मोदींची स्वच्छता मोहिम

मोदींची स्वच्छता मोहिम

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेची बरीचशी सुलट आणि काहीशी सुलट चर्चा झाली. ते स्वाभाविक होतं. ते सहाच महिन्यांपूर्वी पूर्णबहुमत एकट्याच्या बळावर मिळवलेल्या एका लोकप्रिय पंतप्रधानानं केलेलं आवाहन होतं. भाजपी मोदी समर्थकांचा पाठिंबा होताच. भाजपी नसतांना इतर कारणांसाठी मोदींना पाठिंबा दिलेल्या लोकांचाही पाठिंबा मिळाला कारण गांधीजींच्या नावानं, गांधीजींचा चष्मा हे एक जाहिराती चिन्ह वापरून आवाहन केलेलं होतं. एकादा माणूस चांगली गोष्ट सांगतोय तर त्याला पाठिंबा कां देऊ नये असंही लोकांचं मत होतं.   
अशी आवाहनं केली जातात, विसरली जातात.  ही भारताची परंपरा आहे हे माणसांच्या मनोमनी होतं. भावनात्मक आणि प्रतिकात्मकतेची सवय भारताला आहे हे माहित असून, मोदी यांच्याबद्दल संशय आणि विरोध असूनही अनेकांनी पाठिंबा दिला.
मुंबईत मोदींनी रेस कोर्सवर भाषण केलं.  स्वच्छता आंदोलनाचा उल्लेख करून लोकांनी परत जातांना आपापला कचरा बरोबर घेऊन जावा असं सांगितलं. सभा आटोपली, रेसकोर्सवर कचराच कचरा. दसऱ्याच्या दिवसानंतर मुंबईतल्या चौपाटीवर कचराच कचरा. म्हणजे भाषण, शपथ आटोपल्यावर दुसऱ्या क्षणापासून अस्वच्छता जागच्या जागी.
या मनाला भोकं पाडणाऱ्या वास्तवामागची कारणं कोणती? 
मुंबईतलं रेसकोर्स असो की चौपाटी. दोन्हीकडला कचरा निदान दुसऱ्या दिवशी आणि नंतर कायमचा घालवायची जबाबदारी भाजपची माणसं घेऊ शकत नाहीत. कारण ती भाषणापुरती गोळा होतात, भाषणं आटोपल्यावर दुसऱ्या दिवसापासून अस्वच्छ भारतीय नागरीक होतात. त्यांना स्वतःचंच जगणं हे एक ओझं असतं, कचरा गोळा करायला ती वेळ देऊ शकत नाहीत. मोदी भाषणात म्हणाले की आठवड्यातून दोन तास स्वच्छता मोहिमेसाठी द्यावा. व्यवहारात िवचार केला तर फक्त सुटीच्या दिवशी दोन स्वच्छतेसाठी द्यायचे याचा अर्थ आठवडाभर कचरा साठवत रहायचं. एक गंमत आहे. मोदींचा सल्ला मुंबई पालिकेचे लोक आधीपासूनच पाळत आहेत. ते दररोज कचरा साफ करतच नाहीत. ते आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच सफाई करतात.
चांगली भावना बाळगणं, प्रतिकांचा गजर करत रहाणं आणि प्रत्यक्षात एकादी गोष्ट अमलात आणणं यात खूप अंतर असतं. रस्त्यावर पडलेल्या अनाथ माणसाबद्दल सहानुभूती असणं, संबंधित खात्याला फोन करून त्या माणसाची जगण्याची व्यवस्था करणं ही गोष्ट नागरीक करू शकतो. दिसला माणूस की त्याला उचलून पालिकेच्या आसऱ्याला नेणं, तिथं सोय झाली नाही  तर त्याला आपल्या घरी नेणं, नंतर त्याची आपल्या घरातच व्यवस्था लावणं इत्यादी गोष्टी नागरिकाला शक्य नसतात. कितीही माणुसकी असली तरी माणसाला स्वतःचं जगणं चुकत नसतं, व्यवहार चुकत नसतो. म्हणूनच एक तर सरकारकडं वरील काम करणारी एक कार्यक्षम यंत्रणा हवी नाही तर मदर थेरेसा यांनी स्थापन केलेली कार्यक्षम संस्था हवी. थोडक्यात असं की स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या गरजा नीट भागवायच्या असतील तर कार्यक्षम, दर्जेदार, नीट बांधलेली, कधीही न कोसळणारी संस्था हवी. भावना, सदिच्छा यावर ही कामं होत नसतात.
स्वच्छता अभियानाला गेल्या वीसेक वर्षाचा इतिहास आहे. महाराष्ट्रात गाडगेबाबा अभियान झालं, देशाच्या पातळीवरही स्वच्छता अभियान झालं. या मोहिमेत उघड्यावर मलमूत्र िवसर्जन बंद करणं, लोकांनी आरोग्यदायक शौचालयाचा वापर करणं हा मुख्य मुद्दा होता. उघड्यावर मलमूत्र विसर्जन आरोग्याला फारच घातक आहे हा यातला मुख्य मुद्दा होता. केंद्र सरकारनं १९७३मधे कायदा केला, ९३ मधे दुसरा कायदा केला, ९४ साली त्यात सुधारणा केल्या. डोक्यावरून मैला वाहणं हा गुन्हा ठरवला. घराघरात, सार्वजनिक संडास बांधण्यासाठी पैसे उपलब्ध केले, त्यासाठी सरकारात खातं तयार केलं. तरीही आज खेड्यांत ९० टक्के प्रजा उघड्यावर मलमूत्र विसर्जन करत असते.
कारणं कोणती?
 देशाचा आकार पहाता नियोजित रकमा अगदीच अपुऱ्या असतात. करोडो संडास लागतील पण पैसे मात्र काही हजार संडासांसाठी असतात. कमी संख्येनं संडास तयार होतात आणि काही काळानं त्यात बिघाड होतो, त्याच्या बैठका मोडतात. संडास बांधणारी माणसं व्यावसायिक नसल्यानं चुकीच्या रीतीनं बांधतात. संडास लवकर निकामी होतात, माणसं ते वापरेनासे होतात. संडासाची बैठक दुरुस्त करण्याएवढेही पैसे नसल्यानं माणसं संडास नादुरुस्त झाल्यावर उघड्यावर जाणं सुरु करतात.
या कामांसाठी   नेमली जाणारी माणसं संख्येनं कमी असतात. त्यांच्यावर संडास बांधणं, ते दुरुस्त करणं, कायदा न पाळणाऱ्यांवर कारवाई करणं, लोकांचं प्रबोधन करणं इत्यादी साऱ्या जबाबदाऱ्या असतात. सारी  कामं करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ आणि पैसा सरकारजवळ नसतो. किंवा सरकारजवळ तसा पैसा असतो पण तो या कामी पूर्णपणे लावण्याची सरकारची तयारी नसते. यात आणखी एक भानगड आहे. सरकारमधे काम करणारी माणसं कामचुकार असतात असा सार्वत्रिक अनुभव आहे. (कदाचित तो एकूणच भारतीय अवगुण असेल ). मिळणारे पैसे अपुरे आहेत, सवलती अपुऱ्या आहेत इत्यादी इत्यादी गोष्टी सांगून माणसं काम करणं टाळतात. मग सरकार हे काम बाहेरच्यांना, कंत्राटींना देतं. कंत्राटी लोकही भारतीयच असल्यानं ती माणसंही नाना सबबी सांगत कामं करत नाहीत. परिणामी अस्वच्छता शिल्लक रहाते.
उत्तर प्रदेशातल्या मुझफरनर जिल्ह्याचे अभ्यास उपलब्ध आहेत. तिथं ०९ ते ११ या तीन वर्षात ४७ हजार संडास बांधले गेले. प्रत्यक्षात आवश्यकता होती किमान ४ लाख संडासांची. गेल्या दोन वर्षात २६००  संडास बिघडले, मोडले, वापरणं बंद झालं. 
संडासाला दोन कप्पे असावेत, एक कप्पा भरला की दुसरा सुरु करायचा. दुसरा भरेपर्यंत पहिल्या कप्प्यातल्या मैल्याचं उत्तम खत तयार होतं. अशा रीतीनं संडास कायम चालत रहातात.असं हे डिझाईन. एक मीटर खोलीचे कप्पे.  बांधकाम करणारे कंत्राटदार पुरेसे तंत्रसाक्षर नसल्यानं दोन तीन मीटर खोलीचे कप्पे तयार केले. परिणामी कप्प्यातल्या मैल्याचं रूपांतर खतात न होता, मैला सडून अनारोग्य झालं. परिणामी लोकांनी ते वापरणं सोडलं. बैठकी मोडल्यानंही संडास बंद पडले.
मेहेतर समाजातली माणसं, विशेषतः स्त्रिया, मैला उचलतात. मैला टोपलीत भरून डोक्यावर घेतात आणि गावापासून दूर तीन चार किमी अंतरावर नेऊन टाकतात. ( गावातलं अनारोग्य दुसऱ्या गावाच्या हद्दीत पोचतं.) सरकारनं मैला वाहणं हा गुन्हा ठरवला. मेहतर स्त्रियांना पकडलं गेलं, काही काळ तुरुंगात ठेवलं. तुरुंगाच्या बाहेर आल्यावर त्या महिला पुन्हा मैला वाहू लागल्या. कारण घरोघरी पाटीचे संडास शिल्लकच होते. या मेहेतर घरामधे रोजगार नाहीत. त्यांना ते अस्वच्छ आहेत म्हणून रोजगार दिले जात नाहीत. मेहेतर स्त्री १५ घरांचा मैला वाहून नेते आणि घरामागे तिला ६० रुपये आणि एक किलो गहू दरमहा मिळतो.  पुरुष काम करत नाहीत, दारुच्या नशेत दिवस काढतात, मुलं निर्माण करतात, आपल्या दारूची आणि कुटुंब जगवण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकतात. 
उत्तर प्रदेशात विधवेला ३०० रुपये महिना पेन्शन मिळतं. अभ्यासात नोंद झालेल्या मेहेतर स्त्रीला २०१३ पर्यंत दहा वर्षं पेन्शन मिळालेलं नाही.
हे आहे वास्तव. प्रत्येक राज्यातल्या ‘संस्कृतीनुसार’ वास्तवाचे तपशील बदलतात.
मोदींना हे वास्तव माहित आहे कारण ते कार्यकर्ता ना नात्यानं वीसेक वर्षं खेड्यांत फिरलेले आहेत. काँग्रेस, समाजवादी, बहुजन समाज, राष्ट्रवादी इत्यादी नेत्यांनाही हे वास्तव माहित आहे. या वास्तवातून वाट काढण्यायेवढी कल्पनाशक्ती,इच्छाशक्ती आणि शक्ती त्यांच्याकडं नाही. निवडणुक जिंकण्यावर सारी शक्ती लावली जाते. शक्ती वाढते ती पक्षांची आणि पुढाऱ्यांची, देशाची नाही. भावना आणि सदिच्छा या पलिकडं बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत ही गोष्ट भारतीय मनाला अजून पटलेली नाही इथं खोच आहे.
मोदी आणि त्यांचा भाजप हा भारतातल्या वरील राजकीय वास्तवाचाच एक भाग आहेत. दिल्लीत मंत्री लोक झाडू घेऊन बाहेर पडले. काही ठिकाणी पाच दहा कागदाचे कपडे मुद्दाम फोटोत यावेत म्हणून टाकले गेले आणि अभियानाचा गाजावाजा केला गेला. त्याच दिल्लीत अनंत ठिकाणी जमिनीखाली दहा फूट खोलीची आणि जमिनीवर चार पाच फूट उंचीची महाभयानक घाण होती. मोदी, मंत्री, नोकरशहा तिथं गेले नाहीत. कारण तिथं झाडू कसला मारताय माणसाला पायही ठेवता येत नाही.
मोदींनी जे केलं त्याला नाटक म्हणायचं काय? तसं म्हटलं की मोदी समर्थकांना राग येणार. भोळसट मध्यमवर्गीय जनता हळहळणार. निदान प्रतिकात्मक बोलणं तरी काय वाईट आहे असं बहुटक्के लोकांना वाटणार. मोदी नाटक करत नाहीयेत. मोदींच्या हाती दुसरं काही नाहीये ही मुख्य अडचण आहे. मोदींची स्वच्छतेची इच्छा असेल आणि आहे. ते नाटक असायचं कारण नाही.  
इच्छेनं भागत नाही, व्यवस्था उभाराव्या लागतात  ही समज भारतीय जनमानसात फार क्षीण आहे. व्यवस्था, संस्था या पेक्षा उपकार, दान, सेवा अशा अल्पजीवी, वरवरच्या, प्रश्नांतून कायमची वाट न काढणाऱ्या गोष्टींची ओढ भारतीय मानसाला आहे. मोदी त्याच जनमानसात वाढलेले आहेत ही अडचण आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *