मॅक्समुल्लर ते वेलचेरू नारायण राव. भारतीय प्राचीन साहित्याची भाषांतरं.

मॅक्समुल्लर ते वेलचेरू नारायण राव. भारतीय प्राचीन साहित्याची भाषांतरं.

मॅक्समुल्लर ते वेलचेरू नारायण राव
भारतीय प्राचीन साहित्याची भाषांतरं
भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय साहित्याच्या भाषांतराला सुरवात केली. भाषेचा इतिहास आणि भाषेची रचना या शास्त्राचा अभ्यासक विल्यम जोन्सनं १७९४ मधे मनुस्मृतीचं इंग्रजीत भाषांतर केलं. त्यानंतर मॅक्समुल्लरनं the sacred books of the east या मालिकेत भारतीय ग्रंथांचं भाषांतर प्रकाशित करायला सुरवात केली. त्याची ५० भाषांतरं प्रसिद्ध झाली. त्यातली ३८ भाषांतरं संस्कृत ग्रंथांची आहेत. 
मॅक्समुल्लरनं ४९ ग्रंथांची सूची लिहिली. सूची लिहिणं हा प्रकार त्या काळात प्रचलीत नव्हता. मॅक्समुल्लरनं संपादक प्रकाशक विंटरनिट्झकडं सूची ग्रंथ सोपवला. विंटरनिट्झनं तो प्रकाशित करायला नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की सूची देणं योग्य नाही. वाचकानं संपूर्ण ग्रंथ वाचावा आणि स्वतः  पुस्तकात कुठं काय आहे त्याची नोंद ठेवावी. मॅक्समुल्लरचं म्हणणं की सूचीमुळं अभ्यासकाला मदत होते. वाद झाला. शेवटी मॅक्समुल्लरनं विंटरनिट्झला पटवलं. सूचीपुस्तकात ७० हजार नोंदी होत्या. प्रकाशकानं हिशोब मांडला, दोनेक वर्षात सूचीपुस्तक तयार होईल. पण नोंदी कंपोज करता करता त्याच्या नाकी नऊ आले. सूची पुस्तक प्रकाशित व्हायला १६ वर्षं लागली. सूची १९१० मधे प्रसिद्ध झाली.
 मॅक्समुल्लर नंतर जर्मन, फ्रेंच आणि डच अभ्यासकांनी भारतीय ग्रंथांची त्यांच्या त्यांच्या  भाषेत भाषांतरं केली. सर्व माणसांचा हेतू होता पूर्वेकडील प्रदेश समजून घेण्याचा. उत्सूकता. अठराव्या शतकाच्या आधी भारत आणि बाकीचं जग यात संपर्क जरूर होता. व्यापार चालत असे. परदेशी प्रवासी भारतात येत आणि काही भारतीय मंडळी (मुख्यतः व्यापारी) परदेशात जात. भारतावर राज्य करणाऱ्या परदेशी मंडळींनी पाठवलेल्या नोंदीमुळं भारताबाहेरच्या जगाला,  पश्चिमेतल्या देशांना,  भारताबद्दल काहीशी माहिती होती. परंतू त्यांना भारतातील  साहित्याची, धर्मग्रंथाची दीर्घ परंपरा  माहित नव्हती. फ्रेंच, डच, ब्रिटीशांनी भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न केला तिथून भारतीय साहित्याबद्दची माहिती जगात पोचू लागली. भारतविद्या (इंडॉलॉजी) अशी एक ज्ञानशाखाच त्या नादात विकसित झाली. भारतातले धर्म, भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास भारत विद्या या शाखेत जोन्स- मॅक्समुल्लरपासून सुरु झाला.
जोन्स मॅक्समुल्लर यांच्या नंतर भाषा आणि धर्माच्या अभ्यासाला अनेक वळणं आली. एकूणच ज्ञानशास्त्रामधेही नवनवे विचार आले. एडवर्ड सैद या माणसानं पुर्वदेशशास्त्र (ओरिएंटलिझम) म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित केला. पश्चिमेकडले लोक आपली पश्चिमी सस्कृती कशी थोर आहे ते दाखवण्याकरता पूर्वेकडलं साहित्य आणि संस्कृती अभ्यासतात असा आरोप सैद यांनी केला. भारतातल्या काहींचं म्हणणं आहे की हिंदू-भारतीय-संस्कृतीला बदनाम करम्यासाठी भारतीय साहित्याची भाषांतरं होतात, त्यावर समीक्षा केली जाते.
  सगळेच अभ्यासक आणि भाषांतरकार  राजकारणी होते असं नाही म्हणता येणार. जर्मनांना तर राज्य करायचं नव्हतं. मग जर्मन विचारवंतांनी भारतीय ग्रंथांची भाषांतरं कां केली? अभ्यासकांना आणि ज्ञानी माणसांना जग समजून घ्यायचं असतं हे नाकारता येत नाही.  अगदी अलिकडंच स्टेफानी जेमिसन आणि जोएल ब्रेरटन यांनी संपूर्ण ऋग्वेदाचं भाषांतर प्रसिद्ध केलं आहे. आजवरच्या भाषांतरांमधलं ते सर्वात परिपूर्ण आणि योग्य भाषांतर आहे असं अभ्यासक म्हणतात.
मॅक्समुल्लरनंतर Emile Senart नं उपनिषदांचं भाषांतर १९३० मधे प्रसिद्ध केलं. मूळ संस्कृत डाव्या पानावर आणि इंग्रजी भाषांतर समोरच्या पानावर. मूळ संस्कृत भाषेतला मजकूर वाचकांसमोर ठेवण्याची प्रथा तिथं सुरु झाली. १९११ साली Loeb Classical Library या पुस्तक मालिकेची सुरवात झाली. ग्रीक आणि लॅटिन अभिजात साहित्य या मालिकेत प्रसिद्ध झालं. हार्वर्ड विश्वविद्यालयानं ती प्रसिद्ध केली. २०११ साली या मालिकेला शंभर वर्ष पूर्ण झाली. जॉन क्ले या माणसानं ठरवलं की त्याच आकाराची, त्याच रंगाची, त्याच रीतीनं कंपोज केलेली संस्कृत साहित्याची मालिका करायची. या ब्रिटीश माणसानं पूर्वेकडल्या देशांत व्यापार करून अमाप संपत्ती मिळवली होती. पूर्वेकडल्या संस्कृतीबद्दल त्याला आदर होता. त्यानं भारतीय अभिजात साहित्य ‘ क्ले संस्कृत साहित्य मालिका ‘ या रुपात प्रकाशित केलं. क्लेच्या डोळ्यासमोर Loeb Classical Library चा आदर्श होता. २००५ ते २००९ या काळात क्लेनं ५६ पुस्तकं प्रसिद्ध केली. संस्कृत मजकूर आणि त्याचं इंग्रजी भाषांतर. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी प्रेसनं ही पुस्तकं संपादित करून प्रकाशित केली.
नंतर रोहन नारायण मुर्ती यांनी अभिजात साहित्यात उतरायचं ठरवलं. त्यांनी दिलेल्या देणगीतून आता Murthy Classical Library of India सिद्ध होत आहे. कोलंबिया विश्वशाळेतले भारतविद्या अभ्यासक शेल्डन पोलॉक ही मालिका संपादित करत आहेत. या मालिकेचं वैशिष्ट्यं म्हणजे  बांगला, कन्नड, मराठी, पाली, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू या भाषातलं साहित्य या मालिकेत प्रसिद्ध होतंय.
बल्लेशा यांची सुफी गाणी, अकबराचा इतिहास, सुरदासाच्या कविता, तुलसी रामायण,सहाव्या शतकातील कवि भैरवी याची किराट आणि अर्जुन  महाकाव्यं ही पुस्तकं आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत.
प्रसिद्ध झालेलं एक पुस्तक आहे अल्लासानी पेद्दना यांनी लिहिलेलं महाकाव्य. हे काव्य मनुस्मृतीवर आधारेलं आहे. तेलुगूत लिहिलेल्या मनुच्या गोष्टीचं इंग्रजीत भाषांतर. डावीकडं तेलुगू लिपीतला मजकूर आणि उजवीकडं त्याचं भाषांतर. वेलचेरू नारायण राव आणि डेविड शुलमन यांनी हे भाषांतर केलं आहे.
थेरीगाथा या बौद्ध भिक्षुणीच्या कविता संग्रहाचं चार्लस हेलिसे यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर  मुर्ती अभिजात मालिकेनं प्रसिद्ध केलं आहे. बुद्धांनी स्त्रियांना समान हक्क दिले, पुरुषाच्या बरोबरीचं मानलं.  भिक्षुणी संघ स्थापन केला. स्त्रिया प्रथमच चूल, मूल आणि संसारातून मुक्त झाल्या. ऊच्च ब्राह्मण स्त्रिया बौद्ध झाल्या, वेश्या बौद्ध झाल्या. नाना थरातून आलेल्या स्त्रियांनी  मुक्तीचा आनंद आणि अनुभव  पाली भाषेत कविता करून व्यक्त केला. थेरी म्हणजे सीनियर. ज्येष्ठ भिक्षुणींनी लिहिलेल्या कविता, थेरीगाथा. स्त्रियांनी केलेल्या जगातल्या पहिल्या कविता असा मान थेरीगाथाला दिला जातो. १८९९ मधे कार्ल न्युमन यांनी थेरीगाथाचं जर्मन भाषांतर प्रसिद्ध केलं होतं.
थेरीगाथातल्या एका कवितेचं जर्मनमधून इंग्रजीत झालेलं भाषांतर असं- बुद्ध सांगताहेत 
And now, nun, sleep well,
           wrapped in simple veils:
           dried up for you is the impulse of desire
           like dried herb in an earthen vase
हीच कविता हेलिसनं अशी अनुवादली आहे-
     So sleep well, covered with cloth you have made,
                your passion for sex shriveled away
                like a herb dried up in a pot.
एकीकडं बौद्ध झालेल्या स्त्रिया शरीर वगैरे भानगडीतून सुटत आहेत तर दुसरीकडं पेद्दनाच्या मनुच्या गोष्टीमधे विरुतिनी ही अप्सरा आपलं अमरत्व सोडून पृथ्वीवरच्या मर्त्य जीवनातला आनंद घ्यायला आसुसली आहे. घाम येणं यासारखी एक अगदी मानवी भावना तिला अनुभवायची आहे. पेद्दनाच्या कवितेतल्या तेलुगु ओळींचं डेविड शुलननं केलेलं भाषांतर असं-
Fluttering glances healed
her inability to blink, and for the first time
she was sweating. Even her surpassing
understanding was healed by the new
confusion of desire. Like the beetle that,
from concentrating on the bee, becomes
a bee, by taking in that human being
she achieved humanity
with her own body.
भाषांतरकाराच्या समजुती, कौशल्य, काळाच्या ओघात मिळणारी नवी माहिती यामुळं भाषांतरं कशी बदलतात, सिद्ध होतात याचं प्रत्यंतर वरील भाषांतरांतून येतं.
।।

One thought on “मॅक्समुल्लर ते वेलचेरू नारायण राव. भारतीय प्राचीन साहित्याची भाषांतरं.

  1. छान उपक्रम. मराठीत इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे पुष्कळ , परंतु प्राचीन भारतीय भाषांतील पुस्तकांची भाषांतरे दुर्मिळ . आपल्या बर्यावाइट परंपरांची ओळख असणे महत्त्वाचे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *