रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ?
।।।
आज २०१६ सालचा एप्रिल उजाडतोय. एक वर्षं झालं. एप्रिल २०१५ साली विकत घ्यायचं ठरलेल्या  ३६ लढाऊ रफाएल विमानांच्या  खरेदीचा करारही झालेला नाही, विमानं येण्याचं राहू द्या.
१५ एप्रिल २०१५ रोजी फ्रान्सच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील  विमानं तयार स्थितीत भारताच्या ताब्यात येतील अशी घोषणा केली. दौऱ्यात त्यांच्या सोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर होते.  
रफाएल विमानांचा एकूण लोचाच दिसतोय.
२००० साली भारतीय हवाई दलातली मिग-२१ जातीची  विमानं म्हातारी झाली होती, अपघात होत होते. त्यांच्या जागी योग्य लढाऊ विमानं भारत सरकारला हवी होती. भारताला सुदृढ हवाई दलासाठी एकूण १२६ लढाऊ विमानांची गरज होती. ती विकत घेण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला.
२०००. भारत सरकारनं  १२६  मध्यम बहुभूमिका विमानांबाबत (मबवि)फ्रेंच सरकारकडं विचारणा केली.  
 २००१ साली भारत सरकारनं १२६ मबवींची मागणी फ्रेंचांकडं नोंदवली. 
२००१ ते २००६ विमानं घेण्याबाबत फार घोळ चालला, निर्णय होऊ शकला नाही. 
२००७ साली भारत सरकारनं १२६ मबविसाठी ४२,००० कोटी रुपयांचं आंतरराष्ट्रीय टेंडर काढलं. अमेरिकन, रशियन, युरोपियन आणि फ्रेंच कंपन्यांनी टेंडरं भरली.
२०११ साली भारत सरकारनं अमेरिकन, रशियन, युरोपीय कंपन्यांची टेंडरं नाकारली आणि फ्रेंच कंपनी दसॉल्टचं टेंडर स्वीकारलं. 
२०१२ साली फ्रेंच कंपनीनं कळवलं की पुढल्या ३ वर्षात १२६ पैकी १८ विमानं भारताला दिली जातील आणि उरलेली विमानं भारताच्या बंगळुरुतल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कारखान्यात तयार होतील.
२०१३ साली वाटाघाटी चालू राहिल्या.
२०१४ साली भारतान कळवलं की बजेटात पैसे नसल्यानं २०१५ पर्यंत खरेदीचा करार सरकार करू शकत नाही.
१५ एप्रिल २०१५ रोजी नरेंद्र मोदींनी पॅरिसमधे ३६ रफाएल विमानांच्या खरेदीची घोषणा केली. पत्रकारांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांना विचारलं की आधीच्या १२६ विमानांच्या खरेदीचं काय झालं. त्यावर पर्रीकर उद्गारले ‘ कोणतीही कार एका वेळी एकाच रस्त्यावर चालू शकते, दोन रस्त्यांवर नाही.’
२०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर भारत सरकारनं सांगितली रफाएल विमानाच्या खरेदीची बोलणी चालली असून अगदी काही दिवसांतच खरेदीचा निर्णय पक्का होऊन करारावर सह्या होतील, विमानं भारतीय हवाई दलात सामिल होतील. किती विमानं आणि केव्हां सामिल होणार याचा तपशील सांगितला गेला नाही.
रफाएल खरेदीच्या  निर्णयावर चर्चा झाली. रशियन सुखोय विमान रफाएलइतकंच कार्यक्षम आणि उपयुक्त असून त्याची किमत रफाएलपेक्षा कमी होती.  भारताची गरज १२४ विमानांची होती आणि मिळू घातली होती ३६ विमानं. दसॉल्ट कारखान्याची रफाएल विमानांची  उत्पादन क्षमता मर्यादित होती. कंपनी इजिप्तला ही विमानं वेळापत्रकाप्रमाणं पुरवू शकली नव्हती. भारताच्या वेळापत्रकानुसार कंपनी रफाएल विमानं पुरवू शकणार नाही असं विमान क्षेत्रातले अभ्यासक म्हणत होते. रफाएल भारतीय हवाई दलात सामिल होई पर्यंत त्यापेक्षा अधिक विकसित आणि पुढल्या पिढीची लढाऊ विमानं बाजारात येत होती, चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलात सामिल होण्याची शक्यता होती.मग भारत सरकार रफाएलची खरेदी कां करतंय असा प्रश्ण विचारला जात होता.
सुरवातीला ३६ रफाएलची किमत १२ अब्ज डॉलर सांगण्यात आली. भारती हवाई दलाच्या विशेष गरजा या विमानात अंतर्भूत नव्हत्या. त्या गरजा पूर्ण करायच्या तर १८ अब्ज डॉलर द्यावे लागतील असं फ्रेंच म्हणाले. मधल्या काळात एकूणच जगातल्या किमती वाढल्यानं आणि विमानात कराव्या लागणाऱ्या सुधारणांची   किमत वाढल्यानं फ्रेंचांनी २४ अब्ज डॉलर मागितले.
या साऱ्या गोष्टी माध्यमांतून चर्चिल्या जात होत्या, दोन्ही सरकारं या बाबत काहीही बोलत नव्हती.
करार होत नव्हता.
भारत सरकारची मागणी होती की विमानं वेळेवर मिळाली नाहीत तर दिरंगाईसाठी  फ्रेंचांनी दंड द्यावा. फ्रान्स तसा दंड द्यायला तयार नाही. भारत सरकारनं बँक हमी मागितली. फ्रेंच तयार नाहीत. त्या बदल्यात फ्रेंच सरकार एक comfort letter देऊ म्हणतय. comfort letterचा अर्थ काय? घाबरू नका, आम्ही जरूर विमानं देऊ, चिंता करू नका अशा आशयाचं गोड भाषेत लिहिलेलं पत्र. फ्रेंच सरकारची इच्छा आहे की विमानांची ठरलेली किमत  भारत सरकारनं फ्रेंचांना आधीच द्यावी, प्रत्यक्ष विमानं हातात पडायच्या आधीच. भारत सरकार तयार नाही कारण अनेक बाबतीत भारत सरकारला खात्री वाटत नाही.
ऑफसेट कलम हा एक मोठ्ठा वादाचा मुद्दा अनिर्णित आहे. १२६ विमानांची मागणी करताना भारतानं ५० टक्के रक्कम ऑफसेट मागितली होती. ऑफसेट म्हणजे मोबदला. म्हणजे असं की विमानाची किमत शंभर रुपये असेल तर फ्रेंचानी ५० रुपयांची गुंतवणूक भारतामधे कारखाने उभारण्यात खर्च करावी जेणेकरून भारतातले रोजगार वाढतील. अशी भरपाई देणं म्हणजे शेवटी विमानाचा उत्पादन खर्च वाढवणंच असल्यानं फ्रेंचांनी नकार दिला आणि १२६ विमानांची मागणी कोसळली. ३६ विमानांचा करार करताना भारतानं ३० टक्के भरपाई मागितली आहे. फ्रेंच सरकार त्याला तयार नाही. 
मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत सरकार परदेशी गुंतवणूक भारतात यावी आणि भारतात रोजगार वाढावा या प्रयत्नात आहे. रफाएलच्या बदल्यात अशी गुंतवणूक विमान उद्योगात किंवा इतर उद्योगात फ्रेंचानी करावी असा सरकारचा प्रयत्न आहे. फ्रेंच सरकार आणि भारत सरकार यांमधे कोणत्या उद्योगात किती पैसे फ्रेंचांनी गुंतवावेत यावर एकमत होत नाहीये.
आणखी एक मुद्दा संभाव्य भांडणं सोडवण्याचा. काही मतभेद झाले, भांडणं झाली, कराराचं पालन झालं नाही  तर त्यासाठी आवश्यक लवाद भारतातच  नेमला जावा अशी भारत सरकारची मागणी आहे. फ्रेंच सरकारचं म्हणणं आहे की लवाद जेनेवात असावा.
एकूणात करार होत नाहीये हे जगाच्या लक्षात आल्यावर लॉकहीड या अमेरिकन कंपनीनं भारतासमोर अमेरिकन लढाऊ विमानं स्वस्तात द्यायची तयारी दाखवली. ही विमानं स्वस्तात मिळत होती कारण या विमानाची उत्पादन प्रणाली आता कालबाह्य झाली होती. भंगारमधे जाऊ पहाणारी उत्पादन प्रणाली अमेरिका भारताच्या गळ्यात मारू पहात होती. खुद्द रफाएलसुद्धा कालबाह्य होत असल्याची चर्चा आहे.
२६ जानेवारी २०१६ रोजी फ्रान्सचे अध्यक्ष होलाँ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या भेटीचा गाजावाजा झाला.  भेटीच्या वेळी करारावर सह्या होतील असं वातावरण भारत सरकारतर्फे तयार करण्यात आलं.
 चीनकडं आज ९१३ लढाऊ विमानं आहेत. २०२० पर्यंत चीनमधल्या अद्यावत लढाऊ विमानांची संख्या १३०० होणार आहे. पाकिस्तानजवळ नाना पिढ्यांची २८९ विमानं आहेत. भारताजवळ सध्या ३२२ विमानं आहेत, त्यातली बरीच (म्हणजे नेमकी किती ते कळत नाही) निरूपयोगी ठरत आहेत. चीन आणि पाकिस्तानशी तुल्यबल होण्यासाठी  २०२७ सालपर्यंत भारताला  ७५० ते ८०० विविध जातीच्या अद्यावत विमानांची जरूर असेल.  
आधीचं काँग्रेसचं सरकार असो की आताचं भाजपचं सरकार असो, विमानांची खरेदी कां जमत नाहीये? पैसे नाहीयेत की आंतरराष्ट्रीय व्यवहारात आवश्यक असलेली चलाखी, माहिती आणि सरावाचा अभाव आहे? राजकीय इच्छाशक्ती आणि हुशारीचा अभाव आहे?
विमानाचा करारही झालेला नसताना सुरवातीपासून सरकार सतत गाजावाजा कां करतंय? 
चांगली आणि भरपूर विमानं लवकरात लवकर भारताच्या हवाई दलात सामिल होवोत म्हणजे मिळवली.

11 thoughts on “रफाएल विमानं केव्हां येणार ?

  1. This article is to defame Modi government. I found most of the articles of Nilu Damle against BJP and he never mention frauds in defense deals in UPA regime.

  2. Indian government don't have the smartness which is required in international level trade. Mr. Modi is busy in making marketing of himself and Mr.Manmohan Singh always afraid of corruption so he also did't act on same.

  3. १. युपीए म्हणजे काँग्रेसची सरकारं. त्या काळात मी अनंत वेळा त्यांच्यावर झोड उठवलेली आहे. सरकारचं जेव्हां जेव्हां चुकतं असं वाटतं तेव्हां तेव्हां ते मी मांडलेलं आहे, ते पत्रकाराचं कामच असतं. त्यामुळं भाजप सरकारचीही त्यातून सुटका नाही.
    २. भाजप सरकारनं विमानांची घोषणा केली पण विमानं अजून आलेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे ती इतरांच्यावर टीका करून बदलू शकत नाही.

  4. ब्लॉग पुन्हा वाचून पहावा. विमान खरेदीची गोष्ट २००० साली सुरु झाली. तेव्हां भाजपचं सरकार होतं. नंतर २००४ ते १४ युपीएचं सरकार होतं. दोन्ही सरकारांना विमान खरेदी तडीस नेता आली नाही. आता पुन्हा भाजपचं सरकार आलं आहे. या सरकारनंही वर्षभरात पत्रकं काढली, अजून करारही झालेला नाही.

  5. मला आपल्याबद्दल खुप आदर वाटतो.फार महत्वाचे आपण जबाबदारीने lmpartially लीहीत आहात.

  6. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे सामान्यांना या विषयाचे थोडेफार आकलन होण्यास मदत होईल. संरक्षण क्षमतेबाबतची दिरंगाई व निष्काळजीपणा यामुळे चिंता वाटते. आपले लेखन नेहमीच अचूकपणे व्यवस्थेतील दोष, उणीवा दाखवणारे निष्पक्ष असते.

  7. दामले सर, लष्करी विमान म्हणजे भाजीपाला नव्हे, UPA gov. जे 10 वर्षात करू शकले नाही ते काम पूर्ण करण्यासाठी नवीन मिनिस्टर ला थोडा वेळ द्या, त्यात काही चूका राहून गेल्या तर इतकी घाई करायची काय आवश्यकता होती म्हणून तुम्ही दुसरा सुमार दर्जाचा उपदेशपर लेख लिहाल. दरम्यानच्या काळात पर्रीकर यांनी किती सगळी महत्वाची कामे केली, प्रोकरेमेन्ट पोलिसी मध्ये कसे क्रांतिकारी बदल केले,36 रफाएल घेऊन कोणी इतर कंपनी knowledge transfar देण्यास तयार असेल तर मेक इन इंडिया अंतर्गत 'तेजस' च्या त्रुटी दूर करून आपली गरज स्वतः भागऊन पैसे वाचवता येतील का? या व इतर अनेक शक्यता वर संरक्षण मंत्री काय काम करत आहेत यावर थोडा प्रकाश टाकला असता तर आपल लिखाण पूर्वग्रह दूषित नाही व आपण अभ्यासपूर्ण लिहिता अस म्हणता आल असत. असो, निखिल वागळे आणि मुणगेकर इतकेच आपण पण विद्वान, पण असे विद्वान विवेकानंद आणि आंबेडकरांच्या पण वाट्याला आले होते त्यामुळे मी दुर्लक्ष करणे बेहतर समजेल पण आपल्याकडून होत असलेला अर्थपूर्ण विरोध चांगलं काम करणाऱ्या लोकांबद्दल पण नकारात्मक वातावरण तयार करून त्यांचा हुरूप कमी करण्याचे व या देशाच्या येणाऱ्या पिढ्याचं नुकसान आपण नकळत करत असल्याची जाणीव करून देणे मी आपले कर्तव्य समजतो. दुसरे, सुखोई विमान हे निसंदेह चांगलं विमान आहे पण चीन आणि रशिया चे वाढते सम्बन्ध, 'पाक-फा' या संयुक्त प्रकल्पात knoweledge transfer करण्यात रशिया कडून केली जाणारी टाळाटाळ व स्वसंरक्षानासाठी एकाच देशावर अवलंबून राहण्यात असलेली अपरिपक्वता असे अनेक कंगोरे रफाएल खरेदी करण्यामागे आहेत.. आपल्या प्रगल्भ ज्ञानदाना साठी शुभेच्छा.

  8. मोदी सरकारला वेळ दिला पाहिजे हे खरं आहे. कोणतंही सरकार निवडून आल्यावर त्याला काम करायला वेळ द्यावा लागतो. सरकारची कामगिरी ही सरकारच्या हातून झालेल्या कामावरून जोखली जाते. कामगिरी जोखण्यासाठी कामगिरी व्हावी लागते, त्यासाठी वेळ लागतो.
    परंतू कामगिरी करत असताना धोरणात्मक चुका असतील, कामगिरीच्या प्रक्रियेत चुका होत असतील तर त्यावर वेळीच लक्ष ठेवावं लागतं. सगळं मुसळ केरात जाईपर्यंत थांबणं धोक्याचं असतं. म्हणूनच कटुता पत्करूनही माध्यमं आणि विरोधी पक्षांना सरकारच्या वाटचालीवर टीका करावी लागते.
    एक चांगलं काम झालं असेल तर त्याचा बदला म्हणून एका बंडल कामाकडं दुर्लक्ष करण्याची मागणी करणं योग्य नाही. पर्रीकरांनी किंवा मोदींनी अंतिम साध्य झालेली कोणती कामं केलीत ते अजूनही बाहेर आलेलं नाही.
    परदेशातून विमानं विकत घेत असताना फार काळजी आधीच घ्यावी लागते. फ्रेंच, अमेरिकन कंपन्या त्यांचं जुनं झालेलं तंत्रज्ञान लोकांच्या माथी मारतात. तंत्रज्ञान आणि यंत्रं. गरजवंत, भाबडे देश ते तंत्रज्ञान विकत घेतात. दसॉल्ट आणि लॉकहीड या दोन्ही कंपन्या हाच उद्योग करत आहेत. भारताची पंचाईत अशी की भारताला स्वतःचं तंत्रज्ञान तयार करता आलं नाही. एकेकाळी चीनची हीच पंचाईत होती. पण २००० सालानंतर चीननं विमानं, बोटी बांधण्याचं तंत्रज्ञान स्वतः विकसित करून स्वतःची विमानं तयार केली.
    पर्रीकर किंवा मोदीं यांना या गोष्टी माहित असायला हव्यात. या बाबतची माहिती त्यांच्याकडं असायला हवी. याच माहितीच्या आधारे त्यानी विमानं विकत घेण्याचे कयरार करायला हवेत. तेव्हा मोदी किंवा पर्रीकर कराराची घोषणा करतात तेव्हां माध्यम आणि विरोधी पक्षांनी या वास्तवाकडं लक्ष वेधून योग्य निर्णय घ्यायला सरकारला मदत करायला हवी. यासाठी माध्यमं, जाणकार, विरोधी पक्षातले समंजस नेते यांच्याशी सरकारचा संवाद असायला हवा.
    मुद्दा असा की निर्णयाचे परिणाम भोगेपर्यंत थांबता येत नाही. विरोधी किंवा माध्यमं यांनी केलेल्या टीकेचा विधायक उपयोग अमेरिकेत, ब्रीटनमधे, जर्मनीत राज्यकर्ते कधी कधी करताना दिसतात. माध्यमं आणि विरोधक काय म्हणतात पहा, तुम्ही फसवताय असं त्यांना वाटतंय तेव्हां खरं काय ते सांगा असं राज्यकर्ते पलिकडच्या लोकांना सांगतात. मोदी किंवा पर्रीकरांनी हे करायला हवं.
    दसॉल्ट समजा विमानांचं तंत्रज्ञान आणि उभारणीची यंत्रणा देणार असेल तर ती यंत्रणा कशी आहे, त्याची किमत काय, फ्रान्स करार पाळेल की नाही की त्या बदल्यात तिसरीच लचांडं पाठी लावेल याची काळजी मोदी-पर्रीकरांनी घ्यावी.
    या व अशा अनंत बाबी जाणकारांच्या वर्तुळातून सांगितल्या जातात. मोदी पर्रीकर या बाबत किती पूर्वतयारी करून जातात ते कळत नाही. विमानं येणार अशी घोषणा केली जाते आणि वर्ष झालं तरी करारही होऊ शकत नाही याचा अर्थ पूर्वतयारी नव्हती असा होतो. म्हणजे ते निवडणुकीत प्रचार सभेत केलेलं भाषण ठरतं.
    मोदी-पर्रीकरांनी ते टाळावं.
    भारतीय नोकरशाहीतले दोष याला कारणीभूत आहेत. नोकरशाही चालढकल करते. नोकरशाही राजकारण करते. नोकरशाही सत्ताधाऱ्यांना खुष ठेवून कामं टाळतात. विज्ञान, तंत्रज्ञानाचा विकास इत्यादी गोष्टीत नोकरशाहीला कमी रस असतो. त्याना सामान्यतः आपली खुर्ची टिकवायची असते आणि संधी मिळेल तेव्हां चमकोगिरी करून जमेल तेवढी सत्ता आणि पैसा हाणायचा असतो.
    नोकरशाही ही अडचण प्रत्येक सरकारसमोर असते, असणार आहे. मोदी आणि पर्रीकरांनाही त्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
    तेव्हां त्यावर वाट काढण्याची खटपट त्यांच्याकडून अपेक्षा आहे. भाषणबाजी करून, वेगळं मत मांडणाऱ्यांची टिंगल करून, लोकांना भुलवत ठेवून राज्य करण्याची परंपरा भारतात काँग्रेसनं सुरु केली आहे.
    भाजप-मोदींचं सरकार तीच वाट अवलंबत आहे. ते त्यांनी टाळायला हवं.
    त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे माध्यमाचं काम आहे.

  9. मोदी सरकारची कामांची जाहिरात करण्याची घाई चुकीचीच आहे. काम सुरू व्हायच्या आधीच आपले कौतुक करून घ्यायचे. त्याला कोणी विरोध केला तर अनेक अविचारी व अभ्यास नसलेली शिक्षित फौज आलीच अंगावर

  10. आपण जेव्हा लिहतात की Dasuult आणि Lockheed सारख्या कंपन्या जुनं झालेलं तंत्रज्ञान भाबड्या देशानं विकता व त्या अनुषंगाने मोदींवर बोट ठेवता तेव्हा अत्यंत नम्रपणे नमूद करावेसे वाटते, कि एकतर आपलं या विषयाच ज्ञान अत्यंत उथळ आहे किंवा आपण हेतुपूर्वक टीका करत आहात अथवा टीका करणे हा आपला छंद आहे.. आपल्याला जाणीव करून देऊ इच्छीतो कि पर्रीकर हे केरात already गेलेलं मुसळ शोधण्याचं काम करत आहेत, ते त्यांना करू द्या. आपण केलेलं लिखाण आपण थोड आधी केलं असत तर हि वेळ अली नसती.. आपल्या ज्ञानदाना साठी शुभेच्छा.. दरम्यान.. @ETDefence's Tweet: https://twitter.com/ETDefence/status/721030852860329984?s=09

    @ETDefence's Tweet: https://twitter.com/ETDefence/status/720627909317107712?s=09

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *