही. शब्द, रचना, घटना, माणसं. ज्या गोष्टी मराठी माणसालाही दिसल्या नव्हत्या त्या इंग्रजी माणसाला कुठून दिसणार? भारतात इंग्रजीत वाढलेल्या लोकांनाही अमेरिकन-ब्रिटीश प्रतिमा, शब्द, वाक्यरचनांची सवय झाली होती. कोलटकरांच्या कवितेत ते रूढ इंग्रजी नव्हतंच. इंग्रजीत लिहिलेला अभंग कधी कोणी वाचला होता? कोलटकरांचं इंग्रजी हे कोलटकरांचं होतं, ते इतर कोणाचंही नव्हतं.
म्हणूनच ते टिकलं. न्यू यॉर्क रिव्ह्यूनं कोलटकरांच्या कवितेचा संग्रह प्रसिद्ध केला आणि शतकातला कवी म्हणून त्याचा उल्लेख केला. 
झुंपा लाहिरींनी इटालियन भाषेत लिहिल्यानंतर ब्रिटीश आणि अमेरिकन साहित्य जगतात चर्चा सुरु झालीय. एका परीनं भाषा या विषयावर परंपरेनं आखून दिलेल्या परिघात समीक्षक मंडळी विचार करत आहेत. परिसर-परंपरेनं दिलेली भाषा, प्रयत्नपूर्वक तयार केलेली-मातृभाषा नसलेली भाषा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होतेय. 
काही अभ्यासक म्हणतात की कोणत्याही भाषेत विचार करण्याची क्षमता,  व्यक्त होण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत वायर्ड आहे. भाषा वरवर वेगळ्या असल्या तरी आतून सगळ्या भाषा एकमेकांना चिकटलेल्या असतात. कुठल्याही भाषेतून दुसऱ्या कुठल्याही भाषेत जाता येतं. प्रश्न असतो तो ही क्षमता वापरण्याचा. ते बहुतेकांना जमत नाही, फारच थोड्यांना जमतं. कोलटकरांना ते जमलं. लाहिरींना ते जमलं नसावं.  
माणसाजवळ काही तरी सांगण्यासारखं असावं लागतं. नंतर येते भाषा. नंतर येते मेंदूची अनेक भाषांत व्यक्त होण्याची क्षमता.कोलटकरांकडं तिन्ही गोष्टी होत्या.

।।
एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.

एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.

एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.
।।
मार्जिनल रेवोल्युशन युनिवर्सिटी या नावाची एक विश्वशाळा कॅनडात आहे. ही विश्वशाळा अर्थशास्त्र विषय शिकवते. अनेक पाठ्यक्रम ही विश्वशाळा ऑन लाईन शिकवत असते. अनेक विषय, भाषणं या विश्वशाळेनं युट्युबवर टाकलेली आहेत. कोणीही वाचावं, अभ्यास करावा. ही विश्वशाळा  प्रचलित  अर्थविचार आणि विचारवंत विद्यार्थ्यांसमोर, साऱ्या जगासमोर ठेवत असते. अलेक्स टेबेरॉक यांनी ही विश्वशाळा २०१२ मधे स्थापन केली. स्वतः टेबेरॉक शिकवतात, लिहितात.
अभ्यासक्रमात अर्थविचारात गुंतलेले मुद्दे नाना तऱ्हेनं वाचकांसमोर ठेवले जातात. काही दिवसांपूर्वी मणीरत्नमच्या गुरु या सिनेमाचं परिक्षण टेबेरॉक यांनी लिहिलं. २००७ सालच्या  गाजलेल्या फिल्मचं परीक्षण  २०१६ सालातल्या मे महिन्यात. 
टेबेरॉक यांचं म्हणणं असं की गुरु हा  बिझनेस आणि मुक्त अर्थ-बाजारव्यवस्था या आधुनिक तत्वांचा पुरस्कार करणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतला  पहिला चित्रपट आहे. परीक्षणात ते वरील मूल्यांचा मुददा मांडतातच पण त्या बरोबरच गुरुकडं एक चांगली फिल्म म्हणून पाहिलं पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. आयन रँडच्या फाऊंटनहेड या कादंबरीतल्या, त्याच नावाच्या  चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेशी गुरु या चित्रपटाचं साम्य आहे असं टेबेरॉक म्हणतात.
काय गंमत आहे पहा. भारतीय माणसांनी गुरु एक  बॉलीवूड फिल्म, एक छान करमणूक म्हणून पाहिली.एका अमेरिकन अर्थशास्त्र प्राध्यापकाला गुरु या फिल्ममधे मुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश सापडला. भारतीयाना गुरूमधे पुसटसा धीराभाई अंबाणी दिसला, अमेरिकन माणसाला त्यात आयन रँडनं रंगवलेली एक भूमिका दिसली.
गुरु हा चित्रपट खूप गाजला. दोन कारणांसाठी. एक कारण म्हणजे तो सैलपणे धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारलेला आहे अशी समजूत. दुसरं कारण म्हणजे मणीरत्नम या दिद्गर्शकाचं देखणं कर्तृत्व.
धीरूभाईंचं चरित्र, चारित्र्य आणि त्यांच्या वागण्यातून बाहेर येणारा मुक्त बाजारवाद या बद्दल माणसांची अनेक मतं आहेत. अंबाणी आणि त्यांचा उद्योग समूह आजही नैतिक, कायदेशीर कारणांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. 
दिद्गर्शक मणीरत्नम यांचा भर अंबाणीच्या राजकीय, आर्थिक कर्तृत्व वा विचारांवर नाही. गुरू हा अंबाणींवरचा चरित्रपट नाही. 
मणीरत्नम यांना स्वतःचा स्वतंत्र राजकीय विचार असणं शक्य आहे. परंतू चित्रपट करतांना ते एक दिद्गर्शक असतात. अर्थात हेही खरं की एकाद्या निर्मात्यानं अंबाणींवर चरित्रपट करायला सांगितलं तर ते तसा चित्रपट त्यांच्या पद्धतीनं करतीलही. परंतू गुरु हा चित्रपट मणीरत्नम त्यांनी चरित्रपट म्हणून केलेला नाही. अंबाणी यांची सावली पडलेलं एक कथानक त्यांनी तयार केलंय. अंबाणी यांची आठवण मधे मधे यावी अशी तजवीज मणीरत्नम यांनी केलीय.
गांधी हा गांधीजींवरचा चरित्रपट होता. जब्बार पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर चरित्रपट केला. चरित्रपट करत असताना नाना अडथळे येतात. नायकाच्या जीवनातल्या वादग्रस्त, नेगेटिव गोष्टीं चितारायचा तर जनता खवळते आणि  टाळल्या तर समीक्षक खवळतात. अटेनबरा आणि पटेल यांनी मधला मार्ग काढला. सरकार या  चित्रपटात गुन्हेगारी जग आहे, गुन्हेगारी जग आणि राजकीय पुढारी यांच्यातले संबंध चित्रपटात आहेत. बाळ ठाकरे यांच्या लकबी वापरून नांगरे हे पात्र दिद्गर्शकानं उभं केलं म्हणून सरकार हा सिनेमा ठाकरे यांचा चरित्रपट झाला नाही.
 चित्रपटात आकारानं मोठी, गुत्याची, मोठं कर्तृत्व असणारी भूमिका मध्यवर्ती असली की प्रेक्षक खुष होतात. सेनापती, उद्योपती, गुन्हेपती, जनपती अशी पात्रं प्रेक्षकांना आवडतात. भारतीय प्रेक्षकाला नायक सर्व अंगांनी थोर असावा असं वाटतं. नायकाच्या नेगेटिव बाजू पहायला त्याला आवडत नाही. नायक आणि कथानकाला जोडून प्रेक्षकाला रंजन हवं असतं. भावनांना हात घालणाऱ्या गोष्टी त्याला हव्या असतात. संगीत हवं, नाच हवेत, विनोद हवेत, अक्शन हवी. बहुतांश प्रेक्षक वरील वर्गातले असतात. वैचारिक, कंटाळवाणे, प्रयोगशील चित्रपट आवडून पहाणारे प्रेक्षक अगदी मोजके असतात. आशय, प्रयोगशील आणि रंजक असं मिश्रण असणारेही चित्रपट तयार होत असतात. प्रेक्षक ते चित्रपट पसंत करतो.
मणीरत्नमचा गुरु पहा. (किंवा रोजा पहा)
अतीशय देखणी दृश्य हा त्यांच्या  चित्रपटाचा आत्मा आहे. गुरू सिमेमातलं मणीरत्नम यांनी दाखवलेलं ईडर हे गाव पहा. त्या गावातली त्यांनी दाखवलेली घरं पहा. मुळात ते गाव आणि  घरं तशी नाहीत. मणीरत्नमनं ती डोळ्याला सुखावणारी केली आहेत. प्रकाश योजना, कॅमेऱ्यांचे कोन, रंगयोजना इत्यादी घटक त्यांनी फार विचारपूर्वक आणि देखणेपणाकडं लक्ष देऊन योजले आहेत. त्याच गावात एक नाच आहे. त्यात गुरुकांत (धीरूभाई?) आणि त्याची पत्नी (कोकिळाबेन?) नाचते. नाच आणि गाणं अत्यंत देखणं आहे. प्रत्यक्षात त्या गावात तशी जागा नाही आणि धीरूभाई किंवा कोकिळाबेन तसं नाचल्या असणंही शक्य नाही. (जसं बाजीराव आणि काशीबाई कधी नाचल्या असतील काय?) पण चित्रपट हे एक अद्भुत माध्यम आहे. तिथं दिद्गर्शकाची कल्पनाशक्ती असीम असते. तंत्राचा वापर करून दिग्दर्शक काय वाट्टेल ते उभं करतो. चित्रपट वास्तव आणि कल्पित यांच्या सीमारेषेवर नेऊन ठेवतो.प्रेक्षकाला आनंद देण्यासाठी.
प्रेक्षकाच्या सुखाबद्दलच्या दिद्गर्शकाच्या काही कल्पना असतात. तेच त्याचं वैशिष्ट्यं असतं. अनेक दिद्गर्शक नयनरम्यता हा घटक वगळतात. त्यांना वास्तव जितकं दाहक असेल तितकं दाखवायचं असतं. काही दिग्दर्शकांना चित्रपटातून काही एक धडा लोकांना द्यायचा असतो, काही एक संदेश द्यायचा असतो.  संदेश महत्वाचा, डोळ्यांचं किवा कानाचं सुख महत्वाचं नाही असं त्या दिग्दर्शकाचं मत असतं. अशा आशयप्रधान चित्रपटात गाणी नसतात, माणसाच्या गात्रांना सुखावेल असं काहीही नसतं. तेच त्या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्यं आणि तीच त्या दिग्दर्शकाची शैली. तेही चित्रपट आवडणारी माणसं असता, त्याही चित्रपटांना प्रतिष्ठित बक्षिसं देणारे परिक्षक असतात.
  खूप दारू प्याल्यावर, ड्रग घेतल्यावर, मानसीक डिस्टर्ब्ड असण्याच्या काळात माणसाच्या डोळ्यासमोर येतात तशी दृश्य घेऊन एका दिग्दर्शकानं सिनेमा काढला. पूर्ण दीडेक तासाचा. माणसांची शरीरं विचित्र. त्यांचे कपडे थेट आदिम माणसापासून २०१२ सालातले. संगित आदिम काळापासून तर आजच्या जाझपर्यंत. आणि तेही जगातल्या कुठल्याही देशातलं. कथानक शेकडो नव्हे हजारो वर्षं मागं पुढं बेगुमान सरकत रहातं. पडद्यावर काय घडतंय त्याची संगती लावता लावता प्रेक्षकाचा जीव जातो. प्रेक्षकानं अशा छळवादाला तोंड दिलंच पाहिजे असं त्या दिग्दर्शकाचं मत. असेही चित्रपट आणि दिग्दर्शक असतात. तीच त्या चित्रपटाची शैली. ती न आवडणारे जास्त, आवडणारे विरळे.
कोणाला चित्रपटातून चार घटका करमणूक हवी असते. कोणाला संदेश. कोणाला संदेश आणि करमणुक यांचं मिश्रण. भारतात थोडासा संदेश, भरपूर करमणूक हा फॉर्म्युला लोकांना आवडतो. चांगली दृश्यं, चांगला अभिनय  आणि त्यात चिमूटभर संदेश लोकांना आवडतो. त्यातही गाणी आणि नाच लोकांना हवे असतात. भारतीय माणसाचं गाणं आणि संगितावर विलक्षण प्रेम.  दैनंदिन जीवनातही संगीत त्याच्या सोबत असतं. अनेक सिनेमे गाजले, गाजतात  ते त्यातल्या गाण्यामुळं. कित्येक सिनेमे केवळ गाण्यांवर गाजले, लक्षात राहिले. त्यात काम करणारे नट ठोकळे किंवा खांब होते. लोकांनी त्या नट बोल्टांकडं अजिबात दुर्लक्ष केलं, गाणी ऐकली.
बाजीराव मस्तानी या सिनेमातल्या ऐतिहासिक सत्याची फारशी काळजी प्रेक्षकाला नसते. बाजीरावाचं वैभव, त्याच्या लढाया, त्याची देखणी पत्नी, त्यांनी केलेले नाच आणि गाणी या गोष्टी त्याला आवडतात. सारं लार्ज स्केल असल्यामुळं प्रेक्षकाला त्याची भुरळ पडते. बाजीरावाचा नाच अगदी कंटेंपररी आहे.  यात काही चुकलं असं प्रेक्षकाला वाटत नाही. एक सुंदर आणि कर्णमधूर नाच पहायला मिळाला याचा तुडुंब आनंद त्याला असतो. 
नाच-गाणं. 
नाच ‘बाजीराव’मधला.
नाच ‘सत्या’मधला.
सत्यामधलं ‘गोली मार भेजेमे’ नाचगाणं तुफान होतं.
हॉलिवूड सिनेमातही एकेकाळी भरपूर नाच आणि गाणी असत. काळ सरकला. नाच गाणी गायब झाली. खिळवून टाकणारी दृश्य प्रेक्षकांना आवडू लागली. रेवेनंट सारखा भीषण अनुभव देणारा सिनेमा लोकांनी त्यातील थक्क करून टाकणाऱ्या दृश्यांसाठी पाहिला.
  टेबेरॉक या अमेरिकन माणसाला गुरु या सिनेमात धीरूभाई आणि भारत दिसला नाही तर आयन रॅंडच्या फाऊंटनहेड कादंबरीतल्या हॉवर्ड रोर्क या पात्राची आठवण झाली.  फाऊंटनहेड सिनेमात रोर्कवर भ्रष्टाचाराचा खटला चाललेला असतो. रोर्क त्याला उत्तर देत असतो. सभोवतालचा समाज भ्रष्ट असेल तर कोणीही उद्योगपती सचोटीनं कसं काम करू शकतो असा सवाल रोर्क न्यायाधिशाला विचारतो. गुरु सिनेमात गुरूकांतवरचा खटला पाहून   टेबरॉकना रोर्कची आठवण झाली.  भारतीय प्रेक्षकाला आयन रँड किंवा रोर्क माहित असायचं कारण नाही. मणीरत्नमला रँड-रोर्क-फाऊंटनहेड दिसले नाहीत. त्याला दिसले व्यापार उद्योगाचे नियम चौकटी तोडणारे अंबाणी आणि स्वातंत्र्यासाठी कायदे मोडणारे गांधीजी. 
टेबरोक आणि भारतीय प्रेक्षक अशा दोघांनाही वेगवेगळ्या कारणांसाठी कां होईना गुरु चित्रपट पहावासा वाटला. त्यातच चित्रपटाचं यश दडलेलं आहे.

।।
एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.

एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.

एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.
।।
मार्जिनल रेवोल्युशन युनिवर्सिटी या नावाची एक विश्वशाळा कॅनडात आहे. ही विश्वशाळा अर्थशास्त्र विषय शिकवते. अनेक पाठ्यक्रम ही विश्वशाळा ऑन लाईन शिकवत असते. अनेक विषय, भाषणं या विश्वशाळेनं युट्युबवर टाकलेली आहेत. कोणीही वाचावं, अभ्यास करावा. ही विश्वशाळा  प्रचलित  अर्थविचार आणि विचारवंत विद्यार्थ्यांसमोर, साऱ्या जगासमोर ठेवत असते. अॅलेक्स टेबेरॉक यांनी ही विश्वशाळा २०१२ मधे स्थापन केली. स्वतः टेबेरॉक शिकवतात, लिहितात.
अभ्यासक्रमात अर्थविचारात गुंतलेले मुद्दे नाना तऱ्हेनं वाचकांसमोर ठेवले जातात. काही दिवसांपूर्वी मणीरत्नमच्या गुरु या सिनेमाचं परिक्षण टेबेरॉक यांनी लिहिलं. २००७ सालच्या  गाजलेल्या फिल्मचं परीक्षण  २०१६ सालातल्या मे महिन्यात. 
टेबेरॉक यांचं म्हणणं असं की गुरु हा  बिझनेस आणि मुक्त अर्थ-बाजारव्यवस्था या आधुनिक तत्वांचा पुरस्कार करणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतला  पहिला चित्रपट आहे. परीक्षणात ते वरील मूल्यांचा मुददा मांडतातच पण त्या बरोबरच गुरुकडं एक चांगली फिल्म म्हणून पाहिलं पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. आयन रँडच्या फाऊंटनहेड या कादंबरीतल्या, त्याच नावाच्या  चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेशी गुरु या चित्रपटाचं साम्य आहे असं टेबेरॉक म्हणतात.
काय गंमत आहे पहा. भारतीय माणसांनी गुरु एक  बॉलीवूड फिल्म, एक छान करमणूक म्हणून पाहिली.एका अमेरिकन अर्थशास्त्र प्राध्यापकाला गुरु या फिल्ममधे मुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश सापडला. भारतीयाना गुरूमधे पुसटसा धीराभाई अंबाणी दिसला, अमेरिकन माणसाला त्यात आयन रँडनं रंगवलेली एक भूमिका दिसली.
गुरु हा चित्रपट खूप गाजला. दोन कारणांसाठी. एक कारण म्हणजे तो सैलपणे धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारलेला आहे अशी समजूत. दुसरं कारण म्हणजे मणीरत्नम या दिद्गर्शकाचं देखणं कर्तृत्व.
धीरूभाईंचं चरित्र, चारित्र्य आणि त्यांच्या वागण्यातून बाहेर येणारा मुक्त बाजारवाद या बद्दल माणसांची अनेक मतं आहेत. अंबाणी आणि त्यांचा उद्योग समूह आजही नैतिक, कायदेशीर कारणांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. 
दिद्गर्शक मणीरत्नम यांचा भर अंबाणीच्या राजकीय, आर्थिक कर्तृत्व वा विचारांवर नाही. गुरू हा अंबाणींवरचा चरित्रपट नाही. 
मणीरत्नम यांना स्वतःचा स्वतंत्र राजकीय विचार असणं शक्य आहे. परंतू चित्रपट करतांना ते एक दिद्गर्शक असतात. अर्थात हेही खरं की एकाद्या निर्मात्यानं अंबाणींवर चरित्रपट करायला सांगितलं तर ते तसा चित्रपट त्यांच्या पद्धतीनं करतीलही. परंतू गुरु हा चित्रपट मणीरत्नम त्यांनी चरित्रपट म्हणून केलेला नाही. अंबाणी यांची सावली पडलेलं एक कथानक त्यांनी तयार केलंय. अंबाणी यांची आठवण मधे मधे यावी अशी तजवीज मणीरत्नम यांनी केलीय.
गांधी हा गांधीजींवरचा चरित्रपट होता. जब्बार पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर चरित्रपट केला. चरित्रपट करत असताना नाना अडथळे येतात. नायकाच्या जीवनातल्या वादग्रस्त, नेगेटिव गोष्टीं चितारायचा तर जनता खवळते आणि  टाळल्या तर समीक्षक खवळतात. अॅटेनबरा आणि पटेल यांनी मधला मार्ग काढला. सरकार या  चित्रपटात गुन्हेगारी जग आहे, गुन्हेगारी जग आणि राजकीय पुढारी यांच्यातले संबंध चित्रपटात आहेत. बाळ ठाकरे यांच्या लकबी वापरून नांगरे हे पात्र दिद्गर्शकानं उभं केलं म्हणून सरकार हा सिनेमा ठाकरे यांचा चरित्रपट झाला नाही.
 चित्रपटात आकारानं मोठी, गुत्याची, मोठं कर्तृत्व असणारी भूमिका मध्यवर्ती असली की प्रेक्षक खुष होतात. सेनापती, उद्योपती, गुन्हेपती, जनपती अशी पात्रं प्रेक्षकांना आवडतात. भारतीय प्रेक्षकाला नायक सर्व अंगांनी थोर असावा असं वाटतं. नायकाच्या नेगेटिव बाजू पहायला त्याला आवडत नाही. नायक आणि कथानकाला जोडून प्रेक्षकाला रंजन हवं असतं. भावनांना हात घालणाऱ्या गोष्टी त्याला हव्या असतात. संगीत हवं, नाच हवेत, विनोद हवेत, अॅक्शन हवी. बहुतांश प्रेक्षक वरील वर्गातले असतात. वैचारिक, कंटाळवाणे, प्रयोगशील चित्रपट आवडून पहाणारे प्रेक्षक अगदी मोजके असतात. आशय, प्रयोगशील आणि रंजक असं मिश्रण असणारेही चित्रपट तयार होत असतात. प्रेक्षक ते चित्रपट पसंत करतो.
मणीरत्नमचा गुरु पहा. (किंवा रोजा पहा)
अतीशय देखणी दृश्य हा त्यांच्या  चित्रपटाचा आत्मा आहे. गुरू सिमेमातलं मणीरत्नम यांनी दाखवलेलं ईडर हे गाव पहा. त्या गावातली त्यांनी दाखवलेली घरं पहा. मुळात ते गाव आणि  घरं तशी नाहीत. मणीरत्नमनं ती डोळ्याला सुखावणारी केली आहेत. प्रकाश योजना, कॅमेऱ्यांचे कोन, रंगयोजना इत्यादी घटक त्यांनी फार विचारपूर्वक आणि देखणेपणाकडं लक्ष देऊन योजले आहेत. त्याच गावात एक नाच आहे. त्यात गुरुकांत (धीरूभाई?) आणि त्याची पत्नी (कोकिळाबेन?) नाचते. नाच आणि गाणं अत्यंत देखणं आहे. प्रत्यक्षात त्या गावात तशी जागा नाही आणि धीरूभाई किंवा कोकिळाबेन तसं नाचल्या असणंही शक्य नाही. (जसं बाजीराव आणि काशीबाई कधी नाचल्या असतील काय?) पण चित्रपट हे एक अद्भुत माध्यम आहे. तिथं दिद्गर्शकाची कल्पनाशक्ती असीम असते. तंत्राचा वापर करून दिग्दर्शक काय वाट्टेल ते उभं करतो. चित्रपट वास्तव आणि कल्पित यांच्या सीमारेषेवर नेऊन ठेवतो.प्रेक्षकाला आनंद देण्यासाठी.
प्रेक्षकाच्या सुखाबद्दलच्या दिद्गर्शकाच्या काही कल्पना असतात. तेच त्याचं वैशिष्ट्यं असतं. अनेक दिद्गर्शक नयनरम्यता हा घटक वगळतात. त्यांना वास्तव जितकं दाहक असेल तितकं दाखवायचं असतं. काही दिग्दर्शकांना चित्रपटातून काही एक धडा लोकांना द्यायचा असतो, काही एक संदेश द्यायचा असतो.  संदेश महत्वाचा, डोळ्यांचं किवा कानाचं सुख महत्वाचं नाही असं त्या दिग्दर्शकाचं मत असतं. अशा आशयप्रधान चित्रपटात गाणी नसतात, माणसाच्या गात्रांना सुखावेल असं काहीही नसतं. तेच त्या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्यं आणि तीच त्या दिग्दर्शकाची शैली. तेही चित्रपट आवडणारी माणसं असता, त्याही चित्रपटांना प्रतिष्ठित बक्षिसं देणारे परिक्षक असतात.
  खूप दारू प्याल्यावर, ड्रग घेतल्यावर, मानसीक डिस्टर्ब्ड असण्याच्या काळात माणसाच्या डोळ्यासमोर येतात तशी दृश्य घेऊन एका दिग्दर्शकानं सिनेमा काढला. पूर्ण दीडेक तासाचा. माणसांची शरीरं विचित्र. त्यांचे कपडे थेट आदिम माणसापासून २०१२ सालातले. संगित आदिम काळापासून तर आजच्या जाझपर्यंत. आणि तेही जगातल्या कुठल्याही देशातलं. कथानक शेकडो नव्हे हजारो वर्षं मागं पुढं बेगुमान सरकत रहातं. पडद्यावर काय घडतंय त्याची संगती लावता लावता प्रेक्षकाचा जीव जातो. प्रेक्षकानं अशा छळवादाला तोंड दिलंच पाहिजे असं त्या दिग्दर्शकाचं मत. असेही चित्रपट आणि दिग्दर्शक असतात. तीच त्या चित्रपटाची शैली. ती न आवडणारे जास्त, आवडणारे विरळे.
कोणाला चित्रपटातून चार घटका करमणूक हवी असते. कोणाला संदेश. कोणाला संदेश आणि करमणुक यांचं मिश्रण. भारतात थोडासा संदेश, भरपूर करमणूक हा फॉर्म्युला लोकांना आवडतो. चांगली दृश्यं, चांगला अभिनय  आणि त्यात चिमूटभर संदेश लोकांना आवडतो. त्यातही गाणी आणि नाच लोकांना हवे असतात. भारतीय माणसाचं गाणं आणि संगितावर विलक्षण प्रेम.  दैनंदिन जीवनातही संगीत त्याच्या सोबत असतं. अनेक सिनेमे गाजले, गाजतात  ते त्यातल्या गाण्यामुळं. कित्येक सिनेमे केवळ गाण्यांवर गाजले, लक्षात राहिले. त्यात काम करणारे नट ठोकळे किंवा खांब होते. लोकांनी त्या नट बोल्टांकडं अजिबात दुर्लक्ष केलं, गाणी ऐकली.
बाजीराव मस्तानी या सिनेमातल्या ऐतिहासिक सत्याची फारशी काळजी प्रेक्षकाला नसते. बाजीरावाचं वैभव, त्याच्या लढाया, त्याची देखणी पत्नी, त्यांनी केलेले नाच आणि गाणी या गोष्टी त्याला आवडतात. सारं लार्ज स्केल असल्यामुळं प्रेक्षकाला त्याची भुरळ पडते. बाजीरावाचा नाच अगदी कंटेंपररी आहे.  यात काही चुकलं असं प्रेक्षकाला वाटत नाही. एक सुंदर आणि कर्णमधूर नाच पहायला मिळाला याचा तुडुंब आनंद त्याला असतो. 
नाच-गाणं. 
नाच ‘बाजीराव’मधला.
नाच ‘सत्या’मधला.
सत्यामधलं ‘गोली मार भेजेमे’ नाचगाणं तुफान होतं.
हॉलिवूड सिनेमातही एकेकाळी भरपूर नाच आणि गाणी असत. काळ सरकला. नाच गाणी गायब झाली. खिळवून टाकणारी दृश्य प्रेक्षकांना आवडू लागली. रेवेनंट सारखा भीषण अनुभव देणारा सिनेमा लोकांनी त्यातील थक्क करून टाकणाऱ्या दृश्यांसाठी पाहिला.
  टेबेरॉक या अमेरिकन माणसाला गुरु या सिनेमात धीरूभाई आणि भारत दिसला नाही तर आयन रॅंडच्या फाऊंटनहेड कादंबरीतल्या हॉवर्ड रोर्क या पात्राची आठवण झाली.  फाऊंटनहेड सिनेमात रोर्कवर भ्रष्टाचाराचा खटला चाललेला असतो. रोर्क त्याला उत्तर देत असतो. सभोवतालचा समाज भ्रष्ट असेल तर कोणीही उद्योगपती सचोटीनं कसं काम करू शकतो असा सवाल रोर्क न्यायाधिशाला विचारतो. गुरु सिनेमात गुरूकांतवरचा खटला पाहून   टेबरॉकना रोर्कची आठवण झाली.  भारतीय प्रेक्षकाला आयन रँड किंवा रोर्क माहित असायचं कारण नाही. मणीरत्नमला रँड-रोर्क-फाऊंटनहेड दिसले नाहीत. त्याला दिसले व्यापार उद्योगाचे नियम चौकटी तोडणारे अंबाणी आणि स्वातंत्र्यासाठी कायदे मोडणारे गांधीजी. 
टेबरोक आणि भारतीय प्रेक्षक अशा दोघांनाही वेगवेगळ्या कारणांसाठी कां होईना गुरु चित्रपट पहावासा वाटला. त्यातच चित्रपटाचं यश दडलेलं आहे.

।।