रुवांडात हत्याकांड चाललं होतं. जगातला कोणताही देश ते थांबवायला पुढं येत नव्हता. युनोची पाच पन्नास निःशस्त्रं माणसं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती.त्या पैकी एक, त्याचं नाव एमबाये. डोक्यावर युनोची निळी टोपी. अंगावर निळं बुलेटप्रूफ जॅकेट. एकही शस्त्रं नाही. हा माणूस रक्ताळलेले सुरे आणि बंदूक घेतलेल्या माणसासमोर उभा राहून म्हणे की समोरच्या माणसाला उगाचच मारू नका. एका चर्चमधे तर तिथला पादरीच खुनी झाला होता. हातात कलाश्निकाव घेऊन तो चर्चमधे आश्रयाला आलेल्या निर्वासितांना मारत होता.एक स्त्री आश्रयाला आली. पादऱ्यानं तिच्यावर बंदूक उगारली. बाये मधे पडला. बायेला गोळी घातल्याशिवाय त्या स्त्रीला मारता आलं नसतं. ती स्त्री वाचली.
बाये शेजारच्या सेनेगल या देशातला. ना रुवांडाचा नागरिक, ना हुटू वा टुट्सी या मारामारीतल्या जमातीचा. युनोनं आखून दिलेल्या कामाच्या सीमा ओलांडून त्यानं शेकडो निरपराध माणसांचे जीव वाचवले.
अशाच एका प्रयत्नात दंगलखोरांनी त्याला ठार मारलं.
एक उदाहरण मुझफरनगरमधे नुकत्याच झालेल्या दंगलीचं. तिथं सत्तरेक माणसं मारली गेली, कित्येक जखमी झाली, कित्येकांची घरं जाळली गेली.
आज निवडणुकीत तिथल्या लोकांची मतं मागायला काँग्रेस, समाजवादी, बसपा, भाजप इत्यादी पक्षांचे नेते सरसावले आहेत. दंगल झाली तेव्हां या पक्षातल्या पुढाऱ्याना पोलिस संरक्षण होतं, बंदुकधारी पोलीस त्यांच्याबरोबर होते. ते लोक दंगलग्रस्तांचे प्राण वा संपत्ती वाचवायला गेले नाहीत. मरणारा किंवा मारणारा आपल्या बाजूचा आहे की नाही याचीच चौकशी करत गप्प राहिले, नव्हे भाषणं करत राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *