बुश ब्लेअर विनाशक मनमानी

बुश ब्लेअर विनाशक मनमानी

THE 
WAR WITHIN
A SECRET WHITE HOUSE HISTORY
2006-2008
BOB WOODWORD
।।
इराकमधे रासायनिक व जैविक महाघातक शस्त्रं असून सद्दाम हुसने कधीही अमेरिका-दोस्तांवर हल्ला करेल असं म्हणत अमेरिका व ब्रीटननं आक्रमण केलं.  आक्रमणात सुमारे ५  लाख इराकी नागरीक मेले. नागरीक, सैनिक नव्हे. दहा लाख नागरीक बेघर-उध्वस्थ झाले.
या युद्धात ब्रीटननं सुमारे १२ अब्ज डॉलर उडवले. ४५३ ब्रिटीश सैनिक मेले. सुमारे ६० हजार सैनिकांच्या मनावर युद्धाचे विपरीत परिणाम झाले, त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. कित्येक हजारांना अजूनही त्रास होतोय, उपचार घ्यावे लागत आहेत. तीसेक हजार सैनिकांना शारिरीक जखमा झाल्या.
  इराकमधे रासायनिक आणि जैविक महाघातक शस्त्रं सापडलीच नाहीत.
इराक युद्धाचा लोच्या लक्षात आल्यावर २००९ साली गॉर्डन ब्राऊन यांनी सर जॉन चिलकॉट यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली.   जुलै २०१६ मधे अहवाल प्रसिद्ध झाला. अहवाल बारा खंडांचा आणि २५ लाख शब्दांचा आहे. संक्षिप्त गोषवारा १४५ पानांचा आहे.
जे जगाला माहित होतं तेच चिलकॉट यांनी मांडलं. चिलकॉटनी काढलेले निष्कर्ष असे.  ” कोणतेही पुरावे हाताशी नसतांना ब्लेअर यांनी २००२ साली ब्रिटीश संसदेसमोर आक्रमणाचा ठराव मांडला…नेमकं  राजकीय उद्दीष्ट न ठरवता करता आक्रमण केलं… कारवाईच्या  घातक परिणामांची शक्यता अनेकांनी कानी  घातली असतांनाही   तिकडं दुर्लक्ष केलं…शस्त्रं काढून घेणं, निःशस्त्रीकरण करणं या शांततामय पर्यायांचा विचार न करताच लष्करी आक्रमणाचा निर्णय घेतला..” 
इराकमधे अमेरिका आणि ब्रीटननं सैन्य घुसवलं त्याला ११ सप्टेंबरच्या घटनेची पार्श्वभूमी आहे. अल कायदानं न्यू यॉर्कमधले टॉवर्स उडवले. फार माणसं मारली. अमेरिका हादरली. बुश हादरले. त्यांनी ओसामाला पकडायची, अल कायदा नष्ट करायची घोषणा केली. अल कायदाचा एक अड्डा इराकमधे आहे असं त्यांना वाटलं. प्रत्यक्षात अल कायदा तिथं नव्हतं, सद्दामचा अल कायदाला विरोधच होता. बुश चवताळलेले होते. आधीच त्यांचा इराकवर राग होता. सद्दामला उलथून तिथं आपल्या ताटाखालचं सरकार आणायचं असं बुश यांनी ठरवलं. इराकमधे घातक रासायनिक-जैविक अस्त्रं आहेत आणि इराक कधी तरी अमेरिकेवर हल्ला करणार आहे असं बुशनी जाहीर केलं आणि इराकवर आक्रमण केलं.
११ सप्टेंबरच्या घटनेनंतर चवताळलेले बुश इराकवर हल्ला करणार याचा अंदाज ब्रिटीश प्रधानमंत्री टोनी ब्लेअरना आला होता. एक पत्र लिहून त्यांनी बुशना घाईघाईनं इराकवर कारवाई करू नये, दमानं घ्यावं असं सांगितलं. ही २००१ मधली गोष्ट. बुशनी ब्लेअरना बोलावून घेतलं. टेक्सासमधे रँचवर बुश-ब्लेअर बैठक झाली. बैठकीवरून परतल्यावर २८ जुलै २००२ रोजी ब्लेअरनी बुशना पत्र लिहिलं. ” I will be with you, whatever.”
ब्लेअर कां बदलले? अमेरिकेची हडेलहप्पी? पैसे वगैरेचं आमिष? की अमेरिकेपुढं मान टाकायची जुनी ब्रिटीश सवय?
चिलकॉट रीपोर्ट आल्यावरही ब्लेअर म्हणतात  की त्यांचं काहीच चुकलं नाही. सद्दाम हा वाईट माणूस होताच आणि त्याचा समाचार घेणं आवश्यक होतं. ब्लेअर म्हणतात की इराकवर आक्रमण करण्याच्या आधी त्या विषयावर मंत्रीमंडळाच्या २१ बैठका झाल्या होत्या.
इराक आक्रमणाचा मुख्य मुद्दा होता रासायनिक-जैविक अस्त्राचा. कोणी तरी शेंडी लावून इराकमधे अस्त्र निर्मिती कारखाने आहेत असं ब्रिटीश आणि नंतर अमेरिकन हेरखात्याला सांगितलं. चौकशी अंती कारखान्यांसारखी काही दृश्यं दिसत असली तरी तिथं घातक अस्त्रांचे पुरावे नव्हते हे आधीच लक्षात आलं होतं. तरीही बुश आक्रमण करते झाले.
असं कां घडलं?
बॉब वुडवर्ड यांचं द वॉर विदीन हे पुस्तक या मुद्द्यावर प्रकाश टाकतं. बुश यांचं सरकार इराक युद्धाच्या काळात कस कसं निर्णय घेत होतं याचे तपशीलवार उल्लेख या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा कालखंड २००६ ते २००८ असा आहे.  त्या वेळी इराकचं युद्ध जोरात सुरु होतं. इराकच्या युद्धाचा निर्णय बुशनी कां घेतला हा पुस्तकाचा विषय नाही. परंतू बुश यांची निर्णय घेण्याची पद्धत या पुस्तकावरून भरपूर स्पष्ट होते. 
बुश हट्टी आणि दुराग्रही होते. त्यांना जे वाटतं तेच सत्य अशी त्यांची ठाम धारणा होती. सहमत असणारेच लोक त्यांच्या दिमतीला असत. असहमती असणारी माणसं शत्रू असत. त्यांच्या या दुर्गुणामुळंच इराकच्या वाटेला जाऊ नका असं राजकीय-लष्करी सल्लागार सांगत असतानाही त्यांना अमेरिकेला युद्धात ढकललं.
पुस्तकाचा कालखंड सुरु होतो तेव्हां इराकची धूळधाण झालेली आहे. बगदादमधे दररोज स्फोट होत होते, शेकडो माणसं मरत होती. शिया आणि सुन्नी दररोज घाऊक प्रमाणावर माणसं एकमेकांची माणसं मारत होते. अमेरिकन सैन्यानं एक कडेकोट किल्ला तयार केला होता.तिथंच काय ती सुरक्षितता. त्या पलिकडं देशात सरकार नावाची गोष्ट नव्हती. दीड लाख अमेरिकन सैनिक, हज्जारो रणगाडे, विमानं इराकमधे तैनात असूनही परिस्थिती दररोज चिघळत होती. अमेरिकेचे  बाहुलं  प्रधानमंत्री मलिकी शिया होते. ते स्वतःच सुन्नींचं शिरकाण करण्याला शस्त्रं पुरवत असत. बुश, ब्लेअर इत्यादी लोकांसमोर मलिकी आणि इराकी अधिकारी सारं ठीक चाललंय असं म्हणत.   आपण इराकमधे चारही बाजूनी विमानं-रणगाड्यांच्या मदतीशिवाय फिरू शकत नाही याचा साधा अर्थही बुश-ब्लेअरना समजत नव्हता.
शिया, सुन्नी, कोणालाही अमेरिकन लोकं नको होते. एकूणातच इराकी अरबांना अमेरिकनांची घृणा होती. अमेरिकेचा पैसा आणि शस्त्रं वापरून आपल्या प्रतिस्पर्धी गटाचा नायनाट करायचा असं शिया सुन्नी गटांनी ठरवलेलं होतं. मधल्या मधे अमेरिकेचा पैसा, सैनिक खर्ची पडत होते. इराकचं जे काही होत होतं ते वेगळंच.
इराकमधे काम केलेले सेनाधिकारी एकामागोमाग एक बुश सरकारला सांगत होते की ही लढाई फेल गेलीय, ताबडतोब सैन्य मागं घ्या, लढाई थांबवा. अरब कबीले, त्यांची सामाजिक बांधणी, मशीदी आणि मुल्लांभोवती उभं रहाणारं जाळं, जमातीच्या प्रमुखाचा जमातीवरचा प्रभाव यामधून इराकींचे निर्णय होत होते. अमेरिकन सैन्याला शेंड्या लावून ते संघर्ष करत होते. अमेरिकन प्रचार, दबाव, आमिषं याचा परिणाम अरबांवर होत नव्हता, अरबांची निर्णय यंत्रणा आणि प्रक्रिया स्वतंत्र होती.
अमेरिकन संसद सदस्य, लष्करी सेनानी, माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट इत्यादींचं मोठ्ठं शिष्टमंडळ इराकमधे गेलं. तिथं संबंधितांना भेटलं. त्यांनीही इराक युद्धात अमेरिकेला अपयश आलं आहे, अमेरिकेचं फार नुकसान होतंय, कृपया लढाई थांबवा असा अहवाल प्रेसिडेंट बुशना दिला.
तरीही अधिक सैन्य पाठवा, युद्ध अधिक तीव्र करा अशा मागण्या करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचं बुश ऐकत. बुश यांचे सल्लागार त्यांना सांगत ” वियेतनाममधे आपण मार खाल्ला. मध्य आशियात आपल्यावर अल कायदा इत्यादी हल्ले करतात. आपण काही करू शकत नाही, हतबल आहोत असं जगाला वाटू लागलंय. तेव्हां आपली ही प्रतिमी पुसून काढण्यासाठी आपण इराकचं युद्ध जिंकलंच पाहिजे. कितीही वर्षं लागोत. कितीही खर्च होवो. काहीही होवो.”
संरक्षण मंत्री रम्सफेल्ड निर्णय घेत. परस्पर. अनेक वेळा ते कोणालाही विचारत नसत. निर्णय घेत आणि सरकारी पद्दती झुगारून व्यक्तिशः आदेश पाठवत. आदेशाचा मालक कोण, मंत्रीमंडळाचा निर्णय की प्रेसिडेंट याचा उल्लेख नसे. निर्णयाला  कुठल्याही बैठकीच्या मिनिट्सचा हवाला नसे. वुडवर्डनी या आदेशाचं वर्णन stawflakes असं केलंय. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयानुसार नव्हे तर वारंवार भिरकावलेल्या गेलेल्या स्ट्रॉफ्लेक्सनुसार युद्ध चाललं होतं.
प्रेसिडेंटची, व्हाईट हाउसची एक मोठी यंत्रणा असते. त्यात राष्ट्रीय सुरक्षा, परदेश, संरक्षण, लष्कर, बजेट अशी खाती असतात,   त्या प्रत्येक खात्याला सेक्रेटरी म्हणजे मंत्री असतो, या मंत्र्याकडं स्वतंत्र स्टाफ असतो. शिवाय प्रेसिडेंटचा वैयक्तिक सहाय्यक, सल्लागारांचा ताफा असतो. इराक युद्धाच्या बाबतीत वरील सर्व खाती आणि त्यांचे प्रमुख यांची मतं वेगळी असायची, परस्परविरोधी असायची. संयोजनाचा अभाव होता. महत्वाच्या मुद्द्यावर प्रेसिडेंट बैठक बोलावत त्यावेळी बैठकीची कोणतीही पूर्वतयारी नसायची. एकाद्या कागदावरची त्रोटक  एक रूपरेखा आणि प्रेसिडेंटचं भाषण या आधारावर बैठका चालायच्या. इराकमधून येणारे अहवाल वरील यंत्रणेत वरपर्यंत पोचत नसत. लष्कराची गुप्तवार्ता यंत्रणा आणि सीआयएची गुप्तवार्ता यंत्रणा यांच्यात संवाद नसे. दोन्ही संघटनांचे रीपोर्ट एकमेकाशी विसंगत, एकमेकाच्या विरोधात असत.  
वरील यंत्रणेत वरिष्ठ पातळीवरची हजारेक मंडळी सहज असतील. पण त्यांच्यात संवाद नसे. येवढंच नव्हे तर प्रत्येकाच अहं फार तीव्र होते, भांडणं होती आणि एकमेकांचे पाय ओढण्याचे उद्योग चालत. 
बुशना लोक काऊबॉय म्हणते. घोड्यावर स्वार. कंबरेला पिस्तूल. ते केव्हां बाहेर येईल आणि धाडधाड गोळ्या सुटतील ते सांगता येत नाही. अभ्यासाचं अंग बुशना नव्हतं.मूड, डोक्याचं  तपमान या नुसार निर्णय होत. मलिकी या माणसाला पंतप्रधान करायचा निर्णय कोणीतरी माणसानं त्यांच्या गळी उतरवला. मलिकीची काहीही माहिती बुशना नव्हती. आसपासच्या हजार माणसं, संसद इत्यादी गोष्टींना अर्थ उरत नव्हता. 
११ सप्टेंबरला हादरलेल्या बुशना वाटलं की बस इराकवर आक्रमण केलं पाहिजे. झालं. त्यांच्या मनात आलं. आक्रमण झालं.
इराक युद्धात ४५०० अमेरिकन सैनिक मेले. युद्धामधे खाजगी कंत्राटी सैनिकही होते. त्यांच्यापैकी ४००० जण मृत्यूमुखी पडले. शारिरीक आणि मानसिक जखमा आणि परिणामांचे शिकार किती आहेत? नेमका अंदाज येत नाही, लाखाच्या वर असू शकतील.
इराक युद्धावर एका टप्प्यावर अमेरिकेचा दोन ट्रिलियन डॉलर खर्च झाला. मेलेल्या अमेरिकन सैनिकांच्या नातेवाईकांना पुढलं काही वर्षं पेन्शन द्यावं लागणार आहे. जखमी झालेले, मानसिक स्वास्थ्य बिघडलेले यांच्यावरही पुढली काही वर्षं खर्च करावा लागणार आहे. हा खर्च ६ ट्रिलियन डॉलरच्या घरात जाईल.
बाप रे. 

कोणाच्या तरी मनात आलं, कोणाला तरी वाटलं म्हणून इतकी नासाडी?

2 thoughts on “बुश ब्लेअर विनाशक मनमानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *