लातूरचे
रविंद्र गोवंडे, एक सात्विक, सज्जन, निस्वार्थी
आणि बहुगुणी माणूस. 
 रविंद्र ऊर्फ नाना गोवंडे ऊर्फ गोवंडे सर वयाच्या
८२ व्या वर्षी लातूर इथे वारले. ते सिविल इंजिनियर होते.  
सरांना पैसे मिळवण्यात
रस नव्हता. घर चालवावं लागतं, घरात मुलं बाळं असतात, दररोज
भाकर तुकडा लागतो म्हणून नाईलाजानं ते पैसे मिळवत असत. केलेल्या कामासाठी कोणाकडं
पैसे मागणं त्यांना अवघड जात असे. घर, दुकान किंवा इमारतीचं डिझाईन करून झाल्यावर
कित्येक माणसं पैशाचं विचारतच नसत. मग आतून गोवंडे वहिनी खुणावून सरांना पैशाचं
बोला असं सांगत.
वहिनींना घर चालवायचं असे, सरांना जगाच्या कल्याणाची काळजी असे. कोणी विचारे की
सर कामाचे पैसे किती. तेव्हां सर ‘
द्या तुम्हाला जमतील तेवढे ‘ असं
आवंढा गिळून म्हणत.
पॉलिटेक्निकमधे शिकवत
असताना त्यांच्या एका विद्यार्थ्याला प्राचार्यांनी वाईट वागवलं, त्याच्यावर
अन्याय केला. सरांनी  जळजळीत विरोध
प्राचार्यांकडं नोंदला. प्राचार्यांनी वैर धरलं. सर विद्यार्थ्यासाठी भांडले आणि
राजीनामा देऊन मोकळे झाले.
खोटेपणा, पैशापोटी
बेकायदा वर्तणूक, व्यावसायिक सचोटी न पाळणं या गोष्टींना सिविल
इंजिनियरच्या जगण्यात थारा असता कामा नये ही त्यांची विद्यार्थ्याना शिकवणूक होती.
गोवंडे सरांचा जीव
नाटकात असे. लातूरमधे नाट्य चळवळ वाढवण्यात त्यांचा जन्मदात्याचा आणि सिंहाचा वाटा
होता. किती तरी नाटकांचं दिद्गर्शन त्यांनी केलं, भूमिका केल्या.
शाळकरी मुलांवर
साहित्य, नाटक, कविता यांचे संस्कार व्हावेत असं त्यांना वाटत असे.
दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत ते वीस ते तीस मुलामुलींचं शिबीर स्वतःच्या घरात
भरवत असत. शिबीर दोन आठवड्यांचं असे. मुलांकडून पाठांतर करून घेणं, कविता
आणि धडे वाचून घेणं, छोट्या नाट्यछटा बसवून घेणं, चित्र
काढवून घेणं असे अनेकांगी प्रयोग ते करत. विनामूल्य. मुलांना मधल्या वेळचं भरपूर
सकस जेवणही दिल जात असे. त्याचे पैसे ते घेत नसत. 
किल्लारी भूकंपानंतर
पुनर्वसनाच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला. पारधेवाडी या गावाच्या पुनर्वसनात
त्यांचा सर्वांगिण आणि सर्वाधिक  वाटा अगदी पहिल्या दिवसापासून होता.  
कित्येक मुलामुलींना
घरात ठेवून त्यांचं शिक्षण, लग्नबिग्नं सरांनी आणि गोवंडे वहिनींनी पार पाडली.
गोवंडे वहिनी गेल्यानंतर गोवंडे सर काहीसे एकटे पडले होते. पण नाना प्रकारच्या
कामात गुंतवून घेतलं असल्यानं त्यांचा आतला एकटेपणा लोकांना बाहेर दिसला नाही.
 एस टी स्टँडवर किंवा रेलवे स्टेशनवर उतरल्यावर
नुसतं गोवंडे सरांकडं जायचंय म्हटल्यावर कोणीही रिक्षावाला त्यांच्याकडं पोचवत
असे.
  सर  त्यांच्या सिग्नल कँपातल्या  घरून गंजगोलाईच्या दिशेनं निघाले तर वाटेत पन्नास तरी माणसांशी नमस्कारांची
देवाण घेवाण होणार. सावकाशीनं जाणाऱ्या
सायकल रिक्षातलं कोणी ना कोणी तरी सरांना आपल्या रिक्षात बसायला सांगणार, तुरळक
असलेल्या कारमधून कोणीतरी त्यांना ‘
कुठं निगालात, बसा की गाडीत ‘ म्हणणार.
  
सिग्नल कँपाच्या
नाक्यावर अशोक हॉटेलपाशी सिगरेटचे झुरके घेण्यासाठी किंवा अर्धा केटी चहा
पिण्यासाठी नाना सकाळी, संध्याकाळी असत. पाच पन्नास माणसं तिथं सरांना
नमस्कार करून पुढं सरकणार. चुकून एकाद्या नमस्काराला परतीचा देवाण नमस्कार करायचं
राहून गेलं तर ‘ सर रागावलेता ‘ असं म्हणून माणूस त्यांना रात्री घरी
भेटायला येणार.
सर गावात  घट्ट गुंतले होते, गाव
सरांच्यात गुंतलं होतं. 
वर्गातला किंवा
शिकवणीतला विद्यार्थी, नाटकातला नट किवा बॅक स्टेज माणूस, व्यक्तिमत्व
विकासाच्या शिबिरातला मुलगा – मुलगी, घरात कामाला येणारी माणसं किंवा पत्र
टाकायला येणारा पोस्टमन,  वर्तमान पत्रं टाकणारा मुलगा, सक्काळी
दुधाचा रतीब घालायला येणारा माणूस,
 टपरीवरचा चहा सिगरेट विकणारा, जगातली
सगळी सगळी माणसं त्यांना सारखीच होती, प्रत्येक माणसाला त्यांच्या लेखी ह्युमन
डिगनिटी होती, माणूस म्हणून त्यांना प्रत्येक माणसाबद्दल आदर आणि
आपलेपणा होता. साऱ्या साऱ्या लोकांनी ते अनुभवलं.  हा पैलू पुस्तकात वाचून तयार झाला नाही, जगण्याच्या
खटाटोपात, सोसत हे मूल्यं त्यांच्या व्यक्तिमत्वात तयार झालं. 
हल्ली अशी माणसं कुठं मिळतात?
>>
त्यांच्या नातवानं त्याचं सरणचित्रं काढलं. ते सोबत. 
 

 <>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *