Browsed by
Month: July 2017

खुशवंत सिंग,गाजले पण त्यांना कुणी फारसं गंभीरपणानं घेतलं नाही.

खुशवंत सिंग,गाजले पण त्यांना कुणी फारसं गंभीरपणानं घेतलं नाही.

 

खुशवंत सिंग यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या, काही कथा लिहिल्या. परंतू ते लेखक मानले जात नाहीत. शिख धर्माच्या इतिहासावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. परंतू ते अभ्यासक, संशोधक मानले जात नाहीत. काही काळ ते पेंग्विन प्रकाशनाचे मानद सल्लागार संपादक होते.  लेखकांची हस्तिलिखितं किंवा मूळ लिखितं वाचल्याचं दिसत नाही. वीकलीमधला त्यांचा काळ हाच त्यांचा संपादकपणाचा खरा काळ. फक्त नऊ वर्ष त्यांनी संपादन केलं असलं तरी ती कामगिरीसुद्धा भारतीय पत्रकारीत एक मैलाचा दगड असल्यागत आहे.

।।

टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीत चवथ्या मजल्यावर ‘ इलस्ट्रेटेड वीकली ‘ ची कचेरी. सकाळची पावणेनऊची वेळ. सफाई कर्मचारी संपादकाची खोली आणि टेबल साफसूफ करत होता.

चुरगळलेला टी शर्ट आणि ओबडधोबड फेटा घातलेला एका सरदारजी खोलीच्या दारात उभा राहिला. सफाई कामगार म्हणाला की संपादक दहा नंतर कधीतरी येतील, ही संपादकाना भेटायची वेळ नाही. सरदार म्हणाला मीच संपादक आहे. असला गबाळा माणूस संपादक असू शकतो असा त्या सफाई कामगाराचा अनुभव नव्हता.

१९६९ साली खुशवंत सिंग यांचा इलस्ट्रेटेड वीकली या साप्ताहिकाच्या संपादकपदाचा हा पहिला दिवस.

खुशवंत सिंग त्यांच्या कुलाब्यातल्या रहात्या घरापासून बोरी बंदरच्या टाईम्स इमारतीत चालत आले होते. त्यानंतरच्या त्यांच्या नऊ वर्षाच्या संपादनाच्या काळात ते दररोज चालत येत आणि चालत जात. त्यांनी कधी कार वापरली नाही, टॅक्सी वापरली नाही. कित्येक वेळा ते ट्रॅक सूट घालूनच कचेरीत येत. तेवढंच चालणं होतं, तब्येत चांगली रहाते असं म्हणत.

नऊ वाजता शुकशुकाट असताना ते कचेरीत पोचत. पाय टेबलावर पसरून कागद मांडीवर घेऊन लिहायला लागत. हातानं लिहीत. बाकीची संपादक मंडळी पोचण्याच्या आधी पत्रव्यवहार, कारभाराची कामं पाहून लिखाण सुरू करत.नंतर मग सहकारी, पाहुणे इत्यादींबरोबर उपदव्याप करायला मोकळे असत.

वीकली १८८० साली त्या काळच्या टाईम्सची पुरवणी म्हणून सुरु झालं होतं. १९२३ पासून ते इलस्ट्रेटेड या रुपात प्रसिद्ध होऊ लागलं. वीकली ही शैली सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीत विकसित झाली. पुस्तक व्यवसायाचा पूरक भाग असं या शैलीचं रुप होतं. पुस्तकांची परीक्षणं, पुस्तकांचे अंश, चर्चा त्यात प्रसिद्ध होत. बहुतेक वेळा पुस्तकांचे प्रकाशक ही साप्ताहिकं प्रसिद्ध करत. टाईप सेट केलेली अक्षरं आणि लाकडाच्या ठोकळ्यांच्या ब्लॉकवरून (वूड कट) छापलेली रेखाचित्रं असं साप्ताहिकाचं रूप असे. हळूहळू रंजकतेचा आणि कलात्मकतेचा हिशोब करून रेखाटनं वाढत गेली. साप्ताहिकांना चित्ररूप येऊ लागलं. लंडनमधे १८४२ साली इलस्ट्रेटेड लंडन न्यूज प्रसिद्ध झालं. १८८० नंतर फोटोग्राफी विकसित झाली आणि हाफटोन ब्लॉक तयार करण्याचं तंत्र विकसित झालं. त्यातून आज आपण पहातो ती चित्र सिद्ध होऊ लागली. तिथून साप्ताहिकांनी चित्रमय रूप धारण केलं. ब्रीटनमधे घडलेल्या या तंत्रज्ञानातल्या घडामोडी आणि त्याचा पत्रकारीवर झालेला परिणाम टाईम्सच्या पुरवणीत १८८० साली दिसू लागला.

खुशवंतसिंग यांनी संपादकपद घेतलं तोवर वीकलीचा खप फार तर १० हजार असे. ते एक कौटुंबिक पत्र होतं. जन्म, मरण, लग्न इत्यादीच्या बातम्या असत. माहितीपर लेख असत. गृहिणी, मुलं इत्यादींनी वाचावा असा मजकूर असे. राजकारण इत्यादी विषयही येत असत. साधारणपणे वीकली निरस,कंटाळवाणं असे. दवाखान्यात आणि केस कापायच्या दुकानात वेळ काढण्यासाठी ठेवलेला मजकूर असं त्याचं रूप असे. त्यात त्रास देणारं काहीच नसल्यानं घरामधे ते टेबलावर सुखानं पडलेलं असे, मुलापासून आजीआजोबापर्यंत कोणीही वाचावं, किंवा वाचू नये.

खुशवंत सिंग यांनी विचार केला की आपण  कितीही बंडल संपादक असलो तरी आहे या पेक्षा अधिक बंडल करायला वाव नाही इतकं हे साप्ताहिक बंडल आहे. तेव्हां आपण काहीही केलं तरी अधिक वाईट होणार नाही, झालंच तर सुधारणारच होईल.

खुशवंत सिंग यांनी तीन उद्दिष्टं ठरवली होती.  ” माहिती, रंजन आणि डिवचणं, inform, amuse and irritate. भारतीय वाचकांना निरुत्साही सुस्तीतून बाहेर काढणं, विचार करायला डिवचायचं, विनोद आणि उपरोधीक शैली वापरून.”

खुशवंत सिंग यांनी वाचकाला काय वाचायला आवडेल याचा विचार केला. त्या काळात संपादक, प्रकाशक, मालक यांच्या मते जे चांगलं असेल ते वाचकांना दिलं जात असे. संपादकाची आवड हे इंजिन पत्राला खेचत असे. खुशवंत सिंग म्हणत वाचकाला काय हवंय ते पहात.

वीकलीनं शकीला बानो भोपाली या गायिकेवर कव्हर स्टोरी केली.  शकीला बानो कव्वाली गायिका होत्या. भेंडीबाजार इत्यादी ठिकाणच्या तळातल्या माणसांमधे त्या प्रिय होत्या. शास्त्रीय संगित (भारतीय, पश्चिमी) हे समाजातलं शिष्ट संमत गाणं होतं. गझल ऐकली जात असे पण तीही बेगम अख्तर किवा शोभा गुर्टू अशा गायिकांकडून. शकीला बानो चढ्या आवाजात गात, धुंद गात. शकीला बानोंची वेषभूषा, देहबोली इत्यादी सारं आजच्या भाषेत बोलायचं तर सेक्सी आणि भडक होतं. भरपूर रंगीत पानभर फोटोंनी स्टोरी सजली होती. संख्येचा हिशोबात विचार केला तर हरिप्रसाद किवा किशोरी आमोणकर यांचं गाणं कितीसे लोक ऐकतात? त्या मानानं शकीला बानोचे श्रोते खूप जास्त. शकीला जर  लोकांना आवडत असेल तर तिच्यावर मजकूर यायला हवा असा खुशवंतसिंगांचा हिशोब.

वाचकांनी नाकं मुरडली. मुंबईतल्या एका वाचकानं लिहिलं की आजवर वीकलीचा अंक त्यांच्या घरात डायनिंग टेबलवर ठेवतांना त्यांना संकोच वाटत नसे पण आता मात्र त्यांनी वीकली घेणं बंद केलंय.

खुशवंत सिंगांचं उद्दिष्ट सफल झालं.

वाचक आतुरतेनं नव्या अंकाची वाट पहात. ईशान्य भारतात अंक चारेक दिवस उशीरा पोचत असे, वाचक स्टॉलवर वाट पहात असत. गेल्या आठवड्यात शकीला बानूवर मजकूर असेल तर या आठवड्यात कोणत्याही विषयावर, उदा. सुनील गावसकरवरही मजकूर असेल. राजू भारतन खेळावरचा मजकूर लिहीत. चटकदार शैलीत आणि भरपूर चित्रं.

एका अंकाच्या मुखपृष्ठावर लता मंगेशकर दिलीप कुमार यांना राखी बांधतांना घेतलेला फोटो छापला. पण नंतर एका कव्हरवर परवीन बाबी किंवा प्रोतिमा बेदी. दोघीही सेक्स सिंबल होत्या. प्रोतिमा बेदीचं सारं आयुष्य थरारक. किती नवरे आणि किती प्रियकर. ती जे काही करीत असे ते खुल्लेपणानं सांगत असे, लपवाछपवी नसे. लोकाना अशा गोष्टी वाचायला आवडतात. गाजलेल्या लोकांचं सेक्स लाईफ कसं असतं ते जाणून घ्यायला लोकांना आवडतं. समाजमान्य पत्रकारीत अशा  विषयांना स्पर्ष करणं म्हणजे पाप मानलं जात असे. कारण समाजाला तथाकथित चांगलं वळण लावणं हे पत्रकारीचं उद्दिष्ट आहे असं समाज मानत असे. ते खरं नाही हे लक्षात घेऊन खुशवंत सिंगांनी क्षोभक विषयांना हात घातला. त्यामुळंच बुवाबाजी करणारे भोंदू लोकही वीकलीच्या तावडीत सापडले.

मुसलमान आणि पाकिस्तान हे भारतीय म्हणजे बहुसंख्य असलेल्या हिंदू माणसांच्या आवडीचे आणि भावनेचे विषय. वीकलीनं पाकिस्तान म्हणजे केवळ द्वेषाचा विषय नव्हे आणि मुसलमान म्हणजे वाईट्ट माणसं असतात हे खरं नाही असं सांगणारे अनेक लेख प्रसिद्ध केले.

भारतीय माणूस दररोज पारशी, ज्यू इत्यादी माणसांच्या सहवासात वावरतो. हिंदू माणसाच्या दैनंदिन संपर्कात विविध जातीची माणसं असतात. परंतू या जाती काय आहेत, त्यांचा इतिहास काय आणि त्यांची संस्कृती काय आहे हे भारतीय माणसाला माहित नसतं. खुशवंत सिंग यांनी त्या समाजगटांचा इतिहास आणि संस्कृती यांची माहिती दिली. कोकणस्थ, कायस्थ अशा समाजांची माहिती त्यांनी लोकांसमोर ठेवली.

खुशवंत सिंग वात्रट होते, अवखळ होते. त्यांचं कुतुहुल असीम होतं. लाहोरमधे, दिल्लीत, मुंबईत, लंडनमधे, पॅरिसमधे, कुठंही हिंडत असताना आसपास माणसं काय करताहेत याचं कुतुहुल त्यांना असे. गर्दी दिसली की डोकावून आत काय चाललंय ते पहाणं त्यांना कधी चुकलं नाही. अर्थात या कतुहुलात सेक्स, स्त्रीचं शरीर या गोष्टीचं कुतुहुल त्यांच्या एकूण कुतुहुलात सर्वात अधिक प्रबळ होतं. कळायचं वय झालेलं नसतांनाही त्यांनी आईवडिलांनी केलेला संभोग फार उत्सुकतेन पाहिला होता. त्यांचं हे कुतुहूल त्यांच्या सर्व लिखाणात आणि संपादनात येत असे.

संपादक या माणसाला एक खुर्ची असते, एक पद असते, समाजात एक स्थान असतं. या साऱ्या गोष्टी खुशवंत सिंग यांच्या ध्यानी मनी नव्हत्या. कचेरीत जातांना बाहेरच्या हॉलमधे बसलेल्या शिकाऊ पत्रकारांमधे ते वावरत, त्यांच्याशी आपलेपणानं वागत, त्यांच्यावर बिनधास्त लेखनाच्या जबाबदाऱ्या सोपवत, सल्ला मसलत करत. त्यांनी लिहिलेल्या संपादकीयात किंवा लेखात चुका निघत. ज्युनियर संपादक, शिकाऊ संपादक भीतभीत त्यांच्याकडं जात. खुशवंत सिंग मोठ्या आवाजात गर्जत, काढून टाका, कापा.

खुशवंत सिंगांनी लिहिलेला एक लेख अभिरुचीला सोडून आहे असं वीकलीमधे काम करणाऱ्या एका उमेदवारी करणाऱ्या पत्रकाराच्या लक्षात आलं. पण संपादकाला सांगायचं कसं ते त्याला कळेना. त्यानं एक पत्र लिहिलं. त्या खाली आपलं नाव अक्षरं उलट्या दिशेनं लिहिलं. खुशवंत सिंगांनी पत्र वाचलं. तो कोणी लिहिलंय ते त्यांच्या पटकन लक्षात आलं. संध्याकाळी कचेरी सोडून जातांना ते त्या मुलासमोर थांबले आणि म्हणाले हुशार आहेस, चांगलं पत्रं लिहिलयस. तो मुलगा हादरला. आता आपली नोकरी जाणार असं त्याला वाटलं. खुशवंत सिंगांनी त्याची पाठ थोपटली आणि निघून गेले. पुढल्या आठवड्यात त्याचं पत्र वीकलीमधे छापून आलं.

खुशवंत सिंगाना त्यांच्यावर केलेले विनोद आणि टीका आवडत असे.

प्रक्षोभक विषय आणि अल्पवस्त्र चित्रं या गोष्टी त्या काळात पत्रकारीत प्रचलित होते. ब्लिट्झ आणि करंट या साप्ताहिकात भडक बातम्या आणि पानभर अल्पवस्त्रं मादक स्त्रियांची चित्रं छापली जात असत. डेबोनेर आणि प्लेबॉय ही इंग्रजी पत्रं सेक्सी चित्रं आणि मजकुरासाठी प्रसिद्ध होती. पैकी डेबोनेरचं संपादन विनोद मेहता करत असत. डेबोनेरेच्या अंकात मध्यभागी सेंटरस्प्रेड मोठं चित्र छापलं जात असे. ती पानं तयार झाल्यावर छापायच्या आधी मेहता ती खुशवंतांना पाठवून देत. खुशवंतांना मोठ्ठ्या स्तनांचं आकर्षण होतं हे मेहताना माहित होतं. खुशवंत सिंग त्यांची पसंती कळवत आणि त्या चित्रात प्रसिद्ध होणाऱ्या स्त्रीची गाठ घालून द्या असं विनोद मेहतांना सांगत.

वीकलीचा खप चार लाखाच्या घरात गेला होता. तेव्हां टाईम्स या दैनिकाचा खप लाखाच्या आसपास असे.

मारियो मिरांडा या व्यंगचित्रकाराला खुशवंत सिंगांनी खूप वापरलं. मिरांडांची करियर घडण्यात वीकलीचा वाटा मोठा आहे. आर के लक्ष्मण एक श्रेष्ठ व्यंगचित्रकार म्हणून सिद्ध झाले असतानाच त्यांच्या बरोबरीचं स्थान मिरांडा यांना मिळणं ही मोठी गोष्ट होती. लक्ष्मण यांच्या शैलीपेक्षा मिरांडांची शैली अगदीच वेगळी होती. मिरांडांच्या चित्रांत एकापेक्षा अधिक व्यक्ती असत. माणसांच्या सोबत त्यांचा परिसरही असे. समुद्र किनारा, रेस्टॉरंट, रस्त्यावरची गर्दी, ट्राफिक जाम, विमान तळ असे परिसरही त्यांच्या चित्रात असत. खुशवंत सिंगांनी त्यांचं हे वैशिष्ट्यं बरोबर ओळखलं आणि त्यांचा वापर केला. खुशवंत सिंगांच्या स्तंभासाठी एक ओळख चित्र मिरांडांनी केलं. त्यात एका बल्बमधे अस्ताव्यस्त बसलेले खुशवंत सिंग दिसतात, सोबत पुस्तकांची चवड दिसते, हातात एक उलगडलेला कागद दिसतो आणि बाजूला ठेवलेली दारूची बाटली आणि ग्लास दिसतो. खुशवंत सिंग यांनी हे ओळख चित्र आयुष्यभर त्यांच्या स्तंभासाठी वापरलं.

वीकलीचं संपादन करण्याच्या आधी त्यांनी भारत सरकारच्या योजना या मासिकाचं संपादन केलं. परंतू एक दोन अंकातच त्यांनी ते काम सोडलं. त्या आधी लंडनला भारतीय ऊच्चायुक्तांच्या कार्यालयात काम करताना सरकारी वार्तापत्राच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. परंतू सरकारची भलावण करणारा मजकूर, सरकारी बातम्या येवढाच त्या नियतकालिकाचा आवाका असल्यानं खुशवंतांनी दांडी मारली.

वीकलीच्या संपादनाच्या काळातच त्यांनी मनेका गांधी यांचं सुर्य हे मासिक संपादलं. पण त्यात पत्रकारीला फारसा वाव नव्हता, सल्ला देणं येवढंच खुशवंतांचं काम होतं. नॅशनर हेराल्ड या काँग्रेस पक्षाच्या दैनिकाचं काम त्यांनी काही काळ पाहिलं. पण मुळात त्या पेपरमधे दम नसल्यानं सिंग तिथं टिकले नाही. काही काळ द्यांनी हिंदुस्थान टाईम्सचंही काम केलं. परंतू दैनिक या स्वरूपात निघणाऱ्या पत्राशी खुशवंतांचं जमण्यासारखं नव्हतं. एक दर दररोचचा धबडका. निवांतपणा म्हणून नाही. मजकुरावर विचार करणं, निवांतीनं संपादन करणं ही गोष्ट दैनिकात जमत नाही. खुशवंत हा खुशाल माणूस दैनिकात रमणारा नव्हता. तिथून ते बाहेर पडले पण मरेपर्यंत तिथं त्यांनी स्तंभ लिहिला.

खुशवंत सिंगांचा जन्म पाकिस्तानात झाला. त्यांचं शिक्षण लाहोर, दिल्ली आणि लंडनमधे  झालं. ते वाढत होते त्याच काळात त्यांच्या वडिलांची- शोभा सिंग- भरभराट झाली. दिल्ली शहराची वाढ होत होती. दिल्लीतल्या गाजलेल्या इमारतींचं बांधकाम शोभा सिंग यांनी केलं. अर्धी दिल्ली त्यांच्या मालकीची होती असं म्हणत असत. शोभा सिंग श्रीमंत होते, प्रतिष्ठित होते. जिन्ना त्यांच्या शेजारी रहात असत, त्यांच्या घरच्या समारंभांना हजर रहात असत. फाळणीनंतर जिन्नांनी खुशवंत सिंगांना पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं होतं, तिथं त्यांना जिन्ना मोठ्ठया पदावर बसवणार होते. इंदिरा गांधी, नेहरू कुटुंबाच्या आसपास खुशवंत वावरत.

खुशवंत सिंग यांना स्कॉचवंत सिग असंही टोपण नाव ठेवता येण्यासारखं आहे इतका त्यांचा आणि व्हिस्कीचा, स्कॉचचा संबंध आहे. गर्भश्रीमंतीमुळं स्कॉचवैभव त्यांना अनुभवता आलं. पण त्यांनी मद्याच्या आहारी जाऊन धिंगाणा केला, कोणाचा अपमान केला असं घडलेलं नाही. स्त्री, स्त्रीचं शरीर, स्त्रीचं सौंदर्य, उपभोग या गोष्टींबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण होतं. परंतू तेही एका परीनं वरवरचं होतं. एकदा नर्गिस यांनी त्यांच्या घरी काही दिवस रहाता येईल कां याची चौकशी केली. खुशवंत आनंदानं तयार झाले. त्यांनी अट येवढीच घातली की नर्गीसनी जाहीर करायचं की त्या खुशवंतसिंगांच्या शय्येवर झोपल्या होत्या. नर्गीसनी ते मान्य केलं, अनेक वेळा हसत तसं जाहीरही केलं. हीच खुशवंत सिंगांची खासियत होती. त्यांच्या शय्येवर नर्गीस निजल्या पण तेव्हां खुशवंत शेकडो मैल दूर कुठं तरी होते. आपल्या शय्येवर एक सुंदरी निजली, आपल्यासोबत भले नसेल याचा एक गुदगुल्या करणारा आनंद खुशवंत सिंगानी घेतला.

खुशवंतांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची शैली गुदगुल्या करणारी, माणसाला एक्साईट करणारी होती.   त्यांच्या व्यक्तिमत्वाचं हे मुख्य लक्षण वीकलीच्या संपादकापदाच्या काळात साकार झालं, त्याला पोषक परिस्थिती लाभली. वीकलीमधल्या कव्हर स्टोऱ्या स्वतः खुशवंत सिंगांनी लिहिलेल्या नाहीत. तसं लिहिणारे पत्रकार त्यांनी शोधले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. वीकलीच्या सहकारी पत्रकांना त्यांनी कसं लिहावं याचं शिक्षण दिलं नाही किंवा आज्ञाही दिल्या नाहीत. एक्साईट करणारी शैली खुशवंत सिंग यांनी त्यांच्या लेखांत, स्तंभांमधे, पुस्तकात, भाषणात वापरली. त्या शैलीत वीकलीमधे लिहिलं नाही. वीकलीचं यश त्यात लिहिणाऱ्या पत्रकारांचं, छायाचित्रकारांचं, मांडणीकारांचं आहे. अशी माणसं गोळा करणं आणि त्यांना एकत्र गुंफणं हे संपादकाचं यश आहे.

।।

 

 

 

 

 

 

 

शब्दांच्या आधीची भाषा शोधणारा कलाकार, जॉन बर्जर.

शब्दांच्या आधीची भाषा शोधणारा कलाकार, जॉन बर्जर.

विराटनं तळव्याच्या आकाराचं  एक पुस्तक काढून मला दिलं. म्हणाला ” आताच आलय. लेखक आताच वारला, जुन्या पिढीचा लेखक आहे. तुम्ही कधीतरी वाचला असेल. पहा. छान आहे.”

जॉन बर्जरचं पुस्तक होतं, शीर्षक होतं कॉनफॅब्युलेशन्स. छोटं पुस्तक. जाड टायपायतलं. पानं १५० पण मजकूर अगदीच कमी.

पानावर ऐसपैस जागा सोडलेली. पुस्तकात खचाखच मजकूर भरून कमीत कमी पानात जास्तीत जास्त मजकूर घुसवून पुस्तक स्वस्त करणं अशी एक रूढी प्रकाशन विश्वात तयार झालीय. अशोक शहाणे वगैरे माणसांनी ही रूढी नाकारली. पुस्तकात आसपास जागा सोडणं, दोन पॅऱ्यांमधे जागा सोडणं, मजकुराची रुंदी हेतूपूर्वक कमी ठेवणं इत्यादी प्रथा अशोक शहाणेंनी पाडल्या. त्यांनी काढलेली अरूण कोलटकरांच्या कवितांची पुस्तकं पहावीत. तर त्या थाटाचं हे पुस्तक. मधे मधे रेखाचित्रं, रेघोट्या, चित्रं, फोटो इत्यादी. पहाताक्षणीच त्याचं वेगळेपण लक्षात येतं.

जॉन बर्जर हे नाव माझ्या परिचयाचं नव्हतं.  गूगल केल्यावर कळलं की गेल्या वर्षी वारला तेव्हां तो ९० वर्षाचा होता. ब्रिटीश होता. त्याच्या कादंबरीला बूकर पारितोषिक मिळालं होतं. तो चित्रकार, रेखाटनकार, फोटोग्राफर, कवी, कादंबरीकार असा सव्यसाची कलाकार होता. तो तत्वज्ञही होता, तो अँटीएस्टाब्लिशमेंट होता. दृश्यकलांच्या अभ्यासकांमधलं ते एक वेळोवेळी उल्लेख होणारं नाव होतं.

ब्लर्बमधे लिहिलं होतं की दृश्य भाषा समजूत या माणसानं क्रांतीकारी रीतीनं मांडली. या पुस्तकात भाषा म्हणजे काय हेच मुळात समजून घेण्याचा प्रयत्न लेखक करतो.

पुस्तक चाळलं. १३५ वं पान आलं. त्यावर चार पाच ओळी मजकूर आणि फुलाचं चित्रं. पान उलटलं. समोर फुलांची चित्रं. १३६ व्या पानावर लेखक म्हणतो की तो चित्र काढतो, पानांची,फुलांची, झाडांची, नद्यांची, समुद्राची. वनस्पतीशास्त्र किंवा सौंदर्य़शास्त्र समजून घेण्यासाठी नव्हे. त्याला उत्सूकता असते ती निसर्गानं दिलेले संदेश उलगडण्याची. हे संदेश भाषेत, बोलण्यातून व्यक्त करता येत नाहीत. भाषेच्या आधीची एक अनुभवाची भाषा असते, ती समजून घेण्याची लेखकाची इच्छा आहे.

लेखक दृश्य भाषेबद्दल बोलतो, त्या दृश्यातल्या  संगिताबद्दल, सुरांबद्दल, गाण्याबद्दलही बोलतो.

यास्मिन गात असते. शब्द अरेबिक असतात. प्रेक्षकात कोणालाच अरेबिक येत नसतं. पण  ती काय गातेय ते लेखकाला कळतं, भिडतं. हे कसं घडतं ते लेखक शब्दात सांगू शकत नाही.कारण तिचं शरीर गात असतं. ती शरीरानं गात असते. लेखक रेघांनी तिचं गाणं चितारतो, ते पुस्तकात आहे.

सुरांना शरीर हवं असतं, गाण्याला शरीर हवं असतं.वारं शिडात शिरलं की शीड डोलू लागतं. गाण्याचंही तसंच. ते गाणाऱ्याच्या शरीरात शिरतं, शरीर डोलू लागतं.

लेखक गाण्याबद्दल बोलतो. गाणं परफॉर्म करायचं असतं. लेखक दुनियाभर ऐकलेली गाणी पुस्तकात सांगतो. माद्रीदचा फ्लेमिंको नाच, इटाली आणि मेक्सिकोतले नाच. या नाचात गाणी असतात. ती गाणी गोष्ट सांगतात.

त्यातलं एक  गाणं. 1970 च्या दशकातल्या एका कविनं रचलेलं असतं. एक म्हातारा माणूस किनाऱ्यावर वाळूत पहूडलेला असतो. त्याच्याजवळ त्याचं मोजकं अन्न आणि पाणी असतं. दुरून एक माणूस येतो. पळून आलेला, दुसऱ्या गावाच्या वाटेवर. तो भुकेला असतो, तहानलेला असतो. पहूडलेला माणूस आपल्याजवळचं अन्न, पाणी त्याला देऊन टाकतो. तो माणूस निघून जातो. मागोमाग पोलीस चौकशी करत येतात.इथं कोणी माणूस आला होता काय. पहूडलेला माणूस मख्ख गप्प रहातो. हे गाणं दोन पिढ्या या गावात सामुहिकरीत्या म्हटलं जातं.

एक जण ड्रम वाजवत असतो. एक जण गिटार. एक जण माऊथ ऑर्गन. माऊथ ऑर्गन वाजवतांना त्याच्या चेहऱ्याची आणि हाताची वळणं.ड्रम वाजवतांना त्याचं हलणारं धड, डोकं, हात. गाणाऱ्याची कंबर. ओठ, हात, डोकं, कंबर, पाय, खांदे. या गोष्टींचं मिळून गाणं होतं.

लेखकाची आई शेनानडोचं गाण म्हणायची. शेनानडो हा एक अमेरिकन  इंडियन माणूस. एका नदीचं नावंही. शेनानडोचं गाणं मिसुरीतले काळे म्हणतात. कारण मिसुरीच्या उत्तरेला असतं स्वातंत्र्य आणि दक्षिणेला असते गुलामगिरी. शेनानडो म्हणजे गुलामगिरीविरूद्ध लढणारा हीरो. मिसुरीतले लोक गाण्यात म्हणतात, शेनांडो, फार दिवसात तुला पाहिलं नाही रे, केव्हां तू भेटणार आहेस.

फ्लेमेंको नाचात नर्तकाच्या अंगात एक धुंदी येते. त्याला एल डुएंडे म्हणतात. नर्तकाच्या अंगात एक संचारतं. डुएंडेचा एक अर्थ आहे   दंतकथेतला अतीमानवी प्राणी. स्पॅनिश कवी गार्सिया लोर्का म्हणतो की साहित्यात, कवितेत, चित्रात, कलेमधे, संगितात एक एल डुएंडे  यावीच लागते. म्हणजे काय तर वारा  जसं वाळूला उडवतो तसं एल डुएंडे नर्तकाला झुलवते. एल डुएंडे झाली की म्हातारा तरूण होतो, स्त्रीच्या केसांना बंदरातल्या हवेचा गंध येतो…

संगित  इतिहासाला वर्तमानात  आणतं, भविष्याकडं नेतं.

अलीकडं संगित टेपवर असतं, सीडीवर असतं. ते शेअर होत नाही. ते दिसत नाही, ते आपल्याला बरोबर घेऊन जात नाही कारण त्याला शरीर नसतं, ते सेंद्रिय नसतं. जे गाणं शेअर होत नाही ते खरं  गाणं नाही.

लेखक पॅरिसमधे भुयारी रेलवेनं प्रवास करत असताना त्याला चार मूकबधीर हातवारे करून बोलतांना दिसतात. गप्पा करत असतात. हात, चेहरा, डोळे, खांदे, ओठ यांच्या हालचाली करून ते एक चांगलीच गुंतागुंतीची मोठ्ठी गोष्ट सांगत असतात, शेअर करत असतात. शब्दाविना भाषा.

पोकळ शब्द, अर्थहीन शब्द वापरण्याची राजकारणाची सवय लेखक जागोजागी दाखवतो. फ्रेंच अध्यक्ष ओलाँ तीन तीन तास भाषण करतात. त्यात काहीही नसतं. वर्तमानातल्या माणसाच्या जगण्याचा, त्या माणसाच्या व्यथांचा मागमूसही भाषणात नसतो. पुढारी, माध्यमं सतत शब्द ओतत असतात. त्यात आकडे असतात, आलेख असतात, टक्केवारी असते. गरीबी आकड्यात मोजतात, पैशात मोजतात. त्यात माणूस नसतो.

लेखक कसं विचार करतो पहा.  कम्युनिझम नावाचा एक युटोपिया  होता. युटोपिया म्हणजे एक आदर्श व्यवस्था. जी व्यवस्था लोकांवर लादली जाते. युटोपिया म्हणजे मतांधता. युटोपियात माणसावर आनंदी झालंच पाहिजे असं बंधन असतं. युटोपियाला वर्तमान काळ आवडत नाही. त्याला फक्त भविष्य दिसतं. युटोपिया भविष्य कसं उज्ज्वल  असेल  ते सांगतो. वर्तमानकाळात माणसं कशी पिचली जाताहेत ते सांगत नाही. वर्तमान काळात दुःख असतं हे युटोपियाला आवडत नाही, वर्तमान काळात दुःख आहे हे युटोपिया अमान्य करतो. Utopia substitute doma for hope. रशियन राज्यक्रांतीच्या काळात शेतीचं सामुहिकीकरण हा डॉग्मा होता. लाखो शेतकरी त्यात मेले. आज मुक्त बाजार हा डॉग्मा आहे, त्यात लाखो माणसं गरीबीत पिचत आहेत. असं लेखकाचं म्हणणं.

स्वेन या स्विडिश चित्रकाराच्या अंत्ययात्रेला लेखक पोचतो. पन्नास साठ वर्षाची मैत्री लेखात येते. स्वेनचं वर्णन अनार्किस्ट या शब्दात करणं अपुरं आहे असं लेखक म्हणतो. स्वेनला कोणी  दहशतवादी म्हटलं असतं तर त्यानं नुसते खांदे उडवले असते असंही लेखक म्हणतो. स्वेनबरोबर लेखकानं अनेक निदर्शनांत भाग घेतला होता.

स्वेन आणि लेखक एक चित्र पहात उभे असतात. चित्रात तीन मेंढपाळ एका थडग्यासमोर उभे असतात. पैकी एक मेंढपाळ इतर दोघांना थडग्यावरची नोंद वाचून दाखवत असतो. स्वेन लेखकाला सांगतो, त्या लेखकाच्या हाताची सावली पहा.

स्वेन आणि लेखकानं एकत्र घालवलेल्या दिवसांच्या आठवणी लेखकानं लिहिल्या आहेत. स्वेनच्या घरात वीज नव्हती. पिण्याचं पाणी दूरवरून आणावं लागत असे. घरात खुर्च्या नव्हत्या. स्वेनच्या पत्नीनं मुर्ती घडवण्यासाठी तासलेल्या दगडावर किंवा मोडक्या गाडीतून काढून घेतलेल्या सिटांवर बसावं लागे. घरात एका वाडगा होता. पैसे साठवण्यासाठी. त्यात फारसे पैसे नसत. कित्येक वेळा स्वेन जाहीर करे की आज Menu C आहे. म्हणजे पिशवी घेऊन गावाच्या बाहेर जायचं. तिथं मंडईबाहेर टाकून दिलेल्या भाजीपैकी बरी असलेली भाजी ढिगातून उचलून आणायची. वाडग्यातले पैसे  घेऊन ब्रेड आणायचा. कारण ब्रेड रस्त्यावर पडलेला, फुकट मिळण्याची सोय नव्हती.

स्वेन यशस्वी चित्रकार नव्हता. त्याची चित्रं विकली गेली नाहीत, चित्राला किमत येत नसे. युरोपातले अनेक विचारवंत, लेखक, कवी, संगीतकार,कवी, वैज्ञानिक, डॉक्टर, कलाइतिहासाचे जाणकार, स्वेनला भेटायला जात, त्याची चित्र घेत. निवडक लोकांनाच स्वेन समजला होता.

स्वेननं निसर्ग चितारला, स्कँडिनेवियातल्या फार कमी काळ अनुभवायला येणारे समुद्रकिनारी उन्हाळे चितारले. स्कँडिनेवियात फार विरळ वस्ती असते. दीर्घ हिवाळा माणसाला छळतो, घराबाहेर पडू देत नाही. दाटीवाटी ही गोष्ट स्कँडिनेवियात नाही, माणसं एकमेकापासून दूर असतात तरीही ती आतून एका नागरी सभ्य समूहाचा भाग असतात. स्वेन स्कँडिनेवियन समर चितारतो.   ” In the Scandinavian summers, people of all ages take off as many clothes as the self respect permits, so that the three innocenses of sunlight, water and rewarded bodies can touch.”

लेखक पोहायला जातो. पोहताना त्याला सभोवताली काय दिसतं, आकाशातले ढग कसे दिसतात, ते ढग काय सांगतात इत्यादी गोष्टींचं ग्राफिक वर्णन लेखक करतो. सभोवताली मेपल झाडं दिसतात. झाडांची टोकदार पानं दिसतात. त्या पानांतून लेखकाला निसर्ग दिसतो, शब्द नावाची गोष्ट माणसाच्या जीवनात अवतरण्याआधीचा निसर्ग अनुभव. लेखक मेपलच्या पानाची रेखाचित्रं काढून पुस्तकात टाकतो. चित्र आपल्या डोळ्यासमोर उमटत जातं. लेखक म्हणतो की पोहताना सर्वांच्या अंगावर सारखेच आणि कमीत कमी कपडे असतात. ऊच्च नीच ही गोष्ट पोहणाऱ्याच्या बाबतीत नाहिशी होते. पोहतांना चुकून एकाद्याचा धक्का लागला की माणसं सॉरी म्हणतात. पोहण्यावर लिहित असताना लेखकाला आयसिसनं चालवलेले अत्याचार आठवतात. लंडनमधे स्थलांतरित व्हायच्या खटपटीत घुसमटून मेलेली माणसं आठवतात.

इटालीच्या किनाऱ्यावरचं कोमाचिओ नावाचं गाव. चारी बाजूनी पाण्यानं वेढलेलं. ईल मासे पकडणं, खारवणं, खाणं, निर्यात करणं हा मुख्य व्यवसाय. पाण्यातून मासे काढणं या कष्टाच्या  कामामुळं माणसं बुटकी, मजबूत खांद्याची आणि मजबूत बांधणीची. लेखक म्हणतो की सामान्यतः माणसाचं वर्णन डाऊन टु अर्थ असं केलं जातं. या लोकांचं वर्णन डाऊन टु वॉटर असं करायला हवं.

ईल मासे मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून अख्खा अटलांटिक समुद्र पार करून  इटालीकडं येतात. निघतात तेव्हां एक सेंटीमिटर लांबीचे असतात.  चार वर्षं प्रवास करून कोमाचियोपर्यंत पोचतात तेव्हां ते 40 सेंटीमीटरचे होतात. कोमाचियोत गोडं पाणी असतं. ते त्याना मानवतं. गोड्या पाण्यात ते काही महिने रहातात आणि आणखी जाडे होतात. मग त्यांना आपलं माहेर आठवतं. ते मेक्सिकोकडं जायला निघतात तेव्हां कोमाचियोची कोळी त्यांना पकडतात. भलेमोठे मासे पकडणं म्हणजे मोठंच कष्टाचं काम. मासे मिळाले की ऑक्टोबरमधे गाव आनंद साजरा करतं. संगिताची धूम उडते.

निसर्ग. अनुभव. आशा, निराशा, केओस आणि सिमेट्री. काळ म्हणजे रेषा नाहीये, ते वर्तुळ आहे.

काँन्फॅब्युलेशन म्हणजे  माणसाच्या मेंदूला ईजा झाल्यानंतरची अवस्था. माणूस अचानक आपण अवकाश यानातून मंगळावर कसं जाऊन आलं ते सांगतो. सकाळी आपण नाश्ता कसा केला ते सांगतो, जेव्हां त्यानं नाष्टा केलेलाच नसतो. काल आपण एका बैठकीत भाग घेतला असं म्हणून तो बैठकीचं वर्णन करतो, प्रत्यक्षात तशी बैठक झालेलीच नसते. अशा गोष्टी ज्या घडलेल्या नाहीत पण घडू शकतात. अशा गोष्टी ज्यात अनेक छोटे घडलेले तुकडे कोलाजसारखे जुळवलेले असतात. अशा गोष्टी ज्या केवळ कल्पिलेल्या असतात.आठवण, कल्पनाशक्ती या मेंदुतल्या जागांना दुखापत झाल्यानं ही अवस्था उद्भवत असते. माणसाचं हे वागणं त्याच्या नकळत असतं, कोणाला फसवण्यासाठी माणूस तसं वागत नसतो. त्याच अवस्थेत असल्यागत लेखकानं   हे पुस्तक लिहिलय. आपल्या आठवणी, पाहिलेली माणसं,  वाचन, पुस्तक वाचल्यावर वा सिनेमा  पाहिल्यावर झालेल्या प्रतिक्रिया इत्यादी गोष्टी लेखकानं कल्पित-अकल्पित पद्धतीनं  मांडल्या आहेत.

रोझा लक्झेंबर्ग या कम्युनिष्ट स्त्रीला ती स्वतंत्रपणे विचार करत होती म्हणून कम्युनिष्टांनी ठार मारलं, तिचं प्रेत  बर्लिनच्या गटारात फेकून  दिलं. ही घटना  १९१७ सालची. लेखक रोझाला एक काडेपेटींचा खोका भेट म्हणून पाठवतो. २०१०साली. हा खोका जस्मीन नावाच्या एका पोलिश स्त्रीनं खरेदी केलेला असतो आणि तिच्या मुलानं तो खोका लेखकाला दिलेला असतो.या खोक्यातल्या काडेपेट्यांवर पक्षांची चित्रं असतात. हे पक्षी गातात आणि भाषणंही करतात. हे पक्षी जगाला प्रश्न विचारतात आणि उत्तरंही स्वतःच देतात. कम्युनिष्ट दडपशाहीच्या अत्यंत कठीण काळात या पक्षांनी जस्मीनला साथ दिलेली असते.   लेखक जगातल्या पक्षांची संख्या देतो आणि रशियात त्यातले किती पक्षी आजही सापडतात ते सांगतो. बाप रे. किती गोष्टी एकत्र गुंफलेल्या.

आल्बेर कामूची एक गोष्ट वाचताना लेखकाला स्वतःचं लहानपण आठवतं.आई वडिलांनी चांगलं वाढवलं असतांनाही आपण पोरके-अनाथ होतो असं लेखकाला वाटतं. पोरकेपणानंच आपण स्वतंत्र झालो, स्वतःच्या हिमतीवर जगायला शिकलो, जगानं आखून दिलेल्या मर्यादांच्या रेघा तुडवायला शिकलो असं लेखक सांगतो.

चार्ली चॅप्लीनवर लेखक लिहितो. चॅप्लिन सतत पडतो, उठून उभा रहातो. पडताना आणि उभा रहाताना प्रत्येक वेळी चॅप्लीन नवा असतो. सभोवतालचं कमर्शियल, बाजारू, पैशाच्या मागं लागलेलं जग त्याला सतत छळत असतं. न निराश होता  चॅप्लिन त्या जगात लढत लढत जगत असतो. लोकांना आनंदी ठेवण्याची चॅप्लिनची खटपट.

एकदा चॅप्लिन स्टुडियोत काम करत असताना एक माशी घोंगावून त्याला छळते. चॅप्लिन माशी मारण्याचं उपकरण मागवतो. उपकरण येतं, माशी येते. चॅप्लिन त्या माशीला मारत  नाही. टेबलावरची माणसं विचारतात की चॅप्लिन माशीला कां मारत नाही. चॅप्लिन सांगतो की ती माशी ती त्रास देणारी माशी नव्हती, वेगळीच होती. विनाकारण वेगळ्या माशीला कशाला मारायचं.  चॅप्लिन अनेक वेळा रागावतो, फटकेही मारतो. पण तसं करतांना त्याला वाईट वाटत असतं.

चॅप्लिनची आठवण करताना लेखकाला रेंब्रा या चित्रकाराची आठवण होते. लेखक चॅप्लिनचा फोटो, रेंब्रांचं सेल्फ पोर्ट्रेट एकमेकाशेजारी ठेवतो.

लेखकाचं म्हणणं आहे की शब्द, भाषा, चित्रं इत्यादी आविष्काराच्या पलिकडं, त्या आविष्कारापासून खोलवर प्री व्हर्बल, म्हणजे बोलून व्यक्त होण्याच्याही आधीचे अनुभव असतात. माणसं फोटो काढतात आणि पुढं सरकतात. माणसं शब्द उच्चारतात आणि पुढं सरकतात. शब्द, फोटो केवळ चिन्हं होतात, चिन्हं पोकळ होतात, आशयापासून दूर जातात.  एकविसाव्या शतकातलं सगळेच आविष्कार पोकळ झाले आहेत असं लेखकाचं मत आहे.

आशय हरवलेले शब्द. खोकी, त्यावर लेबलं, खोक्यात काही नाही.

।।

 

 

अरूणा पवार यांच्या आठवणी काढायची सवय आता लावायला हवी

अरूणा पवार यांच्या आठवणी काढायची सवय आता लावायला हवी

अरुणा पवार गेल्या.

म्हटलं तर अचानक.म्हटलं तर त्यांच्या जाण्याची कुणकुण बरेच दिवस लागली होती. कारण त्यांना कॅन्सर  होता. त्यावर त्या उपचार घेत होत्या. उपचाराच्या पहिल्या फेरीनंतर त्या छान झाल्या होत्या. डोक्यावरचे केस गेले असताना तर त्या खूप देखण्या दिसत होत्या. उपचारानंतर त्यांना एक नवंच आयुष्य मिळालं होतं. पण ते तसं नव्हतं. कॅन्सरनं उचल खाल्ली. डॉक्टर मंडळींनी उपचारांची शिकस्त केली. अरुणा पवार जे काही समजायचं ते समजल्या. अगदी आनंदानं, आपण आजारी आहोत याची जाणीवही कोणाला होऊ नये असं वागत त्यांनी शेवटले दिवस वरवर आनंदात काढले. वरवर आनंदात पण आतून अतीव वेदना त्याना होत होत्या. वेदना दाबून टाकणाऱ्या औषधांचा मारा डॉक्टरांनी केला. वेदना काही कमी होईनात. पण अरूणाचा जगण्याचा उत्साहही कमी होत नव्हता. वेदना आणि जगण्याची आनंदी ओढ या ओढाताणीत शेवटी वेदनांवर मात करून अरूणा पवार शांत झाल्या.

अरूणा पवार विनोद पवार यांच्या पत्नी होत्या आणि ऋतू पवार यांच्या आई होत्या. हे तर खरंच. तेव्हां अरुणा पवार गेल्या म्हणजे काय झालं ते त्यांना जितकं कळेल तितकं इतरांना कळणार नाही. हेही खरंच.

पण हेही खरंच की अरूणा पवार विनोद, ऋतू, विनोदचे आई वडील, विनोदचे नातेवाईक, अरूणाचे आई वडील आणि नातेवाईक आणि या सर्वांच्या भोवती पसरलेले नातेवाईक आणि मित्र यांच्या गोतावळ्यात सर्व ठिकाणी सतत आनंदानं वावरणारी एक व्यक्ती होती.

कोणाच्या घरी पाळणा हलणार याची बातमी लागली की त्या घरी अरूणानं केलेले पौष्टिक लाडू पोचवायची कामगिरी विनोद आणि ऋतूवर येत असे. अरूणानं बाळासाठी तयार केलेले पायमोजे, हातमोजे, टोपरं, स्वेटर सारं इतकं गोड असे की बाळाच्या घरच्या मंडळींवा वाटे की या बाईनं त्यांनाही असंच काहीबाही द्यायला हवं. अरूणाच्या हाती सतत सुया आणि दोरे आणि धागे. मुंबईत, महाराष्ट्रात, देशात, परदेशातही अरूणानं विणलेले क्रोशाचे रुमाल दिसतील.

अरूणाला रंगांची एक खास जाण होती. साडी, पँटचं कापड, टेबल क्लॉथ, चादरी. काहीही असो. कोणाच्या घरात कोणत्या रंगाचं आणि प्रकारचं कापड योग्य दिसेल हे त्यांना समजत असे. देशात, परदेशात कुठंही हिंडायला गेल्या की मित्रपरिवारातल्या मंडळींसाठी साड्या, कापडं त्या घेऊन येत.  असंख्य मैत्रिणी, मित्रांच्या पत्न्या. प्रत्येकीसाठी शोभणारी साडी कशी काय त्यांना सापडायची हे कोडं सांगायला आता अरूणा नाहीत.

एक म्हण आहे. माणूस काबीज करायचा तो त्याच्या पोटातून. अरूणा आमिष, सामिष स्वयंपाक करत असत. स्वतः मासे खात नसत पण त्यांच्या हाती सापडलेला मासा सुखानं खादाडांच्या पोटात जायला तयार होई अशी ट्रीटमेंट त्या माशाला मिळत असे. पदार्थांची गंमत आणि रंगत आणतात मसाले. अरूणाना मसाले तयार करण्याचं गणित समजलं होतं. ब्राह्मणी असो की शहाण्णव कुळी, सर्व मसाले अरूणाच्या हातून एकदम साच्यातून निघावेत इतके सारखेपणानं लोकांच्या चवी चोंबाळत असत. त्यामुळं अरूणाच्या घरी जाऊन समजा हादडता आलं नाही तरी अरूणाचा डबा किंवा त्यांनी तयार पाठवलेल्या मसाल्यांच्या पुड्या तर अनेकांना मिळायच्या. दारुबिरू पिणाऱ्यांना लागणारे पदार्थ असोत की दिवाळीचा पवित्र फराळ असो. प्रत्येक बाबतीत अरूणाचा हात फार चविष्ट होता. परदेशातल्या कित्येक लोकांना जेव्हां अरुणा गेल्याची बातमी समजेल तेव्हां त्यांना त्यांच्या फडताळात विसावलेले अरुणानं पाठवलेले मसाले, पदार्थ, आठवतील.

लक्षात येईल की किती माणसं अरूणा पवार यांनी काबीज केली असतील.

जगात माणसं सांभाळणं ही एक महाकठीण गोष्ट असते. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कुटुंब हे स्वभावाच्या कंगोऱ्यांचं एक जंजाळ असतं. अशा अनंत जंजाळांना अरूणानं आपलंसं केलं होतं. मराठी माणसातली सगळी वैशिष्ट्यं आपल्या व्यक्तिमत्वात सांभाळत अरूणानं माणसं सांभाळली. कोण तऱ्हेवाईक आहे, कोण चिडचिड करणारं आहे, कोण स्वार्थी आहे, कोण कसं आणि कोण कसं. अरूणा म्हणे ” माणसं अशीच असणार की नाही, आपण काय कमी असतो?”. अशा कोणाही माणसाच्या घरी आजार निघाला, काही संकट निघालं कीही बाई लगेच निघालीच. मदतीला. सतत कोणा ना कोणाकडं असल्यानं माणसाच्या कंगोऱ्यांचे विषय निघाले की अरूणा ते गंमतीनं, तक्रार नसलेल्या सुरात, विनोदानं सांगे, विषय बदलून आनंदाच्या गोष्टींकडं वळे.

जग आणि माणसं कळणं आणि हुशारीनं आणि आपलेपणानं त्या जगाशी छान जुळवून घेत ते आनंदी करण्याची खटपट करणं.

विनोद पवार हा एक सार्वजनिक माणूस. त्याचं स्वतःचं असं फार कमी असतं. त्याचा पाय एका ठिकाणी ठरत नाही. हे वास्तवही अरूणानं छान पचवून विनोदचं सार्वजनिक जगणं सुकर करून टाकलं होतं. अरूणालाही खरंच स्वतःचं असं काय होतं?

उपचाराच्या पहिल्या फेरीनंतर ही बाई टुण्णकन आपल्या दुखऱ्या पायांवर उभी राहिली. जगभर फिरू लागली. मैत्रिणी, नातेवाईक, विनोद आणि ऋतूचे मित्र. अरूणाचा वावर पूर्ववत सुरु झाला. भेटणाऱ्या माणसांना वाटे की ही बाई कॅन्सरचं नाटक करतेय. इतकी आनंदी.

पण अरूणाला आतून समजलं असावं की आपलं काय होतंय. कधीही इतरांना  जाणीव होऊन दिली नाही. भेटायला येणाऱ्या माणसाला कसं आनंदात ठेवू याच विवंचेत असे. विनोद आणि ऋतुलाही ते कळत असणार. पण तेही अरूणाच्या सहवासात आणि प्रभावानं तयार झालेले. दोघंही जणू काहीच घडलेलं नाही अशा थाटात त्यांचे उद्योग करत होते.

अरूणा पवार ही कोणाची तरी पत्नी होती, कोणाची तरी आई होती, कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी सून होती.  तेवढंच असतं तर अरूणाचं जाणं ही गोष्ट खाजगी, कौटुबिंक राहिली असती. पण अरूणा त्याही पलीकडं होती. नाटक, चित्रपट, कविता, गाणी, कथा-कादंबऱ्या इत्यादी क्षेत्रातल्या माणसांमधे ती वावरत होती, एक आनंदी स्त्री म्हणून. त्या क्षेत्रातल्या असंख्य माणसांशी तिचं एक आनंदाच्या धाग्यानं जोडलेलं नातं होतं.

चला. आता अरूणा पवारच्या आठवणी काढायची सवय लावून घ्यायची.

।।

अमेरिकेत थरारक-साहित्यिक वळणाची पत्रकारी सुरु करणारा टेरी मॅक्डोनेल

अमेरिकेत थरारक-साहित्यिक वळणाची पत्रकारी सुरु करणारा टेरी मॅक्डोनेल

 

टेरी मॅकडोनेल.

टेरी मॅकडोनेल.  प्रसिद्ध  न्यूजवीक आणि टाईम या साप्ताहिकाचं संपादन त्यांनी केलं. १९६९ मधे त्यांनी बातमीदारी आणि  छायाचित्रणाला सुरवात केली. १९७४ मधे ते सॅन फ्रान्सिस्को मॅगझीनचे सहायक संपादक झाले. तिथून सुरू झालेली त्यांची संपादन कारकीर्द २०१२ साली टाईम साप्ताहिकाच्या सल्लागार संपादकीय कामगिरीपर्यंत गाजत राहिली. त्यानंतर ते मुक्त पत्रकार झाले.

भटक्या टेरीचा बहुतेक वेळ प्रवासात जात असे. टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप आठवतोय? मुक्त जीवन जगणारा, अमेरिकाभर पळणारा, धाडसी, गंप. टेरीना पत्रकारीतला फॉरेस्ट गंप म्हणत.

अमेरिकन पत्रकारीत खेळ, मनोरंजन, धाडस, बेधडक, बिनधास्ती हे घटक टेरींनी आणले.  टेरीच्या सांगण्यावरून पत्रकार घटनास्थळी जाऊ लागले, घटना घडत असताना पाहू लागले. घटनांचे हज्जारो शब्दांचे वृत्तांत टेरीनी प्रसिद्ध केले. टेरी स्वतः कादंबरीकार होते. साहित्य आणि पत्रकारी यातल्या सीमारेषा पुसणारा मजकूर टेरीनी संपादित करून प्रसिद्ध केला.  एस्क्वायर, आऊटसाईड, रोलिंग स्टोन, स्पोर्टस इलस्ट्रेटेड, स्मार्ट या  त्यांनी संपादित केलेल्या पत्रिका.

टेरी मॅकडोनेल संपादक कसे झाले ?

त्या काळातलं वर्तमानपत्राचं ऑफिस

एस्क्वायर या गाजलेल्या पत्रिकेचा संपादक टेरीना  म्हणाला- चल, कॅलिफोर्नियात एका ठिकाणी पार्टी आहे. ‘ सर्फर ‘ या पत्रिकेच्या संपादकानं आयोजित केलीय.  बरेच लेखक आणि बातमीदार येणार आहेत. टेरीच्या कारममधून दोघे निघाले. टेरी कार चालवत होते आणि बॉब बियर पीत होते. बॉबनं संपादन केलेले टॉम वुल्फ, ट्रुमन कॅपोटे, नॉर्मन मेलर अशा लेखकांकडून बॉबनं लेखन कसं मिळवलं ते टेरी विचारत होते. बॉबना वाटलं की टेरी हा बातमीदार किंवा लेखका होण्यापेक्षा संपादक होण्याच्याच लायकीचा आहे. बॉबनी टेरीना आपल्या पत्रिकेत सहायक संपादकपद दिलं.

संपादन म्हणजे काय ते बॉबनी सांगितलं. ” खोक्यातून उडी मारून बाहेर येणारं माकडाचा  विचार कर. ते संपादकाला साधायचं असतं.”

खोक्यातल्या माकडाचं प्रकरण काय आहे?

अमेरिकेत त्या काळात पॉप कॉर्नसारखा खाऊ मुलांना खोक्यातून मिळत असे.  या खोक्यात मुलांना एक सरप्राईज असे. एकाद्या प्राण्याची छोटी प्रतिकृती किंवा चित्रं किंवा एकादं कोडं. मुलांना पॉप कॉर्नपेक्षा या प्रतिकृतीची उत्सुकता असे. खोका उघडल्यावर काय बाहेर येईल ते सांगता येत नसे.  मुलं दुकानात गेली की टाचा उंचावून खोके शोधत आणि तिथल्या तिथं उघडत. त्यातून एकादं माकड बाहेर आलं की मुलं आनंदानं किंचाळत.

बॉबनं टेरीला सांगितलं की वाचक त्या मुलांसारखे असतात. त्यांना काही तरी सरप्राईज हवं असतं. काय हवं आहे ते त्यांना माहित नसतं. संपादकानं ते हुडकून त्याला द्यायचं. जे मिळेल ते नवं असायला हवं, ते वाचकांना आवडेल असं हवं.

उपभोग

तो काळ १९६० नंतरचा होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेली मुलं या काळात वयात आली होती. युद्धानंतर अमेरिकेत समृद्धी आली होती. या सममृद्धीनं अमेरिकन माणसापुढं प्रचंड ऐहिक सुखं आणून ठेवली होती. दारू होती, सेक्स होता, मादकं होती, गन होती, वेगवान कार होत्या. माणसं बेभान झाली होती.  बेभानी धुंदपार्ट्या, शिकारी, किमती कपडे आणि वस्तू, प्रसिद्धी इत्यादीमधून समृद्धी दिसत  होती. नट, दिद्गर्शक, संगितकार, गायक, पुढारी, लेखक प्रचंड प्रसिद्ध होत होते. प्रसिद्धी, दारू आणि महत्वाकांक्षा आणि निराशा या मिश्रणातून त्यांच्या आत्महत्याही होत होत्या. बहुतांश तरूणांना निव्वळ सुख हवं होतं.

याच वातावरणात एक वेगळा तरूणांचा वर्ग उदयाला आला. ते मानत की   निसर्ग हेच अंतिम सत्य. निसर्गावर आक्रमण करणारी आधुनिकता आणि औद्योगिकता याचा ते तरूण करत होते.  सरकार किंवा स्टेट नावाचं बंधन माणसावर असता कामा नये असं त्या विचाराचे लेखक म्हणत होते. या वैचारिक उधाणाला तात्विक-तत्वाज्ञान्मक बाजू आहे असंही काही लोक म्हणत होते. ऐहिक आनंद आणि अद्यात्मिक विचार अशा दोन बाजूनी माणसं विचार करत होती, वागत होती. सेक्स, पार्ट्या, धुंदी. दुसरीकडं गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हरेराम मंत्रजप आणि बुद्धविचार.

टेरी हा भटक्या, सतत भ्रमंती करणारा संपादक लोकांना वाचावंसं वाटेल ते देणारे लेखक, पत्रकार शोधत हिंडत असे. कधी विमानात, कधी एकाद्या गोल्फ कोर्सवर, कधी एकाद्या  लग्नाच्या पार्टीत, कधी एकाद्या बक्षीस समारंभात, कधी एकाद्या अंत्ययात्रेत त्याला लेखक भेटत. कोणीतरी टेरीना  विचारलं की बातम्यांचे विषय त्यांना कुठं आणि कसे सुचतात. टेरी म्हणतात की पत्रकाराला स्टोऱ्या कुठंही, केव्हांही सुचतात. तीच तर गंमत असते. चोविस तास पत्रकाराचं डोकं चालू असतं. सिनेमा पहाताना, टीव्ही पहात असताना, रस्त्यावर फिरत असताना, पुस्तक वाचत असताना, दुसरी पत्रिका वाचत असतांना, लोक काय बोलतायत ते ऐकत असताना, पार्टीत किंवा बारमधलं त्यांचं संभाषण ऐकताना, टॅक्सीची वाट पहात असताना. केव्हाही, कुठंही काहीही सुचतं, लेखक सुचतो, कोण काय लिहिल ते सुचतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. बऱ्याच वेळा लेखक सॅनफ्रान्सिस्को, शिकागो, न्यू यॉर्कमधल्या मदिरालयात भेटत असत. मदिरालयातली झिंग, तिथलं सिगरेट-मादकांच्या धुरानं भरलेलं वातावरण, तिथला गजबजाट, तिथले टेबलावर मुठी आणि ग्लासं आपटण्याचे आवाज. लेखक पत्रकार त्या वातावरणात रमत, विकसित होत. टेरीला आणि इतर समकालीन संपादकांना लेखक तिथं भेटत.

एड एबी

एडवर्ड (एड) पॉल एबी हा लेखक. त्याची मंकी रँच गँग ही कादंबरी तुफान गाजत होती. निसर्गवादी माणूस. त्याच्या कादंबरीचा नायक असे काऊबॉय.  अमेरिकाभर घोड्यावरून हुंदडणारे काऊबॉईज. अमर्याद निसर्ग, घोड्यांना अमर्याद स्वातंत्र्य. दुसऱ्या महायुद्धानंतर उद्योग वाढू लागले होते, शहरं वाढू लागली होती. एडचा या निसर्गावरच्या आक्रमणावर राग होता. एडच्या कादंबरीतले काऊबॉय हीरो शहरांसाठी-उद्योगासाठी जमीन घेणाऱ्यांविरोधात बंड करीत. एडचे काऊबॉईज धरणं फोडून टाका असं म्हणत.

अमेरिकेत अनेक राज्यं आणि गावं गजबजाटापासून दूर असतात. तिथं निव्वळ जंगलं असतात, निर्मनुष्य वाळवंट असतात, डोंगरं असतात आणि मनसोक्त हुंदडणाऱ्या नद्या असतात. अशाच एरिझोनामधे ओरॅकल या अनाम गावात एड रहात असे. त्याच्याजवळ फोन नव्हता. टेरीनं एडला एक पोष्ट कार्ड टाकलं. एकमेकांची केवळ नावं ऐकलेले दोघे भेटले.

एड खूप प्रसिद्ध असल्यानं त्याला भाषणाची आणि जेवणाची आमंत्रणं येत असत. त्यातलं एक आमंत्रण एका विश्वशाळेतलं होतं. तिथं जायचं तर टेरीच्या गावावरून जावं लागायचं. एड टेरीच्या घरी पोचला. म्हणाला, चला जाऊया, जेवायला.

टेरी म्हणाले- अरे बाबा, आमंत्रण तुला आहे, मला नाही. मी कसा येऊ आगंतुकासारखा.

एड म्हणाले- त्यात काय मोठंसं. आपलं जग आहे अनौपचारिक. आपण औपचारिकतेला फाट्यावर मारलय. चल.

एड टेरीकडं पोचला तेव्हा टेरीची  सहायक संपादक केरन तिथं होती. ती म्हणाली – मलाही यायचंय एडबरोबर. एडशी गप्पा होतील, दोस्ती होईल.

एड म्हणाला-चला, दोघंही चला.

तिघं जण टेरीच्या कारनं निघाले. दारू पीत, धमाल करत.

एका मोठ्या घरात पोचले. यजमान स्त्री त्या शहरातली, राज्यातली, विश्वशाळेतली एक प्रतिष्ठित स्त्री होती. अमेरिकेत एक सोशलाईट नावाची जमात असते. सोशलाईट माणसांचा समाजाच्या वरच्या थरात वावर असतो. गववगवांकित पुढारी, नट, लेखक, उद्योगपती इत्यादी लोकांमधे ही माणसं वावरतात आणि अरे तुरेच्या भाषेत सर्वांशी बोलतात. अगदी अमेरिकेचा प्रेसिडेंट असो की बिल गेट्स असो, सोशलाईट माणसं त्यांना आपले लंगोटी यार किंवा ब्रेसियर यार असल्यासारखं संबोधतात.

एडबरोबर दोन अनोळखी आणि काहीजे झांगड लोक पाहिल्यावर सोशलाईट बाईंचा चेहरा पडला.  पण एड बरोबर असल्यानं त्यांचा नाईलाज होता.

एका अंडाकार आकाराच्या टेबलाभोवती गावातले प्रतिष्ठित जेवायला बसले. त्यात लेखक, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत वगैरे लोक होते. छतावर एक विशाल झुंबर वातावरणाचं प्रतिष्ठित रूप सिद्ध करत होतं. टेरी आणि केरनला टेबलाभोवती न बसवता, टेबलापासून काही अंतरावर घाईघाईनं गोळा केलेल्या दोन खुर्च्यांवर बसवलं होतं.

सोशलाईट बाईनं एडची ओळख करून दिली- एड हा एक तत्वज्ञ आहे.

एडनं धुडकावलं- हॅट. मी तत्वज्ञ वगैरे नाही. मी निव्वळ मनासारखं जगतोय येवढंच.

एक जण एडला म्हणाला – तुम्ही बुद्धीझम ट्राय कां करून पहात नाही.

बुद्धीझम ट्राय करणं? तत्वज्ञान असं ट्राय बिय करता येतं?

एडनं त्या माणसाला विचारलं- काय हो, तुमच्या अमूक एका बुद्धीष्ट केंद्रात खूप फ्री सेक्स असतो, खूप मादक सेवन होतं. खरं आहे का हो?

प्रश्न विचारणारा आणि टेबलावरची सर्व सभ्य माणसं गरगरली.

एका उपस्थितानं विचारलं- एड, तुम्ही तुमच्या लिखाणात कोणता विचार मांडता.

एड म्हणाला- हॅड. कसला विचार आणि कसलं काय. माझ्या लिखाणात काय आहे ते टेरीलाच विचारा..

जमलेले लोक टेरीकडं पाहू लागले.

टेरी म्हणाला- एड हा काही तत्वज्ञ वगैरे अजिबात नाही. तो एक फार डेंजरस माणूस आहे.

जमलेले लोक खट्टू झाले. समाजातली प्रतिष्ठित  मंडळी एका प्रसिद्ध कादंबरीकाराला भेटायला आली होती आणि हा माणूस तर म्हणतोय की एड  डेंजरस आहे.

सोशलाईट लेडी वैतागली. तिनं टेरीला सांगितलं की त्यानं माफी मागावी.

टेरी म्हणाला- एड हा डेंजरस माणूस आहेच मुळी. त्यासाठी माफी कसली मागायची.

लेडी जामच वैतागली. म्हणाली- मला वाटतं की टेरी या आगंतुकानं इथं थांबू नये, निघून जावं.

टेरी उठला. पाठोपाठ केरन उठली. जाऊ लागले.

एड उठला- मीही जातो. तुम्हा लोकांची एक शानदार पार्टी आम्ही खराब केली या बद्दल मी क्षमा मागतो, जातो.

तिथं निघून गेले. पार्टीला जाताना आणि पार्टीतून परतताना तिघांना खूप गप्पा करता आल्या. टेरीसाठी काय लिहिता येईल याचा विचार झाला. केरन आणि एड यांची दोस्ती झाली. एडला त्याच्या मजकुरात कोणी ढवळाढवळ केलेली चालत नसे. पण केरनला मात्र त्यानं आपल्या लेखनाचं संपादन करायची परवानगी दिली.

नो कमेंट

नकाशावर न दिसणाऱ्या  एका टस्कन या गावात एड मेला. एडनं आपल्या निष्प्राण शरीराचं काय करायचं ते लिहून ठेवलं होतं.  एडचे मित्र वैराण वाळवंटी टस्कनमधे पोचले. एड प्रवासात स्लीपिंग बॅगमधे झोपत असे.  त्या जीर्ण स्लीपिंग बॅगमधे मित्रानी एडचं शरीर कोंबलं.  एका टेंपोमधे खाली सुका बर्फ पसरून त्यावर स्लीपिंग बॅग ठेवली.  वाटेत एडच्या इच्छेनुसार भरपूर व्हिस्की आणि बियरच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. एडला अज्ञात ठिकाणी पुरण्यात आलं. त्या वेळी भाषणं झाली नाहीत. एडच्या सांगण्यानुसार लोक खूप प्याले, नाचले, खूप धिंगाणा घातला, आनंद साजरा केला.

एडच्या कबरीवरच्या दगडावर हातानं मजकूर लिहिला होता एडवर्ड पॉल एबी. १९२७-१९८९. नो कॉमेंट.

टेरीना हंटर थॉम्सन या लेखकाकडून  लिहून घ्यायचं होतं.  हंटर म्हणाला की अमूक गोल्फ कोर्सवर ये. हटर गोल्फ खेळत असे, त्या बरोबरच प्रचंड दारू पीत असे आणि एसिड नावाचं एक मादक घेत असे. टेरीनी मादक काही घेतलं नाही पण दारू मात्र खूप प्याले.  दोघे आणि दुसरा एक संपादक जॉर्ज प्लिंप्टन  मिळून रात्रभर खूप प्याले, गप्पा केल्या. दुसऱ्या दिवशी मोठ्ठी मुलाखत झाली. ती मुलाखत प्रसिद्ध झाली. दीर्घ मुलाखती हा पत्रकारी प्रकार टेरीनी सुरु केला, रुळवला.  नंतर हंटर स्वतंत्रपणे टेरीसाठी लिहू लागला.

हंटरनं राजकारण कव्हर केलं. पण पुढाऱ्यांची भाषणं, त्यांचे फोटोसाठी फाकवलेले जबडे यात हंटरला रस नव्हता. पुढाऱ्यांच्या वागण्यातल्या विसंगती आणि दुष्टपणा तो अचूक हेरत असे.   निक्सन यांना ७२ सालच्या निवडणुकीसाठी नामांकन मिळालं तेव्हा  त्यांच्यासमोर अमेरिकन माजी सैनिकांनी निदर्शन केली होती. त्या प्रसंगाचं वृत्तांकन हंटरनं केलं. सैनिकानी आपल्याला मिळालेली शौर्य पदकं  भिरकावून दिली होती. वियेतनाम युद्धात पाय गमावलेला एक सैनिक चाकाच्या खुर्चीवर बसून निदर्शनात सामिल झाला होता. कोविक त्याचं नाव. त्याच्या जवळ माईक नव्हता. शिरा ताणून ताणून तो निक्सनचे वाभाडे काढत होता. हंटरनं त्याचं भाषण छापलं. हेच भाषण जर कोविकला निक्सन यांच्या मंचावरून देशासमोर करता आलं असतं तर तिथंच निक्सन यांची उमेदवारी संपली असती असं हंटरनं लिहिलं.

निक्सनचा पैसे जमवण्याचा एक कार्यक्रम होता.  प्रत्येकी १ हजार डॉलर भरून जेवायला यायचं, जमलेले पैसे निक्सन यांचा निवडणुक निधी. निक्सन वियेतनाम युद्धासाठी बदनाम होते. लोकांचा त्यांच्यावर राग होता. जेवण कार्यक्रमाच्या बाहेर माजी सैनिक आणि विद्यार्थी निदर्शनं करत होते. पोलिसांची फौज उभी होती. निक्सन यांनी आपल्या समर्थकांना बसमधून त्या ठिकाणी आणलं, भाडोत्री शाळकरी मुलं गोळा केली.  निक्सन टोळी आणि निदर्शक यांच्यात बाचाबाची, ढकलाढकली होत असे. पोलिस मधे पडत, काठ्या चालवत. निक्सनला शेलक्या शिव्या देत. अमेरिकेतली जनता हे सारं पहायला तयार नव्हती. टीव्ही चॅनेल हा प्रकार दाखवत नव्हती. हंटरनं या प्रसंगाचं सविस्तर वर्णन लिहिलं.

हंटर थॉम्सन

हंटर थॉम्सन यांची गोंझो (Gonzo) पत्रकारी टेरीनी आकाराला आणली. गोंझो हे हंटरच्या एका कादंबरीतलं पात्रं होतं.  गोंझो पत्रकारी म्हणजे थेट विषयाला हात घालणं, नमनाला घडाभर तेल नाही, जे काही सांगायचं ते इकडं तिकडं न करता धाडकन सांगायचं. साठी आणि सत्तरीच्या दशकांत अश्लील चित्रपटांनी एक नवी जात  निर्माण केली. या अश्लील चित्रपटात अश्लीलता चित्रपटाच्या अगदी पहिल्या दृश्यापासून सुरु होत असे. चित्रपटाला गोष्ट वगैरे नसे, नुसता सेक्स.

गोंझो शैलीतला थेटपणा  हंटर थाम्सननं राजकीय पत्रकारीत आणला. राजकारणातला भ्रष्टाचार इत्यादी थेट मांडायचं, विश्लेषण, समर्थन वगैरे घोळ नाही.

हंटर लोकप्रिय झाला. भरमसाठ पैसे मिळू लागले. एकादा वृत्तांत लिहिण्यासाठी तो सहा सात हजार डॉलर अडव्हान्स घेत असे.  तो इतका प्रसिद्ध झाला की कुठंही गेला तरी अमेरिकाभर त्याला लोक ओळखत, त्याच्या भोवती गोळा होत.  तटस्थपणे वृत्तांकन करणं त्याला अशक्य झालं. हताशा निर्माण झाली. हंटरनं आत्महत्या केली.

” एकदा एस्क्वायरमधे असताना माणसाच्या जीवनातल्या विविध टप्प्यांवर स्टोरी करावी अशी कल्पना सुचली. २१, ३५, ५०, ६० अशा कुठल्या तरी टप्प्यावर. मला वाटलं अमेरिकन माणूस १० वर्षाचा असताना अशी स्टोरी कां करू नये. सुझन ऑर्लिन ग्रेट पत्रकार होती. तिनं न्यू जर्सीतल्या एका १० वर्षाच्या मुलावर लिहिलं. त्या काळात व्हिडियो गेम्सचं पेव फुटलं होतं. बँग बँग, आवाज आवाज. मुलांना एफबीआय एजंट व्हावंसं वाटत होतं. हाणामारी करणाऱ्या कॅरेक्टर्स त्यांचे हीरो होते. ते सारं सुझननं लिहिलं. स्टोरी गाजली. स्टोरी त्या वर्षीची बेष्ट स्टोरी झाली. ”

टॉम वुल्फ हा टेरींचा एक लेखक.

टॉम वुल्फनं  नव्या पत्रकारीची व्याख्या केली. वुल्फनं साहित्य आणि पत्रकारी, दोन्हींवर झोड उठवली. टॉम वुल्फ म्हणत असे की अमेरिकन साहित्य मेलं आहे, साहित्यानं वास्तवापासून फारकत घेतली आहे. साहित्य कसं असावं तर एमिल झोला आणि चार्ल्स डिकन्सच्या साहित्यासारखं असं वुल्फ म्हणत असे. साहित्याच्या मानानं पत्रकारी अधिक प्रासंगिक-प्रस्तुत आहे असं त्याचं म्हणणं होतं.

टॉम वुल्फनं लिहिलं. १. पत्रकारानं दुरवरून घटनांचं वर्णन करू नये, घटनेच्या जागी हजर राहून वाचकाला प्रत्यक्ष घटना दाखवावी.२. घटनास्थळातलं लोकांचं बोलणं संवादाच्या स्वरूपात लिहावं. ३. घटनेच्या ठिकाणची माणसं कादंबरीतल्या पात्रांसारखी रंगवावीत, त्या माणसांच्या मनात काय असेल  इत्यादी गोष्टी लिहाव्यात.४ घटना आणि माणसांच्या आसपासचा परिसर, वातावरणही मांडावं.

टेरी त्यांच्या पूर्वसूरीकडून शिकले होते की संपादकाला वाचकांची नस सापडायला हवी, वाचकांना काय हवंय, काय आवडतं ते संपादकाला कळायला हवं. टेरी म्हणत की वाचकांना वाचकांना अचंबा हवा असतो. वाचकांना आपल्याला काय हवंय  ते त्यांना माहित नसतं. संपादकानं ते हेरून त्यांची गरज भागवायची. काळ बदलत जातो. वाचकांची समज बदलत जाते. वाचकांच्या गरजा बदलत जातात. त्या गरजा खुद्द वाचकांनाही माहित नसतात. त्या संपादकांना ओळखाव्या लागतात. वाचकांना काय हवंय आणि ते देणारा लेखक-पत्रकार कोण आहे ते संपादकाला कळावं लागतं. वाचकाला लेखकाकडं आणि मजकुराकडं न्यावं लागतं. एक आश्चर्य हाती लागल्याचा आनंद वाचकाला व्हायला हवा.

टेरी इतर विचारवंत संपादकांकडून शिकले.  टेरीच्या लेखी चांगल्या पत्रकारीच्या दोन महत्वाच्या कसोट्या होत्या.

संपादक चांगला शिक्षक असतो. शिक्षकाचे गुण स्वतंत्रपणे दिसत नाहीत, ते त्याच्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामधे दिसतात.

शब्द क्षणभंगुर असतात. ते लेखकाच्या मनातून उचलून वाचकाच्या मनात पोचवणं हे सर्वात कठीण काम. तेच तर संपादकाला करायचं असतं.

।।

शिव्या हव्या

शिव्या हव्या

शिव्यांना, अपशब्दांना भाषेत महत्वाचं स्थान आहे. शिव्या किंवा अपशब्द माणसाच्या तीव्र भावनांचं विरेचन करतात. अपशब्द माणसाच्या तोंडून हिरावून घेतले तर भावनांची जागा शस्त्रं घेतात. तेव्हां माणसाच्या निरोगी जगण्यासाठी शिव्या आवश्यक आहेत. असं अभ्यासू संशोधक म्हणतात. बेंजामिन बर्गेन आणि मायकेल एडम्स या लेखकांची नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तकं वरील निष्कर्ष सांगतात.

इकिरो सुझुकी जपानमधे बेस बॉल खेळत असे. त्यानं आपल्या  खेळाचा विकास करण्यासाठी जपान सोडलं आणि अमेरिकेत दाखल झाला. तिथं मैदानात खेळाडूंचा शिव्यांचा सढळ वापर ऐकून सुरवातीला तो अवाक झाला होता. नंतर तो अपशब्दाना सरावला. खेळात थराराच्या सीमेवर पोचल्यावर त्याच्या तोंडूनही अपशब्द निघू लागले. मनासारखा खेळ झाला की अपशब्द, जमलं नाही की अपशब्द, आनंद झाला की अपशब्द, दुःख झालं की अपशब्द, राग आला की अपशब्द. लवकरच सुझुकी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू झाला.

सुझुकी सांगतो की जपानी भाषेमधे अपशब्द जवळ जवळ नाहीतच. एकाद्या व्यक्तीनं काम योग्य रीतीनं केलं नाही तर त्याचा बॉस त्याला सांगतो ‘ माणसा, तुझं काम तू योग्य रीतीनं करायला हवं होतंस. तसं केलं असतंस तर उत्पादन वाढलं असतं, फायदा झाला असता.’  हे सारं अमेरिकेत एका शिवीत, दोन अपशब्दांत अधिक प्रभावी पद्धतीनं मांडता येतं, समोरचा जे समजायचं ते समजून घेतो.

शिव्या बहुतांशी लिंग, योनी यांच्याभोवती असतात. संभोग हा शिव्यांचा गाभा असतो. आईशी संभोग, प्राण्याशी संभोग, जगातल्या कुठल्याही आपल्याला न आवडणाऱ्या वस्तूशी संभोग, बहिणीशी संभोग या गोष्टी शिव्यांतले शब्द सांगतात. लेखक म्हणतात की शिवी देत असताना त्या शब्दांचे शब्दकोषातले अर्थ माणसाच्या मनात नसतात. राग व्यक्त करण्यासाठी त्यानं ती शब्द योजना केलेली असते. बोलणाऱ्या माणसाच्या भावना महत्वाच्या असतात, शब्द नव्हे.

शिव्यांचा उच्चार, वापरलेली आवाजाची पट्टी, हावभाव इत्यादी गोष्टींवरून माणसाच्या भावनांची तीव्रता लक्षात येते. अगदी हळुवारपणे, पाठीवर हात ठेवत कोणी शिव्या देत नाही. अंगाई गीत किंवा भैरवी गायल्याप्रमाणं कोणी शिवी उच्चारत नाही. शिव्या देताना हातांचे हावभाव सुद्धा उत्तेजक असतात. हाताची घडी घालून किवा नमस्कार करून कोणी शिव्या देत नाही.

माणसाच्या दैनंदिन जीवनात असे अनंत प्रसंग येतात जेव्हां माणसाला तीव्रतेनं व्यक्त व्हायचं असतं. आपली लायकी असतानाही दुसऱ्या माणसाला वशिल्यामुळं बक्षीस वा नोकरी मिळाली की माणसाला भयंकर राग येतो. तासन तास एटीएमच्या रांगेत उभ राहूनही पैसे मिळत नाहीत तेव्हां संतापाचा कळस होतो. रोग्याला तात्काळ उपचाराची गरज असताना हॉस्पिटलमधले लोक त्याच्याकडं दुर्लक्ष करतात किंवा कागदं भरायला लावतात तेव्हां कळस होतो. आपल्याला परिक्षेत अव्वल यश मिळतं तेव्हां आनंदाचा धक्का बसतो. आनंदाचा धक्का बसतो तेव्हां कदाचित माणसाची आईची किंवा देवाची आठवण काढत असतील पण त्रास होतो तेव्हां खचितच सणसणीत शिवी तोंडून बाहेर पडते. ती शिवी माणसाचा रक्तदाब स्थिरावायला मदत करते.

अनेक वेळा अनुभव असा येतो की शिवराळ माणसं मोकळी ढाकळी असतात, स्वच्छ असतात, कारण त्याना लपवाछपवी आवडत नाही.  अगदी शांतपणे आणि सभ्यपणे बोलणारी माणसं लबाड असतात, आतल्या गाठीची असतात, स्वच्छ व्यवहार करत नाहीत असाही अनुभव अनेक वेळा येतो. शिव्यांचा सढळ वापर किवा वापर न करणं हा बऱ्याच वेळा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो.

Fuck या शब्दाची, शिवीची, सविस्तर चर्चा लेखकांनी त्यांच्या पुस्तकांत केली आहे. Fuck या शब्दाचे फ्रेंच,जर्मन,लॅटिन भाषेतले उगम लेखकांनी दाखवले आहेत. १२७८ साली एका कोर्टदरबारी नोंदीमधे एका माणसाचा John le Fucker असा उल्लेख आढळतो. ख्रिस्ती धर्मामधे सेक्स ही गोष्ट पाप मानली गेली असल्यानं Fuck या शब्दाचा वापर अशिष्ट मानला जात असे. सार्वजनिक ठिकाणी, साहित्यात तो शब्द वापरणं समाजाला मान्य नव्हतं. व्यवहारात अर्थातच Fuck हा शब्द नाम, क्रियापद इत्यादी पद्धतीनं सर्रास वापरला जात असे पण त्याची दखल घेतली जात नसे. १७७५ सालच्या इंग्रजी शब्द कोषात त्या शब्दाची संभोग या शब्दाचं ते गावंढळ, नीच रूप आहे अशी नोंद केली गेली. १७९० नंतर इंग्रजी साहित्यात हा शब्द उमटू लागला. एका कवीनं एका बापाचं मन व्यक्त करतांना हा शब्द वापरला. मुलगा पुस्तकी किडा झाल्यानं बाप चिडला होता. बाप म्हणला Fuck your reading. कवितेनं खळबळ माजवली होती. १९६५ मधे Fuck हा शब्द इंग्रजी शब्दकोषात (जॉन एशलीच्या ) अवतरला.

अमेरिका आणि ब्रीटनमधल्या इंग्रजी भाषेवर, संस्कृतीवर व्हिक्टोरियन, प्राचीन संस्कृतीचा, प्रभाव असल्यानं वर्तमानपत्रं, भाषणं, माध्यमं या मधे Fuck या शब्दाला वाव नव्हता.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजी समाजाचं रूप बदललं. युद्ध हा या समाजाचा एक महत्वाचा आणि मोठ्ठा भाग झाला. लाखो सैनिक निर्माण झाले. सैनिक जिवाच्या आकांतानं लढत असतात. ते जेव्हां गोळीबार करतात, शत्रूसैनिकांना संगिनीनं भोसकण्यासाठी सरसावतात त्यावेळी शिव्यांचा पाऊस पडत असतो. सैनिकी जीवनात, क्षणाक्षणाला शिव्यांचा वापर होत असतो. युद्ध, सैनिक इत्यादी विषय साहित्य, सिनेमा, पत्रकारी यात यायला लागले आणि त्यामुळं Fuck , Shit, Holy Shit इत्यादी शब्द अटळ होते. दैनिकं, साप्ताहिकं, कादंबऱ्या यातून वरील शब्द यायला लागले. प्रथम संपादकांनी विरोध केला. पण शिव्यांचा वापर केला नाही तर सैनिक, पोलिस, गुन्हेगार, जाझ संगितकार, मुष्टियोद्धे, फूटबॉल खेळाडू इत्यांचं चित्रण अशक्यच होतं. मार्लन ब्रँडोचा अपोकलिप्स नाऊ हा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि माध्यमानी आजपर्यंत नकार दिलेले शब्द वापरायला सुरवात केली. Saigon Shit असं या सिनेमाचं वर्णन करावं लागलं कारण एकूण वियेतनाममधील अमेरिकेची कारवाई शिट या सदरातच मोडणारी होती.

साप्ताहिक न्यू यॉर्कर हा व्हिक्टोरियन संस्कृतीचा एक मजबूत खांब होता. रॉस आणि शॉन हे दोन्ही संपादक फक, शिट इत्यादी शब्द न्यू यॉर्कर साप्ताहिकात फिरकू देत नसत. शब्द सौम्य करून वापरण्यावर त्यांचा कटाक्ष होता. एका पत्रकारानं स्वप्न या विषयावर वैज्ञानिक लेख लिहिला होता. मांजरांना नीट झोप लागली नाही की ती संभोग करतात असा वैज्ञानिक निष्कर्ष होता. पत्रकारानं शब्द वापरला होता की मांजरं mount करतात. शॉन माऊंट या शब्दाला आक्षेप घेत होते. त्यांनी सुचवलं की नर मांजर मादी मांजराला सेक्सचा कल सुचवतं अशा अर्थाचे शब्द वापरा. पत्रकार हसला. तो म्हणाला की मांजरं कधी अशा भाषा वापरत नाहीत. वाद झाला.   शेवटी शॉन यांना पत्रकाराचं म्हणणं पटलं. समाजामधे जे प्रस्थापित आहे ते बदलण्याला, त्यात पाणी-तुळशीपत्र घालून ते शुद्ध करण्याला अर्थ नाही हे त्यांनी मान्य केलं, माऊंट हा शब्द त्यानी मान्य केला. फक, शिट, इत्यादी शब्द न्यू यॉर्करमधे जिथं आवश्यक वाटलं तिथं यायला लागले. एका पत्रकारानं तर विक्रमच केला, त्याच्या लेखात फक हा शब्द सतरा वेळा आला होता आणि न्यू यॉर्करनं तो छापला.

आता राष्ट्रपती, खासदार, मुत्सद्दी इत्यादी लोक सढळपणे फक हा शब्द वापरतात. त्या शब्दाला असलेला संभोग किंवा शारीरीक संबंध हा अर्थ जवळजवळ नाहिसा झालाय. खड्ड्यात गेली तुमची पार्टी, खड्ड्यात गेला तुमचा प्रस्ताव, खड्ड्यात जाओत तुमचे विचार असं आपण म्हणतो, अमेरिकेत त्यातल्या खड्डा या गोष्टीला सर्रास फक असा शब्द वापरतात.

२०१४ साली पोपनी धमाल केली. पोप फ्रान्सिस व्हॅटिकनमधे भाषण करतांना in this case ( in questo caso ) असं म्हणायचं असतांना चुकून in questo cazzo असं म्हणाले. cazzo या शब्दाचा अर्थ फक असा होता. case च्या ऐवजी cazzo अशी चूक अनवधानानं घडली. पोपच्या नंतर ते लक्षात आलं, त्यांनी चूक कबूल करून माफीही मागितली. पण ऐकणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली आणि काही मंडळी जाम हसली.

अलिकडं भाजपचे दानवे वैतागून लोकांना साले असं म्हणाले. ते शेतकऱ्यांना साले म्हणाले की विरोधकांना ते स्पष्ट नाही. परंतू साले हा शब्द वापरण्यावरून ओरड झाली. साले याचा खरा अर्थ मेव्हणा असा आहे. मेव्हणे छळतात अशा अर्थानं त्रास देणाऱ्या माणसाला साला असं म्हणतात. हा शब्द सर्रास वापरला जातो. साले असं म्हणतांना विरोधकांनी जेरीस आणल्यानं वैतागलेल्या दानवेंनी साले हा शब्द वापरला. त्यांच्या मते त्यांचा पक्ष शेतकऱ्यांसाठी भरपूर काही करत असला तरीही शेतकरी आंदोलन थांबवत नव्हते या दानवेंचा वैताग होता.  त्या आधी एकदा राष्ट्रवादीचे अजित  पवार बोलतांना  ‘ मग मी मुतू काय ‘  असं म्हणाले होते. यात खरोखर मुतण्याचा प्रश्न नव्हता,  त्यांना आलेला वैताग त्यातून व्यक्त होत होता.

शिव्या, अपशब्दाचा वापर हा  एक मनोवैज्ञानिक उपचार आहे असं विचारवंतांचं मत आहे.

।।

 

What the F: What Swearing Reveals About Our Language, Our Brains, and Ourselves

by Benjamin K. Bergen.  Basic Books.

In Praise of Profanity by Michael Adams. Oxford University Press.