Browsed by
Month: April 2017

सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

दहशतवादाचा न संपणारा छळवाद

छत्तीसगड राज्यात सुकमा गावात माओवादींनी केलेल्या गनिमी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मारले गेले. सीआरपीएफचे जवान दुपारी एकत्र जेवत होते.  अशा रीतीनं इतक्या जवानांनी एकत्र असणं रणनीतीमधे बसत नाही. सुमारे ३०० माओवाद्यांनी हल्ला केला. आदिवासींना पुढं ठेवून हल्ला करण्यात आला. अचानकपण, माओवादी कोण आणि निष्पाप आदिवासी कोण ते न कळणं, निष्पापांची ढाल या तीन घटकांमुळं सीआरपीला प्रतिकार करण्यात अडचणी आल्या.

छत्तीसगडमधे सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दलाचे १५ हजारपेक्षा जास्त सैनिक माओवाद्यांचा सामना करत आहेत. छत्तीसगड राज्याचे पोलिस या कारवाईत गुंतलेले नसतात. मुख्यतः केंद्र सरकारनं माओवादाशी लढण्याची जबाबदारी घेतली आहे. माओवाद्यांना महिना दोन महिन्यात नेस्तनाबूत करू असं केद्रं सरकार नेहमीच   म्हणत आलं आहे. परंतू माओवाद संपताना दिसत नाही.

स्थानिक आदिवासींना विश्वासात घेणं, त्यांना आर्थिक मदत देणं, त्यांना संरक्षण देणं या वाटांनी सरकार आदिवासींना माओवाद्यांच्या कचाट्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आलं आहे.  माओवाद्यांचा दहशतवाद, लपून रहाण्याची क्षमता, भरपूर शस्त्रसाठा आणि मनोबल यांच्यापुढं आदिवासी हतबल होतात, सरकारी रणनीती यशस्वी ठरत नाही.

मधे मधे काही माओवादी शरण येतात. माओवादी ध्येयवादी राहिले नसून निव्वळ व्यावसायिक दहशतवादी झाले आहेत अशी माहिती मधे मधे बाहेर येते. असं वाटू लागतं की आता माओवादी त्यांच्यातील आंतरिक विकृतींमुळं कोसळणार आहेत. पण तसं घडलेलं दिसत नाही. माओवाद्यांची संख्या कमी अधिक होते, त्यांची माणसं मारण्याची कार्यक्षमता कमी अधिक होते परंतू छत्तीसगडवरची त्यांची पकड सुटतांना दिसत नाही.

स्थानिक जनतेला लोकशाही वाटेनं जाण्यासाठी शिक्षित, प्रोत्साहित करणं व समांतर पातळीवर बळाचा वापर करून माओवादी संघटना नेस्तनाबूत करणं असं धोरण सरकारनं अवलंबलं आहे. गेली वीसेक वर्षं. पैकी बळाचा वापर हे धोरण यशस्वी होताना दिसत नाही.

सुकमामधे रस्ते तयार केले जात आहेत. रस्ते झाले की नागरिकांची सोय होते, विकास होतो आणि सशस्त्र तुकड्यांच्या हालचाली सुलभ होतात. दोन चार दोन चार किमी अंतराचे रस्ते केले जातात. रस्ते तयार करणाऱ्यांना सीआरपीएफ संरक्षण देतं, वाटेत लावलेले सुरुंग काढतं. रस्ते तयार करण्याचं तंत्रज्ञान वेळ खाणारं आहे. रस्ते तयार करणाऱं खातं अनेक वर्षं नवं प्रभावी आणि कमी वेळ घेणारं तंत्रज्ञान आणा असं सांगतय पण सरकारला ते साधता आलेलं नाही.

माओवादी गनिमी पद्धतीनं काम करतात. गनीम जिवावर उदार असतो. गनीम स्थानिक जनतेला वेठीस धरतात. गनीमांना ना स्वतःच्या वा इतरांच्या जिवाची पर्वा असते, लोकशाही आणि मानवी अधिकार या गोष्टी गनिमांना मान्य नसतात. गनीम काय करतात,  ते योग्य रीतीनं वागतात की नाही याची चौकशी करण्याची व्यवस्था गनीमांमधे नसते, ते एक अनिर्बंध सैन्य असतं.

सैन्य आणि पोलिस नेमक्या दुसऱ्या टोकाच्या पद्धतीनं काम करत असतात. सैनिक किंवा पोलिस स्वतःचा जीव वाचवून मगच शत्रूला मारत असतो. लढाईत एकादा सैनिक जखमी झाला तर त्याला मागं नेऊन त्याच्या जगण्याची पूर्ण आरोग्य व्यवस्था सैन्य करत असतं. गनीम जखमीला मागं ठेवत नाहीत, मारून मोकळे होतात. सैन्य किंवा पोलिस बेछूट गोळीबार करू शकत नाहीत. गोळीबार करण्याचेही नियम त्यांना पाळावे लागतात. एकाद्या घरात एका कुटुंबाला  गनीमानं ओलीस ठेवलं तर  सैनिक निष्पाप कुटुंबाला वाचवायच्या प्रयत्नात असतात, सैनिक किंवा पोलिस  सगळं घरच उडवून देत नाहीत.

सैन्य आणि पोलिसांना शत्रूपक्षाची बित्तंबातमी मिळावी लागेत. बित्तंबातमीवरच सैन्य किंवा पोलिसांची रणनीती ठरत असते. बित्तंबातमी मिळवत असताना पोलिस व सैनिकांना कायदे पाळावे लागतात, मानवतेचे नियम पाळावे लागतात. वार्ता जमा करण्यासाठी लोकांना हाताळत असताना सांभाळून वागावं लागत असतं. घाऊक प्रमाणावर मारझोड करणं त्यांना शक्य नसतं आणि ते बरेचवेळा अपकारक ठरत असतं. या उलट गनीमाना कशाचंच सोयर सुतक नसल्यानं ते हिंसक-यमयातनांचा वापर करून शत्रूपक्षाची बित्तंबातमी बिनधास्त मिळवतात. सुकमामधे सीआरपीएफचे सैनिक केव्हा एकत्र असतात, जेवण्यासाठी ते केव्हां जमतात व आयते हातात सापडतात, रस्ता कुठं तयार होणार आहे याची खबर गनिमाना असते. परंतू सैनिकांना आणि पोलिसांना मात्र माओवादी काय करणार आहेत याची खबर मिळत नाही.

गनिमी आणि दहशतवादी परिस्थिती हाताळण्यासाठी पारंपरीक पोलिस आणि सैन्य उपयोगी पडत नाही. त्यासाठी वेगळे लढवय्ये लागतात, माहिती गोळा करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट यंत्रणा हाताशी असावी लागते. तशी यंत्रणा भारतात तयार झाल्याचं दिसत नाही. सीआरपीएफ आणि पोलिस यांचं प्रशिक्षण आणि कामाची पद्धत गनीमी-दहशवादी परिस्थिती हाताळण्यात कमी पडते.

मुळात समाजात घुसून हिंसक कारवाया करणाऱ्यांना शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे काम पोलिस यंत्रणेचंच आहे, सैनिकांचं नाही. इराक आणि अफगाणिस्तानात लाखो सैनिक आणि अत्यानुधिक शस्त्रं ओतूनही अमेरिकन लष्कराला यश आलं नाही, तिथल्या आयसिस आणि तालिबानांबरोबर त्यांना लढता आलं नाही. पोलिस सदैव जनतेत असतात. पोलिस कार्यक्षम असतील तर त्यांना गल्लोगल्लीत काय चालतं याचा अंदाच आधीच आलेला असतो. उपद्रवी माणसं हेरून त्यांना वेगळं पाडणं, निष्प्रभ करणं हे पोलिसांना जितकं जमतं तितकं सैन्याला जमत नाही. छत्तीसगड असो की काश्मिर खोरं, तिथं सैनिकांचा वापर-सीआरपीएफचा वापर अयोग्य आहे. दोन्ही संघटना गावाबाहेर कँप उभारून काम करतात. गावाबाहेर रहातात आणि नंतर गावात प्रवेश करून दंगल हाताळण्याचा प्रयत्न करतात.

माओवाद हे प्रकरण छत्तीगड पोलिसांनीच  हाताळलं पाहिजे. तथापि स्थानिक पोलिस हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पोलिस यंत्रणेत आवश्यक तेवढी माणसं नाहीत. पोलिस ठाण्यांची संख्या अपुरी आहे. अनेक ठाण्यांत टेलेफोन नाहीत.  पुढाऱ्यांना संरक्षण, गुन्हेगारांना संरक्षण, सिनेनट वगैरेंना संरक्षण यात पोलिस गुंतलेले असतात. दंडुका आपटत गावात फिरणं वेगळं आणि संवेदनशील विभागातल्या घराघरात जाऊन लोकांशी संपर्क ठेवणं वेगळं. गनिमी-दहशतवादी स्थिती हाताळण्यासाठी लागणारं स्वतंत्र प्रशिक्षण पोलिसांना दिलं जात नाही, ती परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा पोलिसांकडं नाही. पोलिस व्यवस्थेतल्या दोन मोठ्या त्रुटी म्हणजे पोलिसांचा जनतेशी संबंध नसणं आणि त्यांचं भ्रष्ट असणं.

भिंद्रानवाले यांनी पंजाबात गोंधळ घातला होता. स्थानिक पोलिस दल आणि रिबेरो यांचं कार्यक्षम नेतृत्व लाभल्यामुळं पंजाबमधला दहशतवाद नुसता आटोक्यात आला नव्हे, समूळ निपटला गेला. पंजाबही सरहद्दीवरचं राज्य आहे. पंजाबातही पाकिस्तानची घूसखोरी चाललेली होती. तरीही सैन्याऐवजी पोलिसांचा वापर पंजाबात केला गेला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

हज्जारो सैनिक, सशस्त्र जवान धाडकन पाठवले की प्रश्न सुटेल अशी समजूत सरकारनं करून घेतली आहे. सैनिकांची संख्या वाढवली, पलिकडची चार दोन माणसं मारून दाखवली की जनतेला दिलासा मिळतो. जनमत हाच सरकारांचा प्राणवायू असल्यानं जनमत कसंही करून आनंदी ठेवण्याकडं राजकीय पक्ष आणि नोकरशाहीचा कल पूर्वीपासून दिसतो. राजकीय पक्ष आणि नोकरशाहीचा माध्यमांकडं डोळा असतो. माध्यमांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीस न पडणारी कामं करण्याची एक पद्धत असते. सीआयए, मोसाद, एमआयसिक्स या संघटना कधी तरी सांगतात की त्यांनी अमूक इतके घातपाती हल्ले होण्याआधीच निपटून टाकले.

काश्मिरमधला आणि छत्तीसगड इत्यादी ठिकाणचा दहशतवाद आटोक्यात आणणं शक्य आहे. गाजावाजा न करता, विचारपूर्वक, दूरगामी, प्रभावी, धोरण आणि यंत्रणा उभी करावी लागेल.

।।

 

शेतकरी कर्जमाफी ही पहिली पायरी. दूरगामी अर्थरचना बदल आवश्यक.

शेतकरी कर्जमाफी ही पहिली पायरी. दूरगामी अर्थरचना बदल आवश्यक.

शेतकरी आत्महत्या थांबत नाहीयेत.

कर्जं माफ करा अशी काँग्रेस व इतर पक्षांची मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की कर्ज माफ करून शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, फडणवीस कर्जमाफीला तयार नाहीत. ते विरोधकांना विचारतात, मी कर्जंमाफी करतो, तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी घ्याल काय. उत्तर प्रदेशात शेतकरी आत्महत्या कमी आहेत तरीही तिथल्या भाजप मुख्यमंत्र्यांनी तीसेक हजार कोटींचं कर्ज माफ केलंय.

फडणवीस कर्ज माफीला तयार नाहीत कारण  कर्ज माफ करायचं म्हणजे त्या कर्जाची भरपाई करावी लागेल,ते कर्ज देणाऱ्या बँकांना तेवढे पैसे द्यावे लागतील. तेवढे पैसे आता सरकारजवळ  नाहीयेत. महाराष्ट्र सरकारकडं जमा होणारे पैसे आणि होणारा खर्च सध्या जेमतेम जुळतात. नवा खर्च काढला की कुठल्या तरी जुन्या खर्चात काटछाट करावी लागते किंवा नवीन कर बसवावे लागतात. दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. कुठल्याही सरकारची अशी स्थिती असणं, सरकारकडं जादा पैसे उपलब्ध नसणं हे चांगल्या आर्थिक स्थितीचं लक्षण नाही.

कर्ज देणाऱ्या बँकांमधे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या बँका आहेत. कर्जमाफी करणं म्हणजे त्या पक्षाच्या लोकांची धन करणं आहे असं काहींचं म्हणणं आहे. भाजपला अर्थातच विरोधी पक्ष बळकट झालेलं चालणार नाही.

बँकिंग व्यवसायाचं म्हणणं आहे की कर्जमाफी ही पद्धत बरोबर नाही. एकाला माफ केलं की दुसऱ्याला का नको असा प्रश्न येतो. कर्ज माफ करणं  बँकिंगच्या तत्वात बसत नाही.  कर्ज देणं हा अलिकडं राजकीय मामला झालाय. सत्ताधारी पक्षांना दूरगामी उपाय योजायचे नसतात, तात्कालीक थातुरमातुर लोकप्रिय उपाय योजून म्हणजे कर्ज देऊन व माफ करून सत्ताधारी वेळ मारून नेतात. शेतकरी पैसे परत करू शकणार नाहीत हे माहित असताना कर्ज दिली जातात. कित्येक उद्योगपतींचे कारभार संशयास्पद असतात तरीही कर्ज दिली जातात. बँकिंग व्यवसाय स्वायत्त न राहिल्यानं असं घडत आहे. बँकिंग व्यवसाय आता व्यावसायिक तत्वावर चालत नाही. बुडणारी कर्ज बँकांना द्यावी लागतात, परिणामी बँका तोट्यात जातात परिणामी  त्यांना कमी पडणारं भांडवल सरकार देतं असं एक दुष्टचक्र बँकिंग व्यवसायात प्रचलित झालं आहे.

शेतकऱ्यांची संख्या पहाता त्यांचा असंतोष भाजप सरकारला किंवा कोणत्याही सरकारला  परडणारा नाही. विरोधी पक्ष आणि माध्यमं  सरकारला झोडपून काढत असल्यानं  भाजप कातावला आहे. सोशल मिडियात पेरलेली माणसं आणि नरेंद्र मोदींच्या मोहात पडलेली शहरी  जनता  यांच्या आधारे शेतकऱ्यांना ठोकून काढण्याचा कार्यक्रम भाजपनं चालवलाय. दारू पिणाऱ्या आणि व्यसनी शेतकऱ्यांची उदाहरणं दिली जातात. शेतकरी  कर्जाचा वापर लग्न इत्यादी गैरशेती कामांसाठी करतात असं सांगितलं  जातं. शेतकऱ्याना समजा त्यांच्या माल शहरात विकायचा नसेल  तर नको विकू द्यात आम्ही जगातून शेतमालाची आयात  करून शेतकऱ्यांचा बंदोबस्त करू  असं लोक बोलत आहेत. नकोसे झालेले लोक, त्रासदायक ठरणारे विचार आणि माणसं कशी बेकार आहेत ते सांगत सुटणं असा हा प्रकार दिसतो. सामान्यतः सत्तेत गुंतलेले राजकीय पक्ष या रीतीनं वाटचाल करतात असा जगभरचा अनुभव आहे.

खूप शेतकऱी आत्महत्या करत आहेत हे वास्तव आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमधे सर्वात प्रभावी घटक कर्ज हा आहे हे सर्व पहाण्यांनी मान्य केलं आहे. शेतकरी वर्षानुवर्षं कर्जं घेत आला आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जफेड होत नाही. कर्जातला थोडासा भाग वसूल करून उरलेलं  कर्ज नव्यानं दिल्याचं दाखवलं जातं. याला नवं जुनं म्हणतात. अशा रीतीनं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कायम शिल्लक रहातं. बहुसंख्य शेतकरी तीन एकराच्या आतला आहे. नापिकी होते तेव्हां तो पूर्णच बुडालेला असतो.  पाच सात  वर्षांनी जेव्हां भरपूर उत्पादन होतं तेव्हा किमती पडतात त्यामुळं पुन्हा तो तोट्यातच  असतो. बहुसंख्य शेतकरी लहान आहेत, तोट्यात आहेत, शेती तोट्यात आहे.

शेती व्यवस्थेत भरवसा नसलेले घटक जास्त आहेत. कोणताही अर्थव्यवहार नीट व्हायचा असेल तर त्यात साधारणपणे गुंतवणूक किती करावी लागेल आणि उत्पादन किती येईल याचा एक निश्चित अंदाज असतो. तो अंदाज सत्तर ऐंशी टक्के पक्का असतो. अनिश्चित घटक कमी कमी ठेवण्यात आलेले असतात. उत्पादन केलेल्या मालाची किमत किती ठेवावी या बद्दल उद्योगाला बरंच स्वातंत्र्य असतं.  शेती व्यवहारात जमीन तयार करण्यापासून ते वस्तू विकून उत्पादकाच्या खिशात पैसा येईपर्यंत असलेले बहुतेक  सर्व घटक  बेभरवशाचे असतात. पावसाची खात्री नाही. जमीन ठीक नसल्यानं नेमकं किती उत्पादन येईल याची खात्री नाही. हवामानातले बदलही अनिश्चित असतात, अधिकाधीक अनिश्चित होत चालले आहेत. उत्पादन झाल्यानंतर मिळणाऱ्या भावाचीही खात्री देता येत नाही. एकूण शेती उत्पादन व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाशी विविध सार्वजनिक संस्था, सरकारं, कायदे गुंतलेले आहेत. त्या गुंत्यावर शेतकऱ्याचं अजिबात नियंत्रण नाही. त्यामुळं शेतमालाची किमत ठरवणं व पदरात पाडून घेणं शेतकऱ्याला शक्य नाही.

शेती व्यवस्था ८० टक्के निश्चित झाली आणि त्या व्यवस्थेवर शेतकऱ्याचं नियंत्रण स्थापित झालं तरच शेतकऱी सुखी होईल, कर्जबाजारीपण आणि आत्महत्या थांबतील.

दोन बाजूंनी शेती समस्या सुटू शकते.  एक बाजू म्हणजे शेतीवरील माणसांचं ओझं कमी करणं. उद्योग, सेवा, रंजन, शिक्षण, ज्ञान इत्यादी क्षेत्रं विकसित करून शेतीतली माणसं तिथं शोषून घेणं.  त्या दिशेनं १९५० पासूनची सरकारं पावलं टाकत आली आहेत. परंतू ती पावलं अगदीच अपुरी, परस्पर विसंगत घटक गुंफलेली, गोंधळात पडलेली, तात्पुरती होती.  शेतीतल्या माणसांची संख्या येवढी मोठी होती आणि आहे की वरवरचे उपाय योजण्यावाचून गत्यंतर नव्हतं. शेती सोडता इतर क्षेत्रांचा विकास करण्यासाठी लागणारी अर्थव्यवस्थेची घडण धडपणे केली गेली नाही. उद्योगात वेगवान विकास साधायचा तर उद्योगावरचं सरकारी नियंत्रण कमी असायला हवं. परंतू स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकारांनी समाजवादी नियंत्रणवादी धोरणं अवलंबल्यानं उद्योगांचाही गतीमान विकास झाला नाही, आर्थिक प्रगतीही अगदीच कमी वेगानं झाली. १९९० नंतर सरकार मुक्त व्यवस्थेकडं झुकलं. परंतू ती पावलंही अर्धवट होती, मुक्त अर्थव्यवस्थेचा मुलामा दिला गेला, अर्थरचना आधीसारखीच राहिली. परिणामी शेतीतली माणसं उद्योगात शोषून घेतली गेली नाहीत.

दुसरी वाट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीउत्पादनातली व विक्री व्यवहारातली अनिश्चितता संपवणं. पाणी, हवामान, जमिनीचा कस, उत्पादकता हे घटक तंत्रज्ञानाचा वापर करून निश्चित करणं शक्य आहे. निदान त्यात ८० टक्केपर्यंत निश्चितता आणणं शक्य आहे. हवामान अंदाज व संकट निवारण, जमिनीतल्या घटकांचा अभ्यास करणारी यंत्रणा, पाणी-खतं-बियाणं या गोष्टीत आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं तर पिकाची 80 टक्के खात्री देता येईल. उत्पादनाबरोबर बाजार व्यवस्था (त्यात साठवण व विक्री हे घटक महत्वाचे) मोकळे केले गेले तर बाजाराच्या नियमानुसार शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्याची शक्यता निर्माण होते.

शेतीचा आकार ही मोठी समस्या आहे. एक हेक्टर हा शेतीचा आकार शेती व्यवहाराला उपयुक्त नाही. आज सरासरी शेतकरी एक हेक्टरचा मालक आहे याला जमीन विषयक कायदे कारणीभूत आहेत. जमीन धारणा कायदा, जमिनीच्या हस्तांतरणावर नियंत्रणं आणणारा अशा कायद्यामुळं जमिनीचा आकार कमी होत गेला आहे. दुसरं असं की जमीन या शेतकऱ्याच्या मूलभूत अधिकाराला राज्यघटनेमधे नवव्या शेड्यूलमधे घालून शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे. परिणामी जमिनीचा आकार लहान राहिल्यानं यांत्रिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करू शकत नाही.

अर्थव्यवस्था मोकळी करणं, सरकारनं अर्थव्यवहारातून अंग काढून घेणं, जमीन व्यवहार मोकळे करणं, नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करणं हे दूरगामी उपाय योजणं हाच शेतीतल्या समस्येवरचा, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरचा योग्य मार्ग आहे.

नरेंद्र मोदी भाजपचे सर्वेसर्वा आहेत. ते म्हणतील ती आणि तीच धोरणं भाजप अमलात आणतं. नरेंद्र मोदी 10 वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींना अर्थव्यवहार समजतो आणि राजकारणही समजतं. निवडणुकीत त्यांनी अभूतपूर्व विजय मिळवला.  प्रश्न येतो तो आर्थिक निर्णयाचा. मोदी ज्या मुशीतून वाढले त्या संघाला आर्थिक धोरण नाही. खरं म्हणजे संघाला आर्थिक विचाराचं वावडंच आहे. संघाची वाढ आणि विचार सांस्कृतीक-धार्मिक आहे. अद्यात्मिकतेवर, धर्मावर जगणं आधारलेलं असतं, आर्थिक विचार गौण असतो असा संघाचा विचार आहे. राजकारणात उतरल्यामुळ संघाला आर्थिक भूमिका घ्याव्या लागतात. परंतू त्या खूपच विसंगत अशा तत्वांवर आधारलेल्या असतात. साधारणपणे   भगवा हिंदू समाजवाद असं संघाच्या आर्थिक धोरणाचं वर्णन करता येईल. संघाचा तो विचार शेतकऱ्यांचे, शेतीचे आणि एकूणच आर्थिक प्रश्न सोडण्यास असमर्थ आहे. त्यामुळंच मोदींसमोर पेच आहे. मोदींना सत्ता कशी सांभाळायची ते कळतं पण आर्थिक प्रश्नांबाबत ते संघविचारात अडकलेले आहेत. ही कोंडी मोदींनी फोडली तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकेल. कर्जवाटप, बीबियाणं-खतं-जंतुनाशकं-पाणी-वीज वगैरेची सोय हे तात्कालिक आणि वरवरचे उपाय करत असतानाच अर्थरचना बदलण्याचं धाडस मोदींनी दाखवायला हवं. मोदी ते कसं जमवतात ते पहायचं.

कर्जमाफीवाचून गत्यंतर दिसत नाही. परंतू कर्जमाफी ही दूरगामी धोरणाची पहिली पायरी ठरावी.

 

 

अनारकली ऑफ आरा

अनारकली ऑफ आरा

स्त्रियांचा मान राखा असं सांगणाऱ्या सिनेमांमधे अनारकली ऑफ आरा या सिनेमानं एक दणदणीत भर घातलीय.

अनारकली ही एक गात गात नाचणारी किंवा नाचता नाचता गाणारी कलाकार आहे. ती भोजपूर जिल्ह्यात आरा या गावात रहाते. आसपासच्या गावांत ती कार्यक्रम करते. कधी लग्न प्रसंग, कधी संमेलन, कधी कोणाची तरी हौस. श्रोते असतात बिहारी. खेडवळ असतात. महानगरी संस्कृतीचे बटबटीस संस्कार त्यांनी स्वीकारलेले असतात. त्यांच्या दैनंदिन जगण्यात उसळी मारणाऱ्या आणि बंधनांचं अस्तित्वच नाकारणाऱ्या इच्छा, वासना भागवणारा परफॉर्मन्स अनारकली करत असते.

भोजपूरमधल्या रसिकांची एक स्वतंत्र भाषा असते. जंप मारे जवानी चोलीमे हे शब्द त्यांना आवडतात, समजतात. ही जवानी महाराष्ट्रातल्या शृंगारीक लावणीत ” कंचुकी तटतटली भरजरी ” अशा शब्दात व्यक्त होत असते. जवानी, कंचुकी या गोष्टी शहरी सिनेमात, राज कपूर यांच्या सिनेमात अधिक अलंकृत दिसतात. रंजनाचा संस्कारित आविष्कार उमराव जान सिनेमात पहायला मिळतो. उमराव जानमधल्या गीतांची भाषा, रेखाचा पेहराव, तिथं हजर असणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रिया पहा. अनारकलीतली गाणी, अनारकलीचा पेहराव, रुमाल भिरकावत नाचणारे भोजपुरी लोक, सारंच वेगळं.

पुरुषांची अनिर्बंध होऊ पहाणारी आसक्ती हे वास्तव अनारकली लक्षात घेते, त्या आसक्तीला एका अंतरावर ठेवून ती त्या आसक्तीसह जगते. एका विद्यापीठाचा कुलगुरू धुंद होऊन अनारकलीला खेटतो.  अनारकली विरोध करते, कुलगुरूच्या मुस्कटात मारते. त्यानंतर बिहारमधली सत्ता अनारकलीला नामोहरम करण्याची खटपट करते. अनारकली सत्तेशी, पुरुषी दादागिरीशी संघर्ष करते. अनारकली म्हणते,  माझ्याशी सांभाळून वागा, मला गृहीत धरू नका, माझ्या स्वातंत्र्यावर,  माझ्या माणूस असण्यावर केलेलं आक्रमण मी स्वीकारणार नाही.

स्वरा भास्कर

अनारकली तीनच दिवसात चांगल्या सिनेमांघरातून बाहेर पडला. अनारकलीमधे ज्या बिहारी विद्यापीठाचं नाव घेतलं आहे त्या विद्यापीठानं चित्रपटातून विद्यापीठाचं नाव काढून टाकण्याची, चित्रपटातून ते प्रसंग काढून टाकण्याची मागणी केली. विद्यापीठाचं म्हणणं असं सिनेमामुळं विद्यापीठ बदनाम होतं. हा सिनेमा प्रदर्शित झाला त्याच काळात कंगना राणावत या अभिनेत्रीनं तिच्यावर चित्रपट दिग्दर्शक अतिप्रसंग करत असल्याची तक्रार दबत्या स्वरात केली होती.

बिहारमधे नाचणाऱ्या-गाणाऱ्या कलाकारांवर अत्याचार झाल्याच्या, खून झाल्याच्या घटना आहेत. जयप्रकाश नारायण यांच्या नावानं चालणाऱ्या एका विद्यापीठात कलाकाराशी अतिप्रसंग घडला होता. भारतीय संस्कृती  सुस्वर गीतांत स्त्रियांचं कौतुक करते, ओवाळणी करून तिला मान दिला जातो असा दावा करते. वास्तवात भारतीय माणसं स्त्रियांना वाईट वागवतात हे पुरातन वास्तव हा चित्रपट हाताळतो. चित्रपट  प्रवचनाच्या, उपदेशाच्या थाटात गोष्ट सांगत नाही.  भावनाचिंब शैलीही चित्रपट टाळतो.

अनारकलीतली मुख्य पात्रं बिहारी आहेत, वातावरण बिहारी आहे. त्या वातावरणात एक लाऊडनेस आहे. बोलण्याची ढब, कपड्यांचे रंग, पाटलोणींचे रंग, गॉगल्स या सर्वाला एक खेडवळ आणि बिहारी छटा आहे. माणसांच्या वागण्यातही नाजूकपणा नसतो, एक बटबटीत वळण असतं. ते या बटबटीतपण चित्रपटानं टिकवलं आहे. गाणी, नाच सारं काही लाऊड आहे, पण तीच त्याची गंमत आहे. एका विद्यापीठाचा कुलगुरू जाहीर समारंभात तर्राट होऊन मंचावर जातो आणि नाचणाऱ्या महिलेशी सलगी करतो हे अगदी बटबटीत आहे, वातावरणाशी मेळ खाणारं आहे. अनारकलीचे कपडे, कुलगुरूचे कपडे आणि केसाचा टोपही तिकडचाच आहे. अनारकली आणि ऑर्केस्ट्राचा मालक जत्रेत मिळणारा पिवळ्या धमक जाड फ्रेमचा गॉगल वापरतात, तो भारी आहे.

                                             स्वरा भास्कर, निल बट्टे सन्नाटामधे

चित्रपटात आरा या गावातल्या काही गल्ल्या आहेत आणि काही घरं आहेत. ती छान घेतलीत. वासेपूरमधल्या वाराणसीच्या चित्रीकरणाची आठवण होते. एलिझाबेथ एकादशीमधील पंढरपूर गावातल्या गल्ल्या आणि घरं आठवतात. आरा गावाच्या मानानं दिल्ली मात्र अगदी डल दाखवलीय.

स्वरा भास्करनं अनारकलीची भूमिका केलीय. भूमिकेला आवश्यक तो सगळा जिवंतपणा, वेग, शृंगार आणि शौर्यही स्वरा भास्करनं छान वठवलंय. स्वरा भास्करनं या आधी निल बटे सन्नाटा या चित्रपटात एका नवऱ्या शिवाय जगणाऱ्या आईची भूमिका केलीय. घरातली धुणीभांडी आणि रेस्टाँरंटमधली कामं करून चंदा आपल्या मुलीला वाढवते आणि मुलीला गणित यावं म्हणून स्वतः गणित शिकते. गरजू मुलांना  फावल्या वेळात चंदा गणित शिकवते. नाना वळणं येतात, नाना गैरसमज होतात. घालमेलीतून जाऊन शेवटी चंदाची मुलगी आयएएस होते. स्वरा भास्करची चंदाची भूमिका गाजली होती. चंदा आणि अनारकली अगदी भिन्न भूमिका करून स्वरा भास्करनं आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय.

                                             संजय मिश्रा, अनारकली ऑफ आरामधे

संजय मिश्रानं कुलगुरूची भूमिका केलीय. चित्रपटाला नायक नाहीच, कुलगुरू हा खलनायक मुख्य पात्र आहे. सिनेमा रंगत जातो तसतसा प्रेक्षक कुलगुरूला पहाताच खवळू लागतो, त्याला शिव्या देऊ लागतो. एका जाहीर समारंभात अनारकली कुलगुरूची लक्तरं वेशीवर टांगते, कुलगुरूच्या पत्नी आणि मुलीसमोर. हा प्रसंग घडत असताना कुलगुरूच्या मनात काय घडतं ते संजय मिश्रानं एक अक्षरही न उच्चारता दाखवलंय. दीर्घ काळ लक्षात रहावी अशी भूमिका संजय मिश्रानं वठवलीय. एक दुर्वर्तनी माणूस दिद्गर्शकानं तटस्थपणानं मांडला आहे.

संजय मिश्रानं या आधी मसान या चित्रपाट विद्याधर पाठक या एका पापभिरू शिक्षकाची भूमिका केलीय. गंगेच्या किनाऱ्यावर रहाणाऱ्या पाठकची मुलगी तारुण्य सुलभ सेक्समधे सापडते. तिचा मित्र आत्महत्या करतो. मुलगी बदनाम होते. पोलिस तिच्या बदनामीतून सुटका करण्यासाठी पाठकचं ब्लॅकमेलिंग करतात, पाठक ते पैसे फेडता फेडता जेरीस येतो. मसानमधल्या या भूमिकेबद्दल संजय मिश्राला बक्षीस मिळालं होतं. मसानमधे एक पापभिरू बाप आणि अनारकलीमधे एक स्त्रीलंपट कुलगुरू.

संजय मिश्रा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडलेले आहेत. अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्याच्या खुणा मिश्र त्यांच्या अभिनयात सापडतात. पट्टीच्या शिल्पकाराचं छिन्नी आणि हाताड्यावर उत्तम नियंत्रण असतं. शिल्पाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि कपड्यांवरच्या चुण्या अगदी हलक्या फटक्यानं तो कसा साकारत असेल ते संजय मिश्रा यांचा अभिनय पहातांना कळतं.
चित्रपटात काही छोट्या भूमिका आहेत. अन्वर नावाचा एक कोवळा तरूण अनारकलीच्या प्रेमात पडतो. अनारकली त्याचं तारुण्यसुलभ प्रेम लक्षात घेते, एक अंतर राखून ती त्याच्याशी आस्थेचे संबंध ठेवते. नाचगाण्यांच्या सीड्या विकणाऱ्या एका माणसाची एक छोटी भूमिका चित्रपटात आहे. त्या गृहस्थाची सायकल, त्याचा गळ्यापर्यंत बटनानं बंद केलेला शर्ट, दिल्लीतली एक घरमालकीण अत्यंत शिवराळपणे बोलत असतानाही अगदी सभ्यपणानं तिच्याशी वागणं इत्यादी बारकावे ही भूमिका भरीव करतात.अन्वर, सीडीवाला, अनारकलीच्या ऑर्केस्ट्राचा मालक या भूमिकांसाठी केलेली नटांची निवड, त्यांना दिलेली ट्रीटमेंट छान आहे.

                                          संजय मिश्रा, मसान मधे

अविनाश दास या दिद्गर्शकाची हा पहिलाचा चित्रपट आहे. निल बट्टे सन्नाटा हाही अश्विनी अय्यर तिवारीचा पहिलाच चित्रपट होता. गेल्या वर्षी गाजलेला पण न चाललेला ऑटोहेड हाही दिद्गर्शकाचा पहिलाच चित्रपट होता. नवी मंडळी अगदी नवी कथानकं घेऊन चित्रपट काढत आहेत. गाजलेल्या कथा, कादंबऱ्या त्यांनी घेतलेल्या नाहीत. सभोवतालचं धगधगतं वास्तव ते चित्रपटात मांडतात. तसं पाहिलं तर सभोवतालचं वास्तव हा नेहमीच चित्रपटाचा विषय असतो. पण बरेचवेळा निर्माता-दिग्दर्शकाला  ते वास्तव गुळगुळीत करून, त्यात प्रवचन आणि उपदेश घुसवून, निष्कर्ष वगैरे तयार करून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचा मोह होतो. नवे दिद्गर्शक त्या भानगडीत पडत नाही. उत्कंठा टिकवून ठेवत, रंजकता टिकवून ठेवत, वेगवान चित्रण करत दिद्गर्शक कथानक उलगडतात. काही दिवसांपूर्वी ट्रॅप्ड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तोही फार चालला नव्हता. मुंबईच्या भर वस्तीतल्या ओस पडलेल्या इमारतीत सतराव्या अठराव्या मजल्यावर अडकून पडलेल्या तरूणाची गोष्ट ट्रॅप्डमधे आहे. बाहेर पडण्यासाठी त्यानं केलेली धडपड प्रेक्षकाला अस्वस्थ करते. टॉम हँक्सच्या कास्ट अवे या चित्रपटाची आठवण ट्रॅप्ड पहाताना येत होती. गेल्या वर्षी मामी चित्रपट महोत्सवात एका क्रूर माणसानं आपली पत्नी आणि मुलाला एका घरात अडकवून ठेवणं आणि आईमुलानं सुटका करून घेणं अशी एक जीवघेणी गोष्ट चितारली होती. ट्रॅप्डचं तंत्र कदाचित थोडं ढिलं असलं तरी वरील चित्रपटांची आठवण यावी इतका प्रत्यय ट्रॅप्डनं आणून दिला.

या चित्रपटांचा आणखी एक विशेष असा की कथानकाला अनेक सामाजिक, राजकीय कंगोरे असतात. अनारकलीमधे बिहारचे पोलिस आणि राजकारण आहे. मसानमधे वाराणसीतल्या दाहक आणि क्रूर परंपरा, जातींचा लोच्या आहे. निल बटे सन्नाटामधे एकट्या स्त्रीला समाजात कसं वागवतात ते दिसतं. ट्रॅप्डमधे मुंबईतली न दिसणारी गुन्हेगारी आहे. परंतू या गोष्टी दिद्गर्शक सूक्ष्मपणे नेपथ्यावर ठेवतात. त्यांचा ढोल बडवत नाहीत, त्यावर व्याख्यानं झोडत नाहीत.

हल्ली असे सिनेमे पटकन उडतात. सिनेमा गाजवण्याचं आणि टिकवण्याचं तंत्रं अशा चित्रपटांच्या निर्मात्यांना जमत नाही असं दिसतय. माध्यमांमधे त्यांचं परिक्षण प्रसिद्ध होतं तेव्हां ते सिनेमाघरातून उडालेले असतात. वाहिन्यांवरही ते दिसत नाहीत. चांगले चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांसाठी काही तरी वाट निघायला हवी.

।।

 

 

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

तीही एक गंमतच. परुळकर नावाचा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर आपणहून आला.

पक्षी टेबलावर येणं ही माणूस ‘ चे संपादक श्री.ग.माजगावकर यांची वाकलकब. ते म्हणत की लेख आणि लिहिणारी माणसं हे पक्षी त्यांच्या   टेबलावर आपणहून येऊन बसतात.

विजय परुळकर हा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर एके दिवशी आला.

परुळकर हे  व्हिडियोग्राफर, परदेशात काम करत असत. ते देशात परतले. पुण्यात बानू कोयाजी यांच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमामधे ते फिल्म्स करत असत. ते ‘ माणूस ‘ वाचत असत. ‘ माणूस ‘ मधे येणारा मजकूर वेगळा असतो,   वर्तमानपत्रांत ज्या विषयावर सविस्तर माहिती दिली जात नाही ती माहिती माणूस देत असे असं विजय परुळकरांना वाटत असे. म्हणूनच ते माजगावकरांकडं आले. म्हणाले – कुटुंब नियोजन या महत्वाच्या विषयावर वर्तमानपत्रं लिहीत नाहीत. बानू कोयाजी यांच्या कामावर माणूसनं मजकूर छापावा.

माजगावकर त्याना म्हणाले ‘ अरे, मग तूच कां लिहीत नाहीस.’

‘ छे हो. मी कसला लिहितोय. मी फोटोग्राफर. मला फोटो काढायला सांगा. लिहिणं हे माझं काम नाही, मी कधीही लिहिलेलं नाहीये.’ परुळेकर म्हणाले.

‘ त्यात काय आहे. तू बानू कोयाजींबरोबर हिंडतोस. अनेक स्त्रियांना भेटतोस. त्यांचं म्हणणं तुझ्या कानावर येत असतं. तू खूप पहातोस. बस. ते लिहून काढायचं.’ माजगावकर.

परूळकर उत्साही माणूस. आहे काय न् नाही काय.  परूळकरांनी लिहून काढलं. “मोडकं तोडकं”. माजगाकरांनी ते दुरुस्त केलं. परिवार नियोजनाचं काम किती कठीण असतं, ते किती आवश्यक आहे वगैरे गोष्टी परूळकरांच्या लेखांमुळं वाचकांसमोर आल्या. एक वेगळं क्षेत्रं वाचकांसमोर मोकळं झालं.

परुळकर माजगावकरांना वारंवार भेटत. त्यांच्याजवळ जे काही होतं ते सारं  धडाधड माजगावकरांसमोर उलगडत. काहीही लपवून ठेवलं नाही. त्यांचे अनुभव, त्यांचा स्वभाव, त्यांचं संबंधित विषयाबद्दलचं ज्ञान आणि माहिती.  परूळकर पुस्तकी नव्हते, अकॅडमिक नव्हते. पुस्तकांतून जग समजून घेत नव्हते.  याच गोष्टीबद्दल माजगावकरांना आकर्षण होतं.

शरद जोशी आणि त्यांचं शेतकरी आंदोलन हे पक्षीही माजगावगरांच्या टेबलावर आले. कदाचित ते परुळकर या पक्षाचा माग घेत माजगावकरांकडं पोचले असावेत.  परूळकर भारतात परत आले त्याच्या आसपास शरद जोशीही आपली स्वित्झर्लंडमधील नोकरी सोडून शेतीचा अभ्यास करायला परत आले. शेतीचा अभ्यास जसा पुस्तकातून करता येतो तसाच शेती करून, शेत ते बाजार या शेतलमाच्या प्रवासाचा अनुभव घेऊनही करता येतो. शरद जोशींनी प्रत्यक्ष शेती करण्याचा  मार्ग पत्करला.

शेतीप्रधान देशात शेतकरी देशोधडीला लागतो, देशात अन्न टंचाई निर्माण होते, दुष्काळ होतात या जटील आणि दाहक प्रश्नाला शरद जोशी भिडत होते. माजगावकरांना शरद जोशी या व्यक्तीमधे कार्यकर्ता दिसला, जमिनीवर काम करणारा माणूस दिसला.

शरद जोशींचं आंदोलन धगधगू लागलं. त्याच काळात शेतीविकास, ग्रामविकास या विषयावर श्रीग माजगावकर चिंतनमग्न होते. व्यक्ती म्हणून आणि संपादक म्हणून. शेतीअर्थशास्त्राचा अभ्यास करणारे डॉ. व. द. देशपांडे आणि स.ह.देशपांडे यांच्याशी माजगावकरांच्या  चर्चा झडत असत. सैद्धांतिक अभ्यासाच्या बाजूनं जगात कोणता विचार चाललाय याचा मागोवा श्रीग घेत होते. दैनिकांमधे, चाकोरीतल्या वर्तमानपत्रांत ज्या रीतीनं शरद जोशींच्या आंदोलनावर लिहिलं जात असे त्या पेक्षा वेगळं माजगावकरांना हवं होतं.

माजगावकरांना याच वाटेबद्दल आकर्षण होतं. ‘ माणूस ‘ मधे थेट जमिनीवरच्या गोष्टी याव्यात, जमिनीवरची माणसं यावीत, जमिनीवरचं वास्तव यावं असं माजगावकारांना वाटत असे.  माजगावकरांचा पिंड कार्यकर्त्याचा. कामाची पद्धत कार्यकर्त्याची अभिव्यक्ती पत्रकारीची. माजगावकर वाचत असत. सर्व विषयावर वाचत असत. त्यांचा रा.स्व.संघाशी संबंध होता. त्यांच्या निकटची माणसं सांगतात की ते संघाच्या शाखेवर फारसे जात नसत. संघातल्या काही विचाराचं त्यांना काळानुरुप आकर्षण असावं. त्यांना अधिक आस्था होती ती स्वातंत्र्यवीर सावकरांच्या विचारांची. माजगावकरांचं विचार करणं आणि व्यक्त होणं या  घटकांच्या मिश्रणातून तयार झालं होतं.

एके दिवशी माजगावकरांनी स्कूटर काढली. पाठीमागं परुळकरांना बसवलं. दोघं शरद जोशीकडं आंबेठाणला पोचले. तिथं तिघांची चर्चा. शेतीचा एकेक भाग पिंजून काढणारी.

श्रीग परुळकरांना म्हणाले ” लिहून काढ. शेतकरी आंदोलन हा विषय. आंदोलन तुला जसं दिसतय ते लिहून काढ. तुला वाटतंय तेही लिहून काढ.”

परूळकर मनस्वी माणूस होता. एकाद्या गोष्टीवर प्रेम करायचं तर ते सर्वस्व अर्पण करून. परुळकर शेतकरी आंदोलनमय झाले होते. परूळकरांच्या बोलण्यात एक आवेग असे. तोच माजगावकरांना आवडत होता, हवा होता.

” तू लिही. पुढचं मी पहातो. ” माजगावकारंनी सांगितलं.

परुळकरांनी लिहून काढलं.  मळेकर वाड्यातल्या ‘ माणूस ‘ च्या कचेरीत माजगावकरांची नित्याची बैठक सुरु होई तेव्हां परुळकरांचा मजकूर त्यांच्या टेबलावर असे. बैठकीत  विद्याधर पुंडलीक असत, दिबा मोकाशी असत, दिवी गोखले असत. शेतकरी आंदोलनाची अनेक अंगं या बैठकीत पिंजून निघत.

परुळकरांचे लेख तयार झाले. माजगावकरांनी मजकुराला शीर्षक दिलं- योद्धा शेतकरी.

जुन्या मळेकर वाड्यात  ‘ माणूस ‘ चं ऑफिस होतं. एक मोठा हॉल. एका कोपऱ्यात माजगावकर बसत. तिथं त्यांना भेटायला अनेक माणसं येत.  मामला मोकळा ढाकळा. केबिन्स नाहीत. वाटेत सेक्रेटरी वगैरेंचा अडथळा नाही.  संपादक थेट दिसत, संपादकांना थेट अक्सेस.

माजगावकर सकाळी साडेनऊला येत. दुपारी जेवण आणि विश्रांतीसाठी घरी जात आणि साडेतीन वाजता पुन्हा येत. हिरव्या रंगाच्या स्कूटरवरून. कधी चालतही.

लेखक दि.बा.मोकाशी माजगावरकांच्या नित्याच्या बैठकीत असत. एकदा संध्याकाळी माजगावर-मोकाशी गप्पा मारत होते. मोकाशी पुण्यातल्या गंमती सांगत होते. माजगावकर त्यांना म्हणाले ‘हेच लिहा.’ त्यातून संध्याकाळचं पुणं हे सदर सुरु झालं.

प्रतिभा रानडे अशाच एके दिवशी माणूसमधे पोचल्या. लिहायची हौस होती, अनुभव नव्हता. माणूसमधे आपलं लिखाण यावं अशी इच्छा होती. माजगावकरांनी गप्पा केल्या. प्रतिभाताई कसं आणि काय लिहू शकतील याचा अंदाज घेतला. त्याना लिहितं केलं. अगदी तसंच वीणा गवाणकर यांच्या बाबतीत घडल. वीणाताईनी कार्वरची गोष्ट माजगावकरांना सांगितली. गोष्टीतली ताकद माजगावकरांनी जोखली. वीणाताईंना त्यांनी भरपूर, मनापासून लिहायला सांगितलं. त्यातून दिवाळी अंकाची कव्हर स्टोरी झाली आणि नंतर पुस्तकंही झालं.

बहुतेक वेळा माजगावकर लेखकांवरच सोडून देत असत, तुमचं तुम्ही लिहा असं म्हणत. कित्येक वेळा काय होई की लेखक तोंडी जे सांगे ते त्यांच्या लेखनात येत नसे. लिखाण कोरडं होई, त्यात भावना नसत.  माजगावकर तिकडं लेखकाचं लक्ष वेधत आणि लेखन अधिक रससशीत करायला सांगत. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर ते लेखन अधिक टोकदार करायला सांगत. कधी लेखकाला जमत नसे. तरीही शेवटी जे उरत असे ते माजगावकर प्रसिद्ध करत.

सतीश कामत हे माजगावकरांचे सहकारी. ‘ माणूस ‘ मधे दाखल झाले तेव्हां नवखे होते. त्या वेळी अंतुले मुख्यमंत्री झाले होते. वसंत दादा पाटील यांना शह देण्याची ती खेळी इंदिरा गांधींची खेळी होती. महाराष्ट्राच्या राजकारणात फार दूरगामी बदल होऊ घातले होते. माजगावकरांनी सतीश कामतांना  असाइनमेंट दिली. सांगली-सातारा विभागात आठ दिवस फिरायचं. तिथल्या सामान्य लोकांना, काँग्रेस पक्षातल्या लोकांना भेटायचं. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्यावर लिहायचं.

सतीश कामत म्हणतात ” मी जरा हबकलो होतो.  रीपोर्टिंग करायला नुकतीच सुरवात केली होती आणि असा गंभीर, गुंत्याचा विषय माजगावकारांनी माझ्यावर सोपवला होता. …मी दुपारच्या बसनं सांगलीला जायच्या तयारीत होतो. येवढ्यात बातमी आली. संजय गांधी यांचं विमानाच्या अपघातात मरण झालं होतं. माजगावकरांनी मला थोपवलं. म्हणाले की महत्वाची घटना आहे. तू सांगलीचं रद्द कर आणि दुपारच्या झेलमनं दिल्लीला जा. तिथं तुला अशोक जैनची मदत होईल. तिथल्या पुढाऱ्यांना भेट. आपण फोनवरून बोलत राहू. मी दिल्लीला सुटलो.”

कामत यांनी अशोक जैन यांची मदत घेऊन  यशवंतराव चव्हाण, मधू दंडवते, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटी घेतल्या. माजगावकर पुण्याहून फोनवर बोलत होते, सूचना करत होते. कामत पुण्याला परतले, लगोलग लिहिलं. त्यातून एक अंक तयार झाला.

” अंक छापून झाल्यावर मी माजगावकरांना विचारलं की आमच्यासारख्या नवशिक्यांवर त्यांनी इतका विश्वास कसा काय ठेवला.माजगावकर म्हणाले –   अरे शेवटी तुमच्यावरही एक दडपण येतंच. आपण विषय करायला घेतलाय, त्यावर वेळ आणि पैसा खर्च होतोय, विषय नीट झाला नाही तर वाचक आपल्यालाच नावं ठेवतील. या दडपणाखाली माणूस मेहनत करतोच, आपापल्या व्यक्तिमत्वानुसार मजकूर तयार करतोच.”

केरळात मार्क्सवादी आणि संघवाले यांच्यात तुंबळ युद्ध चाललं होतं. अगदी खरोखरच्या मारामाऱ्या, एकमेकांच्या कार्यालयांवर हल्ले. माजगावकरांनी सतीश कामत  आणि विनय हर्डीकरना केरळात पाठवलं. हर्डीकर संघाच्या विचारांचे. कामतांना संघाची अलर्जी होती.दोघे हिंडले.  मुलाखती घेतल्या. पहिला खर्डा कामत लिहीत. मुलाखतींच्या बाबतीत मतभेदाला किंवा वादाला वाव नसे. तो भाग सटकन फायनल  होई. त्यांची  इंप्रेशन्स सत्यावर आधारलेली असल्यानं त्यावरही वाद नसे. जेव्हां   इंटरप्रिटेशेनचा संबंध येई तेव्हां वाद होत असत. दोघांनी आपापलं म्हणणं मांडलं.  नंतर माजगावरांनी त्यावर हात फिरवला. दहा लेख प्रसिद्ध झाले.  लेखमाला गाजली. एक नवाच विषय वाचकांसमोर आला.

बंगालमधे मार्क्सवादी पक्षाचं राज्य आलं. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या विचारधारेनं लोकशाही पद्धतीनं निवडणुक लढवून लोकशाही  राजकारण करायला सुरवात केली. छाया दातार मार्क्सवादी विचारांच्या. माजगावकर त्यांना म्हणाले- तू मार्क्सवादी ना, मग तूच बंगालमधे जा आणि वार्तापत्रं लिही.

माजगावकरांनी शिरीष सहस्रबुद्धे आणि चंद्रकांत पुरंदरेंना हैदराबादला पाठवून तिथल्या नक्षल चळवळीवर लिहायला सांगितलं. दोघेही व्यावसायिक पत्रकार नव्हते, नवशिके होते. त्यांच्या प्रामाणीकपणावर माजगावकरांचा भरवसा होता. नक्षलवादाच्या शोधात अशी लेखमाला त्यातून साकार झाली. गाजली.

माजगावकर  आणीबाणी विरोधी होते. त्यांनी सत्याग्रह केला. ते माणूसच्या अंकातून बोचरा मजकूर प्रसिद्ध करून  माणूस बंद होण्याचा धोका पत्करत होते. आर डॉक्युमेंट या उघडपणे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या कादंबरीचा अनुवाद माजवकरांनी छापला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीला त्यांचा पाठिंबा होता, वार्तांकनातून तो पाठिंबा व्यक्त होत असे.

माजगावकरांची इंदिराजींशी लव हेट रिलेशनशिप होती. राजकारण मान्य नव्हतं पण त्यांच्या क्षमतेबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल आदर होता. माजगावकर फक्त दोनच स्त्रियांचा उल्लेख वाघीण अशा शब्दात करत असत. इंदिरा गांधी आणि किशोरी आमोणकर.  १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर माजगावकर आणि कुमार केतकर यांनी इंदिरा गांधींची दीर्घ मुलाखत दिल्लीत जाऊन घेतली, माणूसमधे प्रसिद्ध केली. निवडणुकीत हरल्यानंतर इंदिरा गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शिरूरला त्यांची सभा होती. माजगावकरांनी सतीश कामत यांना ती सभा कव्हर करायला पाठवलं. सभेला पन्नासही लोक नव्हते. सतीश कामतांनी बातमीपत्र लिहिलं, सूर टिंगलीचा होता.

माजगावकर कामतांना म्हणाले ‘ मोठ्या माणसाबद्दल असं टिंगलवजा लिहू नये.इंदिरा गांधी सत्वसंपन्न बाई आहे. लढाऊ आहे. ती लढेल, पुन्हा सत्तेमधे परतेल. बघच.’

छचोरपणा, उथळपणा, विनाकारण सनसनाटी निर्माण करणं, टिंगल टवाळी, खोटी टीका किंवा भावूक स्तुती यांना माजगावकरांकडं वाव नव्हता. वाचकांना सारे तपशील आणि कंगोरे कळावेत यासाठी मजकुराची लांबी पुरेशी आणि भरपूर ठेवलेली असे. कित्येक वेळा पूर्ण अंक एकाद्या विषयाला वाहिलेला असे.

माजगावकरांना अकॅडमिक पद्धतीच्या चर्चांत रस नव्हता. सामान्य माणसाला समजेल अशा रीतीनं, सामान्य माणसाच्या बाजूनं त्यांना विषय मांडायचे असत. गहन गंभीर  विषय मांडण्याची एक रीत इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली या साप्ताहिकानं रूढ केली होती. त्यात रकाने असत, रकान्यात आकडेवारी असे. गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केलेला असे. ग्रीक अक्षरांचा वापर करून संख्या शास्त्राचे निष्कर्ष त्यात काढलेले असत. इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकलीचा एक स्वतंत्र वाचकवर्ग होता. त्यातल्या मजकुराचा एक  डावा कल होता. तरीही त्यातल्या गंभीर आणि शास्त्रशुद्ध मांडणीमुळं सगळ्या रंगांचे वाचक ते साप्ताहिक वाचत. विशेषतः शिक्षक, अभ्यासक. वर्तमानपत्रांतून  स्तंभ लेखन करणारी मंडळी मुद्दाम वीकली वाचत. माजगावकरांच्याही वाचनात ते साप्ताहिक असे. पण माजगावकरांनी वेगळा वाचक वर्ग निवडला होता, एक वेगळा वाचक वर्ग तयार केला होता. वीकलीमधे येणारेच विषय पण वेगळ्या रीतीनं मांडणं. वार्ताहर पाठवून तो विषय विकसित करणं. लोकांशी, विचारवंतांशी आणि नेत्यांशी बोलून विषय विकसित करणं. सामान्य माणसाचे अनुभव, त्याच्यावरचे प्रभाव, त्याचे अनुभव वार्ताहरानं संकलित करून मांडायचे.

पारधी समाज विकसित करण्यात गुंतलेले   गिरीष प्रभुणे एके काळी माणूस साप्ताहिकात लिहीत होते.

” मी सातवी आठवीत असतानाच (१९६४-६५) माणूस या साप्ताहिकाचा प्रभाव माझ्यावर आणि आमच्या वर्गातल्या मुलांवर होता. पाडळी गावच्या  शाळेत माणूसची एक प्रत येत असे. आम्हाला राऊत आणि माळी असे दोन शिक्षक होते. ते माणूसच्या अंकातल्या लेखमाला वर्गात वाचून दाखवत. नाझी भस्मासुराचा उदयास्त ही अख्खी लेखमाला आम्ही त्यांच्याकडून ऐकली. ते शिक्षक लेख वाचत असताना स्वतःच्या पदरची माहिती त्यात मिसळून लेखमाला रंगवत असत. वर्ग भारलेला असे…..

…. माणूसमधे सिनेमा, नाटकं, राजकारण इत्यादी विषयांवर मजकूर असे. मला वाटे की आपणही लिहावं, असंच लिहावं. मी लाटाखालील पाणी नावाची एक कादंबरी लिहिली. नववीत. माझ्या बालपणीतल्या अनुभवावरून. साताऱ्याला येण्याच्या आधी आम्ही कोकणात, चिपळूणला होतो. कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमीन मिळत नव्हती. त्यांचं पुनर्वसन होत नव्हतं. त्यांची हलाखी आणि स्थिती या कादंबरीत होती. शरच्चंद्र चटर्जींच्या श्रीकांत या कादंबरीचा प्रभाव या कादंबरीवर होता. ती कादंबरी ‘ माणूस ‘ मधे प्रसिद्ध व्हावं असं मला वाटत असे. माजगावकरांशी बोलावं असं मला वाटत असे. पण बराच काळ ते जमलं नाही. ”

१९८०-८१ च्या काळात प्रभुणेंचा  ‘ माणूस’ शी संपर्क झाला. ‘ माणूस ‘   महानगर विशेषांक काढत होतं. विशेषांकासाठी लेखक, जाहिराती गोळा करण्यासाठी वंदना माजगावकर पिंपरी-चिंचवड भागात फिरत होत्या. लोकांनी गिरीषचा रेफरन्स दिला. एक धडपड्या माणूस असिधारा नावाचं नियतकालिक चालवतो, त्याचा उपयोग होतो कां पहा असं सांगितलं. वंदना गिरीषकडं पोचल्या.

गिरीषची चिंचवडमधे ऊठबस होतीच. कामगार, युनियनचे पुढारी इत्यादींच्या मुलाखती त्यानी घेतल्या आणि चिंचवड गावाची माहिती देणारे लेख तयार केले. सगळ्या लेखांचा मिळून एक पूर्ण अंकच तयार झाला. अनेकांपैकी एका लेखावर गिरीष प्रभुणेंचं नाव. बाकीचे लेख प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी अशा विविध नावांवर.

हे गिरीषचं माणूसमधलं पहिलं लिखाण. या निमित्तानंच माजगावकरांची भेट झाली.  गिरीष दररोज डायरी लिहितो हे माजगावकरांना कळलं.

” तू असं कर. सांगवी सांडस या गावाला जा. तिथं ग्रामायननं केलेल्या प्रयत्नातून एक उपसा सिंचन योजना उभी होतेय. अनेक वर्षं योजना बंद पडली होती. अनेक कारणांसाठी. तिथं जा. महिनाभर रहा. तुला दिसतं ते लिहून पाठव. ” माजगावकर म्हणाले.

” तू डायरी लिहितोसच. मुक्कामात तू जे पहाशील, जे ऐकशील ते डायरीत लिहून ठेव. ते गाव, त्या गावाचा इतिहास, बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनेचा इतिहास इत्यादी गोष्टी लोकांकडून समजून घे. मग ते सगळं लिहून काढ. तुला जमेल. सर्व तपशील काटेकोरपणे गोळा कर. कागदपत्रंही हाताशी असूदेत.” माजगावकर म्हणाले.

त्यातून माणूसचा ग्रामायन विशेषांक निघाला. एक अख्खा अंक गिरीषच्या लेखांवर आधारलेला.

” मी निमगावला ग्रामायनचं काम करू लागलो  तेव्हां संघातले माझे सहकारी म्हणाले, गड्या तू बिघडलास, समाजवादी झालास. त्यांच्या मते माजगाकवर समाजवादी होते. संघानं शाखा घ्यायच्या, बौद्दिकं घ्यायची, सामाजिक परिवर्तनाचं काम करायचं नाही असं  संघाला वाटत असे…  माणूसमधे काम करत असताना मी विलासराव साळुंखेंच्या कामावर लिहिलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या. ….दलित रंगभूमीवरचे एक प्रख्यात रंगकर्मी टेक्सास गायकवाड यांची मुलाखत घेतली. ”

ग्रामायनमधे प्रभुणेंनी  भटके विमुक्तांच्या विकासाचे प्रकल्प केले. त्या काळात माजगावकर त्यांना म्हणाले ”  तेही काम चांगलंच आहे.  ते काम करत असताना लिहिणं मात्र सोडू नकोस.  तू लेखक आहेस, तू जे पहातोस त्यात तुझी लेखनसामग्री आहे. लिहित जा, आपण माणूसमधे प्रसिद्ध करत राहू. ”

प्रभुणेंची माजगावकरांशी चर्चा होत असे, त्यातून  विषय निघत. चर्चेमधे माजगावकर विषयाचे विविध पैलू कसे शक्य आहेत ते सांगत. कोणाला भेटता येईल ते सुचवत. एकूण पर्सपेक्टिव  देत.  अमूक एक प्रकारे लिही असं सांगत नसत.  नव्याच गोष्टी समोर येतील, त्याही पहा त्यातून जे दिसेल सुचेल ते लिही असं सांगत. कोणतंही बंधन नसे. लेखात बदल करत नसत.

डॉ. कुमार सप्तर्षी ‘ माणूस ‘ च्या सुरवातीपासून माजगावकरांच्या संपर्कात होते, ‘ माणूस ‘ मधे लिहीत होते.ते  मेडिकल कॉलेजमधे असतानाच युवकांना विविध सामाजिक प्रश्नांवर संघटित करत होते. पुणे जिल्ह्यात सुपे तालुक्यात  गावातले सवर्ण दलितांना पाणी भरू देत नव्हते. दलितांच्या विहिरी गाळानं भरल्यानं निरुपयोगी होत्या. सप्तर्षी आणि त्यांचे मित्र  एकत्र आले. सुप्यात गेले. तिथं दलितांच्या बैठका घेतल्या. त्यांना धीर दिला. पुण्यात पैसे गोळा केले. युवकांनी श्रमदान केलं. विहिरीतला गाळ काढून त्या वापरत्या केल्या.

माजगावकर सप्तर्षींचं वरील आंदोलन  पहात होते. समाजात एकूणातच काही कार्य, धडपड करणाऱ्या लोकांवर, विशेषतः तरुणांवर माजगावकरांचं लक्ष होतं. जमेल त्या वेळी माजगावकर सप्तर्षींच्या कार्यक्रमात सहभागी होत, पैसे गोळा करण्याच्या मोहिमेला हातभार लावत.सप्तर्षींच्या बैठकांना माजगावकर हजर रहात.

१९६७ मधे बिहारमधे दुष्काळ पडला.जयप्रकाश नारायण यांनी पुण्यात येऊन मदतीची याचना केली. बिहारमधे कशा प्रकारे मदत करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी सप्तर्षी  बिहारमधे गेले. जाण्यापूर्वी माजगावकरांशी चर्चा झाल्या होत्या. पाटण्यात गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीवर त्याची वार्तापत्रं माणूसमधून प्रसिद्ध झाली.

सप्तर्षी म्हणतात ”  माणूसमधे आलेल्या वार्तापत्रांचा परिणाम झाला होता. अनेक विद्यार्थी संघटनाही पुढं आल्या. आम्ही हिशोब काढला होता. बिहारमधे माणसाला एक वेळचं खाणं – खिचाडा – देण्याचा खर्च सुमारे ११ पैसे होता. आम्ही मोहिम चालवली. डेक्कनवर फलक लावले. -अकरा पैसे ही रक्कम तुम्हाला फार नाही पण त्या रकमेत एक बिहारी माणसं जिवंत रहातो, वगैरे. पैसे गोळा करण्यासाठी आम्ही बूट पॉलिश करण्याची मोहिम चालवली. बूट पॉलिशवाल्यांना सांगितलं की तुमच्या दिवसाच्या मिळकतीयेवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो, ते सामान वगैरे आमच्या हाती सोपवा. जनतेनं बूट पॉलिश भले करून घेतलं नसेल पण भरभरून रकमा दिल्या. याही घटनांची माहिती आणि फोटो माणूसमधून प्रसिद्ध झाले. गोळा झालेले पैसे थेट बिहारमधे पोचत असत. ते हिशोब  माणूसमधे प्रसिद्ध होत. माजगावकर सार्वजनिक पैशाच्या हिशोबाबाबत फार काटेकोर असत. ”

मुकुंद संगोराम पत्रकार झाले नव्हते त्या काळात माजगावकरांबद्दल ऐकून असत, भारावलेले असत. माजगावकरांच्या बैठकामधे ते जात असत. तिथं जाणं, बोलणं हे त्यांच्या लेखी एक धाडसच होतं. जवळ जवळ दररोज   संध्याकाळी ते माजगावकरांना भेटायचे. जवळच दत्त उपहार गृह होतं. ते माणूसचं ऑफिसच असल्यागत. तिथं जायचं. तिथं चांगली मिसळ मिळत असे. माजगावकरांना तिखट खाण्याचा त्रास होत असल्यानं ते चहा आणि शंकरपाळे खायचे. बाकीच्यानी मिसळ चापायची. काय वाचलं, काय पाहिलं यावर संगोराम व इतर हजर माणसं बोलायची.

” एकदा महेश एलकुंचवारच्या  पार्टी या नाटकाचा प्रयोग पुण्याला झाला होता. मी तो प्रयोग पाहिला होता. कोणतीही भीडभाड न ठेवता माजगाकरांसमोर बोलायची सवय आणि मुभा होती. मी माझ मत सांगितलं. त्या काळातल्या मध्यम वर्गाचं जगणं एलकुंचवारांनी एक्सपोज केलंय असं म्हणालो. माजगावकर म्हणाले – पुंडलीकनंही ते नाटक पाहिलय. त्यालाही त्यावर बोलायचंय. उद्या ऑफिसवर ये. दुसऱ्या दिवशी मी, पुंडलीक आणि माजगावकर पार्टी या विषयावर तास दीड तास बोललो. माजगावकर बोलत फार नव्हते, ऐकत होते. एका क्षणी त्यांनी मला थांबवलं अन् म्हणाले – तू लिहून काढ. पुंडलीकशी चर्चा कर.’ मी उडालोच. पुंडलिक कुठं आणि मी कुठं. त्यांनीच लिहिणं योग्य.  मी माझं बालिश लिखाण करणं बरोबर नाही असं मला वाटलं. मी माजगावकरांना तसं सांगितलं.माजगावकर म्हणाले – तू पुंडलीककडं जा. त्याच्याशी चर्चा कर आणि तूच लिहून काढ. ही तुझी जबाबदारी.’ मी पुंडलीकांशी चर्चा केली. लिहून काढलं. त्यांचं आणि माझं म्हणणं एकत्र गुंफलं. पुंडलिकांनी ते वाचलं. त्यात सुधारणा केल्या. मी ते लेखन माजगावकरांकडं सोपवलं. माजगावकरांनी त्याची कव्हर स्टोरी केली.   माझं नाव पहिलं आणि विद्याधर पुंडलिकांचं नाव दुसरं अशा संयुक्त नावानं लेख छापून आला. मी काय सांगू. धन्य झालो. माजगावकरांनी माझ्यासारख्या अगदी ज्युनियर माणसाच्या प्रथम नावानं लेख छापणं म्हणजे माझ्या लेखी केवढी मोठी गोष्ट होती. मी कायमचा त्यांच्याशी बांधला गेलो.

विजय कुवळेकरांनी नुकतीच पत्रकारीत उमेदवारी सुरु केली होती. तेही दत्त उपहारगृह या जर्नालिझम स्कूलमधे माजगावकर गुरुजींच्या अनौपचारिक वर्गात बसत. ” त्या दिवशी  दादू इंदुरीकरांचं निधन झालं होतं.  मी म्हणालो की दादू इंदुरीकर हा एक भारी माणूस आज गेला.”

माजगावकरांना इंदुरीकरांचा परिचय नव्हता.

” त्यांचं काय वैशिष्ट्यं आहे असं त्यांनी मला विचारलं. मी दादूच्या नकला करून त्यांना हसवलं. दादूचा गाढवाचं लग्न हा वग इचलकरंजीला  मी कोल्हापूरहून चालत जाऊन तो कसा पाहिला याची गोष्ट मी त्याना सांगितली. हा विषय क्लिक होणार असं त्यांना वाटलं. दादूबद्दल  माझी माहिती कितपत आहे इत्यादी गोष्टी त्यांनी जोखल्या आणि म्हणाले की जा उद्या या विषयावर लिहून आण. ”

दादू इंदुरीकरांवरचा लेख प्रसिद्ध झाला.

कुवळेकरांनी सांगितलेली आणखी एक हकीकत.

” जनता दल फुटला त्या वेळची गोष्ट. फुटलेल्या दोन्ही पक्षाच्या सभा कव्हर करत होतो. रमण बागेत जनसंघीयांची सभा झाली. तिथं हज्जारो माणसं हजर होती. सरस्वती शाळेत समाजवाद्यांची बैठक झाली. तिथं दोन तीनशेच माणसं. या सभेत पुढाऱ्यांचे रुसवे फुगवे झाले. समाजवाद्यांचे एक नेते नानासाहेब गोरे सभेच्या ठिकाणी नाराज झाल्याचं दिसलं. हे सारं मी माजगावकरांना सांगितलं. माझ्या बोलण्यात नानासाहेबांबद्दल थट्टेचा, टीकेचा सूर होता.

माजगावकर म्हणाले – छान. लिहून काढ. दोन पक्ष दोन सभा. पण नाना साहेबांबद्दल थट्टा, टीका करू नकोस. तू लहान आहेस, अननुभवी आहेस, तू नानासाहेबांयेवढ्या मोठ्या नेत्याबद्दल असं लिहिता कामा नयेस. तुझे मतभेद जरूर असतील पण गोरे हे शेवटी एक मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत, त्यांची थट्टा आपण करता कामा नये. हे सारं ऐकूनही तुला जर नानासाहेबांबद्ल थट्टेचं विधान विचारपूर्वक करायचं असेल तर त्याला माझी आडकाठी नाही. मी ते जरूर छापेन आणि त्याची जबाबदारी घेईन.’

कुवळेकरांनी घरी गेल्यावर विचार केला. त्यांना माजगावकरांचं म्हणणं पटलं. त्यांनी टीका टाळून लेख लिहिला. माजगावकरांनी त्याची कव्हर स्टोरी केली.

साऱ्या जगात,  भारतभर काय चाललंय ते समजलं की वाचकाचा एक पर्सपेक्टिव तयार होतो. वाचक परसातल्या विहिरीत डुबक्या मारत राहिला तर त्याची समज त्याच्या परसापुरतीच मर्यादित रहाते. राज्यात, देशात इतरत्र चाललेल्या गोष्टी त्याला समजल्या तर त्याला आपल्या नजीकचं जगही वेगळं समजू लागतं. माहिती तर माध्यमात द्यावीच लागते पण त्या माहितीतून वाचकाचा पर्सपेक्टिव तयार करायला मदत करणं हे  पत्रकाराचं काम.

१९६० मधे ‘ माणूस ‘  साप्ताहिक जन्नाला आलं ते देश आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणच्या वास्तवात, दाहक वास्तवात, जनतेमधे निर्माण झालेल्या असंतोषात. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले आणि वाढलेले माजगावकर देश आणि महाराष्ट्राकडून अपेक्षा बाळगून होते. त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसेनात. त्यानाच नव्हे तर एकूण भारतीयांनाही तसंच वाटत होतं. हे वास्तव, हे सारं नवनवं समजून घ्यावं, मांडावं असं माजगावकारांना वाटलं.

माजगावकरांबद्दल सप्तर्षी म्हणतात ” माजगावकर आमच्याशी बोलताना पुग सहस्रबुद्धे यांच्या शिकवणुकीचा उल्लेख नेहमी करत असत. सहस्रबुद्धे यांचा प्रभाव ते आणि त्यांचे जवळचे मित्र विद्याधर पुंडलीक, सह देशपांडे यांच्यावर होता. पुग रास्व संघाचे बौद्धिक प्रमुख होते. पण त्याच बरोबर ते एक वैचारिक म्हणूनही पुण्यात ओळखले जात. संघाच्या बाहेरचीही माणसं त्यांच्या बैठकांतून प्रेरणा घेत असत. मीही त्यांचा अभ्यास आणि वक्तृत्व यानं प्रभावित झालो होतो, त्यांच्याकडं अनेक वेळा मी जात असे.पुगंचं म्हणणं होतं की स्वतंत्र भारताला चांगल्या पत्रकाराची आवश्यकता आहे. माजगावकरांनी मराठी आणि इतिहास  विषय घेऊन एमए केलं होतं. त्यांच्यासमोर दोन करियर होत्या. प्राध्यापक किंवा संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता. दोन्ही गोष्टी न करण्याचा निर्णय माजगावकरांनी घेतला, पत्रकार व्हायचं ठरवलं. हा पुगंचा प्रभाव होता. पुंडलीक पत्रकारी न करता कविता करायला लागले याचं दुःख पुगंना झालं होतं. माजगावकरांनी अगदी ठरवून, विचारपूर्वक पत्रकारी जीवन पत्करलं होतं.”

माजगावकरांचं व्यक्तिमत्व, माजगावरांचा राजकीय कल, माजगावकरांचं संपादक असणं या बद्दल सप्तर्षी म्हणतात,  ” आम्ही विचारानं समाजवादी आणि गांधीवादी. आम्हाला मार्क्सही जवळ वाटायचा, आंबेडकर आणि फुलेही जवळ वाटायचे. आम्हाला घडवण्यात राम बापट यांचा मोठा हात होता. आम्ही सतत आंदोलनं करायचो. आम्हाला क्रांती करायची होती, निवडणुकांचं राजकारण आम्हाला मान्य नव्हतं. राजकीय पक्षांशी आमचं जुळत नसे. त्यामुळं विचारानं जवळचे असूनही आम्ही समाजवादी पक्षापासून अंतर राखून असायचो. माजगावकर हे सारं जवळून पहात होते. माजगावकर समाजवादी नव्हेत. त्यांना  संघाची आपुलकी होती. तरीही ते आमच्या सोबत असायचे, हातचं राखून न ठेवता. याचं काय कारण असावं याचा शोध मी घेतो तेव्हां मला वाटतं की त्यांचा स्वभाव बंडखोरीचा होता. संघात असले तरीही ते बंडखोर होते. संघाचं देशप्रेम आणि देशाची सेवा या गोष्टी त्यांना आवडत होत्या पण शाखेसारख्या निष्क्रीय गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. संघानं समाजात उतरून कामं करावीत, शेतकरी-दलित-कामगार इत्यादी वर्गात संघानं उतरावं असं त्यांना वाटत असे. हा बंडखोरपणाच आमच्यातला समान धागा असावा. ”

माजगावकर यांचं संपादन म्हणजे काय होतं ते मुकुंद संगोराम सांगतात – संपादकांला द्याव्या लागणाऱ्या मजकुराचे दोन प्रकार असतात. एक मजकूर असतो वाचकांना हवा असलेला. तो द्यावाच लागतो, गत्यंतर नसतं. दुसरा   म्हणजे संपादकाला वाचकानी वाचावा असं वाटतं असा मजकूर. तो वाचक आनंदानं वाचतीलच असं नाही. आज वाचकांना आवडणारा मजकूर दिला जातो. तो दिल्यावर उरलेल्या जागेत असतात जाहिराती. लोकांनी वाचावा असं वाटणारा मजकूर द्यायला जागाच नसते.   असा काही मजकूर असावा असं वर्तमान काळातल्या संपादकांना वाटतच नाही. आताच्या संपादकांना स्वतःचं असं मतच राहिलेलं नाही. माजगावकरांच्या काळात सोबत होतं, किर्लोस्कर होतं, मनोहर होतं. सोबतनं अत्रेंच्या स्टाईलची एकतरफी आक्रमक पत्रकारी चालवली होती. बाकी  संपादकाना  स्वतःची मतंच नव्हती. माजगावकरांनी यातली मधली वाट शोधली होती. आक्रमक नाही,    वेगळा विचार करायला लावणाऱ्या  बाजू. वाचक जिथं वळायलाही तयार नाहीत अशी बाजू. वाचक विहिरीत रहातात. विहिरीतल्या वीस फूट परिघातल्या गोष्टीच संपादक वाचकांना देत. माजगावकर विहिरीच्या पलिकडं जाऊन वाचकाना जग दाखवत असत. चीनमधे काय चाललंय, रशियात काय चाललंय ते माजगावकर वाचकाना दाखवत, वाचायला लावत. चे गवारा काय, माओ काय. कोण मराठी माणूस या लोकांची नावं कधी ऐकणार होता की त्यांच्याबद्दल वाचणार होता. त्या काळात नक्षलवाद उफाळून आला होता. शहरात रमलेला मराठी माणूस कशाला मरायला नक्षलवाद समजून घेईल. तिकडं धुळ्यातल्या आदिवासींचे प्रॉब्लेम्स होते. तत्कालीन मराठी वर्तमानपत्रं आणि ती चालवणारे संपादक या गोष्टी समजूनही घेऊ शकत नव्हते, त्यावर मजकूर देणं तर सोडाच.  साप्ताहिकात, पुरवणीत खेळ, नाटक, संगित, चित्रपट इत्यादी गोष्टी देऊन चुटकीभर राजकारण दिलं जात असे. माजगावकरांनी राजकारण, अर्थकारण, समाजकारण इत्यादी गोष्टी लोकांसमोर ठेवल्या.

माजगावकरांनी उंबऱ्याबाहेरचं जग वाचकांसमोर ठेवलं. तो काळ लक्षात घ्या. दया पवारांचं बलुतं नंतरचं. त्या आधी हंसा वाडकर यांचं सांगत्ये ऐका. हंसा वाडकरांनी गावकुसाबाहेरचं जग माणूसमधे वाचकांसमोर ठेवलं. पुण्या मुंबईतल्या मध्यम वर्गीय लोकांना माहित नसलेलं हंसा वाडकर यांचं जग. माजगावकर जे जगत होते त्याहीपेक्षा खूपच वेगळं.  हे वेगळं जग काय आहे ते जाणून घेण्याची उत्सूकता आणि मोकळेपणा माजगावकरांकडं होता. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून हंसा वाडकरांचं जग माजगावकरांनी माणूसमधे मांडलं, नंतर त्याचं पुस्तकही केलं.”

१९६१ च्या जून महिन्यात माणूस या नियतकालिकाचा (पाक्षिक) पहिला अंक पुण्यात प्रसिद्ध झाला. श्री.ग. माजगावकर यांनी नियतकालिकासाठी काहीही पैशाची सोय नसतांना आणि  स्टाफवर एकही माणूस नसतांना हे पाक्षिक प्रसिद्ध केलं. १९८५ सालच्या जून महिन्यात ‘ माणूस ’ चा शेवटला अंक प्रसिद्ध झाला.

स्वातंत्र्य चळवळीत जनमानसामधे स्वतंत्र भारताबद्दल खूप आशा निर्माण झाल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सुजलाम, सुफलाम इत्यादी होणार असं नागरिकांना वाटत होतं. स्वातंत्र्यानंतर भारतानं राज्यघटना तयार केली, नियोजन मंडळ उभं केलं आणि पंचवार्षिक योजनेतहत विकास प्रयत्नांना सुरवात केली. १९५२ मधे पहिल्या निवडणुका पार पडल्या. नागरीक अधीर होते.  सारे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असं त्यांना वाटत होतं. स्वातंत्र्य पूर्व काळात केवळ राजकीय स्वातंत्र्यावर भर दिल्यानं आर्थिक- सामाजिक प्रश्नांची जटिलता आणि तो सोडवणं किती कठीण आहे याची कल्पना नागरिकांना नव्हती. सरकार स्थापन होऊन, निवडणुका झाल्यानंतर अधीर नागरिकांना वास्तवाचे चटके बसू लागले. भारतातलं आर्थिक सामाजिक वास्तव नागरिकांच्या लक्षात येऊ लागलं.

१९६० च्या सुमाराला वास्तवाचे चटके बसू लागल्यावर संवेदनशील व्यक्तींना वास्तव समजून घेण्याची, समजून देण्याची आवश्यकता भासू लागली. श्री.म. माजगावकर तरूणपणातच सामाजिक कार्याकडं आकर्षित झालेले होते. रास्व संघ, सावकर ही त्यांची प्रेरणास्थानं होती. आपण समाजिक कार्यासाठीच जन्मलो आहोत अशी त्यांची धारणा होती.  स्वतंत्र भारताला चांगल्या पत्रकारांची जरुरी आहे कारण देशाची सर्वांगिण वैचारिक तयारी करण्याची आवश्यकता आहे असं माजगावकर सहस्रबुद्धे यांच्याकडून शिकले होते. या प्रेरणेतूनच त्यांनी माणूस हे पाक्षिक सुरू केलं.

पुढली पंचवीस वर्षं माजगावकरांनी ‘ माणूस ’ जवळपास एकहाती चालवलं. जग, भारत आणि महाराष्ट्र या भूगोलात घडणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक अशा सर्व अंगांचं भान आणून देणारा मजकूर माजगावकरांनी प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातल्या नामांकित आणि होतकरू अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना त्यांनी लिहितं केलं.

भारतातल्या सर्व राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारांना आणि चळवळींना माणूसनं प्रसिद्धी दिली. पण माजगावकर कोणत्याही चळवळीतले कार्यकर्ते झाले नाहीत. अनेक विधायक कामं, अनेक संस्था उभ्या करण्यात आणि चालवण्यात माजगावकरांचा वाटा होता. परंतू माजगावकर त्या संस्थांत गुंतले नाहीत. ती ती कामं माजगावकरांनी   मजकुराच्या रूपात वाचकांसमोर मांडली.

संपादनाची एक विशेष शैली त्यांनी मराठी पत्रकारीत सिद्ध केली. वाचकांना सारे तपशील आणि कंगोरे कळावेत यासाठी मजकुराची लांबी पुरेशी आणि भरपूर ठेवलेली असे. कित्येक वेळा पूर्ण अंक एकाद्या विषयाला वाहिलेला असे. प्रसिद्ध होणारा मजकूर अकॅडमिक शैलीतला नसे पण अकॅडमिक गंभीरता आणि पुरावे यांचा समावेश मजकुरात असे. मजकूर अजिबात गंभीर असे. त्यात छचोरपणा, उथळपणा, विनाकारण सनसनाटी निर्माण करणं, टिंगल टवाळी, खोटी टीका किंवा भावूक स्तुती यांना वाव नव्हता.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार घडवणारी पत्रकारी माजगावकरांनी घडवली.

 

।।