एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.

एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.

एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.
।।
मार्जिनल रेवोल्युशन युनिवर्सिटी या नावाची एक विश्वशाळा कॅनडात आहे. ही विश्वशाळा अर्थशास्त्र विषय शिकवते. अनेक पाठ्यक्रम ही विश्वशाळा ऑन लाईन शिकवत असते. अनेक विषय, भाषणं या विश्वशाळेनं युट्युबवर टाकलेली आहेत. कोणीही वाचावं, अभ्यास करावा. ही विश्वशाळा  प्रचलित  अर्थविचार आणि विचारवंत विद्यार्थ्यांसमोर, साऱ्या जगासमोर ठेवत असते. अलेक्स टेबेरॉक यांनी ही विश्वशाळा २०१२ मधे स्थापन केली. स्वतः टेबेरॉक शिकवतात, लिहितात.
अभ्यासक्रमात अर्थविचारात गुंतलेले मुद्दे नाना तऱ्हेनं वाचकांसमोर ठेवले जातात. काही दिवसांपूर्वी मणीरत्नमच्या गुरु या सिनेमाचं परिक्षण टेबेरॉक यांनी लिहिलं. २००७ सालच्या  गाजलेल्या फिल्मचं परीक्षण  २०१६ सालातल्या मे महिन्यात. 
टेबेरॉक यांचं म्हणणं असं की गुरु हा  बिझनेस आणि मुक्त अर्थ-बाजारव्यवस्था या आधुनिक तत्वांचा पुरस्कार करणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतला  पहिला चित्रपट आहे. परीक्षणात ते वरील मूल्यांचा मुददा मांडतातच पण त्या बरोबरच गुरुकडं एक चांगली फिल्म म्हणून पाहिलं पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. आयन रँडच्या फाऊंटनहेड या कादंबरीतल्या, त्याच नावाच्या  चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेशी गुरु या चित्रपटाचं साम्य आहे असं टेबेरॉक म्हणतात.
काय गंमत आहे पहा. भारतीय माणसांनी गुरु एक  बॉलीवूड फिल्म, एक छान करमणूक म्हणून पाहिली.एका अमेरिकन अर्थशास्त्र प्राध्यापकाला गुरु या फिल्ममधे मुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश सापडला. भारतीयाना गुरूमधे पुसटसा धीराभाई अंबाणी दिसला, अमेरिकन माणसाला त्यात आयन रँडनं रंगवलेली एक भूमिका दिसली.
गुरु हा चित्रपट खूप गाजला. दोन कारणांसाठी. एक कारण म्हणजे तो सैलपणे धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारलेला आहे अशी समजूत. दुसरं कारण म्हणजे मणीरत्नम या दिद्गर्शकाचं देखणं कर्तृत्व.
धीरूभाईंचं चरित्र, चारित्र्य आणि त्यांच्या वागण्यातून बाहेर येणारा मुक्त बाजारवाद या बद्दल माणसांची अनेक मतं आहेत. अंबाणी आणि त्यांचा उद्योग समूह आजही नैतिक, कायदेशीर कारणांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. 
दिद्गर्शक मणीरत्नम यांचा भर अंबाणीच्या राजकीय, आर्थिक कर्तृत्व वा विचारांवर नाही. गुरू हा अंबाणींवरचा चरित्रपट नाही. 
मणीरत्नम यांना स्वतःचा स्वतंत्र राजकीय विचार असणं शक्य आहे. परंतू चित्रपट करतांना ते एक दिद्गर्शक असतात. अर्थात हेही खरं की एकाद्या निर्मात्यानं अंबाणींवर चरित्रपट करायला सांगितलं तर ते तसा चित्रपट त्यांच्या पद्धतीनं करतीलही. परंतू गुरु हा चित्रपट मणीरत्नम त्यांनी चरित्रपट म्हणून केलेला नाही. अंबाणी यांची सावली पडलेलं एक कथानक त्यांनी तयार केलंय. अंबाणी यांची आठवण मधे मधे यावी अशी तजवीज मणीरत्नम यांनी केलीय.
गांधी हा गांधीजींवरचा चरित्रपट होता. जब्बार पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर चरित्रपट केला. चरित्रपट करत असताना नाना अडथळे येतात. नायकाच्या जीवनातल्या वादग्रस्त, नेगेटिव गोष्टीं चितारायचा तर जनता खवळते आणि  टाळल्या तर समीक्षक खवळतात. अटेनबरा आणि पटेल यांनी मधला मार्ग काढला. सरकार या  चित्रपटात गुन्हेगारी जग आहे, गुन्हेगारी जग आणि राजकीय पुढारी यांच्यातले संबंध चित्रपटात आहेत. बाळ ठाकरे यांच्या लकबी वापरून नांगरे हे पात्र दिद्गर्शकानं उभं केलं म्हणून सरकार हा सिनेमा ठाकरे यांचा चरित्रपट झाला नाही.
 चित्रपटात आकारानं मोठी, गुत्याची, मोठं कर्तृत्व असणारी भूमिका मध्यवर्ती असली की प्रेक्षक खुष होतात. सेनापती, उद्योपती, गुन्हेपती, जनपती अशी पात्रं प्रेक्षकांना आवडतात. भारतीय प्रेक्षकाला नायक सर्व अंगांनी थोर असावा असं वाटतं. नायकाच्या नेगेटिव बाजू पहायला त्याला आवडत नाही. नायक आणि कथानकाला जोडून प्रेक्षकाला रंजन हवं असतं. भावनांना हात घालणाऱ्या गोष्टी त्याला हव्या असतात. संगीत हवं, नाच हवेत, विनोद हवेत, अक्शन हवी. बहुतांश प्रेक्षक वरील वर्गातले असतात. वैचारिक, कंटाळवाणे, प्रयोगशील चित्रपट आवडून पहाणारे प्रेक्षक अगदी मोजके असतात. आशय, प्रयोगशील आणि रंजक असं मिश्रण असणारेही चित्रपट तयार होत असतात. प्रेक्षक ते चित्रपट पसंत करतो.
मणीरत्नमचा गुरु पहा. (किंवा रोजा पहा)
अतीशय देखणी दृश्य हा त्यांच्या  चित्रपटाचा आत्मा आहे. गुरू सिमेमातलं मणीरत्नम यांनी दाखवलेलं ईडर हे गाव पहा. त्या गावातली त्यांनी दाखवलेली घरं पहा. मुळात ते गाव आणि  घरं तशी नाहीत. मणीरत्नमनं ती डोळ्याला सुखावणारी केली आहेत. प्रकाश योजना, कॅमेऱ्यांचे कोन, रंगयोजना इत्यादी घटक त्यांनी फार विचारपूर्वक आणि देखणेपणाकडं लक्ष देऊन योजले आहेत. त्याच गावात एक नाच आहे. त्यात गुरुकांत (धीरूभाई?) आणि त्याची पत्नी (कोकिळाबेन?) नाचते. नाच आणि गाणं अत्यंत देखणं आहे. प्रत्यक्षात त्या गावात तशी जागा नाही आणि धीरूभाई किंवा कोकिळाबेन तसं नाचल्या असणंही शक्य नाही. (जसं बाजीराव आणि काशीबाई कधी नाचल्या असतील काय?) पण चित्रपट हे एक अद्भुत माध्यम आहे. तिथं दिद्गर्शकाची कल्पनाशक्ती असीम असते. तंत्राचा वापर करून दिग्दर्शक काय वाट्टेल ते उभं करतो. चित्रपट वास्तव आणि कल्पित यांच्या सीमारेषेवर नेऊन ठेवतो.प्रेक्षकाला आनंद देण्यासाठी.
प्रेक्षकाच्या सुखाबद्दलच्या दिद्गर्शकाच्या काही कल्पना असतात. तेच त्याचं वैशिष्ट्यं असतं. अनेक दिद्गर्शक नयनरम्यता हा घटक वगळतात. त्यांना वास्तव जितकं दाहक असेल तितकं दाखवायचं असतं. काही दिग्दर्शकांना चित्रपटातून काही एक धडा लोकांना द्यायचा असतो, काही एक संदेश द्यायचा असतो.  संदेश महत्वाचा, डोळ्यांचं किवा कानाचं सुख महत्वाचं नाही असं त्या दिग्दर्शकाचं मत असतं. अशा आशयप्रधान चित्रपटात गाणी नसतात, माणसाच्या गात्रांना सुखावेल असं काहीही नसतं. तेच त्या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्यं आणि तीच त्या दिग्दर्शकाची शैली. तेही चित्रपट आवडणारी माणसं असता, त्याही चित्रपटांना प्रतिष्ठित बक्षिसं देणारे परिक्षक असतात.
  खूप दारू प्याल्यावर, ड्रग घेतल्यावर, मानसीक डिस्टर्ब्ड असण्याच्या काळात माणसाच्या डोळ्यासमोर येतात तशी दृश्य घेऊन एका दिग्दर्शकानं सिनेमा काढला. पूर्ण दीडेक तासाचा. माणसांची शरीरं विचित्र. त्यांचे कपडे थेट आदिम माणसापासून २०१२ सालातले. संगित आदिम काळापासून तर आजच्या जाझपर्यंत. आणि तेही जगातल्या कुठल्याही देशातलं. कथानक शेकडो नव्हे हजारो वर्षं मागं पुढं बेगुमान सरकत रहातं. पडद्यावर काय घडतंय त्याची संगती लावता लावता प्रेक्षकाचा जीव जातो. प्रेक्षकानं अशा छळवादाला तोंड दिलंच पाहिजे असं त्या दिग्दर्शकाचं मत. असेही चित्रपट आणि दिग्दर्शक असतात. तीच त्या चित्रपटाची शैली. ती न आवडणारे जास्त, आवडणारे विरळे.
कोणाला चित्रपटातून चार घटका करमणूक हवी असते. कोणाला संदेश. कोणाला संदेश आणि करमणुक यांचं मिश्रण. भारतात थोडासा संदेश, भरपूर करमणूक हा फॉर्म्युला लोकांना आवडतो. चांगली दृश्यं, चांगला अभिनय  आणि त्यात चिमूटभर संदेश लोकांना आवडतो. त्यातही गाणी आणि नाच लोकांना हवे असतात. भारतीय माणसाचं गाणं आणि संगितावर विलक्षण प्रेम.  दैनंदिन जीवनातही संगीत त्याच्या सोबत असतं. अनेक सिनेमे गाजले, गाजतात  ते त्यातल्या गाण्यामुळं. कित्येक सिनेमे केवळ गाण्यांवर गाजले, लक्षात राहिले. त्यात काम करणारे नट ठोकळे किंवा खांब होते. लोकांनी त्या नट बोल्टांकडं अजिबात दुर्लक्ष केलं, गाणी ऐकली.
बाजीराव मस्तानी या सिनेमातल्या ऐतिहासिक सत्याची फारशी काळजी प्रेक्षकाला नसते. बाजीरावाचं वैभव, त्याच्या लढाया, त्याची देखणी पत्नी, त्यांनी केलेले नाच आणि गाणी या गोष्टी त्याला आवडतात. सारं लार्ज स्केल असल्यामुळं प्रेक्षकाला त्याची भुरळ पडते. बाजीरावाचा नाच अगदी कंटेंपररी आहे.  यात काही चुकलं असं प्रेक्षकाला वाटत नाही. एक सुंदर आणि कर्णमधूर नाच पहायला मिळाला याचा तुडुंब आनंद त्याला असतो. 
नाच-गाणं. 
नाच ‘बाजीराव’मधला.
नाच ‘सत्या’मधला.
सत्यामधलं ‘गोली मार भेजेमे’ नाचगाणं तुफान होतं.
हॉलिवूड सिनेमातही एकेकाळी भरपूर नाच आणि गाणी असत. काळ सरकला. नाच गाणी गायब झाली. खिळवून टाकणारी दृश्य प्रेक्षकांना आवडू लागली. रेवेनंट सारखा भीषण अनुभव देणारा सिनेमा लोकांनी त्यातील थक्क करून टाकणाऱ्या दृश्यांसाठी पाहिला.
  टेबेरॉक या अमेरिकन माणसाला गुरु या सिनेमात धीरूभाई आणि भारत दिसला नाही तर आयन रॅंडच्या फाऊंटनहेड कादंबरीतल्या हॉवर्ड रोर्क या पात्राची आठवण झाली.  फाऊंटनहेड सिनेमात रोर्कवर भ्रष्टाचाराचा खटला चाललेला असतो. रोर्क त्याला उत्तर देत असतो. सभोवतालचा समाज भ्रष्ट असेल तर कोणीही उद्योगपती सचोटीनं कसं काम करू शकतो असा सवाल रोर्क न्यायाधिशाला विचारतो. गुरु सिनेमात गुरूकांतवरचा खटला पाहून   टेबरॉकना रोर्कची आठवण झाली.  भारतीय प्रेक्षकाला आयन रँड किंवा रोर्क माहित असायचं कारण नाही. मणीरत्नमला रँड-रोर्क-फाऊंटनहेड दिसले नाहीत. त्याला दिसले व्यापार उद्योगाचे नियम चौकटी तोडणारे अंबाणी आणि स्वातंत्र्यासाठी कायदे मोडणारे गांधीजी. 
टेबरोक आणि भारतीय प्रेक्षक अशा दोघांनाही वेगवेगळ्या कारणांसाठी कां होईना गुरु चित्रपट पहावासा वाटला. त्यातच चित्रपटाचं यश दडलेलं आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *