रवांडा

रवांडा

रुवांडा या आफ्रिकन देशात वीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९४ च्या एप्रिल महिन्यात हत्याकांड सुरु झालं. एक महिन्याभरात नऊ ते दहा लाख टुट्सी जमातीची माणसं मारली गेली. रुवांडाच्या अध्यक्षांचं विमान राजधानी किगालेमधे उतरत असताना उडवण्यात आलं आणि त्यात अध्यक्ष ठार झाले. अध्यक्ष हुटू या जमातीचे होते. हुटू आणि टुट्सी या जमातींमधे पूर्वापारपासून वैर होतं.  टुटसींनी आपल्या नेत्याला मारलं असं ठरवून हुटूनी हत्याकांड पार पाडलं. 
महिनाभर हत्याकांड चालल होतं. तलवारी, सुरे, चाकू इत्यादी प्राथमिक शस्त्रं वापरून माणसं कापण्यात आली. काहीच हातात मिळाल नाही तर स्क्रू ड्रायवरही वापरले गेले. टुट्सी लोकांचे पत्ते ठावठिकाणा पद्धतशीरपणे गोळा केला गेला. हुटूंचं सरकार आणि महापालिका वगैरे असल्यानं सरकारी कागदांतून पत्ते आणि माणसांची जात शोधणं सोप्पं झालं. हातात याद्या घेऊन  मारेकरी फिरत होतं. मारलेल्या माणसाना कुठ ठेवायचं ते कळेना, प्रेतं शेतात धान्य पसरावं तशी पसरून ठेवण्यात आली. रस्तो रस्ती अडथळे उभारून वाहतूक बंद करण्यात आली. घराघरात घुसून किंवा रस्त्यावर प्रत्येक माणसाला ओळखपत्र विचारलं जाई. त्यावरून तो टुट्सी आहे असं कळलं की कापण्यात येई. ओळख पत्र नसलेल्याचीही कत्तल. यातून सुटका म्हणून टुट्सी चर्चच्या आश्रयाला गेले. तर तिथं चर्चमधला पादरी हातात कलाश्निकॉव घेऊन होता, आश्रयाला आलेल्यांना त्यानं मारून टाकलं. काही डोकं ठिकाणावर असलेल्या हुटूनी विरोध केला. तर त्यांनाही मारून टाकलं.
रुवांडा हा एक लहान आणि महत्व नसलेला देश. त्यामुळं जगानं या हत्याकांडाकडं दुर्लक्ष केलं. अशा तऱ्हेनं देशातली वीस टक्के माणसं मेली.
महिन्याभरानं टुट्सी सावरले. संघटित झाले. त्यानी हुटूंवर सूड घ्यायला सुरवात केली. हुटू पळाले. शेजारच्या झैरेमधे गेले. मग तिथून ते रुवांडातल्या टुट्सींवर हल्ले करू लागले. मारामारी सुरूच. अजूनही हाणामाऱ्या चालल्या आहेत.
हूटू जमातीतले लोक स्थाईक होतात, शेती करतात. टुट्सी भटके. जनावरं पाळणं हा त्यांचा  उद्योग. जनावरांना चारत ते भटकत असतात. शेतकऱ्यांना या जनावरांचा त्रास होतो. त्यामुळं हुटू आणि टुट्सी यांच्यात वैर उत्पन्न झालं. ते आजही चालू आहे.
माणसांना हिंसा करायची उबळ येते. कोणाला ती सतत येत असते तर कुणी थांबून थांबून हिंसा करतात. हिंसेचं रूप लढाई असं असतं. माणूस प्राथमिक अवस्थेत होता तेव्हां जास्त हाणामारी करत होता. शतक शतक करत मागं गेलं की मागल्या काळात किती माणसं मारली गेली आणि आधुिनक काळात किती मारली गेलीत याचा हिशोब लागतो. दर दहा वीस वर्षांनी माणस मारणं कमी होत जातंय, कमी संख्येनं माणसं मारली जाताहेत. मोठं युदध करून माणसं मारणं ही एक तऱ्हा. दररोज पाच सात माणसं मारत बसणं ही दुसरी तऱ्हा.  
बहरहाल माणसाचा इतिहास फार हाणामारीनं भरलाय. आफ्रिकेतल्या जमाती अजूनही इतिहासातच जगत असल्यानं हत्याकांडं करत असावीत. फार मागं वळून पाहिलं की माणसाला हाणामारी करावीशी वाटते काय? तपास करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *