कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

आंद्रे वायदा (Andhrzej Wajda) या पोलिश चित्रपट दिद्गर्शकाचं ९ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी. वायदानं ४० पेक्षा जास्त चित्रपट केले. थिएटरही केलं. चित्रपट आणि थिएटर अशा दोन्ही ठिकाणी तो आलटून पालटून असे. २००० साली वायदाना मानद ऑस्कर मिळालं. त्यांच्या तीन चित्रपटांना ऑस्कर नामांकनं मिळाली.
  वायदाच्या  एका फिल्मचं नाव होतं अॅशेस अँड डायमंडस. पोलंडवरच्या नाझी सत्तेविरोधातल्या लढाईची पार्श्वभूमी होती. सिनेमाच्या शेवटल्या दृश्यात नाझींच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता कचऱ्याच्या ढिगावर मरून पडलाय. ही फिल्म दाखवण्यात आली त्या १९५८ सालात पोलंडमधे कम्युनिष्ट सत्ता होती. फिल्मा सेन्सॉर होत होत्या. शेवटल्या दृश्यातला मेलेला कार्यकर्ता कम्युनिष्ट होता. कम्युनिष्ट सत्तेनं अर्थ घेतला की नाझींविरोधात लढलेल्या कम्युनिष्ट कार्यकर्त्याला नाझींनी किती वाईट वागवलं पहा, त्याला मारून कचऱ्याच्या ढिगावर टाकला. पोलिश जनतेनं वेगळाच अर्थ घेतला. पोलिश कार्यकर्ता मेला खरा पण तो मरताना कम्युनिष्ट राजवट थंडपणे बघ्यासारखी दूर होती. पोलिश माणसं परस्पर मरत आहेत याचा रशियनांना आनंद होत होता.
१९५६ साली प्रदर्शित झालेल्या कनाल (Kanal) या पटाच्या शेवटचं दृश्यंही हेलावणारं होतं. नाझींच्य विरोधात १९४४ साली झालेल्या पोलिश उठावाची पार्श्वभूमी होती. उठावात भाग घेणारा माणूस शेवटल्या  दृश्यात नाझींकडून मारला गेलाय आणि गटारात पडलाय. पुन्हा तेच. कम्युनिष्टांना वाटलं की वायदा कम्युनिष्टांचं कौतुक करतोय, पोलिश जनतेला वाटलं की वायदानं खुबीनं कम्युनिष्टांचं क्रूर थंडपण दाखवलंय. पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचा प्रकार रशियन करत होते.
पोलंडच्या दुःखदायक इतिहासानं वायदा पछाडलेला होता. अठराव्या शतकाच्या शेवटाला पोलंडचे लचके शेजारच्या प्रशियन आणि रशियन साम्राज्यांनी तोडले. नंतर  पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात  नाझी जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया यांनी पोलंड परस्परात वाटून घेतला. दीडशे वर्षं परकीयांच्या टाचेखाली असलेल्या पोलंडला मोकळा श्वास घेता आला नाही हे सत्य वायदा मांडू शकत नव्हता कारण तो जगत होता, फिल्म करत होता तो काळही जर्मनी-रशियाच्या  टाचेखाली होता. दोन अर्थ निघणाऱ्या दृश्यांमधून प्रतिकात्मक दृश्यांमधून त्यानं पोलिश जनतेवरचे अन्याय दाखवले. अन्याय मग ते कोणीही  केलेले असोत. ग्लासातला मद्य एका पेटत्या काडीनं भडकतं हे प्रतिक वायदानं वापरलं.
फ्रान्स, जर्मनी, ब्रीटन, साऱ्या युरोपभर नव्या नव्या कल्पना आणि जीवनानंद दाखवणारे सिनेमे तयार होत असले तरी  तसे सिनेमे करण्याचं स्वातंत्र्य पोलिश चित्रपट जगाला नव्हतं, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनच सुरु झालेल्या नाझी-कम्युनिष्ट राजवटींमुळं. जर्मनी आणि सोवियेत रशियानं परस्पर मोलोटोव-रिबेनट्रॉप करारानं पोलंड वाटून घेतला होता. युरोपातली समृद्धी, संस्कृती दाखवणं म्हणजे न परवडणारी चैन होती.  
१९८०च्या दशकात पोलंडमधे सॉलिडॅरिटीचं आंदोलन सुरु झालं. लेक वालेसा पोलिश स्वातंत्र्याचे हीरो होते. वायदानं तो विषय कामगारांचं आंदोलन या रुपात दाखवला. वालेसाला कामगार पुढारी दाखवला. नंतर यथावकास वायदानं लेक वालेसा यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली आणि नंतर एक रीतसर चित्रपटही केला. 
वायदानं केलेले काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले. पोलिश संस्कृती आणि माणसं तपासण्याचा प्रयत्न साहित्य कृतींवर आधारलेल्या चित्रपटात वायदांनी केला. पोलिश माणूस  भ्रष्ट आहे, संधिसाधू आहे असं चित्रण काही चित्रपटात झालं. मूळ साहित्यकृती पोलिश संस्कृतीतले गुंते तपासत होती, पोलिस समाज परकीयांविरोधात कां लढू शकला नाही याचा वेध त्या साहित्य कृती घेत होत्या. वायदाचा प्रयत्न पोलिश जनतेच्या पचनी पडला नाही.
१९८९ मधे सोवियेत युनियन मोडलं. पोलंडमधली कम्युनिष्ट सत्ता नाहिशी झाली. तिथून पुढं वायदाला मोकळेपणानं सिनेमे करता आले.वायदाच्या मनात एक खोल जखम अनेक वर्षं ठुसठुसत होती. १९४० साली स्टालीनच्या आज्ञेवरून २२,००० पोलिश माणसांचे खून झाले. वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, सेनाधिकारी अशी पोलिश समाजातली महत्वाची माणसं स्टालीननं वेचून मारली. नेतृत्वच खलास केल्यानंतर पोलंड कधीही आपल्या विरोधात उभा रहाणार नाही अशी व्यवस्था स्टालिननं केली. कातिन या जंगलात नेऊन माणसं मारली. त्यात वायदाचे वडील याकुब होते. आंद्रे तेव्हा अगदीच लहान होते.   नाहिसे झालेले वडील हुडकण्यासाठी  आईनं केलेली वणवण वायदांच्या मनात रुतली. वडिलांच्या पश्चात आईनं संसार रेटण्यासाठी सोसलेले हास त्यांच्या मनात रुतले. कम्युनिष्ट सत्ता कोसळ्यावर वायदांनी कातिन (Katyn) याच नावानं फिल्म केली.
 कम्युनिष्ट पोलिस किती क्रूरपणे माणसं मारतात ते चित्रपटात फार प्रत्ययकारी रीतीनं दाखवलंय. बसमधून पोलिश माणूस उतरवला जाई. गळ्याभोवती वायर, वायरच्या  दुसऱ्या टोकानं हात पाठीमागं बांधले जात. पाठीमागून पोलिस गोळी झाडी. 
काही ठिकाणी खड्ड्याच्या काठवर माणूस उभा केला जाई. गोळी घातली की खाली जमा झालेल्या  प्रेतांवर तो पडे.
काही वेळा एका खोलीत गोळ्या घातल्या जात. गोळीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी आवाज करणारे पंखे लावले होते.
बसमधून उतरवलेल्या माणसाला आपलं नेमकं काय होणार आहे ते माहित नसे. आपल्याला दुसऱ्या एकाद्या छावणीत नेलं जातय असं वाटत असे.  हात मागं बांधून गुडघ्यावर बसायला सांगितल्यावर त्याला काय होणार आहे त्याची कल्पना येई.  क्रुसात गुंतवलेली जपमाळ तो माणूस बाहेर काढून मणी खेचायला लागे, तोंडानं प्रार्थना पुटपुटू लागे. मागं उभ्या असलेल्या रशियनांचे चेहरे कोरे. कोणताही भाव नाही. अगदी थंड. थंडपणे चाप ओढला जाई. मग पुढला माणूस. तोच थंडपणा. पुन्हा नवा माणूस. तोच थंडपणा.
खड्डा प्रेतांनी भरला की बुलडोझर त्यावर माती लोटे.
एका खड्ड्यात बुलडोझर माती लोटत असताना   माणसाचा जपमाळ धरलेला एक मनगटापर्यंतचा हात बाहेर रहातो. हात क्षणभर थरथरतो. माणूस आत जिवंत असावा. थरथर थांबते. वरून माती लोटली जाते.
गोळीबारासाठी सुरवातीला रशियन पिस्तुल वापरलं जाई. त्याचा दर्जा वाईट होता. गोळी सुटल्यावर पिस्तुल मागं झटका देई आणि त्याचा त्रास होई. पोलिसांनी जर्मन पिस्तुलं मागवली. लोण्यासारखी वापरता येत, गोळी मारणाऱ्याच्या मनगटाला जराही त्रास नसे.
एका पोलिसानं तीन हजार माणसं मारली म्हणजे पहा.
कातिनची सुरवात एका पुलावर होते. दोन्ही बाजूनी पोलिश माणसं आपली गबाळं आणि कुटुंब कबिला घेऊन दुसऱ्या टोकाला जातात. घोडागाडीत, कारमधे लादलेलं सामान आणि त्यावर बसवलेले म्हातारे कोतारे. गाडीसोबत चालणारी कुत्री आणि सायकलवर बसलेली छोटी मुलं. डावीकडली माणसं जर्मनांच्या कचाट्याबाहेर पडत होती आणि उजवीकडली रशियन कम्युनिष्टाच्या कचाट्यातून पळत होती. जर्मन विभागातली माणसं नंतर रशियनांच्या तावडीत. रशियन विभागातली माणसं जर्मनांच्या तावडीत.
वायदावर विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातल्या सिटिझन केन या कल्ट चित्रपटाचा प्रभाव होता. क्लोज अप्सचा वापर. प्रतिकांचा भरपूर वापर. अनेक ठिकाणी डॉक्युमेंटरी शैली. कातिन या पटात सुरवातीच्या काही मिनिटात एका छावणीचं दृश्य येतं. दृश्यात एका भिंतीवर एक तोडलेला हात लटकताना दिसतो. लक्षात येतं की तो हात माणसाचा नाही, एकाद्या प्रतिमेचा आहे. ही प्रतिमा ख्रिस्ताची असणार असं त्या हाताच्या रुपावरुन लक्षात येतं. ते लक्षात येईपर्यंत पुढल्या दृश्यात पांघरुणाच्या खाली एक दडलेलं शरीर असल्याचं दिसतं. एक डॉक्टर  आणि प्रीस्ट त्या शरीरापाशी उकीडवे बसलेले असतात. नायिका आपल्या नवऱ्याला शोधताना  ते शरीर आपल्याच नवऱ्याचं नाही ना हे तपासायला ती जाते, पांघरूण दूर करते. तर आतमधे ख्रिस्ताची मूर्ती असते. वर लटकलेला हात याच मूर्तीचा एक भाग असतो.
   रशियनांनी केलेल्या क्रूर अत्याचाराला पटामधे प्राधान्य नाही. ते अत्याचार पटाच्या शेवटल्या भागात दाखवले आहेत. सुरवातीपासून चित्रपटात रशियनांनी गायब केलेल्या अधिकाऱ्याची पत्नी, अधिकाऱ्याची बहीण आणि त्यांचे कुटुंबीय दिसतात. या माणसांची परवड, हाल,  सिनेमाभर पसरलेले आहेत. सिनेमाभर नाहिशा झालेल्या बावीस हजार माणसांची उध्वस्थ घरं दिसतात, सैरभैर माणसं दिसतात. जे मेले ते सुटले असं म्हणावं अशी स्थिती.
  २००० साली वायदांना   मानद मिळालं  त्या वेळी वायदांनी पंचाहत्तरीत प्रवेश केला होता.  बर्गमन, फेलिनी या थोर युरोपीय दिद्गर्शकांचा रांगेत वायदा यांना स्थान मिळालं. पण हा माणूस थांबायला तयार नव्हता. त्यांनी कातीन करायला घेतला. कातीनची पटकथा मनासारखी होईपर्यंत वायदा थांबले. २००७ साली कातीन प्रदर्शित झाला. २००८ सालच्या ऑस्करसाठी त्याला नामांकन मिळालं. काय गंमत आहे पहा. २००८ साली काउंटरफिटर या चित्रपटाला ऑस्कर मिळालं. काऊंटरफिटर या चित्रपटाची कथा आणि मांडणी वेधक होती. ब्रिटीश अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीनं पाऊंडाच्या खोट्या नोटा छापून ब्रीटनमधे पसरवायचं ठरवलं. त्याची गोष्ट काऊंटरफिटरमधे आहे. नोटा तयार करणारी माणसं छळछावणीतली होती. ती नकोशी झाल्यावर त्यांचे खून केले जात. ते खून थेट कातीन सिनेमातूनच घेतले आहेत असं वाटावं.  प्रमुख भूमिकाही छान होती. दोनमधला कोणता चित्रपट उजवा आहे ते ठरवणं तसं कठीणच होतं. वायदांचं ऑस्कर   हुकलं खरं.
युरोप, अमेरिकेत करोडो लोकांनी कातीन पाहिला. रशियात आणि चीनमधे या चित्रपटावर बंदी होती. कातीन हत्याकांड आपण केलं नाही असं रशियन सरकारनं जाहीर केलं. नाझींवर त्यांनी टेपर ठेवलं.  १९९० मधे गोर्बाचेव यांनी कबूली दिली होती हे रशियन सरकार विसरलं.   सुरवातीला नाझी सरकारनं कातीनमधे पुरलेली प्रेतं बाहेर काढली आणि प्रचार पटांमधून ते कांड रशियानं  केलं युरोपला सांगितलं. युरोपात कम्युनिझम विरोध फोफावत असल्यानं जर्मन प्रचाराला उठाव मिळाला. नंतर रशियनांनी तीच प्रेतं वापरून हत्याकांड नाझींनी केल्याचं दाखवणारे प्रचारपट तयार केले.  
कातीन या चित्रपटाची गणना आधुनिक क्लासिक चित्रपटामधे होते.
तर असा हा थोर चित्रपट निर्माता-दिद्गर्शक आता शिल्लक नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *