Browsed by
Month: August 2016

तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.

तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.

तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर. 
१५ जुलैचा सूर्य मावळल्यानंतर साडेसात वाजता इस्तंबूलच्या रस्त्यावर रणगाडे फिरू लागले, त्यांनी काही रस्ते अडवले. सात वाजून पन्नास मिनिटांनी हवाई दलाची लढाऊ विमानं आकाशात फिरू लागली.आठ वाजता पंतप्रधान यिलडिरीम यांनी जाहीर केलं की लष्करातली काही माणसं अनधिकृत कारवाई करत असून जनतेनं शांत रहावं. नऊ वाजता काही लष्करी अधिकाऱ्यांनी सेना  प्रमुखाना ताब्यात घेतलं आणि अंकारामधे टीव्ही स्टेशनवर ताबा मिळवला. सव्वा नऊ वाजता टीव्हीवरच्या बातम्यांत निवेदकानं जाहीर केलं की लष्करानं मानवी अधिकार आणि लोकशाही स्थापनेसाठी सरकार बरखास्त करून देशाचा कारभार हाती घेतला आहे.साडेनऊ वाजता
 अध्यक्ष एर्डोगननी ट्विटरवरून जाहीर केलं की काही लष्करी लोकांनी उठाव केला असला तरी सरकार शाबूत असून लोकांनी शांत रहावं, रस्त्यावर यावं आणि लष्कराला विरोध करावा.
 जनता रस्त्यावर उतरली. हवाई दल आणि पोलिस एकत्र झाले आणि त्यांनी मिळून  लष्कराला विरोध केला. लष्करी हेलिकॉप्टर पाडली  , काही रणगाडे नष्ट केले. रात्रीच्या बारा वाजता घाईघाईनं अध्यक्ष एर्डोगन देशात परतले. त्यांच्या स्वागताला हजारो नागरीक इस्तंबूल विमानतळावर होते. पोलिस-हवाई दलांची कारवाई सुरु राहिली. दोन वाजता कारवाई संपली. दोनेकशे माणसं मेली. अध्यक्ष एर्डोगन आपल्या कार्यालयात सुखरूप पोचले. त्यांनी जाहीर केलं की बंड थंड झालं असून त्यांचं सरकार सुरक्षित आहे आणि बंडखोरांवर सूड उगवला जाणार आहे.
पहाट उजाडेपर्यंत पोलिस आणि इंटेलिजन्सच्या माणसांनी धाडी घालायला सुरवात  केली. बंडाला पाठिंबा देणारे लष्करी अधिकारी, सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश यांना अटका झाल्या. 
आजवर तुर्की सरकारनं ८० हजार माणसांवर कारवाई झाली असून ६ हजारांना  नोकरीतून काढून टाकलं आहे. त्यात चार हजार लष्करी अधिकारी आहेत आणि पाचेक हजार न्यायाधीश आहेत. यांच्यापैकी काही जणांना फाशी होण्याची शक्यता आहे.
बंड संपलं.
सत्तेसाठी झालेला उठाव केवळ तीनच तासात विरघळण्याचं दुसरं उदाहरण जगाच्या इतिहासात नाही.
अमेरिकेत स्थायिक झालेले इमाम ग्युलेन यांनी उठावाला चिथावणी दिली असा एर्डोगन यांचा आरोप आहे. अमेरिकन सरकारनं त्यांना तुर्की सरकारच्या हाती सोपवावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
निरीक्षक आणि अभ्यासक बुचकळ्यात पडलेत. शे दोनशे रणगाडे, पाच पन्नास हेलिकॉप्टर्स, दोन पाच हजार सैनिक आणि पाच दहा जनरल इतक्या लोकांनी उठाव करणं ही काही साधी गोष्ट नाही. असा उठाव केवळ तीन तासात थंड होणं हे खरं नाही. हे एक नाटक होतं, एक डाव होता असं निरीक्षकांना वाटतं.
एर्डोगन इस्लामी आहेत. तुर्की लष्कर सेक्युलर आहे. १९२३ मधे केमाल पाशांनी लष्करी क्रांती करून इस्लामी ऑटोमन सत्ता बरखास्त करून सेक्युलर सत्ता स्थापन केली होती. आजवर सेक्युलर परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न लष्कर करत आलं आहे.१९८० नंतर तुर्कस्तानात सेक्युलर परंपरा दूर सारून इस्लामी सत्ता स्थापित करण्याचे प्रयत्न झाले. लष्करानं ते हाणून पाडले. एर्डोगन यांनाही एकदा लष्करानं सहा महिने तुरुंगात घातलं होतं. 
२००३ साली पंतप्रधान झाल्यापासून एर्डोगन  सतत या ना त्या वाटेनं आपण इस्लामी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. केमाल पाशांनी बंद केलेले मदरसे त्यांनी सुरु केले. दारुबंदी आणली. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घ्यायला बंदी घातली. रमझानच्या काळात दारू तर बंदच पण कॅफे, बार इत्यादी ठिकाणी दिवसा जेवणाखाणाला बंदी घातली.  आपण तुर्कस्तानला कमाल पाशाच्या सेक्युलर-इस्लामेतर प्रभावातून मुक्त करून तुर्कस्तान इस्लामी करत आहोत आणि लष्कर आपल्याला ते करू देत नाहीये असं भासवण्याचा एक प्रयत्न एर्डोगन यांनी या निमित्तानं केला आहे.   
मुद्दा असा की तुर्की समाज इस्लामी आहेच, तो अधिक इस्लामी करणं म्हणजे काय? 
 १९६० सालापासूनची अधिकृत माहिती सांगते की तुर्कस्तानात ८३ टक्के पुरुष आणि ९७ टक्के स्त्रिया कधीच दारू पीत नव्हत्या. १६ ते २४ या वयोगटातल्या ८३ टक्के तरूण-तरुणींनी दारुला कधीच स्पर्श केलेला नाही. केमाल पाशांनी तुर्की समाजाला पश्चिमी बनवलं असं म्हटलं जातं, त्या समाजात वर्षाला सरासरी जेमतेम १.५ लीटर दारू प्याली जाते. पश्चिमी युरोपीय वर्षाला १५ लीटर दारू पितात. तुर्कीत  शंभरातली जेमतेम १७ माणसं दारु पितात. अशा समाजात दारुबंदीचा ढोल वाजवून इस्लामीपण ठसवायचं  याला काय म्हणायचं?
तुर्की समाज अर्धा युरोपीय आहे आणि अर्धा अरब. इस्तंबूल शहराची विभागणीही युरोपीय इस्तंबूल आणि आशियाई इस्तंबूल अशी होते. ऑटोमन साम्राज्य होतं त्या काळातही युरोपीय वागण्याची पद्दत काही प्रमाणात तुर्कस्तानात होतीच. सौदी-अरब लोक तर नेहमीच म्हणत असतात की तुर्की मुसलमान हा फिक्कट मुसलमान आहे, गडद मुसलमान नाही. खुद्द एर्डोगान एकदा मक्केत गेले असताना तिथल्या मुफ्तींनी त्यांना तुम्ही कमी प्रतीचे मुसलमान आहात असं हिणवलं होतं. तुम्हाला प्रार्थनाही नीट करता येत नाही असं सुनावलं होतं. 
केमाल पाशांनी दोन गोष्टी केल्या. एक, कायदा आणि शिक्षण या दोन व्यवस्था आधुनिक केल्या, शरीयापासून तोडल्या. केमाल पाशांनी मदरसे बंद केले म्हणजे इस्लामी शिक्षण बंद केलं. केमाल पाशांनी फ्रेंच कोडप्रमाणं कायदे अमलात आणले म्हणजे शरीया दूर ठेवला. मुल्ला मंडळींना त्यानं वठणीवर आणून सरकारी धोरणानुसार वागायला लावलं, शरीयानुसार वागायची परवानगी दिली नाही.
 तुर्कस्तानी समाज निधर्मी किवा नास्तिक झाला नाही, इस्लामीच राहिला. मशिदी शिल्लक होत्या, प्रार्थना होत होत्या, रमझानचे उपास होत होते. धर्म व्यक्तीगत पातळीवर ठेवला, माणसाला इस्लामचं आचरण करण्याची सोय ठेवली, सार्वजनिक जीवनात इस्लाम दूर केला. आजही त्याला सरकारची, कोणाचीच आडकाठी नाही. राज्यव्यवहार शरीयावर आधारित नाही येवढंच.  केमाल पाशांनी घडवलेले बदल तुर्की समाजानं मान्य केले.  
 केमाल पाशानं फेझ टोपीवर बंदी घालून युरोपीय हॅट वापरायला सांगितलं, बुरखा बंद केला. हा बदल प्रतिकात्मक होता. त्याचा खरं म्हणजे इस्लामशी संबंध नव्हता. इस्लाममधे कुठंही अमूक प्रकारची टोपी घाला असं म्हटलेलं नाही आणि बुरखाही इस्लामच्या मूळ तत्वात नाही. बुरखा ही इस्लामी माणसाची एक सांस्कृतीक परंपरा आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही. जगभरात करोडो स्त्रिया बुरखा न घालता वावरतात.  
थोडक्यात असं की तुर्की समाज केमाल पाशांच्या काळातही कर्मकांडाच्या हिशोबात  पुरेसा इस्लामी होता आणि आजही आहे. दारू न पिणाऱ्या इस्लामी समाजावर दारुबंदी घालून फरक पडत नाही.
 मग एर्डोगन हे इस्लामचं नाटक कां करतात?
एर्डोगन राजकारण करत आहेत. त्यांना निरंकुष सत्ता हवी आहे. २००० साली ते पंतप्रधान झाले. या पदाला तेव्हांच्या तुर्की राज्यपद्धतीत संसदेशी जुळवून घ्यावं लागत होतं. एर्डोगननी राज्यघटनेत बदल करून अध्यक्षीय पद्धत सुरु केली, स्वतः अध्यक्ष झाले. मिळालेली सत्ता त्यांना अजूनही अपुरी वाटतेय. त्यांनी राज्यघटनेत आणखी बदल सुचवलेत. लष्कर, परदेश धोरण अध्यक्षानंच ठरवावं, संसद आणि मंत्रीमंडळ केव्हांही बरखास्त करण्याचा अधिकार अध्यक्षाला मिळाला पाहिजे, देशद्रोही-दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर स्वतंत्रपणे विनाअडथळा कारवाई करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी केली पाहिजे अशा मागण्या ते आता करत आहेत.  
अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे, अध्यक्षाला निर्णायक अधिकार आहेत. परंतू त्या अधिकारांवरही अमेरिकन संसद आणि न्यायव्यवस्थेचा अंकुश आहे. एर्डोगन यांना निरंकुष अध्यक्ष व्हायचं आहे.
तुर्की समाजात एक जागरूक वर्ग आहे. तो प्रशासनात आहे, न्यायव्यवस्थेत आहे, बुद्धीवंतांत आहे, शिक्षक वर्गात आहे, पत्रकारांत आहे. त्यांना लोकशाही हवी आहे, निरंकुष हुकूमशहा नको आहे. हा वर्ग एर्डोगनना विरोध करतो. एर्डोगन यांच्या जाचक विरोधाला कंटाळून अमेरिकेत स्थायिक झालेले  इमाम ग्युलेन धार्मिक आहेत, त्यांना बहुपक्षीय लोकशाही आणि आधुनिकता हवी आहे. म्हणूनच एर्डोगन यांना ते सलत आहेत. अशा सर्वांची गठडी वळून निरंकुष सुलतान होण्याची एर्डोगन यांची इच्छा आहे. पत्रकार मंडळी तुरुंगात आहेतच, आता आणखी वीस पंचवीस हजार मंडळी तुरुंगात रवाना होत आहेत. हे सारं भविष्यात सुरळीत करता यावं असा त्यांचा प्रयत्न आहे.
तुर्कस्तानची परिस्थिती बिकट आहे. दहशतवाद आणि कुर्डांचं स्वातंत्र्य आंदोलन या दोन गोष्टी तुर्कस्तानची वाट लावायला निघाल्या आहेत. युरोपियन युनियन तुर्कस्तानला प्रवेश द्यायला तयार नाही. आर्थिक विकास आणि रोजगार या दोन आघाड्यांवर तुर्कस्तान घसरू लागलं आहे. दहशतवादी आयएसबद्दल त्यांचं धोरण स्पष्ट नाही. आयएस ही सुन्नी संघटना आहे आणि तुर्कस्तान सुन्नी आहे, त्यामुळं एर्डोगन यांना आयएसबद्दल सहानुभूती आहे असं निरीक्षकांचं म्हणणं आहे.
तुर्कस्तानात कुर्डांचं प्रमाण वीस टक्के आहे. त्यांच्याशी सामोपचारानं बोलून प्रश्न सोडवायला एर्डोगन तयार नाहीत.आयएसशी हात मिळवणी करून ते कुर्डांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं एकीकडं अमेरिका-युरोपीय देश वैतागले आहेत आणि दुसरीकडं कुर्ड मंडळीही संतापली आहेत.
 तुर्कस्तानातली आर्थिक आणि सामाजिक स्थिती बिघडलीय. ती दुरुस्त करण्याचं विधायक  मानस आणि कसब एर्डोगन यांच्याकडं नाही. धर्माचं बुजगावणं वापरून विरोधकांना पळवून लावायचं आणि कसंही करून सत्ता टिकवायची असा एर्डोगन यांचा प्रयत्न आहे.
जे जगात तेच तुर्कस्तानात.

Pnopf प्रकाशनाच्या ब्लांश नॉफ

Pnopf प्रकाशनाच्या ब्लांश नॉफ

नॉफ प्रकाशनाला शंभर वर्षं झाली.
।।
The Lady with Borzoi: Blanchet Knopf, Literary Tastemaker Extraordinaire. Laura Claridge.
 ।।
नॉफ (Knopf) प्रकाशनाला शंभर वर्षं पूर्ण झाली. १९१५ साली ब्लांश आणि आल्फ्रेड नॉफ यांनी हे प्रकाशन न्यू यॉर्कमधे सुरु केलं. अलिकडंच डबलडे आणि नॉफ दोन्ही प्रकाशनं एकमेकात विलीन झाल्यानंतर आज नॉफ डबलडे अशा संयुक्त नावानं हे प्रकाशन चालतं. या प्रकाशनाच्या इतर फांद्याही आहेत. बर्टेल्समान या प्रकाशनाची नॉफची भागीदारी आहे. बर्टेलन्समन,  रँडम हाऊस आणि पेंग्विन आता एकत्र झाले आहेत. म्हणजे नॉफ, डबलडे, बर्टेल्समन,रँडमहाऊस आणि पेंग्विन अशी टोळी झालीय.
अमेरिकेत इतर समव्यवसायी संस्था विकत घेण्याची, विलीन करण्याची प्रथा आहे. प्रत्येक संस्थेचं एकादं वैशिष्ट्यं असतं. एकाद्या संस्थेचं संपादक मंडळ उत्तम असतं. दुसऱ्या संस्थेची वितरण व्यवस्था चांगली असते. तिसऱ्या संस्थेकडं पैशाचं पाठबळ असतं. अशा स्वतंत्र वैशिष्ट्यांच्या  संस्था एकत्र आल्या की प्रकाशन अधिक प्रबळ, अधिक दर्जेदार होतं आणि त्याचा पसारा वाढत जातो. माणसं-संस्थांचे अहम अमेरिकेत बाजूला रहातात, व्यवसायाचं हित लक्षात घेतलं जातं. अनेक वेळा.
नॉफ प्रकाशनाचं वैशिष्ट्यं म्हणजे जगातल्या सर्वाधिक नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकांची पुस्तकं नॉफनं प्रकाशित केली आहेत. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या विभागातले साहित्यिक जाणीवपूर्वक निवडून त्यांचं साहित्य प्रकाशित करणारं बहुदा हे जगातलं एक प्रतिष्ठित प्रकाशन आहे.
१९१५ साली प्रकाशन सुरु झाल्यानंतर लगोलग १९१६ साली नोबेल पारितोषिक विजेता स्विडीश कवी व कादंबरीकार व्हर्नर व्हॉन हीडेनस्टॅमची कादंबरी आणि कविता संग्रह नॉफनं प्रसिद्ध केला. त्यानंतर थॉमस मॅन, आल्बेर कामू, सार्त्र, मिखाईल शोलोखोव, यासुनारी कावाबाटा, मार्क्वेझ, गॉर्डिमर, गुंतर ग्रास, नायपॉल, पामुक आणि इतर अशा जवळजवळ १२० साहित्यिकांची पुस्तकं नॉफनं प्रकाशित केली. हे साहित्यिक अमेरिकेतील पुलित्झर, राष्ट्रीय पारितोषिक आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
ब्लांश वुल्फ या महिलेनं हे प्रकाशन सुरु केलं. ही महिला पुस्तकवेडी होती. १९११-१२ सालात प्रकाशनाचा किडा ब्लांशच्या डोक्यात वळवळला. त्या काळी अमेरिकेत फॅशनेबल, ऊच्चभ्रू, उथळ, गौरवर्णिय, अँग्लोसॅक्सन   लोकांनी चालवलेल्या कमी दर्जाच्या प्रकाशनांचा बोलबाला, सुळसुळाट होता. पुस्तकं विकत घेणं आणि वाचणंही ऊच्चभ्रू श्रीमंत वर्गापुरतं मर्यादित होतं. प्रकाशन व्यवसायावरची फॅशनेबल लोकांची पकड संपवावी आणि दर्जेदार-अभिजात साहित्य प्रकाशित करावं असं ब्लांशना वाटलं. पण पैसेवाल्यांशी स्पर्धा कशी करायची? आल्फ्रेड नॉफ यांच्याशी ब्लांशची ओळख झाली. आल्फ्रेड सधन होता. ऊच्चभ्रू वर्गात वावरणारा होता. त्याला पुस्तकांची आवड होती. मुख्य म्हणजे त्याच्याकडं पैसा होता. 
ब्लांशनं आल्फ्रेडशी लग्न केलं. आल्फ्रेडनं पित्याकडून पाच हजार डॉलरचं कर्ज घेतलं आणि नॉफ प्रकाशन सुरु केलं. छापील पुस्तकाला मरण नाही अशी आल्फ्रेडची धारणा होती. १९४० नंतर टीव्हीचा जमाना सुरु झाल्यानंतर आल्फ्रेड म्हणाला होता “टीव्ही असो की रेडियो की आणखी काही, पुस्तकांना कधीही मरण येणार नाही.”
ब्लांश स्वतः लेखकांचा मागोवा घेत, प्रवास करून लेखकांपर्यंत पोचत. लेखकाला आगाऊ रक्कम देऊन करारबद्ध करत. 
न्यू यॉर्कमधे हार्लेममधे समांतर संस्कृती उभी रहात होती. काळ्यांची, झांगड लोकांची. स्वस्त दारू विकणाऱ्या, धुरानं भरलेल्या, आवाजानं गच्च झालेल्या, गरीब माणसांच्या वासानं व्यापलेल्या बारमधे जाझ संगित लोकप्रिय झालं होतं.   ऊच्चभ्रू गोऱ्या लोकांना ते माहित नसल्यानं माध्यमानं आणि समाजानं या संगिताची किंवा संस्कृतीची दखल घेतली नव्हती. ब्लांश एका फोटोग्राफर मित्राला बरोबर घेऊन या बारमधे जात. तिथल्या लोकांना भेटत. त्यातूनच समांतर साहित्याचं प्रकाशन नॉफमधे सुरु झालं.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत न्युरेंबर्ग खटला झाला. या खटल्यात नाझींनी केलेल्या अत्याचारांची चौकशी झाली, आईकमन या  क्रूरकर्मीला   फाशी झाली. खटला ऐकायला ब्लांश जर्मनीत गेल्या. दीर्घकाळ तिथं थांबल्या. तिथल्या लेखक पत्रकारांमधे मिसळल्या. नाझी अत्याचाराचं कथन करणारी पुस्तकं ब्लांशनी प्रसिद्ध केली. त्यांचा नवरा आल्फ्रेड ती पुस्तकं प्रसिद्ध करायला तयार नव्हता. ऊच्चभ्रू समाजात वावरणाऱ्या आल्फ्रेडला अत्याचाराच्या कहाण्या ऐकवत नसत. आल्फ्रेडचा विरोध पत्करून ब्लांशनी नाझी अत्याचार अमेरिकन आणि जागतीक समाजासमोर आणले.
ब्लांश दक्षिण अमेरिकेत गेल्या. तिथल्या लेखकांना भेटल्या.  उत्तर अमेरिकेतल्या लोकांना दक्षिण अमेरिका म्हणजे गुलाम वाटत असे. तिथं संस्कृती आहे असं अमेरिकन लोकांना वाटत नसे. ब्लांशनं प्रथमच दक्षिण अमेरिकेतील लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली.
ब्लांश स्वतः कॉपी वाचत, संपादन करत, लेखकांना सूचना करत. वयोवृद्ध झाल्यानंतर ब्लांशना दिसत नसे. भलं मोठं भिंग घेऊन त्या कॉपी वाचत. शेवटल्या शेवटल्या दिवसात त्यांना चालताही येत नसे. सहकाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून त्या कशाबशा कचेरीत जात, दिवसभर कचेरीत बसून संपादन, लेखक संपर्क  पत्रव्यवहार पहात असत.
सर्वच्या सर्व पुस्तकांचं संपादन करणं एका माणसाला अशक्य असतं. शिवाय पुस्तकांचे विषयही विविध असतात.   त्या त्या विषयातला जाणकार संपादक प्रकाशनात असावा लागतो. नॉफनं हॅरॉल्ड स्ट्रॉस यांच्यावर  जपानी साहित्य प्रकाशन सोपवलं. संगितकारांची चरित्र, पाककलेवरची पुस्तकं, कादंबऱ्या, कविता असे विभाग करून  हरबर्ट विनस्टॉक,  ज्युडिथ जोन्स, अॅन मॅकॉर्मिक  यांच्या सोबत आणखी वीसेक संपादकांकडं विभाग सोपवण्यात आले. प्रमुख संपादकांमधे सॉनी मेहता असंही एक नाव आहे.
लेखक हुडकण्यासाठी स्वतंत्र माणसं नेमली. 
ब्लांश यांच्या चरित्र पुस्तकात ब्लांश यांचं आयुष्य चितारलेलं आहे.   ब्लांश यांचं आयुष्य खडतर होतं. प्रकाशन पार पाडत असताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात फार चढउतार झाले. आल्फ्रेड यांच्याशी ब्लांशनं लग्न केलं ते पुस्तकवेड या समाईक गुणासाठी. परंतू या पलिकडं आल्फ्रेड यांच्याशी त्यांचं जुळलं नाही. आल्फ्रेड व्यसनी होते, स्त्रैण होते. ब्लांशची आपलेपणाची, प्रेमाची, शारीरीक सहवासाची भूक आल्फ्रेड भागवू शकले नाहीत. त्यामुळं ब्लांश यांनी मित्र जमवले, त्यातून बरीच स्कँडल्सही झाली. हे सारं त्यांच्या चरित्रात आहे. परंतू ब्लांश एक संपादक म्हणून कशा होत्या याचं विवेचन पुस्तकात जवळपास नाही. उदा. सिमॉन द बुवा यांच्या फ्रेंच पुस्तकाचं सेकंड सेक्स हे इंग्रजी भाषांतर होत असताना ब्लांश यांनी व्यक्तिशः बारकाईनं लक्ष दिलं होतं. हे कसं घडलं? फ्रेंच आणि इंग्रजी भाषा यांची ब्लांश यांची समज कोणत्या प्रकारची होती? लेखनाचा अनुभव ब्लांशना कितपत होता? कोणत्या ओळी वा शब्दांचं भाषांतर होत असताना ब्लांशना काय कष्ट पडले इत्यादी तपशील कळते तर बरं झालं असतं.
ब्लांश यांचे निर्णय इंटलेक्चुअल अंगानं होत नसत, ते अंतःप्रेरणेनं, इंट्युईशननं होत असत असं  लेखिकेनं नोंदलं आहे. हे गोलमटोल विधान झालं. नेमके लेखक आणि पुस्तकांच्या निवडीबाबतचे तपशील देऊन लेखिकेनं हा मुद्दा स्पष्ट केला असता तर ब्लांश अधिक समजल्या असत्या.
 लेखक, लेखकांशी दुवा साधून देणारे मध्यस्थ, लेखकाबरोबर झालेला संवाद, पत्रव्यवहार, संपादनाची पद्धत इत्यादी गोष्टी कळत्या तर बरं झालं असतं. प्रत्येक संपादकाची एक स्वतंत्र पद्धत असते. न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सच्या बार्बरा एपस्टिन लेखकाची प्रत तपासून त्यावर खुणा करत. ज्या विधानाबद्दल वा माहितीबद्दल शंका असत त्यावर प्रश्नचिन्ह टाकून त्यावरचा खुलासा मागवत. पुस्तकाच्या विषयाशी संबंधित इतर पुस्तकं आणि लेखकांचे संदर्भ  त्या लेखकाला सुचवत असत. प्रसंगी पुस्तकंही पाठवून देत. काही संपादक लेखकांशी प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर प्रदीर्घ चर्चा करतात. काही ठिकाणी लेखक विषय सुचवतो तर काही ठिकाणी संपादक विषय सुचवतात. ब्लांश यांची संपादनाची, प्रकाशनाची शैली, विषयांची व लेखकांची निवड इत्यादी तपशील या पुस्तकात नसल्यानं पुस्तकातली मुख्य व्यक्तीच नीट समजत नाही. ब्लांश यांचे मित्र आणि त्या मित्रांबरोबरचे व्यवहार यांची वर्णनं पुस्तकात आहेत. ती प्रमाणाबाहेर आहेत आणि उगाचच उत्तेजक केलेली आहेत. ब्लांश यांच्या व्यक्तिगत जीवनाला अनेक कंगोरे होते. ते चरित्रात आले हे चांगलं झालं. पण ब्लांश या संपादिका, प्रकाशक असल्यानं तो भाग जास्त असणं योग्य होतं, त्या भागावर भर असायला हवा होता. 

।।
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आयएसचा प्रवेश

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आयएसचा प्रवेश

कार्लोट्टा गॉल या पत्रकार २००० ते २०१२ या काळात अफगाणिस्तान पाकिस्तानात मुक्काम करून होत्या. त्यांनी दी राँग एनेमी नावाचं पुस्तक लिहिलंय. अमेरिकेचा खरा शत्रू तालिबान नसून पाकिस्तान आहे हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. तालिबान फोफावलं याला पाकिस्तानच कारणीभूत आहे असं त्या आपल्या पुस्तकात सविस्तर उदाहरणं देऊन मांडतात. 
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात आता आयएस डोकं वर काढत आहे यालाही पाकिस्तानलाच जबाबदार धरायचं काय?
।।
क्वेट्ट्यात सिविल हॉस्पिटलमधे बलुचिस्तान बार संघटनेचे अध्यक्ष बिलाल अन्वर कासी सकाळी तिथं भरती झाले होते.त्यांना दोन मोटारबाईकवर स्वार जिहादींनी गोळ्या घातल्या होत्या. हॉस्पिटलमधे यायच्या आधीच ते वारले असावेत. ही बातमी पसरल्यावर क्वेट्ट्यातले शेकडो वकील सिविल हॉस्पिटलमधे पोचले होते. दोन जिहादी तिथं पोचले. त्यांच्या अंगावर आठ किलो स्फोटकं होती. ती फोडून त्यांनी आसपासच्या ७२ वकिलांना ठार मारलं आणि इतर १२० लोकांना जखमी केलं.
अमाक या इस्लामिक स्टेटच्या  (आयएस) न्यूज एजन्सीनं, कैरोमधून पत्रक काढून स्फोटाची जबाबदारी घेतली. पत्रकात एजन्सीनं म्हटलं ” जोवर पाकिस्तानात शरीया लागू होत नाही तोवर अशा घटना होत रहातील.”
क्वेट्ट्यात एका वकीलाला मारण्यात आलं होतं. तहरीके तालिबानच्या एका फुटव्यानं-जमातुल अहरार- खून केला होता. त्या खुनाचा निषेध कासी यांनी केला. त्याना मारलं. त्यांना श्रद्धांजली वहायला गेलेल्या ७२ वकिलांना मारलं. वकील लोक काही अंशी आधुनिक असलेल्या पाकिस्तानी कायद्यानुसार काम करतात. ते तहरीके तालिबान आणि आयएसला मान्य नाही. त्यांना पाकिस्तानात शरीयावर आधारित व्यवस्था हवी आहे.
ही ऑगस्ट २०१६ ची घटना. त्या आधी काही दिवस काबूलमधे हझारा जमातीच्या लोकांनी काढलेल्या मिरवणुकीवर आत्मघातकी हल्ला झाला, त्यात ८० पेक्षा जास्त माणसं मारली गेली. या हल्ल्याची जबाबदारी आयएसनं घेतली. खोरासान गट या नावानं आयएसचा एक गट अफगाणिस्तानात काम करतो. त्यांचं दाबिक या नावाचं एक मुखपत्र आहे. त्या मुखपत्रानं जाहीर केलं की अफगाणिस्तानातलं सरकार इस्लामी नाही, ते अमेरिका या काफिर सरकारच्या मदतीवर चालतं, आयएसला ते सरकार उलथवून लावून अफगाणिस्तानात शरीयाचं राज्य स्थापन करायचं आहे.  
हजारा जमातीची हज्जारो माणसं आर्थिक मागणी घेऊन काबूलमधे जमा झाली होती.त्यांना तुर्कस्तानातून अफगाणिस्तानात जाणारी तेलाची पाईप लाईन त्यांच्या भागातून जायला हवी होती जेणेकरून त्या तेलामुळं त्यांच्या मागास विभागाचा विकास होईल. हजारा जमात शिया असल्यानं आयएसच्या मते ती इस्लामी  माणसं नाहीत, त्यामुळं त्यांना जगण्याचा अधिकार नाही. 
अगदी काल परवापर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अमेरिका म्हणत होते की त्या विभागात आयएसचं अस्तित्व नाही. वरील दोन घटना दर्शवतात की आयएसचा केवळ प्रसार आहे असं नव्हे तर तो अधिक प्रभावी होत चालला आहे. 
आयएसला पाकिस्तानात वाव नव्हता कारण जिहादी-शरीयावादी इस्लामी लोकांसाठी पाकिस्तानात अऩेक संघटना सक्रीय आहेत. तहरीके तालिबान या छत्रीखाली त्या संघटना पाकिस्तानात स्फोट घडवत असतात. या इस्लामी संघटनांना पाकिस्तानात शरीया लागू करायचा आहे. पाकिस्तान सरकार शरीया लागू करत नाही म्हणून ते सरकारही उलथवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिया आणि अहमदी हे इस्लामबाह्य पंथ नष्ट करण्याचा प्रयत्न या संघटना सतत करत असतात. त्यामुळं आयएसची जरुरच नाही असं पाकिस्तानातले जिहादी म्हणत असत. 
अफगाणिस्तानात थोडी वेगळी  स्थिती आहे. तिथं तालिबान प्रभावी आहे. अफगाण समाज जमातींवर आधारलेला आहे, अफगाण संस्कृतीवर आधारलेला आहे. इस्लाम किंवा शरीया हा त्या समाजाचा पाया नाही. पश्तुन या सर्वात मोठ्या जमातीच्या आधारे तालिबान उभी आहे. अफगाण संस्कृतीपलिकडची संस्कृती, धर्म,  अफगाण माणसं स्वीकारत नसल्यानं आयएसची  शरीयाआधारित, जागतीक पातळीवर इस्लामचा विचार करणारी, संघटना अफगाण समाज स्वीकारणार नाही असं अफगाण माणसं म्हणत असत. मुल्ला उमर या तालिबान प्रमुखाचा मृत्यू झाला, त्यानंतर नेमला गेलेला प्रमुख मुल्ला अख्तर मंसूरही वारला आणि आता त्याच्या जागी मुल्ला हिबतुल्ला अखुंडझा याची नेमणूक झाली. त्याच्या नेतृत्वाखाली तालिबान अफगाणी आणि अमेरिकी सैन्यावर हल्ले करत असते. त्यामुळंही आयएसला अफगाणिस्तानात  वाव नाही असं निरीक्षक म्हणत असत.
दोन्ही देशातल्या स्थानिक जिहादींना दूर सारून आयएस पसरते आहे. ही जिहादी संघटनांच्या निर्मितीची आणि विकासाची दिशा आहे. अरब जगामधे वहाबी-सलाफी विचारांचा एक गट होता. त्यांच्या मते महंमदांची कबर बांधणं, कबरीची  पूजा करणं म्हणजे मूर्तीपूजाच होती. वहाबी गटातनच  पुढं अल कायदाचा फुटवा निघाला. अल कायदानं महंमदांच्या काळातला इस्लाम जसाच्या निर्माण करायचं ठरवलं. त्या प्रयत्नात अल कायदा अफगाणिस्तानात गेली. तालिबान ही संघटना अफगाण देशाचाच विचार करते म्हणजे खरी इस्लामी संघटना नाही असं अल कायदाचं, बिन लादेनचं मत होतं. अफगाणिस्ताननंतर अल कायदा इराक आणि सीरियात पसरली. अल कायदा पुरेशी इस्लामी नाही असं म्हणत अल नुस्र हा अधिक हिंसक पण इराक-सीरियापुरता मर्यादित फुटवा निघाला. अल नुस्र कमी हिंसक आहे आणि फार मर्यादित आहे,  सर्व अरब विभागात इस्लाम आणायचा म्हणत अल बगदादीनं आएस काढलं. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या जिहादीना त्यांच्या स्थानिक संघटना अपुऱ्या आणि कमी प्रभावी वाटायला लागल्यावर ती माणसं आयएसकडं वळत आहेत.
एक निरीक्षण असं की तालिबान असो की अल कायदा की आता आयएस, सर्व संघटनांना पाकिस्तानी लष्कराच्या आयएसआयनं खतपाणी घातलं, वाढवलं. पाकिस्तानच्या लष्कराचं उद्दिष्टं पाकिस्तानच्या सीमांचं रक्षण करणं येवढ्यापुरतंच मर्यादित नाही. इस्लामचा प्रसार, इस्लाम वाचवणं हे पाकिस्तानच्या लष्कराचं एक उद्दिष्ट आहे. पाकिस्तानमधल्या प्रभावी इस्लामी विचाराची मुळं मौदुदी यांच्या विचारांत आहेत. कुराण आणि इस्लाम या दोन गोष्टी सर्वसमावेशक, कुठल्याही काळात उपयुक्त असल्यानं विज्ञान,तंत्रज्ञान, लोकशाही, इत्यादी कशाकशाचीही आवश्यकता नाही असं मौदुदी म्हणत. झिया उल हक यांनी मौदुदींचा विचार लष्करात गुंफला. लष्करातल्या बढत्या सैनिकाच्या इस्लामी ज्ञान आणि बांधिलकीशी संबंधित केल्या गेल्या. अभिनंदन आणि बक्षीस दोन्हीसाठी झिया मौदुदींची पुस्तकं देत असत. 
पाकिस्तान लष्करानंच अफगाणिस्तानात तालिबान आणि अल कायदा निर्माण केल्या आणि वाढवल्या. अमेरिकेला ही सत्य उमगलं नाही. उमगलं असलं तरी राजकारणाच्या सोयीसाठी अमेरिकेनं पाकिस्तानी सैन्याच्या उद्योगांकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळंच तालिबानवर कितीही हल्ले केले तरी तालिबान शिल्लक राहिलं कारण पाकिस्तान त्यांना रसद, शस्त्रं, माणसं पुरवत होतं. आजही तीच परिस्थिती शिल्लक आहे.
अमेरिकेनं तालिबानला शत्रू मानलं हीच पाकिस्तानची मोठी चूक झाली, अमेरिकेचा खरा शत्रू पाकिस्तान होता. चुकीच्या शत्रूच्या मागं लागून अमरिकेनं पाकिस्तानला वाढवलं आणि पाकिस्ताननं तालिबानला वाढवलं. तालिबान टिकण्यात पाकिस्तानचा हितसंबंध होता हे अमेरिकेनं लक्षात घेतलं नाही. अमेरिकेनं सारी ताकद तालिबानवर खर्च केली आणि अपयश पदरी घेतलं असं कार्लोट्टा गॉल यांचं म्हणणं आहे. तसं त्यांनी आपल्या दी राँग एनिमी या पुस्तकात स्पष्टपणे मांडलं आहे.
गॉल यांनी त्यांच्या पुस्तकात पाकिस्ताननं तालिबानला कसकसं वाढवलं याची किती तरी उदाहरणं दिली आहेत. अमेरिकेला मामा बनवून पाकिस्ताननं (झियांपासून, मुशर्रफ)  पैसे, शस्त्रं, विमानं, गनीम, मुजाहिद इत्यादी गोष्टी  तालिबानला दिल्या. येवढंच नव्हे तर युनिफॉर्ममधले आणि युनिफॉर्म न घातलेले हजारो सैनिक पाकिस्ताननं अफगाणिस्तानात पाठवले. सुरवातीला या पाकिस्तानी सैनिकांनी रशियन सैन्यावर आणि नंतर अमेरिकन सैनिक तळावर हल्ले केले. 
गॉल यांनी एक  उदाहरण दिलं आहे. २००१ च्या नोव्हेंबरमधे अमेरिकी सैन्यानं, उत्तरी मोर्चानं  तालिबानला नेस्तनाबूत केलं. तालिबान सैन्य कुंडुझला अडकून पडलं होतं. अमेरिकी-उत्तरी मोर्चाचं सैन्य त्या ठिकाणावर हल्ले करून तालिबान पूर्ण नष्ट तरी करणार होतं किंवा त्यांना युद्धकैदी करून कायमचं पंगू करणार होतं. कुडुंझमधे हज्जारो तालिबान आणि पाकिस्तानी सैनिक अडकले होते. कुंडुझचा विमानतळ आणि तिथली विमानविरोधी यंत्रणा पाकिस्तानी सैन्यानं उभारली होती, चालवली होती. पाकिस्तानचा तालिबानशी असलेला संबंध कुंडुझमधे उघडा पडणार होता.
मुशर्ऱफनी अमेरिकेला अंधारात ठेवून उत्तरी मोर्चाचे जनरल दोस्तुम यांच्याशी संपर्क केला. गपचुप पाकिस्तानी सैनिकांना पळून जायला मदत करा आणि तालिबांना शस्त्रं टाकून पळून जायला मदत करा असं मुशर्ऱफनी सांगितलं. करार झाला. पाकिस्तानची विमानं दररोज अनेक उड्डाणं करून पाकिस्तानी सैनिकांना पाकिस्तानात घेऊन गेली आणि काही हजार तालिबान सैनिक पळून गेले. पुढं चालून याच माणसांनी नंतर अमेरिकन-अफगाण सैन्याला छळलं. 
मुल्ला फझल आणि मुल्ला नुरी  यांना अमेरिकेनं पकडलं आणि ग्वांटानामो बे तुरुंगात टाकलं.  फझल आणि नुरी यांनी ग्वांटानामो तुरुंगात मुशर्ऱफ -तालिबान संबंध सुरवातीपासून कसकसे होते ते सारं सविस्तर सांगितलं. पाकिस्ताननं बलुचिस्तानमधे क्वेट्ट्यात तालिबानला एक वस्तीच उभारून दिली होती. मुल्ला उमर तिथंच मुक्काम करून होता. या भागाला पश्चुनिस्तान म्हणत. कार्लोट्टा गॉल तिथं जाऊन तालिबांच्या मुलाखती घेत असत. गार्डियन, बीबीसी, यांचे प्रतिनिधी तिथं जाऊन तालिबान आणि आयएसआय काय करतात यावर वृत्तांत प्रसिद्ध करत होते. इतकं सारं जाहीर असूनही अमेरिकेनं कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि पाकिस्ताननं तालिबान वाढवलं. 
तालिबान-पाकिस्तान गुंता शिल्लक असतानाच आता आयएसनं अफगाणिस्तान-पाकिस्तानात पाय रोवला आहे. हे सारं फारच भयसूचक आहे.
THE WRONG ENEMY
CARLOTTA GILL

।। 
गोरक्षक आणि शरीयारक्षक

गोरक्षक आणि शरीयारक्षक

गोरक्षक आणि शरीयारक्षक
 गुजरातेत उनामधली घटना. परंपरेनं जनावरांचं कातडं काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या बालू सर्वैय्या आणि त्याच्या कुटुंबातल्या  सहा माणसांना गोरक्षकांनी बडवून काढलं. गोरक्षकांचं म्हणणं होतं की त्या लोकांनी गाय मारली. 
गाय मारली की मेलेल्या गायीचं कातडं सर्वैय्या काढत होते याची चौकशी गोरक्षक मंडळींनी केली नाही. गायी मारायला गुजरातेत बंदी आहे. गाय मारणं हा गुन्हा केल्याची तक्रार आली तर चौकशी करून खटला भरण्याची  जबाबदारी पोलिसांवर असते. गोरक्षक स्वतःच पोलिस झाले.   पोलिसच नव्हे तर न्यायाधीशही झाले. खटला वगैरेच्या भानगडीत न पडता गोरक्षकांच्या न्यायालयानं सर्वैय्यांना बडवून काढण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला पोलिस म्हणवून त्यांनी न्यायालयाचा निर्णय अमलातही आणला.
गुजरातेत खरं म्हणजे पोलिस, न्यायालय या खात्याना रजाच दिली पाहिजे. कारण त्या विभागाची कामं गोरक्षक मंडळी करत आहेत, तेही विना वेतन. गुजरातेत आणि भारतात भाजपचं राज्य आहे. त्यांनी यातून धडा घेऊन देशातली पोलिस आणि न्यायालय व्यवस्था आता बंद करण्याचाही निर्णय घ्यायला हरकत नाही. अर्थात हा धडा गुजरातनं आजच दिलाय असं नाही, २००२ मधे साऱ्या भारताला आणि जगाला हा धडा नरेंद्र मोदींच्या सरकारनं दिला होता. गुजरातेतले हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या वस्त्या जाळत फिरत होते, माणसं मारत होते. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काही ठिकाणी तर पोलिस आणि मंत्र्यांनी हिंसाचारात भागही घेतला होता.   जनतेची सेवा करणाऱ्या विनावेतन सेवकांची मजल इथपर्यंत गेली की त्यांनी न्यायाधिशांच्या घरावरही हल्ला केला होता. न्यायाधीश पोलिसांना विनंती करून वाचवा वाचवा असं म्हणत होते. पोलिस न्यायाधिशांकडे पोचले नाहीत. पोचले ते उशीरा. आरामात. त्यांना इतर कामं होती.
  गायी किंवा म्हशींचं मांस खाणारी खूप माणसं भारतात आहेत. ती सर्व धर्मांत आहेत. हिंदूंना सामान्यपणे गायीचं मांस खायला आवडत नाही कारण गेली काही शतकं गायीचं मांस खाणं निषिद्ध ठरवल्यानं त्यांना काहीसं गुन्हेगार असल्यासारखं, काहीसं पापी असल्यासारखं वाटतं. बरीचशी माणसं गोमांस खात नाहीत कारण कित्येक पिढ्या घरात गोमांस न खाल्यानं त्यांना गोमांसाची सवय नाही. अर्थात हे सारं हिंदूमधल्या काही जातींनाच लागू आहे. काही जाती गोमांस खातात.
गोमांस खाल्लं जात असल्यानं त्याचा अर्थव्यवहाराशीही संबंध आहे, काही लोकांचा तो व्यवसाय आहे.
मांस खाणं किंवा माती किंवा दगड  किंवा काहीही खाणं याचा पाप पुण्याशी संबंध असायचं कारण नाही. हे खा ते खाऊ नका असे दंडक माणसं त्या त्या काळातली अर्थव्यवस्था आणि सत्ताकारण यामधून तयार करतात आणि ते देवाच्या नावावर खपवतात.   काहीही खाणं ही गोष्ट केवळ सवय, परंपरा, रूढी यात मोडते, त्याचा पाप पुण्याशी अजिबातच संबंध नाही. समजा त्यात पाप पुण्य असलं तरीही सर्वाना समान मानणाऱ्या, सर्वाना समान संधी देणाऱ्या कायद्यात त्यावर बंदी असायचं कारण नाही.कारण देव वगैरे गोष्टींचा संबंध कायद्याशी असायचं कारण नाही, तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्ण असतो.
कोणाला गायीचं मांस खायला आवडत नाही, कोणाला मासे खायला आवडत नाहीत, कोणाला डुकराचं मांस खायला आवडत नाही, कोणाला अंडीही चालत नाहीत. कोणाला दररोजच्या जेवणात एक तरी मासा लागतो, माशाचा वास असला तरी चालतो, पण मासा हवाच. कोणाला खेकडे आवडत नाहीत, कोणाला ससे आवडत नाहीत, कोणाला लॉब्स्टर आवडत नाहीत. कित्येक माणसं कोणतीही हालचाल करणारी गोष्ट खायला आनंदानं तयार असतात. त्यात झुरळं आली, सापही आले. कोणतीही हालचाल करणारी वस्तू न खाणारे लोकही आहेत.देशात. जगात. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी इतरांनी खाऊ नयेत असं म्हटलं तर बहुदा सारी मानवजात उपाशीच रहाण्याची शक्यता आहे.
वाट्टेल ते खाणारे, निवडक खाणारे, नुसत्या वनस्पती खाणारे अशा सर्व माणसांना एकेक देव असतो. कुठल्या ना कुठल्या तरी देवानं त्यांना खाण्या न खाण्याला परवानगी दिलेली असते.  ख्रिस्तींचा देव वेगळा, हिंदूंचे देव वेगळे, मुसलमानांचा देव वेगळा. जैनांना देव नाहीत पण देवासमान कोणी तरी असतं. ही सगळी देव किवा देवासमान माणसं पृथ्वीपलिकडं कुठं तरी असतात म्हणे. ती कोणालाच भेटत नाहीत. ती कुठल्याही लोकसभेत जात नाहीत, पोलिस स्टेशनमधे जात नाहीत. देवळातही ती नसतात, त्यांच्या प्रतिमा असतात. ती मंडळी इंटरनेट किंवा सेलफोवरूनही पृथ्वीशी संपर्क ठेवत नाहीत.
अवकाशात ही देव व थोर मंडळी आपसात काय ठरवतात ते कळत नाही. त्यांच्यात एकमत आहे असं वाटत नाही. मराठी देवाला मासे चालत नाहीत, बंगाली देवाला ते चालतात म्हणे. अल्ला, ख्रिस्ती गॉड आणि राम  वगैरेंमधेही मतभेद दिसतात.
  अवकाशातल्या  मंडळींचं म्हणणं  पृथ्वीवरील त्यांचे प्रतिनिधी, हस्तक, नोकर, सहकारी वगैरे  स्वयंघोषित लोक आपल्याला सांगतात.   त्यांचं ऐकण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं. एकेकाळी अवकाशातल्या मंडळींच्या संस्था पृथ्वीवर होत्या. त्या अभ्यासवर्ग वगैरे घेऊन माणसं नेमत. अलीकडं अवकाशातल्या मंडळींनी विकेंद्रित व्यवहार करायला सुरवात केली आहे. त्यांच्या वतीनं कोणीही निर्णय घेऊ शकतो अशी स्थिती आहे.
उनामधे गोरक्षकांनी कर्तव्य पार पाडलं. अमेरिकेत ओर्लँडोमधे आणि बांगला देशातल्या ढाक्यात शरीयारक्षकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. 
अवकाशातल्या मंडळींनी आता सामान्य माणसानं कसं जगायचं तेही सांगून सामान्य माणसालाही स्वतःचं रक्षण करता येईल अशी व्यवस्था करावी.
पण ही प्रार्थना, विनंती कोणासमोर कशी करायची? तेही कळलं तर बरं होईल.

।।।
दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी

दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी

Apocalypse: The Second World War.
सहा भागातली पाच तास वीस मिनिटांची मालिका. दुसऱ्या महायुद्धावरची डॉक्युमेंटरी. सध्या नेट फ्लिक्सवर पुन्हा पाहिली जातेय. पुन्हा अशासाठी म्हणायचं की ही मालिका २००९ साली तयार झाली.  युरोपातल्या बहुतेक सर्व भाषांत तिच्या प्रती निघाल्यात. लोकांना ही डॉक्युमेंटरी आवडतेय. साधारणपणे त्याच वर्षी दुसरं महायुद्ध याच विषयावर  World War II In HD Colour ही  १३ भागात पसरलेली १० तास ३३ मिनिटांची मालिका प्रकाशित झाली होती. 
अपोकलिप्स लोकांना आवडतेय कारण त्या मालिकेत दुसरं महायुद्ध हा  महाविषय सव्वापाच तासात चित्रपटाच्या दर्जानं दाखवला  गेलाय. इंग्रजी भागाचं एक वैशिष्ट्यं असं की मार्टिन शीन या नामांकित नटाच्या आवाजात या डॉक्युमेंटरीचं निवेदन आहे.
अपोकलिप्सबद्दल ऐकण्याआधी महायुद्ध आणि डॉक्युमेंटरी विषयी आधी थोडं ऐकणं बरं.
।।
दुसऱ्या महायुद्धानं एक नवीन जग जन्माला घातलं.  
सहा कोटी माणसं मेली. सुमारे तीस देशातली. किती कोटी जखमी झाले आणि किती कोटी विस्थापित झाले ते ठरवणं कठीण. जपान आणि जर्मनी बेचिराख झाले, पुन्हा उत्तम उभे राहिले. साम्राज्यं कोलमडून अनेक देश स्वतंत्र झाले. युरोपियन युनियन आणि विश्व व्यापार-वित्तव्यवस्था या दोन विचारांना चालना मिळून अनेक नव्या संस्था निर्माण झाल्या. युद्धानंतर कम्युनिझम आणि  भांडवलशाही यांच्यात शीत युद्ध सुरु झालं. चित्रकला, कविता, कादंबरी, सिनेमा या प्रांतात खूप नव्या कलाकृती निर्माण झाल्या. 

दुसऱ्या महायुद्धानं अमेरिका आणि युरोपीय चित्रपट जगाला न संपणाऱ्या कल्पनांचा खजिना  दिला. आजही दुसऱ्या महायुद्धावर सिनेमे निघत असतात. सेविंग प्रायव्हेट रायन हा अनेक ऑस्कर मिळवणारा सिनेमा युद्ध संपल्यानंतर पन्नास वर्षँ उलटून गेल्यानंतरही स्टीवन स्पिलबर्गला करावासा वाटला.
पहिल्या महायुद्धानं डॉक्युमेंटरी या चित्रपट प्रकाराला चालना आणि वेग दिला. चित्रपट निर्मितीतली तंत्रं आणि यंत्रं वेगानं सुधारू लागली त्याच काळात पहिलं महायुद्ध सुरु झाल्यानं डॉक्युमेंटरी ही चित्रपट निर्मात्यांना एक पर्वणी ठरली.
 दुसरं महायुद्ध सुरु झालं त्या सुमाराला नव्या लेन्सेस बाजारात आल्या होत्या, विमानातून चित्रीकरण करणारे कॅमेरे निर्माते वापरू लागले होते. लेन्स आणि कॅमेऱ्याला पावसापासून, पाण्यापासून वाचवण्याची सोय झाली होती. समुद्रात बुडकी मारून चित्रीकरण करण्याचंही तंत्र विकसित झालं होतं. जीपवर कॅमेरा ठेवून ट्रॉलीशॉटसारखं चित्रीकरण केलं जाऊ लागलं होतं.
 नवी तंत्रं फीचर फिल्ममधे वापरणं हे महा खर्चाचं काम होतं. युद्ध ही आयतीच संधी निर्मात्याना मिळाली. बाँब फुटत होते, बोटी बुडत होत्या, बाँबवर्षाव होत होता, रॉकेटं कोसळत होती. सारं काही चित्रपटात सेट लावल्यासारखं घडत होतं. नव्या तंत्रांचे आणि यंत्रांचे प्रयोग करण्याची संधी चित्रपट निर्मात्यांना मिळाली.   
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार झालेल्या बऱ्याचशा डॉक्युमेंटऱ्या  युद्धात गुंतलेल्या सरकारांनी केल्या. प्रचार करण्यासाठी. आपलंच म्हणणं कसं खरं आहे, आपले सैनिक कसे शूर आहेत, आपलं सैन्य किती संकटांना तोंड देत विजय मिळवतंय हे जनतेला दाखवण्यासाठी. अनेक हौशी छायाचित्रकारही शूट करत होते. त्या वेळी २५ एमएमचे कॅमेरे बाजारात आले होते. लग्नं, पार्ट्या, पर्यटन इत्यादी व्यक्तिगत घटना चित्रीत करून हौसेनं आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दाखवण्याची टूम त्या काळात सुरू झाली होती. त्यामुळं अनेकांनी युद्ध काळातल्या घटनांचं जमेल तसं चित्रीकरण केलं होतं.

युद्ध संपल्यानंतर प्रचाराचा संबंध नसणाऱ्या स्वतंत्र डॉक्युमेंटऱ्या निघू लागल्या.   दोन प्रकार.  एका प्रकारात युद्धाच्या निमित्तानं पुढं आलेले विषय घेऊन त्यावर डॉक्युमेंटऱ्या  झाल्या. विषय युद्धाचा. पण युद्धाच्या काळातली दृश्यं त्यात वापरलेली नसत. युद्धानंतर केलेली युद्धाचा काळा वाटावा अशी चित्रणं त्यात वापरली गेली. या चित्रपटांना डॉक्यूमेंटरी अशा साठी म्हटलं जायचं की त्या वास्तवावर आधारलेल्या होत्या. चित्रीकरण मात्र वास्तव नव्हतं. 
उदा. अॅन फ्रॅंक रिमेंबर्ड हा चित्रपट १९९५ साली तयार झाला आणि त्याला १९९६ साली डॉक्युफीचर या प्रकारातलं ऑस्कर मिळालं. अलीकडं या प्रकाराला डॉक्युड्रामा असंही म्हणतात. अॅन फ्रॅक ही ज्यू मुलगी कॉन्संट्रेशन कँपमधे, छळछावणीत होती.  तिच्या बरोबर आणखी सोळा लाख छोट्या मुलीही छळछावणीत मारल्या गेल्या. हिटलरनं उभारलेल्या छळछावण्यात  मारले गेलेले लक्षावधी ज्यू दुसऱ्या महायुद्धाचे अविभाज्य भाग झाले असल्यानं तो विषय डॉक्यूमेंटरी या सदरात मोडत होता. अॅन फ्रँकनं छळछावणीत असताना डायरी लिहिली होती. ती नंतर प्रसिद्ध झाली.   जगातल्या गाजलेल्या साहित्यात त्या डायरीची गणना होते.   ते साहित्य होतं आणि एक डॉक्युमेंटही.  डायरीचे ६० भाषांत अनुवाद झाले.  चारेक कोटी प्रती संपल्या.  डॉक्यूफीचरमधे तिच्या डायरीतली पानं, तिचे फोटो, तिनं उल्लेख केलेल्या माणसांचे फोटो इत्यादी गोष्टी वापरून फिल्म तयार केलीय. अॅन फ्रॅक, तिच्या डायरीतली पात्रं इत्यादी भूमिका अभिनेत्यांनी रंगवल्या आहेत. 
अशा प्रकारच्या वास्तवावर आधारलेल्या शेकडो डॉक्यूफीचर  फिल्म्स तयार झाल्या. आजही त्या पाहिल्या जातात.
दुसरा प्रकार म्हणजे युद्धाच्या काळात केलेलं फूटेज वापरून तयार केलेल्या डॉक्यूमेंटऱ्या. हौशी आणि व्यावसायिक व्यक्तींनी घेतलेलं फूटेज त्यावर संस्कार करून या डॉक्युमेंटऱ्यांत मांडण्यात आलं. त्या काळात केलेलं बहुतेक चित्रीकरण काळंपांढरं होतं. कित्येक वेळा धावपळीत चित्रीकरण करावं लागल्यानं ते अस्पष्ट होतं, पिक्सेलेट झालेलं होतं, त्यातले ग्रेन्स फाटलेले होते. ते चित्रीकरण जसंच्या तसं दाखवण्यात गंमत नव्हती. २००८-२००९ या काळात चित्रपटांचं दृश्यमूल्यं इतकं पुढं गेलेलं होतं की १९४० सालचं चित्रीकरण पहाताना मजा येत नव्हता. युद्धाचं नाट्य काळ्या पांढऱ्या रंगात ‘ रंगत ‘ नव्हतं. 
 ‘ सेविंग दी प्रायव्हेट रायन ‘ हा   स्पिलबर्गनं तयार केलेला अत्यंत देखणा डॉक्यूड्रामा पहा. काळ्यापांढऱ्या रंगात त्याच विषयावर १९६२ साली डॅरियल झनुकचा ‘ लाँगेस्ट डे ‘ पहा. देखणेपणात जमीन आस्मानाचं अंतर आहे.   आताच्या काळात पिक्सेलेट झालेली, अस्पष्ट दृश्यं पहायला प्रेक्षक तयार होत नाहीत.  
 महायुद्धासारखा विषय, डॉक्यूमेंटरीच्या रुपात दाखवायचा आणि तो २०१० सालच्या माणसाला पहावासा वाटायला हवा हे एक मोठं आव्हान होतं. अपोकलिप्सनं ते पेललंय.
।।
अपोकलिप्समधे  १९४०-४५ सालातलातल्या चित्रीकरणावर संस्कार केले आहेत. जुन्या चित्रपटाच्या फिल्मा मिळवल्या, त्या डिजिटाईज केल्या,  त्यातले फाटलेले ग्रेन्स एकत्रित केले, काळ्या पांढऱ्या फ्रेममधे रंग भरले. नवी सॉफ्टवेअर आणि यंत्रं वापरल्यामुळं ते शक्य झालं. 
तसं पाहिलं तर ते सॉफ्टवेअर आणि यंत्रं कोणालाही उपलब्ध आहेत. पण ती वापरण्याचं कसब हवं. सफाई हवी.  रांधा एकच असतो. पण एकादा सुतार तो इतक्या सफाईनं वापरतो की  लाकूड आरशासारखं होतं.
अपोकलिप्समधे भरलेले चित्राचे रंग ताज्या चित्रीकरणासारखे आहेत, अगदी कालपरवा युद्ध झालंय आणि स्पिलबर्गनं त्याचं चित्रीकरण केलंय असं वाटतं.
अपोकलिप्सचं वैशिष्ट्यं म्हणजे सामान्यपणे लोकांना न दिसलेलं असं खूप नवं फूटेज त्यांनी वापरलंय. ६०० तासाच्या फूटेजमधे ७५ टक्के फूटेज दुर्मिळ या वर्गातलं आहे असा निर्मात्यांचा दावा आहे. तो दावा खरा असावा असं अपोकलिप्स पहातांना जाणवतं. हिटलर मुलांमधे मिसळतांना, हिटलर जिथं शिकला होता त्या शाळेत गेला असताना, हिटलर आपल्या कुटुंबिंयामधे वावरतांना इत्यादी फूटेज या डॉक्युमेंटरीत आहे. यातलं बरंचसं फूटेज हिटलरच्या जवळच्या माणसांनी हौसेखातर केलेलं फूटेज असल्यानं ते आजवर वापरलं गेलं नव्हतं.
युद्ध म्हटलं की गोळीबार, बाँबफेक, जळती घरं, उध्वस्त इमारती, बंदूक उगारेल्या माणसाचा क्लोज अप इत्यादी गोष्टी दिसतात. परंतू युद्ध त्याच्या पलिकडं खूप असतं. सैनिक नुसते माणसं मारत असतात असं नव्हे. सैनिक चहुकडं बर्फ पसरलेलं असताना  कपडे काढून अंडरवेअरवर नाच करताना अपोकलिप्समधे  दिसतात. सैनिक पायांना चिंध्या बांधून चिखलातून जाताना दिसतात. ऐन युद्धात सेनापती आपल्या कुटुंबासह वाढदिवस साजरा करताना दिसतो. फोटोग्राफर कॅमेऱ्याला चेहरा खेटून चित्रीकरण करत असताना त्याचे हात, तोंड, टोपी, कॅमेरा इत्यादी सारं काही माशांनी भरलेलं दिसतं. कुटुंबं घोडागाडीत सामान भरून दुसऱ्या गावात निघालेली दिसतात. शिक्षिका छोट्या मुलांना गाणं शिकवत असते आणि बाँब पडून तो वर्ग नष्ट झालेला दिसतो. युद्ध ऐन भरात असताना जर्मनीत   मार्लिन डिट्रीक ही प्रख्यात अभिनेत्री नाईट क्लबमधे दिसते.
लंडनच्या उपनगरातला एक माणूस. त्याची मुलगी ‘ रोज ‘ दोन वर्षाची असतांना त्याच्या हाती कॅमेरा येतो.हौसेनं तो समोर दिसेल त्या गोष्टीचं चित्रीकरण करत असणार.  तो आपल्या प्रिय मुलीचं चित्रीकरण सतत करत असतो.  तिचा वाढदिवस. तिथं बागेत फिरणं, तिचं घरात वावरणं वगैरे. युद्ध सुरु झालं तेव्हां रोज आकाशात फिरणाऱ्या बाँबर विमानांकडं पहात रोज घाबरून पहात असते. रोजचा पिता तिला सांगतो घाबरू नकोस ती आपलीच विमानं आहेत. ती विमानं जर्मनीची असतात आणि बाँब फेकतात. बाँबिगची रेड संपते.माणसं  रस्त्यावर पसरलेला राडारोडा दूर करून रस्ता मोकळा करू लागतात. रोज त्या खटपटीत सामील होते. या सगळ्याचं चित्रीकरण पित्यानं केलं. युद्ध संपतं. रोज  एका निकामी होऊन पडलेल्या बाँबवर युद्ध संपलं असं लिहितांना दिसते.
अपोकलिप्समधे  सैनिक, सैनिकांच्या बायका, छोटी मुलं, ज्यू माणसं, यांचे किती तरी क्लोज अप्स आहेत. बहुदा हे क्लोज अप्स हौशी फोटोग्राफरनी घेतले आहेत. या क्लोज अप्सचं दृश्य मूल्य अचाट आहे. 
रोज नावाची छोटी मुलगी, क्लोजअपमधली माणसं, शहरांत फिरणारी माणसं, विस्थापित झालेली माणसं पहातांना कळतं की युद्ध म्हणजे केवळ सैनिक आणि शस्त्रं नव्हेत. युद्दाचा परिणाम केवळ सैनिकांवरच होतो असं नव्हे. युद्धात सारं जग होरपळतं. युद्धाची व्याप्ती या दृश्यांवरून लक्षात येते. ही डॉक्यूमेंटरी युद्धाकडं एका वेगळ्या दृष्टीनं पहायला लावते.
मार्टिन शीनचं इंग्रजी आवृत्तीचं निवेदन ऐकण्यासारखं आहे. ऐकताना प्रेक्षक दृश्यांपासून दूर जात नाही. निवेदनात अभिनिवेश नाही, आपलं कसब दाखवण्याचा खटाटोप नाही. निवेदनाचं हे कसब स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखं आहे.
अर्नेस्ट हेमिंग्वे युद्धाच्या ठिकाणी गेला होता, युद्ध अनुभवण्यासाठी. युद्धानंतर त्याची दृष्टीच बदलली.
अपोकलिप्स ही मालिका निर्मात्यांनी फोटोग्राफर्सना अर्पण केलीय ती उगाच नव्हे.

।।