लातूरचे जयंत वैद्य गुरुजी गेले

लातूरचे जयंत वैद्य गुरुजी गेले

लातूरचे जयंत वैद्य, वैद्य गुरुजी, गेले.
सुरवातीला काही दिवस त्यांचं शरीर त्यांना साथ देईनासं झालं. नंतर त्यांचं मन आणि मेंदूही त्यांना मदत करेनासे झाले होते.
वैद्य गुरूजी मुळातले लातूरचे नव्हेत. स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे यांच्या आग्रहाखातर ते लातूरच्या पॉलिटेक्निकमधे शिकवण्यासाठी रुजू झाले. काही काळ शिकवलं खरं पण नंतर त्यांनी स्वतःचा मोटार रिवाईंडिंचा व्यवसाय सुरु केला. खरं म्हणजे शिकवणं आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी त्यांच्या रक्तात नव्हत्या. अभ्यासाअंती त्यांचे काही सामाजिक, राजकीय इत्यादी विचार तयार झाले होते. एक तरफी. त्या विचारांवर ते घट्ट होते. त्या विचारांपुढं ज्याला आपण दैनंदिन जीवन म्हणतो त्यात त्यांना रस नव्हता. ना पैसे मिळवण्यात रस होता ना संसार चालवण्यात. आपल्या विचारांचा अतिरेकी पाठपुरावा करत करत ते जगले. तंत्रज्ञान हा त्यांचा विषय. भारत किंवा हिंदुस्तान किंवा हिंदू प्रजा यांनी उत्पादक तंत्रज्ञान अंगिकारलं नाही त्यामुळंच त्यांचा सत्यानाश झाला असं त्यांना वाटत असे. अगदी आग्रहानं. दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येकाला ते तंत्रज्ञान आणि हिंदू इतिहास या विषयावर पोटतिडीकीनं सांगत असत. त्यामुळंच त्यानी कधी व्यवसायाकडं, जगण्याकडं लक्ष दिलं नाही. त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि आता त्यांची सून ही मंडळी संसारात लक्ष घालत असल्यानंच लौकिक अर्थानं त्यांचा संसार नीट झाला. 
एकदा त्यांच्या पत्नीच्याच आग्रहाखातर त्यांनी घर बांधलं. खरं म्हणजे त्यानी बांधलंच नाही. बांधलं पत्नी आणि मुलानं. तर घरात भिंती हव्यात कशाला. भिंतींएवजी लोखंडी सळ्यांनी खोका पद्धतीनं, गेबियन, बांधा असा त्यांचा आग्रह. म्हणजे काय तर सारं घर पारदर्शक, अपारदर्शक भिंतीच नाहीत. गेबियन कसं मजबूत असतं, ते किती स्वस्त पडतं इत्यादी गोष्टी ते आग्रहानं सांगत. सुदैवानं त्यांच्या पत्नीनं ते ऐकलं नाही त्यामुळं चार चौघांसारखं त्यांचं घर उभं राहिलं.
वैद्य गुरुजी समाजवादी होते. त्यांचा सारा वेळ पक्षासाठी खर्च होत असे. निवडणुका आल्या की वैद्य गुरुजी भयंकर संतापत. वैचारिकतेचा अभाव असलेले कार्यकर्ते, फालतू नेते यांच्यावर त्यांचा राग होता. कारण त्यांना एक आदर्श समाजवाद आणायचा होता. त्यांचा राग सतत अर्वाच्च्य शिव्यांतून व्यक्त होत असे.
 प्रोफेशनल पद्धतीनं काम करण्याची सवय असल्यानं आमदार बापू काळदाते यांचं आमदारकीचं ऑफिस त्यांनी सांभाळलं. बापूसाहेब आमदार या नात्यानं लोकलेखा समितीवर होते. त्या वेळी वीज महामंडळाची चौकशी चालली होती. वैद्य गुरूजी स्वतः निष्णात आणि अभ्यासू इलेक्ट्रिकल इंजिनयर असल्यानं त्यांनी वीज खात्याची मापं काढली. सरकार आणि  वीज मंडळाची हबेलंडी उडाली. बापूसाहेबांसाठी वैद्य गुरुजी प्रश्न तयार करत असत. ते इतके भेदक असत की विधानसभेत सरकारचे वांधे होत असत.
 एकदा काही शेतकरी त्यांच्याकडं आले. जमीन अधिगृहण खात्यानं त्यांची जमीन अन्याय्य पद्धतीनं घेतली होती. गुरुजींनी कागदपत्रं पाहिले. शेतकऱ्यांना म्हणाले चला. गुरुजी उठले. ताड ताड चालत खात्याच्या कार्यालयात पोचले. त्या काळात लातूरमधे पायानं चालवलेल्या रिक्षा होत्या. त्या रिक्षेची वाटही न पहाता टळटळीत उन्हात ते तरातरा कार्यालयात पोचले. गुरुजींना पाहून तो अधिकारी हादरला. बसा म्हणाला. चहा मागवतो म्हणाला. गुरुजी कुठं थांबायला तयार होते. त्यांनी त्या अधिकाऱ्यासमोरच्या फायली ओढल्या, टराटरा फाडल्या. ‘ माझं काय करायचंय ते करून घ्या. तुम्ही शेतकऱ्याना नाडता तेव्हां त्याना काय वाटत असेल याची कल्पना करा.’ तो अधिकारी काय करणार बिचारा.
गुरुजींचं वर्कशॉप म्हणजे कार्यालयच होतं. एकेदिवशी संध्याकाळी एक गरीबसा माणूस आला. रस्त्यावर जुगार खेळून लोकांना फसवणाऱ्या एका माणसानं त्या माणसाला लुटलं होतं. गुरुजी हे लातूरमधल्या प्रत्येक अडल्या पडल्याचं आश्रय स्थान असल्यानं तो माणूस ओळख नसतांना गुरुजींकडं आला. गुरुजींनी आधी त्याची हजामत केली. ‘ xxxx xxxx मेहनतीनं मिळालेले पैसे बायकापोरांसाठी न खर्च करता xxxx xxx असे उडवतोस?’. तो माणूस गयावया करत होता. घरी कसं तोंड दाखवू असं म्हणत होता.
गुरुजी तरातरा उठले. एसटी स्टँडवर पोचले. त्या जुगारी माणसाची बखोट धरली. ‘ xxx xxx दे त्याचे पैसे परत.’ तो माणूस गुंड होता. त्याच्याभोवती चार दांडगे गुंड होते. गुरुजींचं धाडस पाहून आसपासची माणसं चकित झाली. पण गुरुजी आलेत असं पाहिल्यावर एसटी स्टेशनचे मॅनेजर, हन्नान, धावत आले. त्यांच्या मागोमाग अनेक मेकॅिनक, कंडक्टर्स वगैरे. ही फौज पाहिल्यावर जुगारी हादरला. त्यानं पैसे परत दिले आणि तिथून पोबारा केला.
एकदा शिवराज पाटील साहेब कुठल्याशा काँग्रेस अधिवेशनाला निघाले होते. पािलकेची जीप घेऊन. बहुदा ती जीपही अँब्युलन्स होती. गुरुजीना कळलं. निघाले. अशोक हॉटेलसमोरच्या चौकात गुरुजींना पाहून ड्रायव्हरनं जीप थांबवली. गुरुजी जीपसमोर आडवे पडले. मग झाली धुमश्चक्री. गुरुजींना उचलण्याचे प्रयत्न. गुरुजी तयार नाहीत. मग जीप बाजूनं काढण्यात आली. गुरुजींनी जीपच्या मागच्या बाजूचा दांडा धरला. हिंदी सिनेमात जसा हीरो गाडीला लटकून फरफटत जातो ते गुरुजी काही अंतर गेले. पण नंतर खरचटलं, जखमी झाले, कपडे फाटले, गुरुजींनी जीप सोडली.
गुरुजींच्या अशा किती किती गोष्टी लातूरमधली मंडळी सांगतील. घरी कोणी बायकोला छळतोय. गुरुजी त्याला झापायला हजर. कोणी दारु पिऊन घराची वाट लावतोय. गुरुजी त्या माणसाच्या शिव्या खात त्या घरी जाऊन त्याला वळणावर आणत.
हा काळ १९६७ नंतरचा. लातूर हे एक लहान गाव होतं. त्याला एक छान गावपण होतं. गावातली माणसं एकमेकांना ओळखत होती. एकमेकांना मदत करत होती. भोचकपणाचा आरोप सहन करूनही माणसं दुसऱ्याचा संसार नीट चालावा यासाठी खटपट करत होती. पैसा नाही. पद नाही. सत्ता नाही. लाठी नाही. गाड्या घोडी नाहीत. काहीही नाहीत. तरीही माणसाकडं आदरानं पाहिलं जाणं, त्याच्याकडं आपुलकीनं मदतीसाठी जाणं, अडल्या पडल्यासाठी त्याच्याकडं जाणं असं घडत असे. गुरुजींबरोबरच गोवंडेसरही होते. दोघांची जोडगोळी होती. दोघेही एका परीनं अतिरेकीच. गुरुजी आक्रमक अतिरेकी, गोवंडे सर आत्मक्लेष करणारे अतिरेकी. 
गुरुजीं आणीबाणीत पावणेदोन वर्षं तुरुंगात होते. अनंतराव भालेराव, बापू काळदाते, भाई वैद्य इत्यादी मंडळी त्यांच्यासोबत तुरुंगात होती. तुरुंगात बसल्या बसल्या करायचं काय. मग गुरुजी व्यायाम करू लागले. किती नमस्कार, किती बैठका आणि काही विचारू नका. तासनतास. त्यांचा व्यायाम पहाणाऱ्यांचा जीव जात असे.
गुरुजी तुरुंगात. वैद्य वहिनींनी त्यांच्या पश्चात वर्कशॉप चालवलं. मुख्य म्हणजे फायद्यात चालवलं. कारण अव्यवहारी गुरुजींनी कधी फायद्याकडं लक्षच दिलं नव्हतं. गरजू माणसांकडून ते पैसेही घेत नसत. कित्येक लबाड माणसं त्यांचे पैसे बुडवत असत. गुरुजींना त्या कश्शाची फिकीर नसे.
गोवंडे सर काही दिवसांपूर्वी गेले तेव्हां वैद्य गुरुजीही आतून हादरले होते. गोवंडे सरांच्या शोकसभेला त्याना बोलता येईना. आधीच ढासळत चाललेली त्याची तब्येत नंतर सतत ढासळतीच राहिली.
एकादी गोष्ट बोडक्यात घेतली की वेड्यासारखं तिच्या मागं लागायचं. व्यवहाराचं भान नाही. अतिरेकीच.
लातूरमधे अशी किती तरी माणसं. काळमानानुसार एकेक माणूस नाहिसं होतंय. 
आजची तरूण माणसं, पुढल्या पिढीतली माणसं, त्यांना ही असली माणसं पहायला मिळायची नाहीत. 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *