मलेशियन विमान क्षेपणास्त्रानं पाडलेलं आहे असं आतापर्यंतच्या पुराव्यावरून दिसतय.
विमान पडलं ते ठिकाण रशिया युक्रेनच्या हद्दीवरचं आहे. युक्रेन आणि फुटीर बंडखोर यांच्यात लढाई चाललीय. फुटीर बंडखोर रशियन भाषा-संस्कृतीचे आहेत. युक्रेनची भाषा वेगळी आहे. पूर्व युक्रेनच्या लोकांना युक्रेनमधे रहायचं नाहीये. त्यांना रशियात जायचं आहे. त्यामुळं रशियाची बंडखोरांना सशस्त्र फूस आहे. सोवियेत युनियन कोसळल्यामुळं घटक राज्यं स्वतंत्र झालीत. ती राज्य पुन्हा काबीज करण्याची प्युतीन यांची इच्छा आहे.
बंडखोरांजवळ रशियन शस्त्रं आहेत. युक्रेनकडं जुनी रशियन आणि कदाचित अमेरिकन शस्त्रं आहेत. एकमेकांची विमानं पाडणं असा उद्योग सध्या चालला आहे. त्याच उद्योगामधे मलेशियाचं विमान पाडण्यात आलं आहे.
रशिया म्हणतं की युक्रेननं ते विमान पाडलं. त्याच हवाई वाटेनं प्युतिन यांचं विमान जाणार होतं आणि मलेशियन विमान हे प्युतिन यांचं विमान आहे असं समजून युक्रेननं मलेशियन विमान पाडलं असं रशियन लोकांचं म्हणणं आहे. उलट युक्रेनचं म्हणणं आहे की रशियानंच ते िवमान पाडलंय, आपल्याकडं इतक्या उंचीवरची विमान पाडण्याची व्यवस्था नाही.
इतक्या उंचीवरची विमानं रेडारवर एक छोटा ठिपक्यासारखी दिसतात. ती कोणत्या देशाची आहेत, कोणत्या बनावटीची आहेत, कोणत्या प्रकारची आहेत या गोष्टी रेडारवर कळत नाहीत. त्यामुळं चुकून नको ते विमानही पाडलं जातं. विमानाची हवाई वाट ठरलेली असते. ती वाट सोडून विमान गेलं की संशय येऊन विमानं पाडली जातात. सामान्यपणे वाट चुकलेल्या विमानावर कारवाई करायची असेल तर त्याची प्रणाली ठरलेली असते. नियंत्रण कक्षातून संपर्क साधला जातो. पायलटशी बोलणी होतात.इशारा दिला जातो. ही प्रणाली पार पडल्यानंतरच कारवाई होते. न्यू यॉर्कच्या जुळ्या टॉवरवर हल्ला यशस्वी होऊ शकला कारण हवाई नियंत्रण प्रणालीला जो वेळ लागतो त्याच्या आतच दहशतवाद्यांची विमानं टॉवरवर आदळली.
मलेशियाच्या विमानाच्या बाबतीत काय घडलं? पायलटशी बोलणी झाली कां? झाली असती तर मलेशियाचं विमान पाडण्याची आवश्यकता भासली नसती. त्या विमानात ना दहशतवादी होते, ना संघर्षाच्या कोणत्याही पक्षाचे विरोधक. तेव्हां रेडावरवर विमान पाहिलं आणि ते पाडलं असं घडलं असण्याची शक्यता आहे. मलेशियन विमान कदाचित ठरलेल्या हवाई वाटेपासून दूर गेलं असावं कारण हा प्रदेश संघर्षाचा होता.
रेडार, क्षेपणास्त्रं ही तंत्रज्ञानं आणि उपकरणं यांचा सुळसुळाट झालाय. त्यांची िनर्मिती सहज शक्य असते. त्यांची विक्रीही सहज होते. ती बाजारातही मिळतात. शस्त्रनिर्मिती करणारे देश ( अमेरिका, रशिया इ. ) व्यापारासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शस्त्रं आणि तंत्रज्ञानं अनिर्बंध वाटतात. पाकिस्ताननं अणुतंत्र अशाच रीतीनं मिळवलं आणि इतर देशांना दिलं. इराण, उत्तर कोरिया हे देश त्यात गुतलेले आहेत. 
घातक शस्त्रं आणि तंत्र ज्याच्या हातात असतं ते देश किंवा संघटना कसे असतात? ते लोकशाहीनं चालणारे असतात की हुकूमशाहीनं? त्यांचे निर्णय शांतपणे होतात,  देशातल्या माध्यमांचं आणि मोकळ्या संसदेचं त्यांच्यावर नियंत्रण असतं कां? किती उघडपणे आणि पारदर्शी पद्धतीनं तिथं निर्णय होतात?
दहशतवाद आणि भावनेच्या आहारी जाऊन चक्रम निर्णय होणं ही गोष्ट   अल कायदा, तालिबान, तहरीके तालिबान, लष्करे तय्यबा, बोको हराम, आयसिस इत्यादी संघटनांच्या उद्योगातून  दिसली. युक्रेन-रशिया संघर्षात भाषा आणि संस्कृती गुंतलेली आहे, तिथं हुकूमशाही वर्तनाची परंपरा आहे. भाषा, धर्म, संस्कृती या प्रांतात अनिर्बंध वर्तणुकीचा प्रसार आणि प्रभाव दिसतो आहे. 

क्षेपणास्त्र, बाँब यांच्या बटनावर असणाऱ्या हाताचा मेंदू कसा आहे ते आता पहावं लागणार. माथेफिरू, असंतुलित, अतिरेकी विचार पोसणारी माणसं आणि संघटना आता काय करू शकतात हे मलेशियन विमान पडण्यावरून लक्षात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *