Browsed by
Month: January 2017

अमेरिकन सरकार उध्वस्थ होतं तेव्हां आपोआप होणारा संकटकालीन प्रेसिडेंट

अमेरिकन सरकार उध्वस्थ होतं तेव्हां आपोआप होणारा संकटकालीन प्रेसिडेंट

कल्पना करा. दहशतवाद्यांनी अमेरिकेत संसदेवर हल्ला केलाय. त्यात राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, सर्व संसद सदस्य मारले गेलेत.

अमेरिकन राज्यघटनेत प्रेसिडेंटनं देशाला उद्देशून स्टेट ऑफ द युनियन भाषणं केव्हाही आणि कितीही करावीत अशी तरतूद आहे. सामान्यतः प्रत्येक प्रेसिडेंट वर्षातून एकदा असं भाषण करत असतो. उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, मंत्रीमंडळ अशी सगळी माणसं या भाषणाला हजर असतात.१९६० च्या दशकात जगावर अणुयुद्धाचं सावट पसरलं होतं तेव्हां अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीनं अमेरिकन सरकारनं एक संकटकालीन तरतूद केली. स्टेट ऑफ द युनियन भाषण चालू असताना समजा तिथं बाँबहल्ला झाला तर सारंच्या सारं सरकारच नष्ट होऊ शकतं. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, मंत्रीमंडळ, संसदसदस्य सारेच मरू शकतात. अशा स्थितीत देशाचं नेतृत्व करण्यासाठी एका माणसाची नेमणूक करून ठेवली जाते. भाषण आटोपर्यंतच एका माणसाला सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं. त्याला डेसिग्नेटेड सर्वायवर, संकटकाळासाठी नियुक्त प्रेसिडेंट म्हणतात. अध्यक्षासह सर्व नष्ट झाल्यानंतर हा माणूस अमरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं घेत असतो. अमेरिकेवर अणुहल्ला झाला तर कोण माणसं वाचली पाहिजेत याचाही एक हिशोब अमेरिकेनं केला आहे. अध्यक्षाबरोबरच प्लंबर हा माणूस शिल्लक राहिला पाहिजे असं ठरलं आहे. कारण हल्ल्यानंतर जी काही माणसं उरतील त्यांना प्यायचं पाणी मिळालं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे.

२१ जानेवारी २०१६ रोजी बराक ओबामा स्टेट ऑफ द युनियन भाषण करायला गेले तेव्हां त्यांनी अँथनी फॉक्स या माणसाला संकटकालीन अध्यक्ष नेमलं होतं. भाषण संपलं आणि अँथनी फ्रँक एक साधा नागरीक झाला.

संकटकालीन अध्यक्ष  आणि प्लंबर या तरतुदी भारी नाट्यमय आहेत. यावर सिनेमा करावा असं आजवर कोणाला कसं सुचलं नाही याचं नवल वाटतं. एबीसी या टीव्ही कार्यक्रम  निर्मात्या कंपनीला हा विषय आवडला आणि डेसिग्नेटेड सर्वायवर या विषयावर त्यांनी मालिका तयार केली. मालिकेचा एक सीझन झाला असून मार्चमधे पुढला सीझन प्रदर्शित होणार आहे. पहिला सीझन करोडो लोकांनी पाहिला असून, तुफ्फान प्रेक्षक प्रिय ठरला आहे.

टॉम कर्कमन हा एक कमी महत्वाच्या खात्याचा मंत्री संकटकालीन प्रेसिडेंट नेमला जातो. स्टेट ऑफ दि युनियन भाषण चालू असताना कर्कमन आपल्या घरात लाह्या खात टीव्हीवर प्रेसिडेंटचं भाषण ऐकत असतो. अचानक टीव्ही बंद पडतो. काय झालंय याचा उलगडा होईपर्यंत गुप्तचर येतात आणि कर्कला व्हाईट हाऊसमधे घेऊन जातात. घरच्या कपड्यात, लाह्यांची पुंगळी हातात असतानाच. भाषणाच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी बाँबहल्ला केलेला असतो. इमारती बेचिराख झालेल्या असतात. व्हाईस प्रेसिडेंट, संसद सदस्य, सगळे मेलेले असतात आणि कर्कमन हा आता अध्यक्ष झालेला असतो.

इथून मालिका सुरु होते.

लष्कर, सीआयए इत्यादी संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीत कर्कमनला नेलं जातं. घरच्या कपड्यात. लष्कर, सीआयए, इंटेलिजन्स इत्यादी गोष्टी कशाशी खातात ते कर्कमनला माहित नसतं. लष्करी गणवेशातली माणसं त्याला घाबरवून टाकतात. लष्कर प्रमुख सांगतो की इराणनं दहशतवादी हल्ला घडवून आणलाय. लष्कर प्रमुख सांगतो की पुढल्या काही मिनिटात तो युद्ध सुरु करणार आहे, इराणवर हल्ला सुरु करणार आहे.

कर्कमन चक्करतो. बाथरूममधे जाऊन ओकतो. कुठून आपण या भानगडीत पडलो असं त्याला वाटू लागतं. मुलंही व्हाईट हाऊसच्या सेक्युरिटीच्या भानगडीमुळं वैतागलेली असतात. कौटुंबिक जीवन उध्वस्थ झाल्यानं पत्नी त्रासलेली असते. कर्कमनचे सहकारी त्याला धीर देतात. त्याचा आत्मविश्वास जागृत करतात, तुम्ही नक्की चांगले प्रेसिडेंट व्हाल असं  सांगतात.

धीर करून कपडे बदलून, रीतसर सूट आणि टाय वगैरे कपडे घालून कर्कमन पुन्हा बैठकीत हजर होतो. लष्कर प्रमुख सांगतो की हल्ला नक्की इराणमधून झालाय. कर्कमन विचारतो की तुमची ही माहिती किती टक्के बरोबर आहे. लष्कर प्रमुख सांगतो की ७५ टक्के. कर्कमन म्हणतो की युद्ध म्हणजे अपार हानी, असंख्य माणसं मारणं. तसा निर्णय घेण्याआधी शंभर टक्के खात्री व्हायला हवी. तशी खात्री दिलीत तरच मी युद्धाचा निर्णय घेईन. लष्कर प्रमुख ऐकायला तयार नसतो. कर्कमन धाडकन लष्कर प्रमुखाला पदावरून दूर करतो.

प्रश्न समजुतीनं सोडवले पाहिजेत, युद्ध हा शेवटला व नाईलाजाचा उपाय असतो असं कर्कमनला वाटत असतं. लष्करी अधिकाऱ्यांना वाटाघाटी नको असतात, त्यांना युद्धाची खुमखुमी आलेली असते. कर्कमन इराणच्या राजदूताला बोलावतो. युद्ध करणं सर्वांनाच महागात पडेल असं सांगून दोन्ही बाजूनी प्रक्षोभक उद्योग थांबवूया असं म्हणतो. युद्ध टळतं. लष्कराला सगळी तयारी मागे घ्यावी लागते.

दहशतवादी मुस्लीम आहेत असं माहित झाल्यामुळं मिशिगन राज्याचा गव्हर्नर मुसलमानांना पकडून तुरुंगात घालू लागतो, कायदा धाब्यावर बसवतो. सरसकट मुसलमानांना आणि पश्चिम आशियातल्या लोकांना टार्गेट केलं जातं. त्याचं वागणं घटनेला धरून नाही असं कर्कमन सांगतो. गव्हर्नर ऐकत नाही. कर्कमन हा निवडून आलेला प्रेसिडेंट नसल्यानं आपण त्याला मानत नाही असं जाहीरपणे बोलतो. कर्कमन त्याला सांगतो की तो जरी निवडून आलेला नसला तरी अमेरिकन राज्यघटनेच्या सांगण्यानुसाराच तो प्रेसिडेंट झालेला असतो.

दोघांमधे संघर्ष उद्वभवतो. कर्कमन हुशारीनं गव्हर्नरला वॉशिंगटनमधे बोलावून अटक करतो. केंद्रीय सैन्याचा वापर करण्याची धमकी दिल्यावर गव्हर्नर गप्प होतो.

पहिल्या चार पाच दिवसातच कर्कमन कणखरपणे निर्णय घेतो.  रीपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही पक्षाचे पुढारी कर्कमनला विरोध करत असतात. हुशारीनं त्यातल्या काही प्रमुख पुढाऱ्यांना कर्कमन आपल्या बाजूला घेऊन निवडणुका जाहीर करतो. संसद सदस्य कर्कमनची जवळ जवळ इंपीचमेंटच करतात. असंख्य प्रश्नांनी भंडावून सोडतात.   कर्कमन यामधे प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सर्व प्रश्नांना उत्तरं देतो. आधीच्या प्रेसिडेंटनं आपल्याला  हाकलेलेलं आहे हे कर्कमन कबूल करतो. घरबांधणी या खात्यात आपण बदल करायचा प्रयत्न केला परंतू काही लोकांना ते आवडलं नसल्यानंच आपल्याला ते खातं सोडावं लागलं हे काहीही न लपवता कर्कमन कबूल करतो. आपण सामान्य आहोत, केवळ देशाच्या हितासाठी आपण ही जबाबदारी घेतली आहे, सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांच्या आणि गव्हर्नरांच्या मदतीशिवाय आपण काम करू शकत नाही असं तो प्रांजलपणे सांगतो.

सीरियामधून आणलेल्या स्थलांतरितांचं विमान फ्लोरिडाच्या विमानतळावर उभं असतं. जनता सीरियन लोकांच्या  सरसकट विरोधात असते. वातावरण तापलेलं असतं. जनता खवळलेली असते. गव्हर्नर विमानातल्या प्रवाशांना उतरवून घ्यायला नकार देतो. गव्हर्नरचं वागणं अमेरिकन राज्यघटनेच्या विपरित असतं. कर्कमन तात्पुरती तडजोड म्हणून त्यांना कॅनडात पाठवतो. विमानात एक नवबाळंत महिला असते. ती आणि तिच्या मुलाला मात्र कर्कमन हट्टानं उतरवून घेतो. जनमत थंड होतं पण सीरियन स्थलांतरितांना कॅनडात कां होईना सामावून घेतलं हे कर्कमन दाखवून देतो.

कर्कमन खरा आणि कणखर अध्यक्ष होतो.

कीफर सदरलँड या नटानं कर्कमनची भूमिका केलीय. या आधी ट्वेंटी फोर नावाची एक महालांब मालिका २००१ साली झाली होती. मालिकेत १९२ भाग होते. अमेरिकेवर होणारे दहशतवादी हल्ले आणि कारवाया यांच्यावर मात करणाऱ्या महाबाँडची भूमिका सदरलॅंडनं केली होती. मीरा नायरनं २०१४ मधे केलेल्या रिलक्टंट फंडामेंटलिस्ट या चित्रपटातही सदलँडनं लक्षात रहावी अशी लहान भूमिका केली होती.

एक तसा साधा माणूस एक कणखर राष्ट्रपती कसा होत जातो ते सदरलँडनं छान दाखवलंय.

मालिकेत व्हाईट हाऊस दाखवलंय. प्रेसिडेंट व्हाईट हाऊसमधे कसा वावरतो, त्याचं खाजगी जीवन कसं असतं, अमेरिकेतल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर  प्रेसिडेंट कसा वावरतो याची कल्पना या मालिकेत येते. एक कुटुंबवत्सल माणूस आणि प्रेसिडेंट या दोन टोकांना खेचणाऱ्या प्रेरणांमधे अडकलेला माणूस मालिकेत पहायला मिळतो.

 

व्हाईट हाऊसमधे शिरतांना माणूस एक साधा माणूस असतो. त्याच्यावर त्याची पत्नी, मुलं, नातेवाईक, त्याचे सहकारी इत्यादी लोकांचा प्रभाव असतो. त्याचं कार्यक्षेत्र, अनुभवक्षेत्र, कसब इत्यादी साऱ्या गोष्टी मर्यादित असतात. आणि एके दिवशी तो माणूस राष्ट्राध्यक्ष होतो. हा बदल कसा घडतो? राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आधीचा माणूस शिल्लक न रहाता नवा माणूस होतो काय? की मुळातलाच माणूस फक्त एका नव्या रुपात काम करतो?

कर्कलँडच्या बाबतीत काय घडलं? तो अगदी साधा माणूस असतो, त्याच्या क्षमताही मर्यादित असतात. पण कामाच्या ओझ्याखाली तो बदलतो. पूर्ण बदलतो. एक कार्यक्षम अधिकारी होतो.

बराक ओबामांना राजकारणाचा अनुभव नव्हता. वकीली, सामाजिक कार्य त्यांनी केलं होतं, पण राजकारण नव्हे. त्यांचा पिंड अकॅडमिक माणसाचा, विचारवंताचा. ते उत्तम लिहित असत. अध्यक्षपदाची निवडणुक लढायची ठरवली तेव्हां त्यांची पत्नी त्याना म्हणाली की निवडणुकीसाठी लागणारे पैसे तुम्ही कुठून आणणार. ओबामा दोन पुस्तकं लिहून पैसे मिळवणार होते. पत्नी हसली. पुस्तकातून कितीसे पैसे मिळणार. आणि तेही तितके मिळणार याची खात्री काय. ओबामा म्हणजे कोणी नोबेलवाले लेखक नव्हते. ओबामा म्हणजे जे के रोलिंग नव्हते. फार तर पाच दहा लाख डॉलर मिळाले असते. तेवढे पैसे अगदीच अपुरे.

ओबामानी दोन उत्तम पुस्तकं खरोखरच लिहिली. त्यातून त्यांना बरे पैसेही मिळाले. पण शेवटी त्यांना निवडणूक निधीसाठी लोकांकडं जावंच लागलं.

मुद्दा असा की पुस्तकं आणि विचार हीच काय ती ओबामांची ताकद होती. येवढ्या तुटपुंज्या ताकदीवर आणि जेमतेम एका टर्मच्या सेनेटच्या अनुभवावर ओबामा राष्ट्रपती झाले होते.नंतर एका अकॅडमिक-विचारवंताचा एक प्रभावी राष्ट्रपती झाला.  राष्ट्राध्यक्ष या नात्यानं त्यांनी काही कार्यक्रम  विचारपूर्वक मांडले, सरकार व्यवस्थित सांभाळलं, कोणतीही भानगड होऊ दिली नाही.

ओबामांचं रुपांतर कशामुळं घडलं? अनुभवी, सज्जन, अभ्यासू माणसं त्यांनी मदतीला घेतली म्हणून ते जमलं. त्यांच्या टीममधे गुन्हेगार नव्हते, लबाड्या करणारे नव्हते. संकुचित राजकारण, व्यक्तिगत स्वार्थ या गोष्टींना त्यांच्याकडं थारा नसल्यानं त्यांचे सहकारीही वळणावर राहिले.ओबामा वळणावर राहिले, सज्जन राहिले, भानगडी केल्या नाहीत याचं एक कारण त्यांची सज्जन आणि सुशिक्षित पत्नी हेही होतं. मिशेल ओबामा याही बराक ओबामांच्या तोडीस तोड होत्या, स्वच्छ चारित्र्याच्या आणि सज्जन होत्या.

ओबामांच्या आधी जॉर्ज बुश २००२ ते २००८ राष्ट्राध्यक्ष होते. बुश एक टर्म टेक्ससचे गव्हर्नर होते. त्या पलिकडं त्यांना कोणत्याही पदाचा किवा राजकीय कार्याचा अनुभव नव्हता. केवळ त्यांचे वडील राष्ट्राध्यक्ष होते या बळावर ते राजकारणात उतरले.

वडील प्रेसिडेंटनी बळेबळे मुलाला राजकारणात उतरवलं. जॉर्ज बुश यांना खरं म्हणजे कशातलंच काही कळत नव्हतं. वडिलांचे काँटॅक्ट्स, पैसे वगैरे गृहीत धरून ते शर्यतीत उतरले. जगात कुठले देश कुठे आहेत हेही बुशना माहित नव्हतं. बुश एका परीनं एक महत्वाकांक्षी पप्पू होते अर्थशास्त्रातलं त्यांना काहीही कळत नव्हतं. वडील बुश यांनी चक्क एका अर्थशास्त्र्याची शिकवणी जॉर्ज बुशना लावली. वडिलांच्या सांगण्यावरून सौदी राजघराण्यातले मुत्सद्दी राजदूत श्री.बंदार बुशना भेटले.

त्याचीही गंमतच आहे. बुशनी बंदारना भेटायला बोलावलं. बंदार विमानतळावर पूर्णपणे उतरले नसतांना, विमानाच्या शिडीवरच बुशनी त्यांना आंतरराष्ट्रीय काँटॅक्ट्स मागितले. ही भेट एका खेळप्रसंगाच्या आडून व्हायची होती. उघडपणे एकाद्या देशाच्या राजदूतानं उमेदवाराला भेटणं योग्य नव्हतं. बंदारना सांगावं लागलं की इथं असलं काही विचारू नका  बंदारनी नंतर आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की बुशची प्रेसिडेंटपदाची लायकी नाही, त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या भानगडीत पडू नये.

परदेश धोरणासाठी माणूस निवडायचा म्हणून जॉर्ज बुश आर्मिटेजना भेटले तेव्हां आर्मिटेजही म्हणाले की बुश ढ आहेत. कोंडोलिझ्झा राईस यांचीही शिकवणी जॉर्ज बुशना घ्यावी लागली.

अगदी शे पन्नास मतांनी, लफडी करून, लालू प्रसादांच्या आयडिया वापरून बुश राष्ट्राध्यक्ष झाले, अल गोर हरले. जवळपास ढ, स्वतःच्या क्षमतेबद्दल गैरसमज असलेला माणूस राष्ट्राध्यक्ष झाला. त्यांनी चेनी, रम्सफेल्ड, कार्ड अशी महत्वाकांक्षी माणसं स्वतःभोवती गोळा केली. या माणसांचे पूर्वग्रह होते. त्यांना त्यांचे जुने सूड उगवायचे होते. ही माणसं अहंमन्य आणि गुन्हेगारी वृत्तीची होती.

बुश बॉर्न अगेन होते. त्यांना सारं जग ख्रिस्ती करायचं होतं. त्यांच्याकडं भविष्यातलं जग कसं असावं याबद्दल कोणताही उदात्त नव्हता. अमेरिकन लष्कर अधिकाधीक बलवान करून जगावर राज्य करायचं असं त्यांच्यासमोरचं उद्दिष्ट होतं.

अशा माणसाला  चेनी, रम्सफेल्ड इत्यादी लोकांनी इराकच्या युद्धात लोटलं. सद्दामकडं महाधातक अस्त्रं आहेत याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडं नव्हता. सद्दाम अल कायदाच्या बाजूचा नव्हता, त्यानं अल कायदाला इराकमधून हाकललं होतं. तरीही अमेरिकेनं इराकवर आक्रमण केलं.

इराकमधे विनाकारण माणसं मारली जात होती, अमेरिकन सैनिकही विनाकारण मरत होते. सारं चुकीचं चाललंय असं इराकमधले अमेरिकन लष्करी अधिकारी वारंवार सांगत होते. बुश त्यातलं काहीही ऐकत नव्हते.

जवळ जवळ डेसिग्नेटेड सर्वायावरमधल्या कर्कमन सारखाच व्हाईट हाऊसला नवखा असलेला माणूस राष्ट्राध्यक्ष झाला.  कर्कमनप्रमाणं शिकायची तयारी नसलेला माणूस राष्ट्राध्यक्ष झाला. त्याच्या सभोवताली असलेल्या लोकांच्या नादानं तो माणूस सुधारला तर नाहीच पण अधीक ढ आणि गुन्हेगारासारखा झाला.

डोनल्ड ट्रंप हा राजकारणाचा किवा सार्वजनिक जीवनाचा कोणताही अनुभव नसलेला माणूस व्हाईट हाऊसमधे पोचतोय. त्यांना बिझनेसचा अनुभव आहे. तो अनुभवही आश्वासक नाही. त्यांनी कर भरलेला नाही. त्यांनी अनेक पुरवठादाराना लागू असलेले पैसेही दिलेले नाहीत. कामगारांना त्यांनी कमी पैसे देऊन दादागिरी करून राबवून घेतलंय.  न्यू यॉर्कमधल्या सार्वजनिक संस्था आणि कोर्टांना ट्रंपनी दमदाटी केली आहे. त्यांनी एक फ्रॉड युनिव्हर्सिटी चालवली होती.

आल्या दिवसापासून कोणाही अनुभवी, शहाण्या, परिपक्व माणसाचा सल्ला न घेता ट्रंप मनास येईल तसं बोलत सुटले आहेत. त्यांच्याच पक्षातल्या आणि त्यांच्याच मंत्रीमंडळातल्या लोकांना त्यांचे निर्णय मान्य नाहीयेत.

डेसिग्नेटेड सर्वायवर पहात असताना ट्रंपचं काय होईल असं सतत मनात येत रहातं.

।।

 

 

 

 

 

शिव सेनेचा आधार, महिला.

शिव सेनेचा आधार, महिला.

The Dashing Ladies of Shiv Sena

POLITICAL MATRONAGE IN URBANIZING INDIA

Tarini Bedi

Aleph

एकदा मुंबईत गिरगावात केळेवाडीच्या तोंडाशी मला एक महिला भेटल्या. साधारण उंची, सडपातळ, डोळ्यावर जाड काचांचा चष्मा. त्यांची वडापावची आणि चहाची गाडी होती.

आसपासची  बरीच माणसं त्यांना ओळखत होती. त्यांचा दरारा होता. सभोवतालच्या वातावरणारून ते कळत होतं.

मी सहज त्यांची जनरल चौकशी करणारा प्रश्न विचारला आणि त्या सुटल्याच. त्या शिवसैनिक होत्या. तसं त्यांनी अभिमानानं सांगितलं. म्हणाल्या ” कोणालाही विचारा. आपली वट आहे या विभागात. कुठल्याही पोलिस चौकीत जा नाही तर कॉर्पोरेशनच्या ऑफिसात जा. सगले लोक आपल्याला वळखतात. कधी ना कधी तरी त्यांनी आपले फटके  खाल्लेत.”

बाईंनी आपण कसे राडे केलेत, कशी दुकानं फोडलीत, मोर्चात पोलिसांनी अडवल्यावर कसा राडा केलाय याच्या गोष्टी सांगितल्या. आपण शिव सैनिक आहोत याचा आपल्याला अभिमान आहे असं त्या म्हणाल्या. बाळासाहेब हे आपले परमेश्वर आहेत, त्यांच्यासाठी आपण काय पण करायला तयार असतो असंही त्या म्हणाल्या.

दुपारची वेळ होती. गर्दी होती. त्या इतक्या मोठ्यानं बोलत होत्या की अक्ख्या रस्त्याला ऐकू जात होतं. मीही जरा टरकलोच. आपल्या तोंडून सेनेबद्दल वावगा शब्द निघाला तर या बाई आपल्याला व्हाणेनं मारतील याची खात्री मला वाटली.

” या भागात तुम्हाला काय पण अडचण आली तर थेट माझ्याकडं यायचं. बस. ” त्यांनी मला सांगून टाकलं.

वरील बाईंना भेटण्याआधी  शिवसेनेतल्या एकाच स्त्रीशी माझी चांगली ओळख होती ती व्यक्ती म्हणजे नीलम गोऱ्हे. नीलम गोऱ्हे आता टीव्हीमुळं मराठी माणसाला चांगल्या माहित झाल्या आहेत. त्यांचं संवाद कौशल्य प्रेक्षकांनी अनुभवलं आहे.  गिरगावाच्या नाक्यावरचं संवाद कौशल्य धास्तावणारं होतं. अशी शिवसैनिक स्त्री मी प्रथमच पहात होतो.

अलिकडं पालघरमधे एका कार्यक्रमाला गेलो असताना तिथं एक ठळकपणे लक्षात याव्यात अशा महिला भेटल्या. त्यांचं दिसणं, वावरणं, आवाज, बोलणं सारंच ठळक होतं. त्या मुंबईत सेनेच्या कॉर्पोरेटर होत्या. त्यांनी स्वतःची   ओळख तशीच  करून दिली.  पालघरला भेटलेल्या महिलेला मी गिरगावात भेटलेल्या महिलेची आठवण सांगितली. पालघरच्या बाई हसल्या. म्हणाल्या ” म्हणजे काय, आम्ही शिवसैनिक महिला असतोच तशा. आम्ही कामं करतो. मी एके काळी समाजवादी पक्षाचं काम करायची. मृणाल गोरे यांच्याबरोबर. मृणालताईंचं जनता पक्षाचं राजकारण सुरु झाल्यावर मी पक्ष सोडला आणि शिव सैनिक झाले. आम्ही भाषणं वगैरे करत नाही. आम्ही कामं करतो….?

त्यानंतर असंख्य शिवसैनिक महिलांची गाठ  तारिणी बेदी यांच्या दी डॅशिंग लेडीज ऑफ शिव सेना हे पुस्तकात पडली.

हे पुस्तक हाती पडलं त्याचीही मजाच आहे. विराटच्या वेवर्ड अँड वाईज या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळत होतो. गॅरेथ जोन्सच्या ‘ कार्ल मार्क्स, ग्रेटनेस अँड इल्युजन्स ‘ या पुस्तकाला खेटून दी डॅशिंग लेडी उभं होतं. काळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या लाल अक्षरात पुस्तकाचं नाव आणि सेनेच्या महिलांचं चित्र. महिलांच्या हातात उघडे चाकू. चाकू कीचेनमधे अडकवलेले आणि की चेनच्या टोकाला बाळ ठाकरे यांचा फोटो.

मुखपृष्ठाचा  एक सिद्धांत असा की मुखपृष्ठावरून पुस्तकातल्या मजकुराची कल्पना यायला हवी. या पुस्तकाच्या बाबतीत हा सिद्धांत तंतोतंत खरा ठरत होता. ब्लर्ब वाचला, सुरवातीची काही पानं चाळली आणि पुस्तक घेतलं. अशाही विषयावर पुस्तकं निघतात याचं कौतुक  वाटलं.

स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यू यॉर्कचं हे पुस्तक रुपा पब्लिकेशनच्या अलेफ या उपकंपनीनं भारतात प्रकाशित केलंय. कागद, छपाई, मांडणी या सर्वावर आंतरराष्ट्रीय दर्जाची छाप दिसते.

पुस्तकाच्या लेखिका तारिणी बेदी या मुंबईतल्या गोरेगाव विभागात वाढल्या. शिकण्यासाठी आणि पीएचडीसाठी त्या अमेरिकेत, इलिनॉय विश्वशाळेत गेल्या. तिथं   दक्षिण आशिया विषयविभागामधे त्यांनी पीएचडी पूर्ण केली. शिव सेनेतल्या डॅशिंग स्त्रिया हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. या विषयासाठी त्यांनी मुंबई, पुणे आणि नाशिक इथल्या पंचवीसएक महिलांच्या कार्याच्या अभ्यास केला. तीनेक वर्षं त्या शिव सैनिक महिलांबरोबर वावरल्या, त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि पीएचडीचा प्रबंध लिहिला. वरील पुस्तक पीएचडी  प्रबंधावर आधारलेलं आहे.

सामान्यतः प्रबंध या मजकुराची  शैली फार कंटाळवाणी असते. जागोजाग अवतरणं असतात, विधानं जिथून घेतली ती पुस्तकं आणि त्या लेखकांचे संदर्भ असतात. जगातले अमूक एक विद्वान अमूक विषयावर काय म्हणतात असं ओळीओळीत सांगितलेलं असतं. शिवाय तळटीपा असतात आणि पुस्तकाच्या शेवटी पानंच्या पानं टिपांनी आणि इंडेक्सनं भरलेली असतात. मुख्य विषय काय आहे आणि लेखकाला काय म्हणायचं आहे ते शोधून काढणं फारच कठीण होऊन बसतं.

तारिणी गुप्तांच्या पुस्तकात तो त्रास बराच मर्यादित आहे. साधारणपणे पत्रकारी शैलीत गुप्तानी वीस पंचवीस महिला कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रं या पुस्तकात रंगवली आहेत. महिला कार्यकर्ती घरात कशी वावरते, कचेरीत कशी जाते, तिथं कार्यकर्त्यांबरोबर ती कशी वागते, अँक्शनमधे ती कशी असते इत्यादी गोष्टींचं चित्रासारखं वर्णन लेखिकेनं केलं आहे. त्या महिला कार्यकर्त्या डोळ्यासमोर उभ्या रहातात.

पुण्याच्या बालाताई बाईकवरून फिरतात. त्या लेखिकेला सांगतात ” सर्वांना माहित आहे की मी मिरचीची पूड टाकून तुम्हाला आंधळं करू शकते आणि तुम्हाला ठारही मारू शकते.तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठे मराल पण मला ते माहित असतं. आम्ही शिव सैनिक आहोत. आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला कशाचीही भीती नाही..” बालाताईंचा एक कार्यकर्ता सांगतो ” कोणालाही विचारा, लोक सांगतील की मुंडेताई गोड आहेत पण डेंजरस आहेत. पोलिस बालाताईंना  नाममात्र अटक करतात, चहापाणी करतात आणि सोडून देतात.”

श्रीमती काणे या एक कॉर्पोरेटर. अरूण साटम हा आणखी एक सेना कॉर्पोरेटर. दोघं जण लेखिकेबरोबर मुलाखतीसाठी हिंडत असतात. रात्र झालेली असते. घरी परतत असतांना तिघं रिक्षाची वाट पहात असतात. एक ऑटोवाला जेमतेम थांबतो, पण तो यांना घ्यायला तयार नसतो. दोन्ही  कॉर्पोरेटर त्याला धोपटतात. हे सांगून की आम्ही सेनेचे कॉर्पोरेटर आहोत.

पुण्यातल्या शीला. गरीब घरच्या. लहानपणीच लग्न झालं. नवरा दारुडा, शीलाला मारझोड करत असे. शीलानं धैर्यानं घर सोडलं, माहेरी परतली. नवरा तिथही जाऊन तिला त्रास देत असे. शीला सेनेत गेली. सेनेतले कार्यकर्ते तिला मदत करू लागले. शीलाला संरक्षण मिळालं. शीलानं संसार नीट केला आणि ती सेनेची कार्यकर्ती झाली. तिच्या धैर्याबद्दल तिचं कौतुक होऊ लागलं. आसपासच्या वस्तीत एकाद्या स्त्रीला त्रास होऊ लागला की ती शीलाकडं जाऊ लागली. अन्याय घरच्या माणसाकडून होत असो की समाजातल्या इतर कोणाकडून. शीला सरसावते. शीला जाहीर सभातही बेधडक बोलते.

कल्पना साटे या कॉर्पोरेटर दिवसभर सेनेच्या शाखेवर असतात. त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असतो. कुणाला त्यांच्याकडून शिफारसपत्रं हवं असतं, कोणाला पालिका अधिकाऱ्यासाठी पत्र, कोणाला कसल्या तरी फॉर्मवर सही. फोनवर बोलत बोलत साटे सह्या करत असतात. फोनवरचं बोलणं म्हणजे  कित्येक वेळा दमदाटी असते, सोडलेले हुकूम असतात.  तक्रारी असतात,   वस्तीतले संडास बिघडलेले असतात, पाण्याचा पाईप मोडलेला असतो, सांडपाणी वहात असतं. साटे संबंधित पालिका अधिकाऱ्याला फोनवर हुकूम सोडतात किंवा पत्र लिहितात.

साटे म्हणतात- या सर्व लोकांची मी आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. माझं या लोकांशी रक्ताचं नातं आहे. त्याना माहित आहे की त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असते.

या गर्दीत एक बशीर नावाचा माणूस असतो. त्याच्या मुस्लीम वस्तीतली  अडचण घेऊन तो आलेला असतो. साटे त्याला म्हणतात- मी तुम्हा (मुस्लीम) लोकांचे प्रश्न नेहमी सोडवत असते. माझं येवढंच म्हणणं की तुमच्या वस्तीतल्या घरांवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. या वेळी तरी तसं घडलं पाहिजे.

बशीर हुशार आहे. प्रत्येक वेळी तो आश्वासन देतो – झेंडा एकादे वेळेस फडकणार नाही, निदान एकादी पाटी लावण्याचा तरी प्रयत्न करीन. पण ते जाऊ द्या या वेळच्या निवडणुकीत आमची इतकी इतकी मतं तरी मी तुम्हाला नक्कीच मिळवून देईन.

दुर्वाबाई. वैद्य आहेत. लोक त्यांना डॉक्टर म्हणतात. पुण्यातल्या वेश्यावस्तीत त्या रहातात. वेश्यांचे आरोग्याचे व इतर प्रश्न त्या सोडवतात. वेश्यांना सरकारी अधिकारी छळतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. दुर्वाबाई वेश्यांच्या बाजूनं उभ्या रहातात. या विभागाकडं पालिकेचं दुर्लक्ष असतं. एकदा पालिकेनं शेजारच्या वार्डातला कचरा या वस्तीत साठवायला सुरवात केली. दुर्वाबाईंनी वेश्यांना आणि दुकानदारांना संघटित करून कचरा कुंडी हटवायला लावली. पालिका कर्मचारी कचरा उचलत नाहीत, कचरा साठतो. दुर्वाबाईंच्या आंदोलनामुळं कचरा उचलला जातो. दुर्वाबाई लोकप्रिय आहेत, नेत्या आहेत.दुर्वाबाईंच्या पाठिंब्यावर इथला शिवसेनेचा माणूस निवडून येतो.

दुर्वाबाई ब्राह्मण. त्यांनी एका दलिताशी लग्न केलं. ब्राह्मण वस्तीतलं वास्तव्य सोडून त्या वेश्या विभागात काम करू लागल्या, राहू लागल्या.  त्यांचं माहेर त्यांना मुकलं. तरी न डगमगता त्या काम करताहेत.

गोरेगावात फिल्म सिटी विभागातल्या झोपड्या उठवून तिथं नव्या इमारती उभारल्या जाणार होत्या. एसआरए योजनेखाली झोपडपट्टीतल्या लोकांना इतरत्र घरं देण्यात येणार होती. १९९५ साली सेना सत्ताधारी झाली तेव्हां ही योजना सरकारनं जाहीर केली होती. यथावकाश सेनेची सत्ता गेली. विकास प्रकल्प रेंगाळला. झोपडपट्टीतल्या लोकांची संघटना शिव सेनेनं बांधली होती.

फिल्म सिटी विभागात सेनेच्या दोन महिला कार्यकर्त्या लोकप्रिय आणि प्रभावी आहेत. सीता आणि गीता. त्यांनी झोपडपट्टी विकास योजना रोखून धरलीय. झोपडपट्टीतल्या लोकांना पर्यायी घरं नीटपणे मिळतात की नाही याकडं सीता गीता लक्ष देतात. करोडो रुपयांच्या प्रकल्पाच्या चाव्या जणू या दोघींच्या हातात आहेत. सीता गीता यांचंच राज्य या विभागात चालतं.

पैकी सीता या बेधडक शिव सैनिक महिलेचं एक समांतर खाजगी साम्राज्य आहे. त्यांच्याकडं जमीन आहे, त्या जमिनीवर अनधिकृत घरं बांधलेली आहेत आणि त्या घरात त्या लोकाना भाडेकरू म्हणून ठेवतात, वाजवीपेक्षा जास्त भाडं वसूल करतात. त्या सावकारी करतात. वस्तीतली अनेक दुकानंही त्यांच्या मालकीची आहेत. भाडेकरू ठेवणं, त्यांना व्याजानं पैसे देणं या गोष्टीही सामाजिक सेवा आहेत असं त्या म्हणतात. रहात्या जागेची, पैशाची गरज आपण भागवतो असं त्यांचं म्हणणं.

गीता एकदमच वेगळ्या. त्यांची काहीही प्रॉपर्टी वगैरे नाही. त्या गरीब होत्या, गरीबच आहेत, गरीबच रहाणार आहेत. त्या दलित आहेत. ख्रिश्चन मिशननं त्यांना वाढवलं, त्या ख्रिस्ती झाल्या. या विभागातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना अनेक संकटांतून जावं लागलं. मुलगा गेला, नवरा गेला. तरी गीताबाई हिमतीनं उभ्या राहिल्या. त्यांचं कष्टाचं जीवन वस्तीला माहित असल्यानं वस्ती नेहमी त्यांच्या सोबत असते. मारझोड करणारे व्यसनी नवरे किंवा भाऊ वगैरे त्रास देऊ लागले की वस्तीतल्या स्त्रिया हक्कानं गीताबाईंकडं येतात. वस्तीतली  घरगुती भांडणं आणि समस्याही गीताबाई सोडवतात.

तारिणी बेदींनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रात सेनेच्या महिला विभागाच्या प्रमुख एडवोकेट चुरींचं व्यक्तिमत्व ठळकपणे लक्षात रहातं. सीता आणि गीता यांच्या बरोब्बर दुसऱ्या टोकाचं चुरींचं व्यक्तिमत्व. अभ्यासू, सुखवस्तू संस्कृती, कायद्यानं वागणं, मृदूतेनं लोकांचे प्रश्न सोडवणं. चुरीबाई डॅशिंग नाहीत.

पुस्तक वाचल्यानंतर सेनेचं एक वेगळंच चित्र तयार होतं. तळात काम करणाऱ्या निरलस महिला कार्यकर्त्या. कोंडी झालेल्या समाजात बेधडक-बिनधास्त पद्धतीनं प्रश्न तडीस लावणाऱ्या कार्यकर्त्या. इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते (पुरुष-महिला) शांततामय इत्यादी पद्धतीनं कामं करतात, सेनेच्या महिला कार्यकर्त्या राडा करायला तयार. त्यांची वाट समाजाला मान्य न होणारी पण प्रभावी. बहुतांश कार्यकर्त्या बहुजन समाजातल्या, दलित, मागासवर्गीय. शिवसेनेची राजकीय घडण वेगळी असल्याचं या धाडसी महिलांच्या कामाकडं पाहून लक्षात येतं.

                                  तारिणी बेदी

दी डॅशिंग लेडीज ऑफ शिव सेना हे पुस्तक शिव सेनेचा एक वेगळाच पैलू वाचकांसमोर ठेवतं. शिव सेनेच्या विकासात आणि टिकण्यात महिलांचा वाटा किती आहे ते वरील पुस्तक अप्रत्यक्षपणे दाखवतं. अप्रत्यक्षपणे अशासाठी म्हणायचं की पुस्तकाचा मुख्य विषय आहे सेनेतलं धाडसी-डॅशिंग स्त्रियांचं स्थान. परंतू धाडसी महिलांच्या गोष्टी ऐकत असताना सेना बलवान का झाली या प्रश्नाचं एक उत्तर अलगदपणे वाचकाला सापडतं.

झोपडपट्ट्या, गरीबवस्त्या, वंचित वस्त्या यातल्या लोकांच्या नागरी अडचणी सेनेच्या महिला सोडवतात. मालकीचं घर, सांडपाणी व्यवस्था, पाणी मिळवून देणं, खाजगी भाई आणि पालिका यांच्याकडून होणारी दादागिरी आणि अन्याय यांच्यापासून संरक्षण देणं इत्यादी कामं या महिला निरलसतेनं करतात. या कामाचं एक मॉडेल मृणाल गोरे यांनी तयार केलं होतं. विधायक आणि कायदेशीर संघर्ष हे ते मॉडेल होतं. प्रश्न हाती घ्यायचे, मोर्चे काढायचे, निवेदनं द्यायची, सनदशीर मार्गानं पण संघर्षाच्या वाटेनं प्रश्न सोडवायचे. यात सेनेनं स्वतःच्या स्टाईलची भर घातली. बेधडक राडे करणं. सरकारी अधिकारी किवा बिल्डर किंवा कोणाच्याही कानाखाली आवाज काढणं, त्यांना धोपटणं. मोर्चा किंवा तत्सम प्रसंगी तोडफोड करणं.  मृणाल गोरे अधिक सेना असं मिश्रण महिलांनी साधलं.   त्यांनी सेना अधिक प्रभावी केली.

महिला कार्यकर्त्यांचं एक नेटवर्किंग असतं. हळदी कुंकू, संक्रांत, गोविंदा इत्यादी सांस्कृतीक प्रसंगी महिला एकत्र येतात. यात राजकारण आहे असं कोणालाही वाटत नाही. सेनेला या नेटवर्किंगचा उपयोग होतो. नारायण राणे याना हरवण्यासाठी मुंबईहून महिला सैनिकांची फौज कोकणात गेली होती आणि नेटवर्किंगचा उपयोग करून त्यांनी राणेंच्या मतदारांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळवला होता.

ठाकरे म्हणत की सेनेला राजकारण करायच नाहीये, समाजकारण करायचंय. सेनेतल्या स्त्रियांनी ठाकरेंचं म्हणणं अमलात आणलं. बेदी यांच्या पुस्तकातल्या बहुतेक सगळ्या धाडसी महिला धडाडीनं समाजकार्य करतात पण राजकारणात फार पडत नाहीत. शाखा प्रमुखांनी आदेश दिला की  मोर्चे, तोडफोड, सभा यात  सामिल होतात.  त्या आधी आणि नंतर त्या आपापल्या ठिकाणी आपापली कामं करत रहातात.

तारिणी बेदी यांचं पुस्तक शिव सेना या विषयावर नाहीये. शिवसेनेतल्या डॅशिंग महिला हा पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. शिव सेनेची संघटना, राजकीय विचार इत्यादी विषय अभ्यासाचा भाग नाहीत. जाता जाता काही निरीक्षणं या पुस्तकात येतात, ती विचार करायला लावणारी आहेत.

सेनेमधे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे असं ओझरत्या उल्लेखातून लक्षात येतं. उद्धव ठाकरे यांच्या भेटीला एक कॉर्पोरेटर महिला जातात तो प्रसंग लेखिकेनं चित्रपटासारखा रेखाटला आहे. त्यातही आडून आडून स्त्रीच्या स्थानाचा मुद्दा येतो.

मुंबईची घडण बदलणाऱ्या दोन घटना घडल्या. एक म्हणजे मुंबईतल्या गिरण्या व इतर उद्योग बंद होणं. त्यामुळं मुंबईतली मराठी माणसं कमी झाली, देशोधडीला लागली. दुसरी घटना म्हणजे मुंबईचा विस्तार. जुन्या वस्त्यांच्या जागी नव्या टोलेजंग किमती इमारती येऊ लागल्या. या बदलाच्या संक्रमण काळात ज्यांना त्रास झाला त्या लोकांच्या बाजूनं शिव सेना उभी राहिली. त्रस्त मराठी माणसं. या माणसांनीच शिव सेनेला पाठिंबा दिला, मतं दिली.

आता मुंबई बदललीय. आता त्रास होणाऱ्या मराठी माणसांची संख्या कमी झालीय. ज्यांना त्रास होतोय ती माणसं बिगरमराठी आहेत आणि सुखवस्तू आहेत, चांगल्या घरांमधे रहाणारी आहेत. या माणसांचे प्रश्न सोडवण्याचं राजकीय तंत्र शिव सेनेला माहित नाही. ते तंत्र भाजप किवा कोणत्याही राजकीय पक्षाला माहित आहे.  शिव सेवा रूढार्थानं राजकीय पक्ष कधीच नव्हती.  बदललेल्या मुंबईचे प्रश्न सोडवण्याची वाट सेनेला माहित नाही. बदललेल्या मुंबईतली माणसं रस्त्यावर येणारी, राडे करणारी नाहीत.

म्हणूनच सेना नागरी प्रश्नांपेक्षा हिंदुत्व, व्यापक राष्ट्रीय कार्यक्रम  यावर भर देत असावी.

शिवसेना या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. किंगशुक नाग यांचं सॅफ्रन टाईड, सुजाता आनंदन यांचं सम्राट, वैभव पुरंदरे यांचं बाळ ठाकरे ही इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस यांनी लिहिलेल्या बाँबे मेरी जान या पुस्तकामधे शिवसेनेवर काही मजकूर आहे. प्रकाश अकोलकर यांनी जय महाराष्ट्र या नावानं सेनेचा इतिहास लिहिला आहे. विजय सामंत आणि हर्षल प्रधान यांनी सुवर्ण महोत्सवी सेना नावाचं पुस्तक लिहिलंय. हर्षल प्रधान आणि श्वेता परुळेकर यांची बाळ ठाकरे यांची भाषणं संकलित केली आहेत. सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर लिहिलेल्या पुस्तकात सेनेचं विश्लेषण आहे. डॅशिग लेडीज या पुस्तकानं सेना या विषयावरच्या साहित्यात एक वेगळी भर घातली आहे.

।।

 

वसंत सरवटे, विजय तेंडुलकर, यांची शाखा

वसंत सरवटे, विजय तेंडुलकर, यांची शाखा

वसंत सरवटे गेले. शाखेवरचा एक स्वयंसेवक गळाला.

रविवारची शाखा. शाखेचे संस्थापक विजय तेंडुलकर. शाखेत उपस्थित रहाणारे स्वयंसेवक- वसंत सरवटे, बाजी कुलकर्णी, निळू दामले. साधारणपणे रविवारी शाखा भरे. तेंडुलकर कधी कधी परगावी असत. तेव्हां ते अनुपस्थित. बरेच वेळा निळू दामले दुनियाभर भटकत असत. तेव्हां ते अनुपस्थित. अशा वेळी आठवड्यातल्या इतर दिवशी शाखा भरत असे, इतर स्वयंसेवक शाखा भरवत. शाखेवर गेस्ट स्वयंसेवकही येत असत. जसे अवधुत परळकर, सुबोध जावडेकर, संदेश कुलकर्णी, पंकज कुरुलकर, सचिन कुंडलकर.
शाखेचा कार्यक्रम म्हणजे पुस्तकांची चर्चा, पुस्तकांची देवाण घेवाण, एक सिनेमा पहाणं आणि दुनियाभरच्या गोष्टींवर चर्चा. सरवटे मितभाषी. मोजकं बोलणारे, कोणालाही न दुखावणारे. तेंडुलकरही सवाई मितभाषी. मान हलली की नाईलाजानं शब्द हिंदकळून बाहेर येत. बाजी कुलकर्णी तर या दोघांचेही बाप. हाताची घडी आणि तोंडावर बोट. तिघेही एकूणात खालच्या पट्टीत बोलणारे. शाखेत दणादण ऐकू येई ते निळू दामले बोलू लागल्यावर.

बाजी कुलकर्णींच्या घरच्या शाखेत जमणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त सुधाताई कुलकर्णी करत असत. शाखा चालू असताना त्यांचं पदार्थ करणं चालू असे. मधून मधून त्यांच्या शेलक्या सुचना आणि प्रतिक्रिया येत असत. कारण त्यांचा एक कान कुकरच्या शिट्टीकडं असे आणि दुसरा शाखेच्या कामकाजाकडं. कधी कधी शाखा सरवटेंच्या घरी भरत असे. त्यांचा मुलगा सत्यजीत फार लाघवी. त्याला माणसांची ओढ. त्याच्या आग्रहामुळं सरवट्यांच्या घरी शाखा भरे. सरवटेंच्या कुटुंबातली सर्व माणसं शाखेत भाग घेत, प्रामुख्यानं ऐकत. सरवट्यांची मुलगी मंजू खाण्यापिण्याचा उत्तम बंदोबस्त ठेवत असे.

तेंडुलकर आणि बाजी कुलकर्णी ते वाचत असलेल्या पुस्तकाबाबत बोलत. तेंडुलकरांभोवती वाचणारी आणि लिहिणारी माणसं फार. ती तेंडुलकरांना पुस्तकं देत, पुस्तकं सुचवत. त्या पुस्तकावर तेंडुलकर बोलत. जगभरच्या अनेक नावाजलेल्या लेखकांचा, सिनेमावाल्यांचा, नाटकवाल्यांचा तेंडुलकरांशी जिवंत संपर्क. ती माणसं, त्यांचं त्यांचं जे काही असेल ते तेंडुलकरांच्या बोलण्यात प्रथम पुरुषी एक वचनी येत असे. कुसुमाग्रज काय म्हणाले, डॉक्टर (म्हणजे लागू) पुस्तकांत असं असं म्हणतो, दामूमुळं मी नाटककार झालो, सेनापती बापटांना शेवटी शेवटी त्यांच्या लहापणच्या गोष्टीच आठवायच्या, कमलाकर आणि लालन सारंगनं खूप सोसलंय, बेनेगलशी काय बोलणं झालं. वीणा सहस्रबुद्धेंची गायनकुस्ती. पैलवान बेगम अख्तर असं खूप बरंच.

बाजी कुलकर्णी तर वाचण्यासाठीच जगतात. ते इंजिनियर. व्यवसाय करतात पुस्तकं विकत घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी. हज्जारो पुस्तकं. त्यांनी पुस्तकं सुचवायची, स्वयंसेवकांनी ती वाचायची असं घडत असे. एकदा बाजींनी स्टालिनचं एक साताठशे पानांचं पुठ्ठा बांधणीचं चरित्र तेंडुलकरांना दिलं. बाजींना भलावण-आग्रह करण्याची सवय नाही. ते नुसतं वाचून पहा असं म्हणतात.
साताठ दिवसांतच तेंडुलकरांचा सर्व स्वयंसेवकाना फोन. ” स्टालीन चरित्र उत्तम आहे. स्टालीन हा आपल्याला क्रूरकर्मा म्हणून माहित आहे. पण त्याची इतर अंगं कधी आपल्याला कळली नाहीत. स्टालीन दांडगा वाचक होता. आठवड्या आठवड्याला कादंबरी संपवत असे. कादंबरी पान क्रमांक आणि ओळीसकट उल्लेखित असे. साहित्यात तो रमलेला होता.वाः. मी पुस्तक हातात घेतलं आणि संपवून टाकलं.”
नंतर ते पुस्तक इतर स्वयंसेवकांनी वाचलं.

अनेक चर्चा घनघोर असत. भांडण चाललंय असं वाटावं इतक्या. एकदा सर्वांनी पृथ्वीवर पोलान्स्कीची मॅक्बेथ पाहिली. तेंडुलकर नाटकवाले. त्यांना मॅक्बेथवर सिनेमा करणं मुळातच आवडलेलं नव्हतं. सरवट्यांचंही तेच मत होतं. दोघांचंही नाटकांवर प्रेम. ते वाढले तो जमाना नाटकांचा होता. तेंडुलकरांचा सिनेमाशी संबंध भरपूर. पण तरीही त्यांचा पिंड नाटककाराचा. सिनेमा पहातानाही ते कधी कधी डोळे मिटून घेत, संवाद ऐकत. एकूणात दोघांनाही मॅक्बेथ फिल्म आवडली नव्हती. दामले खुष होते. त्यांना नाटकांची ओढ नसे, ते सिनेमावाले. पोलान्स्कीनं मॅक्बेथ करतांना सिनेमात असायला हवेत ते तपशील घेतले होते. मॅक्बेथ हा सिनेमा होता, नाटक नव्हतं. शेक्सपियरच्या काळातलं फिजिकल वास्तव नाटकात दिसत नाही. ते पोलान्स्कीनं अभ्यास करून तपशिलासह सिनेमात दाखवलं होतं. तेंडुलकरांना त्या काळातलं राजकारण, इतिहास इत्यादीत रस नव्हता, त्यांना नाटकातली पात्रं-त्यांच्यातला गुंता-संवाद हेच महत्वाचे वाटत होते. ते बरोबरही होतं कारण तेच नाटकाचं मर्म असतं. दृष्टीकोनाचा फरक होता. पृथ्वी थिएटरवर चर्चा सुरु झाली. कारमधे ती चर्चा चालू राहिली. नंतर घरीही ती चर्चा सुरु राहिली. सरवटे आणि तेंडुलकर दोघेही अस्वस्थ होते.

शाखा. डावीकडून. सत्यजित. सरवटे. तेंडुलकर.बाजी  कुलकर्णी.

सरवट्यांकडील शाखा वेगळ्या वळणानं जात असे. मराठीतले सर्व मोठे लेखक आणि प्रकाशक सरवट्यांच्या परिचयाचे. मुखपृष्ठ करण्यासाठी ते लेखकांशी, प्रकाशकांशी बोलत. सरवटेंचा स्वभाव गोड. सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. पुल देशपांडे, दुर्गाबाई, लागू, श्रीपु भागवत, मंत्री,गडकरी, कानेटकर, मोकाशी, दळवी, अशा अनेक माणसांचा त्यांचा दीर्घ संबंध. त्यांच्या गोष्टी सरवटे सांगत. त्यात किल्मिष नसे टीका नसे तिरकसपणा नसे.

सरवट्यांनी दृष्टी त्यांच्या व्यंगचित्रातून दिसते. ती तुम्हाला हसवतात,विचार करायला लावतात, त्यात एकादी हलकीशी टपली असते. ज्याचं व्यंग चित्र असे तो माणूसही चित्र पाहून खुदकन हसे. सरवट्यांनी रेखाटलेला दळवींचा ठणठणपाळ हातोड्याला टेकून उभा असतो. आता कोणाच्या टाळक्यात हातोडा घालणार असा विचार करत वाचक वाचन सुरू करतो. साहित्य आणि साहित्यीक यांची बित्तंबातमी त्यात असे. स्तंभ वाचून लेखक संतापलेत, खटला भरायला निघालेत असं कधी झालं नाही. दळवी आणि सरवटे. एकाचे शब्द, दुसऱ्याच्या रेघा. एकाच माणसानं दोन्ही गोष्टी केल्यात असं वाटावं. विंदा करंदीकराच्या कवितांसाठी सरवटेंनी काढलेली व्यंगचित्रं आणि तेंडुलकरांचा सरवटेंनी रेखाटलेला घाशीराम. घाशीरामचं चित्र बाजी आणि तेंडुलकर दोघांच्याही भिंतींवर.

सरवट्यांच्या व्यंगचित्रांना व्यापक समाजाचं नेपथ्थ्य असे. त्यातली माणसंही व्यापक समाजाचा भाग असत. व्यंगचित्रातल्या मुख्य माणसाचं वैशिष्ट्यं हलकेपणानं चित्रात येई पण शेवटी ते पात्र व्यापक नरेशनचा भाग असे. सरवटे कमीच बोलत. गंमती सांगत. ते जगाकडं एका अंतरावरून पहात आहेत, त्यात कुतुहुल आणि उत्सुकता आहे, राग वगैरे नाही असं नेहमी जाणवत असे. तेंडुलकर म्हणत की सरवटे हा फार खोल माणूस आहे, संत आहे. सरवटे म्हणत की तेंडुलकरांबरोबर पन्नासेक वर्षाचा घनिष्ट संबंध असला तरी आपल्याला ते कधीच पूर्णपणे समजलेले नाहीत.

नवी माहिती, जुन्यांना उजाळा असं चर्चेचं स्वरूप असे. सरवटे आणि तेंडुलकर यांचा साहित्य क्षेत्रात पन्नासेक वर्षाचा वावर होता. मराठी साहित्यातल्या महत्वाच्या व्यक्तींच्या सहवासात दोघं आले होते. त्यांच्या कडुगोड आठवणी सरवटे आणि तेंडुलकर काढत. कडू कमी गोड जास्त. साहित्यिक आणि कलाकारांचं मर्म आणि त्यांच्या गमती जमती जास्त असत.

शाखेवरच्या गप्पांची हकीकत ऐकून आकाशवाणीचे  जयंत एरंडे, मेधा कुलकर्णी यांनी सरवटे आणि तेंडुलकर यांच्या गप्पा रेकॉर्ड करायचं ठरवलं. दोन भाग झाले. नंतर रेकॉर्डिंग कां थांबलं कळलं नाही. आकाशवाणीकडं ते रेकॉर्डिंग शिल्लक असेल तर मराठी माणसांना ते जरूर ऐकायला मिळावं.

गप्पामधे कधी कधी बंडल साहित्यिक, बंडल कलाकार यांचे उल्लेख येत. सरवटे आणि तेंडुलकर सावधगिरीनं बोलत. सरवटे किंवा तेंडुलकर कधी आवाज चढवून, रागावून बोलत नसत. राजकारणावर चर्चा होत असे. पुढारी हे सर्वांचं एक आवडतं टार्गेट असे. या चर्चेत मात्र तेंडुलकर खुलत, कडक बोलत. एकदा महाराष्ट्रातल्या एका पुढाऱ्यावर तेंडुलकर भयंकर खवळले होते. क्वचितच ते इतके खवळत. त्यांनी त्या पुढाऱ्याला नाव ठेवलं – मादरणीय अमूक तमूक. हा शब्द नंतर गप्पांत नेहमी येत असे.सरवटे मात्र राजकारणी लोकांचा विषय निघाला की गप्प असत. असतात अशी माणसं, आपण बोलून काय फायदा असा त्यांचा कल असे.

कधी कधी सहल निघे. प्रदर्शन पहायला, सिनेमा पहायला. तिथे शाखा भरे. एकदा शाखेनं पिकासोचं प्रदर्शन पाहिलं. सरवट्यांनी पिकासोचं चित्रकार असणं म्हणजे काय ते समजावलं. एकदा शाखा दामलेंच्या पेणमधल्या चित्रकुटीरमधल्या घरात भरली. दर दिवाळीला एक सहल असे. पाच बागेत फिरणं आणि नंतर मणीज मधे जाऊन वडासांबार आणि कॉफी. फिरतांना, मणीजमधे शाखेचं कामकाज चालत असे.

शाखेत किती पुस्तकांची आणि सिनेमा नाटकांची चर्चा झाली याची गणती करता येणार नाही.
तेंडुलकरांची तब्येत ढासळू लागली तशी शाखा विस्कळित झाली. ते दीर्घ काळ पुण्यात उपचार घेत होते. तेव्हां त्यांच्या हॉस्पिटलातल्या खोलीत शाखा भरे.

तेंडुलकर गेले. शाखेचा संस्थापक स्वयंसेवक गायब झाला. शाखा चालू राहिली. सरवटेंच्या घरी आणि बाजींच्या घरी. यथावकाश सरवट्यांची तब्येत त्यांना त्रास देऊ लागली. सरवटेंच्या मुलाची, सत्यजीतची प्रकृती ठीक नसे. सरवटे स्वतःच्या आणि सत्यजीतच्या प्रकृतीत गुंतत गेले. त्यांच्या घरी शाखा भरेनाशी झाली.

सरवटे गेल्यानं शाखेवरचा आणखी एक स्वयंसेवक अनुपस्थित झाला.

बाजी कुलर्णींच्या घरची शाखा अजूनही सुरु आहे. बाजी, सुधाताई आणि दामले शाखेवर हजर असतात.
।।

नोटरद्दीकरणाचा आतबट्ट्याचा रहस्यमय निर्णय

नोटरद्दीकरणाचा आतबट्ट्याचा रहस्यमय निर्णय

          उद्यापासून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द      आठ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री नरेंद्र मोदींनी घोषणा केली की व्यवहारातल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तत्काळ निकामी होतील. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मोदींनी मुदत दिली. दहशदवाद्यांना होणारा धनपुरवठा संपवून दहशतवाद संपवणं, खोट्या नोटा नाहिशा करणं आणि काळा पैसा खतम करणं या साठी आपण ही कारवाई करत आहोत असं मोदींनी जाहीर केलं. पन्नास दिवसांची मुदत मागितली. २८ डिसेंबर २०१६ रोजी मुदत संपली.

मोदींनी वरील निर्णय जाहीर केला तेव्हां ५०० आणि १००० च्या सुमारे १५.४ लाख कोटी नोटा व्यवहारात होत्या. नव्या ५०० आणि २००० च्या नोटा चलनात येतील असं मोदी  यांनी जाहीर केलं. १५.४ कोटी जुन्या नोटांपैकी सुमारे १३ टक्के नोटा खोट्या, बेहिशोबी असतील असं अर्थखात्याचं अनधिकृत म्हणणं होतं. म्हणजे तेवढ्या वगळून बाकीच्या किमतीच्या नव्या नोटा व्यवहारात जातील आणि हिशोबी व्यवहार करणाऱ्या जनतेला तेवढ्या नोटा परत मिळतील अशी अपेक्षा होती.
भारतात नोटा छापण्याचे सहा कारखाने आहेत. त्यांची क्षमता पहाता आणि त्यांनी ५०० व २००० च्या आवश्यक नोटा छापून जनतेला पुरवायच्या म्हटल्या सहा ते आठ महिने लागणार ते. ही माहिती मोदी यांनी भाषणात किंवा नंतर कधीही उघड केली नाही.
९ नोव्हेंबर पासून लोकांनी नव्या नोटा घेण्यासाठी रांगा लावायला सुरवात केली. आज ६ जानेवारी उजाडला आहे, नोटेच्छुकांच्या रांगा संपत नाहीयेत.
आठ नोव्हेंबरनंतर नगरोटा या हद्दीवरच्या गावातल्या लष्करी तळावर पाकिस्तानी फिदायीन मंडळीनी हल्ला करून जवान मारले. दहशतवाद्यांकडं नव्या दोन हजारच्या नोटा सापडल्या. म्हणजे भारतीय नोटांचा दहशतवाद्यांना होणारा नोटांचा पुरवठा पूर्ववत झाला होता. त्या नोटा खोट्या असतील तर खोट्या नोटा छापण्याची व्यवस्थाही पूर्ववत होती.
डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यात महाराष्ट्रात नाशकात खोट्या नोटा छापणारा माणूस पोलिसांनी पकडला. एक लॅपटॉप आणि प्रिंटर यांचा वापर करून नोटा छापल्या जात होत्या. देशभरात करोडो लॅपटॉप आणि प्रिंटर आहेत.
व्यवहारात असलेल्या नोटा रद्द करून दहशतवाद्यांचा पतपुरवठा थांबत नाही. खोट्या नोटा छापणं ही कायम टिकणारी व्यवस्था असल्यानं जोवर ती व्यवस्था नष्ट होत नाही तोवर खोट्या नोटांनाही आळा बसत नाही.
दहशतवादाचा बंदोबस्त ही एक स्वतंत्र गोष्ट आहे.
खोट्या नोटा नष्ट करणं हे एक स्वतंत्र प्रकरण आहे.खोट्या नोटा छापणाऱ्या गुन्हेगारांवर कडक लक्ष, त्यांच्यावर तडक कारवाई यामुळंच खोट्या नोटा नष्ट होऊ शकतात. नोटा रद्द करून तो उद्देश साध्य होत नाही.
तिसरा मुद्दा काळ्या पैशाचा.
काळा पैसा म्हणजे काय? कर न भरलेला, हिशोब न दिलेला पैसा म्हणजे काळा पैसा. हा पैसा नोटांच्या रुपात असू शकतो किवा जमीन/घरं/दागिने/सोनं/परदेशी बँकात साठवलेला पैसा अशा स्वरूपात असू शकतो.
जमीन/घरं/दागिने/सोनं यातला काळा पैसा कसा बाहेर काढणार? धाडी घालून संपत्तीचा तपास करूनच ते साधतं. एकाद्याकडं वरील गोष्टी सापडल्या तर त्याचा हिशोब करून त्या व्यक्तीला विचारलं जातं की वरील गोष्टींचा हिशोब द्या. हिशोब मिळाला नाही तर सरकार ती संपत्ती जप्त करतं.
मुंबईत किती तरी नामांकित नेत्यांचे प्रचंड बंगले आहेत आणि त्यांच्या दाराशी विदेशी गाड्या उभ्या असतात. त्या नेत्यांना साध्या चार पाच हजारांच्या नोकऱ्या तरी होत्या किवा उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं. तरीही इतकी माया गोळा झालीय. असे अगणित नेते मुंबईत आहेत. सर्व पक्षात. व्यवहारातल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करून वरील काळा पैसा बाहेर येत नाही.
अनेक माणसं परदेशातल्या बँकांत (स्विस बँका) पैसे ठेवतात. परदेशातल्या बँका अशा पैशाची माहिती द्यायला खळखळ करतात. भारत सरकारनं खूप लावून धरल्यावर काही स्विस बँकाना काही नावं जाहीर केली. परंतू त्यातून आजवर भारत सरकारच्या हाती काहीही लागलेलं नाही. कारण बँकांतल्या त्या ठेवीबात प्रत्येक ठेवीदाराचं काही तरी म्हणणं असतं. ते ऐकून घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं ही वाट फार वळणांची असते, त्यात इतर देश आणि आंतरराष्ट्रीय कायदे गुंतलेले असतात. पैसे साठवणारे लोक फार हुशार असतात आणि त्यांचे लागेबांधे प्रत्येक पक्ष आणि सरकारात असतात.

            ५८ दिवस झालेत. रांगा संपत नाहीयेत.

म्हणजे राहता राहिला प्रश्न तो नोटांच्या स्वरूपात साठवलेला काळा पैसा. भारत सरकार किवा रीझर्व बँकेकडं काळ्या चलनी नोटांचा कोणताही आकडा उपलब्ध नाही. सारं अंदाज पंचे दाहो दरसे अशी स्थिती आहे.
सरकारच्या वित्तविभागानं दिलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबरच्या आधी १५.४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. वित्तविभागाची अपेक्षा होती की नोटरद्दीकरण झाल्यानंतर २.२५ लाख कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात येणार नाहीत. म्हणजे तेवढा पैसा काळा पैसा होता असं सरकारचं मत होतं. सरकारची अपेक्षा होती की तेवढ्या नोटांचा लगदा होत असल्यानं त्या पैशाची जबाबदारी सरकारवर येत नसल्यानं परिणामतः सरकारी तिजोरी २.२५ लाख कोटी रुपयांनी भरेल.
६ जानेवारीपर्यंत उपलब्घ आकडेवारीनुसार ९७ टक्के नोटा बँकांकडं सुपूर्द झाल्या आहेत. काही नोटा लोकांनी जाळल्या, नदीत फेकल्या, देवस्थानांना दान केल्या. काही नोटा अजूनही लोकांनी दडवून ठेवल्या असतील. म्हणजे या घडीला सरकारचा हिशोब फेल गेलेला दिसतो. फारच कमी पैसे सरकारच्या हाती लागलेत.
नोटबंदी प्रक्रियेमधे सरकारला नव्या नोटा छापणं भाग होतं. नव्या नोटा छापणं, त्या देशभर पोचवणं, नोटबंदी व्यवहाराचा प्रचार इत्यादी गोष्टींसाठी सरकारचा १.२८ लाख कोटी रुपये खर्च झाला आहे. कदाचित जास्तच. म्हणजे हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला. पन्नास हजार कोटी किंवा त्याहीपेक्षा कमी पैसे मिळवण्यासाठी सरकारनं १.२८ लाख कोटी खर्च केले. (हा खटाटोप चालला असतानाच संसदेमधे रेलवेच्या अर्थव्यवहाराबद्दलची माहिती सादर करण्यात आली. रेलवे एक रुपया मिळवण्यासाठी एक रुपया पाच पैसे खर्च करते असा हिशोब सरकारनं दिला.)
नोटरद्दीकरणाच्या प्रक्रियेत शंभरपेक्षा जास्त माणसं मेली. करोडो लोकांचे रोजगार बुडाले. अठ्ठावन्न दिवस उलटून गेले तरीही जनतेला पुरेसं चलन मिळालेलं नाही. नोटा छापण्याची यंत्रणा आणि क्षमता पहाता आणखी काही महिने पुरेशा नोटा व्यवहारात येतील अशी शक्यता दिसत नाही.
नोटबंदीचा निर्णय नरेंद्र मोदींनी कोणाला विचारून घेतला ते कळलेलं नाही. बँकिंग आणि अर्थव्यवहार जाणणाऱ्या माणसांचा सल्ला मोदींनी घेतला होता की नाही ते कळायला मार्ग नाही. एकूणच मोदींचा निर्णय हे एक रहस्य आहे.
काळा पैसा ही देशासमोरची मोठी समस्या आहे की नाही? नक्कीच आहे. काळा व्यवहार कमी झाला तर अर्थव्यवस्था अधिक गतीमान नक्की होईल. तेव्हां काळ्या पैशावर नियंत्रण आणण्याचा मोदींचा इरादा योग्य आहे.
काळा पैसा आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. बेहिशोबी पैसा सामान्य माणूस ते उद्योगपती या सर्वांना ठेवावा लागतो कारण भारतात कोणताही व्यवहार बेहिशोबी पैसा मोजल्याशिवाय होत नाही. सरकारी यंत्रणा आणि राजकीय पक्ष असे दोघे मिळून अर्थव्यवहार आणि एकूण व्यवहारात अडथळे निर्माण करतात आणि ते अडथळे दूर करण्यासाठी पैसे घेतात. नोकरशाही आणि राजकीय पक्ष यांची हातमिळवणी असते.
सरकारी नोकरांना वाटतं की त्यांची लायकी त्यांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा खूप जास्त आहे. त्यांना वाटतं की ते समाजाची जी सेवा करतात त्याचं मोल इतकं आहे की खरं म्हणजे त्यांच्या पुढल्या काही पिढ्यांची सोय व्हायला हवी. नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून ते जमत नाही म्हणून त्यांना काळा पैसा हवा असतो.
पुढाऱ्यांची वेगळी गोष्ट. त्याना निवडणुकीसाठी खूप पैसे हवे असतात. माणशी पाचशे रुपयांप्रमाणं हज्जारो माणसं प्रचार मोहिमेच्या काळात राबवायची असतात. करोडो रुपये मोहिमेवर खर्च करायचे असतात. त्यांची मुलं आणि नातेवाईकांच्याही खूप अपेक्षा असतात. त्यांनाही आपल्या पुढल्या पिढ्यांची सोय करायची असते. तेव्हां त्यांनाही खूप पैसा लागतो.
सरकारी नोकर आणि राजकीय पुढारी-कार्यकर्ते यांच्याकडं एक सोपा मार्ग असतो. आर्थिक किंवा सामाजिक किंवा कोणताही व्यवहार करतांना अडथळे उभारायचे. प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी इतके हजार ते तितके कोटी रुपये मागायचे.
एक साधं दुकान काढायचं असलं तरी हज्जार परवानग्या. फूटपाथवर भाजी, फुलं, पानपट्टी विकणाऱ्यांनाही महिन्याला तीन साडेतीनशे रुपये पालिका आणि पोलिसांना द्यावे लागतात. मग करोडो रुपयांच्या प्रकल्पाचं तर विचारायलाच नको.
एकादा उद्योग किती सुरळीतपणे उभा राहू शकतो याचा विचार करून ईज ऑफ बिझनेस नावाचा एक निर्देशांक जगानं काढलाय. या निर्देशांकात भारताचा क्रमांक वरून १३० वा आहे.
सरकारी नोकरांच्या मदतीनं अनंत अडथळे उभारणं आणि नंतर ते दुर करण्यासाठी पैसे मागणं या खटाटोपासाठीच तर पुढाऱ्यांना निवडणूक लढवावी लागते.
भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात मिळून ७९० सदस्य निवडून येतात. एक सदस्य निवडून येतो तेव्हां तो सुमारे ४ प्रतिस्पर्ध्यांना हरवत असतो. निवडणुकीत सुमारे ३१६० उमेदवार उभे रहातात. निवडणुक आयोगानं लोकसभा निवडणुकीवरची खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवली आहे. निवडणूक आयोगाचा अंदाज आहे की प्रत्येक उमेदवार सुमारे ४ कोटी रुपये खर्च करत असतो. प्रत्येक उमेदवार सुमारे तीनेक कोटी बेहिशोबी पैसा खर्च करत असतो. खर्च हुशारीनं केला जातो, सत्तर लाखाची सीमा पाळल्याचं दाखवलं जातं. हे कसं घडतं याचं उत्तम मार्गदर्शन खुद्द नरेंद्र मोदीच करू शकतील. म्हणजे संसदेच्या निवडणुकीला सुमारे १३ हजार कोटी बेहिशोबी रुपये लागतात.
भारतातल्या विधानसभेचे ४१२० सदस्य आहेत. निवडून आलेला आमदार सुमारे तीनेक प्रतिस्पर्ध्यांना हरवत असतो. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांची संख्या होते १६ हजार ४८०. विधानसभा निवडणुक खर्चाची मर्यादा आहे रुपये २८ लाख. सरासरी उमेदवार एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असतो. म्हणजे ७० लाख गुणिले १६, ४८० इतके बेहिशोबी पैसे विधानसभा निवडणुकीत तयार होतात.
जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्राम पंचायतींचा हिशोब लावा. प्रत्येक निवडणुकीमधे प्रत्येक उमेदवार सरासरी किमान एक लाख बेहिशोबी रुपये खर्च करत असतो. लावा हिशोब.
डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यामधे देशभर पोलिस आणि ईडी छापे घालत आहेत.त्यात नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा सापडत आहेत. म्हणजे नव्या नोटा कोणी तरी जमा करतंय. म्हणजेच पुन्हा पैसा जमा करायला सुरवात झालीय. पाचशे आणि हजारांच्या नोटांऐवजी दोन हजारांच्या नोटा लोक जमा करू लागलेत.
कारण सरकारी नोकर आणि पुढाऱ्यांना नोटा लागतात, लागणार आहेत.
भ्रष्टाचार आणि काळा पैसा कसा नाहिसा होणार?
नोटांची रद्दी करून भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपत नाही हे सिद्ध झालंय.
||

पाकिस्तानचं लष्कर

पाकिस्तानचं लष्कर

जनरल बाजवा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झाले आहेत.

जनरल बाजवा. शरीफची निवड

पाकिस्तानात लष्कर प्रमुखाची निवड पंतप्रधान करत असतात.    पंतप्रधान लष्कर प्रमुख निवडतांना आपली सोय पहातात, लष्कर आपल्या बाजूला राहील अशा रीतीनं लष्कर प्रमुख निवडतात. प्रमुखपदाच्या रांगेत वरिष्ठतेनुसार क्रमांक लागणाऱ्या अनेकांना दूर सारून आपल्या ताटाखालचं मांजर बनेल असं मनात ठेवून पंतप्रधान लष्कर प्रमुख निवडतात. त्याच परंपरेनुसार पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल बाजवा यांना निवडलं आहे. तीन ज्येष्ठांना बाजूला सारून.

धार्जिणा लष्कर प्रमुख  पंतप्रधानाला उपकारक ठरतोच असं नाही. किंबहुना आजवरचा इतिहास सांगतो की लष्कर प्रमुख यथावकाश पंतप्रधानालाच लाथ घालतो.

पहिले लष्कर प्रमुख आणि अध्यक्ष अय्युब खान यांनी इतरांना दूर सारून जनरल याह्या खान यांना लष्कर प्रमुख नेमलं. याह्या खान दारू आणि स्त्री यात रुतलेले होते. त्यांनी अय्युब खानांनाच अकार्यक्षम ठरवून हाकलून दिलं.

भुत्तो सवंग लोकप्रियतेची चटक असलेले पंतप्रधान. त्यांना मुलतानमधे एका रूटीन लष्करी पहाणीच्या प्रसंगी झिया उल हक हा तसा कनिष्ठ अधिकारी भेटला. झियानी कुराणावर हात ठेवून आपण कसे भुत्तो निष्ठ आहोत ते मैदानात रणगाड्यासमोर उभं राहून सांगितलं. भुत्तो खुष झाले. अनेक सीनियर जनरलांना दूर सारून त्यांनी ब्रिगेडियर झियांना लष्कर प्रमुख केलं. यथावकाश झियांनी भुत्तोंना फासावर लटकावलं.

झिया विमान दुर्घटनेत मारले. मुशर्रफ त्याच विमानातून प्रवास करणार होते, काही कारणानं ते प्रवासात गेले नाहीत, वाचले. ते अगदी कनिष्ठ होते, बेशिस्त होते, आपली कर्तव्यं आणि व्यक्तिगत स्वार्थ यामधे ते कर्तव्य बिनधास दूर सारत. अशा कनिष्ठ माणसाला लष्कर प्रमुख केलं तर तो आपल्याशी प्रामाणिक राहील अशा आशेनं नवाज शरीफ यांनी मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख नेमलं. मुशर्रफनी शरीफना लाथ घातली, त्याना परागंदा करून टाकलं.

शरीफनी दुसऱ्यांदा सुरु झालेल्या कारकीर्दीत राहील शरीफ यांना निवडलं. राहील शरीफनी नावाजांच्या फांद्या सतत कापल्या. पंतप्रधानापेक्षा लष्कर प्रमुख आणि राजकीय पक्षापेक्षा लष्कर महत्वाचं आहे हे जनरल राहील शरीफ यांनी वारंवार दाखवून दिलं. परंतू नवाजांना हाकलण्याची सिद्धता करायची संधी मिळायच्या आधीच ते निवृत्त झाले.

जनरल बाजवांना राजकारणात फारसा रस नाही असं म्हणतात. दहशतवादा विरोधात नवाजनी चालवलेली झर्बेअजब मोहिम जन. बाजवा यांनी उत्साहानं चालवली असं म्हणतात. त्यामुळं बाजवा आपल्या सोबत आहेत अशी नवाजांची कल्पना असावी. इतिहासाची पुनरावृत्ती होते की इतिहासातलं वळण नवा इतिहास टाळतो ते पहायचं.

पाकिस्तान सरहद्दीवरच्या १०व्या कॉर्पमधे जन. बाजवा यांनी दीर्घ काळ काम केलं. काश्मिरची हद्द त्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. तिथं घडणाऱ्या घटना त्यांना चांगल्या माहीत आहेत, त्यात त्यांचा सहभाग होता. मुशर्रफही काश्मिर सरहद्दीवरच अनेक वर्ष होते. काश्मिरवर हल्ला करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कारगील हा त्यांचा शेवटला प्रयत्न. तो न जमल्याचं दुःख मुशर्रफना होतं. काश्मीर जिंकणं ही त्यांची महत्वाकांक्षा होती. बाजवा यांनाही तसंच वाटत असणं शक्य आहे.

बाजवांनी लष्कर प्रमुखपदाची शपथ घेतली नेमक्या त्याच वेळी नगरोटामधे फिदायीन हल्ला झाला आणि भारतीय सैन्यातली पाच माणसं मारली गेली.

बीबीसी आणि गार्डियन यांनी उरी घटनेनंतर सरहद्दीचा दौरा करून त्यावर वृत्तांत प्रसिद्ध केले. दहशतवादी संघटना (जैश, फिदायीन) पाक लष्कर ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावरील घरांमधे मुक्काम करून असतात हे त्या वृत्तांतातून स्पष्ट झालं. दहशतवाद्यांना कुमक मिळत असते ती सैन्याच्या उपस्थितीत. खुद्द सैन्य मदत करतं की नाही याचे पुरावे बीबीसी-गार्डियनला सापडले नाहीत परंतू दहशतवाद्यांचे हल्ले लष्कराच्या उपस्थितीत होत असतात येवढं मात्र त्यांनी सिद्ध केलं. सरहद्दीवरच्या पाकिस्तानी गावातल्या पाक नागरिकांनी सरकारला आणि लष्कराला या दहशदवाद्यांचा उच्छाद थांबवा अशी मागणी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून केली.

काश्मिर हद्दीवरचे हल्ले पाक लष्कराला माहित असतात. बाजवा यांना नगरोटामधला हल्ला माहित नव्हता असं म्हणता येत नाही. कारगील हल्ल्याबाबत शरीफ म्हणाले की त्यांना माहित नव्हतं, आणि मुशर्रफ म्हणाले की तो निर्णय स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी घेतला होता आणि गुप्ततेच्या कारणासाठी त्यांना सांगितला नव्हता. दोघांच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.  जर इतके महत्वाचे निर्णय लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानाला न सांगता होत असतील तर त्या देशाचं खरं नाही असंच म्हणावं लागेल.

जनरल अयुब खान. भुट्टोंनी फुटवलं.

स्वातंत्र्य ते २०१५ या ६८ वर्षाच्या कालखंडात पाकिस्तानात जन.अय्युब खान, जन.याह्या खान, जन. झिया उल हक आणि जन. परवेझ मुशर्ऱफा यांच्या सैनिकी राजवटींनी राज्य केलं. 68 वर्षात ३३ वर्षं लष्करी राजवट. उरलेल्या ३५ वर्षातही पाकिस्तानातल्या मुलकी राजवटींना लष्कराच्या म्हणण्याप्रमाणंच वागावं लागलेलं आहे. लष्कराला मंजूर असलेलीच माणसं पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होतात. लष्कर सांगेल ते धोरण सरकारला, संसदेला अवलंबावं लागतं.कारण लष्कर हा पाकिस्तानी समाजातला एक सर्वात प्रमावी आणि मोठा संघटित घटक आहे.

लष्कर सर्वात प्रभावी घटक कां आहे? माणसं आणि संघटनेच्या हिशोबात विचार करता दर १८० माणसांमागं एक लष्करी/अर्धलष्करी सैनिक असं प्रमाण आहे. पोलिस वेगळेच. तुलनाच करायची झाली तर भारतात ४८० माणसांमागे एक लष्करी/अर्धलष्करी सैनिक असं प्रमाण आहे. जगभर युद्ध खेळणाऱ्या अमेरिकेत २३८ माणसांमागे एक सैनिक असं प्रमाण आहे. पाकिस्तान आणि अमेरिका दोघांच्या लष्कराचा आकार जवळजवळ सारखाच आहे.

मोठं सैन्य बाळगायला हरकत नसते, ते पेलण्यायेवढी देशाची आर्थिक ताकद हवी. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या दहापट मोठी आहे आणि  अमेरिकेची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या ८० पट मोठी आहे.  मुळात अर्थव्यवस्था लहान. त्यातलाही फार मोठा भाग पाकिस्तान लष्करावर, संरक्षणासाठी खर्च करतं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हां पाकिस्तान एकूण खर्चाच्या   ६८ टक्के रक्कम संरक्षणावर खर्च करत होतं. काळाच्या ओघात हा खर्च कमी झाला तरी तो सोळा सतरा टक्क्याच्या घरात आहे. ही फार मोठी रक्कम आहे.

सैन्याचा आकार आणि त्यावर होणारा खर्च सैन्याचं एक रूप दाखवतो. पण त्याही पलिकडंच एक वेगळं रूप सैन्याला आहे. फौजी फाऊंडेशन, आर्मी वेलफेअर ट्रस्ट, शाहीन फाऊंडेशन आणि बाहरिया फाउंडेशन अशा चार महाआकार संस्था पाकिस्तान सरकारनं स्थापन केलेल्या आहेत. सैन्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी या संस्था स्थापन केल्या गेल्या. निवृत्तीनंतर सैनिकांना सुखानं जगता यावं यासाठी सरकारनं या संस्थांच्या माध्यमातून जमिनी, कर्जं, रोजगार इत्यादी गोष्टी पुरवल्या आहेत. बाजारभावाच्या तुलनेत चणेदाण्याच्या किमतीत. सुरवातीला व्यक्तिगत पातळीवर जमिनी देण्यावर, रहाण्यासाठी जागी देण्यावर भर होता. नंतर नंतर कारखाने, बँका, वित्तीय संस्था इत्यादीही या संस्थांकडं दिल्या. देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीमधे या संस्थांकडून होणारी उलाढाल चार ते पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे असा अंदाज आहे. देशाची गरज म्हणून, मुलकी संस्था नीट काम करत नाहीत म्हणून, संकटकाळीन व्यवस्था म्हणून सेनाप्रमुखानं ज्यात पैसा आहे अशी कामं सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी चालवलेल्या संस्थांकडं सोपवायला सुरवात केली.

झुल्फिकार अली भुट्टो.जनरल हकनी भुट्टोंना फासावर चढवलं.

एकदा देशात अन्नाचा तुटवडा झाला. कराचीच्या बंदरातून पटापट धान्य देशात जात नव्हतं. जन झियांनी अन्नधान्याचा व्यापारच सैनिकी संस्थेकडं सोपवला. धान्य मिळालं पण ते रस्त्यावरून वहातूक होऊन देशभर पोचायला हवं. त्यासाठी झियांनी देशभरच्या रस्ते बांधणीचं कंत्राटच एक लष्करी माणसांनी चालवलेल्या संस्थेला देऊन टाकलं. नंतर चीनपासून कराचीपर्यंत जाणारा एक्सप्रेस रस्ताही याच संस्थेकडं दिला गेला. हज्जारो कोटींचा व्यवहार.

एकदा मुशर्ऱफ निवडणुचीचे डावपेच खेळत होते. कराचीत त्यांना हातपाय पसरायचे होते. सिंध, पंजाब इत्यादी राज्यातले गरीब आणि मध्यम वर्गीय यांना रहाती घरं मिळावीत यासाठी मुशर्ऱफ यांनी एक गृहबांधणी संस्था काढली, तिची मालकी लष्करी अधिकारी-सैनिक यांच्याकडं सोपवली. शेकडो एकर जमीन चणे दाणे भावानं या संस्थेला मिळाली. मग शेकडो कोटींची बांधकामं या संस्थेनं केली. कराचीतल्या भर वस्तीतले हलवा भूखंड सरकारनं या संस्थेला स्वस्तात दिले आणि तिथं घरं बांधून कित्येक हजार कोटींचा फायदा या संस्थेनं घेतला.

माजी सैनिक, माजी जनरल इत्यादींना व्यक्तिगत पातळीवर आणि सहकारी संस्थांच्या वाटेनं पाकिस्ताननं सुमारे १.२ कोटी एकर जमीन दिलेली आहे. पैकी ७० लाख एकर शेत जमीन आहे. शेतीच्या जमिनीवर शेती होते, दूध प्रकल्प चालवले जातात. शेती आणि दूध प्रकल्पात काम करणारे मजूर मुलकी असतात, मालक आणि वरिष्ठ अधिकारी माजी सैनिक असतात. सैनिकांचीच मालकी असल्यानं त्यांना कोणी जाब विचारू शकत नाही. जनरल मुशर्ऱफनी इस्लामाबादमधे शेतजमीन घेतली आहे. चार कोटी रुपयांना. जमिनीवर काम करणारे अधिकारी आणि मजूर इत्यादी सैन्यातले असतात. म्हणजे ते नोकरी सैन्यात करतात आणि काम मुशर्ऱफ यांच्या शेतावर करतात. मुशर्ऱफच्या शेतीला वीज पटकन मिळते, पाणी पटकन मिळतं, साऱ्या व्यवस्था बिनबोभाट होतात, भले आसपासच्या इतर नागरिकांना यातलं काहीही मिळत नसो. शिवाय बहुदा या सर्वांची किमत घेतली तरी जात नाही किवा अगदीच चणेफुटाणेच्या किमतीत मिळतात. कारण रेंजर्समधला वरिष्ठ अधिकारी या शेतीचं व्यवस्थापन करत असो. तो अधिकारी पालिकेत, सरकारी कचेरीत गेला की कोणाची बिशाद असते त्याला प्रश्न विचारण्याची.

जन. झिया. भुट्टोंनी निवडलं, भुट्टोंनाच फासावर लटकवलं.

पाकिस्तानी सैन्यात अशी किती तरी माणसं नेमली गेली आहेत की ज्यांनी कधीही ना परेडवर हजेरी लावली, ना  सैनिकी कामं केली. त्यांनी पहिल्या दिवसापासून ब्रिगेडियर ते जनरल अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी कामं केली.

पंजाबात ओकारा आणि रेनाला या ठिकाणच्या २२ गावांच्या परिसरात सैन्यानं १६, ६२७ एकर जमीन घेतलीय. तिथं शेती आणि दूध व्यवसाय चालतो. गावातल्याच मजुरांना तिथं काम करावं लागतं. मजुरांना रोजगार कमी दिला जातो. सरकारनं ताब्यात घेण्याआधी या जमिनी खंडानं करणाऱ्या कुळांना अधिकार होते, धान्य मिळत होतं. सैन्यानं ते सारे अधिकार काढून घेतले. मजुरांनी बंड केलं. सैन्यानं रणगाडे इत्यादी वापरून लष्करी कारवाई करून गावं वेढली, गावकऱ्यांची औषधं, अन्न वगैरे बंद केलं. बंड मोडून काढलं. या खटाटोपात ९ गावकरी मेले.

सैन्याला करोडभर एकर सैन्याची गरज काय असा प्रश्न कोणी लोकसभेत विचारू शकत नाही. कराचीतल्या किंवा लाहोरमधल्या मलिदा भूखंडांवर किती उलाढाल झाली, फायदा कोणाला मिळाला हे प्रश्न लोकसभेत विचारता येत नाहीत. विविध लष्करी संस्थांमधे भ्रष्टाचार होतो, अकार्यक्षमता तर खूपच आहे. सैनिकी संस्थांनी चालवलेले बहुतेक सर्व व्यवहार तोट्याचे आहेत कारण ते बेहिशोबी आहेत, त्यांचं ऑडिट होत नाही, त्यावर लोकसभेत प्रश्न विचारता येत नाहीत. निवृत्त जनरल्सनी खेड्यात आणि शहरात भरपूर भूखंड घेऊन, त्यांचा व्यापार करून करोडो रुपयांची माया गोळा केलेली आहे. हा सारा व्यवहार अनैतिक, जनतेच्या पैशातून झाला आहे.

इंडोनेशिया आणि तुर्कस्तातानातही सैन्याचं वर्चस्व आहे. परंतू तिथल्या अर्थव्यवस्थेत लष्कराचा हस्तक्षेप पाकिस्तानच्या तुलनेत बराच कमी आहे. पाकिस्तानवर लष्कराचा जवळजवळ कबजाच आहे. पाकिस्तानात लष्करच सर्वेसर्वा आहे.

लष्कराच्या हातात येवढी सत्ता जनतेनं, राजकीय पक्षांनी कां दिली?

जनरल मुशर्ऱफ. शरीफना देशाबाहेर घालावलं. शरीफनी मुशर्रफना देशाबाहेर घालवलं.

पाकिस्तानची निर्मिती फाळणीसह, प्रचंड रक्तपातासह झाली. पाकिस्तानला काश्मिर हवा होता. तो मिळाला नाही. अगदी सुरवातीला काश्मिरात अफगाण लुटारू घुसले आणि त्यांनी काश्मिर काबीज करण्याचा प्रयत्न केला तोही लष्कराच्या इच्छेनुसार, राजकीय निर्णयानुसार नाही. प्रत्यक्ष लष्करी कारवाई न करता, लुटारू हस्तकांना पाठवून बेकायदेशीर आणि छुप्या मार्गानं काश्मिर घेण्याचा प्रयत्न लष्करानं केला, सरकारला बाजूला ठेवून.

काश्मिर आपल्याला मिळाला नाही, तो मिळवल्याशिवाय पाकिस्तान पूर्ण होत नाही अशी भूमिका लष्करानं घेतली. भारत हा हिंदू देश आहे आणि तो पाकिस्तान या मुसलमान देशाला खतम करायला टपला आहे असं लष्कर आणि पाकिस्तानी राजकीय एस्टाब्लिशमेंटनं ठरवलं. पाकिस्तान हा देश सेक्यूलर देश नसून द्विराष्ट्र सिद्धांतानुसार इस्लामी देश आहे असं पाकिस्तानी राजकीय एस्टाब्लिशमेंट आणि लष्करानं निश्चित केलं. त्यामुळं काश्मिर मिळवणं आणि इस्लामचा बचाव आणि प्रसार हेच पाकिस्तान या देशाचं परमकर्तव्य आहे असं लष्कर आणि राजकीय पक्षांनी ठरवलं.

सामान्यतः प्रत्येक देश आपली सीमा सुरक्षित ठेवत असतो, आपला भूभाग कोणी लाटू नये, आपल्या देशात घुसून कोणी उत्पात माजवू नये यासाठी प्रत्येक समाज लष्कराची निर्मिती करत असतो. जे देश केवळ संरक्षण नव्हे तर विस्तारासाठी, देशाच्या सीमा अधिक परवण्यासाठी  लष्कराची निर्मिती करतात, पसरणं हे आपलं कर्तव्य मानतात त्यांना लोभी देश असं म्हटलं जातं. पाकिस्तानचं वर्णन लोभी देश असं करता येईल. पाकिस्तानचं अधिकृत ध्येय इस्लामचा बचाव आणि प्रसार हे आहे. दुसरी मदिना तयार करणं याचाच अर्थ साऱ्या जगात इस्लामचा प्रसार करणं असाही होत असतो.

इस्लाम वाचवणं, हिंदूपासून इस्लामी समाजाचा-पाकिस्तानचा बचाव करणं, काश्मिर मिळवणं ही उद्दिष्ट अर्थातच लष्करी वाटेनंच साध्य होऊ शकतात. बळाचा- तलवारीचा वापर न करता पसरणं, इतर समाजातलं आपलं स्थान वाढवणं याची सवय इस्लामला नाही. त्यामुळंच उदाहरणार्थ भारताबरोबर संबंध सुरळीत करून परस्परांनी आर्थिक विकास घडवून आणणं ही गोष्ट लष्कराला मान्य नाही. जेव्हा जेव्हां सत्ताधारी राजकीय पक्षानं भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला तेव्हां तेव्हां पाकिस्तानी लष्कर हिंसा करून ती प्रक्रिया बंद पाडतं. नवाज शरीफ यांनी अटल बिहारी वाजपेयींना लाहोरला नेऊन वाटाघाटींचा बेत आखला तेव्हां लगोलग मुशर्रशनी कारगीलमधे सैन्य घुसवलं. परवापरवा २०१५ मधे शरीफ-मोदींनी पुन्हा एकदा बोलणी करायची ठरवली तेव्हां आयएसआयनं भारतात माणसं धाडली, सरहद्दीवर दोन सैनिक मारले, एकाचा शिरच्छेद केला.

पाकिस्तानी सैन्याचं एकूण चरित्र पाकिस्तानी चरित्राशी मिळतं जुळतं आहे. पाकिस्तानी सैन्यातली माणसं फ्युडल आहेत. त्यामुळं पाकिस्तानी राजकीय पक्ष आणि सैन्य दोन्ही सारखीच आहेत. दोघांनाही आधुनिकता, समानता, मानवी अधिकार या गोष्टी मान्य नाहीत. फ्युडल असल्यानं दोघांचंही धर्माशी भांडण नाही, दोघांनाही लोकशाही नको असते. धर्माशी भांडण राज्यव्यवस्था कितपत उदारमतवादी ठेवावी येवढ्यापुरतंच असतं.  राजकीय पक्ष आणि लष्कराला इस्लाम हवा आहे, फ्युडल चौकटीत. दोन्ही संस्थांना, या संस्था चालवणाऱ्या फ्युडल-जमीनदारी कुटुंबांचा स्वार्थ जपायचा असतो.  लष्कर आणि राजकीय पक्ष समाजातल्या धर्मवादी लोकांना आटोक्यात ठेवतात. येवढं झाल्यावर सामान्य जनता उरते तरी कुठं?

पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हां सैन्य ब्रिटीश व्यावसायिक शिस्तीत वाढलेलं होतं. सावकाशीनं सैन्याचं रूपांतर राजकीय सैन्यात होत गेलं. झिया यांनी सैन्याला उघड इस्लामी सैन्य असं रूप दिलं. अधिकृतरीत्या सैन्यात मुल्लांची नेमणूक केली आणि लढाईवर मुल्लाही पाठवले, निवड करताना आणि बढती देताना इस्लामी  माणसांना प्राधान्य देण्यात आलं. पण हेही खरं आहे की पाकिस्तानतले सर्वच सैनिक वा अधिकारी इस्लामी नाहीत. पाकिस्तानी सैन्यात इस्लामी लोकांना दाढीवाले अशा टोपण नावानं संबोधतात. पाकिस्तानी सैन्यात दाढीवाले नसलेले, व्यावसायिक सेनाधिकारी आहेत. त्यांचं प्रमाण मर्यादित आहे. परंतू जेव्हा लढाईचा संबंध येतो तेव्हां तेव्हां शक्यतो व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या हाती सूत्र देण्याचा प्रयत्न केला जातो.

नवाज शरीफ. बाजवा शरीफांचं काय करतात ते पहायचं.

सैन्य तारणहार आहे, सैन्यामुळंच आपला देश शिल्लक आहे, सैन्यामुळंच  शेजारी बलिष्ठ हिंदू देशापासून संरक्षण होतं अशी कल्पना जनमानसात रूढ आहे. लष्करानं ती स्वतःच्या स्वार्थासाठी रूढ केली आहे. राजकीय पक्षांना त्या बद्दल आक्षेप नाही. लष्कराला सांभाळून त्यांना सत्ता सापडली म्हणजे झालं. अय्युब, झिया, मुशर्रफ यांनी लष्करी राजवटीतही  राजकीय पक्षांना अंकित करून ठेवलं होतं, त्यांचा उपयोग करून घेतला होता. पाकिस्तानात सेक्युलर, लोकशाहीवादी राजकीय विचार जन्मला-वाढला नसल्यानं राजकीय पक्ष ना धर्माच्या विरोधात असतात, ना लष्कराच्या, त्यांना फक्त सत्तेचा व्यवहार समजतो.

कधी कधी राजकीय पक्षांनी लष्कराला आटोक्यात ठेवायचा प्रयत्न केला. पाकिस्तानचं परदेश आणि संरक्षण धोरण लष्कर ठरवत असतं, पाकिस्तानी सरकार किंवा संसद नव्हे. यात बदल करण्याचा प्रयत्न भुत्तो आणि झरदारी यांनी केला. २००८ साली पाकिस्तानी राज्यघटनेत बदल करून अध्यक्षाकडं असलेले संसद आणि पंतप्रधानाला बरखास्त करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पाकिस्तानाच्या वाटेनं अफगाणिस्तानात लष्करी व मुलकी रसद पुरवणं पाकिस्तान सरकारनं बंद केलं होतं. पाकिस्तानी विमानतळावरून ड्रोन हल्ले करायला पाकिस्तानी सरकारनं मनाई केली होती. या दोन्ही गोष्टी लष्करानं नव्हे तर सरकारनं करणं याला एक स्वतंत्र अर्थ आहे. गैरलष्करी संस्था स्वतंत्रपणे परदेश आणि सुरक्षा धोरणाचा निर्णय घेत आहे असा याचा अर्थ होता. लष्करानं तो चरफडत कां होईना मान्य केला.

काहीही असो, पाकिस्तानी समाजाचं नियंत्रण लष्कराकडं आहे. लष्करातली माणसं पाकिस्तानच्या जीवनातल्या प्रत्येक अंगात पसरलेली आहेत. लष्कराचं महत्व आणि स्थान पाकिस्तानी समाजानंही मान्य केलेलं आहे. पाकिस्तानी समाजातल्या आर्थिक आणि राजकीय शक्तींकडून लष्कराच्या स्थानाला हात लावला जाण्याची शक्यता कमी आहे. अमेरिका किंवा बाहेरच्या कोणी आर्थिक व लष्करी बळाचा वापर करून मुलकी-लोकशाही सत्ता पाकिस्तानात स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर तेही यशस्वी होणं शक्य नाही, तो प्रयत्न लष्कर उलथवून लावतं, लावेल.

लष्कर आपलं संरक्षण करू शकतं, देशाला शांतता देऊ शकतं या आश्वासनाला जर धक्का बसला तर मात्र परिस्थिती बदलू शकते. गेल्या पाच सात वर्षात काही अंशी तसं घडलेलं आहे. लष्करातला भ्रष्टाचार लोकांच्या लक्षात आला आहे. लष्कर इस्लामी संस्था आणि देश यांच्याशी लबाडीचे संबंध ठेवते अशी भावना लोकांमधे आहे. १९७१ साली लष्कर पाकिस्तान एकसंध ठेवू शकलं नाही, भारताला हरवू शकलं नाही, बांगला देशाला ताब्यात ठेवू शकलं नाही हे पाकिस्तानी जनतेला झोंबलेलं आहे. अफगाणिस्तानातल्या जिहादींवर, देशातल्या जिहादीवर  लष्कर कारवाई करतंय ही गोष्ट पाकिस्तानी माणसाला पटलेली नाही. अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्ताननं दहशतवादविरोधी कारवाईत भाग घेतला (लादेन, अल कायदाचा बंदोबस्त) ही गोष्ट पाकिस्तानी जनतेला पटलेली नाही. पाकिस्तान आर्थिक फायद्यासाठी अमेरिकेच्या कच्छपी लागलं आहे या बद्दल पाकिस्तानी माणसाच्या मनात राग आहे. त्या बद्दल पाकिस्तानचा मुशर्रफ यांच्यावरही  फार राग आहे.

लष्करावरचा विश्वास उडाल्यानं तहरीके तालिबान आणि लष्करे तय्यबा या संघटनांकडं पाकिस्तानी माणसं वळत असल्याचं दिसतंय. हा प्रवाह वाढला तर मात्र पाकिस्तानवरचं लष्कराचं वर्चस्व कमी होईल.

।।

Military Inc. Inside Pakistan Military Economy.

Ayesha Siddiqua.  Oxford.

Fighting To The End. The Pakistan Army’s Way Of War.

C. Christine Fair. Oxford.