पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

 पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण.
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारत पाक शांतता चर्चा तूर्तास स्थगित असल्याचं पत्रकारांना सांगितलंय. ९ नोव्हेंबर २०१५ साली ही चर्चा परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी सुरु केली होती. काश्मिरचा मुद्दा वगळून चर्चा होऊच शकत नाही;  बलुचिस्तानमधल्या बंडाला भारत चिथावणी देत आहे असे आरोप बासित यांनी केले. 
चर्चा स्थगितीचं तात्कालिक कारण होतं पाकिस्तानी टीमचा पठाणकोट दौरा.     पाकिस्तानी दौऱ्याच्या बदल्यात भारताचा दौरा असं काहीही ठरलेलं नव्हतं असं बासित म्हणाले.  
२०१५ च्या डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी कोणतीही पूर्वतयारी न करता नवाज शरीफाना भेटायला गेले. त्यानंतर आठवडाही झाला नाही तेवढ्यात जैशे महंमदनं पठाणकोटवर हल्ला केला.१९९९ साली नवाज शरीफ पंतप्रधान असतानाच पाकिस्तानी लष्करानं कारगीलवर हल्ला केला होता. पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांना पाकिस्तानात किमत नाही, तिथलं लष्कर आणि आयएसाय भारताबद्दलचे निर्णय घेते. पाकिस्तान जेव्हां शांतता स्थापण्याच्या गोष्टी करतं तेव्हां समांतर पातळीवर भारतावर हल्ला करण्याची तयारी करत असतं. कारगील, संसदेवरील हल्ला, मुंबईवरचा हल्ला ही ढळढळीत उदाहरणं आहेत. या अनेक घटनांमधे मसूद अझरचा सहभाग होता. 
नरेंद्र मोदीनी नवाज शरीफ यांना शपथविधीसाठी बोलावून घेतलं. नरेंद्र मोदी शरीफ यांना त्यांच्या घरच्या लग्नाच्या निमित्तानं लाहोरमधे भेटायला गेले. या घटना नाटकं असतात, ती कूटनीतीतली औपचारिकता असते. 
  पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पठाणकोटमधे पायघड्या घालून बोलावणं ही भारत सरकारची फार मोठी चूक होती. भारत सरकार भाबडं किंवा मूर्ख आहे; भारत सरकारकडं पाकविषयक ठाम धोरण नाही असा संदेश पाकिस्तानी पठाणकोट दौऱ्यानं दिला.
पठाणकोटच्या हवाईदलाच्या वस्तीत अनेक व्यवस्थांचा अभाव होता. सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. संरक्षक भिंतीही पुरेशा सुरक्षित नव्हत्या. वस्तीच्याभिंतीलगत झोपडपट्ट्या होत्या. हवाई दलाच्या वस्तीतल्या दुकानांत बाहेरच्या लोकांची भरपूर ये जा होती. सुरक्षा व्यवस्थेतही अनेक दोष आणि त्रुटी होत्या. हे सारं पाकिस्तानी टीमला प्रत्यक्ष पहायला मिळालं. ही सारी माहिती अर्थातच आयएसआयच्या वाटेनं जैशे महंमदला मिळणार.
पठाणकोट हल्ल्याचं नेतृत्व जैशे महंमदच्या मसूद अझरनं केलं होतं. दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत आल्यानंतर आपल्या टॅक्सीनं आतमधे आणणाऱ्या इकागर सिंगला पाकिस्तानातल्या बहावलपूरमधून फोनवरून बोलावण्यात आलं होतं. गुरदासपूरचे एसपी सलविंदर सिंग यांचा फोन दहशतवाद्यांनी हिसकून घेतला आणि त्यावरून बहावलपूरला फोन केले. दहशतवाद्यांना हाताळणाऱ्या लोकांशी या फोनवरून संभाषणं झाली. बहावलपूर हे जैशे महंमदचं एक महत्वाचं केंद्र आहे. दहशतवाद्यांपैकी किमान एकाचा ठावठिकाणा लागला होता. दहशतवाद्यांकडली शस्त्रं आणि इतर वस्तूवर पाकिस्तानी उत्पादकांचा वा व्यापाऱ्यांचा ठसा होता.
भारत सरकारनं हे सारे पुरावे पाकिस्तान सरकारपुढं ठेवले. अझर आणि जैशे महंमदच्या पुढाऱ्यांच्या आवाजाचे नमुने भारत सरकारनं मागवले. पाकिस्ताननं ते दिले नाहीत. अझरला पकडा अशी मागणी भारतानं केली. पाकिस्ताननं ती मान्य केली नाही. युनायटेड नेशन्सनं अझरला दहशतवादी जाहीर करावं अशी मागणी भारतानं केली. चीननं ती मागणी तांत्रिक कारणांसाठी धुडकावून लावली. कळस म्हणजे पाकिस्तानी चौकशी समितीनं पाकिस्तानात परतल्यावर माध्यमांना सांगितलं की पठाणकोट हल्ला एक भारतानं पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी केलेलं एक नाटक होतं. 
  पाकिस्तान भारताशी सुखाचे संबंध ठेवू इच्छित नाही हे पाकिस्ताननं जन्मापासूनच आपल्या वागण्यातून जाहीर केलेलं आहे. मसूद अझर हे पाकिस्तानच्या वागण्याचं एक प्रतिक आहे, अझर हा पाकिस्तानचा प्रतिनिधीच आहे.
कोण आहे हा मसूद अझर?
मसूद अझरला मोठ्ठा,  अनेक वळणांचा इतिहास आहे.
अझरचं जन्मवास्तव्य ठिकाण बहावलपूर. त्याचं जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचं मुख्य कामच जिहादी तयार करणं हे होतं. तय्यार झालेला अझर अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयनं उभारली होती. जिहादींचं खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी हर्कतुल मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अझर त्या संघटनेत सामिल झाला. ही गोष्ट १९८५ च्या सुमाराची. १९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यासारखं झाल्यानंतर जिहादींचं काय करायचं असा प्रश्न होता. आयएसआयनं त्यांना काश्मिरमधे कामी लावलं. काश्मीरमधे घातपात करायचे, काश्मिर भारतातून हिसकून घ्यायचं. या कामी अझरची नेमणूक करण्यात आली. अझरच्या काश्मिरात फेऱ्या सुरु झाल्या.
याच काळात अझर ब्रीटनसह अनेक देशांत दौरे करून जिहादसाठी पैसे गोळा करत असे. प्रत्येक दौऱ्यात तो स्पष्टपणे सांगत असे की काश्मिर मुक्ती आणि भारतविरोधी लढा यासाठीच जिहाद असेल, त्यासाठीच पैसे,शस्त्रं आणि जिहादींची आवश्यकता आहे.
 अझर काश्मिरमधे १९९४ साली पोचला. परदेशी लोकांचं अपहरण करून पैसे मिळवण्यासाठी त्यानं  अल फरहान नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापली. हॅन्स ख्रिश्चन ओस्ट्रोला अल फरहाननं ठार मारलं.   युनायटेड नेशन्सनं १९९७ साली हर्कतुल अन्सार संघटना दहशतवादी म्हणून जाहीर केली. अझरनं जुन्या  हर्कतुल मुजाहिद्दीन या नावानं उद्योग सुरु केले. १९९४ साली अझरला भारतीय पोलिसांनी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवलं.
१९९९ साली अझरचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर यानं योजनापूर्वक इंडियन एयरलाईन्सचं आयसी ८१४ विमान काठमांडूहून पळवलं आणि कंदाहारला नेलं.  
अपहरणकर्त्यांची मागणी मान्य करून  अझरला कोट भलवाल तुरुंगातून आयपीएस पोलिस अधिकारी एस पी वैद्य यांनी सोडवलं.  भारत सरकारचे मंत्री जसवंत सिंग अझरला सोबत घेऊन कंदाहारला पोचले. अझर कंदाहारमधून तडक पाकिस्तानात गेला. 
  अझर १९९९ साली पाकिस्तानात पोचल्या पोचल्या कराचीत गेला.सिंध, पंजाबमदे त्याच्या  सत्काराच्या सभा झाल्या. सभांमधे तो काश्मिर मुक्ती, भारताविरोधात आणि हिंदूंच्या विरोधात लढाईचं आवाहन करत असे.
१९९९मधे हर्कतुल मुजाहिद्दीन वर आरोप व्हायला लागल्यावर अझरनं आपल्या संघटनेचं नाव बदललं. नवं नाव जैशे महंमद.   १९९९ मधे जनरल मुशर्रफ यांनी देश ताब्यात घेतला होता. आयएसआय आता त्यांच्या हाताखाली आली होती. मुशर्रफ  जैशेला मदत करू लागले, त्यांचा वापर करू लागले.  
अझरनं काश्मिर विधानसभा, लोकसभा यावर हल्ले आयोजित केले. पठाणकोट हल्ल्याचाही तो सूत्रधार होता.असा दहशतवादी  अझर पाकिस्तानात  मोकाट असतो. आयएसआयच्या सांगण्यानुसार तो वागत असतो. 
अगदी परवापरवाची गोष्ट. अब्दुल रऊफ या अझरच्या भावानं इंडियन एयर लाईन्सच्या विमानाचं अपहरण घडवून आणलं होतं. हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गंभीर गुन्हा आहे. १९९९ पासून अब्दुल रऊफ फरार होता. भारतानं त्याला पकडण्याची खटपट केल्याची नोंद नाही. गेल्या आठवड्यात  विमान अपहरणाच्या आरोपाखाली चिली सरकारनं अटक केली.  
 बातमी बाहेर फुटायच्या आधीच भारत सरकारनं त्याच्या मुसक्या बांधून त्याला भारतात कां आणलं नाही? चिलीशी बोलून ते घडवता आलं असतं. मोदींच्या आंतरराष्ट्रीय राजकीय टुरिझमच्या यादीत चिलीचं नाव नसावं. पोलिस सध्या देशद्रोह्यांना शोधण्यात गुंतले असल्यानं पोलिसांनाही असल्या फालतू गोष्टीत रस नसावा. 
पक्षीय स्वार्थ, पक्षीय मर्यादा, पुढाऱ्यांची अकार्यक्षमता आणि अज्ञान, नोकरशाहीचा मद्दडपणा या पूर्वापारपासून चालत अलेल्या अडचणी दूर सारून भारतानं काश्मिर, पाकिस्तान आणि दहशतवाद या बद्दलचं एक राष्ट्रीय धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे.
।।
  पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारत सरकारचं धोरण काय आहे? धोरण कसं असायला हवं? 
पाकिस्तानचं भारताशी वागणं पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. पाकिस्तान तयार  होण्याच्या क्षणी पाकिस्तानी लष्करानं जिन्नांना न विचारता काश्मिरात अफगाण टोळीवाले घुसवले. या घटनेला जिन्ना यांनी आक्षेप घेतला नाही, पाकिस्तानी जनता किंवा राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला नाही. कारगील, संसदेवरचा हल्ला, मुंबईवरचा हल्ला हे सारे उद्योग आयएसआयनं दहशतवादी संघटनांचा वापर करून केलेले आहेत. पठाणकोट हल्ला हे त्यातलं अगदी ताजं उदाहरण.  
पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध नको आहेत. पाकिस्तानला भारताचं भलं झालेलं नको आहे. पाकिस्तानची सूत्रं ज्यांच्या हातात आहेत त्याना काश्मिर हिरावून घ्यायचाय आणि भारताला सतत रक्तंबंबाळ करायचं आहे.
पाकिस्तानावर राजकीय पक्ष आणि संसदेचं राज्य चालत नाही. लष्कराचं राज्य चालतं. लष्करही इस्लामवादी आहे, सेक्युलर नाही. लष्कर नॉन स्टेट अॅक्टर वापरून, खाजगी दहशतवादी गट तयार करून लढाया करतं. देशांतर्गत घटनाही दहशतवादी आणि अतिरेकी गटांच्या कलानं घडतात.  
लोकशाहीची जगाला समजतात तशी मुळं पाकिस्तानात रुजलेली दिसत नाहीत. पाकिस्तान अजूनही फ्यूडल आहे, त्याच्यावर कालबाह्य इस्लामी विचार आणि परंपरांचा प्रभाव आहे. ही स्थिती आहे तोवर  तो देश कधी सुधारेल असं वाटत नाही. 
दहशतवादाची वाट पाकिस्ताननं धरली आहे.
अशा स्थितीत पाकिस्तानशी संबंध कसे असावेत ?
वाटाघाटी वगैरे चालू ठेवाव्यात. पण त्यातून निष्पन्न निघेल हा भाबडेपणा त्यागावा.
पाकिस्तान हा एक समस्याग्रस्त न सुधारणारा शेजारी आहे असं लक्षात घेऊन त्या देशापासून चार हात दूर रहाण्याचं धोरण ठेवावं.  त्या देशाचा उपद्रव कमी कसा होईल याकडं लक्ष द्यावं.
पाकिस्तानचा मुख्य उपद्रव दहशतवादाचा आहे. दहशतवाद हे प्रकरण लष्कर आणि पोलिसांना हाताळता येत नाही. लष्कर आणि पोलिस या यंत्रणांची कार्यपद्धती आणि त्यांच्यावरची कायदेशीर बंधनं पहाता त्या दोन संघटना स्वतंत्रपणे  दहशतवादाचा मुकाबला करू शकत नाहीत. लढाईची वाट विसरावी. त्या वाटेनं पाकिस्तानचं काहीही होवो, भारताचं त्यात फार नुकसान होईल. शिवाय लष्करी लढाई करून दहशतवाद आटोक्यात येत नाही.
दहशतवादाचा सामना दहशतवादानं करता येत नाही.  जैशे महंमद आणि लष्करे तय्यबा पाकिस्तानातल्या अहमदी, शिया, ख्रिस्ती, हिंदू इत्यादी लोकांना जगू देत नाहीत. जैशे महंमद देवबंदी विचारावर आधारलेली आहे. देवबंदी लोक इतर सर्व इस्लामी गटांना गैरइस्लामी मानून त्यांचा नायनाट करू मागतात. तेव्हां जैशे महंमदला उत्तर देण्यासाठी जैशे महंमदची भारतीय वा हिंदू आवृत्ती काढणं उपयोगाचं नाही, ते  भारताची वाट लावतील. 
 दहशतवादी माणूस भारतात प्रवेश करणार नाही याची काळजी घेणं हा पहिला मुद्दा. कुंपण नसलेल्या भागातून दहशतवादी पठाणकोटमधे आले. सरहद्दीजवळचा भारतातला विभाग स्मगलिंग, गुन्हे यांनी व्यापलेला आहे. भारतीय पोलिस आणि प्रशासन त्या ठिकाणी भ्रष्टाचारात बरबटलेलं आहे. पोलिस आणि प्रशासन भ्रष्ट आहे कारण राजकीय पक्ष त्यांचा वापर करून घेतात, राजकीय पक्षांना सुशासनात रस नाही, त्यांना मतं मिळवून सत्तेत पोचणं आणि सत्तेत टिकणं यातच रस आहे. त्यामुळंच दहशतवाद्यांना तिथं सहज प्रवेश मिळाला.  दहशतवादाला भारतात थारा द्यायचा नसेल तर काय करावं लागेल याची कल्पना यातून यावी.
बाहेरून येणारे दहशतवादी असोत की देशातच दहशतवाद माजवणारे वा दहशतवादाला मदत करणारे असोत, त्याना भारतीय कायद्याची भीती वाटत नाही. गुन्हा तपासला जाणं, खटला होण, निकाल लागून शिक्षा होणं या गोष्टी भारतात होत नाहीत. झाल्या तर शिक्षा व्हायला वीसेक वर्षंही लागू शकतात. हे दहशतवाद्यांना माहित असल्यानं त्याना चिंता नसते.
कायदे करणारे विधीमंडळ सदस्य राज्यघटना आणि कायदे पायदळी तुडवतात. कायद्याचा अमल करण्याची जबाबदारी असणारे पोलिसच कायदे पाळत नाहीत.मग दहशतवाद्यांचं तर विचारालायचा नको. 
कायदे पाळले जातात, अमलात आणले जातात याची व्यवस्था भारतात व्हायला हवी.
भारतीय पोलिसांची, इंटेलिजन्सची यंत्रणा अपुरी आहे. माणसंही कमी आहेत. ती काम करतील याची खात्री नसते. या यंत्रणांच्या कामाच्या पद्धती व तंत्रज्ञानातही सुधारणांची आवश्यकता आहे. यंत्रणेतल्या त्रुटीमुळं  भारतात घराघरात काय चाललंय याचा अंदाज इंटेलिजन्सला येत नाही. इंटेलिजन्सही व्यावसायिक राहिलं नसून राजकीय झालं आहे. 
धर्म, पंथ, जात इत्यादी साऱ्या गोष्टी देशाच्या हितापेक्षा कमी महत्वाच्या असतात असं अजून भारतीय जनतेला पटलेलं नाही. पाकिस्तानविषयक प्रश्न हाताळण्यात ती एक मोठी अडचण आहे. 
पाकिस्तानचं काय होईल याची चिंता आपण करू नये. पाकिस्तान सुधारण्याचं उदात्त कार्य आपण करू नये. आपल्याच देशात अजून सुधारण्यासारख्या अनेक गोष्टी शिल्लक आहेत.
दहशतवादाला तोंड देण्याची तयारी आपण करावी. हेच पाकिस्तानविषयक धोरणाचं मुख्य सूत्र असावं.
।।

  

2 thoughts on “पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

  1. परवेज मुशरफने भारतात येऊन पत्रकात परिषद घेतली तेव्हा भारतीय पत्रकाराना त्यानी त्यात सहभागी होऊ दिले नाही.
    विमान अपहरण झाले तेव्हा भारताच्या ताब्यातील पाक दहशतवाद्याना आपले परराष्ट्र मंत्री विमानाने आपल्या सोबत कंदाहारला नेतात तेव्हाही मुर्खपणा केलाच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *