पन्हा एकदा धर्म

  मुद्दा
आहे धर्म आणि संस्कृती,धर्म आणि चालीरीती यांच्यातल्या नात्यांचा.
पन्नास हजार ते एक
लाख वर्षं हा धर्म, देव, श्रद्धा यांच्या निर्मितीचा काळ मानला जातो. सभोवतालचं
वास्तव आणि माणसाचं जगणं-मरणं यातल्या अनेक गोष्टींचा खुलासा विज्ञान-तंत्रज्ञान-उपकरणं
 यांच्या नसण्यामुळं होत नव्हता.  त्या त्या काळात लोकांनी देव, उपासना इत्यादी
गोष्टी कल्पिल्या. माणसं काहीही खात होती. कोणालाही मारत होती. कोणाशीही शरीर
संबंध ठेवत होती. शक्तीवान प्रबळ ठरत असे.
काळ पुढं सरकल्यावर
जगात नाना ठिकाणी नाना  स्थितीनुसार देव, माणसांनी
उपासना या गोष्टी समाज बांधणीसाठी वापरायला सुरवात केली. चालीरीती, संस्कृती या
गोष्टी नियंत्रित करण्यासाठी देव, उपासना 
यांतील क्रिया, प्रक्रिया, चालीरीती, कर्मकांडं यांचा वापर केला.
कोणी अनेक
स्त्रियांशी लग्न करणं धर्मात बसवलं,कोणी एक पती एक स्त्री अशी गोष्ट धर्मात
बसवली. कोणी लढाया करून, माणसं मारून इतरांना जिंकणाऱ्याला देव-देवाचा अवतार मानलं.
कोणी जगातल्या सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग 
करणाऱ्याला देव-देवाचा अवतार मानलं. कोणी मांस खाऊ नका म्हटलं कोणी मांस
खाणं हे एक पवित्रकर्म मानलं. एके काळी मासिक पाळी अपवित्र मानून स्त्रीला घरात
बसवलं गेलं, नंतर विज्ञानानं वास्तव समोर 
आणल्यावर  मासिक पाळी ही नैसर्गिक
गोष्ट  मानून स्त्रीला मोकळं करण्यात आलं.
धर्म आणि संस्कृती, धर्म आणि चालीरीती यांच्यातलं नातं लवचीक असतं.  कधी पुरावे सापडल्यामुळं, कधी ज्ञान झाल्यामुळं
तर कधी सोय पाहून माणसानं चालीरीती बदलल्य, यम नियम बदलले, पाप पुण्याचे नियम
बदलले. काही चालीरीती-कर्मकांडं नव्यानं धर्मात घुसवली  तर काही चालीरीती धर्माच्या शिकवणुकीतून काढून
टाकल्या. धर्म-संस्कृती-चालीरीती-कर्मकांडं  या गोष्टींतलं नातं लवचीक असतं. काही
धर्मात  लवचीकता टिकते,  काही धर्मात ते नातं ताठर रहातं. त्या त्या
धर्मातल्या लोकांची काळाबरोबर  जाण्याची
तयारी किती असते यावर लवचिकता टिकते.
  बहुतेक वेळा व्यवहार  समजलेली माणसं व्यवहारात लवचीक असतात परंतू
काही कारणानं तत्वाच्या बाबतीत ताठर 
रहातात. तिथंच घोळ सुरु होतो. धर्माची तत्व आणि लोकांचं धर्माचरण  यात दुफळी निर्माण होते. आज कित्येक
मुस्लीम  देशांत माणसं सर्रास दारू पितात,
व्याज बट्टा करतात, कुराणात सांगितलेल्या अनेक गोष्टींच्या विपरीत वागतात. तेच
हिंदूंच्या बाबतीत  घडतं आणि जैनांच्या
बाबतीतही. कित्येक जैन माणसं घराबाहेर 
जाऊन दारू पितात, जुगार खेळतात, मांसाहार करतात, स्त्रीच्या  बाबतीत धर्मानं सांगितल्यापेक्षा वेगळं आचरण
करतात. आज देशात भ्रष्टाचार करून शोषण करणाऱ्यांत कित्येक  जैन आघाडीवर 
आहेत. अपरिग्रहाचा सिद्धांत 
मांडणारे कित्येक जैन जाम पैसा करतात, 
वापरतात, उपभोगतात आणि दाखवण्यासाठी दानधर्म करतात, देवळं बांधतात.
2500 वर्षांपूर्वीच्या वास्तवात
त्या त्या काळातल्या विचारवंतांनी जे जे मांडलं ते आज लागू पडत नाही. याला त्या
विचारवंतांना जबाबदार धरता येत नाही, परिस्थितीचा तो परिणाम असतो. आता दर दहा
वर्षांनी समाज बदलू घातला आहे.
 तेव्हां वास्तव लक्षात घेऊन कोणत्याही  धर्मातले लोक कसे वागतात हा मुद्दा आहे.
चालीरीती म्हणजे धर्म नाही. एकाद्या माणसानं मांस खाल्लं आणि मद्य प्याला तरी
तो  जैन असायला हरकत नाही. माणसानं समाजात
कसं वागावं याचं मूलतत्व सांभाळलं तर तो काय खातो, काय पितो, कोणते कपडे घालतो,
कोणतं संगित ऐकतो या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात. अर्थात हे पृथ्वीतलावरच्या
सर्व माणसांना लागू असायला हवं, पाळता यायला हवं.तसं घडण्यासाठी  सर्व धर्मीय म्हणतात तसं धर्माचं एकादं मूलतत्व
असायला हवं, जे काळाच्या ओघात बदलायचं कारण 
नसेल.
 असं तत्वं कोणतं? सर्वांना जगण्याचा अधिकार
आणि  स्वातंत्र्य असणं, सर्व माणसं समान
असणं. माझ्या घरासमोर  चिकन,मटन, मासे
विकण्याचा अधिकार असणं आणि मी ते न खाणाऱ्या माणसानं त्यासकट जगणं. दोन्ही बाजूनी
समजुतीनं मार्ग काढणं.
जबरदस्ती न करता, भीती न
घालता, समजुतीनं मार्ग काढणं हे तत्व देवाधर्माशिवाय लोकशाहीत सांगता येतं.
लोकशाही पाळत  असताना कोणी  धर्म पाळला तर ना असायचं कारण नाही. फक्त
इतरांचे अधिकार, इतरांचं स्वातंत्र्य यांच्याशी दादागिरी न करता जुळवून घेता आलं
पाहिजे. लोकशाहीचं मुख्य मर्म ‘लोक’ या गोष्टीत आहे. कसं  जगायचं हे
लोक ठरवतात, कित्येक शतकापूर्वी घडलेल्या गोष्टी, विचार, आदेश, नियम इत्यादी
गोष्टी लोकशाहीत माणसं सांभाळून हाताळतात, काळसंमत असं हित स्वतः शोधतात,ठरवतात.
पंचवीसशे वर्षांपूर्वी, दोन
हजार वर्षांपूर्वी, चौदाशे वर्षांपूर्वी. भारतात, मेसापोटोमियात, पॅलेस्टाईनमधे,
सौदी अरेबियात. परिस्थिती वेगळी, जगणं वेगळं, माणसं वेगळी, जगण्याच्या वाटा
वेगळ्या, उपासना पद्दती वेगळ्या. ते सारं आताच्या काळात लागू करायचं, जगातल्या इतरांनाही
ते लागू करायचं ही गोष्ट कशी काय स्वीकारायची?
पंचवीसशे वर्षांपूर्वीच्या
गोष्टींचा अभ्यास करायला हरकत नाही. आजच्या काळाचा आणि उद्या येऊ घातलेल्या काळाचा
अभ्यासही तितकाच महत्वाचा. प्राचीनतेचा अभ्यास करणारे थोर आणि आताच्या गोष्टीवर
विचार करणारे म्हणजे त्यांच्या तुलनेत कमी प्रतीचे असं असत नाही.
धर्माचा,तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे थोर, विज्ञान-तंत्रज्ञान-अर्थ इत्यादी
गोष्टींचा अभ्यास करणारे कमी प्रतीचे असं मानणं बरोबर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *