कर्नाटकातल्या भटकळ गावात जन्मलेला सुलतान अब्दुल कादिर आरमार गेले काही दिवस अन्सार उल तौहिद या वेबसाईटवर दिसत होता.( अब्दुल कादीरचं शिक्षण लखनऊच्या दारुल उलूम या धर्मीशाळेत झालेल आहे.) वेबसाईटवरून त्यानं भारतातल्या मुसलमान तरुणाना आवाहन करून जिहादमधे भाग घ्यायला बोलावलं. अफगाणिस्तानात या, तिथं प्रशिक्षण घ्या आणि सीरियातल्या जिहादमधे भाग घ्या असं त्यानं सांगितलं. सीरियातलं असद यांचं सरकार धर्मभ्रष्ट असल्यानं त्या िवरोधात लढणाऱ्या ISIS या जिहादी संघटनेत या असंही तो म्हणाला. त्या बरोबरच भारतातले गाईची पूजा करणारे, ब्राह्मण, इस्लामी नसलेले, अश्रद्ध इत्यादींचाही नायनाट करण्यात सामील व्हा असं तो म्हणाला. 
इंडियन एक्सप्रेसनं ही माहिती प्रसिद्ध केलीय.  
अब्दुलचं धर्मशिक्षण लखनऊच्या धार्मिक शाळेत झालेलं आहे. सध्या तो भारताबाहेर कुठं तरी आहे. तिथून तो वरील वेबसाईटवरून संदेश पाठवत असतो. संदेश पाठवत असताना त्याच्या हाताशी कुराण असतं, बंदूक असते.
इराकमधे अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं उडवणारा जिहादी ब्रिटीश होता. इराकमधे सध्या  ब्रिटीश, बेल्जियन, फ्रेंच तरूण आयसिस या जिहादी दहशतवादी संघटनेबरोबर हिंसारत आहेत. त्यांची संख्या दोनेक हजारांच्या घरात आहे असं म्हणतात. एकेकाळी अफगाणिस्तान हे जिहादींचं भरती आणि प्रशिक्षण केंद्र होतं. अल कायदा आणि तालिबान मिळून ते चालवत असत. जगभरातून तिथं पैसे आणि शस्त्रं पोचत असत. शस्त्र आणि पैशात अरबांचा वाटा बहुतांश असे. साऱ्या म्हणजे साऱ्या जगातून तिथं तरूण लोक जिहाद करण्यासाठी पोचत. तिथं तयार झालेली माणसं जगभर जिहादसाठी फिरत. केनया, येमेन, थायलंड, अमेरिका इ. ठिकाणी हल्ला करणारे जिहादी वरील केंद्रातून तयार झाले होते. अलिकडं अफगाणिस्तानातलं केंद्रं थंड आहे. आता सीरिया, इराकमधे ते स्थिरावलेले दिसतात.
जिहादमधे भाग घ्यायला जाणाऱ्या जिहादींबाबत एक गोष्ट बहुतांशी समान आहे. ही तरूण मुलं चांगल्या खात्या पित्या घरातली होती. व्यक्तिगत जीवनात काही खाचखळगे आल्यावर हे तरूण अस्वस्थ झाले. त्या अवस्थेत ते जिहादी संघटनांच्या जाळ्यात सापडले. पुस्तकं, व्हिडियो क्लिप्स, फिल्म्स, ऑडियो टेप्स इत्यादींच्या सहाय्यानं जगातली स्थिती कशी मुसलमानांच्या दृष्टीनं वाईट झाली आहे हे त्या साहित्यातून सांगण्यात आलं. यातून वाट एकच म्हणजे शरीया आणि कुराणात सांगितलेल्या जिहादची. ती वाट घेण्यासाठी सतत संदेशांचा मारा करत, एकच गोष्ट सतत मनावर िबंबवत, बराकीकरण करत एका टोकाच्या मानसिक अवस्थेत त्याना नेण्यात आलं. या काळात ही मुलं जग, वास्तव या पासून पूर्ण तुटलेली होती, तुटलेली ठेवण्यात आली होती. एकतरफी माहितीचा मारा त्यांच्यावर करण्यात आला. अब्दुलनं सांगितलं तसं इस्लामी नसलेलं जग म्हणजे पाप असल्यानं ते नष्ट करणं हे आपलं धर्म कर्तव्य आहे असं त्यांच्या मनावर ठसवण्यात आलं.
 यात गुंतलेले मुद्दे. इस्लामी नसलेले, धार्मिक नसलेले म्हणजे कोण? सर्वांनी इस्लामीच असलं पाहिजे आणि इस्लामी नसलेल्यांना जगायचा अधिकार नाही म्हणजे काय? हे ठरवलं कोणी? हा अधिकार त्यांना कोणी दिला?
इस्लामी नसलेले म्हणजे इतर सर्व धर्माचे, निरीश्वरवादी, अज्ञेयवादी. पण त्या बरोबरच  शिया आणि अहमदी पंथाचेही इस्लामी नाहीत. गाडं तेवढ्यावरच थांबत नाही. सौदी अरेबियाचे शासक सुन्नी असले तरीही ते इस्लामबाह्य. येवढंच नाही. जिहादमधे खांद्याला खांदा लावून लढलेले सहकारीही नेतृत्वाच्या किवा रणनीतीच्या मुद््यावर वेगळ्या मताचे झाले की गैरइस्लामीच. ओसामा बिन लादेनला जिहादची दिक्षा देणारा अझ्झमही धर्मभ्रष्ट ठरला, त्याचा खून झाला. इराकमधे अल बगदादी याच्याबरोबर काम करणाऱ्या कित्येक जिहादींचा खून झाला कारण त्यांची काही मतं अल बगदादीपेक्षा वेगळी होती, अल बगदादीचं नेतेपण आणि वाटा त्यांना मंजूर नव्हत्या. खुद्द अल बगदादीला अल कायदाच्या अयमान जवाहिरीनं हाकलून लावलं आहे.
अल्ला, महंमद, कुराण, शरीया हे सारं मानणारे शिया, सुन्नी, अहमदी, सूफी, इत्यादी मंडळीही जर धर्मभ्रष्ट ठरत असतील तर इतरांबद्दल विचारायलाच नको.
दुसरा मुद्दा. वेगळी मतं, आचार, संस्कृती, उपासना इत्यादी असणाऱ्यांनी जगायचं नाही. जर दुसरी माणसंही असंच म्हणत असतील तर काय करायचं? इतर धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांना समजा ‘या’ इस्लामी लोकांनी जगू नये असं वाटत असेल तर? म्हणजे शेवटी लोकानी गट तयार करायचे, शस्त्रं गोळा करायची आणि आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांना नष्ट करायचं असं घडणार. मग अमेरिका, पश्चिमी संस्कृतीचे लोक इस्लामी लोकांना मारत असतील, त्यांना हरवत असतील तर त्यांचं काय चुकलं?
इतरांनी जगू नये असं ठरवणारे हे लोक कोण आहेत? या साऱ्यांचं प्रतिनिधित्व ओसामा बिन लादेन करू शकतो. ओसामाच्या लहानपणात डोकावलं तर त्याच्यावर झालेले विध्वंसक आणि क्रूर संस्कार लक्षात येतात. आपल्या पित्यालाच ठार मारता आलं पाहिजे अशी शिकवण त्याच्या गुरुजींनी त्याला दिली होती. कदाचित त्याचं व्यक्तिमत्व मुळातच या विचारांचं असेल. त्याच्यासोबत गेलेले लोक लहानपणी साधे पण नंतर व्यक्तिगत हताशा-निराशा-अपेश यांचा परिणाम म्हणून हिंसेकडे वळल्याचं दिसतं.
या मंडळींना हिंसा करण्याचा अधिकार कोणी दिला?  या लोकांनी तो इस्लामी विचार, इस्लामी परंपरा, इस्लामी पुस्तकं यातून मिळवला. आपल्यापेक्षा वेगळं जे जे असेल ते कनिष्ठ आणि ते ते नष्ट करणं असा इस्लाम-जिहादचा अर्थ काढला गेला. सर्वच माणसं तसा अर्थ काढतात असं नव्हे. परंतू मौदुदी, हसन अल बाना इत्यादी लोकांनी तो अर्थ काढला. तो अर्थ काढतांना त्यांनी त्यांच्या म्हणण्याला बळ देणारे पुरावे इस्लामी पुस्तकं, परंपरांमधे शोधले. सारीच मुसलमान माणसं त्या मताची असण्याची शक्यता नाही. परंतू वरील मोजक्यांनी काढलेल्या अर्थाचा सामना करत त्याना रोखण्याची खटपट इस्लामी जगानं केलेली दिसत नाही. बहुतांश इस्लामी जग गप्प आहे आणि कित्येक इस्लामी देश त्यांना मदत करत आहेत.
या साऱ्या उद्योगाला आपण दहशतवादी असं ढोबळमानानं म्हणू शकतो. पण दहशतीच्या पलिकडचे अनेक विषय त्यात गुंतलेले आहेत.
या दहशतवाद्यांचं एक स्वतंत्र तंत्र तयार झालं आहे. इस्लामी देशातल्या अंतर्गत सत्ता संघर्षात त्यांचा वापर इस्लामी ( आणि रशिया-चीनसारखे इतरही ) देश करून घेतात. त्यांना शस्त्रं, पैसा पुरवतात. गेल्या काही वर्षात जगभर बदललेल्या आर्थिक-राजकीय परिस्थितीमधून निर्माण झालेलं नैराश्य आणि हताशा हा दहशतवाद्यांना माणसं पुरवणारा कारखाना तयार झाला आहे. मुंडकी उडवणं, रक्ताच्या चिरकांड्या उडवणं, माणसांचे तुकडे तुकडे होऊन हवेत उडताना पहाणं इत्यादी गोष्टी कंप्यूटवरच्या खेळात पहाण्याची सवय लागल्यानं म्हणा किंवा कसंही म्हणा काही तरूणांना थरारक वाटतं. या थराराला धर्माची वैश्विक-पारमार्थिक-धार्मिक वगैरे डूब दिली की मग थरार पटींनी वाढतो. त्यामुळं आईबाप रोखत असतांनाही मुलं हट्टानं तिकडं वळतात.
हा प्रकार जगभर पसरू शकतो. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, ब्रीटन, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, नॉर्वे आणि भारत अशा नाना ठिकाणची मुलं जिहादसाठी बाहेर पडताहेत. ती त्यांच्या त्यांच्या देशात जिहादसाठी परतली तर वांधा आहे.
निकडीनं विचार करण्याची वेळ येऊन ठेपलीये.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *