जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.
अमेरिकेत लोकांकडं बऱ्यापैकी पैसे असतात. प्रवास करायला निघताना बरेच अमेरिकन एकादं पुस्तक विकत घेतात आणि प्रवास संपल्यानंतर पुस्तक विमानतळावरच्या किवा रेलवे स्टेशनवरच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतात. मायामीच्या किवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर अनेक पुस्तकं पडलेली असतात, ओली होऊन कुजत असतात. 
हे जितकं खरं तितकंच अमेरिकन माणसं जुनी पुस्तकं टाकून देत नाहीत, विकतात, विकत घेतात हेही तितकंच खरं. म्हणूनच अमेरिकाभर जुनी पुस्तकं घेणारी आणि विकणारी किती तरी महाकाय दुकानं आहेत.
।।
बेंट कॉर्नर्स युज्ड बुक्स. जुन्या पुस्तकाचं दुकान.  बॉईसी, आयडाहो राज्य, अमेरिका.
शेजारी इतर अनेक दुकानं.
साधारणपणे दुपारी बाराची वेळ. दुकानाच्या दारात एक फोर्ड गाडी उभी रहाते. नव्वदीतली फोर्ड गाडी चालवणारी नव्वदीच्या घरातली ज्युडिथ   हातात एक पुस्तकांची चळत घेऊन उतरते. डाव्या हातानं दुकानाचं दार उघडून आत शिरते.
मालक डेव हॅन्सन ज्युडिथचं स्वागत करतो. ज्युडिथ या दुकानात नेहमीच येत असल्यानं एक जिव्हाळ्याचं नातं दोघांच्या हावभावात दिसतं.
ज्युडिथनं आणलेली पुस्तकं डेव टेबलावर ठेवतो. मोजतो. नोंद करतो, खाली ठेवलेल्या टोपलीत टाकतो.
” दुसरी पुस्तकं विकत घेणारेस की या पुस्तकांचे पैसे हवेत?” डेव  विचारतो.
” चार पुस्तकं पुन्हा घेईन, दोनाचे पैसे दे.” ज्युडिथ.
डेव पैसे देतो, ज्युडिथ दुकानाच्या आत जाते, पुस्तकांच्या रॅकमागे दिसेनाशी होते.
डेवचं दुकान जुन्या पुस्तकांची देवाण घेवाण करतं.
दुकानात सुमारे २५ हजार पुस्तकं आहेत. काही पुस्तकं पुठ्ठा बांधणीची आहेत, काही साध्या बांधणीची, पेपरबॅक सारखी. 
पुठ्ठा बांधणीची म्हणजे जाडजूड उंचीपुरी पुस्तकं. यातल्या काही पुस्तकांवर किमतीची चिठ्टी लावलेली आहे, काही पुस्तकांवर चिठ्ठी नाही. चिठ्ठी लावलेल्या पुस्तकांवर पुस्तकाची किमत लिहिली आहे. किमती पंधरा डॉलर, दहा डॉलर, सतरा डॉलर अशा आहेत. किमती न लिहिलेल्या पुठ्ठा बांधणी पुस्तकाची प्रत्येकी सरसकट किमत दीड डॉलर आहे. कुठलंही पुस्तक घ्या, फक्त दीड डॉलर, म्हणजे सुमारे शंभर रुपये.
 दीड डॉलर किमतीची पुस्तकं नवी कोरीच आहेत. बॉब वुडवर्ड या वॉशिंग्टन पोष्टच्या पत्रकारानं लिहिलेली बुश, क्लिंटन, रेगन इत्यादी प्रेसिडेंटवरची गाजलेली प्रत्येकी चार सहाशे पानांची पुस्तकं दीड डॉलरला मिळतात. वॉटरगेट बॉबनीच बाहेर काढलं होतं. ऑल दी प्रेसिंडेंट्स मेन हे बॉबचं बरंच गाजलेलं पुस्तकही दीड डॉलरला.
बाकीची पुस्तकं त्याच्यावर छापलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीत. मुराकामीची अगदी ताजी कादंबरी अर्ध्या किमतीत मिळत होती. आठ डॉलरला. तेच पुस्तक अॅमेझॉनवर चार डॉलरला मिळत होतं. परंतू पाठवणावळ होती चार डॉलर. त्यामुळं दुकानातच जुनं पुस्तक घेणं परवडतं. शिवाय हवं असल्यास वाचून झाल्यावर ते परत करता येतं.
दीड डॉलर किंवा अर्ध्या किमतीतली पुस्तकं पैसे टाकून विकत घ्यायची. वाचून झाल्यावर याच दुकानात आलं तर दीड डॉलरचं पुस्तक डेव विकत घेत नाही पण बाकीची पुस्तकं छापील किमतीच्या पंचवीस टक्के किमतीत विकत घेतो. वाचलेली पुस्तकं ठेवायची, नवी घ्यायची किंवा नवी नको असतील तर पंचवीस टक्केप्रमाणं पैसे घ्यायचे.
ज्युडिथ पुस्तकांच्या रॅकमधे पोचते न पोचते तोवर एक सहा फुटी म्हातारा माणूस काऊंटवर पोचला. त्यानं एक पुस्तक  परत करायला आणलं होतं. त्याला कुठल्याशा लेखकाचं पुस्तक हवं होतं. त्यानं आधी येऊन आणि फोनवरून डेवला त्या लेखकाचं आणि पुस्तकाचं नाव सांगितलं होतं. डेवनं ते पुस्तक बाजूला काढून ठेवलं होतं. या माणसानं ते पुस्तक घेतलं. नव्या पुस्तकाची अर्धी किमत आणि परत केलेल्याची पंचवीस टक्के यातली बेरीज वजाबाकी झाल्यावर डेवनं काही पैसे त्या माणसाला परत केले. तीन चार मिनिटं दोघं एका लेखकाबद्दल बोलले. हे बोलणं सुरु असतानाच आणखी दोन महिला आल्या. एक मध्यम वयीन आणि एक वयस्क. त्या महिला आल्या म्हणून सहा फुटी माणूस दूर झाला आणि निघून गेला.
मध्यमवयीन महिलेनं दोन पुस्तकं ठेवली आणि नवी पुस्तकं घ्यायला तीही रॅकमागे दिसेनाशी झाली. वयस्क महिलेनं दहा बारा पुस्तकं आणली होती. ती सगळीच्या सगळी पुस्तकं विकण्यासाठी होती. डेवनं हिशोब करून पैसे दिले.
“या आजी आणि यांच्यासारखी किती तरी माणसं कुठून कुठून पुस्तकं गोळा करतात आणि विकायला आणतात. हा एक व्यवसायच आहे. त्या पुस्तकं कुठून आणतात ते आम्ही विचारत नाही. कोणीही कुठलीही पुस्तकं आणावीत, पंचवीस टक्के किमतीत ती आम्ही विकत घेतो.” डेव म्हणाला.
डेव पाठ्यपुस्तकं ठेवत नाही. कारण इथल्या विद्याशाळांत पाठ्यपुस्तकं दर वर्षी बदलत असतात. त्यामुळं जुन्या पाठ्यपुस्तकाला किमत शून्य.
मेरिडयनमधे वाचणारी अनेक माणसं आहेत, त्यांना नवी पुस्तकं परवडत नाहीत. ही माणसं लक्ष ठेवून त्यांना हवी ती पुस्तकं घेण्यासाठी डेवच्या दुकानात येतात.
दिवसाला हजारेक पुस्तकं येतात.
या दुकानाच्या मेरिडियन आणि नँपा या लगतच्या शहरात दोन शाखा आहेत. डेव आणि त्याची पत्नी मिळून हे दुकान चालवतात. डेव कंप्यूटर इंजिनियर आहे. त्याला पुस्तकांची आणि वाचनाची आवड आहे. राजकारण, सभोवतालच्या कटकटी, टेररिझम इत्यादी गोष्टींनी त्याचं डोकं पिकतं. म्हणून तो सायन्स फिक्शन वाचतो. नोकरीचा कंटाळा आला म्हणून हे दुकान त्यानं २००५ साली उघडलं.  नंतर नँपामधे २००७ साली आणि मेरिडियनमधे  २०१२ साली दुकान उघडलं. कुठं कुठं माणसं घरं विकतांना पुस्तकं काढून टाकतात तेव्हां ती पुस्तकं घ्यायला डेव स्वतः जातो. माणसं गॅरेज सेल करतात. म्हणजे घरातल्या अनेक वस्तू काढून टाकतात. त्यातली पुस्तकं घ्यायला डेव जातो.
डेवचा उद्योग चांगला चाललाय.
पॉवेल्स बुक्स.
दुकानाचं ब्रीद वाक्य आहे ‘पुस्तकं विकत घ्या, वाचा, विका’
अमेरिकेतल्या महाकाय पुस्तकांच्या गणनेत ओरेगनमधील पोर्टलँड या शहरातल्या पुस्तक दुकानाचा नंबर लागतो. या दुमजली दुकानातल्या किरकोळ विक्रीच्या पुस्तकांचं क्षेत्रफळ १.६ एकर (६८ हजार चौफू) आहे. १९७१ साली हा उद्योग प्रथम शिकागोत सुरु झाला. तिथून तो पोर्टलँडमधे सरकला. पोर्टलँडमधेही तो विविध ठिकाणी हलत हलत सध्याच्या जागी आलाय.  पुस्तक विकत घेणाऱ्या लोकांच्या सोयीची असल्यानं ही जागा निवडण्यात आली.
दुकानात नवी आणि जुनी पुस्तकं विकली जातात. दररोज सुमारे ३००० पुस्तकं हे दुकान खरेदी करतं. दुर्मिळ पुस्तकांचाही साठा दुकानात आहे. सीडी, डीव्हीडी, ऑडियो पुस्तकं, ईपुस्तकं इत्यादी गोष्टीही विकल्या जातात. काऊंटवर व्यवहार होतात आणि इंटरनेटवरही खरेदी होते. आज या दुकाना पुस्तकाचं उत्पन्न सुमारे दहा कोटी डॉलर आहे.
अमेरिकेत कॅलिफोर्निया, मिनेसोटा, नॉर्थ कॅरोलायना, व्हर्जिनिया, वॉशिंगटन, न्यू यॉर्क व इतर राज्यात जुन्या पुस्तकांची पॉवेल बुक्ससारखीच महाकाय दुकानं आहेत. प्रत्येक दुकानाची एकेक खास बात आहे. मिनेसोटात कॉमन गुड बुक्स नावाचं दुकान आहे. दुकानाच्या मालकाचा माणूस जाम विनोदी. दुकानात ठायी ठायी मालकाच्या खुणा दिसतात. जुन्या पुस्तकाच्या कपाटावर एका ठिकाणी फलक आहे दर्जेदार कचरा. quality trash. फुल सर्कल बुक स्टोअर या ओक्लाहोमा सिटीतल्या दुकानात ऊंच छतापर्यंत पुस्तकं ठेवलेली आहेत. खरेदी करणाऱ्यांनी शिड्या लावून पुस्तकं निवडायची. मेगर्स अँड क्विन या मिनिओपोलिसमधल्या पुस्तकाच्या दुकानात जुनी पुस्तकं तर आहेतच पण तिथं पुस्तक-साहित्य या विषयावर जाहीर कार्यक्रम होता, काव्य वाचनाचे जाहीर कार्यक्रम दरमहा होतात.
अशा महाकाय दुकानामधे एक आहे  डेट्रॉईटमधलं John K. King, Used and Rare Books नावाचं १९३० पासून चालत आलेलं दुकान आहे. या दुकानाची गंमत म्हणजे  पोर्नोग्राफी पुस्तकात (मराठीत चावट पुस्तकं) रस असणारी माणसं अमेरिकाभरून या दुकानात येतात. जुनी जुनी चावट पुस्तकं इथं मिळतात. जवळ जवळ ९०० विविध प्रकारची पुस्तकं या दुकानात मिळतात. काही कपाटं केवळ नऊ सेंट किमतीच्या पुस्तकांची. या दुकानात खूप जुनी नियतकालिकंही पहायला, विकायला ठेवली आहेत. एका नियतकालिकात अर्नेस्ट हेमिंगवे च्या पुस्तकाचं परीक्षण आहे. हेमिग्वेनं ते मासिक पाहिलं, त्यातलं आपल्या पुस्तकावरचं परिक्षण वाचलं आणि त्या पानावर स्वतःच्या हस्ताक्षर आणि सहीसह लिहिलं ‘ blah.. blah .. blah ‘ 


किंगमधे दररोज ढिगानं पुस्तकं येत असत. जुनी. मॅनेजरचं एक किचकट काम म्हणजे ती पुस्तकं पहायची आणि त्याची किमत ठरवायची. मॅनेजरला पुस्तकाचं कव्हर पाहूनच पुस्तकाच्या मोलाचा अंदाज येत असे. पुस्तकाचा लेखक कोण, किती जुनं प्रकाशन, लेखकाची किवा नामांकिताची सही असणं इत्यादी कसोट्या होत्या. महत्वाचं वाटलं की पुस्तकाची सगळी पानं मॅनेजर चाळून पहात असे.
१९८७ मधे मार्क ट्वेनचं तीन खंडातलं चरित्र एका माणसानं किंगला विकलं. मॅनेजर ते चाळत असताना एका खंडातून तीन फोटो खाली पडले. फोटो मार्क ट्वेनचे होते. ट्वेन एका गाढवाच्या गाडीतून एका तरुण मुलीबरोबर प्रवास करत होता. फोटोमागे पेन्सिलिनं तारीख लिहिली होती १९०८. ट्वेनच्या चरित्रात १९०८ साली बर्म्युडामधे ट्वेन मार्गारेट ब्लॅकमर या तरुणीला भेटल्याचा उल्लेख होता. मार्क ट्वेनचा अभ्यास असणाऱ्या लोकांनी वरील फोटो आणि नोंद खरी आहे असं सांगितलं. त्या दिवशी डेट्रॉईटच्या पेपरात ती हेडलाईन होती.
किंगनं ते फोटो एका संस्थेला खूप किमतीला विकले.
डेट्रॉईट शहर खलास होतंय. तिथला कार उद्योग खलास झाला आहे. माणसं शहर सोडून चाललीत. डेट्रॉईटमधे शिल्लक असणाऱ्या लोकांची हालत फार वाईट आहे. जगणं कठीण झालंय. त्यामुळं ९ सेंटचं पुस्तकही विकत घेण्याची ताकद डेट्रॉईटवासियांत राहिलेली नाही. त्यामुळं हे दुकान आता बंद होतंय.
।।

4 thoughts on “जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

  1. भारतात अशा प्रकारची दुकानं चालतील / चालतात का? त्याबद्दल लिहाल का? (आधीच लिहिलं असेल, आणि माझ्या नजरेतून सुटलं असेल, तर माफी.)

  2. भारतात अशी दुकाने सहज चालतील. नाहीतरी मुंबई फोर्ट भागात व फ्लोरा फाउंटन जवळ अशी रस्ता दुकाने असताना मी ढीगभर पुस्तके विकत घेतलेली आहेत. ज्याला वाचायचे आहे त्याची ही सोय. मोठ्या शहरातून असलेली ही सोय अधिक व्यापक व्हायला हवी. हैद्राबाद मध्ये दर रविवारी जुन्या पुस्तकांचा अक्षरश: बाजार भरतो.

  3. किमान मुंबईत तरी अशी दुकाने चालू शकणार नाहीत. याचे कारण असे की जे नवी पुस्तके विकत घेऊन वाचतात, ते सहसा इतरांना ती मोफतपणे वाचण्यासाठी देत नसतात. त्यांच्या संग्रही उरून ती त्यांच्या पाश्च्यात एक अडगळ म्हणून कुटुंबातील अरसिक मंडळी नजीकच्या लायब्ररींना फुकटात ‘देणगी’ नांवाच्या उदात्तीकरणाच्या भूमिकेतून ‘सप्रेम भेट’ म्हणून देतात. माझ्या लहान वयात दादरच्या टिळक ब्रिजवर एक जण पथारी मांडून बरीच इंग्रजी फोटोग्राफीवर असलेली भली मोठी पुस्तके स्वस्तात विकत असे परंतु मराठीला ‘नन्ना चा पाढा”. म्हणे, “कुत्रा देखील तिकडे फिरकणार नाही” -आता बोला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *