मुझूफ्फरनगरला गेलो होतो.
दिल्लीहून मुझफ्फरनगरमधे जाणं हे एक 
दिव्य असतं. अत्यंत घाण बसेस. सिटाही जागेवर  नसतात, टायरवर बसावं लागतं. रस्ते खराब. वाटेत
नाना प्रकारची वाहनं उलट सुलट बाजूनं मनास वाटेल तशी फिरतात. परिणामी वाहतुक
तुंबा. एका ठिकामी मी दोन तास अडकून पडलो होतो. त्या वेळी वाहनांच्या दंगलीमुळं
धुळीचे लोट वाहत होते. ती धूळ आसपासच्या रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांवर बसत होती.
धूळ आणि माशा यांच्यात स्पर्धा चालली होती. मुझफ्फरनगर आणि आसपासची गावंही अस्वच्छ
आणि  साधनहीन दिसतात.
  1980च्या 
आसपास मी मेरठ आणि मुझफ्फऱनगरमधे चौधरी चरणसिंगांची निवडणुक कव्हर करायला
गेलो होतो. त्या वेळचा बस प्रवास आणि रस्ते अजूनही तसेच.
 खूप लोकांशी बोललो. हिंदू आणि
मुस्लीम. फेरीवाला, छोटा दुकानदार, धाबा चालवणारा, सायकल रिक्षा चालवणारा, डॉक्टर,
वकील, शिक्षक, भणंग असे अनेक भेटले.
दंगलीचे वृत्तांत ऐकले. अंगावर काटा आला. दोन्ही समाजातल्या लोकांनी
एकमेकांविरोधात आरोप केले. परंतू भेटणाऱ्या बहुतांश लोकांनी सांगितलं की ही दोन
समाजांमधली जातीय दंगल नव्हती, ही दंगल राजकीय पक्षाच्या लोकांनी घडवून आणली होती.
हिंदू आणि मुसलमानांमधे तणाव होते. ते तसे नेहमीच असतात. परंतू दोन्ही
समाजातली माणसं एकमेकांवर अवलंबून असतात. एका शिवाय दुसऱ्याचं चालत नाही. कोणताही
सामाजिक-आर्थिक व्यवहार दोन्ही समाजाची माणसं एकत्र आल्याशिवाय होत नाही. दंगली
चिथावण्यात भाजप, काँग्रेस आणि समाजवादी नेत्यांचा हात होता याची उदाहरणं लोकांनी
सांगितली.
जशी मुसलमानांची मतबँक आहे तशाच मतबँका हिंदूंच्या  आणि हिंदूंमधल्या जातींच्या आहेत. एकूण सारे
हिंदू एकत्र करून मोठी हिंदू बँक करायचा भाजपचा प्रयत्न आहे. दलित आणि मागासांची
बँक तयार करण्याचा बहुजन समाज पक्षाचा प्रयत्न आहे. दंगल झाली ती निवडणुकीच्या
उंबरठ्यावर. भाजपनं जाटांची बँक हिंदू बँकेमधे विलीन करून दंगलीला चिथावणी दिली.
समाजवादी आणि काँग्रेस पक्षानं मुसलमानांची बँक या निमित्तानं मजबूत करण्याचा
प्रयत्न केला. मधल्या मधे बहुजन समाजानं तूर्तास आपली बँक हिंदू बँकेला आऊट
सोर्सम्हणून वापरू दिली.
दंगल झाली ती प्रामुख्यानं जाट आणि मुसलमानांमधे. दोघांचाही काय फायदा
झाला?
  जमीन चिबड झाल्यानं उसाची उत्पादकता घसरली आहे
आणि याच जिल्ह्यात पाण्याच्या तुटवड्यामुळंही उसाचं दर एकरी उत्पादन घसरतं आहे. उद्योग
नाही,शेतीही कठीण. परिणामी जाट शेतकरी त्रस्त आहेत.  दंगलीनं त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.
मुसलमान अल्पभूधारक आहेत. त्यांच्यात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. परिणामी
त्यांची स्थिती दरवर्षी बिघडत चालली आहे. त्यांना या दंगलीतून काय मिळालं?
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर मुझफ्फऱनगरमधे मतबँकांचं राजकारण सर्व
पक्षांनी केलं. निवडणुकीच्या आसपास दंगली घडतात. सरकार मग ते कोणाचंही असो, गप्प
रहातं. माणसं मरतात. घरं उध्वस्थ होतात. काही काळ जातो. माणसं पुन्हा हाताशी जे
शिल्लक उरतं त्यामधे जगणं सुरु करतात.

कशी वाट निघणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *