Browsed by
Month: October 2017

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट या नावाची   व्हॅन गॉग या चित्रकारावरची एक फिल्म २०१७ च्या मामी उत्सवातलं एक मोठं आकर्षण ठरली.  व्हॅन गॉगनं त्याच्या  भावाला, थियोला, लिहिलेलं पत्रं घेऊन एक माणूस व्हॅन गॉगच्या गावात पोचतो. पत्रं पोचवत असतानाच तो व्हॅन गॉगच्या मृत्यू म्हणजे आत्महत्या होती की खून होता याचा शोध घेतो. या शोधावर ही ९० मिनिटांची फिल्म  Dorota Kobiela  या दिद्गर्शिकेनं तयार केलीय.

फिल्म रोटोस्कोपिंग एनिमेशन हे तंत्र वापरून केलीय.

रोटोस्कोपिंग या तंत्रात आधी फिल्म नेहमीच्या पद्धतीनं चित्रीत केली जाते. स्टुडियोत सेट लावून चित्रीकरण केलं जातं. नेहमीच्या फिल्ममधे सेटवर खूप बारीकसारीक तपशील चितारलेले असतात. रोटोस्कोपिंगसाठी वापरलेला सेट प्रतीकात्मक, सूचक अशा प्रकारचा असतो. पात्रांच्या हालचाली आणि कमीत कमी तपशीलाचं नेपथ्य येवढ्याच गोष्टी आवश्यक असतात.

फिल्म चित्रीत झाल्यानंतर प्रत्येक फ्रेमवर संस्कार केले जातात. पात्रांच्या हालचाली एका सेकंदाला किती फ्रेम वापरल्या जातात त्यानुसार ठरतात, व्यवहारात जशा दिसतात तशा हालचाली एनिमेशन फिल्ममधे दिसत नाही. फ्रेमवर केलेल्या संस्काराचे अनेक प्रकार असतात. संस्कार करणाऱ्या चित्रकाराच्या शैलीनुसार चित्र बदलतं. व्यंगचित्रकाराच्या रेखाटनाच्या, रेघांच्या शैलीनुसार जशी व्यंगचित्रातली पात्रं दिसतात तसंच एनिमेशन फिल्ममधल्या फ्रेममधली पात्रांच्या बाबतीत घडतं. लक्ष्मण, मारियो मिरांडा, उन्नी, शंकर, सरवटे या प्रत्येक चित्रकाराची पात्रं, माणसं, स्वतःची स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन कागदावर उतरतात. तसंच एनिमेशन फिल्मबाबत घडत असतं. संस्कार करणाऱ्याची दृष्टी आणि शैली महत्वाची.

लविंग विन्सेंटमधे प्रत्येक फ्रेम म्हणजे व्हॅन गॉगचं एकेक पेंटिंग असतं. एक दृश्य असतं व्हॅन गॉग शेतात बसून पेंटिंग करत असतो आणि चार टारगट मुलं त्याच्यावर दगडफेक करतात. व्हॅन गॉगचं पेंटिंग करतोय असं दृश्य सेटवर चित्रीत करण्यात आलं. चार मुलांकडून दगड मारत असल्याची एक्शन सेटवर स्वतंत्रपणे चित्रीत चित्रीत करण्यात आली. नंतर या दोन्ही दृश्यांमधली प्रत्येक फ्रेम  व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर चिकटवण्यात आली. फिल्म दिसते त्यावेळी वरील घटना व्हॅन गॉगच्या पेंटिंगच्या पार्श्वभूमीवर दिसते.

पूर्ण चित्रपट अशा रीतीनं तयार करण्यात आलाय.

चित्रपटाचं चित्रीकरण १४ दिवसांत सेटवर आटोपण्यात आलं. नंतर हे चित्रण पोलंडमधील डॅन्स्क या शहरामधे काम करणाऱ्या १२५  चित्रकारांकडं सोपवलं गेलं.त्यांनी ८५० कॅनव्हासेसवर व्हॅन गॉगच्या पेंटिंगच्या कॉपीज तयार केल्या आणि एकूण  ६५ हजार फ्रेममधे पार्श्वभूमी म्हणून चिकटवल्या. कधी व्हॅन गॉगचं पेंटिंग जसंच्या तसं वापरलं तर कधी त्यात थोडेसे बदल केले.

बाप रे. किती ती पेंटिंग्ज. इतकी सारी पेंटिंग्ज करायला ३ हजार लीटर रंग वापरावा लागला. एक अडचण होती. व्हॅन गॉगनं टर्पेंटाईन वापरून चित्रं केली होती. टर्पेंटाईन वापरलेला  रंग पटकन वाळत नाही. तैलचित्रात रंगाचा एक हात वाळल्यानंतर दुसरा द्यायचा असतो. त्यामुळं चित्रं तयार व्हायला खूप वेळ लागत असे. इतका वेळ चित्रपट निर्मात्यासमोर नव्हता. त्यांनी टर्पेंटाईन तेलाऐजी लवंगीचं तेल वापरलं. स्टुडियोत लवंगी तेलाचा घमघमाट असे. दात दुखू लागले की या तेलाचा बोळा दाताखाली धरा असं डॉक्टर सांगतात, त्यामुळं वेदना कमी होतात. चित्रपट करणारे लोकं बराच काळ वेदनारहित जगले असावेत.

सबंध चित्रपट प्रेक्षक व्हॅन गॉगची पेंटिंग पहात असतो. हा प्रयोग प्रेक्षकांना आवडला. युरोपात निवडक ठिकाणी ही फिल्म दाखवण्यात आली तेव्हां प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी फिल्मची खूपच वाखाणणी केली.

१९९० मधे अकिरा कुरोसावा या जपानी दिद्गर्शकानं  व्हॅन गॉगची पेंटिंग्ज या विषयावर  ड्रीम्स या नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती.  एक चित्रकार व्हॅन गॉगच्या चित्रांचं प्रदर्शन पाहून त्याला  भेटायला जातो हे कुरोसावाच्या शॉर्ट फिल्मचं कथानक आहे. चित्रकार फिरतांना थेट व्हॅन गॉगच्या चित्रातच शिरतो.त्याचा  सगळा प्रवास व्हॅन गॉगच्या चित्रांतून होतो. चित्रात शेत असतं, कुरोसावाचा माणूस त्या चित्रातल्या पायवाटेनं जातो. व्हॅन गॉगची बरीच मूळ चित्रं या चित्रपटात वापरली आहेत. व्हॅन गॉगची चित्रं ड्रीम्समधे जशी दिसतात तशी लविंग विन्सेंटमधे दिसत नाहीत.

२०१६ मधे टॉवर नावाची एक फीचर फिल्म कम डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. १९६६ मधे अमेरिकेत एक माणूस युनिवर्सिटीच्या टॉवरमधे मोक्याच्या जागी जाऊन खाली वावरणाऱ्या लोकांवर गोळीबार करतो. खूप माणसं मरतात. एक धाडसी माणूस शेवटी त्या खुन्याला मारतो. ही गाजलेली सत्य घटना टॉवरमधे चितारलेली आहे. त्यामधे रोटोस्कोपिंगचं तंत्रं अंशतः वापरलेलं आहे. काही प्रसंगात रोटोस्कोपिंग एनिमेशननं कार्टूनच्या धर्तीवरची चित्र वापरली आहेत.काही दृश्यं त्या काळातल्या नॉर्मल फिल्मची क्लिप्स अशा रूपात वापरली आहेत. काही चित्रं प्रत्यक्ष माणसांचं चित्रीकरण करून मुलाखतीच्या रुपात  दाखवली आहेत.

२०१६ मधे मामीमधे लिटल प्रिन्स नावाची ११६ मिनिटांची एनिमेशन फिल्म प्रदर्शित झाली होती. तीही गाजली होती.

चित्रपट निर्मितीत कंप्यूटर आणि चित्रीकरणाची, संपादनाची विविध नवी तंत्रं आल्यानंतर एनिमेशन हा चित्रपट प्रकार निर्माण झाला, चित्रपट पहाण्याची एक नवी दृष्टी विकसित झाली. एके काळी माणसं फक्त नाटकं पहात. नंतर चित्रपट पहाण्याची सवय झाली. नवी तंत्र आल्यावर कळसुत्री बाहुल्या, चिकणमातीच्या प्रतिमा वापरून चित्रपट तयार झाले. एनिमेशन हे आणखी नवं तंत्र. डिस्ने कंपनीनं केलेल्या एनिमेशन फिल्म आता लोकप्रिय झाल्या आहेत. जंगल बुक, अवतार ही काही खूप पाहिल्या गेलेल्या एनिमेशन फिल्मची उदाहरणं.

रोटोस्कोपी किंवा एकूणातच एनिमेशन हे नेहमीच्या चित्रपट तंत्रापेक्षा एक वेगळं तंत्रं आहे. नटनट्या घेऊन चित्रपट तयार करणं आणि एनिमेशन तंत्रानं चित्रपट तयार करणं या दोन्ही प्रकारात मेहनत सारखीच आहे.

अलीकडं रोटोस्कोपिंग न करताही केवळ एनिमेशन करून चित्रपट तयार करण्याकडं कल वाढत आहे. पात्रांना घेऊन चित्रीकरण करणं ही गोष्टच एनिमेशनमधून वगळली जाते. सर्व पात्रं कागदावर चितारली जातात. किंवा विविध सॉफ्टवेअर वापरून ती थ्रीडी किंवा टूडी पद्धतीनं चित्रीत केली जातात. सॉफ्टवेअर आता इतकी विकसित होत आहेत की माणूस जसा दिसतो जवळपास तसाच माणूस आता सॉफ्टवेअर तयार करतात. त्यामुळं नट, नट्या, एक्स्ट्रॉ अशी माणसं हाताळणं, स्टुडियो किंवा बाहेर चित्रीकरण करणं ही जिकिरीची आणि फार खर्चाची प्रक्रिया पूर्णपणे टळते.माणसं,त्यांच्या लहरी, त्यांची वेळापत्रकं इत्यादी गोष्टीच नाहिशा होतात. आभासी जगातली आभासी माणसं हाताळणं सोपं असतं. आभासी माणसं आणि पात्रं दिद्गर्शक आणि चित्रकार म्हणतो ते निमूट मान्य करत असतात. हे तंत्र जेव्हां पूर्ण विकसित होईल तेव्हां चित्रपट सृष्टी बदललेली असेल, आजचे फीचर चित्रपट इतिहासजमा झाले असतील.

लविंग विन्सेंट खूप कमी पैशात तयार झाला. तेही पैसे भरून निघाले नाहीत. बहुतांश प्रेक्षक असे प्रयोग पहायला तयार नसतात. अशा फिल्म कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रदर्शित करायला वितरक तयार नसतात. त्यामुळं एका फेस्टिवलकडून दुसऱ्या फेस्टीवलकडं अशी या चित्रपटांची वाटचाल होत असते.

रसिक, अभ्यासकांना मात्र हे चित्रपट म्हणजे मेजवानी असते.

।।

 

 

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

देवासारखा माणूस तयार होईल काय?

युवाल हरारी यांचं होमो डियस (Homo Deus) हे पुस्तक सध्या गाजतय. होमो डियस म्हणजे जवळ जवळ देव झालेला माणूस. देव म्हणजे पूर्ण व्यक्ती, पुर्ण निर्दोष व्यक्ती. एकेकाळी माकड असलेला माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जवळजवळ देव बनवला जातोय या विषयाभोवती हे पुस्तक फिरतं.

लेखक पृथ्वीचा  ४ अब्ज वर्षांचा जीवनप्रवास धुंडाळतो. आजचा माणूस घडण्याचा पहिला टप्पा ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाला. त्यावेळी  माणसाला बोधनाची, ज्ञान आणि समज घडवण्याची सोय मेंदूत झाली. ११ हजार वर्षांपूर्वी माणसानं शेती   सुरू केली शेती सुरु केली, जंगलं, मोठी जनावरं, उपयोगी नसलेली जनावरं-प्राणी मारायला सुरवात केली. पृथ्वी केवळ आपल्यासाठीच आहे असं मानव तिथून मानू लागला. त्याच्या या समजुतीवर जगभरातले आदिधर्म आणि नंतर ज्यू-ख्रिस्ती इत्यादी धर्म तयार झाले. हिंदू धर्म अपवाद होता, त्यानं प्राण्यांना मानवी जीवनाचा भाग मानलं. नंतर ५०० वर्षापूर्वी वैज्ञानिक क्रांती झाली, २५० वर्षांपुर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि ताजी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती ५० वर्षांपूर्वी झाली.

या प्रवासात पृथ्वीवर केवळ मानवच उरेल या दिशेनं माणूस वागला. त्यानं भूक, दुष्काळ, युद्ध यांच्यावर मात केली. मृत्यू हा माणूस आणि देवातला मुख्य फरक. माणूस आता आयुष्य लांबवत लांबवत पाचशे हजार वर्षांवर घेऊन जात आहे, माणसाला अमर करण्याच्या  खटपटीत लागला आहे. अमरच नव्हे तर शरीर, मेंदू या सगळ्या बाबत निर्दोष आणि परिपूर्ण माणूस तयार करण्याची खटपट माणूस करतोय.

दुष्काळ, उपासमार, रोग आणि युद्ध या गोष्टी माणसानं संपवल्या.पण आता युद्दात जेवढी माणसं मरत नाहीत तितकी रस्त्यावरच्या अपघातात मरतात, अती खाण्यानं आणि निकस खाण्यानं मरतात.मानसीक ताणामुळं आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय, जगातल्या मृत्यूत तो सगळ्यात मोठा आकडा आहे असं लेखक दाखवतो.

भावना हे माणसाचं वैशिष्ट्यं. पण भावना  म्हणजे  रासायनिक इलेक्ट्रिकल प्रेरणा आहेत याचा शोध माणसानं लावला आहे. या शोधाचा उपयोग करून रासायनिक आणि इलेक्ट्रिकल प्रेरणांची पद्धतशीर मांडणी करून एक नवा मेंदू माणूस तयार करतो, सेंद्रीय नव्हे, निरींद्रीय मेंदू. अलगोरिदम, म्हणजे पद्धतशीर निर्णय पायऱ्या चालण्याची क्षमता निरींद्रीय मेंदूत माणूस गुंफतोय.

लेखक निरींद्रीय मेंदू आणि माणसाचा मेंदू यातला फरक सांगतो. सध्या बाजारात एक नवी कार येऊ घातलीय. ती माणसाविना चालेल. रस्त्यावरून प्रवास करत असताना येणाऱ्या सर्व शक्यता आणि अडचणींचा विचार करणारा कंप्यूटर या कारमधे असेल. अपघात होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही आणि कारमधली माणसंही सुरक्षित रहातील अशा रीतीनं ही कार चालेल. रस्त्यात माणसं आली, खड्डा आला, मधेच एकादी कार किंवा जनावर आलं, पाऊस पडला, बर्फ पडला इत्यादी सर्व शक्यतांचा विचार या कारमधे झालेला असेल. लेखक विचारतो की ही कार म्हणजे माणूस असेल काय? कारमधला कंप्यूटर म्हणजे माणसाचा मेदू असेल काय? कारला भावना असतील काय?

निरींद्रीय आणि सेद्रीय मेंदूतला फरक असा की निरींद्रीय मेंदू नियम, अलगोरिदम पाळून चालतो. माणूस तसं करत नाही. एकादी गोष्ट घातक आहे असं सांगितली तरी तो ती करतो.   तर्क आणि उपदेश दोन्ही धाब्यावर बसवून चक्रम निर्णय घेणं, चुका करणं  हे माणसाचं वैशिष्ट्यं आहे.

                                        हरारी

पुस्तकाचा शेवटला आणि सर्वात मोठा धडा डेटा रिलिजन,  माहितीचा धर्म करणं या विषयावर आहे. जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे माहितीचा एक तुकडा, इन्फर्मेशन बिट असतो असं जगानं ठरवलं आहे. या माहितीचा वापर करून  देवमाणूस तयार करण्याचा खटाटोप होतोय. माहितीवर नियंत्रण ठेवून काही मोजके देवपुरुष तयार होतील त्यांच्या द्वारे कॉर्पोरेशन्स समाजावर ताबा मिळवतील. समाजाचे दोन भाग होतील. एका भागात तुमच्या आमच्यासारखी बावळट आणि बिनकामाची कामगार मंडळी असतील, जी भावना वगैरेत गुंतलेली सामान्य, कमी जगणारी, दीर्घायुष्य नसलेली, प्रोग्राम्ड मेंदू नसलेली माणसं असतील. ती बहुसंख्य असतील. दुसऱ्या भागात असतील प्रोग्राम्ड मेंदूची कारखान्यात तयार केलेली माणसं आणि त्यांचा ताबा ज्यांच्याकडं आहेत अशी माणसं. एक नवी विषमता जन्माला येईल असं लेखक सुचवतो.

लेखकानं मानववंश इतिहास, तंत्रज्ञान, विज्ञान, बाजार, उद्योग, धर्म, संस्कृती इत्यादी क्षेत्रांचा एक विस्तृत पण धावता आढावा घेऊन वर्तमान आणि भविष्याचं चित्रं पुस्तकात चितारलं आहे. असंच चित्र काही वर्षांपूर्वी रे कर्झवेल या माणसानंही काढलं होतं.यंत्रं आणि मानव यांचं एकीकरण होईल, माणूस चारशे ते एक हजार वर्षं जगेल असं कर्झवेल यांनी लिहिलं होतं. जेरेड डायमंड यांनी माणसाच्या वाटचालीचा मागोवा बंदूक, पोलाद आणि रोगजंतू या कसोक्यांवर घेणारं एक पुस्तक लिहिलं होतं. कर्झवेल किंवा हरारी ही माणसं एकाद्या क्षेत्रातली निष्णात आहेत आणि बाकीच्या क्षेत्रातली माहिती गोळा करून एक सम्यक चित्र उभारतात.

हे पुस्तक लेखकाच्या मते  तत्वचिंतनात्मक पुस्तक आहे. सुखाच्या शोधात, समाजाचं नियंत्रण करण्याच्या खटपटीत धर्म आणि अद्यात्म या दोन शाखा निर्माण झाल्या. लेखक म्हणतो की या दोनही शाखांचा उपयोग करून माणसानं संस्था, चौकटी निर्माण केल्या. बुद्धानं अद्यात्म सांगितलं, बुद्धाच्या अनुयायांनी त्याचा धर्म केला, यमनियम सांगितले. लेखक एका ठिकाणी झेनचं अवतरण देतो. झेन म्हणाला की वाटेत जर बुद्ध भेटला तर त्याला ठार करा. झेनला म्हणायचं असतं की रस्त्यात भेटणारा बुद्ध म्हणजे एक संस्थाच असेल.अद्यात्म हा व्यक्तीगत मुक्तीचा मार्ग असतो, ती सामुहीक संस्था वगैरे नाही असं झेन म्हणत होता. लेखक म्हणतो की धर्माची चौकट घालून वाट लावायची माणसाची सवय आजही जिवंत आहे, माणसानं  माहिती-माहिती तंत्रज्ञानाचा धर्म केलाय.

।।

हरारी यांनी डियसच्या आधी  सेपियन्स हे पुस्तक लिहिलं.

सेपियनमधे हरारी माणसाची तुलना वानराशी करतात.  ते म्हणतात आपण सुधारलेले किंवा बदललेले वानर आहोत.  सिंह आणि शार्कना जगण्यासाठी अधिकाधीक क्रूर व्हावं लागलं तसं वानरही म्हणजे आजचे वानर सभोवतालचं जग नष्ट करत चालले आहेत. बनाना रिपब्लिकमधे हुकूमशहा आपल्याला नको असलेली माणसं मारून टाकतो, त्या खटाटोपात बहुसंख्य समाजाला गरीब ठेवतो, समाजातली केळी आणि खनिजांसारखी संपत्ती निर्यात करून राज्य चालवत असतो. वानर आणि माणूस आज तेच करतोय असं हरारी सेपियन्स या पुस्तकात म्हणतात.

हरारी सेपियनबद्दल म्हणतात की ते पुस्तक म्हणजे माणसाचा इतिहास नाहीये, ते पुस्तक म्हणजे तत्वचिंतन आहे, फिलॉसफी आहे. माणसाच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्या पुस्तकात केला आहे.

” मानवतेचं भविष्य काही चिमूटभर लोकांच्या हातात असणं ही गोष्ट मला चिंतेची वाटते. .. स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. माणसाला स्वातंत्र्य दिलंत  की तो समाजात अधिकाधीक विषमता निर्माण करत जातो.”

सेपियन्स हे पुस्तक खूप गाजलं होतं याचं एक कारण ते पुस्तक बराक ओबामानी वाचून त्याची प्रशंसा केली होती. झकरबर्गनही त्या पुस्तकाचं वर्णन आजचं सर्वश्रेष्ठ पुस्तक असं केलं होतं. त्यामुळं हरारी हे एकदम प्रकाशात आले. सोशल मिडियात त्यांना ३.८ कोटी अनुयायी मिळाले आणि आज जगभरच्या विश्वशाळात आणि शहरात ते भाषणं करत फिरतात. त्यांच्या या कीर्तीमुळंच डियस या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती, डियसच्या लक्षावधी प्रती खपल्या. सीएनेन, बीबीसीवर त्यांच्या पुस्तकाची चर्चा झाली, यु ट्यूबनं त्यांची भाषणं प्रसृत केली,ती भाषणंही लाखो लोकांनी पाहिली.

स्टीवन हॉकिंग यांचं ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम या पुस्तकानं प्रसिद्धीच्या वेळी नॉन फिक्शन पुस्तकाच्या खपाचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आजही ते पुस्तक जोरात खपत असतं. गंमत म्हणजे हरारी यांच्या पुस्तकाचं नावही सेपियन्स ए ब्रीफ हिस्टरी ऑफ मॅनकाईंड असं आहे. हॉकिंगच्या पुस्तकाचा रेकॉर्ड ते किंवा नंतरचं पुस्तक मोडतंय का ते पहायचं.

एकूण मानवी इतिहासाचा धावता आढावा लेखकानं दोन्ही पुस्तकांत घेतला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, लोकशाही, आधुनिकता इत्यादी गोष्टी माणसानं विकसित केल्या असल्या तरी एकूणात माणूस निसर्गाचा नाश करण्याकडं, स्वनाशाकडं चालला आहे असं लेखक सुचवतो. पण हेही मान्य करतो की तसंच घडेल असं नाही.

अलिकडं पर्यावरणाचा विचार करणारे अनेक विचारवंत म्हणतात की जग आता विनाशाकडंच चाललं आहे, फक्त नेमका दिवस तेवढा माहित नाहीये. मागं वळताच येणार नाही अशा दिशेनं माणसानं वाटचाल केली आहे असं या विचारवंतांचं म्हणणं आहे. समजा माणसानं प्रजा वाढवणं बंद केलं, कार्बन हवेत सोडणं बंद केलं, घातक वायू उत्सर्जन बंद केलं, जैविक विविधता पुन्हा जागेवर आणण्याचा प्रयत्न केला तरीही आजवर केलेल्या चुकांमुळं जगरहाटीला जे वळण मिळालं आहे ते थांबणार नाही, फार तर परवाचं मरण तेरवावर टाकता येईल असं या काहीशा निराशावादी माणसांचं म्हणणं आहे.

हरारी निराशावादी नाहीत. परंतू कोंडी कशा रीतीनं फुटू शकेल याचा विचार हरारी मांडत नाहीत.

माणसाच्या मेंदूचा विकास झाला आणि माणूस प्रती जग निर्माण करू लागला. माणूस स्वतःचा देव होण्याच्या मागे लागला. विनाशाकडं जाण्याची शक्ती ज्या मेंदूनं माणसाला दिली तोच मेंदू अधिक समंजस, शहाणा होणारच नाही असं कां म्हणावं ? विनाश समोर दिसत असताना, विनाशाची कारणं दिसत असताना माणूस विनाश रोखण्याचा प्रयत्न करणारच नाही असं कां म्हणावं? १९४५ नंतर माणसानं अणुशस्त्रं वापरलेलं नाही. कदाचित असलेली अणुशस्त्रं नष्ट करणं, अणूचा वापर टाळणं याकडंही माणूस वळेल. सूर्य,वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा वेग यांचा वापर करून शुद्ध ऊर्जा माणूस वापरू शकेल.

युवाल हरारीनी मध्ययुगीन लष्करइतिहास या विषयावर पीएचडी केलीय. तोच विषय ते येरुसलेम विश्वशाळेत शिकवतात.

हरारे गे आहेत. हरारे शाकाहारी आहेत, प्राणी मारणं त्यांना मान्य नाही. हरारेनी पीएचडी करत असताना दोन महिने विपस्यना केली.

।।

Homo Deus. A Brief History of Tomorrow

Yuval Noah Harari

Vintage.

 

 

 

 

 

 

अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?

अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?

अँगेला मर्केल वैज्ञानिक आहेत. अनुभव घेणं, त्या अनुभवातून शक्यता लक्षात घेणं आणि त्या शक्यतांचा वापर करून पुढील निर्णय घेणं ही वैज्ञानिक कार्यपद्धती मर्केल यांच्या अंगी मुरली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात.  अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात. सभोवतालची परिस्थिती जशी असेल म्हणजे जसा अनुभव आला असेल त्यानुसार मर्केल धोरणं ठरवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा भाग त्यांना सत्तेचा खेळ करताना उपकारक ठरतो.

अँगेला मर्केल चवथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलर झाल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विभागीय निवडणुकांमधे त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाला (सीडीयु) बरीच कमी मतं पडली होती. त्यामुळं निवडणुक लढवायची की नाही अशा गोंधळात मर्केल होत्या. त्यांची शंका खरी होती कारण संसदेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची पंधरा ते वीस टक्के मतं कमी झाली आणि त्यांच्या सत्ताधारी संयुक्त मोर्चाचं बहुमतही गेलं.  हिटलरचा पाडाव झाल्यानंतर जर्मन संसदेत पहिल्यांदाच आल्टर्नेटिव फॉर जर्मनी या नाझीवादी पक्षानं १३ टक्के मतं आणि ८८ जागा मिळवून संसदेत प्रवेश केला.

युरोपीय समुदाय टिकवणं आणि सीरिया इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या स्थलांतरितांना भरपूर प्रमाणावर स्वीकारणं या दोन मुद्द्यांवर लोकमत अंगेला यांच्या विरोधात गेलं आहे. स्थलांतरितांवर जर्मनांचा राग दिसतो. पूर्व जर्मनीतल्या जर्मनांना त्यांचा विकास होत नाही आणि बाहेरुन आलेले मात्र सुखी होताहेत असं वाटतंय. बऱ्याच जर्मनांना युरोपीयन युनियनच्या नादी लागू नये आपला जर्मनी हाच देश बलवान करावा असं  वाटतंय.

लोकमताचा हा कल लक्षात घेऊन मर्केल यांनी स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण आणायची तयारी दाखवली आहे. सत्ता मिळाली खरी पण ती टिकवण्याचा प्रयत्न मर्केल यांनी सुरू केला आहे, विरोधकांना समजून घ्यायची तयारी त्यांनी दाखवलीय.

तीन कारकीर्दींमधे जर्मनीची अर्थव्यवस्था विकसित करणं आणि युरोपियन समुदाय संघटित करणं हे मर्केल यांच्या कारकीर्दीचं मुख्य सूत्र होतं. जर्मनीनं स्वतःचा खिसा मोकळा केला, त्याच बरोबर ग्रीस, इटाली इत्यादी देशांना आर्थिक शिस्त लावायचा प्रयत्न केला. हे धोरण कितपत यशस्वी झालं याबद्दल जर्मनी आणि युरोपमधे मतभेद आहेत. परंतू जर्मन अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत राहिली, बेरोजगारी खूप कमी झाली, इन्फ्लेशन खूप आटोक्यात राहिलं हे त्यांच्या कारकीर्दीचं यश आहे.

या निमित्तानं मर्केल यांचं  व्यकिमत्व समजायला मदत होते.

अँगेला मर्केल प्रेस कॉन्फरन्समधे उभ्या होत्या. बुटक्या. फिकट बेज रंगाचं  अनाकर्षक जॅकेट.  एक पांढरं हेलमेट घातलंय असं वाटणारे डोक्यावरचे केस. संथपणे, एकाच लयीत, आवाजाचे कोणतेही चढउतार न करता, एकाच सुरात मर्केल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या.  एकाच पट्टीत, एकाच सुरात बोलत होत्या, कंटाळवाणं. सामान्यपणे त्यांचं म्हणणं पाच दहा मिनिटं ऐकलं की प्रेक्षकांना झोप येते. पण पत्रकारांना झोप येऊन चालणार नसतं, त्यांना काही तरी निश्चित असं हवं असतं. हेच जर मर्केल संसदेत बोलत असत्या तर संसदेतली अर्धी बाकं रिकामी झाली असती.

‘ तुमची खूप मतं विरोधकांनी खाल्लीत, तुम्ही अल्पसंख्य आहात मग सरकार कसं स्थापन करणार’

‘ तुमचा सहकारी सोशल डेमॉक्रॅट पक्ष तुम्हाला सोडून गेलाय, आता तुम्ही कोणाला बरोबर घेणार?’

‘ ज्यांच्याशी तुमचं भांडण आहे असे ग्रीन्स आणि फ्री डेमॉक्रॅट्स यांच्याशी तुम्ही जुळवून घेणार काय?’

‘ सत्ता  मिळवण्यासाठी तुम्ही इतर विरोधी पक्षातली माणसं फोडणार काय?’

असे प्रश्न राजकारणी माणसाला विचलित करतात, त्यांचं विचलित होणं त्यांच्या चेहऱ्यावरच्या आठ्या आणि त्रासावरून दिसतं.  राजकारणी चिडतात, उलट उत्तरं करतात, उत्तर द्यायला नकार देतात.

मर्केल एकदम शांत. कुठंही ठाम कमीटमेंट न देणारी निर्विकार  उत्तरं येतात. निर्विकार चेहरा.

दोनेक तास कॉन्फरन्स चालते. पत्रकारांना किंवा टीव्हीवर ही कॉन्फरन्स पहाणाऱ्यांना भविष्यात काय होणारे याचा काहीही पत्ता लागत नाही.

एका प्रश्नाला उत्तर देतांना मर्केल म्हणाल्या की २०१७ ची संसदेची निवडणूक लढवायची की नाही याबद्दल त्या साशंक होत्या. कारण आधी झालेल्या स्थानिक संसदांच्या निवडणुकीत त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅट पक्षानं मार खाल्ला होता. पर्यायी जर्मनी या टोकगामी परतिरस्कारी ग्लोबलायझेशनला विरोध करणाऱ्या पक्षाला भरपूर मतं मिळाली होती. स्थलांतरीतांच्या संकटामुळं लोकक्षोभ वाढला होता आणि मर्केल यांची लोकप्रियता घसरत चालली होती.

मर्केल यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर जर्मनीतले अभ्यासक तज्ञ प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण करत होते. पर्यायी जर्मनीवादी (नाझीवादीही) हा उजव्या टोकाचा आणि सोशल डेमॉक्रॅट हा डाव्या टोकाचा पक्ष वाढले होते. मर्केल यांचा मध्यमार्गी ख्रिश्चन डेमॉक्रॅट हा पक्ष लोकांच्या नजरेतून उतरला होता. जर्मनीमधे लोकशाहीच धोक्यात आली होती, पुन्हा एकदा समाजवाद किंवा नाझीवाद जर्मनीत फोफावण्याची शक्यता निर्माण झाली होती.

परंतू मर्केल यांना या बदललेल्या वातावरणापेक्षा सत्ता टिकवून धरण्याची चिंता असावी. मर्केल नेहमी दाट धुक्यात कार चालवत असतात. समोर फक्त पाच फुटापर्यंतचंच दिसत असतं. त्या पलिकडं काय आहे याचा विचार करून कार चालवणं मूर्खपणाचं असतं. पहिले पाच फूट, नंतरचे पाच फूट, नंतरचे पाच फूट अशा रीतीनं त्यांची कार पुढं सरकरते. धुकं संपेपर्यंत.

मर्केल यांनी थेरटिकल केमेस्ट्रीत डॉक्टरेट केली आहे. प्रयोगाला सुरवात करताना रसायनं, मॉलिक्यूल्स वैज्ञानिकाला माहीत नसतात. प्रयोग करून  वैज्ञानिक निष्कर्ष काढतो. निष्कर्ष निघाल्यानंतरही भावनांत न गुंतता वैज्ञानिक सिद्ध झालेल्या गोष्टी अमलात आणण्याच्या मागं लागतो.  घटकांचं रासायनिक वागणं वैज्ञानिक कसोट्यांवर निरखायचं, त्यात विकार येऊ द्यायचे नाहीत, नंतर ज्या शक्यता दिसतात त्यावरून निर्णय घ्यायचा. नंतर तो निर्णय शेडी तुटो वा पारंबी मोडो या निर्धारानं अमलात आणायचा.  ही वैज्ञानिक शिस्त मर्केल यांच्या राजकारणातही दिसते. राजकारणात पडायचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांनी राजकारण, प्रशासन, अर्थकारण याचा अभ्यास केला आणि त्यातून निघालेले निष्कर्ष त्या अमलात आणत राहिल्या.

१९७७ साली मर्केल यांच्याशी अँगेला यांचं लग्न झालं. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की या माणसाशी आपलं जमणं शक्य नाही. १९८१ मधे त्या घटस्फोट देऊन मोकळ्या झाल्या.

१९९० साली त्या ख्रिश्चन डेमॉक्रॅट या पक्षात त्या दाखल झाल्या आणि लगोलग त्या संसदेतही दाखल झाल्या. निवडून आल्यावर त्यांनी आनंदोत्सव इवेंट वगैरे केला नाही, वाच्यता केली नाही. आपला आनंद किंवा दुःख सार्वजनिक करायची सवय त्याना नाही. गप्प रहाणं, शांतता, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक महत्वाचं अंग आहे, म्हटलं तर ते हत्यारही आहे.

मर्केल त्यांचं अनाकर्षक असणं, अनाकर्षक बोलणं, शांत रहाणं  तत्कालीन पक्षाध्यक्ष आणि चॅन्सेलर हेलमुट कोल यांना आवडलं, उपयोगी पडलं. पुढाऱ्यांना अशी गप्प बसणारी माणसं आवडतात कारण ती आपले प्रतिस्पर्धी नाहीत असं त्यांना वाटतं. कोल मर्केलना ‘ मुलगी ‘ म्हणत, काहीसं उपहासानं, काहीसं त्या निरुपद्रवी आहेत असं दाखवत.

कोलनी मर्केलना एक अगदीच फालतू खात्याचं मंत्री केले. त्या खात्याच्या सचीवालाही वाटायचं की मर्केल एक फालतू बाई असून आपल्यामुळंच ती मंत्रीपद सांभाळू शकते. मर्केलनी पद घेतलं आणि काही तासातच त्या सचीवाला हाकलून दिलं. आपल्याला पाहिजे ती, आपल्या विश्वासातली माणसं निवडली.

कोलना वाटत होतं की आपण मर्केलसारख्या मुलीला नेमून आपला एक निरुपद्रवी अनुयायी तयार केलाय. पण वेळ आल्यावर मर्केल यांनी मुसंडी मारली. एका वर्तमानपत्रात लेख लिहून जगाला सांगितलं की कोल हे संदर्भहीन झाले आहेत, आम्हीच पक्ष पुढे नेणार आहोत. या लेखानं खळबळ उडाली, कोल यांना पक्षानं नेतृत्वातून रिटायर केलं. मर्केल पक्षाच्या अध्यक्ष झाल्या, चॅन्सेलरपदाच्या सत्ताशिडीवरच्या शेवटल्या पायरीवर त्या पोचल्या.

पदावरून दूर झाल्यावर एका समारंभात असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या पत्रकारानं कोलना मर्केलबद्दलचं मत विचारलं. कोल म्हणाले ” मीच मर्केलला निवडलं. मी माझा खुनी निवडला. मीच माझ्या अस्तनीत साप ठेवला.”

२००५ साली संसदेची निवडणुक झाली. तेव्हां  सोशलिस्ट श्रोडर जर्मनीचे चॅन्सेलर होते.  एका ‘ मुलीनं ‘ कोल यांना दूर केलं म्हणजे त्यांचा पक्षच बावळट होता असं श्रोडर यांना वाटत असे. आपण स्मार्ट आहोत, आपल्याला दूर सारून ‘ मुलगी ‘ चॅन्सेलर होऊच शकत नाही असं ते म्हणत असत. ते मर्केलचे उल्लेख नेहमीच उपहासानं करत असत. एका पत्रकार परिषदेत मर्केलनी हुशारीनं   श्रोडरना सांगून टाकलं की ‘ त्यांचा पक्ष आता मागं पडलेला असल्यानं जर्मन जनता आता त्यांना सहन करणार नाहीये.’ श्रोडर यांचा पक्ष आणि मर्केल यांचा पक्ष सत्तेत जरी सहकारी असले तरी आपसात त्यांच्यात चढाओढ होतीच. त्याचा फायदा मर्केलनी घेतला. श्रोडर यांना हाकलण्यासाठी मर्केल यांच्या पक्षानं ‘ निरुपद्रवी मुलीला ‘ पाठिंबा दिला.

मर्केल यांची खेळी यशस्वी ठरली.पक्षातल्या इतरांना दूर सारून मर्केल चॅन्सेलर झाल्या. श्रोडर या कसलेल्या राजकारणी माणसाला सत्तेनं अव्हेरलं.  जर्मनीतली पहिली महिला चॅन्सेलर. पूर्व जर्मनीतून आलेली. दोन लग्न झालेली. सावत्र मुलं असलेली. जर्मनीतल्या कंझर्वेटिव समाजात हे मुद्दे माणसाला सत्तेपासून दूर ठेवतात.

अमेरिकेचे जर्मनीतले राजदूत जॉन कोर्नब्लुम यांनी मर्केल यांना जवळून पाहिलं होतं. कॉर्नब्लुम म्हणतात ” तुम्ही त्यांना आडवे गेल्यात तर मेलात. राजकारणात किती तरी दांडगे पुरुष त्यांना आडवे गेले आणि राजकारणातून फेकले गेले. ”

२००४ साली मर्केल यांच्या साठाव्या वाढदिवशी कंझर्वेटिव पुढारी मायकेल ग्लॉसनी पेपरात लिहिलं ” मर्केल एक जातीवंत शिकारी आहे. शिकार नेमकी केव्हां गाठायची ते तिला चांगलं कळतं. जेव्हां कोंबडा कोंबडीचा पाठलाग करत असतो तेव्हां तो बेसावध असतो हे मर्केलला माहित आहे. नेमक्या त्या क्षणांची वाट पाहून ती शिकार करते.”

चॅन्सेलरपदाच्या तीन कार्यकाळात मर्केल यांनी अनेक भूमिका बदलल्या. एकदा समलिंगी संबंधांना विरोध केला आणि नंतर पाठिंबा दिला. अणूऊर्जेला पाठिंबा दिला, विरोध केला. स्थलांतरीत हे जर्मन संस्कृतीला धोकादायक आहेत असं म्हटलं आणि नंतर त्यांनाच स्वीकारणारे कायदे केले. वेळ पाहून त्या निर्णय घेतात. अंतिम ध्येय सत्तेत टिकणं हेच असतं. त्यासाठी लागणारी चिकाटी त्यांच्यात आहे.

शेवटी राजकारण हा सत्तेचा खेळ तर आहे. त्या खेळात त्या वाकबगार आहेत.

।।

 

 

 

लास वेगाससारखी हत्याकांडं अमेरिकेतच कां घडतात?

लास वेगाससारखी हत्याकांडं अमेरिकेतच कां घडतात?

लास वेगासमधे स्टीवन पॅडॉकनं ५९ माणसांना ठार मारलं. ३२ व्या मजल्यावरच्या हॉटेल खोलीत, जिथून त्यानं गोळीबार केला, २३ बंदुका आणि हज्जारो गोळ्या होत्या. लास वेगासपासून चाळीस मैलावरच्या त्याच्या गावातल्या घरात पोलीस घुसले तेव्हां तिथं १९ बंदुका सापडल्या. ६४ वर्षीय पॅडॉकनं त्या गावातच असलेल्या गिटार आणि बंदुका या नावाच्या दुकानातून आणि काही अंतरावरच्या दुसऱ्या गावातून हस्तगत केल्या होत्या.

पॅडॉक  गोरा होता, मुसलमान नव्हता, त्यानं जिहाद केला नव्हता. पॅडॉकवर कोणताही गुन्हा पूर्वी नोंदला गेलेला नव्हता.

गोळीबाराची बातमी पसरल्या पसरल्या सोशल मिडियात दणादण मेसेजेस फिरले की पॅडॉक डेमॉक्रॅट होता, ट्रंपविरोधी होता, त्यानं ट्रंपना बदनाम करण्यासाठी हा उद्योग केला होता. पोलिसांनी तपास सुरु करून काही निष्कर्ष जाहीर करण्याच्या आतच मिडियात बातमी पसरली की एकापेक्षा अधिक जिहादी मारेकरी होते. फेसबुकची यांत्रिक पद्धत अशी की ज्या शब्दाला जास्तीत जास्त हिट्स मिळतात त्या शब्दाला प्राधान्य मिळतं. जिहादी, ट्रंप विरोधी शब्द आलेले मेसेजेस फेसबुक आणि गुगलनं रीतसर पसरवले.

ट्रंपांचे ट्विट्स लास वेगास प्रकरणात अगदीच थंड होते. मेलेल्यांना सहानभूती असे कोमट शब्द त्यात होते. कारण पॅडॉक ना मुसलमान होता, ना तथाकथित दहशतवादी होता. तो दहशतवादी असता तर मेलेल्यांना धोधो सहानुभूती मिळाली असती.

पॅडॉककडं फार शस्त्रं होती. अमेरिकेत शस्त्रं बाळगायला कायद्यानं परवानगी आहे. अमेरिकन लोकं तो त्यांच्या अधिकार मानतात.  स्वसंरक्षणासाठी, खेळ आणि मनोरंजनासाठी आम्हाला बंदुका हव्यात असं अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे. अमेरिकेत शस्त्राधिकार हवा असणाऱ्यांचा फार मोठा प्रभावी गट आहे. ते बहुतांशी गोरे आहेत. कामगार, काळे इत्यादी ‘ गैरअमेरिकन ‘ लोक आपल्यावर हल्ला करतील या भीतीपोटी ही माणसं शस्त्रं मागतात. शिवाय शस्त्रं उत्पादणाऱ्यांचाही एक मोठा गट आहे. शस्त्राधिकार गेला तर त्यांचा धंदा खतम होईल. वरील दोन्ही गटांचं वर्चस्व अमेरिकन राजकारणात आहे. त्यामुळंच कितीही हत्याकांडं झाली तरी शस्त्राचा अधिकार अमेरिकन सरकार नाकारत नाही, शस्त्र बाळगण्याला कायद्यानं बंदी घालत नाही.

स्वसंरक्षाणासाठी पिस्तुलं वापरली जातात. शिकारीसाठी रायफल्स वापरल्या जातात.  पॅडॉककडं असॉल्ट रायफल्स आणि ऑटोमॅटिक गन्स होत्या. या बंदुका केवळ युद्धात वापरल्या जातात, पक्षी मारण्यासाठी किंवा नेमबाजी करण्यासाठी वापरल्या जात नाहीत.

बंदुका देताना माणसाचा इतिहास तपासण्याची तरतूद अमेरिकन कायद्यात आहे. गुन्हेगार नाही ना, दहशतवादाशी संबंध नाही ना, एकूण तोल सुटलेला माणूस नाही ना  याची चौकशी केली जाते. पॅडॉकला कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता किंवा तो चक्रमपणे वागण्याच्या घटना नोंदल्या गेलेल्या नव्हत्या. त्यामुळं अमेरिकन कायद्यानुसार तो शस्त्रं बाळगू शकत होता.

मेख इथंच आहे. अलिकडल्या काळात कोणत्याही दहशतादी संघटनेशी कोणताही संबंध नसणारी माणसं कोणाकडूनही आदेश न घेता हत्याकांडं करतात. ब्रेक्झिटला विरोध करणाऱ्या एका खासदाराचा खून एका माणसानं केला. कोणत्याही संघटनेचा संबंध नसलेला अगदी सामान्य, तुमच्या आमच्यातला माणूस वर्तमानपत्रं आणि सोशल मिडिया वाचून भडकला आणि त्यानं परस्पर, एकांडेपणानं खासदाराला मारलं.

मुसलमानांवर अन्याय होतोय, काळ्यांवर अन्याय होतोय असं माणसं माध्यमातल्या क्लिप्स पाहून, दहशतवादी संघटनांचा प्रचार पाहून ठरवतात. दुसऱ्या बाजू कधी पहात नाहीत. अन्याय दूर करण्याचे अनेक इतर मार्ग असू शकतात हे त्यांच्या डोक्यात येत नाही. दुसऱ्याला मारणं म्हणजे एकतरफी पद्धतीनं दुसऱ्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणं होय हे त्याला सुचत नाही. आपले शत्रू कोण आहे ते आपलं आपणच ठरवतात आणि एकतरफीपद्धतीनं खून करून मोकळे होतात. कोणीही साधा माणूस आता खुनी होऊ शकतो असं वातावरण तयार झालं आहे.

प्रेमप्रकरणात अपेश, आईबाप घरी थारा देत नाहीत, नोकरी मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, खर्चायला पैसे मिळत नाहीत इत्यादी हताशांमधूनही माणसं शस्त्र उचलतात, खून करतात.

तुमच्या आमच्यासारखी माणसं कशी तरी कुठल्या तरी क्षणी हिंसक कां होतात याचा अभ्यास आताशा होऊ लागलाय. विजय तेंडुलकरांनी हिंसा या विषयावर केलेल्या अभ्यासात अनेक सामान्य असलेल्या आणि गुन्हेगार झालेल्या माणसांच्या केसेस नोंदल्या आहेत. एका कुटुंबवत्सल आणि घरेलू माणसानं आपल्या पत्नीला डोक्यात दगड घालून मारलं. आपण हे कृत्यं कां केलं हे त्याला सांगता येत नव्हतं. पण तरीही पत्नीला मारलं हा गुन्हा असल्यानं तो शिक्षा भोगत होता.

मानसिक तोल कोणाचाही केव्हाही जाऊ शकतो.

तोल जातो त्याक्षणी जर माणसाकडं घातक हत्यार नसेल तर हत्याकांड होण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच माणसाकडं हत्यार असायला परवानगी नसावी. जगभरच्या अनेक देशात, युरोपात, ब्रीटनमधे, जपानमधे हत्यारं ठेवायला बंदी असल्यानं बंदुकांमुळं होणारे खून अगदीच कमी होतात. अमेरिकेत सर्वात जास्त खून आणि हत्याकांडं होतात.

पॅडॉक ६४ वर्षाचा होता. सामान्यपणे आपण असं मानतो खूनबीन करायची खुमखुमी माणसाच्या तरुण वयात असते, म्हातारी माणसं वय वाढतं तसं मनानं आणि शरीरानं थकत जातात. त्यामुळं पॅडॉकचं कृत्यं  विचार करायला लावतं.

अमेरिकन म्हातारे हाही मुद्दा विचारात घ्यायचा कां?अमेरिकन म्हातारे सैरभैर, पोकळीग्रस्त झालेत काय? त्यामुळंच ते गुन्हे करायला प्रवृत्त होताहेत काय? केवळ एका पॅडॉकच्या घटनेवरून असा निष्कर्ष काढू नये पण तो एक मुद्दा चर्चेत येऊ लागलाय.

अमेरिकेत तारुण्यातच तुटलेपण सुरु होतं आणि म्हातारपणात ते अधिक गडद होतं. साठी उलटलेले लोक हल्ली बाईक घेऊन दिवसेंदिवस रस्ते आणि मॉटेलमधेच जगत असतात. या गावातून त्या गावात, या मोटेलमधून त्या मोटेलमधे. बांधून ठेवणारं घर त्यांना उरलेलं दिसत नाहीये.

गेल्या वर्षी मी लास वेगासला गेलो होतो, दिवसभराचा कारचा प्रवास करून. वाटेत कित्येक बायकर म्हाताऱ्यांचे ताफे भेटले. अर्ध्या अंतरावर नेवाडा वाळवंटातल्या ईली नावाच्या गावातल्या एका मोटेलमधे मी रात्र काढली. त्या मोटेलमधे चार जोडपी आणि दोन एकटे म्हातारे बाईकवरून आले होते. कित्येक दिवस ते फिरतच होते. दिवसभर रस्त्यावर, दुपारी आणि रात्री बारमधे.

कोलंबसमधे एका कॉफी हाऊसमधे मी पुस्तकं वाचत, लिहित बसत असे. तिथं मेगन नावाची तरूणी होती. तिची दोस्ती झाली. ती शिकत होती, शिक्षणासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी कॉफी हाऊसमधे वेट्रेस झाली होती. गप्पा मारता मारता म्हणाली की ती तिच्या गावातल्या घरी जात नाही, तिचे वडीलही तिला भेटायला कोलंबसमधे येत नाहीत. कारण वडिलांना मुलांमधे इंटरेस्ट नव्हता, वडिलांना तिच्याकडं पहायला वेळच नव्हता, ते कायम बाईकनं फिरत असत, घरीच येत नसत.

विस्कॉन्सिनमधल्या स्टीवन्स पॉईंट या गावात  मी रहात होतो तिथं माझ्या घरासमोरच्या एका बागेत एक माणूस सक्काळी येऊन  एका बाकड्यावर बसायचा.पुतळ्यासारखा. मी दिवसभर काहीबाही करून घरी परतलो तरी तो तिथंच. मग रात्री कधी तरी तो तिथून जायचा.

पॅडॉक ६४ वर्षाचा होता म्हणून हा मुद्दा येतो.

गेल्या पाचेक वर्षात अनेक एकांड्यांनी हत्यांकांडं केली. ते एकांडे तरूण किंवा मध्यम वयीन होते. ती माणसं हताश होती, निराशाग्रस्त होती, सैरभैर होती, समाजापासून तुटलेली होती, सारासार विचारांशी त्यांचा संबंध तुटला होता.

अमेरिकेत फाक माणसं एकूणातच तुटल्यागत झालीत कां?

सर्वसामान्य घरातली, साधारण सुखी घरातली तरुण मुलंही आज अत्यंत अस्थिर मनस्थितीत आहेत. समाजात चहूकडं सुख आणि स्थैर्याच्या असंख्य शक्यता दिसत असतानाही त्यांच्यात आपण सुखाला वंचित झालो आहोत अशी भावना आहे. शिक्षण अर्धवट राहिल्यानं, मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं, मिळणारं उत्पन्न अपुरं असल्यानं, मिळणारा रोजगार अनिश्चित असल्यानं किती तरी म्हणजे किती तरी तरूण अस्वस्थ आहेत. त्यात गोरे आहेत, काळे आहेत, आशियाई आहेत, आफ्रिकी आणि लॅटिनो आहेत, मुसलमान आहेत आणि ख्रिस्तीही आहेत.

जाहिरातीत, मॉलमधे, टीव्हीत, सेलफोनमधे, दुकानांत, सिनेमात नाना प्रकारची सुखं खुणावत असतात, त्यातली बरीचशी सुखं मिळतातही. तरीही माणसं सुखी दिसत नाहीत. आपल्याला काही तरी अजूनही मिळालेलं नाही जे इतरांना मात्र मिळालंय असं खूप लोकांना वाटतंय. आपलं दुःख हे इतर माणसांमुळं आहे असं खूप लोकांना वाटतं.

जगण्यासाठी आता घराची आवश्यकता राहिलेली नाही. सारं काही दुकानात, इस्पितळात, न्यायालयात मिळतं. लोकं घरापासून तुटलीत.  पण घराबाहेरचं जगही त्यांना सुख द्यायला तयार नाही. घरात एकादं सूज्ञ माणूस असतं, आई असते, मोठा भाऊ असतो जो माणसाला समजावतो, आततायी वागू नको म्हणून सांगतो.  घराबाहेर, चर्चमधला उपदेशक किवा मशिदीतला इमाम न्यायानं वागा, आततायीपणा करू नका, दुसरा गाल पुढे करा, सहन करा असं सांगत असे.आता माणसं चर्चमधे जाईनाशी झालीत आणि मशिदीत तर बऱ्याच ठिकामी आततायीपणालाच चिथावणी दिली जाते.

भाऊ पाध्ये म्हणत असत की ते ‘ बाहेरख्याली ‘ होते. घरात ते कधीच सामावले गेले नाहीत, फूटपाथ आणि इराण्याचं हॉटेल हेच त्यांचं जग होतं. याच इराण्याच्या हॉटेलानं महाराष्ट्रात नारायण सुर्वे आणि अरूण कोलटकरांना कवी केलं,  स्वातंत्र्य चळवळीच्या चर्चाही याच इराणी हॉटेलांनी घडवल्या.  आता मुंबईत लोकांना घरही नाही आणि इराणी हॉटेलही नाही अशी अवस्था झालीय.

म्हातारे असोत की तरूण, तुटलेपण, अवकाशात भिरकावले गेलेपण, ही एक समस्या अमेरिकेत तयार होऊ लागलीय. त्यातूनच तर अशी हत्याकांडं घडत नाहीयेत ना?

।।