वैदिक प्रकरण
वैदिक हे गृहस्थ पाकिस्तानात गेले होते. एका शिष्टमंडळाबरोबर. शिष्टमंडळासोबतचं जे काही काम होतं ते झाल्यावर ते स्वतंत्रपणे हफीझ सैद या दहशतवादी पाकिस्तानी माणसाला भेटले. मुंबई, काश्मीर इत्यादी ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधे त्यांचा हात होता. एकेकाळच्या लष्करे तैयबा आणि आताच्या जमात उद दवा या दशहतवादी संघटनेचे ते निर्माते आहेत. त्यांच्याशी वैदिक काही तरी बोलले. ते प्रसिद्ध झालं, त्या बद्दल वैदिक यांनी काहीही लिहिलेलं नाही ते फक्त प्रतिक्रियेच्या स्वरूपात माध्यमांसोर बोलत राहिले. ते जे काही बोलले ते क्षुल्लक होतं, निरर्थक होतं. आपला भारतावरील हल्ल्यात हात नव्हता, मोदी यांचं आपण स्वागत करू वगैरे.
वैदिक हे पत्रकार आहेत. त्यांचं म्हणणं असं की ते काँग्रेसच्या जवळ आहेत, नरसिंह राव यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. त्यांचा रास्व संघाषी, संघानं उभ्या केलेल्या दिखाऊ संघटनांशी त्यांचा संबंध आहे, ते बाबा रामदेव यांच्याही निकटवर्ती आहेत असं प्रसिद्ध झालं आहे. वैदिक असं म्हणतात की ते मार्क्स आणि रुसो यांच्या सारखे, त्या वर्गातले विचारवंत आहेत.
त्यांच्या एकूण वर्णन आणि वर्तनावरून ते एक संमिश्र माणूस दिसतात. वर्तमानपत्रात लिहिणं या अर्थानं ते पत्रकार आहेत. पत्रकारी करत असतानाच त्यांची राजकीय पक्षात, सामाजिक संघटनात ऊठबस असते. सामाजिक-राजकीय विचार आणि पत्रकारी अशा दोन गोष्टी ते करत असतात. त्यामुळं ठामपणाने ते राजकारणी आहेत असंही म्हणता येत नाही आणि पूर्णपणे पत्रकार आहेत असंही म्हणता येत नाही.
सैद यांची भेट ते घेऊ शकले याचा अर्थ उघड आहे की त्यांना पाक सरकार, आयएसआय या संस्थानी परवानगी दिली, मदत केली. लष्करे तैयबा ही संघटना आयएसआयनं उभी केली वापरली हे आता सिदध झालेलं आहे. अफगाण लढाईसाठी अमेरिकेकडून आलेला पैसा आणि शस्त्रं आयएसआयनं भारताविरोधात वापरण्यासाठी लष्करची निर्मिती केली होती हे सिद्ध झालंय, त्याचे असंख्य पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालेले आहेत. भारतविरोधी मोहिमेसाठी ही जिहादी संघटना उभी करण्यात आली आहे. सैद पाकिस्तानात उघडपणे फिरत असतात. त्याना आणि त्यांच्या दहशतवादी संघटनाना प्रसिद्धी हवीच असते. त्यामुळं आयएसआयनं आनंदानं वैदिकांची भेट घडवून आणली.
या भेटीमागं भारत सरकार आहे काय? तसा निश्चित पुरावा नाही. या पाठी संघ परिवार आहे काय? तसा पुरावा सापडत नाही. संघाची कामाची पद्धत पहाता ते शक्यही आहे आणि तसं न घडल्याचीही शक्यता आहे. एका अपरिपक्व आचरट माणसानं काही तरी उद्योग केला असं घडलं असण्याचीही शक्यता आहे. संघ किंवा भारत सरकारनं  काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी,  पाकिस्तानशी पाठल्या दारानं संपर्क ठेवण्यासाठी वैदिक यांचा आडवाट प्रयत्न केला काय? तसे प्रयत्न जगात अनेक वेळा झालेले आहेत. तसं घडलं असेल तर ते कदाचित आणखी काही वर्षांनी उघड होईल, आताच कळणार नाही. परंतू समजा संघ किंवा सरकारनं तसा प्रयत्न केला असेल तर ते हास्यास्पद म्हणायला हवं. कारण वैदिक हे गृहस्थ उठवळ आहेत, त्या लायकीचे नाहीत. या विषयावर त्यांनी गंभीर अभ्यास केला आहे, काही संशोधनात्मक काम केलेलं आहे असं दिसत नाही. ज्या माणसाला वजन नाही आणि धड डोकंही नाही अशा माणसाचा उपयोग कूटनीती कामासाठी करणं हे मूर्खपणा, अपरिपक्वतेचं लक्षण मानता येईल.
राजकीय पक्षांचं वर्तन? सैद या माणसाला भेटणं हा देशद्रोह आहे असं शिवसेनेचं म्हणणं दिसतंय. सेनेची भृूमिका अपरिपक्व आणि चुकीची आहे. पत्रकार किंवा कोणीही अभ्यासाठी, माहिती काढण्यासाठी, आपली समजुत चांगली करण्यासाठी भेटणं यात गैर नाही. वैदिक समजा शस्त्रं-पैसा-रणनीतीविषयक माहितीची देवाण घेवाण करण्याासाठी गेले असतील तर मात्र तो गुन्हा ठरेल. त्याची चौकशी करायला हरकत नाही आणि त्यात जर ते दोषी आढळले तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई हवी. पण त्यातलं काहीही घडलेलनं नसतांना केवळ सैदची भेट घेतली म्हणून निषेध करणं, कारवाईची मागणी करणं बरोबर नाही.
बाकीच्या राजकीय पक्षांनी दिवस भर संसदेचं कामकाज बंद पाडणं अयोग्य आहे. संसदेसमोर, देशासमोर किती तरी प्रश्न प्रलंबित आहेत. जमीन अधिग्रहणाचा कायदा होतोय. त्यात खाचाखोचा आहेत. गंभीरपणे त्या खोचा चर्चेत घेतल्या पाहिजेत. नृपेन मिश्र यांना थेट ट्रायमधून सरकारमधे घेणं घातकच आहे. जनरल व्हीके सिंग सरळ सेनापतीपदावरून भाजपच्या वाटेनं लोकसभेत दाखल झाले. मुंबईचे कमीशनर सत्यपाल सिंगही तसेच. हा पायंडा चुकीचाच आहे. अशानं सर्व सरकारी अधिकारी निवृत्त होण्याच्या सुमाराला राजकीय पक्षांकडं जाण्यासाठी फील्डिंग लावतात आपले निर्णय राजकीय पक्षाला उपकारक ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकानेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर समतोल, अभ्यासपूर्ण भूमिका घ्यायचं सोडून वैदिक प्रकरणावर इतका वेळ खर्च करण्याची जरूर नव्हती. वैदिक यांनी देशद्रोहासारखं काही केलेलं नाहीये याची चौकशी करावी अशी मागणी नोंदवून पुढं सरकता आलं असतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *