माझं  दुष्काळ-सुकाळ हे मौजेनं प्रकाशित केलेलं पुस्तक छापून झालंय. लवकरच ते पुस्तकांच्या दुकानात विकण्यासाठी जाईल.
जतमधे कित्येक शतकं पाऊस पडतो पण लहरी. त्यामुळं पिकाचं गणित कोसळतं. जेवढा पाऊस पडतो तो खरं म्हणजे जतच्या जनतेला अगदी सुखात ठेवण्यासाठी पुरेसा आहे येवढंच नव्हे तर शेतीतलं उत्पन्न घेऊनही पाणी उरू शकतं. तरीही दर वर्षी तिथं टंचाई निर्माण होते. वर्षाचे चार एक महिने पाण्याची टंचाई असते, पाणी बाहेरून आणाव लागतं.गुरं जगवण्यासाठी चारा बाहेरून आणावा लागतो, लोकांना जगवण्यासाठी नाना प्रकारची मदत करावी लागते. कित्येक शतकं असं चाललं आहे. 
तेव्हां जतमधली टंचाई हे काय प्रकरण आहे ते तिथल्या लोकांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.
जतमधली टंचाई जाऊन तिथं मुबलकी येऊ शकते काय या प्रश्नाचा वेध या पुस्तकात घेतलेला आहे. चीन लोकसंख्येचा हिशोबात भारतापेक्षा मोठा. द.कोरिया लहान.  या दोन देशात भारतापेक्षा वाईट स्थिती परवापरवा पर्यंत होती. गेल्या तीस वर्षात ते दोन्ही देश भारताच्या तिपटीपासून वीस पटीपर्यंत पुढे गेले. उपासमारीसाठी प्रसिद्ध असलेला आणि अशिक्षिततेचा शिक्का कपाळी असलेला इथियोपिया आता सात टक्के वेगानं प्रगती करू पहात आहे. या देशांना प्रगती करणं कां शक्य झालं?
उपलब्ध असणाऱ्या साधनांची, हवं तर नैसर्गिक साधनांची म्हणा, कालसुसंगत जुळवाजुळव नव्यानं करणं ही विकासाची किल्ली आहे. पाणी आणि जमीन ही दोन साधनं ध्या. तंत्रज्ञान, यंत्रं, रसायनं वापरून माणूस या दोन गोष्टींपासून शेती करतो, वनस्पती निर्माण करतो, गुरं राखतो. जगात वीज नव्हती तोपर्यंत कारखाना नव्हता. त्यामुळं जमीन आणि पाणी यांचा शेती हाच मुख्य उपयोग होता, रोजगाराचंही तेच साधन होतं. वीज, कारखाना, उद्योग सुरु झाल्यावर चित्र बदलल. नवी उत्पादनं आली, नवे रोजगार आले.
१९९० नंतर माहिती तंत्रज्ञानानं उचल खाल्ल्यानंतर शेती उत्पादनाच्या तंत्रात, ऊर्जेच्या वापरात, पाण्याचा उपयोग आणि पुनरुपयोग यात खूप बदल झाले. थोडक्यात असं की माणसाच्या गरजा पुरेपूर भागवण्यासाठी खूपच कमी जमीन आणि खूपच कमी पाणी पुरतं हे लक्षात आलं. शिवाय नव्या वस्तू, नवी उत्पादनं, नव्या सेवा आणि त्यासाठी नवे रोजगारही शक्य झाले.
 तेव्हां आता समाजाची एकूण उत्पादन व्यवस्था आणि रोजगार व्यवस्था नव्यानं मांडता येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शेती आणि जमिनीचे उपयोग आता बदलता येणं शक्यच नव्हे तर अत्यावश्यक झालं आहे. पन्नास शंभर चारशे हजार दोन हजार इत्यादी वर्षांपूर्वी जे होतं तेच पुढं चालवायचं असं म्हणून चालणार नाही. वर उल्लेख केलेल्या देशांनी अगदीच नवी उत्पादनं शोधली, अर्थव्यवस्थेला निर्यातप्रधान केलं. 
गेल्या वीसेक वर्षामधे जग बदललं आहे. तंत्रज्ञान आणि िवज्ञानानं माणसाच्या सर्व गरजा भागवण्यासाठी तंत्रं, व्यवस्था शक्य आहेत हे दाखवून दिलं आहे. टंचाई/अभाव ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे, भविष्यात अभाव रहाणार नाही, मुबलकी अटळ आहे असं तंत्रज्ञान सांगतय. मुंबलकी तंत्रज्ञान जरूर देईल पण ती हाताशी येण्यासाठी आणि सर्वाना उपलब्ध होण्याची व्यवस्था मात्र समाजाला करावी लागेल, त्यासाठी व्यवस्था, संस्था यात बदल करावा लागेल. 
हजार दोन हजार वर्षं मानवाला नाना प्रकारच्या अभावांचा सामना करावा लागला. निसर्ग क्रूर होता. तो माणसाला धडपणानं जगूही देत नव्हता. मुलं जन्मायच्या आधी, पाच वर्षाची व्हायच्या आत मरत. समजा मूल वाचलं तर पुढं रोगराया. दीडेक हजार वर्षं तरी सरासरी माणूस जेमतेम ३५ वर्षं जगत होता. अशा अवस्थेत दुष्काळ अटळ आहे, तो आपल्या नशिबी लिहिला आहे असं माणूस मानू लागला. अभाव गृहीत धरून माणसानं आपली मूल्यं, अध्यात्म, धर्म इत्यादी गोष्टी अभावाच्या भोवती गुंफल्या. ही दीड दोन हजार किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची सवय. ती सवय अजून जात नाहीये. माणसानं आता मुबलकी, सुकाळ शक्यच नव्हे तर अटळ आहे ही खूणगाठ बांधली तर गोष्टी वेगानं बदलतील.

जतमधे दुष्काळ रहाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *