इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.

इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.

सौदी इराणमधल्या प्राचीन संघर्षातलं एक नवं वळण.
।।
 इराण आणि सौदी अरेबिया यांनी आपसातले राजनैतिक संबंध तोडले आहेत. दूतावास बंद करावेत, राजदूतानी आपापल्या देशात परत जावं असे आदेश दोन्ही देशांनी काढले आहेत.
सौदीनं अल निम्र या शिया पुढाऱ्याचा केलेला शिरच्छेद हे या घटनेचं तात्कालिक कारण आहे. सौदीचं म्हणणं होतं की अल निम्र सौदी हिताच्या विरोधात भाषणं करत होते, हिंसेला चिथावणी देत होते, सौदीविरोधात इतर देशांनी (इराणनं) कारवाई करावी असं सुचवत होते.  सौदीनं त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. इराणचं म्हणणं आहे की अल नम्र हे नम्र होते,ते चिथावणी वगैरे देणाऱ्यांपैकी अजिबात नव्हते, ते सौदीतल्या अल्पसंख्य शियांच्या हक्कासाठी लढत होते. नम्र यांच्या शिरच्छेदानंतर तेहरानमधल्या इराण्यांनी सौदी दूतावासावर अग्नीगोळे फेकले, दूतावासावर हल्ला केला.
नम्र यांचा शिरच्छेद आणि राजनैतिक संबंध तोडणं या घटना निमित्तमात्र आहेत. इराण आणि सौदी यांच्यातलं वितुष्ट कित्येक शतकापासून चालत आलेलं आहे. इराण आणि सौदी हे आजच्या स्वरूपात देश नव्हते, नेशन स्टेट्स नव्हते तेव्हापासून इराण (शिया पंथाचा नेता) आणि सौदी (सुन्नी पंथाचा नेता) यांच्यात वैचारिक आणि सामरिक लढाया चालत आल्या आहेत. इराण, सौदी आणि जगभरचे मुस्लीम प्रदेश यामधे दोन्ही पंथाच्या लोकांनी एकमेकाचे लाखो लोक मारले आहेत.
तेव्हां मूळ मारामारी पंथांची.  मुस्लीम समाजाचं नेतृत्व मुस्लीम समाजानं आपसात चर्चा करून ठरवावं, ते कोणा एका घराण्यात (महंमदांच्या वंशजात) असता कामा नये असं सुनी म्हणतात. शियांचं म्हणणं  महंमदांच्या वंशातल्याच माणसानं इस्लामचं नेतृत्व केलं पाहिजे.त्यांचे बारावे इमाम नाहिसे झाले आहेत, माहदी, ते कधी तरी परत येतील आणि जग इस्लाममय करतील असं शियांचं म्हणणं आहे. ते माहदीची वाट पहात आहेत. सुन्नी मात्र त्यांना हवा तो प्रमुख निवडायला मोकळे आहेत. अल बगदादीनं स्वतःला  इस्लामचा प्रमुख जाहीर करून टाकलंय. इतरही अनेक बारके सारके पण चिवट धागे या पंथांनी भांडणांमधे घुसवले आहेत.
काही अंशी यामधे सांस्कृतीक-वांशिक भागही आहे. महंमदांनी इस्लाम स्थापला आणि पसरवला. महंमद अरब होते. त्यांचे साथीदार अरब होते. अरबी भाषा आणि संस्कृतीही महंमदांच्या इस्लामचा अविभाज्य घटक होती. पर्शियन-इराणी लोकांनी इस्लाम स्वीकारला (त्यातही जबरदस्ती कितपत होती याचा तलाश घ्यायला हवा) परंतू त्यांना अरब वर्चस्व नको होतं. यातूनच संघर्षाला  अरब विरुद्ध पर्शियन असाही एक पैलू चिकटला.
पहिल्या महायुद्धापूर्वी इराण आणि सौदी अरेबिया हे समाज या ना त्या इस्लामी साम्राज्याचा भाग होते. पांथिक आणि वांशिक मतभेदांसह दोन्ही पंथ साम्राज्यात नांदत होते. पहिल्या महायुद्दानंतर जगभरची साम्राज्य कोसळली आणि देश सुटे झाले. तिथून नेशन स्टेट्सना स्वतःचं एक स्वतंत्र आर्थिक आणि राजकीय अस्तित्व प्राप्त झालं. तेल हाताशी आल्यानंतर मुस्लीम देशांचं रूप आणखीनच पालटलं. सौदी किंवा इराण केवळ देश न रहाता त्या त्या विभागातले दादा  होण्याच्या प्रयत्नात लागले. शिया-सुनी आणि अरब-पर्शियन या पलिकडं जाऊन देश म्हणून ते एकमेकांच्या स्पर्धेत उतरले. त्यांनी आपापले गट तयार केले. इराणनं सीरिया, इराक, लेबेनॉन इत्यादी आखाती देश आपल्या गटात ओढले. सौदीनं दोहा, कतार, कुवैत, बहारीन, अमिराती इत्यादी देश आपल्या तंबूत खेचले. इजिप्त, पाकिस्तान, इंडोनेशिया इत्यादी मुस्लीम देश वंशाच्या आणि संस्कृतीच्या हिशोबात ना फारसी ना अरब. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र तंबू उभारले. इजिप्तची तर मजाच मजा. त्यांचं म्हणणं की त्यांची संस्कृती पर्शियन, अरब यांच्यापेक्षा किती तरी आधीची, म्हणून वेगळी आणि श्रेष्ठ.
 जगभरात १२० कोटी मुसलमान.  १४ कोटी शिया आणि उरलेले सुन्नी. सुन्नी मंडळीही नाना वंश, संस्कृती आणि भाषांत विभागलेली. भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी कित्येक सुनी गट शियांशी जुळवून घेत असतात, मारामाऱ्या करत नाहीत. परंतू आखात, पश्चिम आशियात मात्र ते एकमेकाचे गळे चिरत असतात. सध्या येमेनमधे दोन गटांमधे धुमश्चक्री चालू आहे.  एका गटाला इराण शस्त्र पुरवतं, दुसऱ्याला सौदी अरेबिया. सीरियात असद यांच्या सरकारला इराण शस्त्रं, पैसा पुरवतं आणि असदला विरोध करणाऱ्या गटांना सौदी,दोहा,कतार शस्त्रं पुरवतात. आयसिसला अरब देशांचा पाठिंबा आहे. इराकमधे सरकार कोणाचंही असलं तरी शिया आणि सुनी टोळ्यासैन्य गेली वीस वर्षं एकमेकांशी लढत आहेत.
सीरिया, इराकमधे सुनी अल्पसंख्य आहेत. तिथली सरकारं त्यांना छळत असतात.  त्या बद्दल सौदी अरेबिया तक्रारी करतं.  सौदी, बहारीन इत्यादी ठिकाणी शिया अल्पसंख्य आहेत, त्यांना तिथले सत्ताधारी सुन्नी छळत असतात. इराण त्या बद्दल तक्रारी करत असतं.
एकूणात असा हा चिखल आहे.
इराण आणि सौदी अरेबियाला मुस्लीम जगाचं नेतृत्व हवंय. ते मिळवण्यासाठी दोघेही पश्चिमी देश, रशिया इत्यादींचे पाठिंबे मिळवत असतात. राजकारणाचा भाग म्हणून अमेरिका-रशिया  सतत आपल्या भूमिका बदलत कधी या गटाला तर कधी त्या गटाला पाठिंबा देतात,  दोघांमधलं वितुष्ट टिकवून ठेवतात.  इराण – सौदीचं नेतृत्व आणि जनताही गोठलेल्या कालबाह्य इस्लामी विचारांत अडकलेली आहे. आधुनिकता, सभोवतालचं जग, उद्याचं जग या बद्दल एकूणच मुस्लीम समाजात औदासिन्य, अज्ञान आणि दुरावा आहे. त्यामुळं गाढवासारख्या लढाया करत मुस्लीम समाज स्वतःचं आणि जगाचं नुकसान करत असतात.
इराण-सौदीनं राजनैतिक संबंध तोडणं हा मुस्लीम समाजाच्या स्वतःला आणि जगाला त्रास देणाऱ्या सिलसिल्यातला एक बिंदू आहे.
।।

।।

8 thoughts on “इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.

  1. प्रो आणि अँटी ही विशेषणं निसरडी आणि फसवी असतात. इशूज, मुद्दे महत्वाचे असतात. मुसलमान माणसं म्हणून त्यांचं कधी चुकत असेल पण काही वेळा त्यांच्यावर अन्यायही होत असतो. अशा वेळी त्याची नोंद करावी लागते. तेच हिंदूंच्या बाबतीतही आहे. हिंदूवरही कित्येक वेळा अन्याय होतो. त्याचीही नोद घ्यावी लागते. राजकारणामुळं आपण आणि इतर अशी जकडबंद विभागणी होते. विशेषतः भारतात. एकच एक कसोटीचा दंडुका घेऊन ठोकत सुटणं योग्य नसतं. कोण हिंदुत्ववादी, कोण सेक्युलर असं ठरवून राजकारणी मोकळे होतात. पण राजकारण हा ज्यांचा धंदा नाही त्यांनी अशी विभागणी करण्याची आवश्यकता नाहीं

  2. The choice for most countries is to select between Islamic terrorism and western supremacy(what would you prefer?). Most other countries have accepted this . India is in peculiar situation because it is neither small nor devoid of cultural history. The Hindu extremist positions are in response to Islamic attacks initiated by Pakistan. Even then, the reaction is still humane. As we see, painter Hussain was not beheaded or killed — what would have been his fate in any Muslim country. However, it is inevitable to harden in future.

  3. We should accept neither islamic terrorism nor western supremacy. Living in diversity is a unique distinctive feature of Indian culture.Western supremacy is largely economic and islamic terrorism is largely cultural-religious. Indian culture has accommodated both, religious and economic diversities. Hindu extremism is a reaction to muslim extremism, hence it is not indian or Hindu. Hussain was not beheaded but was almost forced to leave the country. Amir Khan is being stamped traitor and expected by Hindu extremists to leave the country ( to leave for Pakistan). A non hindutva hindu would criticize amir or hussain and live with them, while Hindutvavadi would make living of both the guys impossible.

  4. In every kind of variety combinations in any society , the most important need has to be peaceful living of those who want all categories to live, develop with harmony & accept and believe that variety has to be there and the human race without different thoughts would rather be charmless & may stagnate.

  5. ’मुसलमान’म्हणजे सैतानाची प्रतिमा, या शिक्क्याला हे लिखाण छेद देतं. मुसलमानांच्यातही एकमेकांच्या जिवावर उठणारे मतभेद आहेत. शिया आणि सुन्नी यांच्यात (तुलनेने) शिया मवाळ, असा माझा समज आहे. तो खरा की खोटा? बांगलादेशात कोण बहुसंख्य आहेत? पूर्वी लखनौ, वगैरे ठिकाणी शिया-सुन्नी दंगली होत, असं मला आठवतं. त्या का होत आणि कशा थांबल्या? देवबंद हा प्रकार कुठल्या पंथातला? बाबरी मशीद पाडल्यानंतर मुसलमानांच्यात बुरखा, नमाज, वगैरे धार्मिक कडवेपणा वाढीस लागला, त्याचं श्रेय कुठल्या पंथाचं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारतीय मुसलमान (समाज आणि सर्वसाधारण लोक) भावनिक दृष्ट्या कोणाला जवळ मानतात? सौदी की इराण?

    इथे चांगली माहिती असते. मी फक्‍त भारतीय perspective मधून पहाण्याचा प्रयत्न करतो आहे.

  6. एक दुरुस्ती. "समाज आणि सर्वसाधारण लोक" याऐवजी "धार्मिक-राजकीय नेते आणि सर्वसाधारण लोक" असं हवं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *