शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

ऊबर क्रांती।।
ऊबर टॅक्सी भारतात गाजली ती दिल्लीतल्या बलात्कार प्रकरणानंतर, एका ऊबर ड्रायव्हरनं बलात्कार केल्यानंतर. मुंबईत ऊबर गाजतेय ती त्या टॅक्सीला काळ्या पिवळ्या टॅक्सीवाल्यांनी केलेल्या विरोधामुळं.

ऊबर टॅक्सी एसी असते. सेल फोनवरून ती बोलावता येते. पूर्ण टॅक्सी वापरता येते किंवा इतर सहप्रवासी घेऊन ती स्वस्तात वापरता येते. ऊबर टॅक्स्यांची स्थिती चांगली असते. त्यामुळं मुंबईत ऊबर फार लोकप्रिय झाली. काळीपिवळीचे ड्रायव्हर नकार देतात. टॅक्सी बंद करायची वेळ झालीय, जेवायची वेळ झालीय,तुमच्या दिशेला मला जायचं नाहीये अशा नाना सबबी सांगून काळीपिवळी भाडं नाकारते. उबरच्या बाबतीत ते घडत नसल्यानं मुंबईचे नागरीक खुष आहेत.

ऊबर टॅक्सीनं एकूण सार्वजनिक प्रवासात क्रांती केलीय. २००९ साली स्थापन झालेली ही कंपनी जगभरच्या ४२५ शहरात टॅक्स्या फिरवतेय.ऊबरची बाजारातली किमत आता ७० अब्ज डॉलर झालीय.जगभर टॅक्सी व्यवसाय सुमारे १०० अब्ज डॉलरचा धंदा करतो. त्यातला बहुतांश भाग आपल्या खिशात घ्यायचा ऊबरचा विचार आहे. त्यासाठी ऊबर विविध नव्या तंत्रांचा वापर करतेय.

ऊबर काय करते? अगदी साधी गोष्ट ऊबरनं केलीय. उबरकडं न टॅक्सीची मालकी आहे ना पदरी बाळगलेले चालक. ऊबरनं चालक, वाहन आणि प्रवासी यांची गाठ घालणारं अप तयार केलंय. प्रवासी फोन करतो, टॅक्सी त्याच्या दारात पोचते. टॅक्सी चालवल्यानंतर लावलं जाणारं भाडं चालक, टॅक्सी मालक आणि ऊबर या तिघांत वाटलं जातं. मालकाला किंवा चालकाला चिंता नसते. त्यांना ऊबर गिऱ्हाईक आणून देतं. जीपीएस व इतर तंत्रंज्ञानं वापरून नकाशा, रस्ते इत्यादी सगळी माहिती ऊबर चालकाला पुरवते. चालक आणि प्रवासी यांची गाठही ऊबर घालून देतं. 


आज मुंबईत कित्येक सुखवस्तू माणसं स्वतःची कार न ठेवता ऊबर वापरतात. स्वतःच्या कारपेक्षाही चांगल्या स्थितीतली ऊबर वापरणं नागरिकाला सोयीचं जातं. चालक बाळगा, कार मेंटेन करा, पार्किंग शोधा, घराजवळ गाडी उभी करा इत्यादी भानगडीतून नागरीक मुक्त झाले आहेत. ऊबरची सोय अशीच वाढत गेली तर हज्जारो मुंबईकर कार विकत घेणार नाहीत, कार रस्त्यावर आणणार नाहीत. रस्त्यावरची गर्दी कमी होईल, मुंबईचं पर्यावरण कायच्या कायच शुद्ध होईल.

ऊबरची पुढची वाटचाल चालकविरहित टॅक्सीच्या दिशेनं आहे. टेक्सला, गूगल इत्यादी कंपन्या चालकाशिवाय चालू शकेल असं तंत्रज्ञान तयार करत आहेत. ते तंत्रज्ञान आता नव्वद टक्के तयार झालं आहे. कारमधे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळं कार रस्त्यावरचे सर्व अडथळे लक्षात घेऊन मार्गक्रमण करते. खड्डे, अचानक रस्ता ओलांडणारी माणसं, रस्त्यावर येणारी जनावरं, अचानक ब्रेक लावणारे समोरचे चालक इत्यादी संकटंही वरील तंत्रज्ञान पार पाडतं. थोडक्यात म्हणजे कारच्या समोर, मागं आणि दोन्ही बाजूला असणाऱ्या वस्तूंची दखल घेऊन कार मार्गक्रमण करते. अशा कार सध्या प्रयोग म्हणून जगात काही रस्त्यांवर चालत आहेत आणि त्यांना अपघात झालेला नाही. आज घडीला या कारना सरकारांनी परवानगी नाकारली आहे. हे तंत्रज्ञान विकणाऱ्या कंपन्यांनी पर्यायी सुरक्षा व्यवस्था म्हणून चालकही कारमधे बसवला आहे. तो करत काहीही नाही, नुसता बसून रहातो जेणेकरून एकादं संकट आलं तर तो कारचा ताबा घेऊ शकतो. प्रयोग संपतील, तंत्रज्ञान परिपूर्ण होईल तेव्हां वरील पर्यायी चालकाशिवाय कार चालवायला सरकारं परवानगी देतील अशी त्या कंपन्यांची अपेक्षा आहे.

कार उत्पादक केवळ कारचं उत्पादन करतात. त्या कारचं रस्त्यावर काय होतं या बद्दल ना त्यांना माहिती असते ना चिंता. टेक्सला, गुगल, अपल या कंपन्या कार आणि रस्ता यांची सांगड घालत आहेत. शहरातल्या रस्त्यांची स्थिती, कुठल्या रस्त्यावर किती गर्दी आहे किंवा वाहतुक तुंबली आहे याची माहिती अप कंपन्या संकलित करत आहेत. अमूक रस्ता तुंबला असेल तर त्याला पर्यायी रस्ता कुठला इत्यादी माहितीही अपवर उपलब्ध करून दिली जाईल. ही माहिती सार्वजनिक बसेससाठीही उपलब्ध असेल. परिणाम असा की बसेस आणि टॅक्सी मिळून प्रवास हे प्रकरण जवळपास पूर्णतया हाताळतील. सेल फोनवर प्रवाशाला कळेल की कोणती बस घरापासून किती अंतरावर आहे आणि किती मिनिटात ती घराजवळच्या स्टॉपवर पोचू शकेल. घरापासून ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी पोचण्यासाठी किती वेळ लागेल आणि किती पैसे खर्च होतील याचाही अंदाज सेलवरून प्रवाशाला मिळेल. पर्याय म्हणून टॅक्सीसुद्धा उपलब्ध असेल. टॅक्सीमधेही साधी आणि मर्सिडीझ-बीएमडब्ल्यू अशी विविधता माणसाला उपलब्ध असेल. प्रतिष्ठितानं जादा पैसे देऊन मर्सिडीझ वापरावी साध्या माणसानं मारुती वापरावी.

आज खाजगी कार उभी करण्यावर शहरांतला फार पैसा खर्च होतो. जसजशी शहरं वाढू लागली आहेत तसतशी जागा कमी पडू लागल्यानं कार उभी करण्यासाठी फार पैसे नागरिकाला मोजावे लागतात. सिंगापूर, हाँगकाँगमधे कार उभी करण्याची व्यवस्था ज्यांच्याकडं आहे त्यांना श्रीमंत आणि भाग्यवान मानलं जातं. स्वयंचलित कार आणि बसेस सुरु झाल्यावर कार उभी करण्याचा प्रश्न सुटेल आणि त्या जागा उद्यानं, करमणूक, व्यायाम इत्यादी गोष्टींसाठी वापरता येतील. शिवाय पर्यावर शुद्ध होईल ते वेगळंच.

आता ऊबर हे नाम म्हणून न वापरता क्रियापद म्हणून वापरलं जातय. चला ऊबरगिरी करूया असं लोक म्हणू लागलेत. कार उत्पादक उद्योगावर ऊबरगिरीचा परिणाम होईल. कारचं उत्पादन काही प्रमाणात कमी होईल, बशींचं उत्पादन वाढेल. कार आणि बस उत्पादकांना नवं तंत्रज्ञान आणि अप त्यांच्या वाहनांत बसवावं लागेल. येव्हाना त्यांनी त्या बदलाची पूर्वतयारी केलीही असेल.

2 thoughts on “शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *