स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

‘स्पॉटलाईट’ ला सर्वोत्तम चित्रपट आणि पटकथा अशी दोन ऑस्करं मिळाली.
गेली सातेक वर्षं हा पट  घडत होता. हॉलिवूडमधले पैसेवाले, स्टुडियोंचे मालक या पटात पैसे घालायला तयार नव्हते. मोठमोठे स्टार्स, त्याना अगडबंब पैसे, चित्रीकरणावर भरमसाठ पैसे, वितरणावर भरमसाठ पैसे, जाहिरातबाजीवर पैसे. हे हॉलिवुडचं वैशिष्ट्यं झालंय. या जाचक चौकटीत राहूनही चांगले चित्रपट निघत असतात. (स्पीलबर्ग, स्कॉरसेसे इ).  आशयघन ‘स्पॉटलाईट’ काढणं हॉलिवूडमधे जवळजवळ अशक्य झालंय. स्पॉटलाईटच्या लोकांनी कष्ट करून ते जमवलं. जाहिरात आणि पैसे पाठीशी नसल्यानं या चित्रपटाची वाच्यता झाली नव्हती. ऑस्कर मिळाल्यानंतर या चित्रपटाची कथा कळू लागलीय.
निव्वळ करमणुकीसाठी सिनेमाघरात जाणाऱ्यांसाठी हा चित्रपट नसेल असं निर्मात्यानं सुरवातीलाच ठरवलं होतं. चर्चची बदनामी, चर्च उध्वस्थ करणं असा चित्रपटाचा उद्देश दिद्गर्शकाच्या मनाशी नव्हता. समाजात निर्माण झालेल्या कुप्रथांकडं लक्ष वेधणं आणि त्या बदलायला समाजाला भाग पाडणं हा उद्देश होता. समाजातल्या दुर्लक्षितांकडं लोकांचं लक्ष जात नाही. त्यांचं म्हणणं लोकांसमोर आलं पाहिजे असं ग्लोबमधे पत्रकारी  करणाऱ्या लोकांच्या डोक्यात होतं. चित्रपट निर्मात्याचंही तेच मत होतं. लोकांनी विचार करावा, चिंतन करावं, आपल्या अंतरंगात डोकावून पहावं असं पत्रकारांना आणि चित्रपट निर्माता याना  वाटत होतं.
  मुख्य विषय शक्यतो अनाकर्षक पद्धतीनं मांडायचा, विषयाला झगमगीत कपडे घालायचे नाहीत, दागिने घालायचे नाहीत. मुळ विषयातच ताकद आहे. विषय जसा आहे तसा लोकांना दाखवायचा. स्पॉटलाईटमधल्या भूमिकांना कपडे घातलेले नाहीत. विषयाला कपडे घातलेले नाहीत. माणसं आणि विषय जसे असतात तसे चित्रपटात दिसतात.  खाकी तुमानी घातलेली पात्रं चित्रपटात वावरतात. जमिनीलगत फूट दोन फूट अंतरावर कॅमेरा ठेवून माणूस दाखवला की तो आकाशायेवढा दिसतो, सारा पडदा व्यापतो. पात्र  फार  मोठ्ठं आहे दाखवण्याचा हा खटाटोप असतो.  असं चित्रीकरण केलं की पात्राची ‘ उंची ’ काय आहे ते ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकाला रहात नाही. दिग्दर्शकच सांगू टाकतो की पहा हे पात्र किती महान आहे. तसं या चित्रपटात कुठंही नाही. 
बॉस्टन ग्लोबचा खराखुरा संपादक रॉबी परवा प्रेक्षकांसमोर आला. तो म्हणाला ‘ मी तसा कणखर माणूस आहे, भावनाविवश होत नाही. पण प्रीस्टांच्या विकृतीला बळी पडलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हां मी दोन वेळा रडलो.’  सिनेमात संपादक रॉबी रडताना दाखवलेला नाही.
  चित्रपट काढतांना दिद्गदर्शक आणि सहायकांनी   मुळातल्या पत्रकारांसमवेत अनेक दिवस खर्च केले. पत्रकारांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक, वावरण्याच्या आणि  बोलण्याच्या लकबींचा अभ्यास त्यांनी केला.  पिफर ही पत्रकार महिला या मुलाखतींनंतर हादरली. आपल्या   जीवनातलं नाट्य, खाजगी गोष्टी चित्रपटात येणार या विचारानं ती अस्वस्थ झाली. चित्रपटात तसं काही नाही याचं तिला आश्चर्य आणि सुख वाटलं.
वॉटरगेट प्रकरण खोदून काढणारे ‘वॉशिंग्टन पोस्टचे’ पत्रकार वूडवर्ड आणि बर्नस्टिन काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी बोलत होते. वॉटरगेटनंतर शोध पत्रकारी   कां होत नाहीये असा प्रश्न   विचारल्यावर ते म्हणाले. ‘ तसं नाहीये. बोस्टन ग्लोबनं केलेली प्रीस्टांच्या वर्तनाची छाननी हे शोध पत्रकारीचं उत्तम उदाहरण आहे. आणि तुम्ही विकीलिक्स विसरताय. असांजे आणि स्नोडेन यांनी साऱ्या जगातली गुपितं उघड केली.’ स्पॉटलाईट ही चित्रपट क्षेत्रातली शोधपत्रकारी आहे.
स्पॉटलाईट हा चित्रपट जसा चर्चवर आहे तसाच पत्रकारीवरही आहे. पत्रकारी कशी चालते त्याचा एक घडा स्पॉलाईटनं दिलाय. 
वर्तमानपत्रात बातमीदार असतात. प्रत्येक बातमीदाराला एक बीट दिलेला असतो. कोण कोर्टातल्या बातम्या गोळा करतो, कोण पोलिसातल्या, कोण विधानसभेतल्या, कोण शिक्षणक्षेत्रातल्या.  शोधपत्रकारी करणारा बातमीदार  बीट बातमीदारापेक्षा वेगळा असतो. बॉस्टन ग्लोबमधले चार ते सात पत्रकार कित्येक महिने केवळ चर्चमधल्या घटनांचीच चौकशी करत होते. एकच एक विषय.  लोकांना भेटायचं, फोन करायचे.  माहिती गोळा करायची. स्पॉटलाईटमधे पत्रकार अनंत खोक्यात साठवलेले अनंत कागद डोळे फोडून तपासताना दिसतात. रात्रं दिवस. अमेरिकाभर पसरलेल्या चर्चमधे किती प्रीस्ट आहेत, ते कुठं काम करतात, कुठं कुठं जात येत असतात याचा अभ्यास करण्यासाठी पत्रकारांनी अनंत कागद तपासले. हे काम अत्यंत कंटाळवाणं असतं.
 बॉस्टनमधे काम करणारा प्रीस्ट बॉस्टन सोडून कुठं तरी जातो. कुठं तरी म्हणजे? म्हणजे विशाल अमेरिकेत कुठंही. अशा प्रीस्टचा माग घ्यायचा, कोणताही मागमूस नसतांना.  कोणतीही चावी हातात नसतांना कुलुप उघडण्याचा प्रयत्न. अत्यंत म्हणजे अत्यंत  कंटाळवाणा. इंग्रजीत याला ड्रजरी असा शब्द आहे.  कित्येक दिवसांच्या कंटाळवाण्या खटाटोपातून कधी तरी एकादी छोटीशी माहिती मिळते. तेवढ्या माहितीनं सारं चित्रं बदलतं, स्पष्ट होतं. शोध पत्रकारी हे असं प्रकरण आहे.
स्पॉटलाईटमधे असलेली भूमिका खऱ्या आयुष्यात निभावलेल्या ग्लोबमधल्या पत्रकारानं परवा मुलाखत दिली. तो म्हणाला ‘ शोध पत्रकार म्हणजे कोण? जो सत्तेला प्रश्न विचारतो, सत्ताधाऱ्याला आणि सिस्टीमच्या प्रमुखांना प्रश्न विचारतो.’ पोपला, पंतप्रधानाला, राष्ट्राध्यक्षाला, लष्कर प्रमुखाला, पोलिस प्रमुखाला, हॉस्पिटलच्या प्रमुखाला प्रश्न विचारणं. त्यासाठी अभ्यास हवा. धैर्य हवं. पर्सपेक्टिव  हवा. त्या व्यक्तीला उघडं पाडणं हा हेतू नसतो, व्यवस्था उघड करायची असते.
निक्सन उघडे पडले. वॉटरगेट प्रकरणात.
जॉर्ज बुशनी  कोणतीही विश्वास ठेवण्यालायक माहिती हाताशी नसताना इराकमधे संहारक शस्त्रं आहेत असं जाहीर केलं. खोटं बोलले. त्या माहितीची सबब वापरून त्यांनी इराकवर आक्रमण केलं.
 चर्चमधे अमानवी अत्याचार होतात. पोपना ते माहित असतं. पोप ती माहिती दडवून ठेवतात. पोप  गुन्हेगार प्रीस्टांना शिक्षा करत नाहीत, त्यांना कोर्टामधे जाण्यापासून वाचवतात. 
 हे सारं अमेरिकेतले पत्रकार उघडं पाडतात. त्या  विषयावर चित्रपट निघतात. चित्रपटांवर बंदी येत नाही, पुस्तकांवर बंदी येत नाही. BETRAYAl. CRISIS IN THE CHURCH हे पुस्तक ग्लोबनं प्रसिद्ध केलं. कॅथलिक बहुसंख्य असलेल्या अमेरिकेनं त्या पुस्तकावर  बंदी आणली नाही. अमेरिकन लोकानी संपादक, वार्ताहरांवर हल्ले केले नाहीत. पुलित्झर हे प्रतिष्ठित बक्षीस त्या पुस्तकाला मिळालं. त्या पुस्तकावर आधारलेल्या स्पॉटलाईट या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळालं.
भारतात धार्मिक कपडे घातलेली माणसं अत्याचार करतात, भ्रष्टाचार करतात. सरकार, सामाजिक संस्था, लष्कर, पोलिस, शिक्षणव्यवस्था, संसद, मंत्रीमंडळ यामधे भयानक गुन्हे करणारी माणसं सुखानं वावरत असतात.
चला. आपण बॉस्टन ग्लोबची, स्पॉटलाईटची वाट पाहूया.

।।

7 thoughts on “स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

  1. आपल्याकडे नव्हता का महानगर? वातावरण थोडं जास्त असहिष्णू आहे. पण म्हणून अगदीच निराशाजनक आहे असं नाही.

  2. छान आहे सर! पण जरा काही कुठे चांगलं दिसलं की लगेच भारताशी तुलना नको प्लीज. एवढे पण काही आपण टाकाऊ नाहीत!

  3. एक बारीकसा मुद्दा. समजा या ब्लॉगमधला शेवटचा पॅरा, भारतातल्या परिस्थितीची नोंद घेणारा, लिहिला नसता तर काय झालं असतं? केवळ चित्रपटाबद्दल लिहिलं असतं तर या ब्लॉगकडं वाचक कसं पहाणार होते? याच विषयावरच्या आधीच्या ब्लॉगमधे भारताचा उल्लेख नव्हता, निव्वळ चित्रपटाबद्दल लिहिलं होतं. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या.

  4. >भारतात धार्मिक कपडे घातलेली माणसं अत्याचार करतात, भ्रष्टाचार करतात. सरकार, सामाजिक संस्था, लष्कर, पोलिस, शिक्षणव्यवस्था, संसद, मंत्रीमंडळ यामधे भयानक गुन्हे करणारी माणसं सुखानं वावरत असतात.

    इतर देशातही कडवे धार्मिक लोक असतात. इतर देशांतही अत्याचार भ्रष्टाचार होतात. प्रत्येक देशाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. उदा. ब्रिटनमध्ये unwed mothers हा भयंकर प्रॉब्लेम आहे. unwed mothers ना council फ्लॅट सहज मिळतो याचा गैरफायदा घेतला जातो! अलीकडे नेट / मीडिया मुळे आपलयाला जगभरची माहिती मिळते याचा पॉजिटिव फायदा करून घेऊ शकतो का? हे पाहिलं पाहिजे. तुम्ही मीडियामधले असल्याने आणि तुमचा म्हणून काही इंफ्लुएंस होईल म्हणून तुम्हाला लिहिलं.

  5. तुमचं म्हणण खर मानू. आपल्यातील टाकाऊ आणि टिकाऊ यांची यादी कराल का प्लीज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *