मुंबई आणि भारतात टीबीचा हैदोस

मुंबई आणि भारतात टीबीचा हैदोस

टीबीच्या प्रसाराकडं दुर्लक्ष होतंय.
।।
दहीहंडी खेळून मराठी संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न मुंबईत चालला असताना, मुंबई पालिकेच्या शाळेत सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती करण्यावरून वाद चालला असताना, मुंबईत टीबीचे रोगी वाढलेत ही गोष्ट दुर्लक्षित राहिलेली दिसते.
मुंबईत दर वर्षी सुमारे ६० हजार माणसं टीबीनं बाधित होतात. (हा आकडा २०१० सालचा आहे.) ही माणसं सरकारी, खाजगी आणि वैद्यकीचं  अपुरं (चुकीचंही) ज्ञान असणाऱ्या माणसांकडं उपचारासाठी जातात. बहुसंख्य माणसं खाजगी डॉक्टरकडं जातात. मोजक्या  डॉक्टरांचं वर्तन सोडल्यास बहुतेक उपचार केंद्रात पाट्या टाकल्या जातात. नियमितपणे औषध घेणं, रोगाची प्रगती वेळोवेळी तपासणं या बाबतची माहिती रोग्यांना दिली जात नाही. माणसं उपचार काही दिवसांतच सोडून देतात. हॉस्पिटलात दाखल केलं गेलं तर तिथली आरोग्य व्यवस्था आणि उपकरणं निरुपयोगी असल्यानं रोग नाहिसा व्हायच्या ऐवजी इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होते. औषधांत पंचवीस टक्के औषधं निरुपयोगी, दर्जाहीन असतात. थोडक्यात असं की मुंबईतली टीबीला तोंड देणारी व्यवस्था अत्यंत म्हणजे अत्यंत अपुरी आणि सदोष आहे. परिणाम असा की रोग दूर होत नाही, रोग्यांची संख्या वाढत जाते.
 भयानक गोष्ट म्हणजे औषधांना न जुमानणारे टीबीचे जंतू तयार होतात आणि रोगप्रसार वाढत जातो. कित्येक जंतू आणि रोगी कोणत्याही औषधांना दाद देत नाहीत. अशांची संख्या किती आहे ते कळायला मार्ग नाही.
टीबीची लागण झालेले रोगी, औषधांना दाद न देणारे जंतू घेऊन फिरणारे लोक, मुंबईत हिंडत असतात.मुंबईत रस्त्यावर, मार्केटमधे, बस किंवा ट्रेनमधे, सिनेमाघरात किंवा मॉलमधे, बारमधे किंवा खाणावळीत वावरतांना आपल्या असलेला माणूस टीबीचे जंतू बाळगणारा असण्याची दाट शक्यता असते.
मुंबईत एका किमीमधे ५० हजार माणसं दाटीवाटीनं रहातात. अर्धी माणसं अस्वच्छ वस्त्यांमधे रहातात. तिथं पाणी मिळत नाही. तिथं शुद्ध पाण्यात सांडपाणी मिसळतं. तिथले कचऱ्याचे ढीग कायम शिल्लक असतात, जंतू बाळगत आणि वाढवत. तिथं खड्डे असतात, जागोजागी पाणी साचलेलं असतं, त्यात डास वाढत असतात. माणसांना दररोज एक आंघोळही धडपणे करता येत नाही इतकं पाणी उपलब्ध असतं.
स्वच्छ किंवा सुखवस्तू वस्त्यांची स्थिती वेगळी नाही. तिथं घरामधे एसी असतो आणि आधुनिक फर्निचर असतं. पण घराच्या बाहेर पडलं रे पडलं की मुंबई पालिकेनं मुक्त हस्तानं वाटलेली अस्वच्छता पसरलेली असते. टोलेजंग इमारतीच्या बाहेर कचऱ्याचे ढीग असतात,  अस्वच्छ पदार्थ विकणाऱ्या गाड्यांवर लोक खात असतात, घाण पसरवत असतात.
अस्वच्छ वस्त्या स्वच्छ वस्त्यांना चिकटून असतात. श्रीमंत टोलेजंग टॉवर अस्वच्छ झोपड्यांमधे विसावलेले असतात. अस्वच्छ वस्तीत राहून टीबी बाळगणारी माणसं स्वच्छ घरात विविध कामं करायला जातात. घराची झाडलोटच नव्हे तर स्वयंपाकही ही टीबीग्रस्त माणसं करत असतात. टीबीग्रस्त माणसं शहरभर फिरत असल्यानं ती रोग मुक्तपणे पसरवत असतात.  स्वच्छ वस्तीतल्या सुखवस्तू लोकांमधे दर एक लाखांत ४५८ माणसं टीबीचे रोगी असल्याचं पाहणीत आढळून आलं होतं. अस्वच्छ वस्त्यात हे प्रमाण लाखात ६०० इतकं पडतं. म्हणजे रोगाबाबत मुंबईत समता आहे असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईतल्या टीबीची आठवण निघाली याचं कारण लॅन्सेट या प्रतिष्ठित आरोग्य मासिकानं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करून भारतातल्या टीबीची परिस्थिती सांगितली आहे. जगात ९६ लाख टीबीचे रोगी असून त्यातले ३५ लाख भारतात आहेत. त्या ३५ लाखातले लाखभरापेक्षा मुंबईत असण्याची शक्यता आहे. मुंबई पालिका, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची संबंधित खाती नेमकी माहिती देऊ शकत नाहीत. अचूक माहिती गोळा करण्याची प्रथा भारतीय संस्कृती आणि परंपरेत नाही.  व्यावसायिक
शिस्त पाळणाऱ्या काही विदेशी संस्था पहाण्या करतात तेव्हां आपल्याला वास्तव कळतं. मुंबईबाबत सध्या नेटवर उपलब्ध असलेली पहाणी २०१० सालची आहे आणि तिच्यातही अंदाजे भाग बराच आहे.
टीबी या त्रासदायक प्राणघातक रोगाची कारणं उघड आहेत. अस्वच्छता हे एक कारण आहे. अपुरा आणि सदोष आहार हेही एक कारण आहे.  रोगजंतू गरीब-श्रीमंत असा भेद करत नसल्यानं अगदी सुखवस्तू घरातही या रोगाची लागण होते. हा रोग व्यक्तिगत पातळीवर आटोक्यात आणणं कठीण असतं, तो सार्वजनिक पातळीवरच हाताळावा लागतो.   एकूण वातावरण रोगाला उपकारक असल्यानं व्यक्तिगत काळजी अपुरी ठरत असते.
मुंबईच्या हद्दीपर्यंत बोलायचं झालं तर सार्वजनिकतेची काळजी घेणाऱ्या संस्थांना या भयानक परिस्थितीची जबाबदारी टाळता येणार नाही. पालिका आणि महाराष्ट्र सरकार या बाबत अपेशी ठरलेलं आहे. उत्तरोत्तर परिस्थिती बिकट होत असतांना राजकीय पक्ष आपले कार्यकर्ते आणि नेते आपले  खिसे भरण्यात मशगूल दिसतात. निवडणुका जिंकणं येवढ्या एकाच गोष्टीत राजकीय पक्षांना रस दिसतो. मतं आकर्षित करण्यासाठी गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, ईद, साईबाबा उत्सव, जैनांचे सण इत्यादीवर राजकीय पक्ष वेळ खर्च करतात. वरील बहुतेक सर्व उत्सव अप्रत्यक्षपणे अस्वच्छता वाढवत असतात, नागरिकांची प्रतिकारक्षमता कमी करत असतात याकडं राजकीय पक्षांचं लक्ष नाही.
शुद्ध पर्यावरण आणि शिक्षण या सरकार व पालिकेच्या जबाबदाऱ्या आहेत. माणसाला पोषक आहार मिळेल इतपत रोजगार माणसाला उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार आणि पालिका या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत म्हणून टीबीसीरखं संकट अधिकाधीक गडद होत चाललंय.
काय करायचं या पक्षांचं आणि कंठाळी-भ्रष्ट पुढाऱ्यांचं?

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *