एकांतकोठडीतल्या कैद्यांचं वेबदैनिक

एकांतकोठडीतल्या कैद्यांचं वेबदैनिक

एकांतकोठडीतल्या कैद्यांचं वेबदैनिक
७९ वर्षाचे जेम्स रिजवे दर रोज सकाळी वॉकर रेटत वॉशिंगटनमधल्या आपल्या घरातून िनघतात आणि पोष्टात जातात. आताशा त्यांना वॉकर घेऊन येवढं चालणंही कष्टाचं असतं. दररोज सुमारे ५० पत्रं त्यांच्या नावे येतात. घरी परतल्यावर दिवसभर ते पत्र संपादित करतात. सॉलिटरी वॉच या त्यांनीच निर्माण केलेल्या वेबसाईटचा एक कर्मचारी येतो. पत्रांचा गठ्ठा घेऊन जातो. 
‘सॉलिटरी वॉच’ या वेब दैनिकात  तुरुंगात एकांतवासात खिचपत पडलेल्या माणसांची पत्रं आणि हकीकती छापल्या जातात. दररोज सुमारे २ हजार माणसं हे वेब वर्तमानपत्रं वाचतात. कधी कधी या पत्रात येणारी हकीकत जबरदस्त असली की वाचकांची संख्या खूप वाढते. काही दिवसांपूर्वी विल्यम ब्लेक या पंचवीस वर्षं एकांतकोठडीत अडकलेल्या माणसाची हकीकत प्रसिद्ध झाली. सहा लाख लोकांनी ती वाचली.
पत्रं गोळा करून छापणे हा रिजवे रिजवे यांचा नित्यक्रम २०१० सालापासून चालला आहे. रिजवे पत्रकार आहेत. गेली पन्नास वर्षं. ते तीस वर्षं वॉशिंग्टनमधल्या व्हिलेज वॉईस या दैनिकाचे प्रतिनिधी होते. वॉशिंग्टनमधील दुर्लक्षित कहाण्या शोधून काढणं हा त्यांचा हातखंडा. सार्वजनीक जीवनातल्या माणसांनी केलेली लफडी हुडकून काढण्याबद्दल ते प्रसिद्ध होते. लोक त्याना टरकत असत.
 २०१० साली रिजवे निवृत्त झाले. स्वस्थ बसवेना. प्रकृती साथ देत नव्हती त्यामुळं दैनिकात काम करणं शक्य नव्हतं. निवृत्तीच्या वेळी मिळालेले पैस गोळा करून त्यांनी सॉलिटरी वॉच सुरु केलं. ज्याँ कसेल्ला या एका पत्रकार स्त्रीला संपादक म्हणून नेमलं. 
एकांत कोठडीतल्या माणसांची दुःखं हा त्यांच्या वेबसाईटचा विषय. वेबसाईट म्हणजे एक प्रकारचं वेबदैनिक.
एकांतवासात कोंडलेल्या माणसांचे हाल होतात. परंतू त्याची वाच्यता होत नाही. कारण तुरुंगाधिकारी पत्रकारांना तुरुंगात, विशेषतः एकांत कोठड्यात जाऊ देत नाहीत. रिजवे पत्रकारी करत असताना एकांत कोठड्या पाहून आले होते. तिथले हाल त्यांनी पाहिले होते. त्यांचे संपादक या विषयावरची वार्तापत्रं छापायला तयार नसत. कारण कोठडीतला कैदी अट्टल भयानक गुन्हेगार मानला जातो. गुन्हेगार खोटंच बोलणार असं समाजानं गृहीत धरलेलं असतं. त्यामुळं त्याच्या तोडून ऐकलेल्या हकीकती छापायला संपादक तयार नसत.
रिजवेना आयडिया सुचली होती. कैद्यालाच पत्रकार करायचं, त्यालाच लिहायला लावायचं.निवृत्त झाल्यावर रिजवेनी कल्पना अमलात आणली, स्वतःचंच स्वतंत्र वेब दैनिक सुरु करून.
२६ वर्षं न्यू यॉर्कच्या तुरुंगातल्या एकांतकोठडीत विनाकारण अडकलेल्या ब्लेकनं पत्रात लिहिलं होतं “कोठडीच्या दारातून तुम्हाला दिवसाच्या कोणत्याही प्रहरात घाण घाण शिव्या ऐकायला येतात. अशा शिव्या की ज्या जगात इतरत्र कुठही उच्चारल्या जाणार नाहीत. कायच्या काय वरच्या पट्टीत माणसं ओरडत असतात. एकाच वेळी अनेक माणसं अनेक विषयावर ओरडत असतात. स्वतःची दुःखं. तुरुंगातल्या गैरसोयी. तुरुंगाधिकाऱ्यांची गैरवर्तणुक. नॉन स्टॉप.”
रिजवे दररोज पत्रांचा गठ्ठा घेऊन बसतात. प्रत्येक पत्र वाचतात. अलीकडं त्यांची दृष्टी अधू झालीय. फार वेळ वाचन करता येत नाही. थांबून थांबून वाचतात. दोन मदतनीस ठेवलेत. रिजवे घाऊक प्रमाणावर  स्वस्त  पोस्ट कार्डं विकत घेतात. ख्रिसमस किवा वाढदिवस इत्यादी प्रसंगी अनेक माणसं त्यांना वाईल्ड लाईफ इत्यादी संस्थांची भेट कार्डं पाठवत असतात. ती कार्डं रिजवे गोळा करतात. कार्डाच्या एका बाजूला प्राणी, पक्षी, निसर्ग याची सुंदर चित्रं असतात. पत्त्याच्या बाजूला चार ओळी लिहायला ठेवलेल्या जागेत ते लिहितात ‘पत्र लिहून हकीकत कळवल्याबद्दल आभार. धीर सोडू नकोस. हिमतीनं तोंड दे.’ पत्र एकांतकोठडीतल्या माणसाला जातं.
एका कैद्यानं विजेच्या धक्का घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जेलरनं तो हाणून पाडला. नंतर त्यानं हाताची नस कापायचं ठरवलं आणि तसं रिजवेना पत्रात कळवलं. रिजवेनी पत्र लिहून त्याला परावृत्त केलं. ‘धीर धर, वाट सापडेल, सुटशील’  असं त्यांनी त्याला पत्रात लिहिलं.
आपल्याला कोणीतरी आहे, आपलं कोणी तरी ऐकतय असं रिजवेच्या पत्रामुळं कैद्यांना वाटतं. कित्येक कैदी त्यामुळं सुखावतात, एकांतवास त्यांना   सुसह्य होतो.
न्यू यॉर्कचा रायकर्स आयलंड तुरुंग विमानतळाला लागूनच आहे. विमान आकाशात झेप घेताना खाली पाहिलं तर तो तुरुंग दिसू शकतो. आठ इमारती असलेल्या ४०० एकरात पसरलेल्या या तुरुंगात चारशे एकांतकोठ्या आहेत. १२ फूट बाय ७ फूटच्या या कोठडीत झोपायला एक खाट, कपडे ठेवण्यासाठी आणि इतर उपयोगांसाठी एक बादली आणि एक टंबलर ठेवलेला असतो. कोठडीत एकदा माणूस ढकलला की दरवाजा बंद. एका झरोक्यातून अन्न आत सरकवलं जातं. बस.  
एकांतकोठडीत कोणालाही ढकललं जातं. कायदे उल्लंघून.  जेलरची मर्जी. एकादा कैदी दंगा करू लागला, जेलरचं ऐकेनासा झाला, तुरुंगातल्या व्यवस्थेबद्दल तक्रार करू लागला की त्याला एकांतात ढकललं जातं.
कालीफ ब्रोडर या सोळा वर्षाच्या तरूणाच्या एकांतवासाच्या हकीकतीनं अमेरिकेत खळबळ उडाली. अडीच वर्षं कोणताही गुन्हा न केलेला निर्दोष कालीफ तुरुंगात, एकांतवासात अडकवला गेला. 
न्यू यॉर्कच्या ईस्ट साईडमधे रहाणारा कालीफ एकदिवशी मित्राबरोबर फिरत असताना समोरून पोलीस आले. तू लुटालूट केलीस असं म्हणत चौकीत घेऊन गेले. कालीफ म्हणत होता की माझे खिसे तपासा, मी आताच घराबाहेर पडलोय, मी कोणालाही लुटलं बिटलेलं नाहीये. पोलिसांनी खिसे तपासले, त्याच्याकडं काहीही नव्हतं. तरीही पोलिस त्याला चौकटीत घेऊन गेले. काही दिवसांपूर्वी एका मेक्सिकन माणसानं त्याला लुटल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून अनेक दिवस मधे गेल्यानंतर कालिफला अटक.
आरोपपत्र नाही. चौकशी नाही. सुनावणी नाही. कालीफचा असलाच तर गुन्हा असा की तो काळा होता.
कालीफचे आईवडील गरीब होते. जामीन  देण्यायेवढे किवा वकील नेमण्यापुरते पैसेही त्यांच्याजवळ नव्हते. मुलगा निष्पाप आहे, त्यानं गुन्हा केलेला नाही अशा विनवण्या सतत करण्यापलिकडं त्यांना काहीही करणं शक्य नव्हतं. सरकारी वकील दिला गेला. तो कोर्टात येत नसे. आला तर तारीख मागत असे. त्यानं आठ दिवस पलिकडली तारीख मागितली तर कोर्ट त्याला दोन महिन्यानंतर वगैरे तारीख देत असे. कोर्टाचं म्हणणं असं की न्यायाधीश आमि कोर्टांचा तुटवडा आहे, हज्जारो केसेल पडून आहेत, त्यामुळं दिरंगाई होते, खटले निकाली निघत नाहीत. 
 पुरावा नाही, चौकशी नाही, कालिफ तुरुंगात अडकून पडला. वकील आणि पोलिस सांगू लागले की गुन्हा कबूल केलास तर तुरुंगात गेलेले दिवस हीच शिक्षा मानून सोडून देऊ. आपण गुन्हाच केलेला नाही मग कबूल कां करायचा असं कालीफ म्हणत असे. चौकशी करा, सुनावणी करा, रीतसर खटला भरा आणि त्यात मला निर्दोष सिद्ध व्हायचंय असं कालीफ म्हणत होता.  त्याच्या या बोलण्याबद्दलच त्याला एकातवासात टाकण्यात आलं. एकांतवासात त्याला पोलिसांचे अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. तुरुंगात दादा झालेले गुंडही त्याला बडवून काढत. त्याच्या आईनं त्याला बरं खायला मिळावं यासाठी चार पैसे देत असे. दादा लोक ते पैसे लुटत असत. कालीफ पार उध्वस्थ झाला. अनेकदा त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  अडीचेक वर्षाच्या छळानंतर एकेदिवशी कोर्टानं त्याला पुराव्याअभावी निर्दोष ठरवलं आणि सोडून दिलं. तक्रार नोदवणारा माणूसच पोलिसाना सापडला नाही. तक्रारदार नाही तर आरोप कसा ठेवणार आणि सिद्ध करणार असं म्हणून न्यायाधिशान कालिफला सोडलं. 
तुरुंगाबाहेर आल्यावरही कालिफ मनोरूग्ण झाला होता, सामान्य जीवन तो जगू शकत नव्हता. दिवसरात्र त्याला भीती वाटे की आपल्याला कोणीतरी मारणार आहे. त्याला कोणी नोकरी द्यायला तयार नाही. रस्त्यावर फिरतांना समोरून पोलिस येताना दिसला की त्याला भीतीगंडाचा अटॅक येत असे. 
अमेरिकेतल्या नाना तुरुंगात लाखभर कैदी एकांतवासात आहेत. त्यातले कित्येक म्हणजे कित्येक वर्षानुवर्ष विनाकारण शिक्षा भोगत आहेत.
रिजवे यांचं नवं पुस्तक प्रसिद्ध होतंय, त्यात या साऱ्या कहाण्या आहेत. रिजवे यांची विविध विषयांवर अठरा पुस्तकं प्रसिद्ध झालीत.
जेम्स रिजवेनं केलेल्या पत्रकारीचा परिणाम म्हणा, कालीफची केस गाजल्यामुळ म्हणा अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यादेश काढला आणि लहान मुलांना, वयस्कांना, किरकोळ गुन्ह्याचा आरोप असलेल्यांना एकांतवास द्यायला बंदी घातली.
 नियम आणि कायदे न पाळणारे तुरुंग अध्यक्षाचा हुकूम पाळतील अशी अपेक्षा बाळगायची.
।।

2 thoughts on “एकांतकोठडीतल्या कैद्यांचं वेबदैनिक

  1. लेख आवडला. वागल्याच विषयावर वाचायला मिळाले. या निमित्ताने तुमच्या ब्लॉगवरचे अन्य काही लेखही वाचले. मजा आली. महितीपूर्ण शिवाय शैलीदार..
    शुभदा चौकर

  2. भारतातच असे प्रकार होत नाहीत तर! वाचून सुन्न व्हायला झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *