vying for allah vote

vying for allah vote

एक पुस्तक नुकतंच वाचलं. vying for alla’s vote.
पाकिस्तानच्या राजकारणाचा अभ्यास करणारं.
 जिथं धार्मिक माणसं जास्त असतात तिथले राजकीय पक्ष धर्माचा वापर, धार्मिक मूल्यं आणि प्रतिकं यांचा वापर मतं मिळवण्यासाठी करतात. ते आजवरचा इतिहास पहाता अटळ दिसतं. परंतू असा वापर अतिरेकी-दहशतवादी संघटनांना जन्म आणि अन्नपाणी देऊ शकतो हे पाकिस्तानात सिद्ध होत आहे. पाकिस्तान आज एका विभाजक रेषेवर उभा आहे. दहशतवादी विचार आणि संघटना देशाचा आणि समाजाचा ताबा घेऊन लोकशाही-मोकळेपणा संपवू शकतात. किंवा लोकशाही आणि आर्थिक गरजा यांचा परिणाम म्हणून अतिरेकी धर्मवादी संघटना वेसणीत येऊन लोकशाही चौकटीत सामावून घेतल्या जाऊ शकतात. पाकिस्तान त्या बाजूला जाईल की या बाजूला हे पुढल्या काही वर्षात सिद्ध होईल.
लोकशाहीचे नाना अर्थ लावले जातात. लोकशाही आणि सेक्युलरिझम या गोष्टी एकत्र असतात असं काही लोक मानतात. परंतू सेक्युलरिझम नव्हे तर धर्म आणि लोकशाही एकत्र नांदू शकतात असं काहींचं मत आहे. धर्म आणि सरकार यात अभेद्य भिंत असायलाच हवी असं इस्लाम आणि हिंदू विचारात मानलं जात नाही. धर्म आणि राजसत्ता यांचा संबंध तोडणारा विचार पश्चिमेत झाला, आशिया-आखाती देश इत्यादी ठिकाणी जिथं इस्लाम आणि हिंदू धर्म, परंपरा, विचार आणि संस्कृती प्रचलित आहेत तिथं पश्चिमी विचार बहुसंख्य जनतेनं मानलेला नाही.
पाकिस्तानात त्यामुळंच धर्म, लोकशाही या दोन क्षेत्रांच्या सीमांबद्दल विचार चालला आहे, इस्लामी संघटना लोकशाही मानायला तयार नाहीत. त्यांच्या मते धर्म ही गोष्ट जीवनाच्या सर्व अंगांचा विचार करणारी असल्यानं लोकशाही आणि राजसत्ता धर्मापासून वेगळी असण्याची आवश्यकता नाही. परंतू निवडणूक, संसद या गोष्टी एक तडजोड म्हणून इस्लामी संघटना स्वीकारायला तयार आहेत.
एकूणात धर्म, संस्कृती, लोकशाही, मोकळेपणा इत्यादी गोष्टींवर आशियात, धर्मप्रधान समाजात बराच विचार चालला आहे. पीपल्स पार्टी आणि नवाज मुस्लीम लीग हे दोन लोकशाहीवादी पक्ष आणि जमाते इस्लामी इत्यादी इस्लामी राजकीय संघटना आपापले अजेंडे रेटत या विषयाला तोंड फोडत आहेत.
या विषयावर वाचलेल्या पुस्तकाचा परिचय महाराष्ट्र टाईम्समधे मी करून दिला होता.
तो खालील प्रमाणं

VYING FOR ALLAH’S VOTE
UNDERSTANING ISLAMIC PARTIES, POLITCAL VIOLENCE AND
EXTREMISM IN PAKISTAN
HAROON ULLAH  GEORGETOWN UNIVERSITY
PRESS
272 पानं.
माध्यमात डोकावून पहा. पाकिस्तानात दर आठवड्यात कुठं तरी स्फोट झालेला
असतो, कुठ तरी दंगल झालेली असते, कुठं तरी खून झालेला असतो. या स्फोटात एकादी
अतिरेकी धार्मिक संघटना गुंतलेली असते. मग ती लष्करे जांघवी असेल, लष्करे तय्यबा
असेल, तहरिकी तालिबान पाकिस्तान असेल किंवा एकादी स्थानिक नव्यानं स्थापन झालेली
संघटना असेल. कधी शियांना मारलं जातं, कधी अहमदिया पंथाच्या
लोकांना. गेले दोन अडीच महिने खैबर पख्तुनख्वा या अफगाण सीमेला लागून असलेल्या
विभागात पाक लष्करानं कारवाई आरंभली आहे, त्यात हजारभर तरी अतिरेकी इस्लामवादी
मारले गेले आहेत. ही कारवाई आणि 2011 मधे पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांचा
त्यांच्याच सुरक्षा रक्षकानं सत्तावीस गोळ्या घालून केलेला खून या दोन घटना
पाकिस्तानातलं वातावरण स्पष्ट करतात.तासीर यांना शरीयाविरोघी वर्तन, धर्मनिंदा
करणं या नावाखाली मारण्यात आलं.
अतिरेकी इस्लामी संघटनांनी पाकिस्तानचा ताबा घेतला आहे.  जमाते इस्लामी आणि जमियते उलेमाए पाकिस्तान या
इस्लामी राजकीय संघटनांचा या अतिरेकी कारवायांना छुपा पाठिंबा असतो.  पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान-पीपीपी- आणि
पाकिस्तान मुस्लीम लीग ( नवाज) हे पक्षही निवडणुकीत  वरील पक्षांशी संगनमत करतात. गेली पाच वर्ष
सत्तेत असलेले आणि पुन्हा निवडून आलेल्या नवाज शरीफनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत
तहरीके तालीबान या अतिरेकी संघटनेचा पाठिंबा मिळवला होता, त्या संघटनेकडून पैसे
आणि अभय मिळवलं होतं. थोडक्यात असं की पाकिस्तानात जी काही लोकशाही आहे, ज्या काही
निवडणुका होतात त्यात इस्लामी संघटना ( अतिरेकीही) आणि पक्ष यांचा वाटा असतो.  पाकिस्तानात धर्म-अतिरेक-लोकशाही यांचं एक
मिश्रण आहे. लोकशाही इस्लाम यांची सांगड घालायचा प्रयत्न पाकिस्तानात चाललेला आहे.
या घटनेचा आणि प्रक्रियेचा अभ्यास लेखकानं पुस्तकात केला आहे. लेखक
राज्यशास्त्राचा प्रोफेसर आहे आणि पाकिस्तानातल्या अमेरिकी राजदूतांच्या सल्लागाराच्या
टीममधे त्यानं काम केलं आहे.  सिद्धांत आणि
जमिनी वास्तव दोन्हींचा दाट परिचय लेखकाला आहे.
लेखकाचं म्हणणं असं की ज्या देशात माणसं फार धार्मिक असतात तिथं राजकीय
पक्षांना धार्मिक आवाहन करून, लोकांच्या हळव्या धार्मिक भावनेला जोजवून पुढं जावं
लागतं. पीपीपी हा पक्ष समाजवाद आणि समता मानणारा असला तरी पदोपदी इस्लामचीच भाषा
करतो. नवाज यांची मुस्लीम लीग आर्थिक विकासाला प्राधान्य देणारी   असली तरीही त्याला शरीयाची भाषा करावी लागते,
प्रत्येक निवडणुकीत इस्लामी पक्षांना सोबत ठेवावं लागतं. इजिप्त, तुर्कस्तान
इत्यादी देशांतही तसंच घडतं. त्यातून अतिरेकी इस्लाम फोफावतो, तो एक दुष्परिमाम
जरूर आहे, परंतू धर्माचा पगडा असणाऱ्या देशातलं ते न टाळता येणार वास्तव आहे.
यातून भविष्यात कधी तरी इस्लामी अतिरेक क्षीण होऊन लोकशाही वाढेल की लोकशाही
संकुचित होऊन इस्लाम वाढेल ते सांगता येत नाही.
लेखकानं या पुस्तकात पाकिस्तानातल्या राजकीय पक्षांचा इतिहास आणि त्यांची
आजवरची निवडणुकीतली कारकीर्द तपशीलवार मांडली आहे.
लोकशाही विचार आणि इस्लाम यातल्या नात्याला लेखकान ओझरता स्पर्श केला आहे.
लोकशाही आणि सेक्युलरिझम या मुद्द्यांनाही जाता जाता स्पर्श केला आहे. इस्लाम,
लोकशाही आणि सेक्युलरिझम हे आज इस्लामी जनता आणि एकूणच जग यांच्या दृष्टीनं फार
महत्वाचे, भविष्याबद्दल चिंता निर्माण करणारे विषय आहेत. पुस्तकाच्या मुख्य
विषयाभोवती फिरण्याच्या व्यावसायिक शिस्तीमुळं लेखकानं वरील विषयांचा उल्लेख केला
आहे, चर्चा केलेली नाही.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही समाजात, देशात, लोकशाही परंपरांत खूप फरक
आहेत. त्यामुळं या दोन लोकशाह्यांत फार जपून तुलना करावी लागते. परंतू धर्माला,
धार्मिक भावना आणि परंपरांना, धार्मिक प्रतिकांना निवडणुकींत मिऴणारं स्थान ही
घटना जगभर लक्षात घेण्यासारखी आहे. धर्म, संस्कृती यातल्या संबंधांचा राजकारणात
होणारा वाढता वापर घातक रूप धारण करतो आहे ही गोष्ट हे पुस्तक वाचतांना छळू लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *