दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी

दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी

Apocalypse: The Second World War.
सहा भागातली पाच तास वीस मिनिटांची मालिका. दुसऱ्या महायुद्धावरची डॉक्युमेंटरी. सध्या नेट फ्लिक्सवर पुन्हा पाहिली जातेय. पुन्हा अशासाठी म्हणायचं की ही मालिका २००९ साली तयार झाली.  युरोपातल्या बहुतेक सर्व भाषांत तिच्या प्रती निघाल्यात. लोकांना ही डॉक्युमेंटरी आवडतेय. साधारणपणे त्याच वर्षी दुसरं महायुद्ध याच विषयावर  World War II In HD Colour ही  १३ भागात पसरलेली १० तास ३३ मिनिटांची मालिका प्रकाशित झाली होती. 
अपोकलिप्स लोकांना आवडतेय कारण त्या मालिकेत दुसरं महायुद्ध हा  महाविषय सव्वापाच तासात चित्रपटाच्या दर्जानं दाखवला  गेलाय. इंग्रजी भागाचं एक वैशिष्ट्यं असं की मार्टिन शीन या नामांकित नटाच्या आवाजात या डॉक्युमेंटरीचं निवेदन आहे.
अपोकलिप्सबद्दल ऐकण्याआधी महायुद्ध आणि डॉक्युमेंटरी विषयी आधी थोडं ऐकणं बरं.
।।
दुसऱ्या महायुद्धानं एक नवीन जग जन्माला घातलं.  
सहा कोटी माणसं मेली. सुमारे तीस देशातली. किती कोटी जखमी झाले आणि किती कोटी विस्थापित झाले ते ठरवणं कठीण. जपान आणि जर्मनी बेचिराख झाले, पुन्हा उत्तम उभे राहिले. साम्राज्यं कोलमडून अनेक देश स्वतंत्र झाले. युरोपियन युनियन आणि विश्व व्यापार-वित्तव्यवस्था या दोन विचारांना चालना मिळून अनेक नव्या संस्था निर्माण झाल्या. युद्धानंतर कम्युनिझम आणि  भांडवलशाही यांच्यात शीत युद्ध सुरु झालं. चित्रकला, कविता, कादंबरी, सिनेमा या प्रांतात खूप नव्या कलाकृती निर्माण झाल्या. 

दुसऱ्या महायुद्धानं अमेरिका आणि युरोपीय चित्रपट जगाला न संपणाऱ्या कल्पनांचा खजिना  दिला. आजही दुसऱ्या महायुद्धावर सिनेमे निघत असतात. सेविंग प्रायव्हेट रायन हा अनेक ऑस्कर मिळवणारा सिनेमा युद्ध संपल्यानंतर पन्नास वर्षँ उलटून गेल्यानंतरही स्टीवन स्पिलबर्गला करावासा वाटला.
पहिल्या महायुद्धानं डॉक्युमेंटरी या चित्रपट प्रकाराला चालना आणि वेग दिला. चित्रपट निर्मितीतली तंत्रं आणि यंत्रं वेगानं सुधारू लागली त्याच काळात पहिलं महायुद्ध सुरु झाल्यानं डॉक्युमेंटरी ही चित्रपट निर्मात्यांना एक पर्वणी ठरली.
 दुसरं महायुद्ध सुरु झालं त्या सुमाराला नव्या लेन्सेस बाजारात आल्या होत्या, विमानातून चित्रीकरण करणारे कॅमेरे निर्माते वापरू लागले होते. लेन्स आणि कॅमेऱ्याला पावसापासून, पाण्यापासून वाचवण्याची सोय झाली होती. समुद्रात बुडकी मारून चित्रीकरण करण्याचंही तंत्र विकसित झालं होतं. जीपवर कॅमेरा ठेवून ट्रॉलीशॉटसारखं चित्रीकरण केलं जाऊ लागलं होतं.
 नवी तंत्रं फीचर फिल्ममधे वापरणं हे महा खर्चाचं काम होतं. युद्ध ही आयतीच संधी निर्मात्याना मिळाली. बाँब फुटत होते, बोटी बुडत होत्या, बाँबवर्षाव होत होता, रॉकेटं कोसळत होती. सारं काही चित्रपटात सेट लावल्यासारखं घडत होतं. नव्या तंत्रांचे आणि यंत्रांचे प्रयोग करण्याची संधी चित्रपट निर्मात्यांना मिळाली.   
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार झालेल्या बऱ्याचशा डॉक्युमेंटऱ्या  युद्धात गुंतलेल्या सरकारांनी केल्या. प्रचार करण्यासाठी. आपलंच म्हणणं कसं खरं आहे, आपले सैनिक कसे शूर आहेत, आपलं सैन्य किती संकटांना तोंड देत विजय मिळवतंय हे जनतेला दाखवण्यासाठी. अनेक हौशी छायाचित्रकारही शूट करत होते. त्या वेळी २५ एमएमचे कॅमेरे बाजारात आले होते. लग्नं, पार्ट्या, पर्यटन इत्यादी व्यक्तिगत घटना चित्रीत करून हौसेनं आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दाखवण्याची टूम त्या काळात सुरू झाली होती. त्यामुळं अनेकांनी युद्ध काळातल्या घटनांचं जमेल तसं चित्रीकरण केलं होतं.

युद्ध संपल्यानंतर प्रचाराचा संबंध नसणाऱ्या स्वतंत्र डॉक्युमेंटऱ्या निघू लागल्या.   दोन प्रकार.  एका प्रकारात युद्धाच्या निमित्तानं पुढं आलेले विषय घेऊन त्यावर डॉक्युमेंटऱ्या  झाल्या. विषय युद्धाचा. पण युद्धाच्या काळातली दृश्यं त्यात वापरलेली नसत. युद्धानंतर केलेली युद्धाचा काळा वाटावा अशी चित्रणं त्यात वापरली गेली. या चित्रपटांना डॉक्यूमेंटरी अशा साठी म्हटलं जायचं की त्या वास्तवावर आधारलेल्या होत्या. चित्रीकरण मात्र वास्तव नव्हतं. 
उदा. अॅन फ्रॅंक रिमेंबर्ड हा चित्रपट १९९५ साली तयार झाला आणि त्याला १९९६ साली डॉक्युफीचर या प्रकारातलं ऑस्कर मिळालं. अलीकडं या प्रकाराला डॉक्युड्रामा असंही म्हणतात. अॅन फ्रॅक ही ज्यू मुलगी कॉन्संट्रेशन कँपमधे, छळछावणीत होती.  तिच्या बरोबर आणखी सोळा लाख छोट्या मुलीही छळछावणीत मारल्या गेल्या. हिटलरनं उभारलेल्या छळछावण्यात  मारले गेलेले लक्षावधी ज्यू दुसऱ्या महायुद्धाचे अविभाज्य भाग झाले असल्यानं तो विषय डॉक्यूमेंटरी या सदरात मोडत होता. अॅन फ्रँकनं छळछावणीत असताना डायरी लिहिली होती. ती नंतर प्रसिद्ध झाली.   जगातल्या गाजलेल्या साहित्यात त्या डायरीची गणना होते.   ते साहित्य होतं आणि एक डॉक्युमेंटही.  डायरीचे ६० भाषांत अनुवाद झाले.  चारेक कोटी प्रती संपल्या.  डॉक्यूफीचरमधे तिच्या डायरीतली पानं, तिचे फोटो, तिनं उल्लेख केलेल्या माणसांचे फोटो इत्यादी गोष्टी वापरून फिल्म तयार केलीय. अॅन फ्रॅक, तिच्या डायरीतली पात्रं इत्यादी भूमिका अभिनेत्यांनी रंगवल्या आहेत. 
अशा प्रकारच्या वास्तवावर आधारलेल्या शेकडो डॉक्यूफीचर  फिल्म्स तयार झाल्या. आजही त्या पाहिल्या जातात.
दुसरा प्रकार म्हणजे युद्धाच्या काळात केलेलं फूटेज वापरून तयार केलेल्या डॉक्यूमेंटऱ्या. हौशी आणि व्यावसायिक व्यक्तींनी घेतलेलं फूटेज त्यावर संस्कार करून या डॉक्युमेंटऱ्यांत मांडण्यात आलं. त्या काळात केलेलं बहुतेक चित्रीकरण काळंपांढरं होतं. कित्येक वेळा धावपळीत चित्रीकरण करावं लागल्यानं ते अस्पष्ट होतं, पिक्सेलेट झालेलं होतं, त्यातले ग्रेन्स फाटलेले होते. ते चित्रीकरण जसंच्या तसं दाखवण्यात गंमत नव्हती. २००८-२००९ या काळात चित्रपटांचं दृश्यमूल्यं इतकं पुढं गेलेलं होतं की १९४० सालचं चित्रीकरण पहाताना मजा येत नव्हता. युद्धाचं नाट्य काळ्या पांढऱ्या रंगात ‘ रंगत ‘ नव्हतं. 
 ‘ सेविंग दी प्रायव्हेट रायन ‘ हा   स्पिलबर्गनं तयार केलेला अत्यंत देखणा डॉक्यूड्रामा पहा. काळ्यापांढऱ्या रंगात त्याच विषयावर १९६२ साली डॅरियल झनुकचा ‘ लाँगेस्ट डे ‘ पहा. देखणेपणात जमीन आस्मानाचं अंतर आहे.   आताच्या काळात पिक्सेलेट झालेली, अस्पष्ट दृश्यं पहायला प्रेक्षक तयार होत नाहीत.  
 महायुद्धासारखा विषय, डॉक्यूमेंटरीच्या रुपात दाखवायचा आणि तो २०१० सालच्या माणसाला पहावासा वाटायला हवा हे एक मोठं आव्हान होतं. अपोकलिप्सनं ते पेललंय.
।।
अपोकलिप्समधे  १९४०-४५ सालातलातल्या चित्रीकरणावर संस्कार केले आहेत. जुन्या चित्रपटाच्या फिल्मा मिळवल्या, त्या डिजिटाईज केल्या,  त्यातले फाटलेले ग्रेन्स एकत्रित केले, काळ्या पांढऱ्या फ्रेममधे रंग भरले. नवी सॉफ्टवेअर आणि यंत्रं वापरल्यामुळं ते शक्य झालं. 
तसं पाहिलं तर ते सॉफ्टवेअर आणि यंत्रं कोणालाही उपलब्ध आहेत. पण ती वापरण्याचं कसब हवं. सफाई हवी.  रांधा एकच असतो. पण एकादा सुतार तो इतक्या सफाईनं वापरतो की  लाकूड आरशासारखं होतं.
अपोकलिप्समधे भरलेले चित्राचे रंग ताज्या चित्रीकरणासारखे आहेत, अगदी कालपरवा युद्ध झालंय आणि स्पिलबर्गनं त्याचं चित्रीकरण केलंय असं वाटतं.
अपोकलिप्सचं वैशिष्ट्यं म्हणजे सामान्यपणे लोकांना न दिसलेलं असं खूप नवं फूटेज त्यांनी वापरलंय. ६०० तासाच्या फूटेजमधे ७५ टक्के फूटेज दुर्मिळ या वर्गातलं आहे असा निर्मात्यांचा दावा आहे. तो दावा खरा असावा असं अपोकलिप्स पहातांना जाणवतं. हिटलर मुलांमधे मिसळतांना, हिटलर जिथं शिकला होता त्या शाळेत गेला असताना, हिटलर आपल्या कुटुंबिंयामधे वावरतांना इत्यादी फूटेज या डॉक्युमेंटरीत आहे. यातलं बरंचसं फूटेज हिटलरच्या जवळच्या माणसांनी हौसेखातर केलेलं फूटेज असल्यानं ते आजवर वापरलं गेलं नव्हतं.
युद्ध म्हटलं की गोळीबार, बाँबफेक, जळती घरं, उध्वस्त इमारती, बंदूक उगारेल्या माणसाचा क्लोज अप इत्यादी गोष्टी दिसतात. परंतू युद्ध त्याच्या पलिकडं खूप असतं. सैनिक नुसते माणसं मारत असतात असं नव्हे. सैनिक चहुकडं बर्फ पसरलेलं असताना  कपडे काढून अंडरवेअरवर नाच करताना अपोकलिप्समधे  दिसतात. सैनिक पायांना चिंध्या बांधून चिखलातून जाताना दिसतात. ऐन युद्धात सेनापती आपल्या कुटुंबासह वाढदिवस साजरा करताना दिसतो. फोटोग्राफर कॅमेऱ्याला चेहरा खेटून चित्रीकरण करत असताना त्याचे हात, तोंड, टोपी, कॅमेरा इत्यादी सारं काही माशांनी भरलेलं दिसतं. कुटुंबं घोडागाडीत सामान भरून दुसऱ्या गावात निघालेली दिसतात. शिक्षिका छोट्या मुलांना गाणं शिकवत असते आणि बाँब पडून तो वर्ग नष्ट झालेला दिसतो. युद्ध ऐन भरात असताना जर्मनीत   मार्लिन डिट्रीक ही प्रख्यात अभिनेत्री नाईट क्लबमधे दिसते.
लंडनच्या उपनगरातला एक माणूस. त्याची मुलगी ‘ रोज ‘ दोन वर्षाची असतांना त्याच्या हाती कॅमेरा येतो.हौसेनं तो समोर दिसेल त्या गोष्टीचं चित्रीकरण करत असणार.  तो आपल्या प्रिय मुलीचं चित्रीकरण सतत करत असतो.  तिचा वाढदिवस. तिथं बागेत फिरणं, तिचं घरात वावरणं वगैरे. युद्ध सुरु झालं तेव्हां रोज आकाशात फिरणाऱ्या बाँबर विमानांकडं पहात रोज घाबरून पहात असते. रोजचा पिता तिला सांगतो घाबरू नकोस ती आपलीच विमानं आहेत. ती विमानं जर्मनीची असतात आणि बाँब फेकतात. बाँबिगची रेड संपते.माणसं  रस्त्यावर पसरलेला राडारोडा दूर करून रस्ता मोकळा करू लागतात. रोज त्या खटपटीत सामील होते. या सगळ्याचं चित्रीकरण पित्यानं केलं. युद्ध संपतं. रोज  एका निकामी होऊन पडलेल्या बाँबवर युद्ध संपलं असं लिहितांना दिसते.
अपोकलिप्समधे  सैनिक, सैनिकांच्या बायका, छोटी मुलं, ज्यू माणसं, यांचे किती तरी क्लोज अप्स आहेत. बहुदा हे क्लोज अप्स हौशी फोटोग्राफरनी घेतले आहेत. या क्लोज अप्सचं दृश्य मूल्य अचाट आहे. 
रोज नावाची छोटी मुलगी, क्लोजअपमधली माणसं, शहरांत फिरणारी माणसं, विस्थापित झालेली माणसं पहातांना कळतं की युद्ध म्हणजे केवळ सैनिक आणि शस्त्रं नव्हेत. युद्दाचा परिणाम केवळ सैनिकांवरच होतो असं नव्हे. युद्धात सारं जग होरपळतं. युद्धाची व्याप्ती या दृश्यांवरून लक्षात येते. ही डॉक्यूमेंटरी युद्धाकडं एका वेगळ्या दृष्टीनं पहायला लावते.
मार्टिन शीनचं इंग्रजी आवृत्तीचं निवेदन ऐकण्यासारखं आहे. ऐकताना प्रेक्षक दृश्यांपासून दूर जात नाही. निवेदनात अभिनिवेश नाही, आपलं कसब दाखवण्याचा खटाटोप नाही. निवेदनाचं हे कसब स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखं आहे.
अर्नेस्ट हेमिंग्वे युद्धाच्या ठिकाणी गेला होता, युद्ध अनुभवण्यासाठी. युद्धानंतर त्याची दृष्टीच बदलली.
अपोकलिप्स ही मालिका निर्मात्यांनी फोटोग्राफर्सना अर्पण केलीय ती उगाच नव्हे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *